कोची हून आम्ही दुसर्या दिवशी सकाळी निघालो. आभाळ भरून आलेले होतेच शिवाय कोची खाडीच्या तोंडावर समुद्र नेहेमीच खवळलेला असतो त्यात पावसाळा म्हणजे हिंदीत म्हणतात तसं "पहलेही करेला उपरसे नीम चढा हुआ." फार वर खाली होऊन पोटात डचमळायला लागले आणि पोटातील न्याहारी बाहेर येते काय असे वाटू लागले. नाहीतरी करायला काही नव्हते बाकी समुद्र पण किती वेळ बघणार. परत जाऊन आपल्या केबिन मध्ये आडवा झालो. सारखे हलत असले तर वाचता हि येत नाही. टीव्ही( व्हिडियो) हि पाहता येत नाही. आडवे पडून फक्त संगीत ऐका.
मला माझ्या मित्राची आठवण झाली. त्याच्या जहाजातून ( तारागिरी) गुरखा रेजिमेंटच्या सैनिकाना श्रीलंकेत घेऊन गेले होते तेंव्हाची गोष्ट. त्यांना विशाखापट्नमला जहाजावर चढवले. तेंव्हा सुरुवातीला तिथल्या च्यानल (कालव्यात) मध्ये जहाज जाताना सगळ्या गुरखा सैनिकांना फार छान वाटत होते.नौदलातील उत्तम न्याहारी खाऊन त्यांना वाटू लागले कि नौदलाची नोकरी लष्कर(ARMY)पेक्षा फार छान आहे. बाहेरचा एवढा प्रचंड समुद्र पाहायला छान वाटत होता.
पुढे समुद्रात आल्यावर वर खाली व्हायला लागले तेंव्हा बर्याच सैनिकांना ओकाबोकी सुरु झाली तेंव्हा त्यांना वाटू लागले कि हे काही खरं नाही. सर्व डेक वर ओकारीचा वास पसरल्यावर जे उरलेले लोक ठीक ठाक होते त्यांची पण परिस्थिती बिकट झाली. त्या बिचार्यांनी सकाळी केलेली न्याहारी बाहेर आली. अर्धे सैनिक जमेल तिथे आडवे झाले होते. काही सैनिक तर आपल्या सुभेदाराला विचारत होते कि साब हमारी क्या गलती हो गयी? चाहे तो हमारी ४० किमी पिठ्ठू परेड करवा दो लेकीन वापस ले चलो.
माझ्या मित्राने जेंव्हा ते पहिले तेंव्हा त्याला त्यांची दया आली त्याने सर्वाना एव्होमीनच्या गोळ्या खायला घातल्या आणि तिथेच डेक वर झोपवले.( सगळे जण आपल्या किट आणि रायफल सह तेथेच आडवे झाले) दुपारी आणि संध्याकाळी कोणीही जेवले नाही. दुसर्या दिवशी श्रीलंकेत पोहोचायच्या अगोदर माझ्या मित्राने विचारले कैसे लग राहा है तर सगळे जण एक सुरात म्हणाले. सर ये नौसेना कि नौकरी कुछ ठीक नाही. आदमी ठीक तरहसे खाना हि नही खा सकता!न ठीक तरहसे खडा हो सकता है! आप हमको जंगलमे दो महिने रख दो उधर कमसे कम जिस जमीन पे खडे है वो ऐसे हिलती तो नही. सर हम फौजमेही ठीक है!
त्याला हसायला आले, तो सांगत होता कि हे गुरखे म्हणजे अगदी लहान मुलासारखे असतात जे मनात असेल ते सरळ बोलून दाखवतात.
असो. आडवे पडून कंटाळा आला कि मी डेक वर जात असे किंवा ब्रिजवर तेथे ड्युटीवर असलेल्या आधिकार्याशी थोड्या फार गप्पा मारत असे. तेथे कळले कि तटरक्षक दलात (कोस्ट गार्ड मध्ये) आलात कि घर कोस्टगार्ड कडून पुरवले जाते. मी म्हणालो कि मला काय कुणीही घर दिले तरी चालेल. त्यावर हे कळले कि विशाखापटणम ला तटरक्षक दलाकडे घरे नाहीतच. मी त्याला विचारले मग तेथे अधिकारी काय करतात त्यावर तो म्हणाला कि आम्ही तेथे शहरात घरे भाड्यानेच घेतो. मी म्हणालो पण भाषेचा प्रश्न आहे त्याचे काय? त्याच्या कडे त्याचे उत्तर नव्हते. मी ठरवले कि तेथे गेल्यावर पाहू. कारण मुंबईत असताना मला ९ महीने घर मिळाले नव्हते. तेवढी ज्येष्ठता मला घराच्या प्रतीक्षा यादीत मिळायला हवी होती.
मी खाली परत केबिन मध्ये आलो आणि विचारचक्र चालू झाले. मी शेवटी ठरवले चार पैसे जास्त गेले तरी चालतील तेथे सिव्हिल क्षेत्रात चांगले घर भाड्याने घेऊ. मग मला शांत झोप लागली. दुसर्या दिवशी संध्याकाळी आम्ही चेन्नई च्या बंदरात पोहोचलो. तेथे बाहेर आलो तर ती कोळशाची जेट्टी होती. म्हणजे तेथे आयात केलेला कोळसा ट्रक/ रेल्वे वाघीणीत भरून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशा तील वेगवेगळ्या वीजकेंद्रात, सिमेंट कारखान्यात जात असे. हा कोळसा जहाजातून काढण्यात त्याची पूड इतकी उडत असे कि सगळी जेट्टी पूर्ण काळी होती. त्यातून ती कोळशाची धूळ उडू नये म्हणून एक पाण्याचा ट्रक त्या रस्त्यावर पाणी शिंपडत असे त्यामुळे त्या संपूर्ण रस्त्याला माकड छाप काळी टूथ पावडरने तोंड घासून थुकल्यावर येणारी कळा आलेली होती. त्यात मधूनच वरून पडणारा पाऊस. म्हणजे एकतर काळा चिखल किंवा राखाडी चिखल अशा परिस्थितीत हि केवळ जहाजावर राहायचे नाही म्हणून आम्ही तीन अधिकारी बाहेर पडलो.कोळशाचे ट्रक चुकवत आम्ही बाहेर पडलो. बाकी दोन्ही अधिकार्यांना बर्मा बाजारला जायचे होते. तेथे तेंव्हा इलेक्ट्रोनिक उपकरणे मिळत. मला काही त्यात फारसा रस नव्हता. तेवढ्यात तेथे बाहेर एक नौदलाची रुग्णवाहिका दिसली. ती पाहून मला फार आनंद झाला. तिला थांबवले. त्यात मला अश्विनीत ओळखणारा एक वैद्यकीय सहाय्यक निघाला. त्याला इकडचे तिकडचे विचारले तेंव्हा तो म्हणाला सर येथे जवळच आय एन एस अड्यार आहे. तेथे एक डॉक्टर (सर्जन लेफ्ट्नंट) महापात्रा आहेत. मी त्याला ओळखत होतो. मी त्या रुग्णवाहिकेत बसून अड्यारला गेलो. तेथे प्रथम मी माझे पाय बूट वगैरे स्व्च्छ धुतले. महापात्रा बायको माहेरी गेली असल्याने एकटाच बसला होता. ( त्याची बायको काश्मिरी पंडित होती आणि ती काश्मीरला गेली होती). त्याला विचारले काय करतो आहेस. तो म्हणाला काही नाही नुसताच बसलो आहे. म्हणालो चल जर बाहेर जाऊन काहीतरी व्यवस्थित खाऊया. त्यावर तो तयार झाला. त्याला विचारले ते सरवण भवन कुठे आहे? तो म्हणाला हि कल्पना छान आहे. आपण तेथेच जाऊया. तेथे गेलो तर जवळ जवळ २० माणसांची रांग होती.मी विचारात पडलो पण महापात्रा म्हणाला सर पाच मिनिटात जागा होईल. तसेच झाले. आम्ही आत जाऊन छान मद्रासी थाळीचा आस्वाद घेतला. बर्याच दिवसांनी मी पोटभर आणि चवीने जेवलो. साधे रसम, सांबार, भाज्या पापड दही इ. असलेले शाकाहारी जेवण फक्त १५ का २० रुपये होते.तुम्ही पायाखालील जमीन घट्ट आहे आणि पोटात भूक आहे इतक्या साध्या गोष्टीचा सुद्धा किती आस्वाद घेऊ शकता?
त्याने विचारले सर उद्या मी कारने महाबलीपुरमला जात आहे. माझ्या बरोबर दोन लेफ्टनंट कमांडर आहेत आणि एक जागा खाली आहे तुम्ही येणार का? इथे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी परिस्थिती होती. मी कशाला नाही म्हणू? मी त्यानंतर त्याच्या घरी गेलो. तेथे तो गणवेश उतरवून तयार झाला मग आम्ही बाहेर जेवायला गेलो. रात्री बारा वाजता त्याने मला जहाजावर सोडले त्यामुळे येताना त्या कोळशाच्या चिखलातून चालणे वाचले. दुसर्या दिवशी सकाळी सहा ला उठून मी परत त्या कोळसा जेट्टी वरून निघालो तर तेथून परत जाणारा एक तटरक्षक दलाचा ट्रक दिसला. म्हटले चला त्यातल्या त्यात या घन काळ्या कोळशातून चालायचे तर वाचले. त्यातून तो ट्रक अड्यार वरुनच कुठेतरी जाणार होता. मग काय छानपैकी आय एन एस अड्यारच्या फाटकाशी उतरलो आणि आपले ओळखपत्र दाखवून आत गेलो तर तेथे महापात्रा बसलेला होता आणि एक अधिकारी आलेला होता. नमस्कार चमत्कार झाले. तेवढ्यात तिसरा अधिकारी सुद्धा आला. मग आम्ही त्याच्या मारुती कार मध्ये बसलो. माझे डोके अजूनही गरगरत होते. मी पुढे बसलो होतो. सकाळी साडे सहा ला रविवारी काहीही वाहतूक नव्हती. महाबलीपुरम चेन्नई पासून ६० किमी वर आहे आणि तो रस्ता मरिन बीच वरून आणि पुढे समुद्राच्या काठाकाठाने जाणारा असा आहे. पावसाळी वातावरण होते. त्यामुळे सूर्योदय असा दिसलाच नाही.महापात्राने गाडीतील डेक वर गाणी लावली होती. "सय्योनी" हे गाणे मला फार आवडले भुरभुरणारा पाऊस, पहाटेची वेळ डावीकडे मी बसलो होतो तेथे ढगामधून तांबडे फुटले होते. आणि गायक गात होता "चैन एक पल नाही और कोई हल नाही, सय्योनी".
अगदी माझ्या मनाची अवस्था त्या गाण्यातून व्यक्त होत होती.
क्रमशः
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 8:45 pm | अस्वस्थामा
मी पयला.. :)
(बाकी निवांत वाचतो..) पण डॉक, ते पॅरा पाडायचं बघा ना जरा..
22 Jul 2015 - 9:02 pm | टवाळ कार्टा
ए गप रे...पॅरा बिरा जाउदे...आलाय लेख इतक्या दिवसांनी तर चिवडत बस्तोय :)
22 Jul 2015 - 8:47 pm | होबासराव
आता वाचतो..
22 Jul 2015 - 8:51 pm | द-बाहुबली
क्लास शेवट.
(नक्किच हे अनुभवणार. मलाही हे अधुन मधुन भावणारे गाणे आहे. भल्यासकाळी प्रवासात कधी ऐकले नाही पण बघणार... हा अनुभव नक्किच घेणार. (बहुदा ताम्हणी घाटात).)
22 Jul 2015 - 9:56 pm | पद्मावति
आज पाचवा भाग दिसला म्हणून आधीचे भाग वाचून काढले. काय जबरदस्त लिहिलय. प्रत्येक भाग एक से बढकर एक.
बोटीवर त्या उलट्या, दोन-दोन दिवस फक्त मॅगी वर राहणं, यंत्रांची सतत घरघर - बापरे, वाचुनच कसंतरी झालं. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहायचे आणि मुख्य म्हणजे तिथल्या लोकांच्या आरोग्याची, जीवाची एक डॉक्टर म्हणून जबाबदारी हे खरोखर कठीण काम आहे.
एका वेगळ्याच विश्वाची ओळख तुम्ही करून देत आहात आणि ते सुद्धा इतक्या छान, साध्या सरळ भाषेत. खुपच मस्तं.
22 Jul 2015 - 10:04 pm | खेडूत
वाह ! मामल्लापुरम .
आता जुने भाग परत वाचायला हवेत .
22 Jul 2015 - 11:00 pm | एस
चला, पुढचा भाग आला तर! यापुढचा भाग सहा दिवसांच्या आत टाका! :-)
22 Jul 2015 - 11:13 pm | माझीही शॅम्पेन
डॉक्टर … एक जबरदस्त लेखमाला तुम्हाला अनुभवाचं देण दैवानेच दिले आहे , एकेक अनुभव छान सांगत आहात !!
23 Jul 2015 - 12:59 am | डॉ सुहास म्हात्रे
बराच वेळ लावलात हा लेख टाकातला... जरा लवकर लवकर टाका. लोक वाट पाहतात.
त्या संपूर्ण रस्त्याला माकड छाप काळी टूथ पावडरने तोंड घासून थुकल्यावर येणारी कळा आलेली होती. त्यात मधूनच वरून पडणारा पाऊस. म्हणजे एकतर काळा चिखल किंवा राखाडी चिखल
असे डोळ्यासमोर स्पष्ट चित्र उभे झाल्यावर त्या पार्श्वभूमीवर नखशिखांत पांढरेशुभ्र कपडे घातलेले नौदल अधिकारी चालताना दिसले ! :)
23 Jul 2015 - 1:32 am | मयुरा गुप्ते
बोटीवरची डचमळ आणि गुरखा सैनिंकाची अगतिकता छान रंगवलिये..
पटापट टाका पुढचे भाग.
-मयुरा
23 Jul 2015 - 6:15 am | कैलासवासी सोन्याबापु
Brave little candid fellows indeed!!! साले मुंगळा चिकटावा तसे चिकटतात शत्रु ला, विलक्षण साधे अन विलक्षण शुरवीर जमात
23 Jul 2015 - 9:31 am | प्रचेतस
उत्तम लेखमाला.
23 Jul 2015 - 9:49 am | श्रीरंग_जोशी
नव्या घडामोडींचे वर्णन वाचण्यासाठी उत्तम वातावरणनिर्मिती झाली आहे.
पुभाप्र.
25 Jul 2015 - 3:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
आज ही कविता नेट वर सापडली ती मी डॉक्टर साहेबां सारखे हाडाचे नौसैनिक अन समुद्राशी सतत झोंबुन सुद्धा त्याच्यावर नितांत प्रेम करणारे इतर नौसैनिक व् मर्चेंट नेवी च्या जिगरबाज अधिकारी व् खलाश्यांस समर्पित करतो
Sea Fever
I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking.
I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying.
I must go down to the seas again, to the vagrant gypsy life,
To the gull’s way and the whale’s way where the wind’s like a whetted knife;
And all I ask is a merry yarn from a laughing fellow-rover,
And quiet sleep and a sweet dream when the long trick’s over.
-John Masefield
25 Jul 2015 - 3:57 pm | खटपट्या
नेहमीप्रमाणे जबरदस्त भाग !!
पु.भा.प्र.
25 Jul 2015 - 4:24 pm | अत्रुप्त आत्मा
@ त्यामुळे त्या संपूर्ण रस्त्याला माकड छाप काळी टूथ पावडरने तोंड घासून थुकल्यावर येणारी कळा आलेली होती.>>> :-D
25 Jul 2015 - 4:36 pm | पैसा
वाचायला मजा आली! तुम्हा लोकांंचे खरे तर हालच असतात त्या अवस्थेत!
सोन्याबापूनी दिलेली कविता पण मस्तच!
26 Jul 2015 - 7:51 pm | सुबोध खरे
पैसा ताई
एका पावसाळ्यात आम्ही मुंबई बंदरात परत येत असताना खवळलेल्या समुद्रात सगळ्यांची हालत फार खराब झालेली होती. बोट लागून तोंडाची चव गेलेली होती डोके गरगरत होते अशा स्थितीत बाजूने एक कोळ्यांचे होडके मासेमारी साठी समुद्रात चालले होते.त्या होडक्याच्या आकारामुळे ते फारच वर खाली होत होते. त्याच्या डोलकाठीवर + चिन्ह असते त्याच्यावर दोन बाजूला दोन पाय टाकून एक कोळी आरामात विडी पीत बसला होता जसे काही समुद्र तालावासारखा शांत आहे. त्याच्या कडे पाहून मला आणि माझ्या मित्राला त्याचा हेवा आणि कौतुकहि वाटत होते आणि ज्या परिस्थितीत तुम्ही एवढे हवालदिल होता त्यात तो आरामात विडी पीत बसला होता त्याचा रागही येत होता. आम्ही स्वतःला नौदलाचे अधिकारी म्हणवत होप्तो आणि एक साधा माणूस तुम्हाला क्षुद्र ठरवतो याचाही राग असेल एखादे वेळेस. (अहं दुखावलाअसावा).
पण असे समुद्रात वर खाली होत दिवस अन दिवस काढणे हे आजही मला फारसे सुखावह वाटत नाही.