पूर्वेच्या समुद्रात-४
बेयपूर या ठाण्याकडून आम्ही निघालो आणि कोचीकडे कूच केले. समुद्र खवळलेला होताच. पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने सर्व जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. हे म्हणजे एखादे आक्रस्ताळे दुसर्याचे मुल रडून तुम्हाला त्रास देत असेल तरी तुम्ही काहीही करू शकत नाही तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तसे.
काही काळाने कोचीचे बंदर दिसू लागले. तेथे समुद्र कायमच अतिशय खवळलेला असतो. तेंव्हा त्या डचमळणार्या समुद्रातून कोचीच्या संथ पाणी असलेल्या कालव्यात (बैक वाटर) शिरली तेंव्हा जोराच्या पावसात आपली गाडी एकदम बोगद्यात शिरते तेंव्हा कसे एकदम आवाज बंद होऊन शांत वाटते तसे वाटू लागले.
काही मिनिटात आमचे जहाज किनार्याला लागले. छान सकाळ होती. त्यातून आमच्या डाव्या इंजिनाच्या पंख्यातून काहीतरी आवाज येत असल्याचे शुभ वर्तमान आमच्या इंजीनियरने दिले. त्यामुळे जहाज एक दिवास तरी कोची बंदरात थांबणार असण्याची उत्साहवर्धक बातमी त्याने दिली. आता इतकी छान बातमी मिळाल्यावर मी ताबडतोब कॅप्टनला कोचीच्या संजीवनी या रुग्णालयात मित्रांना भेटायला जातो म्हणून परवानगी विचारली. नाही तरी मला काही काम नव्हतेच. पण ते म्हणाले डॉक्टर आम्ही रिट्झ (नाव नक्की आठवत नाहीये) हॉटेलात जेवायला जाणार आहोत तिथे ये साडेबारा एक वाजे पर्यन्त. तेंव्हा साडे नऊ वाजले होते मी हो म्हणालो. आणि ताबडतोब कपडे घालून निघालो. बंदरातील धक्का नौदलाच्या गोदितच आहे आणि हे रुग्णालयसुद्धा जवळच आहे. मी बाहेर पडलो तोच रुग्णालयाकडे कोणत्या तरी जहाजाकडून परत जाणारी रुग्ण वाहिका दिसली मी हात केला त्यात बसलेल्या वैद्यकीय सहाय्यकाला माझे ओळखपत्र दाखवले. तो हसून म्हणाला सर मी तुम्हाला ओळखतो. तुम्हा थोड्या दिवसापूर्वी मुंबईला अश्विनीत ( रुग्णालयात) होतात. मी तेथे चर्मरोग विभागात होतो. मग त्या रुग्ण वाहिकेत बसून दोन मिनटात मी संजीवनी रुग्णालयात उतरलो. बर्याच दिवसांनी मी स्थिर जमिनीवर चालत होतो आणि त्यातून ओळखीच्या रुग्णालयात आल्याने मला फार बरे वाटत होते. म्हणतात ना चुकला फकीर मशिदीत सापडेल तसे मला झाले होते. तेथे वाटेत दोन मित्र भेटले त्यांच्या बरोबर मी डॉक्टरांच्या चहापानाच्या खोलीत गेलो. बर्याच दिवसांनी बरेच जुने मित्र तेथे भेटले. चहा पिउन होईस्तोवर माझा एक वर्षे कनिष्ठ पणिक्कर म्हणून स्त्रीरोग तज्ञ भेटला. तो अगदी खुश झाला. तो म्हणाला कि बरं झालं तू आलास. मिया विचारले का रे त्यावर तो म्हणाला इथली क्षकिरण तज्ञ कालच रात्री तातडीच्या सुटीवर गेली आहे. तिचे वडील मुंबईत जसलोक रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आल्याने भरती झाले आहेत. त्यांना भेटायला ती रात्रीच्या विमानाने मुंबईला गेलेली आहे. आता माझ्याकडे एक स्त्री रक्तस्त्राव होत असल्याने भरती झाली आहे तिला बर्याच वर्षांनी उपचारानंतर गर्भ धारणा झाली आहे. पण आता सोनोग्राफीशिवाय गर्भ ठीक आहे कि नाही ते कळायला मार्ग नाही. तू म्हणजे देवाने पाठवल्यासारखा आलास. मी त्याला हसत म्हटले कि मी काही येथे ड्युटीवर आलो नाही. त्यावर तो म्हणाला मला माहिती आहे कि तुझ्याकडे आखत्यारी/ अधिकार(authority) नाही. फक्त गर्भ जिवंत आहे कि नाही तेवढे सांग म्हणजे उपचार काय करायचे ते ठरविता येईल[.पूर्ण रिपोर्ट देऊ नको. मी हसत म्हटले ठीक आहे मला चहा तरी पिऊ दे. आम्ही चहा घेतला तोवर त्याने त्या स्त्रीला क्षकिरण विभागात हलवायला सांगितले. आम्ही दोघे तेथे गेलो मी तिची सोनोग्राफी केली सुदैवाने तिचे मुल व्यवस्थित होते. मी त्याला व्यवस्थित रिपोर्ट तयार करून दिला. तो हसत म्हणाला याची काही गरज नाही. मी त्याला शांतपणे म्हणालो कि मी जरी येथे कामावर(ड्युटी) नसलो तरी नौदलाच्या एका सैनिकाच्या बायकोची सोनोग्राफी केली आणि रिपोर्ट दिला तर मला कोणी फाशी देणार नाही. त्यावर तो हसला. मला धन्यवाद देऊन जातो म्हणाला. तेवढ्यात त्या रुग्णालयातील एक सिस्टर आत आली आणि म्हणाली सर माझे वडील कोट्टायमहून येथे प्रोस्टेटच्या सोनोग्राफीसाठी आले आहेत पण मादाम सुट्टीवर गेल्या आहेत. तुम्ही कृपा करून त्यांची सोनोग्राफी कराल काय? नाही तर तेवढ्यासाठी त्यांना परत यावे लागेल. आता ७६ वर्षाचा माणूस ७० -७२ किमी अंतर कापून येतो त्याला परत कुठे पाठवायचे म्हणून मी म्हटले ठीक आहे त्यांना घेऊन या.
त्यांना आत आणेपर्यंत पणीक्कर हसत म्हणाला. यांची सोनोग्राफी होईपर्यंत एक अजून रुग्ण पाठवू का ती पूर्ण दिवसाची भरती आहे. मुलाची पोझीशन नुसती सांगितलीस तरी चालेल. मग काय मी म्हणालो पाठव आता आलीया भोगासी असावे सादर.
हे सर्व होईस्तोवर बर्याच लोकांना कळले होते कि कोणीतरी नौदलाचा डॉक्टर आला आहे. मग जे लोक क्षकिरण तज्ञ नाही म्हणून परत जाणार होते ते सर्व तेथे रांग लावून उभे राहिले. कोणी तरी आर्मीचा सैनिक त्यांच्या कण्णुरच्या रेकॉर्ड कार्यालयातून आला होता. त्याचे पेन्शनपूर्वीची वैद्यकीय तपासणी होती त्याचा छातीचा एक्स रे चा रिपोर्ट हवा होता. २८० किमी लांबून आलेल्या माणसाला परत कसे पाठवणार. केरळ मध्ये बरेच निवृत्त सैनिक आहेत त्यांना खाजगी रुग्णालये परवडत नाहीत. ( आखाती देशांतील पैश्याच्या ओघामुळे तसे झाले होते)त्यामुळे तेथे बरेच निवृत्त सैनिक उपचारासाठी १००-२०० किमी वरुन येतात.) एकाला बघीतले तोवर दुसरा म्हणतो सर मी त्रिवेंद्रमहून आलो आहे. असे करता करता मला दुपारचे दोन वाजले. अर्थात मला बसल्या जागी एकदा चहा एकदा कॉफी एकदा समोसा आला तेवढे मी खाऊन घेतले होते. दोन वाजता मला आठवण झाली कि अरे आपल्याला रिट्झ हॉटेलात जायचे आहे. एक तर दुपारच्या टळटळीत उन्हात कुणाची तरी स्कूटर घेऊन जायचा कंटाळा आला होता आणि शिवाय चहा कॉफी आणि समोश्याने भूकही उरली नव्हती. मी आता विचार करत होतो जहाजामध्येच परत जावे तेवढ्यात पणिक्कर आला आणि म्हणाला चल घरी जाऊन जेवू या. मी संकोचाने म्हटले अरे नको अशा अवेळी तुझ्या बायकोला त्रास कशाला? त्यावर तो म्हणाला मला माहिती आहे तू किती जेवतोस. आमच्या घरी उरलेल्या अन्नामध्येच तुझं जेवण होईल उगाच औपचारिक पण नको. मग त्याच्या मागे त्याच्या स्कूटर वर बसून घरी गेलो. त्याच्या बायकोची ओळख होतीच. त्याच्या मुलाच्या वेळेस त्याच्या बायकोची सोनोग्राफी पुण्याला मीच केली होती. (या नंतर एक वर्षाने परत त्याच्या मुलीच्या वेळेस मी तीची सोनोग्राफी विशाखापट्टणम येथे पण केली). त्याच्या कडे घरगुती केरळी पद्धतीचे साधे जेवण जेवून त्याने मला परत जहाजात सोडले. या वेळेपर्यंत दुपारचे चार वाजले होते.
मी जहाजात परत आलो तेंव्हा कॅप्टन माझी वाट पाहत होते. मी आत गेलो आणि मी रिट्झ मध्ये येऊ शकलो नाही याबद्दल त्यांची माफी मागितली. त्यावर ते म्हणाले डॉक्टर तू मूर्ख आहेस. एवढ्या दिवसानंतर संधी आली तर तू रुग्णालयात जाऊन रुग्ण पाहत बसलास, आम्ही तेथे शेवंड (lobster) खाल्ले मजा केली. मी त्यांना विचारले तुम्हाला कसे कळले कि मी रुग्ण पाहत होतो. ते म्हणाले मी जीप घेऊन रुग्णालयात तुला आणायला आलो होतो पण तुझ्या खोली बाहेर एवढी गर्दी होती. मी विचार केला डॉक्टर येईल हे सर्व संपवून. आम्ही सर्व बियर पीत होतो २ वाजे पर्यंत त्यानंतर मग खाण्याची ऑर्डर दिली जेवून साडेतीन ला परत रुग्णालयात तुझ्या खोलीशी आलो तो सर्व सामसूम. मग काय आम्ही परत आलो. मी हसून म्हटले सर काय करणार तेथे रुग्णच असे आले कि मला नाही म्हणताच येईना. ते म्हणाले म्हणूनच मी म्हणतोय कि तू मूर्ख आहेस रुग्णालयात गेलासच कशाला?
मी क्काही न बोलता हसत बाहेर पडलो.
एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली कि एकदा डॉक्टरची झूल तुम्ही अंगावर चढवली कि ती सहज उतरवता येत नाही. (हिपपोक्राटीक शपथ) चा पगडा तुमच्या मनावर जबरदस्त असतो.
आणि चांगले काम करण्यासाठी तुम्हाला अधिकार किंवा अख्त्यारी (authority) असलीच पाहिजे असे नाही.
पूर्वेच्या समुद्रात-३ http://www.misalpav.com/node/29719
पूर्वेच्या समुद्रात-२ http://www.misalpav.com/node/29607
पूर्वेच्या समुद्रात- १ http://www.misalpav.com/node/29373
प्रतिक्रिया
12 Jan 2015 - 12:35 am | श्रीरंग_जोशी
कथासाराशी पूर्णपणे सहमत.
12 Jan 2015 - 2:07 am | खटपट्या
हेच म्हणतो..
12 Jan 2015 - 12:53 am | डॉ सुहास म्हात्रे
सहमत, पण थोड्याश्या फरकासह... हृदयात नीतिमत्ता असली की ती आचरणात येते, हिप्पोक्रॅटीक शपथ निमित्तमात्र असते !
12 Jan 2015 - 2:09 am | मुक्त विहारि
अख्त्यारी (authority) असलीच पाहिजे असे नाही.....
सहमत...
12 Jan 2015 - 5:24 am | रेवती
छान लिहिताय.
12 Jan 2015 - 5:37 am | अर्धवटराव
शेवंड आणि बिअर... यु मिस्ड इट डॉक :P
12 Jan 2015 - 5:05 pm | शिद
+१
बाकी, तुमचे अनुभव नेहमीच विचार करायला लावणारे असतात. पु.भा.प्र.
12 Jan 2015 - 7:59 am | स्पंदना
एक पेशंट म्हणुन त्या स्त्रीया, किंवा ती माणसे किती मानसिक तणावाखाली असतील याची कल्पनाच करवत नाही.
अक्षरशः देवासारखे गेलात तुम्ही हॉस्पिटलात.
12 Jan 2015 - 9:36 am | टवाळ कार्टा
+१
12 Jan 2015 - 8:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं लेख!!!! पण नेची हॉस्पिटल्स मधे एक डॉक्टर रजेवर गेले तर त्यांच्या जागी प्लॅन बी अर्थात बदली डॉक्टर नसतात का? का फक्त सर्जन वगैरे जागांसाठी असतात?
12 Jan 2015 - 8:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नेव्ही असं वाचण्यात यावं!!!
12 Jan 2015 - 8:06 am | स्पंदना
अचानक मृत्यु झाला होता त्या आधीच्या डोक्टारांच्या वडिलांचा. दोन दिवसात आले असते कुणी बदली वर कदाचित!!
12 Jan 2015 - 8:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह...ओके...मग बदली डॉक्टर येईपर्यंत बहुतेक दुसर्या शिफ्ट मधले डॉक्टर्स कव्हर करत असतील ओव्हरटाईम मधे.
12 Jan 2015 - 8:58 am | अजया
अगदी सहमत!डाॅक्टर मग तो कुठल्याही प्रकारचा असो,झूल चढली की कायमचीच! आपल्यातली माणूसकी आपोअाप काम करवुन घेतेच!
12 Jan 2015 - 9:41 am | टवाळ कार्टा
+१
12 Jan 2015 - 9:12 am | सुबोध खरे
सर्वसाधारणपणे कोचीला दोन क्षकिरण तज्ञ असत पण त्यातील पहिला अगोदरच रजेवर गेला होता आणि दुसरीचे वडील हृदय विकाराचा झटका आल्याने जसलोक मध्ये भरती झाले होते त्यासाठी ती तातडीने गेली होती अन्यथा सहसा अशी परिस्थिती येत नाही.
12 Jan 2015 - 9:28 am | ज्ञानोबाचे पैजार
हा भागही आवडला.
पैजारबुवा,
12 Jan 2015 - 9:38 am | असा मी असामी
खरे आहे. कालच NDTV वर हम लोग मध्ये डॉक्टर व्यवसायावर चांगली चर्चा ऐकली.
Hats Off to you Doctor. :)
12 Jan 2015 - 3:39 pm | इरसाल
ती झुल नाही तो तुमच्यात ठासुन भरलेला चांगुलपणा आहे. :)
16 Jan 2015 - 5:00 pm | नाखु
बाहेरचा अॅप्रन कधीही काढाल ! आतला "माणूस" नाही काढता येणार तुम्ही ठरवलं तरी !!!
12 Jan 2015 - 5:52 pm | विनोद१८
छान अनुभव कथन चाललेय डॉ. खरे.
12 Jan 2015 - 8:02 pm | बाबा पाटील
एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली कि एकदा डॉक्टरची झूल तुम्ही अंगावर चढवली कि ती सहज उतरवता येत नाही. (हिपपोक्राटीक शपथ) चा पगडा तुमच्या मनावर जबरदस्त असतो.एकदा यात पडलो की आपण काय करु शकतो , माझ नशिब माझे घरचे,मित्रपरिवार या सगळ्यांनी आम्हा उभयतांच्या वेळा मान्य केल्या आहेत.
13 Jan 2015 - 3:57 am | मदनबाण
अनुभव कथन आवडले...
पुढच्या भागाची वाट पाहतो.... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रूठ ना जाना तुम से कहू तो... { 1942 A Love Story }
14 Jan 2015 - 5:01 pm | शैलेन्द्र
अनुभव आणि कथन दोन्ही आवडले.
14 Jan 2015 - 5:10 pm | स्पा
मस्तच मजा येतेय
पु भा प्र
16 Jan 2015 - 10:57 pm | दोस्त
मस्त... सुन्दर लिखान
17 Jan 2015 - 7:52 pm | पैसा
शपथ सगळेच डॉक्टर घेतात. पण सगळेच ती मनापासून पाळतात असे नाही! तुम्ही माणूस म्हणून खरंच ग्रेट आहात!
17 Jan 2015 - 9:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहॉय कोस्टगार्ड्स!!!, पाण्यावर वरुणदेवते चे ताल तम्बोरे सांभाळत कोस्ट "गार्ड" करणे ! challenging job !! प्रचंड आवडले!
17 Jan 2015 - 10:33 pm | कैलासवासी सोन्याबापु
डॉक्टर आपण ही कविता वाचलीच असेल असे वाटते , नसल्यास ही जरुर वाचा! "सेलर्स" चा उल्लेख आला की ही कविता मला नेहमी आठवते, शेयर करायचा मोह होतो,
Sea Fever
BY JOHN MASEFIELD
I must go down to the seas again, to the lonely sea and the sky,
And all I ask is a tall ship and a star to steer her by;
And the wheel’s kick and the wind’s song and the white sail’s shaking,
And a grey mist on the sea’s face, and a grey dawn breaking,
I must go down to the seas again, for the call of the running tide
Is a wild call and a clear call that may not be denied;
And all I ask is a windy day with the white clouds flying,
And the flung spray and the blown spume, and the sea-gulls crying.
I must go down to the seas again, to the vagrant gypsy life,
To the gull’s way and the whale’s way where the wind’s like a whetted knife;
And all I ask is a merry yarn from a laughing fellow-rover,
And quiet sleep and a sweet dream when the long trick’s over.