छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना

एस's picture
एस in काथ्याकूट
12 Apr 2013 - 11:58 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार

डीएस्एल्आर कॅमेरा म्हणजे नक्की काय?

          डीएस्एल्आर कॅमेरा म्हणजे ज्याच्या लेन्सेस बदलता येतात असा कॅमेरा हे सर्वसाधारणपणे लोकांना माहिती असते. त्याचबरोबर डीएस्एल्आर कॅमेरा म्हणजे खूप जास्त मेगापिक्सेल असाही त्यांचा (गैर)समज असतो. डीएस्एल्आर घेऊन छायाचित्रण करताना पाहून लोक पहिल्यांदा हाच प्रश्न हमखास विचारतात - "काहो, किती मेगापिक्सेलचा आहे?" :)

डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची खालील काही वैशिष्ट्ये सांगता येतील.

     १. ऑप्टिकल सिंगल लेन्स रिफ्लेक्स पूर्वदृश्य यंत्रणा, जिच्यात लेन्स आणि संवेदक यांच्यामधील आरसा फोकस व फ्रेमिंग करताना छायाचित्रकाराच्या डोळ्याकडे प्रकाश पाठवत राहतो आणि प्रतिमा घेताना तेवढ्या एक्स्पोजर कालावधीत संवेदकावर प्रतिमा पडू देण्यासाठी बाजूला होतो.
     २. एक्स्पोजर, रंग व इतर बाबींचे संपूर्ण नियंत्रण करण्याची सोय. ज्यामुळे छायाचित्रकाराला प्रचंड असे रचनात्मक नियंत्रण (Creative control) मिळते.
     ३. कंझ्यूमर व व्ह्यू-फाइंडर कॅमेर्‍यांच्या तुलनेत आकाराने मोठा असा सीसीडी किंवा सीमॉस संवेदक (Sensor). तसेच अशा संवेदकावरील प्रकाशकूप (Pixel wells) हे मोठे व खोल असतात.
     ४. डीएस्एल्आर कॅमेरा हा एक स्टॅण्डअलोन कॅमेरा नसून ती एक विस्तृत कॅमेरा सिस्टीम असते. त्यात खर्‍या बदलता येण्याजोग्या लेन्सेस, अ‍ॅक्सेसरीज, फ्लॅश स्ट्रोब्ज, वगैरे वगैरे असे बरेच इतरही घटक समाविष्ट होतात.
     ५. डीएस्एल्आर कॅमेरा म्हणण्यापेक्षा डीएस्एल्आर कॅमेरा-सिस्टीम म्हणणे जास्त योग्य ठरेल, कारण तुमच्या छायाचित्रणाच्या कौशल्याबरोबरच तुमच्या कॅमेरा-सिस्टीम किंवा कलेक्शन मध्येही इतर कॅमेर्‍यांची, लेन्सेसची, स्ट्रोब्जची, अ‍ॅक्सेसरीजची भर पडत राहते. त्यामुळे डीएस्एल्आर ही ब्रॅण्ड लॉयल्टीची बाब आहे. तसे कंझ्यूमर कॅमेर्‍यांच्या ग्राहकांत आढळत नाही.

डीएस्एल्आर कॅमेरा-सिस्टीम

(Image Copyright: Tom Huynh)

डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रिफ्लेक्स व्ह्यूईंग सिस्टीम

          रिफ्लेक्स व्ह्यूईंग सिस्टीम म्हणजे काही यांत्रिक आणि प्रकाशीय भाग मिळून बनलेली यंत्रणा असते. अशा यंत्रणेमुळेच डीएस्एल्आर कॅमेर्‍यांना हे नाव मिळाले आहे. या यंत्रणेमुळे छायाचित्रकाराला कॅमेरा ज्या लेन्समधून प्रतिमा घेणार आहे त्याच लेन्समधून प्रतिमेचे पूर्वदृश्य पाहता येणे शक्य होते. ह्यालाच 'थ्रू द लेन्स व्ह्यूईंग - TTL' असे म्हणतात.

          तुम्ही म्हणाल आता एलसीडी स्क्रीन असताना उगाच त्या छोट्याशा चौकोनाला डोळा भिडवून का उगाच डोळे ताणत बसा. पण जगातील कुठलीही स्क्रीन मानवी डोळ्यांची बरोबरी करू शकणार नाही हे आपण आधीच्या लेखात पाहिले आहेच. त्याशिवाय ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर आणि एलसीडी स्क्रीनमधील काही फरकांचे मुद्दे खाली देत आहे -

     १.ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर खूप जास्त ब्राइट, तीक्ष्ण (sharp), वास्तववादी असतो.
     २.ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर मधून छायाचित्रकाराच्या डोळ्यांना दिसणारी रंग अचूकता (Color Accuracy) व रंगउठाव अचूकता (Tonal Accuracy) कुठलाही इलेक्ट्रॉनिक स्क्रीन दाखवू शकत नाही.
     ३.ऑप्टिकल व्ह्यू फाइंडरला ऊर्जास्रोत लागत नाही. कॅमेरा बंद असतानाही तुम्ही पूर्वदृश्य पाहू शकता.
     ४.ऑप्टिकल व्ह्यू फाइंडरमधून पूर्वदृश्य पाहताना कुठलाही कालापव्यय (time delay) असत नाही. प्रतिमेत कुठलेही भ्रंश नसतात.
     ५.ऑप्टिकल व्ह्यू फाइंडरमधून पूर्वदृश्य पाहणे आणि इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडरमधून पूर्वदृश्य पाहणे यात खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहणे आणि तेच दृश्य दूरदर्शन संचावर पाहणे एवढा फरक आहे. दोन्हींमधील दर्जात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

डीएस्एल्आर कॅमेरा - अंतर्गत भागातील प्रकाशाचा प्रवास

(ऑलिम्पस इ-३० ची मूळ प्रतिमा विकीपिडियावरून साभार)

          वरील आकृती पहा. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये लेन्सच्या मागच्या बाजूस संवेदकाच्या थोडे आधी एक आरसा ४५ अंशांच्या कोनात बसवलेला असतो. नेहमीच्या स्थितीत हा आरसा संवेदकावर पडणारा प्रकाश अडवतो आणि तो वरच्या बाजूला बसवलेल्या एका संवेदकाच्याच आकाराच्या काचेकडे ९० अंशांतून परावर्तित करतो.पेंटाप्रिझम किंवा पेंटामिररमार्फत या काचेवरील प्रतिमा पुन्हा ९० अंशांतून व्ह्यू-फाइंडरमधून छायाचित्रकाराच्या डोळ्याकडे पाठवतो. पण हा आरसा आपल्या जागी कायमचा घट्ट बसवलेला नसतो, तर जेव्हा आपण प्रतिमा घेण्यासाठी शटर रिलीज बटन दाबतो तेव्हा तो लेन्स व संवेदकाच्या मधून बाजूला होतो आणि प्रकाश आता संवेदकाच्या आधी असलेल्या यांत्रिक शटरवर पडतो. (शटरचे लीफ् शटर, इलेक्ट्रॉनिक शटर आणि फोकल प्लेन शटर असे प्रकार आहेत. ते पुन्हा केव्हातरी...) डीएस्एल्आरचे फोकल प्लेन शटर हे शटर इंटर्वल जेवढे ठेवले असेल तेवढ्या वेळाकरीता उघडले जाते आणि मग प्रकाश पुढे संवेदकावर पडतो. शटर इंटर्वल संपताक्षणी शटर पुन्हा मिटले जाते, आरसा पुन्हा सरकून आपल्या जागी येतो आणि ऑप्टिकल व्ह्यू फाइंडरमधून पाहणार्‍या छायाचित्रकाराला तत्क्षणी पूर्वदृश्य पुन्हा दिसू लागते.

          हे सगळं पापणी लवण्याच्या आत घडून येते.

          पेंटाप्रिझममुळे डोळ्यांच्या पातळीत कॅमेरा ठेऊन प्रतिमा घेणे शक्य होते. नाहीतर कंबरेच्या पातळीत कॅमेरा ठेऊन जुन्या पद्धतीने खाली बघून प्रतिमा घ्याव्या लागल्या असत्या. त्याचबरोबर, जेव्हा f/22 सारखे अतिशय लहान अ‍ॅपर्चर वापरले जाते तेव्हा आत येणारा प्रकाश इतका कमी असू शकतो की आपल्या डोळ्यांना प्रतिमेतील बारकावे चांगले दिसू शकत नाहीत. यासाठीच हल्ली एस्एल्आर/डीएस्एल्आर कॅमेर्‍यांच्या लेन्सेसमध्ये एक स्वयंचलित पडदा (diaphragm) असतो. जेव्हा पूर्वदृश्य पाहिले जात असते, किंवा संकेंद्रीकरण केले जात असते तेव्हा हा पडदा लेन्सचे अ‍ॅपर्चर त्याच्या कमाल पातळीवर ठेवतो, जेणेकरून जास्तीत जास्त प्रकाश लेन्समधून आत येऊ शकेल. प्रतिमा घेतली जाण्याआधीच्या क्षणाला पडदा लेन्सचे अ‍ॅपर्चर 'स्टॉप डाउन' करून आधी निवडलेल्या किंमतीला आणून ठेवतो. आणि प्रतिमा घेतली गेल्याबरोबर पुन्हा अ‍ॅपर्चर पूर्ण उघडतो.

इलेक्ट्रॉनिक प्रतिमा संवेदक

          कॅमेर्‍यांमधील एका प्रकारच्या प्रकाशसंवेदी माध्यमाची ओळख आपल्यापैकी अनेकांना असेल. ते म्हणजे फिल्म. कोडॅक किंवा फुजिफिल्मचे ३५ मिमी रोल आपण वापरलेही असतील. आणि मग तो रोल डेवलप केल्यावर एखादे छायाचित्र नुसतेच पांढरे किंवा अर्धेच आले तर प्रोसेसिंगचे पैसे गेल्याबद्दल व तो क्षण निसटल्याबद्दल स्वतःला मनातल्या मनात चार शिव्याही हासडल्या असतील. तेव्हा काय जपून फोटो काढायचो.. ३५ एक्स्पोजर्स चा एक रोल तीन-चार दिवसांच्या आख्ख्या ट्रेकला पुरवायचो. आजच्या डिजिटल युगात तो क्या, बस खिंचो, खिंचो, खिंचो.. लगेच बघो, फिर नाय आवडला तर लगेच डीलीट मारो... आणि हे ज्यामुळे शक्य झाले ते दुसरे प्रकाशसंवेदी माध्यम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक संवेदक.

          (विषय डीएस्एल्आर असल्याने ब्लॅक-अ‍ॅण्ड-व्हाइट फिल्म तसेच रंगीत फिल्म च्या जास्त खोलात जात नाही. कुणाला जास्त माहिती हवी असल्यास प्रतिसादांतून दिली जाईल.)

          इलेक्ट्रॉनिक प्रतिमा संवेदक म्हणजे एक अर्धसंवाहक चकती (semiconductor chip) असते. ज्या प्रमाणे फिल्मवर सिल्वर हॅलाइड चे असंख्य स्फटिक एकसमान पद्धतीने पसरवलेले असतात, तसेच संवेदकावर लाखो प्रकाशकूप एका विशिष्ट रचनेत बसवलेले असतात. हे प्रकाशकूप म्हणजे प्रकाशसंवेदी पदार्थ भरलेले बादलीच्या आकाराचे सूक्ष्म खड्डे असतात. त्यांनाच इंग्रजीत Pixels - Picture Elements असे म्हणतात. सिल्वर हॅलाइडच्या स्फटिकांवर प्रकाशकिरण पडल्यावर त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते. त्याच पद्धतीने प्रकाशकूपांवर प्रकाश पडल्यावर ते इलेक्ट्रॉन बाहेर टाकू लागतात. जर प्रकाश पुरेसा असेल तर त्यांच्यावर तात्पुरता विद्युतप्रभार (Electronic charge) तयार होतो. हा विद्युतप्रभार पुढे संवेदकावरील मूल्यवर्धकाकडे (Amplifier) पाठवला जातो. जर एखाद्या प्रकाशकूपावर पडणारे फोटॉन कण (प्रकाश) पुरेसे नसतील तर त्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडू शकत नाहीत. आणि विद्युतदृष्ट्या तो प्रकाशकूप निगेटिव स्थितीत राहतो. प्रतिमेवर असा प्रकाशकूप काळा दिसतो. याउलट जेव्हा पुरेसे फोटॉन असतात तेव्हा तो प्रकाशकूप इलेक्ट्रॉन निर्गमित (emit) करू लागतो, म्हणजेच प्रतिमेवर तो पांढरा दिसतो. पण प्रकाशकूपांवरील प्रभार हा त्यांच्यावर पडणार्‍या फोटॉन्सच्या संख्येच्या समप्रमाणात असल्याने पूर्ण काळा व पूर्ण पांढरा यामधील सर्व रंगछटा (shades of Grey) ते निर्माण करू शकतात. थोडक्यात प्रकाशकूप हे डिजिटल साधन नसून ते अ‍ॅनालॉग साधन आहे.

          अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक प्रकाशकूपाचा प्रभार मिळाल्यावर संवेदकाच्या प्रकारानुसार एडीसी (Analog-to-Digital Converter) मायक्रोचिप वापरून किंवा संवेदकामध्येच अ‍ॅनालॉग प्रभाराचे रुपांतर डिजिटल स्वरूपात - शून्य किंवा एक द्वीअंकी (binary) - केले जाते. ह्यालाच निष्पन्नांकन (Calibration) असे म्हणतात.

          मग ह्या कृष्णधवल विदाचे रुपांतर रंगांमध्ये कसे केले जाते? जसे रंगांमध्ये तांबडा, निळा व पिवळा हे तीन मूळरंग आहेत, तसेच प्रकाशात तांबडा, हिरवा आणि निळा हे मूळ प्रकाशरंग आहेत ( RGB ). प्रत्येक प्रकाशकूपावर या तीन प्रकारचे फिल्टर आलटून पालटून विशिष्ट रचनेत बसवलेले असतात. फिल्टरच्या रंगानुसार त्या-त्या तरंगलांबी (Wavelength) चे किरण प्रकाशकूपापर्यंत पोहोचवले जातात. (या 'ताहिनि' फिल्टरच्या आकृतिबंधाला Bayer pattern असे म्हटले जाते. कोडॅक कंपनीच्या ब्राइस बायेर या शास्त्रज्ञाने या पॅटर्नचा शोध लावला.)

बायेर आकृतिबंध आणि प्रकाशाच्या तरंगलांबींचे निस्यंदन (filtration)

(प्रतिमा विकीपिडियावरून साभार)

          यात तुम्हांला हिरव्या रंगाचे फिल्टर तांबड्या किंवा निळ्या फिल्टरच्या तुलनेत दुप्पट दिसतील. याचे कारण म्हणजे मानवी डोळा हा हिरव्या रंगाला सर्वाधिक संवेदनशील असतो. मुख्यत्त्वे हिरव्या रंगाच्या विविध छटांनुसार प्रतिमेच्या तीक्ष्णतेची (sharpness) आपली जाणीव बदलते.

          फिल्म आणि संवेदकांमध्ये एक अतिशय महत्त्वाचा फरक हा आहे की फिल्मवर प्रकाशकिरण कुठल्याही कोनातून पडले तरी सिल्वर हॅलाइड स्फटिकांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडू शकते. पण संवेदकाच्या प्रकाशकूपामध्ये प्रकाश पोहोचण्यासाठी प्रकाशकिरण संवेदकावर अगदी लंबरूप म्हणजेच सरळ पडावे लागतात. ते तसे पडावेत यासाठी डिजिटल कॅमेर्‍यांच्या लेन्सेसची खास पद्धतीने रचना केली जाते. फिल्म कॅमेर्‍यांच्या लेन्सेसना अशी मर्यादा नसते. केवळ लेन्सेसची रचना बदलून चालत नाही, तर प्रत्येक प्रकाशकूपावर एक अतिसूक्ष्म मायक्रोलेन्स बसवली जाते. जिचे कार्य म्हणजे प्रकाशकूपावर पडणारे जास्तीत जास्त किरण एकवटवून सरळ रेषेत प्रकाशकूपाकडे वळवणे. या रचनेमुळे aliasing किंवा blooming सारखे प्रतिमाभ्रंश (aberrations) कमी होण्यास मदत होते.

          पण एवढे सगळे केले म्हणजे तुम्हांला आता डोळ्यांना दिसते तशी प्रतिमा मिळेल असे नाही. यापुढची पायरी म्हणजे प्रत्येक प्रकाशकूपाचे शेजारच्या प्रकाशकूपांच्या जवळचे स्थान, त्यांचे कलर-फिल्टर्स, आणि या सर्व गोष्टींचा एकमेकांशी असणारा संबंध ओळखून त्या प्रकाशकूपाचा नेमका रंग आणि रंगाची तीव्रता ठरवणे. यालाच अंतर्वेशन करणे (interpolation) असे म्हणतात. हे अंतर्वेशन कॅमेर्‍याचा प्रतिमाप्रक्रीयक (image processing engine) करतो. त्यासाठी अतिशय गुंतागुंतीचे गणनविधी (Algorithms) वापरले जातात.

          संवेदकांच्या आकृतीबंधातील घटक प्रकाशकूप हे चौरसाकृतीच असावेत असा काही नियम नाही. काही प्रकारच्या संवेदकांमध्ये प्रकाशकूप आयताकृती असतात, तर काहींमध्ये अष्टकोनी रचना आढळते.

          लेन्समधून पूर्वदृश्य पाहिल्यावर शटर रिलीज बटन दाबल्यावर एलसीडी स्क्रीनवर प्रतिमा दिसेपर्यंत एवढ्या सगळ्या यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया घडून येतात. तेही क्षणार्धात... तेव्हा ही सगळी यंत्रणा किती अचूक, तत्पर, विश्वासार्ह आणि टिकाऊ असेल याची कल्पना तुम्हांला आता आली असेल.

संवेदकांचे प्रकार

डीएस्एल्आर कॅमेर्‍यांच्या संवेदकाच्या रचनेनुसार व उत्पादनप्रक्रियेनुसार त्याचे दोन प्रकार पडतात. दोन्ही प्रकारांमध्ये फोटॉनचे इलेक्ट्रॉनमध्ये रूपांतर करणारा फोटो डायोड हा भाग सारखाच असतो. फरक पडतो तो त्यानंतरच्या पायर्‍यांमध्ये.

     १. सीसीडी (Charge-coupled Device) - यांना चार्ज-कपल्ड डिवाइस यासाठी म्हटले जाते कारण प्रकाशकूपांनी निर्माण केलेला विद्युतप्रभार हा संवेदकाच्या कडेला एकामागोमाग एक वाहून नेला जातो. उदा. एका खेळात काही व्यक्तींना एका रांगेत उभे करून पहिल्याच्या कानात एखादे वाक्य सांगितले जाते व त्याने त्याच्या मागच्याला, मागच्याने त्याच्या मागच्याला असे करत करत शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो निरोप पोहोचवला जातो. त्याच पद्धतीने संवेदकावरील प्रत्येक रांगेतील प्रत्येक प्रकाशकूपाचा प्रभार त्या रांगेच्या शेवटी संवेदकाच्या कडेपर्यंत नेला जातो. ह्या सगळ्या अ‍ॅनालॉग प्रभारांचे रूपांतर एक वेगळी ADC चकती करते. थोडक्यात सीसीडी प्रकारचे संवेदक हे फक्त प्रकाशावरून प्रतिमा नोंदवण्याचे काम करतात.

     २. सीमॉस (Complementary Metal Oxide Semiconductor) - ह्या प्रकारच्या संवेदकांमध्ये अ‍ॅनालॉग प्रभाराचे रूपांतर द्वीअंकी (binary) स्वरूपात करण्याचे काम संवेदकावरच प्रकाशकूपांच्या शेजारी असणारे प्रवाह-परिवर्तक (Transistors) आणि विद्युतमंडले (circuits) करतात.

          ह्या दोन प्रकारच्या संवेदकांमधील फरक असा -
     * सीसीडी संवेदक हे डिजिटल कॅमेर्‍यांच्या सुरुवातीच्या काळापासून बनवले जात आहेत. त्यामुळे त्यांची उत्पादनप्रक्रिया खूपच विकसित झालेली आहे. याच कारणांमुळे, सीसीडी संवेदकांच्या प्रत्येक प्रकाशकूपावरील प्रभार शेवटपर्यंत वाहून नेला जात असताना अजिबात विपर्यासभ्रंश (Distortion) निर्माण होत नाही. त्यामुळे सीसीडी संवेदकांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची असते.
     * सीसीडी संवेदकांना पर्याय म्हणून आलेल्या सीमॉस संवेदकाची उत्पादनप्रक्रिया नेहमीच्या मायक्रोप्रोसेसर चिपप्रमाणेच आहे.
     * सीसीडी संवेदकांमुळे उच्च दर्जाची, कुरवविरहीत (Noiseless) प्रतिमा मिळते, तर सीमॉस संवेदकांच्या प्रतिमेत कुरवदोष जास्त प्रमाणात येतो.
     * सीसीडी संवेदकांपेक्षा सीमॉस संवेदक जास्त वेगाने काम करू शकतात.
     * सीमॉस संवेदकांवर प्रत्येक प्रकाशकूपाच्या आजूबाजूला प्रवाह-परिवर्तकसुद्धा असल्याने संवेदकावर पडणार्‍या फोटॉन कणांपैकी बरेच कण प्रकाशकूपांऐवजी प्रवाह-परिवर्तकांवर आदळून वाया जातात.
     * सीमॉस संवेदकांना सीसीडी संवेदकांच्या तुलनेत १ शतांश एवढीच ऊर्जा लागते.
     * सीमॉस संवेदक बनवायला सोपे व स्वस्त असल्याने त्यांचे कॅमेरेसुद्धा स्वस्त, रचना करायला जास्त सोपे आणि कमी भाग असणारे असतात. सीसीडी संवेदक मात्र उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेसाठी ओळखले जातात.
     * सीमॉस संवेदक हे कुठल्याही प्रमाणित अर्धसंवाहक उत्पादनप्रक्रियेत बनू शकतात. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च फारच कमी असतो. सीसीडी संवेदकांच्या कारखान्यातून फक्त कॅमेर्‍यांचे संवेदकच बनू शकतात. सीमॉस संवेदकांच्या कारखान्याच्या उभारणीखर्चाच्या तुलनेत सीसीडी संवेदकांच्या कारखान्याचा उभारणीखर्च हजारो पटींनी अधिक असू शकतो.

संवेदकांच्या आकाराचा छायाचित्रणाशी असलेला संबंध

     १. सहगुणक किंवा क्रॉप फॅक्टर - क्रॉप फॅक्टर बद्दल आधीच्या लेखावरील या प्रतिसादात माहिती दिली होती. थोडक्यात ३५ मिमी संवेदकाला फुलफ्रेम म्हणायचे कारण म्हणजे अशा संवेदकावर लेन्सचे परिणामी नाभीय अंतर (Effective focal length) हे लेन्सच्या अभिधानित नाभीय अंतराएवढेच (Designated focal length) असते. ३५ मिमी पेक्षा ज्या पटीत संवेदक लहान होत जाईल त्या पटीत परिणामी नाभीय अंतर वाढत जाते. (व्यस्त गुणोत्तर). उदा. कॅननच्या APS-H संवेदकाचा क्रॉप फॅक्टर १.४, कॅननच्याच APS-C संवेदकाचा क्रॉप फॅक्टर १.६, निकॉनच्या DX संवेदकाचा क्रॉप फॅक्टर १.५, तर ऑलिंपसमध्ये वापरल्या जाणार्‍या कोडॅकच्या Four thirds चा क्रॉप फॅक्टर २ आहे.
     २. वाइड अ‍ॅन्गलसारख्या लेन्सेस वापरण्यास मर्यादा -
DX प्रकारच्या संवेदकांसाठी वाइड अ‍ॅन्गल लेन्सेस बनवणे अवघड असते, कारण उदा. फुलफ्रेम संवेदकाची १४ मिमी ची अल्ट्रा-वाइड लेन्स DX संवेदकावर १४ गुणिले १.५ म्हणजे २१ मिमी चे परिणामी नाभीय अंतर देते. त्यामुळे इथे अल्ट्रा-वाइड लेन्स किंवा फिश-आय लेन्स वापरायची असेल तर पहिले म्हणजे तेवढ्या परिणामी नाभीय अंतराची लेन्स शोधणे आले. आणि अशा लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर त्याहीपेक्षा कमी असल्याने त्या लेन्समध्ये विविध प्रकारचे प्रतिमाभ्रंश, उदा. विपर्यास (Distortion) वगैरे फारच जास्त येतात.
     ३. चित्रणकक्षा किंवा डेफ्थ ऑफ् फिल्ड - लेन्सचे नाभीय अंतर म्हणजे लेन्स अनंत अंतरावर संकेंद्रित केली असता संवेदकाच्या प्रतलापासूनचे लेन्सच्या मध्यबिंदूपर्यंतचे अंतर. डेफ्थ ऑफ् फिल्ड म्हणजे अग्रभूमी ते पार्श्वभूमी यातील जेवढा भाग संकेंद्रित असतो तेवढे अंतर. तर डेफ्थ ऑफ् फिल्ड आणि नाभीय अंतर यामध्ये व्यस्त प्रमाण असते. याचा अर्थ तुम्हांला जर कमीत कमी भाग फोकसमध्ये ठेऊन बाकीचा भाग ब्लर करायचा असेल (चित्रणकक्षा अरूंद करायची असेल) तर जास्तीत जास्त अभिधानित नाभीय अंतराची लेन्स वापरावी लागेल. आणि तेवढाच दृश्यकोन ठेऊन डेफ्थ ऑफ् फिल्ड कमी ठेवायची असेल तर जास्त नाभीय अंतराची लेन्स वापरावी लागेल. आणि त्यासाठी जेवढा मोठा संवेदक असेल तेवढीच ही डेफ्थ ऑफ् फिल्ड कमी ठेवण्यात यश मिळेल.
     ४. कुरव (Noise) - प्रतिमेच्या दर्जावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा प्रतिमाभ्रंश म्हणजे कुरव. गडद भाग प्लेन गडद दिसण्याऐवजी त्यावर रेती पसरलीये असे कुरव आल्यास वाटते. आणि जेवढा मोठा संवेदक तेवढे सिग्नल-टू-नॉइज गुणोत्तर जास्त असते. कुरव येण्यास कारणीभूत ठरतात ते संवेदकाच्या चकतीवर अतिशय दाटीवाटीने बसवलेले प्रकाशकूप. तसेच संवेदकाची प्रकाशसंवेदनशीलता किंवा आय्एस्ओ स्पीड वाढवल्यासही कुरव दोष निर्माण होतो. मोठ्या संवेदकावरील प्रकाशकूप आकाराने मोठे असतात, सखोल असतात आणि त्यांच्यामध्ये पुरेसे अंतर ठेवलेले असल्याने त्यांचा विद्युतप्रभार उतू जात नाही. (संवेदकावरील प्रकाशकूपांच्या आकाराला संवेदकाचे Pitch असे म्हणतात. उदा. ३ मायक्रॉन, ४ मायक्रॉन, १२ मायक्रॉन इत्यादी.)
     ५. विणल्यासारखा पोत किंवा Moiré - म्वॉरे म्हणजे दोन भौमितीय आकृतीबंध एकाआड एक दृष्टीत आले असता निर्माण होणारा तिसर्‍याचा आकृतीबंधाचा आभास. फिल्म युगात हा परिणाम फारसा ज्ञात नव्हता. डिजिटल युगात पहिल्यांदा हा परिणाम दिसल्यावर त्याच्याकडे कुतुहलाने पाहिले गेले. पण जसजसे संवेदकांचे आकार व त्यांची पृथक्करण क्षमता वाढतेय तसतशी म्वॉरेची समस्या वाढत चालली आहे. याबाबत अधिक माहिती इथे मिळेल. इथे मात्र लहान आकाराच्या व कमी pitch च्या संवेदकांवर हा परिणाम कमी येतो. म्वॉरे टाळण्यासाठी प्रतिमा घेण्याचा कोन बदलून काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.

वेगवेगळ्या डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमधील फरक

          साधारणपणे डीएस्एल्आर कॅमेर्‍यांचे त्यांच्या संवेदकांच्या आकारानुसार फुलफ्रेम आणि APS-C किंवा DX प्रकारचे असे दोन प्रकार पडतात.

          त्याचबरोबर त्यांच्या उपयोगांनुसार व वैशिष्ट्यांनुसार डीएस्एल्आरचे तीन प्रकार मानले जातात. हौशी (Entrylevel), निमव्यावसायिक (Semiprofessional) आणि व्यावसायिक (Professional).

          यातील सर्वात मोठा फरक अर्थात किंमतींचा असला तरी वैशिष्ट्यांच्या दृष्टीनेही त्यांच्यामध्ये बराच फरक असल्याचे दिसून येईल. खाली त्यातील काही मुख्य फरकांचे मुद्दे दिले आहेत.

     * व्यावसायिक कॅमेर्‍यांमध्ये पेंटाप्रिझम बसवलेला असतो, जो उच्च दर्जाच्या पारदर्शी काचेचा पंचकोनाकृती तुकडा असतो. हौशी कॅमेर्‍यांमध्ये पेंटाप्रिझमऐवजी पेंटामिरर किंवा पोरोमिरर असतो. आरशांनी बनवलेला पोरोमिरर स्वस्त, वजनाने हलका आणि बनवायला सोपा असल्याने अशा कॅमेर्‍यांच्या किंमती, आकार व वजन कमी ठेवणे कंपन्यांना शक्य होते. पेंटाप्रिझममधून दिसणारे पूर्वदृश्य पोरोमिररच्या तुलनेत अधिक स्पष्ट व उजळ असते.

     * व्यावसायिक कॅमेर्‍यांच्या बॉडीज् या नेहमीच वजनाने जड, दणकट व उच्च प्रतीच्या बांधणीच्या, आणि शटर फटीग् न येता सलग हजारो प्रतिमा घेण्याच्या दृष्टीने बनवलेल्या असतात.

     * व्यावसायिक कॅमेर्‍यांचे संवेदक हे मोठे असतात. त्यांच्यावरील प्रकाशकूप (Pixel) हे मोठे आणि खोल असतात. तसेच त्यांची पृथक्करण क्षमता (Resolution) सुद्धा जास्त असू शकते.

     * व्यावसायिक कॅमेर्‍यांची तात्पुरती स्मृतीक्षमता (Memory buffering) जास्त असते. स्मृतीमधील प्रतिमा विदा (Image data) वर असे कॅमेरे जास्त गतीने प्रक्रिया करू शकतात. त्यांचे ऊर्जास्रोत (Batteries) मोठे व जास्त क्षमतेचे असतात. तसेच शटर लॅग कमी असल्याने असे कॅमेरे एका सेकंदात जास्त प्रतिमा घेऊ शकतात. (FPS - Frames per Second).

     * जीपीएस्, बिनतारी माहितीवहन, बिनतारी नियंत्रण (Remote Control), जास्त ब्रॅकेटिंग इ. सुविधा व्यावसायिक कॅमेर्‍यांत जास्त असतात.

     * निमव्यावसायिक व हौशी कॅमेर्‍यांच्या लेन्सेस च्या तुलनेत व्यावसायिक कॅमेर्‍यांच्या लेन्सेस महाग असतात. आकाराने मोठ्या, जड, दणकट, प्रतिमा-स्थिरीकरणासारख्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण, जास्त पृथक्करण क्षमतेच्या, लवकर संकेंद्रीकरण करू शकणार्‍या आणि जास्त मोठ्या अ‍ॅपर्चर क्षमतेच्या असतात. (f/2.8 पेक्षा जास्त मोठ्या अ‍ॅपर्चरच्या लेन्सेसना फास्ट लेन्सेस म्हटले जाते. अ‍ॅपर्चर व्हॅल्यूसाठी 'बिग' आणि 'स्मॉल' यांच्यापेक्षा 'फास्ट' आणि 'स्लो' ही विशेषणे वापरली जातात. कारण अ‍ॅपर्चर व्हॅल्यू हा लॉगरिदमिक आकडा असल्याने तो अपूर्णांकात व्यक्त केला जातो. अपूर्णांकात विभाजक जितका मोठा तेवढा तो अपूर्णांक लहान असतो. म्हणून f/2.8 हे f/5.6 ह्या अ‍ॅपर्चरपेक्षा 'फास्ट अ‍ॅपर्चर' आहे. ह्याचा संदर्भ पुढील लेखात 'लेन्स स्टॉपिंग डाउन' ही संकल्पना समजताना होईल.)

     * हौशी डीएस्एल्आर कॅमेर्‍यांचे बॉडीवरील पॉप-अप् फ्लॅश हे तितकेसे शक्तिमान नसतात. तसेच त्यांच्यामध्ये स्टुडिओ फोटोग्राफीमध्ये इतर फ्लॅशेसना बिनतारी पद्धतीने ट्रिगर करण्याची क्षमता (Commander for slave strobes) नसते.

     * हौशी डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये बहुधा बिल्ट-इन फोकसिंग मोटर नसते. त्यामुळे त्यांच्यावर काही प्रकारच्या लेन्सेस वापरता येत नाहीत. अशा लेन्सेस शक्यतो स्वस्त आणि अ‍ॅपर्चर रिंग असलेल्या असतात, त्यामुळे ह्या लेन्सेस वापरण्याची क्षमता काही बाबतीत निर्णायक ठरते.

     * व्यावसायिक कॅमेर्‍यांचे प्रोसेसर इंजिन जास्त क्षमतेचे असू शकते.

     * फिल्म फोटोग्राफीच्या युगातील व आजही व्यावसायिक छायाचित्रकारांकडून वापरली जाणारी काही वैशिष्ट्ये उदा. डेफ्थ ऑफ् फील्ड प्रिव्ह्यू बटन, फ्लॅश व्हॅल्यू लॉक बटन, जुन्या स्क्रू-ड्रायवर लेन्सेस वापरण्याची सोय इत्यादी बाबी आता हौशी कॅमेर्‍यांमधून गायब झाल्या आहेत.

     * हौशी कॅमेर्‍यांमध्ये असणारी हौशी लोकांसाठीची वैशिष्ट्ये उदा. सीन मोड्स, ऑटो मोड्स वगैरे हे व्यावसायिक कॅमेर्‍यांमध्ये आढळत नाहीत. अर्थात, कॅमेर्‍याच्या मेंदूपेक्षा स्वतःच्या मेंदूवर आणि हातांवर जास्त विश्वास असणे हे व्यावसा़यिक किंवा उत्तम छायाचित्रकार असल्याचे पहिले लक्षण आहे. ;)

पुढील लेखापर्यंत एक गृहपाठ - जास्त मेगापिक्सेल म्हणजे जास्त चांगली प्रतिमा हे खरे आहे की खोटे? पहा, थोडा विचार करा. जास्त किंवा कमी मेगापिक्सेल असण्याचे काय फायदेतोटे असू शकतात हे प्रतिसादांतून सांगा.

जाता जाता - तुम्ही फोटोग्राफर बनला आहात हे कसे ओळखावे?
उत्तर - जेव्हा तुम्हांला तुमच्या नेत्रपटलात एक कॅमेरा बसवावासा वाटू लागतो तेव्हा. ;)

क्रमशः

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

13 Apr 2013 - 9:03 am | प्रचेतस

वाचनखूण साठवली आहेच.
सीसीडी, सीमॉस संवेदकांबद्दल असलेल्या शंकांचे निराकरण झाले.

काही शंका

वाइड अ‍ॅन्गलसारख्या लेन्सेस वापरण्यास मर्यादा -

वाईड अ‍ॅन्गल लेन्स म्हणजे नेमके काय? लेन्स मधून जास्तीत जास्त व्ह्यु कॅप्चर होणे म्हणजे वाईड अ‍ॅन्गल का?

पेंटाप्रिझममधून दिसणारे पूर्वदृश्य पोरोमिररच्या तुलनेत अधिक स्पष्ट व उजळ असते..

हे फक्त ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर मधून दिसणार्‍या दृश्याच्या गुणवत्तेपुरतेच मर्यादित असते का? प्रत्यक्ष घेतलेल्या प्रतिमेवर याचा काहीही प्रभाव नसतो ना? अर्थात व्ह्यु फाईंडर मधून प्रतिमा जितकी सुस्पष्ट दिसेल तितकी ती अधिक अचूकतेने आपणास घेता येईल हे ओघाने आलेच.

हौशी डीएस्एल्आर कॅमेर्‍यांमध्ये बहुधा बिल्ट-इन फोकसिंग मोटर नसते.

कॅननच्या अगदी एन्ट्री लेव्हल डिएसएलआर मध्ये बिल्ट इन फोकसिंग मोटर आहे. निकॉनच्या एन्ट्री लेव्हल मध्ये मात्र ती आढळत नाही. मात्र हल्लीच्या बहुतेक सर्वच नव्या लेन्सेसमध्ये फोकसिंग मोटर असतेस. जुन्या फिल्म कॅमेर्‍याच्या लेन्सेस मात्र ह्यात वापरता येत नाहीत हाच तोटा असावा.

जास्त मेगापिक्सेल म्हणजे जास्त चांगली प्रतिमा हे खरे आहे की खोटे?

मेगापिक्सेलमुळे प्रतिमा जास्त सुस्पष्ट येउ शकते. जेव्हा आपल्याला प्रतिमेची मोठी प्रिंट आउट काढायची असेल (उदा. फ्लेक्स वगैरे) तेव्हा जास्त मेगा पिक्सेलचा नक्कीच उपयोग होतो कारण डिटेल्स जास्त येतात. पण नेहमीच्या वापरासाठी (४ बाय ६, ८ बाय १०) साठी ७ मेगापिक्सेल कॅमेरा सुद्धा पुरेसा ठरावा.
कमी मेगापिक्सेलमधे नॉइज जास्त येतो तर जास्त मेगापिक्सेलमुळे इमेजची साईझ मोठ्या प्रमाणावर वाढते.

बाकी डिएसेलार कॅमेर्‍यांमध्ये येणारा शटरचा खटकन होणारा यांत्रिक आवाज ऐकणे म्हणजे विलक्षण आनंददायी अनुभव असतो. :)

बाकी डिएसेलार कॅमेर्‍यांमध्ये येणारा शटरचा खटकन होणारा यांत्रिक आवाज ऐकणे म्हणजे विलक्षण आनंददायी अनुभव असतो. smiley

आता कसं मनातलं बोललास..

मेगापिक्सेलमुळे प्रतिमा जास्त सुस्पष्ट येउ शकते. जेव्हा आपल्याला प्रतिमेची मोठी प्रिंट आउट काढायची असेल (उदा. फ्लेक्स वगैरे) तेव्हा जास्त मेगा पिक्सेलचा नक्कीच उपयोग होतो कारण डिटेल्स जास्त येतात. पण नेहमीच्या वापरासाठी (४ बाय ६, ८ बाय १०) साठी ७ मेगापिक्सेल कॅमेरा सुद्धा पुरेसा ठरावा.
कमी मेगापिक्सेलमधे नॉइज जास्त येतो तर जास्त मेगापिक्सेलमुळे इमेजची साईझ मोठ्या प्रमाणावर वाढते.

हे थोडस उलट आहे, मोठ्या संवेदकात जितके कमी पिक्सल तितका नॉइस कमी. थोडक्यात, हौशी कॅमेरे ज्यात, लहान संवेदकावर कमी जागेत बाजारपेठेच्या मागणीनुसार जास्त दाटीवाटीने पिक्सल बसवलेले असतात तेथे नॉइस जास्त येतो, तर हॅसल्बाल्डसारख्या कॅमेर्‍यात प्रचंड मोठ्या संवेदकावर अंतर ठेवुन भरपुर पिक्सल बसवतात, आणी नॉइस कमी येतो..

आमच्या मुंबईतल्या लोकलच्या वेगाचे-गर्दीचे उकाड्याशी जे गुणोत्तर आहे ते असेच.. :)

वाईड अ‍ॅन्गल लेन्स म्हणजे नेमके काय? लेन्स मधून जास्तीत जास्त व्ह्यु कॅप्चर होणे म्हणजे वाईड अ‍ॅन्गल का?

कमी अंतरावरून बघताना जास्तीत जास्त व्ह्यु पहाता येणे म्हणजे वाईड अ‍ॅन्गल..

स्वॅप साहेब.. धन्यवाद

प्रचेतस's picture

13 Apr 2013 - 11:32 am | प्रचेतस

धन्स रे शैलेन्द्र. :)

माझे टंकनक्षम वाचवल्याबद्दल... ;)

बाकी डिएसेलार कॅमेर्‍यांमध्ये येणारा शटरचा खटकन होणारा यांत्रिक आवाज ऐकणे म्हणजे विलक्षण आनंददायी अनुभव असतो.

डीएस्एल्आर पेक्षाही फिल्म एस्एल्आर चा शटरचा आवाज आणि नंतर फिल्मच्या पुढे सरकण्याचा आवाज म्हणजे जस्ट अहाहा... केवळ त्या अनुभवासाठी म्हणून एखादा फिल्म एस्एल्आर घेणार आहे कधीतरी...

अभ्या..'s picture

13 Apr 2013 - 1:29 pm | अभ्या..

मेगापिक्सेलमुळे प्रतिमा जास्त सुस्पष्ट येउ शकते. जेव्हा आपल्याला प्रतिमेची मोठी प्रिंट आउट काढायची असेल (उदा. फ्लेक्स वगैरे) तेव्हा जास्त मेगा पिक्सेलचा नक्कीच उपयोग होतो कारण डिटेल्स जास्त येतात. पण नेहमीच्या वापरासाठी (४ बाय ६, ८ बाय १०) साठी ७ मेगापिक्सेल कॅमेरा सुद्धा पुरेसा ठरावा.
कमी मेगापिक्सेलमधे नॉइज जास्त येतो तर जास्त मेगापिक्सेलमुळे इमेजची साईझ मोठ्या प्रमाणावर वाढते.

वल्ली अगदी सहमत आहे. पण फ्लेक्स हे लांब अंतरावरुन बघायचे माध्यम आहे. तू जवळून (१ ते ५ फूट) फ्लेक्स पाहीले तर तुला सुध्दा मॉयर जाणवेल. अर्थात हे इनपुट्वर पण डिपेंड आहे. डायरेक्ट कॅमेर्‍यातून घेतलेली इमेज किंवा काढलेल्या फोटोला स्कॅन (परत सीसीडीच. आता ड्रम स्कॅनर कोणी वापरत नाहीत) करुन घेतलेली इमेज यात फरक येणारच.
नॉइझ हा रिप्रॉडक्शन करताना उपयोगी सुध्दा ठरतो. कारण तेथे इमेजचे रुपांतर हाफटोन मध्ये झालेले असते.(जवळ्पास कॅमेर्‍याच्या उलट पध्धत) बर्याचदा थोडा नॉइझ वाढवून केलेल्या इमेजेस क्रीस्पी अन शार्प दिसतात. प्लेन विग्नेटला थोडा नॉइझ अ‍ॅड (२ ते ३ टक्के) करावाच लागतो.
एखाद्या इमेजचे रिप्रॉडक्शन करताना (फोटो प्रींट सोडून) RGB फॉर्मॅट वापरतच नाहीत. तेथे CMYK वापरले जाते. लिथो, ग्रॅव्हीअर, ऑफसेट, फ्लेक्स, इंकजेट ऑर लेसर. कुणी RGB चे CMYK मध्ये रुपांतराची जवळपास १०० टक्के रिझल्ट देणारी यंत्रणा सांगेल काय? बिनुस्कॅन वगैरे मेथड आणि काही प्लगीन वापरलेले आहेत पण नाहीच रिझल्ट. :(
अर्थात RGB ही प्रकाश पध्दती आहे(सर्व स्क्रीन्स आणि फोटो प्रींटस) तर CMYK रसायन (प्रिंटींगच्या इतर सर्व पध्दती). कलर व्हील दोन्हीचे वेगळे आहे.
कॅमेर्‍याच्या इनपुटचा वेब सोडता जास्त वापर रिप्रॉडक्शन मध्ये होतो म्हणूनच हा प्रतिसाद :)

प्रचेतस's picture

13 Apr 2013 - 1:46 pm | प्रचेतस

धन्स रे अभ्या.

काही संज्ञांचे अर्थ समजावून सांग की रे जरा. हाफटोन, प्लेन विग्नेट, CMYK रसायन, कलर व्हील वैग्रे.

तसेच प्रिंटींग तंत्रज्ञानावर पण एखादी लेखमाला अवश्य सुरु कर.

अभ्या..'s picture

13 Apr 2013 - 3:29 pm | अभ्या..

अवश्य वल्लीसाहेब. सगळं सांगेन व्यनिमध्ये अथवा प्रत्यक्ष :)
बाकी या प्रिंटींग टेक्नॉलोजी विषयावर लेखमाला हा मला सध्यातरी जमणारा विषय नाही, माफ करणे. :(
डेमो देऊ शकेन. त्यासाठी माझ्याकडे यावे लागेल.

एस's picture

13 Apr 2013 - 6:26 pm | एस

तसेच प्रिंटींग तंत्रज्ञानावर पण एखादी लेखमाला अवश्य सुरु कर.

याला पूर्ण अनुमोदन. किमान ह्या लेखमालेत जेव्हा इमेज प्रोसेसिंग वर आपण येऊ तेव्हाचे भाग तुम्हीच लिहा अशी विनंती.

चौकटराजा's picture

13 Apr 2013 - 3:34 pm | चौकटराजा

साधारणपणे आर जी बी कलर मॉडेलचा संबंध स्कीन वरच्या प्रकटनासाठी आहे. असा स्क्रीन ज्यात लाईट एमिशन बीम टाकून प्रकाश निर्मिती होते. तर सी एम वाय के चा संबंध हा पेपर वा तत्सम माध्यमांवर शाई वा रंग यांचे चार वेगवेगळे
पृथः कृत पडदे ( लेअर्स) द्वारे चित्र दिसते.

संदीप डांगे's picture

13 Nov 2015 - 7:52 pm | संदीप डांगे

कुणी RGB चे CMYK मध्ये रुपांतराची जवळपास १०० टक्के रिझल्ट देणारी यंत्रणा सांगेल काय?

अ श क्य आहे. प्रिंटसाठी आर्टिस्टला सीएमवायकेतच काम करावे लागते हे तर तुला माहितच आहे. पुर्वानुभवाधारित कॉम्बिनेशन्स करुन जवळपास दिसणारी प्रिंट निघू शकते. पण जसे स्क्रीनवर दिसते तसेच हवे असेल तर प्रिंटींग कशी केली जाते त्यावर बरेच अवलंबून आहे. जसे डिझाइन व फोटो कसा कंपोज केला आहे, पेपर कोणता आहे, प्रिंटींग मशिन (एक्स्ट्रा कलर वेगळा सोडणे, ६ कलर, ८ कलर मशिन), प्रिंटींग कलर्स, टेक्निक. इत्यादी गोष्टी अंतर्भूत होतात. शिवाय प्रिंटींगला सोडतांना पँटॉन कलर प्रोफाईल देणे हाय-क्लास प्रिंटींग जॉब्स मधे शक्य असते.

आरजीबी प्रिंटमधे मागणारे क्लायंट आले की डॉकं खातात. त्यांना समजावून सांगणे अशक्य असते. स्क्रीनवरचा आरजीबी ग्रीन तर सोडाच, सीएमवायके ग्रीन अगदी जस्साच्या तसा येईलच याची कोणतीही खात्री नसते. काही रंग जब्रा असतात. जसे दिसतात तसे कधीच येत नाहीत. हिरवा, जांभळा, नारंगी ह्यांच्या छटा हमखास फसवणार्‍या असतात. त्यामुळे त्यासोबत एखादा विरूद्ध रंग वापरून त्याचे अस्तित्व सामान्य मानवी दृश्यपटलावर मॅनेज करावे लागते. त्यातही विरूद्ध् रंग एकमेकांचे जानी दुष्मन असतात. पिवळा आणि निळा एकत्रच वापरला व अनुभवी प्रिंटींग टेक्निशियन नसेल तर पिवळा हा हिरवट लींबू कलर होतो, नाहीतर निळा जांभळट हिरवा होतो.

कॅननच्या अगदी एन्ट्री लेव्हल डिएसएलआर मध्ये बिल्ट इन फोकसिंग मोटर आहे

कॅनन च्या कोणत्याही डिएसएलआर मध्ये बिल्ट इन फोकसिंग मोटर नसते . कॅनन च्या सर्व ऑटो फोकस लेन्सेस मधे फोकसिंग मोटर असते. त्यामुळे कॅनन मध्ये लेन्स - कॅमेरा निवड सुटसुटीत असते.
निकॉन मध्ये लेन्स ऑटो फोकस होईल का नाही हे तपासून पहावे लागते.
जुन्या फिल्म कॅमेर्‍याच्या लेन्सेस बिल्ट इन फोकसिंग मोटर असली तरी ऑटो फोकस होणार नाहीत. मॅनुअल फोकसच चालू शकतील. ऑटो फोकस व्यतिरीक्त इतर बाबी तपासाव्या लागतील.
जुन्या फिल्म कॅमेर्‍याच्या लेन्सेस कॅनन वर (मॅनुअल फोकसच ) चालण्याची शक्यता अधिक.

कॅनन च्या कोणत्याही डिएसएलआर मध्ये बिल्ट इन फोकसिंग मोटर नसते

हे पहा. कॅननच्या अगदी साध्या मॉडेल्सलाही बिल्ट इन अ‍ॅटोफोकस मोटर आहे.
http://snapsort.com/compare/Canon_EOS_1000D-vs-Nikon_D3000
http://snapsort.com/compare/Canon_EOS_550D-vs-Nikon_D3100
http://snapsort.com/compare/Canon-600d-vs-Nikon-D3200

बोका's picture

13 Apr 2013 - 2:13 pm | बोका

वल्ली भाऊ, स्वत: कॅनन काय म्हणते ते पहा …
http://www.canon.com/camera-museum/tech/report/2010/07/

What differentiated the EOS’s AF system was the in-lens motor*2 — that is, the focusing mechanism’s drive motor was placed inside the lens. Most other AF SLR systems housed the drive motor in the camera body, which necessitated mechanical linkages — shafts or levers — through the mount mechanism to adjust the focusing lens group. Canon’s decision to employ in-lens motors was based on the approach of placing optimized drive sources near their corresponding drive mechanism. Since the in-lens motor was specifically designed for the lens’s particular focusing lens group, it achieved faster AF drive speeds.

कॅननने जेव्हा त्यांचा आधीचा FD माउंट बदलून त्याजागी EF माउंट आणला तेव्हापासून फोकसिंग मोटर त्यांच्या लेन्समध्येच बसवली जाऊ लागली. कॅननच्या कुठल्याच EF व EF-S माउंट कॅमेरा बॉडींमध्ये बिल्ट-इन् फोकसिंग मोटर नसते. पण त्यांच्या ह्या माउंट्स साठीच्या सर्व लेन्सेसमध्ये ऑटोफोकस मोटर असल्याने बॉडी-बिल्टइन् फोकसिंग मोटरची गरज भासत नाही. वल्ली, तुमची याबाबतची माहिती चुकीची आहे.

संदर्भासाठी खालील दुवा पहा.

http://en.wikipedia.org/wiki/Canon_EF_lens_mount

निकॉनच्या सेमी आणि प्रो बॉडींमध्ये बिल्ट-इन् फोकसिंग मोटर असते कारण निकॉनने त्यांचा F माउंट आजतागायत बदललेला नाही. त्यामुळे सर्वात आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे बर्‍याच जुन्या निक्कॉर लेन्सेससुद्धा नवीन बॉडींवर आजही वापरता येतात. पण ऑटो-फोकस मोटर असणार्‍या/नसणार्‍या बॉडीज् आणि फोकस मोटर असणार्‍या/नसणार्‍या लेन्सेस मुळे निकॉनच्या लेन्सेस घेण्याआधी बराच विचार करावा लागतो हे खरे आहे.

प्रचेतस's picture

13 Apr 2013 - 7:41 pm | प्रचेतस

गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद स्वॅप्स आणि बोका.

अरे बापरे....ही मायक्रो दुनिया फार भारीच दिसतेय. व स्वॅप्स बुवानी नी अरबी कथे पेक्षा ही सुरस केली आहे.
माझा एक मित्र म्हणाला होता. ३५ एमेम च्या फिल्मची डिटेलिंग गाठायचे असेल तर सुमारे ५२ मेगापिक्सल चा इले. सेन्सर लागेल. काय अर्थ असावा त्याच्या या विधानाचा ? केमिकल डॉट हे इले पेक्षा भारी समजावे काय ?
बाकी क्रॉप फॅक्टर हे प्रकरण ग्राफिकली स्पष्ट करता येउ शकेल काय? तसेच डी ओ एफ व लेन्स ची निवड याचा काही तक्ता आहे काय ? कमीत कमी डी ओ एफ म्हणजे एस एल आर म्हणजेच मोठा सेन्सर हे समीकरण पक्के समजायचे का?
गुर्जी , गृहपाठाचे उत्तर .
जास्त मेगॅपिक्सल पेंक्षा मोठा सेनसर व असलेल्या पिक्सलची गुणवत्ता हे गुण अधिक महत्वाचे असावेत.

एस's picture

13 Apr 2013 - 1:17 pm | एस

३५ एमेम च्या फिल्मची डिटेलिंग गाठायचे असेल तर सुमारे ५२ मेगापिक्सल चा इले. सेन्सर लागेल. काय अर्थ असावा त्याच्या या विधानाचा ? केमिकल डॉट हे इले पेक्षा भारी समजावे काय ?

हा थोडा वादाचा मुद्दा आहे आणि डिजिटल (न्यू स्कूल) विरूद्ध फिल्म (ओल्ड स्कूल) असे वाद नेहमीच झडत असतात. वेगवेगळ्या हौशी छायाचित्रकारांनी आणि इतरांनीही डिजिटल व फिल्मची विविध प्रकारे तुलना करायचा प्रयत्न केलाय व परस्परविरोधी किंवा गोंधळात टाकणारे निष्कर्ष काढले आहेत. याचे मूळ कारण म्हणजे दोन्ही अगदी वेगळी माध्यमे आहेत आणि दोन्हींची तुलना करायची झाली तर त्यांच्या छपाईशिवाय (viewing media) ते शक्य नाही. म्हणजेच छपाईचे माध्यम, तंत्र, दर्जा इ. अनेक थर्ड पार्टी फॅक्टर्स चा परिणाम होत असल्याने पूर्ण निष्पक्षपणे अशी तुलना करता येणे प्रॅक्टिकली अशक्य आहे. तरीही किमान आजतरी फिल्मच्या प्रतिमांची डायनॅमिक रेंज आणि टोनल क्वालिटी कुठल्याही डीएस्एल्आरला गाठता आलेली नाही - अपवाद D800E, D800 सारखे काही कॅमेरे अपवादात्मक परिस्थितीत काही फिल्म्सपेक्षा जास्त चांगल्या दर्जाच्या प्रतिमा निर्माण करू शकतात.

इलेक्ट्रॉनिक प्रतिमा संवेदकांची रचना आपण बघितली. फिल्म आणि संवेदक हे प्रकाश टिपण्याच्या बाबतीत साधारणपणे सारखेच कार्य करतात आणि दोन्ही अ‍ॅनालॉग डीवायसेसच आहेत. फरक नंतर अ‍ॅनालॉगचे रूपांतर बायनरी विदामध्ये केले जाते तेव्हा येतो.

फिल्मचे अनेक प्रकार आहेत - पॉजिटिव व निगेटिव फिल्म्स, फाइन व कोअर्स ग्रेन फिल्म्स, कृष्णधवल व रंगीत फिल्म्स इत्यादी. यातील खोलात जायची गरज नाही. फिल्मचे प्रकाशसंवेदनशील घटक म्हणजे सिल्वर हॅलाइड चे स्फटिक. हे स्फटिक फिल्मच्या सपाट पृष्ठभागावर एकसमान पद्धतीने बसतील अशा प्रकारे त्यांचा पातळसा थर फिल्मवर लावलेला असतो. प्रकाश पडल्यावर प्रत्येक स्फटिकाची बदललेली रासायनिक संरचना अगदी स्वतंत्रपणे नंतर फिल्म डेवलपिंग मध्ये टिपली जाते असे नाही, तर जसे संवेदकांवर प्रकाशकूप असतात तसे फिल्मवर थोडे थोडे स्फटिक एकत्र येऊन ग्रेन बनतात. फक्त हे ग्रेन एकसारखे नसतात. ज्याप्रमाणे संवेदकांची पृथक्करण क्षमता प्रकाशकूपांच्या संख्येवर अवलंबून असते, तशी फिल्मची पृथक्करण क्षमता ग्रेनच्या संख्येवरून काढता येत नाही, कारण प्रत्यक्ष प्रतिमा घेताना आणि नंतर डेवलप करताना ग्रेनमधील बदल कसे घडतील यावर काही आपले नियंत्रण नसते. अर्थात, हे ग्रेन इतके छोटे आणि स्मूद किंवा अ‍ॅनालॉग स्वरूपाचे असतात की ठराविक पॅटर्नमधील प्रकाशकूप त्यांची प्रतिमा टिपण्याच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाहीत. कारण शेवटी खर्‍या जगात सर्व काही अ‍ॅनालॉग आहे. आपली पाहण्याची क्षमताही अ‍ॅनालॉग आहे. प्रतिमेचा दर्जा तेच दृश्य मानवी डोळ्यांना कसे दिसले असते त्याच्या ती प्रतिमा कितपत जवळपास जातेय त्यावर अवलंबून असते. त्यामुळे फिल्ममध्ये गाठता येणारा स्मूदनेस, डेलिकेट टोनलिटी, रंगभेदन क्षमता वगैरे बाबतीत कुठलीही डिजिटल यंत्रणा फिल्मची बरोबरी करू शकणार नाही हे निदान माझेतरी मत आहे.

एस's picture

13 Apr 2013 - 1:35 pm | एस

बाकी क्रॉप फॅक्टर हे प्रकरण ग्राफिकली स्पष्ट करता येउ शकेल काय?

खालील आकृत्या पहा.

crop-factor-conversions

ह्या तक्त्यावरून कुठल्या लेन्स कुठल्या संवेदकावर किती परिणामी नाभीय अंतर देतात हे लक्षात येईल.

crop-factor-photo

ह्या प्रतिमेवरून प्रत्यक्ष लेन्स ओपनिंगमधून दिसणारे दृश्य, ३५ मिमी संवेदक आणि कॅननचा APS-C संवेदक यावरील प्रतिमेच्या आकारांची कल्पना येईल.

तसेच डी ओ एफ व लेन्स ची निवड याचा काही तक्ता आहे काय ?

चित्रणकक्षा ही वेगवेगळ्या अ‍ॅपर्चरला वेगवेगळ्या संवेदक-ते-विषयवस्तू अंतरावर वेगवेगळी असते. त्यामुळे असा काही तक्ता देता येणार नाही. तरीही अधिक माहिती शोधून सांगतो.

चौकटराजा's picture

13 Apr 2013 - 4:17 pm | चौकटराजा

मला फोटोशॉप सारखे साधन वापरून D O F सारखा परिणाम निर्माण करता येतो. त्यासाठी मी वेगवेगळ्या अंतराच्या ऑब्जेक्ट्स सिलेक्शन मधून सेपरेट करून वेगवेगळ्या लेअर वर टाकतो. पाहिजे त्या लेअरला ब्लर वा शार्पन फिल्टर लावून तो परिणाम साधता येतो. पण मानवी मनाची तर्‍हाच निराळी. कॅमेर्‍यावर माझी कमांड आहे हा गर्व माणसाला स्वस्थ बसू देत नाही. हॅ ! ते फोटोशॉप वापरून केलेलं काय बघायचं ? असेही काहीजण म्हणतात. असो. सोबत एक लिंक जोडत आहे.
त्यात काही उपयुक्त सापडले तर " गीतेची ज्ञानेश्वरी " करून सांगाल काय ?
http://www.dofmaster.com/dofjs.html

तुम्ही ज्याला गीता म्हणताय ते आख्खं महाभारत आहे.. ते मूळरूपातच वाचा. :) अधिक माहितीसाठी खालील दुवे पहा.

छायाचित्रणामधील सर्कल ऑफ् कंफ्यूजन ही संकल्पना -

http://en.wikipedia.org/wiki/Circle_of_confusion

विशेषतः वरील दुव्यातील १८६६ सालच्या द ब्रिटिश जर्नल ऑफ् फोटोग्राफीच्या अंकातील परिच्छेद पहा.

चित्रणकक्षा गणक -

http://www.dofmaster.com/dofjs.html

हायपर फोकल डिस्टन्स संकल्पना -

http://www.cambridgeincolour.com/tutorials/hyperfocal-distance.htm

वेगवेगळ्या कॅमेर्‍यांची CoC -

http://www.dofmaster.com/digital_coc.html

वरील सीओसी मूल्यांचा उपयोग विशेषतः छपाई तंत्रज्ञानात जास्त उपयोगाचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या सैद्धांतिक व गणितीय बाबींना व्यवहारात असणार्‍या मर्यादांचाही त्यात उहापोह केलेला आहे. हा सगळा भाग आपल्या लेखमालेच्या व्याप्तीच्या बाहेरचा असल्याने त्यावर इथे काही मांडणे शक्य नाही. नंतर केव्हातरी.

आणि शेवटी मला तरी संगणकाच्या पडद्यावर प्रतिमेशी झुंजत बसण्यापेक्षा कॅमेरा घेऊन छायाचित्रणात जास्त वेळ घालवायला केव्हाही आवडेल. फोटोशॉप वापरून बरेच काही करता येईल. तो मुद्दा पोस्टप्रोसेसिंगवरील लेखात घेऊयात.

आणखी एक, फोटोशॉपमध्ये हवा तो लेयर घेऊन ब्लर करता येत असला तरी 'ब्लर' आणि 'डीफोकसिंग' यांच्यामध्ये बरेच अंतर आहे. ब्लर ही व्ह्यूइंग माध्यमातली संकल्पना आहे तर डीफोकसिंग ही ऑप्टिक्सशी संबंधित गोष्ट आहे. ब्लर हा दोष आहे. डीफोकसिंग हा दर्जा आणि कौशल्य. अर्थात, हे माझे मत झाले. पोस्टप्रोसेसिंग हे दुय्यम आहे असे मला म्हणायचे नाहीये. विशेषतः तुम्ही जर व्यावसायिक छायाचित्रकार असाल तर तुम्हांला ग्राहकाला हवे तसे पोस्टप्रोसेसिंग करता यायलाच पाहिजे. ह्यालाच 'फोटोशॉपमध्ये पेंट करणे' अशी संज्ञा आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Apr 2013 - 10:23 am | लॉरी टांगटूंगकर

बिल्ट-इन फोकसिंग मोटरच्या उपयोगाबद्दल अजून लिहा. त्याचा नेमका काय फायदा?
लेन्सेंस मधलं अंतर कमी जास्त करून फोकस करता येतंच की आणि मॅन्युअल फोकसिंग आहेच परत.

हौशी डीएसआर कॅमेऱ्यामध्ये सी मॉसच दिसतात. आणि एकदम लो एंड पॉइंट अ‍ॅन्ड शुट मध्ये सीसीडी त्यामुळे मी थोडा जास्त गोंधळात पडलो.

आणि जर कमी आकारमानाच्या संवेदकावर जास्त मेगा पिक्सेल दिले तर तो उच्च आयएसओला आणि/किंवा जास्त एक्स्पोजरला जास्त नॉइझ देइल (तांत्रिक शब्द वापरायचा प्रयत्न लोल!!!! प्रतिमा गंडेल हा मुद्दा ). एका आकारमानाच्या संवेदकावर वेगवेगळे मेगापिक्सेल असलेली तुलना बघितली होती. त्यात समान सेन्सरवर कमी मेगापिक्सेल लोड दिलेला कॅमेरा चांगला असे म्हणलेलं होतं..

शैलेन्द्र's picture

13 Apr 2013 - 10:49 am | शैलेन्द्र

हौशी डीएसआर कॅमेऱ्यामध्ये सी मॉसच दिसतात. आणि एकदम लो एंड पॉइंट अ‍ॅन्ड शुट मध्ये सीसीडी त्यामुळे मी थोडा जास्त गोंधळात पडलो.

यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वेग.. सीमॉस्चा वेग हा सीसीडीपेक्षा खुप जास्त असतो. त्यामुळे वाढणार्‍या नॉइसला संवादकांच्या आकाराने नियंत्रित करुन डीएसेलआर मधे सीमॉसच वापरतात.

एस's picture

13 Apr 2013 - 12:38 pm | एस

समान सेन्सरवर कमी मेगापिक्सेल लोड दिलेला कॅमेरा चांगला

बरोबर.

बिल्ट-इन फोकसिंग मोटरबद्दल लेन्सेसवरील भागात जास्त लिहीन. कारण लेन्सेसच्या प्रकारांनुसार कॅमेर्‍यातील कुठली वैशिष्ट्ये कशी लागू पडतात ते तेव्हा जास्त स्पष्ट होईन.

जयंत कुलकर्णी's picture

13 Apr 2013 - 6:56 pm | जयंत कुलकर्णी

छान लिहिले आहे..........

I will frame you ! Then I will shoot you and lastly I will hang you..............................on a wall ! Yes I am a Photographer

LOL

मंदारपुरोहित's picture

29 Dec 2014 - 10:23 pm | मंदारपुरोहित

मी २-३ भाग वाचले. मिररलेस कॅमेरा हा technically DSLR समजला जातो का ? कि तो एक वेगळा प्रकार आहे? आणि त्याचे फायदे तोटे आहेत का? मी sony alpha ६००० घेतला आहे आणि मला सो फार quality खूप बरी वाटली

एस's picture

30 Dec 2014 - 8:34 am | एस

मिररलेस कॅमेरा इज नॉट अ डीएसएलआर. अगदी साध्या पॉइंटअँडशूट व डीएसएलआर यांच्यामध्ये ही कॅटेगरी येते. तुम्ही घेतलेला कॅमेरा चांगला आहे.

मंदारपुरोहित's picture

30 Dec 2014 - 6:55 pm | मंदारपुरोहित

धन्यवाद स्वॅप्स

मराठी कथालेखक's picture

13 Nov 2015 - 3:47 pm | मराठी कथालेखक

म्यन्युअल फोकस करावे का ? कधी करावे ?
Nikon D3200 वर Hi1 अशी ISO उपलब्ध आहे, त्याचा अर्थ काय ? ते कधी वापरावे ?

मराठी कथालेखक's picture

13 Nov 2015 - 7:13 pm | मराठी कथालेखक

DSLR ने Panaorama photos घेता येतात का ? असल्यास कसे ?