बाप्पा जेमतेम पंधरवड्यावर येउन ठेपलेले आहेत. त्यामुळे सद्ध्या साफसफाई, आवराआवरीमधे संध्याकाळ आणि जमेल तेवढा वेळ निघुन जातोय. घर आवरायला एवढा वेळ लागतो का वगैरे छापाचे प्रश्ण विचारु नये. आमच्याकडे घर आवरणे हा कार्यक्रम घर शिफ्ट करणे ह्याच्याएवढाचं किंबहुना त्याहुन मोठा असतो. माळ्यावरच्या फक्त गणपतीमधे/ दिवाळीमधे वगैरे लागणार्या वस्तु काढत असताना आमच्या मातोश्रींच्या नजरांना उंची पुरत नसली तरी त्या तिकडच्या मागच्या कोपर्यामधल्या पोत्यामधली कढई आणि त्यामधे ठेवलेली पंचामृताची पंचपळी किंवा तांब्याची मोठी ताम्हनं बरोबर दिसलेली असतात. मग त्या किमान ७५-८० वर्षं जुन्या कढईबरोबरचं त्याहुन जुन्या आईच्या आज्जीच्या म्हणजे माझ्या पणजीच्या आठवणीही येतात. त्या कढईच्या कानावरुन कधीकाळी पणजीचा आणि त्यानंतर माझ्या आज्जीचा सुरुकुतलेला हात फिरलेला असतो तिथे मातोश्रींचे हात थबकतात. महाग झालेल्या आणि नं चिरलेल्या कांद्यातला अमोनिया मातोश्रींच्या डोळ्यामधे जाउन पाणी यायला लागतं. एवढा वेळ चाललेलं वरुन ती ताटं काढ, हा डिनरसेट तिकटे सरकव वगैरे (अत्यावश्यक) सुचना स्वयंपाकघरामधे गायब होतात. हा नित्यक्रम गेली कित्येक वर्षं अगदी नं चुकता चालत आलेला आहे.
दोन दिवसांपुर्वी हा वर्षानुवर्षं चालत आलेला उपक्रम करत असतानाचं आमच्याकडच्या एका फुटक्या सोलर कुकरमधे निमुट पडुन असणारी माझी कोणेएकेकाळची कॉलेजमधली मिसेस कॅप्टन जॅक स्पॅरो दिसली. गेल्या काही वर्षांमधे अगदीचं विस्मरणामधे गेली होती. किंबहुना ती घरामधे असेल हे ही मी विसरुन गेलेलो होतो. आतमधे काय काय आहे हे बघायसाठी सहज खाली काढली आणि अंगणामधे नेउन झाडायला सुरुवात केली. बॅग तशी जड लागत होती म्हणजे आतमधे वस्तु असणार हे तर उघड होतं. बॅगेवरच्या साठलेल्या धुळीमधली काही धुळ साफ केली आणि बॅग घेउन परत घरामधे गेलो. जमिनीवर बसकण मारली आणि हलकीचं एक-एक चेन उघडुन आतमधला माल-मसाला बघायला सुरुवात केली. तत्कालिन पी.एम.टी.चा २००८ सालचा विद्यार्थी पास (च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), कॉलेजचं शेवटच्या वर्षांचं ओळखपत्र, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या परिक्षेचं फाटलेलं प्रवेशपत्र, फ्रेंडशिप बँड्स, स्टीलची फुटपट्टी वगैरे काय काय निघालं त्यातुन. तो कप्पा संपवुन जरा दुसर्या कप्प्याकडे वळालो.
दुसरा कप्पा उघडला. काही कागदपत्रांच्या पार चुरगळलेल्या छायाप्रती होत्या. त्याखाली उत्खनन केल्यावर हाताला प्लॅस्टिकची केस लागली. उपसुन बाहेर काढली तर हातात चक्कं आलं एक सी.डी.चं जुनं फोल्डर आणि त्यामधे जवळपास वीसएक जुन्या सी.डी.ज आणि दोन हेवनवासी झालेल्या बुटेबल फ्लॉपीज सापडल्या. विंडोज ९५, ९८ आणि विंडोज २००० सर्वर एडिशन च्या बुटेबल सीडीज सापडल्या. फोल्डरची अजुन एक-दोन पानं उलटल्यावर हाताला लागला काही वर्षांपुर्वी विस्मरणामधे गेलेल्या काही गाण्यांच्या सी.डी.ज. हाताला लागल्या. सुमारे २००३-०४ मधे राईट केलेल्या. त्यावेळी साधे सी.डी. रायटर्स सर्रास उपलब्ध नसायचे. त्यामुळे एका मित्राच्या गाण्यांची सी.डी. दुसर्याच्या हार्डडिस्कमधे कॉपी करुन नंतर ती हार्डडिस्क चौथ्याच्या (श्रीमंत चौथेसाहेब ह्यांच्याकडे त्यावेळी पेंटीयम-३ का पेंटियम-४ चा अत्याधुनिक संगणक होता. ;))घरी नेउन त्याच्या मिनतवार्या करुन, त्याला हरबर्याच्या झाडावर चढवुन सी.डी. राईट करायचा काळ होता तो. वरती Favorite Superhits-04 वगैरे लिहिलेलं नावं पाहुन ती सी.डी. उलटी केलेली. चकचकीत बाजु बर्यापैकी चकचकीत आहे हे बघुन पटकन डिव्हीडी रायटर ड्राईव्हमधे टाकली. सी.डी. रॉमचा आवाज हळुहळु वाढत जातो आणि नंतर एकदम बंद होतो असं चार पाच वेळा झालं तरी सी.डी. रिड व्हायला तयार नाही. शेवटी सी.डी. चक्क साबणाने धुतली, वाळवली आणि परत ड्राईव्हमधे टाकली. ह्यावेळी चक्क ऑटोरनमधे विनअँपचा ओळखीचा पॉपअप आला. दिल खुश हो गया जी.
विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले. मिनिटभर हँग होउन नंतर विनअँप ओपन झालं. प्लेलिस्ट वर एक नजर टाकताच एकदम नॉस्टॅल्जिक फिलिंग आली. ही सी.डी. म्हणजे त्या काळामधली होती ज्या काळामधे मी नुकतीचं इंग्रजी गाणीसुद्धा ऐकायला सुरुवात केलेली होती. ह्या सी.डी. मधे हिंदी, मराठी आणि इंग्रजी गाण्यांची अतिशय चविष्ट खिचडी आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे गाण्यांची सुरुवात सुर मधल्या "आ भी जा, आ भी जा" गाण्यानी झाली. व्वा!! व्हायोलिन आणि लकी अलीचा आवाज ऐकुन काय वाटलय म्हणुन सांगतो. विनअँप शफल ला टाकुन इकडे मिपावर ऑनलाईन आलो. इकडे दोन-चार ठिकाणी प्रतिसाद देतोय नं देतोय पर्यंत विनअँपने एकेकाळचं फँटसी असणारं १९४२- अ लव्ह स्टोरी मधलं कुछ ना कहो, कुछ भी ना कहो हे गाणं सुरु केलं. मी आमच्या भडजी मित्रवर्यांना किंवा ना"खु"न काकांना काहितरी काडीसारु खरड लिहित होतो. ते गाणं सुरु झालं आणि बॅकस्पेसच्या किवर जे बोट दाबुन धरलं ते थेट आख्खा प्रतिसाद खोडला आणि मिपावरुन चक्क "गमन" केलं. ते गाणं जवळजवळ ७-८ वेळा ऐकलं. एचडीमधे डाउनलोडवलं आणि परत परत ऐकलं आणि आत्ताही ऐकतोय. (ओसीडी).
असं म्हणतात किंवा मला असं वाटतं किंवा माझी अशी समजुत आहे की तरुण वयामधे जेव्हा कधी माणुस प्रेमामधे पडतो किंवा त्याला कोणीतरी आवडायला लागतं (तिलाही हेच्चं अॅप्लाय होतं पण मी सद्ध्या प्रथमपुरुषी एकवचनी मधे लिहिणारे) तेव्हा तो (निरर्थक) अत्मरंजनामधे गुंग व्हायला लागतो. ते मै हुं ना मधे दाखवलयं तसं ती समोर आली की डोक्यात व्हायोलिन, गिटार वगैरे वाजायला लागतात. (देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार हे गाणं अपवाद, हे गाणं प्रेमात पडण्यापेक्षा दहिहंडीच्या बाराव्या मजल्यावरुन पडण्यासाठी जास्तं शोभुन दिसतं असं वैयक्तिक मत आहे.). त्यातुन मी पडलो "मुंगेरिलाल के हसिन सपने" छाप साधा भोळा सज्जन इत्यादी सद्गुणांनी नटलेला मुलगा. होपलेसली रोमँटिक म्हणावा असा. स्वप्नं पडायला आजपर्यंत कधी झोपायला लागलेलं नाही. जिधर टैम मिला उधर सपने देखना शुरु! असो. अवांतर होतय जास्तं.
तरुण वयामधे प्रत्येकजण कधीनाकधीतरी प्रेमात पडतोच. ती पेश्शल व्यक्ती समोर आली की डोक्यामधे "ऑर्चेस्ट्रा" सुरु होतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिला मागणी घालण्यासाठीचे वेगवेगले सिनारियोज (फिरलेल्या आणि अंध) डोक्यामधे सुरु होतात. ती प्रेयसी असती तर काय काय केलं असतं (गैरसमज नकोत, फक्त डोळ्यात तुझ्या पाहतो मी गीत चांदण्यांचे किंवा वैचारिक चावटपणाची परिसीमा म्हणुन फार फारतर हे चिंचेचे झाड, दिसशी तु नवतरुणी काश्मिरी पलीकडे प्रतिभा जात नाही वगैरे छाप रोमँटिक गोष्टी) त्याची दृष्य डोळ्यांसमोर उभी रहायला लागतात. अस्मादिक ह्या सर्व बहुगुणांनी नटलेले असल्याने प्रेमात पडणं (आणि भरपुर लागुन घेणं) अत्यंत अपरिहार्य होतं. ;)
आपण एखाद्या व्यक्तीला मागणी कशी घालु ह्याविषयी प्रत्येकाच्या काही कल्पना ठरलेल्या असतात. गद्धेएकविशीमधे माझ्याही काही रोमँटिक कल्पना होत्याच रादर अजुनही आहेत. ह्या माझ्या कल्पनेचा एक अविभाज्य भाग म्हणजे हे १९४२-अ लव्ह स्टोरी मधलं 'कुछ ना कहो, कुछ भी ना कहो' हे गाणं. (कुमार सानु _/\_).
आपण एखाद्या छान गर्दीच्या ठिकाणी असावं. ती समोर यावी, आपल्याकडे बघुन 'कातिल' हसावी. अचानक पाउस भरुन यावा. तिनेही तेवढ्या गर्दीमधे जराहि नजर नं हटवता आपल्याकडेचं एकटक बघत रहावं. आपण एखाद्या मंत्रचळ (स्पेलबाउंड) लागलेल्या माणसाप्रमाणे हलकचं तिच्याकडे जायला निघावं. आपण जसं जसं तिच्या जवळ जाउ तसं तसं तिच्या स्मितहास्याचं रुपांतर गालावर लाली चढवणार्या लज्जेमधे व्हावं. तिच्या गालावर चढलेली लाली बघुन आपण अजुन वेडं व्हावं. ;). नकळत त्याचं धुंदीमधे पुढे जाउन आपण तिचा हात हातामधे घ्यावा. आणि आपण तिला मागणी घालायच्या वेळीच जादुने बॅकग्राउंडला हे गाणं सुरु व्हावं. ;)
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या केहेना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
तिनी आपण काहीही नं बोलता आपल्या मनामधलं ओळखावं. काहि नं बोलता,गर्दीची पर्वा नं करता आपल्याला पटकन येउन बिलगावं. अगदी मुकपणेचं आपल्याला होकार द्यावा. सगळी गर्दी आपल्याकडे बघत असावी आणि त्याचं क्षणी भरुन आलेला पाउस कोसळायला सुरुवात व्हावी.
समय का ये पल, थमसा गया है
और इस पल मे, कोई नही है
बस एक मै हुं, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
तो एक क्षण कायमचा अजरामर व्हावा. आजुबाजुच्या त्या गर्दीचं अस्तित्व त्या झंझावाती पावसाने म्हणा किंवा त्या गोड क्षणाच्या गोडव्यामधे विरघळुन जावं. फक्त ती आणि मी आणि बाजुची अतिशय धुसर झालेली गर्दी. तिचा दुसराही हात नकळत आपल्या हाती यावा आणि एका अत्यंत लयबद्ध अश्या सालसा ला सुरुवात व्हावी.
सुलगी सुलगी सांसे, बेहेकी बेहेकी धडकन
मेहेके मेहेके शाम के साये, पिघले पिघले तन मन
;) ;) ;) णो एक्सप्लेणेशण!!! ;) ;) ;) ह्युमन माईंड नोज नो लिमिट्स. अपनी अकड लगाओ ;) ;)!!!
ह्या सगळ्या कल्पना परत मनामधे पुनरुज्जीवीत झाल्या गाणं ऐकुन. नॉस्टॅल्जिक विचारांनी मनावर कब्जा घ्यायच्या आतचं आमच्या अत्यंत चलकटह विनअँपनी पुढचं गाणं सुरु केलं ते होतं "सच केह रहा है दिवाना, दिल दिल ना किसी से लगाना" ;). त्यानंतर मग मात्र "तनहा दिल तनहा सफर", "भुल जा" वगैरे शानकृत गानी लागायला लागली शफलवर. It's like universe giving signs for giving up life long dream. :/
हेचं ते भारी वालं गाणं (ज्यांना चित्रपटांमधल्या चुंबनदृष्यांची अॅलर्जी आहे त्यांनी व्हीडीओ फाट्यावर मारावा)
रच्याकने. त्याच सी.डी.मधे देवांग पटेलची पिछाडी पे कुत्ता काटा, अय्यय्या सु सु सु सु वगैरे गाणी सापडली आणि गेलेला मुड परत मिळाला. अजुनही काही अशीचं रोमँटिक गाणी सापडली. त्याविषयी परत कधीतरी मुड आला लिहायचा की :)
विस्कळीतअव्यवस्थित (-कॅप्टन जॅक स्पॅरो-)
प्रतिक्रिया
28 Aug 2015 - 10:42 pm | दमामि
सावकाशीनं वाचतो!
30 Aug 2015 - 7:17 am | यशोधरा
आँ? संपादनाचे अधिकार हायती जनू!
30 Aug 2015 - 7:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नोप. हल्ली म्या पहिला छाप कमेंटा डायरेक्ट हेवनवासी होतात किंवा संपादित होतात. माझ्या पण झाल्या मोजीकथांवरच्या दोन वेळा.
(मुविंनी जॅक लावला असावा असा अंदाज आहे.) :P
30 Aug 2015 - 11:04 am | यशोधरा
कायबी सांगता यीना आजकाल!
30 Aug 2015 - 10:34 pm | वगिश
त्यांच्या काही कथांवर मी "छान लेख" अशा प्रतिक्रिया दिल्या, त्या उडवून लावण्यात आल्या. ईथे प्रतिसादाबद्दल नेमके काय नियम आहेत???
28 Aug 2015 - 10:48 pm | मांत्रिक
मस्त लिहिलंय. अगदी नाॅस्टॅल्जिक केलं.
(च्यामारी त्या फोटोमधल्या सारखं परत दिसायला रादर त्या दिवसांमधे परत जायला काय वाटेल ते करायची तयारी आहे), हे तर अगदी आवडलं. ध्रुवबाळासारखं तप करावं इतका प्रिय विषय!
28 Aug 2015 - 10:55 pm | चौथा कोनाडा
_/\_ _/\_ _/\_
सुरेख आणि सुरेल लेखन ! सुपर्ब स्मरण रंजन
वाचुन आख्ख "कुछ ना कहो " धा वीस वेळा वाजुन गेले.
यावेळी पिंचिवाडी मध्ये पावसाळी जाणवला नाही, कोरडे कोरडे वाटत होते. हा लेख वाचुन चिंब झाल्या सारखे झाले. आमच्याही "काही" जुन्या आठवणी जाग्या झाल्या !
पु.भा.प्र. हे ल्ह्यावेच लागले.
28 Aug 2015 - 11:03 pm | मुक्त विहारि
हे आमचे पण आवडते गाणे....
१९४२-ए लव स्टोरी, मधील सगळीच गाणी अप्रतिम.
मग ते "एक लडकी हो देखा" असू दे किंवा "प्यार हुवा चुपके से" किंवा "रिम झिम रिम झिम"
पण ही गाणी ऐकावित ती आपल्या जोडीदारा बरोबरच, ही गाणी एकट्याने कधीच ऐकू नयेत, असे माझे मत आहे.
आता, ह्या सोमवारी बायकोबरोबर ही गाणी परत ऐकणार.
28 Aug 2015 - 11:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत. १९४२ अ लव्ह स्टोरी हा स्टोरीपेक्षा जास्तं गाण्यांसाठी आवडलेला. :)
रिमझिम रिमझिम, एक लडकी को देखा तो आणि कुछ ना कहो अतिशय सुंदर गाणी आहेत.
29 Aug 2015 - 11:36 am | अन्या दातार
१९४२ अ लव्ह स्टोरी हा स्टोरीपेक्षा जास्तं गाण्यांसाठी आवडलेला. पंचमचा तो नॉक आउट पंच म्हणावा लागेल; कारण त्याआधी अंदाजे ५-८ वर्षे पंचम फ्लॉप संगीतकारांमध्ये गणला जायचा.
अवांतर - मुविंच्या प्रतिसादातली शेवटची २ वाक्ये व तुझे "सहमत" हे वाचून मला कळेचना नक्की कशाशी सहमत ते. ;)
30 Aug 2015 - 12:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
एक अत्यंत काड्यासारु प्रतिसाद डोक्यात आलेला आहे ;) लिहु काय?
रच्याकने तुला कळेलचं लौकरचं म्हणा =))
31 Aug 2015 - 10:59 am | नाखु
जाब्बर्दस्त "लाईक" केले आहे.
आता अवांतर : सुमडीतल्या लोकांनी अशी (दुसर्याची)कोंबडी करू नै पाप लागतं आधिक तपशील वयक्तीक+गँग भेटीत.
दातरू आपणास प्रगोने सस्नेह आवताण दिले आहे येण्याचे करावे.
निरोप्या
चिमण हटेला मेंबर नाखु
28 Aug 2015 - 11:03 pm | बहुगुणी
मुळीच 'विस्कळीत अव्यवस्थित' वगैरे नाहीये...अगदी सुरेख जमलंय स्मरणरंजन! आवडलंच.
28 Aug 2015 - 11:12 pm | आदूबाळ
कं लिवलंय, कं लिवलंय!
"कितने गहरे हल्के, शाम के रंग है छलके..."
काय गाणी बनायची राव ९०च्या दशकात...
(चला एक प्लेलिस्ट बनवू या!)
28 Aug 2015 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. ८० च्या दशकातली पिढी सगळ्यात नशिबवान. जुनी चांगली गाणी आणि साधारण २००२ पर्यंतची चांगली गाणी दोन्ही प्रकारचा अनुभव मिळाला. २००२-०३ नंतर धांगडधिंगा आणि नंगानाच चालु झाला गाण्यांच्या नावाखाली. अपवाद म्हणजे मोहित चौहान, अर्जित सिंघची काही गाणी.
31 Aug 2015 - 4:37 pm | सूड
सहमत!! काल सकाळ सकाळ अर्जित सिंघ ऐकत बसलो होतो...तेवढ्यात तुनळीवरच्या प्लेलिस्टमध्ये मोहितचं 'कितने दफे दिल ने कहा' दिसलं. डाऊनलोड करुन घेतलं. आज सकाळी आंघोळीला गेल्यापासनं ब्रेकफास्ट होईस्तवर त्याची किती आवर्तनं झाली त्याचा नेम नाही.
28 Aug 2015 - 11:34 pm | रेवती
लेखन आवडले. माझ्या जुन्या ब्याकप्याकमध्ये असे काही नव्हते. गोग्गोड रंगाचे रुमाल दोन सापडले होते. बाकी परिक्षापत्र, पासपोर्ट आकारातले फोटू, त्यातील उग्गीच केलेला आज्ञाधारक चेहरा असे काहीसे होते. पेनं ,पेन्सिली वगैरे.
एकदा लहान भावाचे प्राथमिक शाळेचे दप्तर व त्यातील वह्या सापडल्या होत्या. त्याने गायीवर लिहिलेला निबंध, दोन शिंगे, कपिला, देव मानणे, गाय दूध देते वगैरे वाचून हसून पुरेवाट झाली होती. तुमच्या लेखाच्या निमित्ताने हे आठवले.
29 Aug 2015 - 1:03 am | प्यारे१
खासच!
मस्त लिहिलंयस.
नॉस्टॅल्जिक काय होता रे तुम्ही पंचविशीतली पोरं???
29 Aug 2015 - 9:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पंचवीशी सरुन दोन वर्षं झाली. :(
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी :(
29 Aug 2015 - 1:39 am | एक एकटा एकटाच
मस्तच
29 Aug 2015 - 2:37 am | रातराणी
छान लिहिलंय! आवडलं :)
29 Aug 2015 - 3:28 am | श्रीरंग_जोशी
कॅप्टन तुझ्या दिलच्या छाल्यांना वाह वाह म्हंटल्याबद्दल माफी असावी. पण ते आहेतच त्या योग्यतेचे.
हे गीत माझ्याही सार्वकालिन आवडत्या गीतांपैकी एक आहे.
मी मिपावर नवा असताना सायलेंट गाणी या धाग्यावर याच काळातली एकाहून एक श्रवणीय गाणी उल्लेखली गेली होती.
29 Aug 2015 - 3:29 am | अर्धवटराव
:)
29 Aug 2015 - 6:09 am | यशोधरा
भा हा री ही ही.
29 Aug 2015 - 9:16 am | चौकटराजा
का लि म्हण्जी काय लिवलंय !! लै खास ! पिंची मधे पाउस नाही पण पंचम ने ओलावा आणलाय ही कामेंट एकदम फिट ! बाकी त्यो सालसा हाय काय ...." आमच्या मतं ( आणि मतिप्रमाणं ) वॉल्टझ आहे. असंच ललित लेखन लिहित जावा.
29 Aug 2015 - 9:41 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आयड्या नै बॉ. रोमँटिक आहे एवढं खरं. ;)
29 Aug 2015 - 10:08 am | चांदणे संदीप
मस्त लिहिलय!
असच कधीतरी वर्षातून एकदा वगैरे अडगळीला हात लागून गुप्त खजिन्याचा मार्ग सापडतो आणि त्यावरून गेल असता आपलाच लपविलेला, विस्मृतीत गेलेला खजिना सापडतो! मग निदान त्या वेळेपुरत तरी आपण खूप श्रीमंत होऊन जातो. दुस-या कशाचीही गरज भासत नाही!
पोटमाळा वगैरेंच्या सफाईचा सफाईने त्रास चुकवणारा
Sandy
29 Aug 2015 - 10:25 am | जेपी
आवडल.
(नस्तेलॉजीक) जेपी
29 Aug 2015 - 11:11 am | नीलमोहर
'१९४२' ची सर्वच गाणी अप्रतिम..
कविता कृष्णमूर्ती यांचं 'प्यार हुआ चुपकेसे' आणि लता मंगेशकर यांचं 'कुछ ना कहो' जास्त आवडतात.
पण 'कुछ ना कहो' नंतर देवांग पटेल म्हणजे जरा टू मच हं :)
काय ती गाणी त्याची, अर्थात त्याने चेहर्यावर स्माईल मात्र येतं आजही..
त्याचं 'ए राजू..हो जाना बाजू' ऑफिसमधील ऑल टाईम फेव्हरेट आहे
इतरही गाणी अधूनमधून आठवण झाली की वाजवत असतात.
29 Aug 2015 - 12:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो ती मिक्स सी.डी. होती. पार खिचडी सी.डी. होती. =)) विश्वास ठेवा अगर नका ठेउ त्यामधे मै तो रस्ते से जा रहा था भेलपुरी खा रहा था पण आहे. =))
त्याच सी.डी. मधे तोच चंद्रमा नभात सुद्धा आहे. टोट्टल वेडी सी.डी. आहे ती.
29 Aug 2015 - 2:22 pm | अन्या दातार
लैच लोल =)) =)) =))
दिसलं गाणं की भर, दिसलं गाणं की भर याचे उत्तम उदाहरण
30 Aug 2015 - 12:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाबा तेव्हा सी.डी. राईट करणं हा प्रकार बराचं रेअर असायचा. तु Nero वापरलयस का नाही माहिती नाही. त्यामधे रायटिंग क्यु मधे जश्या जश्या फाईल्स अॅडवत जासील तशी तशी सी.डी. मधे किती जागा राहिलीये ते दाखवणारी एक लाल पट्टी असायची. लोक ही फाइल बसत नाही का मग हि दुसरी टाक असं टाकुन ७०० एम.बी. जागा भरुन टाकायचे =))
हल्ली आता १-२ टी.बी. नॉर्मल झालाय डेटा ट्रान्सफर. ती लिमिटेड जागेमधे असे उद्योग करायची पण एक मजा होती रे. Sigh!!!
30 Aug 2015 - 2:16 pm | अभ्या..
हो. अगदी अगदी.
मस्त लिहिलेस ज्याकोबा.
31 Aug 2015 - 11:45 am | नाखु
असला जबरी प्रकार कॅसेटीच्या जमान्यात केलेला आहे.
अगदी मराठी-हिंदी साठीही !!!!
"हे गाव लई न्यारं नतर पुढचे गाणे "दो और दो पांच" चे टाकून ट्रीपमध्ये सगळ्यांना फेफरे आणण्याचे पुण्यकार्य पाठीशी आहे!
कॅसेट खजाना कालच आवराआवरीत कोपरा बदल झाला इअतकेच.
सरभेसळवाला सांजधारा-छायागीत्प्रेमी नाखुस
31 Aug 2015 - 10:41 am | नीलमोहर
सगळ्यांचं तसंच असंतय बघा :)
माझाही मोबाईलचा म्युझिक प्लेअर उघडला की अशी काही यादी दिसते,
बाबाजी की बूटी
बचके बक्षी
बघ उघडूनि दार अंतरंगातला देव घावंल का,
किंवा,
ज्युरासिक पार्क
परवरदिगार (बालगंधर्व)
पटाखा गुड्डी
पण बॅकअपमध्ये म्हणजे एमपी३ प्लेअर, पीसी, लॅपटॉप आणि सीडीजमध्ये मात्र गाणी व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवलेली असतात जसेकी हिंंदी, इंग्लिश, मराठी, त्याखाली चित्रपट, अल्बम, त्यात परत जुनी ,मिड, नवीन, लेटेस्ट इ.
29 Aug 2015 - 11:31 am | मारवा
सुंदर लेख गाण्याच सुंदर वर्णन !
संपादक मंडळाला एक विनंती एक गाना डॉट कॉम नावाचा सदाहरीत प्रकारातला धागा बनवावा. त्यात सर्वांनी आपापली आवडती गाणी ( शक्यतो पुर्ण लिरीक्स सहीत ) द्यावीत त्यातील सौंदर्यस्थळे उलगडुन दाखवावीत, आपल्या त्या गाण्याशी जुडलेल्या आठवणी इतर माहीती शेअर करावी शक्यतो गाण्याची लिंक ही द्यावी.
एक छान कलेक्शन होउन जाइल.
लेखासाठी पुनश्च धन्यवाद
30 Aug 2015 - 10:01 am | एस
गाण्याचे बोल देणे हा प्रताधिकारभंग होईल.
30 Aug 2015 - 10:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
असं वाटतं नाही. कारण आंजां वरती लिरिक्स देणार्या शेकडो साईट्स आहेत. गाणी विनामोबदला डाउनलोड करणं किंवा शेअर करणं हा कॉपीराईटचा भंग असेल.
30 Aug 2015 - 11:30 am | एस
त्या सर्वच संस्थळांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते कुणी ठरवल्यास.
30 Aug 2015 - 11:40 am | मांत्रिक
@स्वॅप्सः पूर्वी आंजा वगैरे नव्हते तेव्हा गाण्यांची विशेष आवड असणारे लोक त्यांना आवडलेल्या गाण्याचे लिरिक एखाद्या वहीत लिहून ठेवत. अशा वह्यांना खूप प्रसिद्धी व मागणी असे तेव्हा.
माझ्या आईने अशीच एक जुन्या प्रसिद्ध मराठी गीतांची वही तयार केलेली होती जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी. दुर्दैवाने ती वही हरवली.
30 Aug 2015 - 11:44 am | मांत्रिक
तुमच्या गप्पांमुळे त्या जुन्या आठवणींत परत रमून जायला झालं. ती वही हरवल्याचं समजलं तेव्हा खूप हळहळलो होतो.
30 Aug 2015 - 1:27 pm | एस
मीही लिहून ठेवत असे. ती गाणी अद्याप तोंडपाठ आहेत. नंतरनंतर गाण्यांचे बोल लक्षात ठेवणे बंद केले, कारणः
'स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा!'
30 Aug 2015 - 1:34 pm | मांत्रिक
अगदी सहमत! आज प्रत्येक गोष्ट सेवेला हजर आहे. पण तो पूर्वीचा छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र गायब झालाय आता. पूर्वी व्हीसीआर म्हणून प्रकार होता. कधीतरी दिवाळी आणि मे महिन्यात आणला जाणारा. बापरे, तो आणला रे आणला की शेजारचे सगळे लोक न बोलवता जमणार हे नक्कीच! आम्ही लहान मुलांनी एकदा हट्ट करून करून बंद दरवाजा नामक भुताटकी चित्रपट आणला होता. रात्री १०.०० नंतर सगळ्यांची जेवणखाण झाल्यावर लावला. काय तो इफेक्ट म्हणायचा रे देवा. बरेच महिने आम्ही रात्रीचं वरच्या खोलीत एकटं जाणं टाळत असू. अशा प्रसंगी मग त्या हट्टानं आणलेल्या चित्रपटाच्या नावानं उद्धार होत असे.
29 Aug 2015 - 12:12 pm | पद्मावति
मस्तं. खूप छान लिहिलय. आवडलं.
29 Aug 2015 - 12:24 pm | अद्द्या
वाह वाह चिमण राव जमलंय अगदी
29 Aug 2015 - 3:44 pm | बॅटमॅन
चिमण्राव, लैच भारी बगा. नव्वदच्या दशकातली गाणी आणि एकेक अत्मरंजने आठवून दिल एवढाएवढासा झाला.....
29 Aug 2015 - 5:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅटवुमनच्या आठवणीनी हळवा झालास कै रे :P
29 Aug 2015 - 6:29 pm | पैसा
खूप छान लिहिलंय. मात्र कुमार सानुची काही मोजकीच गाणी छान म्हणण्यासारखी वाटतात. १९४२ लव्हस्टोरीमधली तशी आहेत नक्कीच.
29 Aug 2015 - 10:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
लै भारी, चिमणराव !
यानिमित्तने ८० च्या दशकात (मिळेल ते कॉपी) केलेल्या तीनेकशे ऑडिओ कॅसेट्सची आठवण आली ! कधीतरी बघायला पाहिजेत कढून किती फंगस साठले आहे ते :)
29 Aug 2015 - 10:04 pm | प्रचेतस
निरर्थक नसलेलं आत्मरंजन. :)
29 Aug 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्मरंजन****
सूद्दलेकणाच्या चुका नकोत :P
30 Aug 2015 - 12:16 am | प्रचेतस
मायला त्या ऑटोकम्प्लीटच्या.
मी 'अत्म' असंच लिवलेलं. गूगलबाबाने 'आत्म' केलं.
30 Aug 2015 - 12:45 am | तुमचा अभिषेक
मस्त! वाटले नव्हते या गाण्यावरचाच लेख असेल मात्र शीर्षक वाचून धागा उघडताना हे गाणे गुणगुणतच उघडला आणि.... आता लेख वाचतो सावकाशीने :)
30 Aug 2015 - 12:47 am | प्यारे१
शीर्षकातलं निरर्थक अत्मरंजन काढावं अशी विनंती.
ही फुटकळ जिलेबी नाही. धन्यवाद!
30 Aug 2015 - 7:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
काढायला सांगतो. =))
30 Aug 2015 - 1:30 pm | प्यारे१
साबास, सरदार खुस हुआ! ;)
-अमराठी ;) प्यारेगब्बर
30 Aug 2015 - 8:44 pm | बोका-ए-आझम
१९४२ अ लव्ह स्टोरी आला आणि त्याची गाणी गाजली,पण ते पाहायला पंचमदा हयात नव्हते हई नियतीने केलेली क्रूर थट्टा आहे. कुमार सानूचा सानुनासिक आवाजही अपीलींग वाटावा असं पंचमदांचं संगीत आणि आयुष्यात सर्वात सुंदर दिसलेली मनीषा कोईराला हे मारडाला काँबिनेशन आहे. बाकी चित्रपट यथातथाच होता. मध्यंतराआधी लव्हस्टोरी आणि नंतर १९४२.
30 Aug 2015 - 9:09 pm | प्यारे१
तेव्हा वर्तमानपत्र की मासिक्/पाक्षिक्/वीकली मध्ये आलेल्या लेखामध्ये १९४२ अ लव स्टोरीच्या संगीतानं चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा सुरेल आणि सार्थ संगीताला पुनरुज्जीवन दिलं असं लिहीलेलं आठवतंय.
वैयक्तिक आरडींच्या तुलनात्मक वाद्यबंबाळ किंवा थोड्या धांगडधिंग्याच्या संगीत रचनांपेक्षा १९४२ चं संगीत अत्यंत कर्णमधुर होतं. हे त्यांच्या बाबत झालं.
तर अखिल हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तेव्हा दलाल, राजाबाबू आणि तत्सम गोविंदापट, मिथुनपटातल्या कमरेखालच्या शब्दरचना आणि नाचकामानं ऊत आणला होता. 'सरकायलो खटीयां जाडा लगे' सारख्या नाचगाण्यांमधून करिष्मा आपल्या खानदानाचं नाव अटकेपार आपल्या गावाकडं नेत होती आणि सो़ज्वळ आयेशा जुल्का सुद्धा 'अटरिया पे लोटन कबुतर' वगैरे म्हणत होती.
तेव्हा १९४२ नं आपल्या संगीतानं मेलोडीयस संगीत आणि गोड दिसणारी मनिषा आणली होती. एक लडकी को देखा तो, कुछ ना कहो, रिमझिम रिमझिम आणि सगळीच गाणी मैलाचे दगड म्हणून गणली जायला हरकत नाही.
30 Aug 2015 - 11:22 pm | एस
चित्रपट मात्र दणकून आपटला होता.
30 Aug 2015 - 11:59 pm | प्यारे१
हो. विधु विनोद चोप्रानं चित्रपट दिग्दर्शित केला की चित्रपट पडतो असा समज आहे. दिग्दर्शन दुसऱ्याकडं दिलेले दणक्या चाललेत. ;)
31 Aug 2015 - 1:33 am | बोका-ए-आझम
हे अपवाद. हे चालले होते. १९४२ पण अगदी सुपरफ्लाॅप वगैरे नव्हता गेला. एकलव्य मात्र धन्यवाद होता. तो पडणारच होता. पण राजू हिरानी ही विधू विनोदने बाॅलिवूडला दिलेली देणगी म्हणायला हरकत नाही.
31 Aug 2015 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मनिषा कोईराला दिल से रे आणि १९४२ अ लव्ह स्टोरी मधे प्रचंड छान दिसलेली.
31 Aug 2015 - 10:01 am | बोका-ए-आझम
खामोशी द म्युझिकलमध्ये पण. आज मै उपर आसमां नीचे किंवा ये दिल सुन रहा है - ही गाणी बघा.
31 Aug 2015 - 10:04 am | यशोधरा
खामोशीची गाणीदेखील एकदम सुरेल आणि श्रवणीय आहेत.
31 Aug 2015 - 11:27 am | प्यारे१
बाहोंके दरमियाँ विसरलं का भो?
31 Aug 2015 - 11:51 am | अन्या दातार
ठळक अक्षरातील मजकुराबद्दल लैच असहमत. आरडीचे म्युजिक स्ट्रॅटेजिक असते. अगदी बॅकग्राऊंड स्कोअरसहित. बर्याच वाद्यांचा चित्रिकरणाशी काहीनाकाही संबंध येतोच येतो. त्यामुळे आरडीच्या म्युजिकला वाद्यबंबाळ वा धांगडधिंगा म्हणू नका प्लिज प्यारेबुवा.
31 Aug 2015 - 11:53 am | प्यारे१
असहमतीबद्दल सहमत आहोत.
31 Aug 2015 - 5:09 am | स्पंदना
आयी हैं देखने, झीलों के आईने, बालों को खोले घटाएं
राहे धुवां, धुवां, जायेंगे हम कहा, आओ यही पे रह जाए
या ओळी अश्या २५ वीतच मनावर कोरल्या गेल्या. अजूनही त्या मागच सौंदर्य तसच अबाधित आहे.त्यआम
लेख सुंदरच!!
रच्याकन "त्या कढया पुढच्या धणिनीला त्यामागच्या ओलाव्यासकट जपायला लावा. आईच्या न कापलेल्या कांद्याच परिमार्जन होइल.
31 Aug 2015 - 2:00 pm | बॅटमॅन
म्हणजे १२ वीनंतर किती वर्षे शिकलात म्हणायचं?
1 Sep 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रिमझिम रिमझिम च्या ओळी विसरलो होतो :)
धनिण मिळाली की हा तुमचा प्रतिसाद नक्की दाखवेन =))
31 Aug 2015 - 7:01 am | अजया
सुंदर लेख.वाचताना आपोआप गाणी मनात वाजायला लागली!यातली सर्वच गाणी त्यातल्या ताल सूर आणि गीतातल्या शब्दांमुळे अजूनही पाठ आहेत हा शोध लागला!!
31 Aug 2015 - 10:11 am | बोका-ए-आझम
रिमझिम रिमझिम
रुमझुम रुमझुम
भीगी भीगी रुत में
तुम हम हम तुम
हो चलते है चलते है
बजता है जलतरंग पेड की छत पे जब
मोतियों जैसा जल बरसे।
बूंदोंकी ये झडी लायी है वो घडी
जिसके लिये हम तरसे॥
बादल की चादरें ओढे है वादियां
सारी दिशाएं सोयी है।
सपनों के गांव मे भीगी सी छांव में
दो आत्माएं खोयी है॥
आयी है देखने झीलों के आईने
बालों को खोले घटाएं।
राहे धुअां धुआं जायेंगे हम कहां
आओ यही रह जाएं॥
यातलं शेवटचं कडवं चित्रपटात नाहीये.
31 Aug 2015 - 12:45 pm | gogglya
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बाकी असे एखादे जुने गाणे अवचित सापडले आणी भुतकाळात मन रमले की जणु संगीत परीस सापडल्याचा भास होतो.
31 Aug 2015 - 3:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
:) सहमत.
31 Aug 2015 - 3:48 pm | मदनबाण
विनअँप वर अधिरपणे डबलक्लिक केलं गेलं आणि कानावर सेनहैजर्स चढवले गेले.
विनअअँप वापरुन जमाना झाला रे.... काय दिवस होते ते ! आता प्लेअर बदलला... पण सेनहैजर्स रॉक्स ! :)
वेळ मिळाल्यास आणि जमल्यास सहीतले गाणं मात्र ऐक हो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ये ज़मीं गा रही है, आसमां गा रहा है... :- { Teri Kasam (1982) }
1 Sep 2015 - 9:36 am | हेमंत लाटकर
छान लेख. वाचून छान वाटले.
1 Sep 2015 - 1:27 pm | पियुशा
जियो मस्त लिहिल आहेस,, आपली आवड्ती गाणी त्याच्या सी. डी बनवने हा आवडता उद्योग गाणे आठवुन आठवुन फुल स्केपेच्या पानावर लिस्टा बन्वने मग त्या लाय्ब्ररि वाल्याला देने एखाद दोन गाण ओरिजिनल न मिळ्याल्यामुळे तो रिमिक्स भरायचा मग उगा त्यावर खेकसणे आनी घरी ऐकुन हेच रिमिक्स गाणे १० दा ऐकने , आता मोब्ल्यामुळे गेले ते दिवस राहिल्या त्या .........
1 Sep 2015 - 10:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. हे झालं फक्तं सी.डी.जचं. फितवाल्या कॅसेट्स किती रेकॉर्ड केल्या, तोडल्या मोडल्या ह्याला गणतीचं नाही. एक गणपतीच्या पुजेची कॅसेट होती. तिच्यामधे ओम केशवाय नम: नंतर थेट इ-ष्टाईलमे रेहेने का इष्टाईल मे रेहेनेका गाणं रेकॉर्ड केलेलं आहे =))
1 Sep 2015 - 11:52 pm | यशोधरा
=))
2 Sep 2015 - 2:41 am | स्रुजा
हाहाहा, त्या वेळचे रेट्स पण भारी असायचे कॅसेटस चे. एक गाणं दोन रुपयाला का काय. शिवाय हिंदी ईंग्लिश गाण्यांवर रेट बदलायचा. आता सगळं यु ट्युब वर असतं, मजा नाही ती.
तुम्ही लेख अगदी दिलखुश लिहिलाय.. अशी खुप गाणी आणि त्या बरोबर काय काय आठवायचं ते आठवलं :) रूठ ना जाना हे १९४२ मधलं पण अगदी मुलायम गाणं आहे. अक्षरशः पिसासारखं हवेत तरंगल्यासारखं हळूवार म्हणलंय ते गाणं. आर डीं चा मास्टर स्ट्रोक. संगीत दिग्दर्शक ब्रिलियंट असला की कुमार सानु पण चांगलं गाणं म्हणुन जातो आणि चित्रपट दिग्दर्शक चांगला असला की शाहरुख पण स्वदेस मधे "कलाकार" वाटतो :)
2 Sep 2015 - 6:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही कॅसेट रेकॉर्ड करायला कधी पैसे नाही दिले कोणाला. ते सगळे उपद्व्याप स्पॅरो गृहोद्योग पायरेट लिमिटेड मधे करण्यात आलेले. शानची बहुतेक गाणी त्यावेळेला रेकॉर्ड केलेली. त्यावेळेला रेडिओ मिर्ची नवीन आलेली आणि माझ्याकडच्या टेपरेकॉर्डरला रेडिओवरुन माईकशिवाय रेकॉर्डिंग करता यायचं नाही. थेट माईक लाउन रेकॉर्ड केलं तर बाहेरचा नॉईज सुद्धा रेकॉर्ड व्हायचा म्हणुन एका छोट्या बॉक्समधे रेकॉर्डिंग स्टुडिओ बनवलेला. नॉइज आयसोलेशनसाठी बॉक्समधे उश्या भरलेल्या असायच्या. कॅसेटच्या खाली एक स्लॉट असतो रेकॉर्ड लॉक साठी. तो स्लॉट उघडा असेल तर टेपरेकॉर्डर मधलं रेकॉर्डिंग मेकॅनिजम चालु व्हायचं नाही. त्यासाठी मग तो स्लॉट बारिक लाकडाचे तुकडे वगैरे चिकटवुन बंद करायचो. बाबांच्या किशोर कुमारच्या गाण्यांच्या कॅसेट्सचे "रेकॉर्ड्स" मीचं मोडले =))
2 Sep 2015 - 8:10 am | जुइ
लोल! होपलेसली रोमँटिक एकदम ;-)
18 Aug 2017 - 8:15 am | बोका-ए-आझम
आणि त्यामुळे हा लेख वरती अाणतोय. कुणीतरी या चिमणरावांना लिहायला लावा!
18 Aug 2017 - 8:23 am | जेम्स वांड
तुम्ही पण लिहिलेत तर चालेल की हो मोसादकार
__/\_
18 Aug 2017 - 4:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
नको. सद्ध्या मी लिहिलं की संपादित तरी होतं नाहितर तत्परपणे वाचनमात्रं होतं.
तरी अजुन आयडी कसा शाबुत राहिलाय ते कळत नाहिये.