गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-२

वाटाड्या...'s picture
वाटाड्या... in जनातलं, मनातलं
20 Dec 2008 - 2:39 am

गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...(१८४९-१९२६) मंडळी, आज मी तुम्हाला अश्या एका संघर्षरत, दिव्य व अस्सल 'खरा सोना' ज्याला म्हणतात अश्या थोर आचार्यांची ओळख करुन देत आहे. मंडळी, माझी फक्त एकच विनंती की या महात्म्याला लाख लाख दुवे व नमस्कार मनातून तरी करा ज्यानं आपल्या मराठी लोकांना एक शान दिली. तर सुरु करु या...भाग -१ वरुन

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर..पुढे....एकदा पंगतीत बुवांनी एक श्लोक म्हटला नी त्याच पंगतीत बसलेले ग्वाल्हेरचे जयाजीराव महाराज बुवांच्या आवाजाने एकदम प्रभावित झाले. (मंडळी, पंगतीत श्लोक म्हणण्याची मजा ज्यांनी घेतली असेल त्यांनाच ते कळणार. आजकालच्या टेबल-खुर्ची जेवणात त्याचा अंशही नाही.) त्यांनी चौकशी केल्यावर जेव्हा गाणं शिकण्याकरता ह्या मुलानं घरदार सोडलं आहे तेव्हा त्यांना बुवांच खुप कौतुक वाटलं. त्यांनी बुवांना बोलावून विचारलं की तुझी सोय दरबार गायक हद्दु खाँ यांच्याकडे करु का? तेव्हा बुवा नम्रतेने म्हणाले

"जोशीबुवांकडची सर्व विद्या मला आली की मी जरुर हद्दु खाँकडे गाणं शिकेन". ह्याला म्हणतात गुरुनिष्ठा. नाहीतर आजकाल जरा संधी मिळतीय म्हटल्यावर काही येईना का जो तो धावतो. पण त्याआधीच दुर्दैवाने हद्दु खाँसाहेब गेले.

ग्वाल्हेरचं शिक्षण पुर्ण झाल्यावर बुवा मुंबईला आले. तेव्हा एके ठिकाणी महंमदखाँचं गाणं होतं. महंमदखाँ हे प्रसिद्ध उस्ताद ख्यालगायक रहमतखाँ ह्यांचे मोठे बंधु. महंमदखाँ व रहमतखाँ हे हस्सु खाँचे चिरंजीव तर हद्दु खाँसाहेब यांचे पुतणे. हस्सु खाँसाहेब व हद्दु खाँसाहेब हे बंधु होत. तर मंडळी, या महंमदखाँची बैठक होतं मुंबईला. तेव्हा गाण्याला रंग चढावा म्हणुन त्यांना लोकांनी भरपुर दारु पाजली. परीणामी महंमदखाँना गाणं जमेना. तेव्हा त्याच जलशात महंमदखाँच्या परवानगीने बाळकृष्णबुवांनी तानांचा अक्षरक्षः पाऊस पाडला. त्यांच गाणं ऐकुन खुद्द महंमदखाँसुद्धा चकित झाले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी बुवांना बोलावुन घेतलं. त्यांच्याशी बोलल्यानंतर खाँसाहेबांनी वासुदेवबुवांना पत्र लिहीलं व परवानगी मागितली कशाला तर बाळकृष्णबुवांना शिष्य म्हणुन ठेऊन घेण्याची. वासुदेवबुवांनी आनंदाने परवानगी दिली. दैव पहा कसं असतं ज्या बाळकृष्णबुवांना एकेकाळी कोणी गुरु ठेऊन घेत नव्हता त्याच बुवांना आता एक एक बडे बडे गुरु, शिष्य म्हणुन मागत होते.

त्याकाळी बुवांचा दिनक्रम साधारण असा असायचा, पहाटे साधारण ४.०० - ४.३० वाजता बुवा खाँसाहेबांच्या घरी पोहोचत व तंबोरा जुळवून छेडण्यास सुरुवात करत. नंतर खाँसाहेब येऊन बसत. नंतर हे गुरु शिष्य सर्वसाधारण ११ तास रियाझ करत. महंमदखाँ नंतर बाळकृष्णबुवांनी वासुदेवबुवांबरोबर बरेच दौरे केले. कलकत्ता व नेपाळचा दौरा विशेष ठरला. नेपाळ नरेशांनी बाळकृष्णबुवांना दरबार गायक म्हणुन नोकरीही देऊ केली होती. पण बुवांनी ती नम्रपणे नाकारली. नेपाळहुन परतल्यावर वासुदेवबुवा अतिसाराने अंथरुणाला खिळले. बाळकृष्णबुवांनी त्यांची अखेरपर्यंत खुप सेवा केली. शेवटी जाताना वासुदेवबुवांनी बाळकृष्णबुवांना आर्शिवाद दिला दिला की "आजवर कोणालाही दिला असा आर्शिवाद मी तुला देणार आहे. तुझ्या गाण्याचा कधीही बेरंग होणार नाही". मंडळी हे लिहीताना हर्षवायुनं एकीकडे मन उचंबळुनही आलयं आणि डोळ्यात पाणीही. कारण बुवांना या क्षणी आपल्या आयुष्याचं सार्थक असणार नक्की. यानंतर वासुदेवबुवा गेले.

नंतर मुंबईहुन बाळकृष्णबुवा हवामान मानवेना म्हणुन मिरजेला आले व स्थायिक झाले. मिरजकर महाराजांच्या दरबारी ते दरबार गायक म्हणुन राहिले.

रहमतखाँ, अल्लादियांखाँसाहेब, अब्दुल करीम खाँसाहेब(आपल्या अण्णांचे गुरु सवाई गंधर्व यांचे गुरु), भास्करबुवा बखले, वझेबुवा या सगळ्यांनी बाळकृष्णबुवांचा अतिशय आदर केला आहे. दरबारात जेव्हा बाळकृष्णबुवा येत तेव्हा संपुर्ण दरबार उठुन उभा रहात. म्हणुन बाळकृष्णबुवा हे गायनातील भीष्माचार्य समजले जातात.

बाळकृष्णबुवांमुळे ही संगीताची गंगा महाराष्ट्रात आली. नाहीतर कशी आली असती? त्यांच्यामुळे विष्णु दिगंबर पलुस्कर घडले. त्यांच्याचमुळे गुडंबुवा, अनंत मनोहर जोशी(औंध), निळकंठबुवा जंगम, वामनबुवा चाफेकर, मिराशीबुवा व त्यांचा स्वतः मुलगा अण्णाबुवा इचलकरंजीकर घडले. हे सगळे शिष्य एका फौजेसारखे होते.

मंडळी, गुरुंचे शाप, नि:र्भ्यस्तना, आर्शिवाद, प्रेम ह्या सगळ्यांतुन तेजाकडे नेणार्‍या या तेजपूंज स्वराला शतशः प्रणाम !!!
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.

छायाचित्र : जालावरून साभार.

विशेष सुचना : मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व.

संस्कृतीसंगीतइतिहाससद्भावनाअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

20 Dec 2008 - 4:56 am | घाटावरचे भट

>>मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व.

माझ्या माहितीप्रमाणे बाळकृष्णबुवांचे कोणतेही ध्वनिमुद्रण अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्या चीजा ध्वनिमुद्रण स्वरूपात मिळण्याची शक्यता नाही. पण लिखित स्वरूपात/नोटेशन मधे जर हव्या असतील तर, पं. विनायकराव पटवर्धनांच्या 'राग-विज्ञान' ही पुस्तक मालेत तुम्हाला काही चिजा मिळू शकतील. किंवा पं. मिराशीबुवांच्या पुस्तकाचे पण २ भाग आहेत (त्यांचं नाव मला आत्ता आठवत नाही), त्यातही तुम्हाला पं. बाळकृष्णबुवांच्या चिजा मिळू शकतील.

शितल's picture

20 Dec 2008 - 5:33 am | शितल

लेखाचा पहिला आणि दुसरा भाग ही खुपच सुंदर झाला आहे.
:)

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 8:07 am | विसोबा खेचर

बाळकृष्णबुवांना दंडवत..!

अत्यंत कठोर परिश्रम करून अत्यंत कष्टसाध्य अशी गानविद्या संपादन करून ती महाराष्ट्रात रुजवायचे फार मोठे काम बाळकृष्णबुवांनी केले, ही मी खूप मोठी गोष्ट मानतो..!

केवळ बाळकृष्णबुवांमुळेच महाराष्ट्रात गाणं आलं, रुजलं, आणि वाढलं!

आजमितीस तर उत्तर हिंदुस्तानी संगीताचा वटवृक्ष महाराष्ट्रातच इतका फोफावला आहे की आज महाराष्ट्रात जितके गाणे आहे तितके भारतात कुठेच नाही, असेही म्हणता येईल अन् ते वस्तुस्थितीला धरूनच असेल!

या सगळ्याचा पाया बाळकृष्णबुवांनी रचला हे निर्विवाद..

तात्या.

वाटाड्या...'s picture

24 Dec 2008 - 3:05 am | वाटाड्या...

उशिराच्या उत्तराबद्दल क्षमस्वः
भटबुवा, तात्याबुवा, शितल, प्राजुतै...सगळ्यांना धन्यवाद....भटोबा..माहीतीकरता पुन्हा एकदा धन्यवाद...आमचे सुरेश अलुरकर गेले अन्यथा काहीतरी मिळवता आले असते...असो..अजुन दोन संदर्भ आहेत पुण्यात..त्यांना विचारावे लागेल...पुढच्या भारतभेटीत नक्की...

पुन्हा एकदा धन्यवाद...

मुकुल...