छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)

एस's picture
एस in काथ्याकूट
19 Jan 2014 - 8:45 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्
छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्
छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स

छायाचित्रण - एक कला...

सूची
      १. कलाकृतीतील रचनेचे घटक
      २. काही साध्या गोष्टी
      ३. रचनाविचार

      आतापर्यंत छायाचित्रणाच्या तंत्राचा आणि साधनांचा आपण विचार केला. मूलभूत डीएस्एल्आर छायाचित्रणासाठी एवढ्या गोष्टी माहीत असणं साधारणतः पुरेसे ठरते. (फ्लॅश किंवा कृत्रिम प्रकाश वापरून केले जाणारे छायाचित्रण हा भाग राहिला आहे. पण त्यासाठी आधी छायाप्रकाशाचे छायाचित्रणातील स्थान लक्षात घेऊन नैसर्गिक प्रकाशाचा वापर कसा करायचा हे पुढील एखाद्या लेखात पाहू आणि नंतर त्यायोगाने कृत्रिम प्रकाशाच्या विविध साधनांची माहिती तेव्हा घेऊ. कृत्रिम प्रकाशाचा वापर कसा करायचा ह्यातील जो तांत्रिक भाग आहे, तो खूपसा तुमच्या साधनांवर म्हणजे कॅमेरा, लेन्सेस, कृत्रिम प्रकाशाची साधने, इतर प्रकाश-परिवर्तक साधने (लाइट मॉडिफायर्स) वगैरे बाबींवर अवलंबून असतो आणि कितीही पुस्तकी ज्ञान वाचून काढले तरी स्वतः जोपर्यंत ते वापरून पहात नाही तोपर्यंत अशा संसाधनांवर हात बसणं जरा अवघड असतं. त्यामुळे तो विषय नंतर कधीतरी.)

      इथून पुढे आपण छायाचित्रणाची कला जाणून घेऊ यात. कला म्हटलं की त्यातील तत्त्वज्ञानही आलंच. आणि ह्या दोहोंचाही आवाका अथांग आहे. छायाचित्रणाचे तंत्र जेव्हा माहीत झाले तेव्हाचा त्याचा 'माहितीची नोंद करणे' हा मूळ उद्देश जरी अजूनही तसाच असला, तरी लवकरच त्यातील कला लवकरच बहरू लागली आणि आज छायाचित्रणाला एक कला म्हणून भारतात एवढी नाही तरी जगात इतरत्र मोठी मान्यता मिळाली आहे. अर्थात, भारतात सामान्यांच्या जीवनात चित्रकलेचे जे दयनीय स्थान आहे तेच छायाचित्रणाचे एक कला म्हणून आहे, ही एक दुर्दैवाची बाब आहे. केवळ भारीतला जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा घेतला किंवा डीएस्एल्आर घेतला की आपल्याला चांगले फोटो काढता येतील ह्या भ्रमाचा दोष जितका कॅमेरा-उत्पादकांच्या धूळफेक करणार्‍या मार्केटिंग तंत्राचा आहे तितकाच तो चांगल्या, उच्च दर्जेच्या कलेबाबत जनसामान्यांत असलेल्या औदासीन्याचाही आहे. आणि काही प्रमाणात हा दोष कलाकारांचाही (त्यात छायाचित्रकारही आले) आहे. आपल्याला परदेशात किंवा उच्चभ्रू वर्तुळात ओळख मिळाली की भागले अशी एक वृत्ती इथे निर्माण झाली आहे. आणि ती प्रतिष्ठा मिळाल्यावर आपल्याकडील कलाकारपण मग जमिनीवर यायला तयार नसतो. तोही सामान्यांना तुच्छ लेखतो आणि सामान्यांनाही अशा लोकांचे नाव त्यांची एखादी कलाकृती भल्यामोठ्या रकमेला विकली गेल्याची बातमी आल्यावरच कळते. अर्थात ह्यालाही काही अतिशय सन्माननीय अपवाद आहेत. पण अपवादच. दुर्दैवाने छायाचित्रणामागच्या कलेची कदर करायचे वळण समाजाला लावले जात नाहीये आणि पर्यायाने चित्रकलेबरोबरच छायाचित्रणही सर्वसामान्य भारतीय जीवनाच्या उंबरठ्यावरच थिजून राहिले आहे. लोक आपल्या घराच्या दालनात एखादे चित्र पटकन लावत नाहीत ते छायाचित्राची मुद्रित प्रत विकत घेऊन काय लावणार...! असो.

      असं म्हणतात की छायाचित्रणाची सुरुवात ही कलात्मक मांडणीपासून होते. केवळ छायाचित्रणच नव्हे, तर इतर सर्वच कलाप्रकारांना हे तत्त्व लागू होते. मानवी बुद्धीचा कल हा आधी बाह्यरेषा म्हणजेच आउटलाइन लक्षात ठेवण्याचा असतो. त्यातील बारकाव्यांकडे आपले लक्ष नंतर जाते. म्हणजेच, एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायची सुरुवात आपण मनोमन त्या कलाकृतीचा ढोबळमानाने पडलेल्या फर्स्ट इंप्रेशनपासून करतो. आणि हे फर्स्ट इंप्रेशन निर्माण करण्याचे सर्वात पहिले काम करते कलाकृतीतील घटकांचे एकमेकांशी निगडीत असलेले स्थान म्हणजेच कलाकृतीतील रचनाविचार. मला वाटते, कॉम्पोजिशन ह्या शब्दाला 'रचनाविचार' हा मराठी प्रतिशब्द चपखल आहे.

      कलाकृती ही कितीही स्वांतसुखाय केलेली असो. जेव्हा कलाकाराव्यतिरिक्त दुसरा कोणीही ती कलाकृती बघतो किंवा अनुभवतो तेव्हा कलाकृती आणि पाहणार्‍याचे मन यात काही देवाणघेवाण होत असते. प्रत्येकजण आपापला अर्थ त्यात शोधत असतो. अशा वेळी, एक कलाकार म्हणून किंवा त्या कलाकृतीचा निर्माता म्हणून तुम्हांला तुमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधायचा असतो किंवा आपलं म्हणणं, आपला विचार हा इतरांपर्यंत पोहोचवायचा असतो तो संवाद, तो प्रभाव जास्तीत जास्त परिणामकारकपणे आणि सर्वात जलद रीतीने साधण्यासाठी रचनाविचाराशिवाय पर्याय नाही. इथे केवळ सौंदर्यविचारच नव्हे, तर इतरही प्रकार विशेषतः रिपोर्ताज किंवा वार्तांकनासारखे माहितीधिष्ठित माध्यमेही याच रचनाविचाराचा आधार घेताना दिसतात. छायाचित्रणासारख्या दृक् माध्यमात मांडणीला अनन्यसाधारण महत्त्व याचमुळे आहे. आणि छायाचित्रांचा दर्जा ठरवणार्‍या रंगाविष्कार, सुस्पष्टपणा इत्यादींसारख्या इतर घटकांपेक्षाही प्रेक्षकांपर्यंत जलद आणि परिणामकारकपणे पोहोचते ती त्या छायाचित्रामधील विषयवस्तूंची रचना.

कलाकृतीतील रचनेचे घटक -

रेषा आणि प्रतल(Lines and Planes)
      बिंदू, रेषा आणि प्रतल यांचे स्वतंत्र अस्तित्व प्रत्यक्षात नसते. प्रतल हे सपाट पृष्ठभागाच्या इतर अवकाशाशी होणार्‍या संवादाचा आभास आहे. अशी दोन प्रतले एकमेकांना छेदतात तिथे रेषेचा आभास होतो. आणि दोन रेषा एकमेकींना छेदतात तिथे बिंदू दिसतो. निसर्गात ह्या तिन्ही गोष्टी इतर त्रिमितीय वस्तूंच्या परस्परसंबंधाच्या आधारे व्यक्त होतात. ह्या तिन्ही गोष्टींचा वापर प्रेक्षकांच्या दृष्टीला प्रतिमेच्या चौकटीत तसेच चौकटीबाहेरही प्रवास घडवून आणण्यासाठी कलाकारांकडून केला जातो.

आकार (Shape)
      आकार हे द्विमितीय प्रतिमेच्या बाबतीत तिच्यातील कडांमुळे आणि रेषांच्या भासामुळे निर्माण होतात. ते नेहमीच वास्तवदर्शी असतीलच असे नाही. मानवी मेंदू प्रतिमेतील सुसंगती आणि विसंवादाचा शोध हा त्यातील आकारांच्या आणि रेषांच्या मदतीने घेत राहतो. वरवर अगदी वेगवेगळ्या वाटणार्‍या आकारांमधील रेषीय सलगपणा शोधणे हा मानवी मेंदूचा आवडता खेळ आहे.

अवकाश (Space)
      अवकाश हे प्रतिमेतील विषयवस्तूंच्यामधील किंवा विषयवस्तूंच्या आभासी आकाराच्या आतील जागेमुळे निर्माण होते. अवकाशाचा वापर हा चित्राला गती मिळवून देण्यासाठी केला जातो. प्रतिमेतील एखाद्या पक्ष्याच्या बघण्याच्या दिशेला सोडलेली रिकामी जागा ही तो कशाचा वेध घेत आहे, भक्ष्य आहे की भक्षक, हे छायाचित्र काढल्यावर तो पक्षी उडाला का, कुठल्या दिशेला उडाला असावा असे अनेक प्रश्न प्रतिमा पाहणार्‍यांच्या मनात उत्पन्न करू शकते. त्याचबरोबर छायाचित्रातील धावणार्‍या मुलाच्या पुढे जागा न सोडता जर मागे सोडली तर प्रेक्षकांना अशी रचना चौकटीच्या बाहेर जाण्यास भाग पाडते.

सखोलता (Depth)
      द्विमितीय प्रतिमेत त्रिमितीय विश्व उभे करताना खोलीचा आभास हा त्यातील पृष्ठभूमी आणि पार्श्वभूमीतील घटकांद्वारे प्रस्थापित केला जातो. यात कधीकधी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंडच्या मध्ये मिडलग्राउंड म्हणजे मध्यभूमीही असू शकते.

आकृतीबंध (Pattern)
      प्रतिमेतील आकृतीबंध हे त्यातील आकारांच्या परस्परसमानतेमुळे निर्माण होतात. मानवी मेंदूला गोंधळाच्या स्थितीपेक्षा जास्तीत जास्त समरूप असणारे घटक एकत्र पहायला जास्त सोसवणारे वा रोचक वाटतात.

रंग (Color)
      रंगीत छायाचित्रणाचा शोध लागल्यापासूनच अचूक रंगउठावाचे आणि पर्यायाने विविध रंगावकाशांचे महत्त्व छायाचित्रणात वाढले. मांडणीच्या बाबतीत उष्ण अथवा शीत, विरुद्ध अथवा समदर्शी अशा विविध प्रकारे रचनाविचार दर्शवता येतो. विविध संस्कृतींमध्ये विविध रंगांचा अर्थ आणि महत्त्व वेगवेगळे असल्याने छायाचित्रणात परिणामकारकता आणण्यासाठी रंगाधिष्ठित रचना करता येऊ शकते.

पोत (Texture)
      पोत म्हणजे प्रतिमेतील वस्तूंच्या पृष्ठभागांचा मऊ किंवा खडबडीतपणा. प्रतिमेतील विविध वस्तूंच्या पोतातील विरोधाभास ठळक करून रचना साधता येते.

दृष्टिकोन किंवा परिदृश्य(Perspective)
      छायाचित्रणामध्ये दृष्टिकोन किंवा परिदृश्य म्हणजे छायाचित्रातील वस्तूंचा दर्शवलेला (अभिधानित) परस्परसंबंध. वर दर्शवलेल्या सर्व घटकांचा प्रभाव हा चित्रामधील पर्स्पेक्टिव निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. हा परस्परसंबंध प्रत्यक्षात वेगळाच असू शकतो. मात्र छायाचित्रणामध्ये पाहण्याचा दृष्यकोन बदलून मूळ त्रिमितीय जगताचे द्विमितीय प्रतिरूप निर्माण केले जाते.

      रेषीय परिदृश्य (Linear Perspective)
      सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त वापरला जाणारा दृष्टिकोन हा छायाचित्रकाराच्या डोळ्यांच्या रेषेत आणि चित्रातील घटकांना लंबरूप असा असल्याचे पहायला मिळते. प्रतिमेतील घटक सामान्यपणे कॅमेरा जमिनीपासून डोळ्यांच्या अंतरावर आणि जमिनीला समांतर असा ठेऊन घेतले जातात.

      अतिव्याप्ती परिदृश्य (Overlapping Perspective)
      प्रतिमेतील घटकांची रचना एकमेकांना अंशतः झाकतील अशा प्रकारे केली जाते.

      आकाशीय परिदृश्य (Aerial Perspective)
      विषयवस्तूपेक्षा जास्त किंवा अतिशय उंचावरून केले जाणारे छायाचित्रण. यालाच बर्डस् आय व्ह्यू असेही म्हणतात.

      बिंदूवत परिदृश्य (Worm's Eye View Perspective)
      विषयवस्तूकडे नेहमीच्या उंचीपेक्षा अतिशय लहान उंचीवरून, जवळजवळ जमिनीवर कॅमेरा ठेऊन केले जाणारे छायाचित्रण.

001

काही साध्या गोष्टी -

01

03

04

05

06

07

08

09

10

11

12

13

14

रचनाविचार

15

16

17

18

19

20

21

      आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे. रचनाविचार हा विषय इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता अतिशय विस्तृत व्याप्ती असलेला छायाचित्रणातील हा भाग आहे. केवळ या विषयावर स्वतंत्रपणे लिहिली गेलेली पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ती इंग्रजीत आहेत आणि अतिशय महागडी आहेत.

जाताजाता
"You know you are a photographer when performing daily duties, you adjust the angle of your head or change your line of vision for a more interesting composition... ;-)

क्रमशः

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

19 Jan 2014 - 9:54 pm | चौकटराजा

यातील काही तंत्रे मी वापरतो. पण माझी सध्या व्यथा वेगळीच आहे . माझ्या कॅमेर्‍याला ऑप्टीकल व्यू फाईंडरच नाही. त्यामूळे प्रखर प्रकाशात काही दिसतच नाही.मग नंतर फोटोशॉप मधे क्रॉप वापरून सारे ठाकठीक करावे लागते. मी वल्ली व प्रशांत काल परवा लोहगड येथे गेलो असताना आपली आठवण आली. डी एस एल आर चे फायदे असा काही विषय निघाला होता. हा धागा अनेक फटूवाल्यांचा डोक्यात " प्रकाश" पाडेल. आपण या साठी घेतलेल्या मेहनतीचा आदर करतो.

माझे लेख तुम्हांला आवडताहेत आणि आपण आवर्जून प्रतिसाद देत आहात ही मला व्यक्तिशः फार भावणारी गोष्ट आहे. रचनाविचारावरील धाग्याचीही रचना तितकीच सुंदर असली पाहिजे ह्या अट्टाहासामुळे हा धागा यायला थोडा उशीर झाला.

माझ्या कॅमेर्‍याला ऑप्टीकल व्यू फाईंडरच नाही. त्यामूळे प्रखर प्रकाशात काही दिसतच नाही.मग नंतर फोटोशॉप मधे क्रॉप वापरून सारे ठाकठीक करावे लागते.

हरकत नाही. एलसीडी स्क्रीनचा ब्राइटनेस जास्तीत जास्त सेटिंगला ठेऊन पहा. अर्थात त्यामुळे एक्स्पोजर व्यवस्थित आले आहे की नाही ह्यात थोडा गोंधळ उडू शकतो. आणि आता तु्म्ही डीएस्एल्आर घ्याच असा प्रेमळ आग्रह करतो. :-)

प्रचेतस's picture

19 Jan 2014 - 10:14 pm | प्रचेतस

खच्चून माहितीने भरलेला भाग.

सर्वच सूचना अत्यंत उपयुक्त आहेत. वर चौराकाका म्हणतात त्यानुसार आपल्या धाग्यांबद्दल चर्चा झाली होती.

शैलेन्द्र's picture

19 Jan 2014 - 11:14 pm | शैलेन्द्र

मस्तं.... आवडलं.. :)

रचनाविचार म्हणजे आपल्या फोटोत कोणत्या गोष्टी (अ)चौकटीत कुठे आणि(ब) किती ठळकपणे दाखवायच्या .
(अ)हा पर्याय महागड्या आणि स्वस्त सर्व कैमऱ्यांना लागू आहे .
याबाबतीत फोटो कला चित्रकलेच्या थोडीफार जवळ जाते .
लहान मुलांनी /साध्या
कैमऱ्याचा एखादा फोटो भाव खाऊन जातो याचे कारणही हेच आहे .

(ब)हा पर्याय फोटोमध्ये आणण्यासाठी मात्र महागडी लेन्सीज (मोठी अॅपचर असणारी ) अथवा स्पॉटमिटरिंग आणि मोठे सिसिडी सेंसर असणारे कैमरा बॉडी हवेत .

एस's picture

20 Jan 2014 - 11:25 pm | एस

ह्याला थोडासा वेगळा पर्याय म्हणजे जर फोटोशॉप येत असेल तर आपल्याला हवा असलेला भाग आपण थोडा धूसर करू शकता आणि जास्त अ‍ॅपर्चर वापरल्याचा भास निर्माण करू शकता. अर्थात वस्तूंच्या मांडणीला मात्र छायाचित्रकाराची नजरच हवी हे मात्र खरं.

नांदेडीअन's picture

20 Jan 2014 - 5:31 am | नांदेडीअन

मस्तच !
कृपया पुढचा भाग पोस्ट प्रोसेसिंगवर येऊ द्या.

एस's picture

20 Jan 2014 - 11:27 pm | एस

पोस्टप्रोसेसिंग हा भाग टोटल इमेज फ्लोमध्ये जवळजवळ शेवटी येतो. त्यामुळे आधी थोड्या बाकीच्या बाबी पुढच्या धाग्यांतून पाहूयात.

उपाशी बोका's picture

20 Jan 2014 - 10:07 am | उपाशी बोका

हा भाग माहितीपूर्ण आहे आणि खूप आवडला.
कॉम्पोझिशन कसे असावे याचे उदाहरण म्हणून माझा आवडता व्हिडिओ सुचवायला आवडेल.

एस's picture

20 Jan 2014 - 11:29 pm | एस

छान सिनेमॅटोग्राफी आणि तितकंच छान गाणंही.

मदनबाण's picture

20 Jan 2014 - 10:27 am | मदनबाण

उत्तम लेखन आणि महत्वपूर्ण माहिती. :)

सौरभ उप्स's picture

20 Jan 2014 - 10:38 am | सौरभ उप्स

कडक माहिती दिली आहे. खूप फायद्याचे आहे ज्यांना हौस आहे आणि त्याबद्दल ज्ञान मात्र नाही अश्यांसाठी जास्त उपयुक्त…
फोटोग्राफी मध्ये चित्रकले ची छाप असते त्यामुळे दोन्ही क्षेत्रात विझुअलायझेशन खूप महत्वाच असत….

जेपी's picture

20 Jan 2014 - 10:56 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

एस's picture

20 Jan 2014 - 11:16 pm | एस

चौकटराजा, वल्ली, शैलेन्द्र, कंजूस, नांदेडीअन, उपाशी बोका, मदनबाण, सौरभ उप्स, तथास्तु - सर्वांचे मनःपूर्वक आभार. या लेखमालेला निवडक वाचकवर्ग लाभलाय ही बाब उत्साह वाढवणारी आहे.

पहाटवारा's picture

21 Jan 2014 - 12:13 am | पहाटवारा

तुमची हि लेखमाला अतीशय माहितीपूर्ण आहे. हा तर खुपच ऊपयोगी आहे आणी या लेखासाठी घेतलेली मेहनत दिसून येते आहे.. खासकरून ऊदाहरणासहित दिलेल्या टिप्स !
-पहाटवारा

श्रीरंग_जोशी's picture

21 Jan 2014 - 1:10 am | श्रीरंग_जोशी

या अभ्यासपूर्ण लेखमालिकेतील हा भाग म्हणजे सुवर्णकळस आहे.
वरील उदाहरणांत स्वॅप्स यांनी काढलेली विविध छायाचित्रे फारच आवडली.

अवांतर: छायाचित्रणात रस असणार्‍यांनी रोज bing.com वर अवश्य चक्कर टाकावी. विविध विषयांवरची सुरेख छायाचित्रे पहायला मिळतात व बरेचदा त्या चित्रांशी संबंधीत पर्यटनविषयक माहिती पण मिळते.

मला छायाचित्रकलेत फारसा रस नाही, पण तुम्ही या धाग्यावर घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येतेय.
असं प्रेझेंटेशन मला जमायला हवं !

मोहन's picture

21 Jan 2014 - 2:57 pm | मोहन

प्र्त्येक भाग अप्रतीम झाला आहे. सगळ्या भागांचे एक संकलीत स्वरूपात इ-पुस्तक करण्याची विनंती सं.म. ला करत आहे.
अर्थात सर्व भागांच्या वा.खू. साठवल्या आहेतच

सूड's picture

21 Jan 2014 - 5:31 pm | सूड

असेच म्हणतो.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 Jan 2014 - 12:38 am | लॉरी टांगटूंगकर

बाडीस

एस's picture

22 Jan 2014 - 10:57 pm | एस

अहो मला अजून लिहायचं आहे. थांबा थांबा. :-P

अवांतर - ही लेखमाला फक्त मिसळपाव.कॉम साठीच लिहिली जात आहे. यातील काहीही माहिती माझ्या अनुदिनी (ब्लॉग) वर किंवा चेपु पानावरही नाहीये.

कपिलमुनी's picture

21 Jan 2014 - 4:34 pm | कपिलमुनी

दंडवत !!

एक नंबर माहिती आहे ..

प्रत्येक भागात प्रतिसाद देत नाही वाचतो मात्र जरूर.
हा भागही अतिशय उपयुक्त व सुंदर! आभार!

सूड's picture

21 Jan 2014 - 5:23 pm | सूड

वाचनखूण साठवली आहे.

jaypal's picture

21 Jan 2014 - 6:29 pm | jaypal

उत्तम आहेत. अनेक नव्या गोष्टी समजल्या.
सुन्दर धाग्यांबद्दल धन्यवाद

फोटोशॉप सॉफ्टवेर वापरून मागचा भाग धूसर केला तरी 135mm f 2 , f2.8 चे पॉटेट चित्र जसे मिळेल अथवा 50mm f1.4 , f 1.8चे असे होत नाही .

निसर्ग दृष्य 24 mm ,28 mm फिक्सट लेन्सने जो भव्यपणा आणते तो दुसऱ्या कशानेही येत नाही .

18-55mm f 5.6 -8चे लेनस आणि फ्लैश टाकून काय कप्पाळ फोटो येणार .

डिजिटल कम्पैक्ट कैमरे सगळा उजेडच उजेड करतात ,छायाप्रकाशाचा काही खेळच नाही .

महागडे मोबाईल (कैमरावाले)तरुणपिढी घेत आहे .आणखी पैसे घालून चांगला कैमरा घेण्याचा कला कमी होत चालला आहे .

अभिजा's picture

24 Jan 2014 - 8:17 pm | अभिजा

Khoop chhan lekh!

एस's picture

25 Jan 2014 - 8:45 pm | एस

:)

चिगो's picture

27 Jan 2014 - 2:14 pm | चिगो

सुंदर लेख, स्वॅप्स.. आणि त्यापायी घेतलेली मेहनतही "उत्तुंग" टायपातली आहे. आणि तुमचे मराठी म्हणजे.. साष्टांग नमस्कार..

पैसा's picture

29 Jan 2014 - 4:22 pm | पैसा

सगळे फोटो बघता शब्दच संपले! या चित्रांच्या स्वरूपातल्या सूचना हा फॉर्मॅट मस्त जमला आहे. तसंच यातील बरीचशी सूत्रे चित्रकलेला पण लागू होतात त्यामुळे चित्रकार आणि चायाचित्रकार दोघांनाही हा अतिशय महत्त्वाचा धागा! या भागासाठी आणि एकूणच मालिकेसाठी मनापासून धन्यवाद!

धन्यवाद पैसाताई आणि चिगो!

foto freak's picture

11 Oct 2015 - 9:50 pm | foto freak

मार्गदर्शनपर लेख लिहिल्या बद्दल प्रथमतः आपले मना पासून धन्यवाद...आपले है लेख माझ्या सारख्या नवगताला उपयुक्त ठरतात..

एस's picture

11 Oct 2015 - 10:06 pm | एस

धन्यवाद, फोटोफ्रीक!

नाव आडनाव's picture

12 Oct 2015 - 10:01 am | नाव आडनाव

हा (आणि आधिचे पण) भाग आधी वाचले नव्हते. फोटॉग्राफितलं काहीच माहित नाही, त्यामुळे थोडी-थोडी माहिती वाचणार आहे. वाचनखूण साठवलेली आहे (शेवटी स्मायली नाही, खरंच साठवली आहे :) ).
चांगल्या माहितीसाठी धन्यवाद :)

चांदणे संदीप's picture

12 Oct 2015 - 11:03 am | चांदणे संदीप

डिट्टो! = | | =

शब्दबम्बाळ's picture

12 Oct 2015 - 11:00 am | शब्दबम्बाळ

खूप छान मांडणी आणि उत्तम माहिती!
याच्या पुढच्या भागांची लिंक मिळेल का?

वेल्लाभट's picture

12 Oct 2015 - 11:18 am | वेल्लाभट

एक्सलंटच समजावलंयत. मस्त.

शामसुन्दर's picture

12 Oct 2015 - 1:06 pm | शामसुन्दर

उत्तम माहिती! धन्यवाद :)

एस's picture

12 Oct 2015 - 1:30 pm | एस

वरील सर्वांना एकत्रित धन्यवाद. खालील भागात सर्व लेखांचे दुवे दिले आहेत.

http://misalpav.com/node/29842

सवड मिळाल्यावर प्रत्येक भागात त्याच्या पुढच्या भागाचा दुवा देण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून वाचकांना सर्व भाग प्रथम लेखापासून सुरू करून सलगपणे वाचता येतील.

पुनरेकवार आभार.