छायाचित्रण भाग १२. प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्त्वे

एस's picture
एस in काथ्याकूट
27 Dec 2014 - 8:24 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्
छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्
छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स
छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)
छायाचित्रण भाग ९. छायाप्रकाशाचा खेळ
छायाचित्रण भाग १०. एक्स्पोजर ट्रायॅंगल आणि हिस्टोग्राम
छायाचित्रण भाग ११. उद्भासन मापन आणि मीटरींग

सूची
       ०१. प्रतिमासंस्करण (पोस्टप्रोसेसिंग) का करावे लागते?
       ०२. काही मूलभूत संकल्पना - संवेदनमीती (सेन्सिटोमेट्री)
       ०३. रंगसंस्करण (कलर मॅनेजमेंट) - कलरस्पेस
       ०४. कॅमेराअंतर्गत संस्करण आणि RAW
       ०५. डिजिटल फाईल प्रकार - JPEG आणि TIFF
       ०६. प्रतिमासंस्करणाची कार्यपद्धती - RAW वर्कफ्लो आणि JPEG वर्कफ्लो

      आत्तापर्यंत आपण छायाचित्रण म्हणजे काय, त्यासाठीचे तंत्रज्ञान कोणते आणि ते कसे कार्य करते, छायाचित्रणाचा एक कला म्हणून विचार कसा करायचा, त्यातील सौंदर्यदृष्टी कशी विकसित करायची आणि आपल्या मनातील प्रतिमा कॅमेर्‍यात टिपण्यासाठी त्यातील तंत्र कसे आत्मसात करायचे इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता जवळजवळ चांगले म्हणता येतील इथपर्यंत बरे फोटो घेणे आपल्याला जमू लागले आहे. त्याचबरोबर चांगले छायाचित्र म्हणजे काय, चांगल्या आणि वाईट छायाचित्रांमधील फरक कसा ओळखायचा हेही आपल्याला येऊ लागले आहे. आणि ह्याच अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला जाणवते म्हणजे तंत्रावरील आणि तंत्रज्ञानावरील हुकूमत जमली तरी आपल्या मनातील चांगल्या प्रतिमेचा दर्जाही कितीतरी उंच जाऊन पोहोचलेला असतो आणि त्यातील बारकावे हे हातातील सर्वोच्च दर्जाचा कॅमेरा आणि लेन्स वापरूनही जस्सेच्या तस्से कॅमेर्‍यातच कैद करता येत नाहीत. थोडक्यात, मिळालेल्या प्रतिमेवर काही प्रक्रिया, संस्करण करून तिला अजून स्वीकारार्ह (अ‍ॅक्सेप्टेबल) आणि दर्जेदार बनवणे आवश्यक ठरते.

      प्रतिमासंस्करणात (Image Post-processing) आणि प्रतिमाबदलात (Image Editing/Manipulation) मूलभूत फरक म्हणजे प्रतिमासंस्करणात प्रतिमेतील सर्व प्रमुख दृश्य किंवा प्रतिमाविषयवस्तू कायम राहते, तर प्रतिमाबदल करताना मूळ दृश्यात काही भर घातली जाते किंवा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे आपण फक्त प्रतिमेवर 'पोस्टप्रोसेसिंग' करतो आहोत, प्रतिमा 'एडिट' करत नाही हे लक्षात ठेवावे. हा लेख इमेज एडिटिंगबद्दल नसून इमेज पोस्टप्रोसेसिंगवर आहे.

प्रतिमासंस्करण (पोस्टप्रोसेसिंग) का करावे लागते?

      प्रतिमेवरील संस्करण (प्रोसेसिंग) किंवा विकसन (ड़ेवलपमेंट) ही छायाचित्रणातील एक अविभाज्य क्रिया आहे. फिल्मयुगातील निगेटिव किंवा डिजिटल कॅमेर्‍यातील सेन्सरने टिपलेली RAW फाइल, दोहोंवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया करून त्यातून 'दृश्यमान प्रतिमा' मिळवावी लागते. फिल्मवर टिपली गेलेली प्रतिमा ही निगेटिव स्वरुपातील असते. तिच्यावर विविध भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया केल्याशिवाय त्यातील प्रतिमा ही तिच्या अंतिम रूपात येणार नाही. डिजिटल रॉ फाइलवर अशाच स्वरूपाच्या प्रक्रिया होतात, पण त्या इलेक्ट्रॉनिक असतात. मग भलेही तुमचा पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरा थेट तुम्हांला jpeg प्रतिमा देत असेल, पण त्याआधी तो कॅमेरा सेन्सरवरून मिळालेल्या अ‍ॅनालॉग डेटाचे रूपांतर हे डिजिटल RAW डेटामध्ये करतो. नंतर त्या RAW डेटावर स्वतः प्रक्रिया करतो आणि त्याचे रूपांतर हे jpeg प्रतिमेत करतो.

      छायाचित्रणात प्रोसेसिंगला प्रतिमा टिपण्याइतकेच महत्त्व का आहे हे जाणून घ्यायचे असेल तर छायाचित्रण म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय असतो हे समजून घेतले पाहिजे. छायाचित्रण असो, वा चित्रकला असो अथवा मानवी अभिव्यक्तीची इतर कोणतीही साधने असोत, संगीत-साहित्य-क्रीडा-वक्तृत्त्व-चित्रपट-नाटक-अभिनय... जे जे काही आहे त्यात रूपांतरणाला (ट्रान्सफॉर्मेशन) फार महत्त्व आहे. या सगळ्यांत कलाकार म्हणून आपण काहीतरी सांगत असतो आणि प्रेक्षक-श्रोते-वाचक वगैरे रूपांमध्ये जे सांगितले जातेय ते समजून घेत असतो. हा इन्फॉर्मेशन फ्लो जो आहे, त्यात जे सांगायचे आहे ते कशाच्या तरी माध्यमातून सांगितले जाते. थोडक्यात अभिव्यक्तीला एक 'माध्यम' लागते. मग त्या माध्यमाची स्वतःची अशी एक भाषा तयार होते, व्याकरण तयार होते. आणि त्या भाषेतून, अभिव्यक्तीला मूर्त रूप दिले जाते. उदा. छायाचित्रणाच्या संदर्भात जी द्विमितीय प्रतिमा आपण पहात असतो, ती म्हणजे वास्तवातील एखाद्या परिदृश्याची वेगळ्या माध्यमातील अभिव्यक्ती असते. मग ती प्रतिमा डिजिटल स्वरूपातील असेल तर विशिष्ट रंगांच्या प्रकाशलहरी वापरून त्या दृश्याचा आभास तुमच्या मॉनिटरवर निर्माण केला जातो, किंवा छापील स्वरूपात असेल तर फक्त तीन ते चार रंगांच्या सूक्ष्म बिंदूंच्या विशिष्ट रचनेतून त्या प्रतिमेला दृश्यरूप मिळते. म्हणजेच हे जे काही रूपांतरण आहे ते कुठल्याच टप्प्यावर 'अंतिम' नाही. त्यात अजून बदल करायला, अजून काहीतरी जास्त चांगले करायला नेहमीच वाव असतो. म्हणून, जरी तुमचा कॅमेरा तुम्हांला आयती छापण्यायोग्य (रेडी-टू-प्रिंट) प्रतिमा देत असला तरी तुम्ही त्यातूनही तुम्हांला तुमच्या अभिव्यक्तीचा जो दर्जा अपेक्षित आहे तो प्रतिमासंस्करणाद्वारे मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. नव्हे - तुम्ही तो केलाच पाहिजे.

काही मूलभूत संकल्पना - संवेदनमीती (सेन्सिटोमेट्री)

      संवेदनमीती म्हणजे प्रकाशसंवेदी पदार्थांवर प्रकाशाच्या होणार्‍या परिणामाचा अभ्यास. त्याचबरोबर ह्या व्याख्येला अधिक विस्तृत स्वरूपात मांडायचे झाल्यास प्रकाशसंवेदी पदार्थांवरील प्रकाशाचा परिणाम आणि त्यापासून प्रतिमा मिळवण्यासाठी कराव्या लागणार्‍या संस्करणप्रक्रियेचा अभ्यास असे म्हणता येईल. थोडक्यात, संवेदनमीती ही फिल्मच्या संदर्भात विकसित फिल्मच्या घनतेचा उद्भासनाच्या लांबीशी व तीव्रतेशी असणारा परस्परसंबंध तपासते. डिजिटल युगातही कॅमेर्‍याचे विद्युतसंवेदक हे मूलतः अ‍ॅनालॉग स्वरूपाचे असतात आणि ते प्रकाश पडल्यावर फिल्मसारखेच वागतात, त्यामुळे संवेदनमीतीचा अभ्यास हा याही काळात तितकाच महत्त्वाचा ठरतो. विशेषतः तुम्हांला जर प्रतिमासंस्करणाची (पोस्टप्रोसेसिंग) तत्त्वे मुळापासून समजून घ्यायची असल्यास त्याला पर्याय नाही.

      डिजिटल कॅमेरा संवेदकांच्या बाबतीत संवेदनमीती ही दोन प्रकारची असते. पहिल्या प्रकारात संवेदकांचा आयएसओ स्पीड हा प्रतिमेच्या दर्जाच्या संदर्भात मोजला जातो ('सॅच्युरेशन-बेस्ड आयएसओ'). दुसर्‍या प्रकारात जास्तीत जास्त किती आयएसओ स्पीडला चांगली प्रतिमा मिळू शकते हे पाहिले जाते. याला 'नॉइज-बेस्ड आयएसओ' असे म्हणतात. आपण एक्स्पोजर ट्रायॅन्गलच्या वेळी पाहिलेले आयएसओ हे मुख्यत्त्वे नॉइज-बेस्ड आयएसओ असते. हा फरक पुढे पोस्ट प्रोसेसिंगच्या वेळी येणार्‍या काही विशिष्ट अडचणी सोडवण्यासाठी उपयोगी पडतो. अर्थात हे तांत्रिकतेच्या बाबतीत फारच पुढचे ज्ञान झाले. ह्या गोष्टीची आत्ता आपल्याला गरज नाही.

      संवेदनमीती दाखवण्यासाठी एक प्रकारचा रेषालेख वापरला जातो. त्याला 'कॅरॅक्टरिस्टिक कर्व' (Characteristic Curve) असे म्हणतात. हा आलेख फिल्मची घनता आणि उद्भासन तीव्रता यांचा परस्परसंबंध दाखवतो, आणि त्या विशिष्ट फिल्म (अथवा संवेदक) वर एका विशिष्ट पद्धतीने कितीही वेळा प्रक्रिया केल्यास तोच परिणाम मिळेल याची खात्री देतो. म्हणून नाव कॅरॅक्टरिस्टिक (विशिष्ट) कर्व.

      याचे तीन भाग करता येतात. एक म्हणजे पायथा, दुसरा भाग सरळ उतार आणि तिसरा भाग माथा.

पायथा (Toe Section) :       पायथ्याच्या भागात संवेदकाचा उद्भासनाच्या अगदी कमी प्रमाणांना मिळणारा प्रतिसाद नोंदवला जातो. या भागात उद्भासन (एक्स्पोजर) जास्त वेगाने वाढले तरी संवेदकावरील परिणाम तितक्याच वेगाने वाढत नाही. सुरूवातीला हा बदल हळूहळू होतो. हेच या पायथ्याच्या क्षेत्रात दिसून येते. (आकृती पहा.)

सरळ उतार (Straight-line Section) :       जसजसे उद्भासन वाढू लागते तसतसा संवेदकाचा प्रतिसादही समान प्रमाणात वाढू लागतो. ह्या टप्प्यात रेषालेख हा बराचसा एकसरळ रेषेत असतो. ह्याच भागात प्रतिमेतल्या सर्वात जास्त रंग व प्रकाशछटा व्यापल्या जातात. इथे ज्यांना 'मिडटोन्स' म्हणतात त्या मध्यम उद्भासित पिक्सेल्सची दाटी झालेली दिसते. ह्याच भागाच्या रेंजवरून त्या-त्या प्रतिमेचा टोनल दर्जा ओळखला जातो. कुठल्याही चांगल्या छायाचित्रात अतिशय गडद व अतिशय फिक्या भागातील जास्तीत जास्त सखोल बारकावे दिसणे हे महत्त्वाचे असते. त्यालाच टोनल रेंज असे म्हणतात. आणि निदान हा लेख लिहीपर्यंततरी कुठल्याही डिजिटल संवेदकाला फिल्मचा ह्या बाबतीतला परफॉर्मन्स मागे टाकता आलेला नाही. म्हणूनच आजही बरेचसे मीडियम फॉरमॅट आणि लार्ज फॉरमॅट कॅमेरे आणि कृष्णधवल छायाचित्रकार हे फिल्म वापरतात. अर्थात ही परिस्थिती वेगाने बदलत आहे हेही तितकेच खरे आहे.

माथा (Shoulder Section) :       रेषालेखाचा सर्वात वरचा टप्पा हा आता सरळ उताराच्या भागापेक्षा थोडा खाली येऊ लागलेला दिसतो. पायथ्याचा भागाप्रमाणेच ह्याही भागात संवेदक घनता आणि उद्भासन तीव्रता यांच्यातील प्रमाण तितके समान राहिलेले नसते आणि ह्या टप्प्यात उद्भासन जास्त वाढले तरी संवेदकाचा प्रतिसाद त्यामानाने मंदावलेला दिसतो. साहजिकच इथे वैधम्र्य (कॉन्ट्रास्ट) कमी दिसते. प्रतिमेतल्या सर्वात फिक्या व पांढर्‍या जागा ह्या टप्प्यात नोंदवलेल्या दिसून येतात. त्याचमुळे हाय आयएसओला किंवा जास्त एक्स्पोज झालेल्या फिल्मवर आपल्याला एकदमच पांढरेफटक पट्टे दिसतात (इमेज वॉशआउट).

CharacteristicCurve
      ह्या आकृतीत कॅरॅक्टरिस्टिक कर्व किंवा विशिष्ट रेषालेख दर्शवला आहे. त्यात A ते C हा टप्पा पायथा म्हणून ओळखला जातो. A बिंदूपाशी शून्यापेक्षा किंचित वर हा रेषालेख सुरू होतो. B पाशी संवेदक हा प्रकाशाला प्रतिसाद देऊ लागतो. इथून उद्भासनातील वाढी जास्त प्रमाणात असली तरी संवेदकाचा प्रतिसाद हा कमी वेगाने वाढतोय. C बिंदूपासून D पर्यंत रेषालेख जवळजवळ सरळ आहे. येथे या आलेखाचा 'उतार' किंवा 'स्लोप' हा एकसमान असल्याचे दिसते. ह्या भागाला सरळ उतार असे संबोधले जाते. D नंतर पुन्हा एकवार उद्भासनात वाढ होताना वैधम्र्य मात्र कमी वेगाने वाढताना दिसतेय. E बिंदूपासून हा परिणाम उलट होताना दिसतो.

गॅमा (Gamma)      हे एवढं सांगायचं कारण म्हणजे पोस्टप्रोसेसिंगमध्ये बर्‍याच ठिकाणी आणि खूपशा पुस्तकांमध्ये, सॉफ्टवेअर प्रणालींमध्ये तुम्हांला गॅमा हा शब्द दिसेल. गॅमा म्हणजे दुसरेतिसरे काही नसून वरील कॅरॅक्टरिस्टिक कर्वचा 'स्लोप ग्रॅडियंट' मोजण्याचे एकक आहे. सोप्या भाषेत ह्या रेषालेखाचा उतार किती आहे हे मोजणे. गॅमा हा संवेदक-ते-संवेदक बदलतो आणि प्रतिमासंस्करण पूर्ण झाल्यावर जेव्हा आपण ती प्रिंट करायला जातो तेव्हा प्रिंटरचा गॅमा आणि प्रतिमेचा गॅमा एकच नसेल तर प्रिंटर तुम्ही केलेल्या प्रतिमासंस्करणाचा आपल्या पद्धतीने अर्थ लावतो आणि छपाई करतो. परिणाम हा की, संगणकाच्या पडद्यावर दिसणारी प्रतिमा आणि छपाई करून आलेली प्रिंट यामध्ये खूपच फरक असतो. अर्थात एखाद्या नवोदित छायाचित्रकाराला तो फरक जाणवणारही नाही, पण एखादी व्यावसायिक छायाचित्रकार ही अशा प्रकारचा दर्जात्मक तोटा सहन करणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या छायाचित्रकार ह्या अगदी प्रिंटिंग प्रक्रियेलाही प्रत्यक्ष छायाचित्रणाइतकेच महत्त्व देतात.

      गॅमा हा जास्त तीव्र असेल तर प्रतिमेत जास्त वैधम्र्य (कॉन्ट्रास्ट) येईल व प्रतिमेचा एकूण दृश्यपरिणाम हा जास्त प्रभावी ठरेल. पण जास्त गॅमाच्या नादात मिडटोन्समधील बारकावे सुटतील व ग्रेन किंवा नॉइज वाढेल. अतिशय कमी गॅमामुळे प्रतिमा खूप शार्प येतील, पण प्रतिमेत वैधम्र्याचा अभाव अशी प्रतिमा एकदमच फ्लॅट होण्यास कारणीभूत ठरेल. गॅमा ही एक बाब कलात्मकदृष्ट्या विचार केल्यास पोस्टप्रोसेसिंगमध्ये अशा पद्धतीने महत्त्वाची ठरते.

रंगसंस्करण (कलर मॅनेजमेंट) - कलरस्पेस

      सुरुवातीस जेव्हा रंगीत छायाचित्रणाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा दिसणारे कृष्णधवल छायाचित्रणातले जग आणि नंतर रंगीत छायाचित्रणातल्या मर्यादांमध्ये व्यक्त होणारे जग यात इतका फरक होता की बर्‍याच छायाचित्रकारांना कृष्णधवल - ते - रंगीत हा बदल स्वीकारणे फारच जड गेले. आजही जुन्या छायाचित्रकार ह्या फिल्मवरील कृष्णधवल छायाचित्रणालाच छायाचित्रणाचा सर्वोच्च मानबिंदू मानतात. अर्थात बदल हीच एकमेव स्थिर गोष्ट असणार्‍या जगात आजूबाजूच्या रंगीत सृष्टीला छायाचित्रणाच्या माध्यमातून नेमके पकडणे आणि व्यक्त करणे ही तितकीच आवश्यक बाब होऊन बसली आहे. याचे कारण असे की, मानवी डोळ्यांना दिसू शकणारे रंग आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून पकडता येणारे रंग यांच्या एकूण व्याप्ती आणि सखोलतेमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. मानवी डोळे जितक्या रंगछटा ओळखू शकतात तितक्या कुठलाच कॅमेरा आपल्या संवेदकावर अथवा फिल्मवर पकडू शकत नाही आणि कुठलेच इन-कॅमेरा वा पोस्टप्रोसेसिंग सॉफ्टवेअर ते करू शकेल अशी आज्ञावली (अल्गोरिदम) लिहू शकत नाही. ही मर्यादा लक्षात घेतल्यावर मग त्यातूनही जास्तीतजास्त अचूक रंगभेदन (कलर टोनॅलिटी) कसे मिळवायचे ह्यावर विचार करता येईल.

मेटामेरिजम्       रंगांच्या सारखेपणाचा आभास (Metamerism) म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळे रंग सारखेच भासणे. उदा. रंगांच्या विविध छटांमधील वेगळेपणा हा एका निरीक्षकाला जाणवेल पण दुसर्‍याला जाणवेलच असे नाही. (डोळ्यांसमोर आणा - साड्या, मॅचिंग ब्लाउजपीस, बायका आणि नवरे...) छायाचित्रणाच्या बाबतीत, वेगवेगळ्या प्रकाशस्रोतांमध्ये तीच वस्तू वेगवेगळ्या रंगांची जाणवणे ह्याला मेटामेरिजम् म्हणता येईल. एकच प्रतिमा ही दिवसा वेगळी आणि रात्रीच्या ट्यूबलाइट किंवा टंगस्टन दिव्याच्या प्रकाशात वेगळी दिसू शकते. तसेच एकाच प्रकाशात वेगवेगळ्या कॅमेर्‍यांच्या संवेदकांना एकच रंगछटा वेगवेगळी भासू शकते.

कलर गामुट       कलर गामुट म्हणजे छायाचित्रणात रंग निर्माण करणारी व्यवस्था. यालाच 'रंगभेदनक्षमतेची व्याप्ती' असेही म्हणता येईल. वेगवेगळ्या प्रणालींचे कलर गामुट हे वेगवेगळे असते आणि जेव्हा एकच प्रतिमा ही कॅमेर्‍याची एलसीडी स्क्रीन, संगणकाचा पडदा, छापील प्रिंट, प्रोजेक्टर इत्यादी माध्यमातून पाहिली जाते तेव्हा दरवेळी तिचा दर्जा आणि त्यातील रंगछटा ह्या अनुभवी डोळ्यांना वेगवेगळ्या भासतात. जेव्हा एका गामुटमधून आलेली प्रतिमा दुसर्‍या गामुटमध्ये व्यक्त केली जाते तेव्हा त्यात एक प्रकारचे मॅपिंग केले जाते. एखादी रंगछटा जर दुसर्‍या गामुटमध्ये उपलब्ध नसेल तर तिला जवळची अशी रंगछटा निवडली जाते. मानवी डोळ्यांना हे पटकन जाणवत नाही कारण आपण दोन्ही माध्यमे शेजारीशेजारी ठेवून तुलना करत नाही.

अ‍ॅडिटिव्ह आणि सबट्रॅक्टिव रंगमिश्रण       दृश्यमाध्यमांमध्ये वेगवेगळे रंग दाखवण्याच्या RGB आणि CMYK अशा दोन प्रकारच्या कलरमिक्सिंग पद्धती आहेत.

RGBAdditiveColorSpace      चित्रकलेच्या दृष्टीने मूळ रंग म्हणजे तांबडा, निळा व पिवळा. हे तीन रंग वापरून आपण पाहिजे ती रंगछटा बनवू शकतो. तशाच पद्धतीने प्रकाशातही तीन मूळ रंग आहेत. आणि शाईंमध्ये तीन मूळ रंगाच्या शाई आहेत. प्रकाशाची इतर कुठलीही रंगछटा प्राप्त करायला तांबडा, हिरवा आणि निळा हे मूळ तरंगलांबीचे प्रकाशकिरण एकमेकांत वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले की झाले. ह्या तिन्ही रंगांच्या प्रकाशशलाका एकत्र केल्यास तिथे पांढरा प्रकाश तयार होईल. आणि तिन्ही रंगशलाका काढून टाकल्यास काळा. म्हणून प्रकाशशलाका एकत्र करून हवी ती रंगछटा मॉनिटरसारख्या माध्यमात मिळवणे ह्याला 'अ‍ॅडिटिव्ह कलरमिक्सिंग' असे म्हणतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये वापरल्या जाणार्‍या अशा रंगव्याप्तींना RGB रंगव्याप्ती म्हणतात.

CMYKSubtractiveColorSpace      छपाईसारख्या माध्यमात मात्र ह्याच्या उलट तंत्र वापरावे लागते. तिथे कागदासारख्या आधीच पांढर्‍याशुभ्र माध्यमावर रंगछटा निर्माण करण्यासाठी त्या कागदावरून परावर्तित होणार्‍या प्रकाशाचा उपयोग करून घेतला जातो. अशा परावर्तित प्रकाशातील आपल्याला हवी असलेली रंगछटा सोडून बाकीच्या तरंगलांबी शोषून घेतल्या की झाले. म्हणून इथे Cyan, Magenta, Yello आणि Black या शाईंचा वापर केला जातो. ह्याला 'सबट्रॅक्टिव कलरमिक्सिंग' असे म्हटले जाते. आणि मुद्रित माध्यमांमध्ये वापरल्या जाणार्‍या अशा रंगव्याप्तींना CMYK रंगव्याप्ती म्हणतात.

ColorSpaceComparison      वरील प्रतिमेत अ‍ॅ़डोबी आरजीबी कलर स्पेस, एसआरजीबी कलर स्पेस आणि सीएमवायके कलर स्पेस दाखवली आहे. आपल्या लक्षात आले असेलच की तिन्ही रंगव्याप्ती ह्या आकाराने आणि भेदनक्षमतेने वेगवेगळ्या आहेत. Adobe RGB स्पेस ही आकाराने इतर दोन व्याप्तींपेक्षा जास्त मोठी आहे. sRGB कलरस्पेस ही अ‍ॅडोबीपेक्षा लहान असली तरी जवळजवळ तशाच आकाराची आहे, तर CMYK कलरस्पेस ही दोन्ही व्याप्तींपेक्षा लहान आणि वेगळ्याच आकाराची आहे. शिवाय त्यात जास्त रंगछटा ह्या गडदपणाकडे झुकणार्‍या आहेत. बर्‍याचशा प्रिंटरमध्ये सीएमवायके कलरस्पेस ही डिफॉल्टरूपाने वापरली जात असल्याने प्रिंट केलेल्या प्रतिमा ह्या जास्त वैधम्र्य दाखवतात, पण त्यात तितक्या टोनल व्हेरिएशन्स दिसत नाही. त्यासाठी सर्वोच्च दर्जाचे फोटोप्रिंटर वापरावे लागतात. भारतातील बंगळूर येथील फोटोलॅबमध्ये अशा स्वरूपाच्या २०१४ साली नुकत्याच आणलेल्या प्रिंटरची किंमत सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक आहे...!

      अधिक विचार करता तुमच्या असेही लक्षात येईल की संस्करणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिमेचा जो काही एकूण विदा असतो त्याचा तुलनात्मक र्‍हास होत असतो. म्हणजे छायाचित्र घेताना कॅमेर्‍यात अ‍ॅडोबी आरजीबी वापरलेली असेल तर त्याचे रूपांतर जेपेग (JPEG) मध्ये करताना एसआरजीबी कलरस्पेस वापरावी लागेल. नंतर प्रिंटरवर प्रिंट घेताना त्या एसआरजीबी रंगव्याप्तीतील छटांचे रूपांतर हे सीएमवायके रंगव्याप्तीत होताना प्रतिमेत अजून बदल होतील. उदा. लाल रंगाच्या अ‍ॅडोबी आरजीबीतील रंगछटांमधील वैविध्य हे एसआरजीबीमध्ये घेताना कमी होईल, तर सीएमवायकेमध्ये आणताना ते जवळजवळ नाहीसे झालेलेही असू शकेल. पण हे रंगबदल मोठ्या रंगव्याप्तीतून छोट्या रंगव्याप्तीत जाताना करणे जितके सोपे आहे ते छोट्या रंगव्याप्तीतून मोठ्या रंगव्याप्तीत जाताना करणे तितकेच अवघड आहे. म्हणून प्रतिमा घेतानाच त्यात जास्तीत जास्त विदा साठवला जाईल अशी रंगव्याप्ती निवडणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी शक्यतो RAW फॉरमॅटमध्येच प्रतिमा क्लिक करून नंतर त्यातील अ‍ॅडोबी आरजीबीचे रूपांतर पोस्टप्रोसेसिंगच्या वेळी एसआरजीबीमध्ये करणे जास्त सुविधाकारक ठरते. अर्थात, प्रतिमासंस्करणाला जास्त वेळ द्यावा लागतो, पण त्याचा परिणामही जास्त समाधानकारक आणि छायाचित्रकारास जास्त रचनात्मक नियंत्रण देणारा असतो. हे फार महत्त्वाचे आहे आणि तुमच्या डीएसएलआरमध्ये डिफॉल्ट कलरस्पेस जर sRGB असेल तर ती बदलून Adobe RGB करा आणि मग फोटो काढा. (JPEG मध्ये शूट करत असाल तर हा पर्याय मिळणार नाही!)

डिजिटल रंग आणि चॅनेल्स       आपण छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना या भागात बायेर आकृतिबंध पाहिला होता. प्रकाशाच्या तीन मूलभूत तरंगलांबी ह्या लाल, हिरवा आणि निळा रंग असतात. कॅमेर्‍याच्या संवेदकावरही प्रत्येक प्रकाशकूपा (पिक्सेल) वर ह्या तीन रंगांपैकी एका रंगाचे फिल्टर असतात. त्यातून प्रत्येक रंगाच्या सापेक्ष किंमती (रिलेटिव व्हॅल्यूज) मिळवल्या जातात आणि अ‍ॅनालॉग-ते-डिजिटल कन्वर्टर सर्किट (ADC) वापरून त्यांचे रूपांतर हे अंकीय पद्धतीत केले जाते. प्रत्येक रंगाचे किमान मूल्य हे ० तर कमाल मूल्य हे २५५ असू शकते. जर तिन्ही रंगांचे चॅनेल शून्य असतील तर एकही रंग अपेक्षित नाही असे समजून प्रतिमेत तेवढ्या भागात काळा रंग दाखवला जातो. जर तिन्ही रंग त्यांच्या कमाल पातळीला (२५५) असतील तर तिथे पांढरा रंग अपेक्षित असतो. यालाच 'चॅनेल' असे म्हणतात. रेड चॅनेल, ग्रीन चॅनेल आणि ब्ल्यू चॅनेल. ह्या तिन्ही चॅनेल्सच्या मूल्यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समुळे प्रत्यक्ष प्रतिमेत वेगवेगळ्या रंगछटा दिसतात. म्हणजेच प्रतिमासंस्करणाच्या दृष्टीने सुयोग्य रंगसंगती दाखवण्यासाठी आपणांस कॅमेर्‍याने ठरवलेल्या चॅनेल मूल्यसंगती हव्या तशा बदलून वेगवेगळा परिणाम साधता येतो. उदा. एखाद्या प्रतिमेत निळसरपणा जास्त जाणवत असेल तर प्रतिमासंस्करणात ब्ल्यू चॅनेल कमी करून आपण ती निळसर झाक काढून टाकू शकतो.

      प्रत्येक चॅनेलच्या किंमती ह्या ० ते २५५ असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक चॅनेलसाठी 8-bit किंवा एक बाइट एवढी जागा स्मृतीमध्ये (मेमरीत) दिलेली असते. म्हणून दोनचा आठवा घातांक ही अशा 8-bit सिस्टीमची कमाल किंमत असते. ह्यालाच बिट-डेप्थ असे म्हणतात. पण काही डीएसएलआर कॅमेरे हे 14-bit किंवा त्यापेक्षाही जास्त bit-depth ला प्रतिमा घेऊ शकतात. त्यामुळे अशा कॅमेर्‍यांमध्ये सामान्य कॅमेर्‍यांपेक्षा रंगछटांचे वैविध्य व त्यातील बारकावे टिपण्याची क्षमता कितीतरी जास्त असते. RAW प्रोसेसिंगचे महत्त्व अशासाठी की, तुम्हांला काम करायला भरपूर विदा (डेटा) हाताशी असतो. त्यामुळे होईल तेवढे प्रतिमासंस्करण हे रॉ मध्ये करावे आणि नंतर JPEG, TIFF, BMP, PNG अशा प्रतिमा-फाइल प्रकारांमध्ये रूपांतर करून पुढचे काम त्यावर करावे. याचा फायदा म्हणजे प्रतिमासंस्करण पूर्ण झाल्यावरही तयार झालेल्या फायनल इमेज फाइलमध्ये पुरेसा विदा उरतो.

प्रदीप्ती आणि रंगदीप्ती (Luminance And Chrominance)       ल्यूमिनन्स आणि क्रोमिनन्स म्हणजे अनुक्रमे प्रखरतेचे मापन आणि रंगीतपणाचे मापन. क्रोमिनन्स चॅनेलमध्ये मुख्यत्त्वे प्रतिमेतील रंगांची माहिती साठवलेली असते, तर ल्यूमिनन्स चॅनेलमध्ये प्रतिमेच्या गडद-प्रखरपणाचा विदा असतो. याचा उपयोग प्रतिमेची सुस्पष्टता (शार्पनेस) वाढवण्यासाठी करतात. सुस्पष्टता मिळवण्यासाठीचे संस्करण हे पूर्ण प्रतिमेवर करण्याऐवजी फक्त ल्यूमिनन्स चॅनेलवर करणे त्यासाठीच जास्त योग्य ठरते, अन्यथा रंगीतपणाचा विदा विनाकारण बदलला जाऊ शकतो. फोटोशॉपमध्ये किंवा पिकासामध्ये फक्त शार्पनेसचा स्लायडर सरकवून प्रतिमा शार्प करणे आणि आणि अशा रीतीने प्रतिमेचे डिजिटल विदा-स्वरूप शास्त्र समजाऊन घेऊन मग त्यावर प्रक्रिया करणे ह्यात खूप फरक आहे. अशा पद्धतीने मूलभूत तत्त्वे एकदा शिकली की तुमचे या क्षेत्रातील कौशल्य हे टूल-स्पेसिफिक न राहता फील्ड-स्पेसिफिक आणि विस्तृत होईल.

कॅमेराअंतर्गत संस्करण आणि RAW

      भाग ३ मध्ये आपण कॅमेरा संवेदकाची रचना ही मूलतः अ‍ॅनालॉग पद्धतीने कशी काम करते ते पाहिले. संवेदकांच्या प्रकाशकूपांमध्ये निर्माण होणारा विद्युतप्रभार (CCD) किंवा विद्युतदाब (CMOS) हा संवेदकावर पडणार्‍या प्रकाशाच्या प्रमाणात कमी-जास्त असतो. प्रत्येक प्रकाशकूपावरील हा प्रभार/दाब मोजून त्याचे रूपांतर अंकीय विदा किंवा डिजिटल डेटामध्ये करणे या प्रक्रियेला क्वांटायझेशन असे म्हणतात. याच्या जास्त खोलात शिरण्याचे आपल्याला आत्ता काही कारण नाही. पण किमान माहिती असल्यास कॅमेरा घेताना अशा तांत्रिक गोष्टींचा उपयोग होतो. साध्या Point-and-shoot कॅमेर्‍यांमध्ये अ‍ॅनालॉग विदाचे रूपांतर करण्यासाठी 8-bit क्वांटायझेशन वापरतात. आधुनिक प्रो आणि सेमी-प्रो डीएस्एल्आर कॅमेरे 12-bit किंवा 14-bit पर्यंत विदासंस्करण वापरू शकतात. म्हणजेच २ चा आठवा घात = २५६ पेक्षा २ चा चौदावा घात = १६,३८४ वेगवेगळ्या टोन्स जास्त मिळू शकतात. आता लक्षात आले का की पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यांपेक्षा डीएसएलआरने घेतलेल्या प्रतिमा रंगांच्या बाबतीत जास्त 'नॉर्मल' का वाटतात ते?

      कॅमेर्‍यातील संवेदकावरील प्रत्येक प्रकाशकूपावर तांबडा, हिरवा आणि निळा यापैकी एका रंगाचा फिल्टर लावलेला असतो. पण म्हणून त्या पिक्सेलचे अंकीय RGB मूल्य हे फक्त एका रंगाने नाही दाखवता येत. उदा. तांबड्या रंगाच्या फिल्टरवाल्या प्रकाशकूपाचे RGB मूल्य हे (255, 0, 0) असे नसते. जरी त्या पिक्सेलचे उद्दिष्ट मुख्यत्वे तांबड्या रंगाची रंगछटा दाखवणे हे असले तरी त्या पिक्सेलसाठी Green आणि Blue यांचीही किंमत काढावी लागते. त्या पिक्सेलने इतर रंगांची नोंद घेतलेलीच नसताना हे कसे काय करायचे? त्यासाठी मग त्याच्या शेजारच्या प्रकाशकूपांच्या RGB मूल्यांचा एकत्रित विचार केला जातो. शेजारच्या हिरव्या, निळ्या आणि तांबड्या प्रकाशकूपांनी कुठल्या रंगाचे प्रमाण किती कमीजास्त नोंदवले आहे हे लक्षात घेऊन ह्या प्रकाशकूपाची हिरव्या-निळ्या रंगांची मूल्ये अंदाजे ठरवली जातात. अतिशय गुंतागुंतीच्या आणि एकाच वेळेस पुन्हापुन्हा एक्झिक्यूट होणार्‍या आज्ञावलीचा त्यासाठी वापर केला जातो. या समग्र प्रक्रियेला 'कलर फिल्टर अ‍ॅरे इंटरपोलेशन' (CFAI) किंवा 'डीमोझेइकिंग' (Demosaicking) असे म्हणतात. खालील प्रतिमा पहा.

DemosaickingVariations
      इथे एकाच प्रतिमासंवेदकावरील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या प्रकाशकूपांच्या RGB किंमती ठरवण्यासाठी वेगवेगळ्या आज्ञावली कशा वापरल्या जाऊ शकतात हे दाखवले आहे. मधल्या १५ क्रमांकाच्या पिक्सेलची हिरवी-निळी छटा शोधण्यासाठी एक आज्ञावली कधी शेजारच्या ४, ८, १३, १४, १६, १७, २२, २६ इतक्या प्रकाशकूपांचे सापेक्ष मूल्य विचारात घेईल, तर दुसरी आज्ञावली त्यासोबतच ३, ५, ६, ७, ९, १०, २०, २१, २३, २४, २५ आणि २७ यांचेही मूल्य संदर्भासाठी पाहील. कदाचित तिसरी आज्ञावली १ ते २९ या सर्वच प्रकाशकूपांची मूल्ये वाचेल आणि १५ व्या प्रकाशकूपाच्या हिरव्या-निळ्या रंगांच्या किंमती ठरवेल.
      हे एवढे सगळे सांगत बसण्याचे कारण म्हणजे आपण ज्याला RAW फाइल म्हणतो ती रॉ फाइल अशा डीमोझेइकिंग आज्ञावलीचे फलित असते. आणि ह्या गुंतागुंतीच्या आज्ञावली प्रत्येक कॅमेरा उत्पादक कंपनीचे ट्रेड सिक्रेट असल्याने दोन कंपन्यांनी एकच संवेदक जरी वापरला तरी दोन्ही कॅमेर्‍यातून मिळणार्‍या रॉ फाइल्स अगदी वेगवेगळ्या असू शकतात. दुसरा तोटा असा की रॉ प्रोसेसिंग करणार्‍या थर्ड पार्टी सॉफ्टवेअर प्रोग्राम्सना ह्या डीमोझेइकिंग आज्ञावलींचा अंदाज कितपत येतोय त्यावर त्यामध्ये करता येणार्‍या रॉ प्रोसेसिंगचे यश अवलंबून असते. म्हणूनच निकॉनच्या रॉ फाइल्स ह्या निकॉननेच बनवलेल्या ViewNX2 किंवा CaptureNX2 सॉफ्टवेअरशिवाय इतर सॉफ्टवेअरना तितक्याशा चांगल्या समजत नाहीत असे छायाचित्रकारांच्या वर्तुळात म्हणतात.

डिजिटल फाईल प्रकार - JPEG आणि TIFF

      डिजिटल फाईलींचे प्रकार हे त्यांच्या प्रतिमेतील विदा साठवण्याच्या कार्यप्रणालींच्या फरकांनी ओळखले जातात. प्रतिमेशी संबंधित विदामध्ये खुद्द प्रतिमेचा विदा जरी सर्वात जास्त भाग व्यापत असला तरी त्या विदाची संरचना किंवा डेटा ऑर्गनायझेन हे संगणक प्रणालींना समजणे आवश्यक असते. त्यामुळे बराचसा मेटाडेटा किंवा 'विदाबद्दलचा विदा' सुद्धा अशा फाईल प्रकारांना साठवावा लागतो. त्यात EXIF सारख्या कॅमेरा सेटिंग्ज साठवणार्‍या संकेताचा (प्रोटोकॉलचा) ही समावेश होतो. याव्यतिरिक्त अतिशय महत्त्वाची अजून एक बाब डिजिटल फाइल प्रकारांमध्ये साठवली जाते, ती म्हणजे प्रतिमेचा विदा कशा प्रकारे कॉम्प्रेस केला आहे आणि तो योग्य प्रकारे डीकॉम्प्रेस कसा केला जावा. डिजिटल फाइल प्रकारांची उपयुक्तता ही दोन बाबींवर अवलंबून असते - एक म्हणजे फाईल आकार लहान असणे आणि दुसरे म्हणजे फाईलमधील प्रतिमेचा मूळ विदा कायम राहणे. अर्थात हे दोन्ही निकष एकाच वेळी पूर्ण करणे कोणत्याच फाईल-प्रकाराला शक्य नाही. इथे आपण प्रामुख्याने JPEG आणि TIFF या फाईल-प्रकारांची माहिती घेणार आहोत कारण डिजिटल जमान्यात हे दोन प्रकार सर्वात जास्त प्रचलित आहेत.
१) JPEG (जेपेग)
      जेपेग हा छायाचित्रणातील सर्वात लोकप्रिय आणि सर्व अ‍ॅप्लिकेशन/टेक्नॉलॉजी/वेब वगैरे ठिकाणी ओळखला जाणारा (कंपॅटिबल) असा इमेज फाईल-प्रकार आहे. IS 10918-1 ह्या आयएसओ मानकांचा पहिला भाग म्हणजे हा जेपेग प्रोटोकॉल. त्यामुळे बरेचसे संगणक प्रोग्रॅम जेपेग फाईल सहजपणे वाचू आणि लिहू शकतात. दुसरा याचा फायदा असा की, जेपेग वापरून तुम्ही इमेज फाईल खूपच कॉम्प्रेस करू शकता. प्रतिमेतील एकसारख्या रंगाचे भाग जास्त असले आणि प्रतिमेत फारसे डिटेल्स नसले की हे कॉम्प्रेशन मूळ प्रतिमेच्या १/४० इतके प्रचंड लहान होऊ शकते. याचे कारण म्हणजे जेपेग प्रोटोकॉल हा एकसारख्या रंगछटांना एकाच रंगछटेशी 'मॅप' करतो आणि प्रतिमा साठवताना आधीचे डिटेल्स सरळसरळ कमी करून टाकतो. म्हणूनच दरवेळेस जेपेग फाईल सेव्ह करताना त्यातील काही बारकावे कायमचे नष्ट होतात. त्यामुळे जेपेग फाईल प्रकाराला 'लॉसी फॉरमॅट' म्हणतात.

२) TIFF (टीआयएफएफ)
      टीआयएफएफ फाईल फॉरमॅट हा खास पब्लिकेशन किंवा प्रिंटींगसाठी वापरला जाणारा उच्च-पृथक्करण क्षमता (High Resolution) असणारा फाईल प्रकार आहे. TIFF म्हणजे 'टॅग्ड इमेज फाईल फॉरमॅट' असे काहीजण मानतात. पण त्याचा अधिकृत लॉन्गफॉर्म असा काही नाही. त्यामुळे TIFF स्टॅण्डर्ड (प्रमाणन) ने जे ४७ वेगवेगळे 'टॅग' मान्य केले आहेत आणि त्याव्यतिरिक्त अप्रमाणित आणि व्यक्तिगत स्वरूपाचे अजून कितीतरी टॅग मिळून हा फाईल प्रकार तयार झाला आहे. टीआयएफएफ किंवा टिफ्फ या नावानेही ओळखला जाणारा हा फाईल प्रकार खूपच लवचिक आणि बहुपयोगी म्हणून मान्य पावला आहे. टीआयएफएफ एखाद्या XML सारखे असते. काय शोधायचे आणि कुठे शोधायचे हे सांगणारे. खरंतर बहुसंख्य RAW फॉरमॅटही मूलतः टीआयएफएफ प्रमाणनावर आधारीत असतात. जेपेगच्या तुलनेत टिफ्फ प्रकारात प्रतिमा विदा कॉम्प्रेस व डीकॉम्प्रेस होताना कुठलाही विदा नष्ट होत नाही. म्हणूनच टीआयएफएफ हा 'लॉसलेस फॉरमॅट' म्हणून ओळखला जातो. अर्थात हे LZW अल्गोरिदमला लागू आहे. RIP सारख्या काही सिस्टिममात्र अनकॉम्प्रेस्ड टीआयएफएफ फाईल्स वापरायला प्राधान्य देतात.

प्रतिमासंस्करणाची कार्यपद्धती - RAW वर्कफ्लो आणि JPEG वर्कफ्लो

      प्रतिमासंस्करणात दोन प्रकार येतात जे आपल्या प्रतिमा फाइलप्रकारावर अवलंबून असतात. रॉ प्रोसेसिंग आणि जेपेग प्रोसेसिंग. रॉ इमेज फाइल म्हणजे कॅमेरा संवेदकावर टिपला गेलेला सर्व विदा असतो, तर जेपेग इमेज फाइलमध्ये रॉ फाइल प्रोसेस केल्यानंतर वगळलेल्या बाबींव्यतिरिक्त उरलेली प्रतिमा असते. एकाच प्रतिमेच्या रॉ आणि जेपेग फाइल जशाच्या तशा दिसतात. पण खूप झूम केल्यानंतर त्यातील सूक्ष्म फरक आपल्याला दिसतात. रॉ इतका सुस्पष्टपणा, रंगछटा ह्या जेपेगमध्ये नसतात. पोस्टप्रोसेसिंगच्या 'संवेदक -> रॉ -> जेपेग' ह्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिमेतील काही विदा कायमचा नष्ट होत असतो. त्यामुळे काही पायर्‍या ह्या केवळ रॉ मध्येच करता येतात. एकदा त्यापासून जेपेग बनवली की त्या पायर्‍या करता येत नाहीत. उदा. एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन आणि व्हाइट बॅलन्स. म्हणून फोटो घेताना शक्यतो रॉ मध्ये शूट करावे.

RAWvsJPEGzoomed
RAW प्रोसेसिंगच्या पायर्‍या
व्हाइट बॅलन्स ठीकठाक करणे

      प्रत्यक्षात प्रतिमा घेताना व्हाइट बॅलन्स किंवा शुभ्रसंतुलन हे ऑटोमॅटिक ठेवले तरी नंतर प्रतिमासंस्करणात ते बदलता येते. प्रतिमा घेतानाचा प्रकाश हा टिंटेड असेल तर व्हाइट बॅलन्स सेट करताना तु्म्ही तो बदलू शकता. उदा. ट्यूबलाइटमध्ये काढलेल्या फोटोंमध्ये निळसर झाक येते. प्रतिमासंस्करणात त्याऐवजी उदा. Daylight अथवा Cloudy ठेऊन ही झाक काढू शकता.

RAW-WhiteBalance
      व्हाइट बॅलन्समध्ये खाली दाखवल्याप्रमाणे फाइन अ‍ॅडजस्टमेंट करता येतात.

RAW-WhiteBalanceFineAdjustment
एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन सुधारणे

      मॅन्युअल मोडमध्ये शूट करताना किंवा ऑटो मोडवरदेखील उद्भासन नेहमीच अचूक येईल असे नसते. त्यामुळे हा स्लाइडर वापरून एक्स्पोजर व्यवस्थित करता येते. हिस्टोग्राम आणि प्रतिमेचे पूर्वदृश्य ह्या दोन्हींवर लक्ष ठेऊन उद्भासन समायोजन करावे.

RAW-ExposureCompensation
RAW ते JPEG रूपांतरण

      RAW फाइल प्रोसेस केल्यानंतर फाइलचे रूपांतर TIFF किंवा JPEG मध्ये करता येते. JPEG मध्ये करताना आधी वर्किंग स्पेस किंवा कलरस्पेस ही ProPhotoRGB किंवा Adobe RGB असल्याची खात्री करून घ्या. प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटची पायरी म्हणजे Adobe RGB मधून sRGB रंगव्याप्तीत बदलणे. ही पायरी आधीच करू नका. अजून एक म्हणजे जेपेगमध्ये बदलताना इमेज क्वालिटी किती ठेवायची हे एक पॉपअप विचारतो. त्यात सर्वात जास्त किंवा १००% ही क्वालिटी सिलेक्ट करा. म्हणजे पुढील टप्प्यांतील बदलांसाठी जास्तीत जास्त प्रतिमा-विदा उपलब्ध होईल. खालच्या स्टेप्स प्रतिमा RAW फॉरमॅटमध्ये असतानाही करता येतात. तसे केले तर उत्तमच. अन्यथा प्रतिमा JPEG मध्ये कन्व्हर्ट करून घ्या.

JPEG प्रोसेसिंगच्या पायर्‍या
पिक्चर कंट्रोल

      यात कॅमेर्‍यामध्ये सेट करता येणारे वेगवेगळे पिक्चर कंट्रोल मोड बदलता येतात. उदा. स्टॅण्डर्ड, न्यूट्रल, व्हिविड, मोनोक्रोम, पोर्ट्रेट, लॅण्डस्केप इत्यादी.

JPEG-PictureControl
कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेस

      वैधम्र्य म्हणजेच कॉन्ट्रास्ट वाढवले तर प्रतिमेतील रंगांची कलर डेप्थ् वाढते. प्रखरपणा किंवा ब्राइटनेस वाढवल्यास प्रतिमेतील प्रकाशमानतेचे प्रमाण वाढते. हे दोन्ही स्लाइडर थोडे-थोडे वाढवत न्यायचे असतात. कारण कॉन्ट्रास्ट आणि ब्राइटनेस यांचा एकत्रित परिणाम प्रतिमेत दिसत असतो. कॉन्ट्रास्ट वाढवला तर गडदपणा कमी करण्यासाठी ब्राइटनेस थोडा वाढवावा लागतो.

JPEG-BasicAdjustmentMenus
हायलाइट प्रोटेक्शन

      प्रतिमेतील प्रखर जागा जर ओव्हरएक्स्पोज झाल्या तर त्या भागातील बारकावे (डीटेल्स) पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हा स्लाइडर वापरतात.

शॅडो प्रोटेक्शन

      त्याचप्रमाणे प्रतिमेतील गडद जागांमधील बारकावे पुन्हा रिकव्हर करण्यासाठी शॅडो प्रोटेक्शन स्लाइडरचा वापर केला जातो. हा स्लाइडर काळजीपूर्वक वापरावा. जास्त झाला तर टोनॅलिटी गंडते.

व्हाइट्स

      प्रतिमेतील शुभ्र किंवा पांढरट भागांचा शुभ्रपणा वाढवण्यासाठी.

ब्लॅक्स

      प्रतिमेतील काळपट भागांना अधिक काळे करण्यासाठी.

ह्यू आणि सॅच्युरेशन

      ह्यू म्हणजे रंगछटा. सॅच्युरेशन म्हणजे त्या रंगछटेत करड्या रंगाचे प्रमाण किती आहे.

JPEG-HueSaturation
शार्पनिंग

      प्रतिमेतील सुस्पष्टता कमी वाटत असेल तर हा स्लाइडर वापरून तो काही प्रमाणात वाढवता येतो. अर्थात अचूक संकेंद्रीकरणाला म्हणजेच फोकसिंगला हा पर्याय नाहीये हे मात्र लक्षात ठेवावे. प्रतिमेतील सुस्पष्टता वाढवण्यासाठी बरेच अल्गोरिदम आहेत. बहुतांशी अल्गोरिदम हे पिक्सेलच्या आजूबाजूच्या पिक्सेल्सच्या व्हॅल्यूजनुसार समायोजन करतात. त्यामुळे प्रतिमेत नको असलेल्या ठिकाणीदेखील कधीकधी कुरव (नॉइज) निर्माण होतो. म्हणून हा स्लायडर जास्त वापरू नये. शार्पनिंग हे +1 ते +3 इतपतच ठेवावे. त्यापेक्षा जास्त वाढवू नये.

JPEG-Sharpening
स्ट्रेटनिंग आणि रिसाइजिंग

      प्रतिमेतील आभासी क्षितिज हे एका बाजूला कललेले असल्यास रचनाविचार प्रभावी ठरत नाही. त्यामुळे वरील सर्व स्टेप्स झाल्यावर प्रतिमा सरळ करून घ्यावी.

JPEG-Straightening
      रिसाइजिंग म्हणजेच क्रॉपिंग. प्रतिमा घेताना थोडी लांबून घेतली असल्यास किंवा फ्रेमिंगमध्ये जास्त निगेटिव्ह स्पेस, नको असलेल्या दुय्यम विषयवस्तू इत्यादी दोष आल्यास क्रॉप करून ते काढता येतात. शिवाय प्रतिमा ज्या माध्यमांत पहायची आहे त्यांच्या रिझॉल्यूशनप्रमाणे प्रतिमा क्रॉप करता येते.

JPEG-Cropping
      ह्यातील कुठल्याही सेटिंगचा अतिवापर टाळावा. प्रतिमेतील सर्वसाधारण मूलभूत दोष कमी होतील आणि दिसायला छान वाटेल इतपतच पोस्टप्रोसेसिंग करावे.

      ह्या भागात आपण प्रतिमासंस्करणाच्या मूलभूत संकल्पना आणि त्यासंबंधीच्या सॉफ्टवेअरमधील वेगवेगळे मेनू, प्रतिमासंस्करणाचे विविध टप्पे पाहिले. पण उदाहरणे राहिलीत. पुढील भागात आपण प्रतिमासंस्करणाच्याच अधिक प्रगत बाबी (advanced image post-processing) पाहणार आहोत. सोबतच वरील वर्कफ्लो वापरून एक प्रतिमा प्रोसेस करणार आहोत. छायाचित्रण स्पर्धेत हिरीरीने भाग घेणार्‍या मिपाकरांना थोडी मदत व्हावी म्हणून अर्धाच भाग टाकला आहे. उरलेले पुढील भागात!

जाताजाता
Stranger: “That is beautiful child you have there.”
Mother: “That’s nothing. You should see his photograph.”

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

27 Dec 2014 - 8:51 pm | कंजूस

वा ! सर्व लेख वाचला स्पर्धेसाठी पाठवलेल्या चित्रांना असे बदल केले आहेत का नाही हे मान्य करावे लागते ना ?

एस's picture

27 Dec 2014 - 11:06 pm | एस

बहुतांशी स्पर्धांमध्ये कितपत पोस्टप्रोसेसिंग केलंय हे सांगावे लागते. खूपच जास्त एडिट केली असेल तर अशी प्रतिमा रद्दबातल होते. ह्याचे एक उदाहरण एका जागतिक स्पर्धेत घडल्याचे आठवतेय, पण आत्ता बातमीचा दुवा नाहीये. प्रथम क्रमांकाच्या फोटोप्रवेशिकेचे पारितोषिक काढून घेतले गेले होते आणि छायाचित्रकाराला मूळ प्रतिमा सामान्य होती हे मान्य करावे लागले.
असेच एकदा बहुधा नॅटजिओ की कोणत्या मॅगझिनमध्ये दोन पक्ष्यांची सुंदर फ्रेम असलेला एक फोटो होता. तो नंतर दोन वेगवेगळ्या फोटोंपासून बनवलेला होता हे सिद्ध झाले.

कंजूस's picture

28 Dec 2014 - 5:52 am | कंजूस

असे बदललेले रंगीत चित्र करणयाची पद्धत (द् +ध)आकाशातील गेलेक्सी अथवा ताऱ्यांचे साठी एका फोटोग्राफरने शोधली(खरं म्हणजे १५०वर्षाँपूर्वीची )ती आता मान्य करण्यात आली आहे.{ तो NAT GEOचा अंक आता माझ्याकडे नाही.}

मुक्त विहारि's picture

27 Dec 2014 - 9:15 pm | मुक्त विहारि

फोटोग्राफीतले घंटा काही कळत नाही,

त्यामुळे, सध्या "वाखूसा."

हळू-हळू आरामात एक एक गोष्ट शिकत मग पुढे जाईन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2014 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर आणि माहितीने ओतप्रोत !

वाखुवर साठवून ठेवली आहे. एक संदर्भ म्हणून ही लेखमाला सतत उपयोगी पडेल हे नक्की.

आंतरजालावर चकटफू मिळणार्‍या काही उपयोगी पोस्ट प्रोसेसिंग प्रणाली आहेत का ?

एस's picture

27 Dec 2014 - 11:13 pm | एस

GIMP, Irfaan View, FastStone Image Viewer अशा अनेक प्रणाली आहेत व फुकट आहेत.

कहर's picture

21 Jan 2015 - 9:47 am | कहर

Microsoft ने windows मध्ये फुकट दिलेले Microsoft Office Picture Manager वापरून सुद्धा basic एडिटिंग शक्य आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Dec 2014 - 10:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर आणि माहितीने ओतप्रोत !

वाखुवर साठवून ठेवली आहे. एक संदर्भ म्हणून ही लेखमाला सतत उपयोगी पडेल हे नक्की.

आंतरजालावर चकटफू मिळणार्‍या काही उपयोगी पोस्ट प्रोसेसिंग प्रणाली आहेत का ?

आतिवास's picture

27 Dec 2014 - 11:10 pm | आतिवास

अशा प्रकारे चांगले फोटो कधी बरं काढता येतील?

आतिवास's picture

27 Dec 2014 - 11:12 pm | आतिवास

'मला!!' हा शब्द राहून गेला वरच्या प्रतिसादात!

एस's picture

28 Dec 2014 - 12:55 pm | एस

मलापण! ;-)

रामपुरी's picture

31 Dec 2014 - 3:25 am | रामपुरी

"GIMP" : ADOBE ची सगळी वैशिष्ट्ये असणारी परिपूर्ण आणि मुख्य म्हणजे चकटफू प्रणाली. सध्या हिच वापरत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2015 - 7:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

(थोडे उशीरा) पण मनःपूर्वक अनेक धन्यवाद !

प्रचेतस's picture

27 Dec 2014 - 11:31 pm | प्रचेतस

निव्वळ अफाट. _/\_
कधीपासून ह्या धाग्याची वाट पाहात होतो.
आता केवळ पोच. उद्या परत सविस्तर वाचणार.

एस's picture

28 Dec 2014 - 12:54 pm | एस

कार्यबाहुल्यामुळे धागा टाकायला उशीर झाला. पुढच्या भागात अधिक डिटेल्स येतील. दोन्ही धागे वाचून कुणालाही पुरेसे पोस्टप्रोसेसिंग करायला जमले पाहिजे असा प्रयत्न आहे.

चौकटराजा's picture

28 Dec 2014 - 10:02 am | चौकटराजा

यातून बर्‍याच फोटोग्राफरनी धडा घेण्याचे काही मुद्दे- १) आर जी बी व सी एम वा के मॉडेल मधला फरक समजावून घ्या.
२) डिजिटल व केमिकल फोटो सेन्सीटीव्हीटी मधले उजवे कोण हे समजावून घ्या. ३) आपल्या क्यामेर्‍यास रॉ ची सोय असेल तर तिचा वापर आवश्य करा. ४) रंग, प्रकाश, व करडेपण याचे प्रमाण कमी अधिक करून रंगाची दुनिया आपले रंग कसे दाखवते तसेच गॅमा करेक्शन मुळे ( व्ही एल सी मोडिया प्लेअरवर सोय) काय घडते हे पहाणे. ५) आपल्या एक्सपोझरच्या वा मीटरिंगच्या चुका दुरूस्त करणारे लेव्हल करेक्शन किती महत्वाचे साधन आहे हे पहाणे.
स्वॅप , हे तपशीलात समजायला तीन चार वेळा वाचावे लागेलच ! यात आपण केलेल्या मेहनतीचे सार आले !

एस's picture

28 Dec 2014 - 10:37 am | एस

फक्त स्टेप्स देण्यापेक्षा त्यामागील संकल्पना समजाऊन सांगण्यासाठी हे लिहिलेय.

शुक्रिया राजासाहब! :-)

प्रचेतस's picture

29 Dec 2014 - 2:26 pm | प्रचेतस

आता निवांतपणे वाचला हा भाग परत.
प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्वे उत्तमप्रकारे विषद केली आहेत.
गॅमा कसा मोजायचा किंवा गॅमामध्ये बदल कसा करायचा हे समजले नाही.

चौराकाकांचा प्रतिसादही आवडला.

एस's picture

29 Dec 2014 - 5:33 pm | एस

पुढील भागात 'कर्व्हज्' आणि चॅनेल्स पाहणार आहोत तेव्हा सांगतो.

प्रचेतस's picture

29 Dec 2014 - 5:56 pm | प्रचेतस

वोक्केजी.

चौकटराजा's picture

29 Dec 2014 - 6:34 pm | चौकटराजा

माझा एक व्यावसायिक स्नेही मला म्हणाला होता " ३५ मिमि फिल्म निगेटिव्हची बरोबरी करायची असेल तर ५२ मेगा पिक्सलचा क्यामेरा हवा !"
बा द वे - स्वॅप साहेबा- धाग्याला अवांतर ठरणारा एक प्रश्न - फोटो मधे फिगरला रिम लाईट्स टाकायचे असतील तर कडांवर " डॉज" ब्रश मारून मी तो परिणाम आणतो. पण सिनेमात वा नाटकात ज्याप्रमाणे रंगीत कट लाईट्स असतात तसे मला साधायचे आहे. हे डोज टूल फक्त पांढरा किंवा पिवळट पांढरा लाईट पुरवते. नवा लेअर निर्माण करून हे रिटचिंग त्यावर आयसोलेट करून ते कलर बॅलन्स मधून रंगीत करता येईल का?

एस's picture

29 Dec 2014 - 8:16 pm | एस

'इमेज मॅनिप्युलेशनचा' प्रश्न विचारलात! :-)

हो तसे करता येईल. सिलेक्शन आयसोलेट करून तेवढ्या लेअरवर वेगळे काम करून करता येईल. एक तर चॅनेल्समधून व्ह्यू-सॅच्युरेशन वाढवता येईल किंवा ब्रश वापरून वेगळा रंग सिलेक्ट करूनही फटकारे मारता येतील. किंवा फक्त तेवढाच भाग वेगळा लेअर बनवून त्याचा रंग बदलता येईल. याचे बरेच मार्ग आहेत. पण इथे देत बसण्यापेक्षा खवमधून चर्चा करतो, नाहीतर पब्लिक कंफ्यूज होईल.

पैसा's picture

30 Dec 2014 - 12:17 pm | पैसा

फारच सुरेख लेख! प्रचंड माहितीपूर्ण आहे.

ह्या सगळ्या लेखांची एक पीडीएफ बनवल्यास उत्तम होईल.

एस's picture

2 Jan 2015 - 4:29 pm | एस

कंजूस, मुक्त विहारि, इस्पीकचा एक्का, आतिवास, रामपुरी, वल्ली, चौकटराजा, पैसा, यशोधरा आणि सर्व वाचकांचे मनापासून आभार!

पूर्ण झाल्यावर नक्कीच एक इ-बुक करूयात. कदाचित त्यात थोडी भर घालता येईल किंवा बदल करता येतील. त्यासाठी काही सूचना असतील तर जरूर द्या. पाहू. वेळ मिळण्यावर अवलंबून आहे.

वेल्लाभट's picture

6 Jan 2015 - 12:50 pm | वेल्लाभट

प्रश्न खरं तर छायाप्रकाशाबद्दल आहे. परंतु इथे विचारला तर हरकत नसेल असं मानून विचारतो.

आतापर्यंतच्या अनुभवानुसार मला तीव्र प्रकाशात लँडस्केप काढणं नीट जमत नाही. मनासारखे फोटो येत नाहीत. एफ स्टॉप खूप अधिक ठेवूनही डीटेल्स मिस होतात. कमी ठेवून एक्स्पोजर अती होतं. काही सूचना शेरे मिळतील का? तांत्रिक संज्ञा वापरताना गल्लत झाली असेल तर समजून घ्यावी.

तीव्र प्रकाशात लॅण्डस्केपच काय, कुठल्याही प्रकारची प्रतिमा घेणे हे तसे अवघडच असते. कॅमेरा मीटरिंग मोड जसा असेल त्याप्रमाणे एक तर हायलाइट्स किंवा शॅडोज् साठी एक्स्पोजर देतो. दोन्ही भागांमधील बारकावे एकाच प्रतिमेत एकाच वेळी टिपता येत नाही.

त्यासाठी कॅमेरा ट्रायपॉडवर ठेऊन तीन ते चार प्रतिमा घ्याव्या लागतील. प्रत्येक प्रतिमेत एक्स्पोजर ब्रॅकेटिंग करायचे आणि शेवटी ह्या प्रतिमा एचडीआर प्रोसेसिंग करून एकत्र करायच्या.

दुसरा मार्ग असा की प्रतिमा घेताना थोडी अंडरएक्स्पोज घ्यायची व नंतर बर्निंग व डॉजिंग करून हवे त्या भागातील बारकावे मिळवायचे.

वेल्लाभट's picture

6 Jan 2015 - 1:32 pm | वेल्लाभट

हे मी करतो. शक्यतोवर अन्डर एक्स्पोज करण्याकडे कल असतो. बर्निंग डॉजिंग शक्य असल्यास टाळतो पण लेव्ह्ल, ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट अ‍ॅडजस्ट करतो.

एचडीआर मात्र ट्राय केलेलं नाही फारसं. नक्कीच करून बघेन. :) धन्यवाद.

चौकटराजा's picture

6 Jan 2015 - 1:59 pm | चौकटराजा

एच डी आर ची काही मस्त उदाहरणे जालावर आहेत. फॉटोशॉपला त्यासाठी एक प्लगिन लागते बहुतेक !

वेल्लाभट's picture

6 Jan 2015 - 3:22 pm | वेल्लाभट

हो ना? .... हं.... बघतो आता

बर्निंग व डॉजिंग म्हणजे काय?

प्रतिमासंस्करणातील हे टप्पे आपण पुढील भागात बघणार आहोतच. आत्ता थोडक्यात सांगतो.

बर्निंग व डॉजिंग हे डार्करूम फिल्म डेवलपमेंट व प्रिंटिंगशी संबंधित शब्द आहेत. आताच्या डिजिटल युगातही काही सॉफ्टवेअर प्रणालींमध्ये हे फीचर्स असतात.

काही वेळेस आपणांस प्रतिमेतील काही भाग हा गडद ठेवायचा असतो, पण प्रतिमा घेताना ओव्हरऑल सिंगल एस्क्स्पोजरमुळे त्या भागातील बारकावे हे जास्त प्रखर होतात. अशा वेळी 'बर्न' करून म्हणजेच एक्स्पोजर वाढवून (हे एक्स्पोजर म्हणजे फिल्म विकसित करतानाचे डार्करूम एक्स्पोजर; आपले नेहमीचे अ‍ॅपर्चर-शटरस्पीड-आयएसओ वाले एक्स्पोजर नव्हे) तो भाग थोडा गडद केला जातो. याला 'बर्निंग' असे म्हणतात.

डॉजिंग याच्या नेमकं उलट असतं. जो भाग अंडरएक्स्पोज झाला आहे किंवा काळपट आला आहे त्या भागावर विकसन करताना (म्हणजे निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह प्रिंट करताना) तेवढ्या भागात फिल्म कमी एक्स्पोज केली जाते, जेणेकरून असा भाग थोडा पांढरट राहील. म्हणजेच अंधारात हरवलेले बारकावे डॉज करून पुन्हा मिळवता येतात.

बर्निंग म्हणजे प्रतिमेची निगेटिव्ह ही नॉर्मल प्रकाशापेक्षा जास्त प्रकाश वापरून 'जाळायची' म्हणजे विकसित झाल्यानंतरही अजून विकसित करायची.
डॉजिंग म्हणजे प्रतिमेची निगेटिव्ह नॉर्मल प्रकाशापेक्षा अपुरा प्रकाश वापरून 'विझवायची' किंवा संपूर्ण विकसित होऊ द्यायची नाही.

बर्न म्हणजे ब्राइट भागांना डार्क करणे, डॉज म्हणजे डार्क भागांना ब्राइट करणे.

हे प्रत्यक्ष कसे, केव्हा आणि किती करायचे ते पुढील भागात पाहू. :-)

चौकटराजा's picture

7 Jan 2015 - 6:42 am | चौकटराजा

गोनिदा ना अनेक छंदांप्रमाणे छायाचित्रणाचा ही छंद होता. त्यानी एक खास फोटो डेव्हलपर योजलेला असे. गोनिदा फोटोचे एन्लार्जमेंट करण्याअगोदर त्याला काही सूचना देत असावेत अथवा आपल्या फोटोतील काही दोष त्याच्यावरच सोपवीत असावेत.
पण ज्यावेळी तो फायनल एन्लार्जमेंट आणून द्यायचा त्यावेळी गोनिदा मात्र खुष होत. त्यात या दोन क्रिया होत असत.या निमित्ताने त्यांचे केरळच्या लॅगूनचे तसेच ह्ंपीचे एनलार्जमेंटस आठवले. मी फोटोशॉप वापरताना या क्रियांचा सर्रास वापर करतो.पण त्यात त्यातील स्लायडर फार जपून वापरावे लागतात नाहीतर काम ओंम्फस होते.

एस's picture

7 Jan 2015 - 12:06 pm | एस

गोनिदांचे फोटो मी पाहिलेले नाहीत. कुठे लिंक आहे का? पहायला आवडेल.

प्रचेतस's picture

7 Jan 2015 - 4:55 pm | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्वॅप्स.
सध्या तरी ही प्रक्रिया काहिशी किचकट असावी अशी दिसते आहे.

पुढच्या भागाची वाट पाहतो आहेच.

किल्लेदार's picture

7 Jan 2015 - 3:55 pm | किल्लेदार

स्वॅप्स साहेब सर्वप्रथम आपले आभार.

आपण दिलेली माहिती म्हणजे सुग्रास भोजनाचे ताटच आहे. याआधी पण असे जेवलो आहे पण तेव्हा ताटात सर्व पदार्थ एकदम पडले नव्हते. माझ्या ब्राउझर च्या फेवरिट्स मध्ये माहितीच्या भरपूर लिंक्स आहेत पण त्याजागी ही एकच लिंक ठेवली तरी पुरे असे म्हणण्याइतपत आपण परिपूर्ण माहिती दिली आहे. इ बुक करतांना मदत करायला आवडेल. वेळेअभावी लेख सूक्ष्मपणे अजून वाचला नाही पण लवकरच वाचून व्यनि करेन.

धन्यवाद किल्लेदार! :-)

रवीराज's picture

20 Jan 2015 - 6:56 pm | रवीराज

अतिशय महत्त्वपुर्ण आणि बहुमोल माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

खूपच विलंब लावता राव तुम्ही.

पुढचा भाग कधी येतोय?

एस's picture

26 Feb 2015 - 2:27 pm | एस

हो लक्षात आहे. लिहिणार आहे. थोडा लिहून झालायही. पण त्यासाठी तितकासा सलग मोकळा वेळ काही मिळायला तयार नाही. इथे मिपावर प्रतिसाद देत असलो तरी ते मोबाईलवरून जमते तितकेच. पण नक्कीच लिहीन. सॉरी! :-)

रवीराज's picture

28 Apr 2015 - 10:41 pm | रवीराज

पुढचा भाग कधी येतोय.....

रवीराज's picture

28 Apr 2015 - 10:42 pm | रवीराज

पुढचा भाग कधी येतोय.....

राघवेंद्र's picture

26 Mar 2016 - 8:19 am | राघवेंद्र

पुढचा भाग कधी येतोय.....

२२८ पानांचे पुस्तक तयार झाले आहे. खुप धन्यवाद.