छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे

एस's picture
एस in काथ्याकूट
30 Jun 2013 - 5:13 pm
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना

निक्कॉर लेन्स-सिस्टीम मधील काही लेन्सेस

16-Nikkor-Lenses

(मूळ प्रतिमा Nikkon Rumors वरून साभार)

कदाचित कॅमेर्‍यांपेक्षाही त्यांच्या लेन्सेसवर जातिवंत छायाचित्रकाराचा जास्त जीव असतो. त्याला कारणही तसेच आहे. पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍यांना एकच लेन्स कायमची बसवलेली असते. झूम बदलून हव्या त्या अंतरावरची प्रतिमा हवी तशी कॉम्पोज करून घेता येते. मग 3X असो वा 50X असो. ती झूम वापरणार्‍याच्या दृष्टीने कॅमेर्‍याची झूमक्षमता असते, त्याच्या लेन्सची नव्हे. थोडक्यात सर्वसामान्य लोक एखाद्या कॅमेर्‍याचा दर्जा आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे एकतर त्याच्या मेगापिक्सेलनुसार ठरवतात किंवा त्याच्या झूमवरून. ही झूम नक्की काय असते, तर झूम म्हणजे त्या कॅमेर्‍याच्या लेन्सच्या कमीत कमी परिणामी नाभीय अंतराचे जास्तीत जास्त नाभीय अंतराशी असणारे गुणोत्तर. उदा. किमान परिणामी नाभीय अंतर जर समजा २७.५ मिमी असेल आणि कमाल परिणामी नाभीय अंतर ५५० मिमी असेल तर अशा लेन्सची झूम ५००/२७.५ = २०X एवढी असते. जर तुम्हांला तुमच्या पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेर्‍याचे किमान परिणामी नाभीय अंतर माहीत असेल तर झूमक्षमतेवरून त्या लेन्सचे कमाल परिणामी नाभीय अंतर अशा रीतीने काढता येईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॅमेर्‍यांच्या निव्वळ झूमवरून त्यांची तुलना करण्यापेक्षा त्यांच्या किमान व कमाल परिणामी नाभीय अंतरावरून त्यांची लेन्स किती वाइड अ‍ॅन्गल आणि किती टेलिफोटो जाऊ शकते याची काहीशी कल्पना करता येईल. याच तत्वाचा वापर करून लेन्सचे परिणामी नाभीय अंतर हवे तितके ठेऊन तुम्हांला तशी छायाचित्रे काढता येतील. उदाहरणार्थ, पोर्ट्रेट्स साठी आदर्श नाभीय अंतर साधारणतः ८५ ते १३५ मिमी मानले जाते. या नाभीय अंतराला विपर्यासभ्रंश (Distortion) सर्वात कमी येत असल्याने माणसांची चांगली छायाचित्रे काढायला अशी लेन्स चांगली असते. वरील उदाहरणातील लेन्स घेतल्यास तिची झूम ३X ते ४X ठेवल्यास डीएस्एल्आरवरील पोर्ट्रेट लेन्स वापरल्यासारखी छायाचित्रे आपण घेऊ शकता.

डीएस्एल्आर छायाचित्रणाचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे वेगवेगळ्या नाभीय अंतराच्या लेन्सेस एकाच कॅमेर्‍यावर वापरण्याची क्षमता. सर्व झूम रेंज एकाच लेन्समध्ये एकवटल्यास एकतर तिचा आकार महाप्रचंड होईल कारण आपल्या डीएस्एल्आरचे संवेदक चांगलेच मोठाले असतात. आणि जितकी झूम रेंज जास्त तितका त्या लेन्सचा परफॉर्मन्स ढासळेल.असे म्हणतात की,ए लेन्स गुड अ‍ॅट एवरिथिंग इज् बेस्ट अ‍ॅट नथिंग.. म्हणूनच वेगवेगळ्या नाभीय अंतरांसाठी त्या-त्या अंतराची स्पेशालिस्ट प्राइम लेन्स वापरणे केव्हाही सर्वोत्तमच.

पण लेन्सेस बदलता येणं ही चांगली गोष्ट आहे तशीच ती वैतागवाणी आणि जाम दमवणारीपण आहे. ह्या लेन्सेस इतक्या महागड्या असतात की जगातल्या सर्वात श्रीमंत छायाचित्रकारासुद्धा तिला हव्या असलेल्या किंवा हव्याहव्याशा वाटणार्‍या सर्वच्या सर्व लेन्सेस घेणं कदाचित शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्हांला तुमच्या लेन्सेसचा संच काळजीपूर्वक निवडावा लागतो. शिवाय दरवेळी लेन्स काढा रे, लावा रे, नीट जपून ठेवा रे, साफसूफ करा रे आणि सगळ्यात वाईट म्हणजे फील्डवर जाताना या सगळ्यांचं ओझं पाठीवर वागवा रे. अन् एवढं सगळं करूनदेखील दरवेळी फील्डवर असा एकतरी क्षण येतोच येतो की आपण एखादी लेन्स न आणल्याबद्दल स्वतःला शिव्या घालतच परत येतो. तात्पर्य, बाबांनो आणि बाबींनो, उगाच पैसे आहेत म्हणून डीएस्एल्आर् घेत बसू नका. हे एकापरीने व्यसनच आहे. ;)

हा लेख लिहीत असताना मला एक प्रश्न पडला - कॅमेर्‍याला लेन्स का आवश्यक असते? म्हणजे नुसताच संवेदक वापरून प्रतिमा घेता येणार नाही का? अर्थातच घेता येईल. पण ती कशी असेल हे पहायला कॅमेरा ऑब्स्क्युराचा वापर करावा लागेल. लेन्समध्ये कमीत कमी एक बाह्यवक्र भिंग असते. खरेतर कुठल्याही लेन्समध्ये एकाआड एक अशा बाह्यवक्र आणि अंतर्वक्र भिंगांच्या एकापेक्षा अधिक जोड्या असू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा हा की, संवेदकावर किंवा फिल्मवर पडणारी प्रकाशशलाका जास्तीत जास्त संकेंद्रित केली जाते, अनावश्यक अपवर्तित (Scattered) प्रकाशकिरणे अडवली जातात, संवेदकावर पडणारी प्रतिमा जास्तीत जास्त सुस्पष्ट असते व या प्रकाशशलाकेचे नाभीय अंतर नियंत्रित करण्याची प्रचंड उपयोगी अशी क्षमता छायाचित्रकारास प्राप्त होते. अर्थात सर्वच फायदेच फायदे होतात असे नाही. लेन्सेसचे तोटे आणि उच्च प्रतीच्या लेन्सेसवर छायाचित्रकाराचा जीव असण्याची कारणे नंतर बघू.

एस्एल्आर व डीएस्एल्आर साठीच्या लेन्सेसमधील फरक

          जर आपण छायाचित्रणाच्या क्षेत्रातील माहीतगार असाल तर कदाचित आपण फिल्म युगाकडून डिजिटल युगाकडे तंत्रज्ञानाचा झालेला प्रवास जवळून पाहिला असाल. छायाचित्रणाचे क्षेत्रसुद्धा त्याला अजिबातच अपवाद नाही. अर्थात् फिल्म चांगली की विद्युत संवेदक, हा वाद आधीच्या लेखावरील चर्चेत आलेला आहेच. त्यामुळे इथे आपण त्याच वादाचा पुढील भाग पाहू. तो म्हणजे जुन्या फिल्म एस्एल्आर साठीच्या उत्तमोत्तम लेन्सेस आणि आत्ताच्या आधुनिक अशा डिजिटल एस्एल्आर साठीच खास बनवलेल्या लेन्सेस मधील फरक. असा काही फरक आहे काय? हो, आहे. डिजिटल लेन्सेस ह्या फिल्म लेन्सेसपेक्षा बर्‍याचदा सरस मानल्या जातात. कारण डिजिटल लेन्सेसमध्ये खालील काही क्षमता असाव्या लागतात, ज्या फिल्मसाठी तितक्या आवश्यक नसायच्या -

     १. प्रकाशशलाकेचा मार्ग अधिकाधिक सरळ करणे

LensLightPath

(मूळ प्रतिमा Olympus America वरून साभार)

आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे फिल्मपेक्षा संवेदकावरील प्रतिमासंवेदक कूप आणि त्यांच्यावरील सूक्ष्मभिंगे (मायक्रोलेन्सेस) यांच्यामुळे संवेदकावर पडणारा प्रकाश फिल्मच्या तुलनेत जास्तीत जास्त लंबरूप असावा लागतो. कारण जर प्रकाशकिरण सरळ न पडता तिरपी पडत असतील तर ती शेजारील प्रकाशकूपांवर परावर्तित होऊन ब्लूमिंग, अलियासिंग, विनेटिंग आणि लाइट फॉल्ऑफ् सारख्या नको असलेल्या प्रतिमाभ्रंशांना आमंत्रण देतील.

फिल्म लेन्सेसमधून अपवर्तित होणारा प्रकाश हा लेन्सच्या मध्यभागी तसा लंबरूपच असतो. पण लेन्सच्या कोपर्‍यांतून तो बराचसा तिरपा होतो. फिल्मवरील सिल्वर हॅलाइड स्फटिकांना त्यामुळे तितकासा फरक पडत नाही. पण इलेक्ट्रॉनिक संवेदकासाठी मात्र अशी लेन्स प्रतिमेच्या दर्जाच्या दृष्टीने कुचकामी ठरू शकते. त्यामुळे डीएस्एल्आरसाठी खास बनवलेल्या आधुनिक लेन्सेस प्रकाशाचे अपवर्तन केवळ मध्यभागीच पूर्ण लंबरूप न करता लेन्सच्या पूर्ण परिघावर जास्तीत जास्त लंबरूप होईल अशा असतात. त्यासाठी ह्या लेन्सेसमधील भिंगे असमान घनतेच्या खास काचेपासून बनवलेली असतात.

     २. जास्त पृथक्करण क्षमता

LensResolvingPowerComparison

पृथक्करण क्षमतेतील फरक

डिजिटल लेन्सेसची पृथक्करण क्षमता ही त्यांच्या कॅमेर्‍याच्या संवेदकाच्या पृथक्करण क्षमतेच्या किमान दुप्पट असावी लागते. कारण डीएस्एल्आर च्या संवेदकावर एक अ‍ॅन्टि-अ‍ॅलियासिंग फिल्टर बसवलेला असतो. या फिल्टरचे कार्य हे भासमानता कमी करणे आणि रंग अचूकता वाढवणे हे असते. ह्या फिल्टरमुळे प्रतिमा किंचित धूसर येते. त्यामुळे प्रतिमेचे डिजिटायझेशन म्हणजे प्रोसेसिंग करताना एक शार्पनिंग अल्गोरिदम कार्यान्वित होतो. फिल्मसाठी अशा अल्गोरिदमची गरज नसल्याने फिल्म एस्एल्आर लेन्सेसना तेवढ्या पृथक्करण क्षमतेची गरज भासत नाही. अर्थात् यात एमटीएफ कर्व्ह आणि नायक्वेस्ट फ्रिक्वेन्सीसारख्या अजूनही कित्येक बाबी येतात.

     ३. वर्णविक्षेप (Chromatic Aberration) व दृष्टिवैषम्य (Astigmatic Aberration) कमी असणे

ChromaticAbberation

वर्णविक्षेप

Astigmatism

दृष्टिवैषम्य

फिल्मचा प्रकाशसंवेदी पृष्ठभाग हा अगदी एकसमान नसतो. त्यामुळे लेन्समधून संकेंद्रित होणारा प्रकाश अगदी अचूक एकाच बिंदूत केंद्रित व्हावा अशी गरज नसते. किंचित इकडे-तिकडे चालू शकते. मात्र विद्युत संवेदकांचा पृष्ठभाग त्यामानाने अतिशय एकसमान व एका पातळीत असतो आणि हवा व संवेदी माध्यम यांच्यातील हे प्रतल आता इतके अरूंद झालेले असते की फिल्म लेन्सेस डिजिटल लेन्सेसच्या तुलनेत तितकी उच्च दर्जाची प्रतिमा अशा संवेदकांवर देऊ शकत नाहीत.

नॉन-सीपीयू लेन्स

non_cpu_lens

सीपीयू लेन्स

cpu_lens

(मूळ प्रतिमा Nikkon Asia वरून साभार)

डिजिटल युगातील लेन्सेसच्या मर्यादा

          

जेव्हा तुमची ५० मिमी लेन्स ५० मिमी नसते, तेव्हा...

     सहगुणक किंवा क्रॉप फॅक्टर

एस्एल्आर फिल्म लेन्सेस ह्या एकाच आकाराच्या संवेदक पृष्ठभागासाठी बनवलेल्या असत (३५ मिमी फॉरमॅट). पण डीएस्एल्आर कॅमेर्‍यांच्या संवेदकांचे आकार आपण आधी पाहिल्याप्रमाणे निरनिराळे असू शकतात. त्यामुळे ३५ मिमी फॉरमॅटवर ५० मिमी चे परिणामी नाभीय अंतर देणारी ५० मिमी अभिधानित नाभीय अंतराची लेन्स ही APC-C फॉरमॅटवर ७५ मिमीचे परिणामी नाभीय अंतर देते. ह्यालाच क्रॉप फॅक्टर म्हणतात. फुल फ्रेमपेक्षा कमी आकाराचा संवेदक वापरण्याचे फायदे हे टेलिफोटो आणि एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्स वापरणार्‍यांना होतात. उदा. ६०० मिमी ची लेन्स डी५१०० वर वापरल्यास तिचे परिणामी नाभीय अंतर ६०० x १.५ = ९०० मिमी एवढे दणक्यात वाढते. पण वाईड अ‍ॅन्गल वापरणार्‍यांना मात्र फुलफ्रेम एवढा रूंद कोन मिळत नाही. उदा. २८ मिमी ची वाईड अ‍ॅन्गल लेन्स ही क्रॉप सेन्सर वर दीडपटीने जास्त नाभीय अंतर देते. नाभीय अंतर हे दृश्य कोनाच्या व्यस्त परिमाणात असते. नाभीय अंतर वाढले की दृश्य कोन कमी होतो. म्हणून डीएस्एल्आर वापरणार्‍यांना लेन्सवर लिहिलेल्या लेन्सच्या अभिधानित नाभीय अंतरावर अवलंबून राहून चालत नाही. त्यामागची डीएस्एल्आर बॉडी कोणती आहे हे पण पहावे लागते.

     चित्रणकक्षा किंवा डेफ्थ ऑफ् फिल्ड

चित्रणकक्षा ही इतर अनेक बाबींबरोबरच लेन्सच्या अभिधानित नाभीय अंतरावरही अवलंबून असते. आणि ती कुठला संवेदक वापरलाय यावर अवलंबून नसते. म्हणजेच ५० मिमी लेन्स फुलफ्रेम बॉडीवर जर एक ठराविक चित्रणकक्षा देत असेल, तर क्रॉप सेन्सर बॉडीवरसुद्धा ती लेन्स तेवढीच चित्रणकक्षा देईल - जरी क्रॉप फॅक्टरमुळे तिचे परिणामी नाभीय अंतर दीडपटीने वाढून ७५ मिमी झाले असले, तरी. याचाच अर्थ असा, की छायाचित्रकाराला जर जास्तीत जास्त रचनात्मक नियंत्रण हवे असेल (म्हणजेच कमीत कमी चित्रणकक्षा) तर केवळ परिणामी नाभीय अंतराचा विचार करून चालणार नाही. तिथे फुलफ्रेम बॉडीच आणि त्याच नाभीय अंतराची लेन्स वापरावी लागेल.

नाभीय अंतरानुसार लेन्सेसचे प्रकार

          

वेगवेगळ्या लेन्सेसमध्ये फरक करणारी सर्वात मोठी आणि समजायला सर्वात सोपी बाब म्हणजेच त्या लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर. ज्यांना डीएस्एल्आरची तितकी माहिती नसते त्यांच्यासाठी लेन्स ही झूमच्या पटीत असते, उदा. ३x, ४x, १२x, ५०x इ. डीएस्एल्आर वापरायला लागलेल्यांसाठी लेन्सवर लिहिलेले अभिधानित नाभीय अंतर हे त्या लेन्सची ओळख सांगते. उदा. १४ मिमी, ५० मिमी, ४०० मिमी, ८०० मिमी, इ. आणि ह्या क्षेत्रातील प्रो साठी लेन्स म्हणजे तिचा दृश्य कोन (अ‍ॅन्गल ऑफ् व्ह्यू) असतो.

खालील वर्गीकरण फुलफ्रेम संवेदकाच्या सापेक्ष केलेले आहे.

     फिश आय लेन्स
साधारणपणे ७ मिमी ते १८ मिमी. अशा लेन्सेसना फिश आय म्हटलं जातं कारण त्यांच्यामधून दिसणारी प्रतिमा ही बाहेरच्या सर्व बाजूंनी फाकलेली दिसते. सरळ रेषा वक्राकार दिसते. फिश आय लेन्सेस ह्या १८० अंशांपेक्षा जास्त दृश्यकोनातून प्रतिमा टिपू शकतात.
     अल्ट्रा-वाईड अ‍ॅन्गल लेन्स
१४ मिमी ते २४ मिमी अभिधानित नाभीय अंतर असणार्‍या लेन्सेस. ८० ते ११५ अंशांमधून प्रतिमा घेतात. जवळील वस्तू जास्त मोठ्या व दूरच्या वस्तू जास्त लहान दिसतात. वस्तू आणि वस्तूमागील पार्श्वभूमीतील अंतर प्रत्यक्षातील अंतरापेक्षा जास्त वाटते. त्यामुळे पोर्ट्रेटसाठी अनुपयोगी.
     वाईड अ‍ॅन्गल लेन्स
२४ ते ३८ मिमीचे नाभीय अंतर. नॉर्मल लेन्सपेक्षा जास्त दृश्यकोन (५५ ते ८० अंश)
     नॉर्मल लेन्स
४५ ते ५५ मिमी च्या लेन्सेसना नॉर्मल लेन्स म्हटले जाते कारण त्यांचा दृश्यकोन हा मानवी डोळ्याच्या दृश्यकोनाच्या जवळजवळ सारखाच असतो. (साधारणतः ४५ अंश). अशा लेन्सेस बनवायलासुद्धा कमी गुंतागुंतीच्या आणि वजनाने व किंमतीने हलक्या असतात. असे म्हणतात की हेन्री कार्टिए-ब्रेसन् ह्या महान छायापत्रकाराने त्याच्या आख्या करिअरमध्ये फक्त नॉर्मल लेन्सच वापरली.
     पोर्ट्रेट लेन्स
६५ ते १०५ मिमी अंतरामधील लेन्सेसना पोर्ट्रेट लेन्स म्हटले जाते. हे़ड-आणि-शोल्डर, म्हणजेच क्लोज्अप व्यक्तिचित्रे घ्यायला हे नाभीय अंतर आदर्श समजले जाते कारण प्रतिमाभ्रंशाचे कमी प्रमाण आणि अंतराचे सुयोग्य अंकन. व्यक्तीचे नाक मोठे व कान छोटे किंवा व्यक्ती आणि पार्श्वभूमीमध्ये काही अंतरच न दिसणे हे दोन्ही दोष या नाभीय अंतरास समायोजित होतात. दृश्यकोन सुमारे २३ ते २८ अंश.
     मीडिअम टेलिफोटो लेन्स
१३५ ते २०० मिमी या आवाक्यातील लेन्सेसना मीडिअम टेलिफोटो लेन्सेस म्हटले जाते. काही प्रकारच्या खेळांच्या छायाचित्रणासाठी या लेन्सेसचा वापर केला जातो. तसेच ७०-२०० मिमी सारख्या लेन्सेस ह्या फॅशन फोटोग्राफर्समध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
     एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्स
३०० मिमी पासून ह्या लेन्सेस पुढे कितीही असू शकतात. अतिशय निरूंद असा दृश्यकोन व त्यामुळे मिळणारे लांबवरचे दृश्य. ४०० मिमी लेन्स ही आकाराने मोठ्या अशा सस्तन प्राण्यांची छायाचित्रे काढण्यास, तर ६०० ते ८०० मिमी लेन्स ही पक्ष्यांच्या चित्रीकरणासाठी आवश्यक आहे.
     प्राइम लेन्स आणि झूम लेन्स
प्राइम लेन्स किंवा प्राइम फोकल लेन्ग्थ लेन्स ही एकाच नाभीय अंतरासाठी बनवलेली असते. तर झूम लेन्समध्ये एकाच लेन्समध्ये वेगवेगळ्या नाभीय अंतराची छायाचित्रे घेणे शक्य होते. उदा. ५० मिमी ही प्राइम फोकल लेन्ग्थ लेन्स असून १८-५५ मिमी ही झूम लेन्स आहे.

उपयोगानुसार लेन्सेसचे प्रकार (Special Purpose Lenses)

          

     मॅक्रो
मॅक्रो लेन्सेस ह्या नावाप्रमाणेच अतिशय लहान वस्तूंची मोठी छायाचित्रे घेण्यासाठी खास बनवलेल्या असतात. अर्थात्, क्लोज्अप व मॅक्रो फोटोग्राफीमध्ये थोडासा फरक आहे. क्लोज्अप फोटोग्राफीमध्ये प्रतिमा-विशालन (इमेज मॅग्निफिकेशन) हे १:१ पेक्षा जास्त (१:२, १:३, इ.) असते, तर मॅक्रो फोटोग्राफीमध्ये प्रतिमेची वस्तूसापेक्ष अचूकता महत्त्वाची असते. ट्रू मॅक्रो नेहमी अचूक १:१ विशालन दाखवते. याचाच अर्थ एक सेंमी व्यास असलेले नाणे जर अशा लेन्सने टिपले तर त्या नाण्याची संवेदकावर पडणारी प्रतिमासुद्धा एक सेंमी व्यासाचीच असेल. त्याचबरोबर मॅक्रो लेन्सेसना पुढील एलिमेंटच्या अगदी एक इंचापेक्षा कमी अंतरावरील वस्तू टिपण्याची क्षमता असावी लागत असल्याने त्या अनुषंगाने येणारे इतर प्रतिमाभ्रंश, उदा. विपर्यासभ्रंश (Distortion) तसेच वर्णविक्षेप इ. दोष जवळजवळ येत नाहीत.

उदा. AF-S VR Micro-NIKKOR 105mm f/2.8G IF-ED

     पर्स्पेक्टिव कन्ट्रोल
आपल्यापैकी कितीतरी जणांनी एखाद्या भव्य वास्तूचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. अशा छायाचित्रांमध्ये इमारतीच्या दोन्ही बाजू सरळ उभ्या व एकमेकींना समांतर न दिसता तिरप्या होत गेलेल्या आणि एकमेकींना एका अदृश्य बिंदूत छेदत असल्यासारख्या दिसतात. पर्स्पेक्टिव कन्ट्रोल किंवा टिल्ट-अ‍ॅण्ड-शिफ्ट लेन्सेस ह्या खास आर्किटेक्चरल फोटोग्राफीसाठी बनवल्या गेल्या आहेत.

35 mm f/3.5 PC-Nikkor lens

35mmPC500

(मूळ प्रतिमा विकीपिडियावरून साभार)

     मिरर लेन्सेस Catadioptric
अशा प्रकारच्या लेन्सेसमध्ये प्रकाशाचे अपवर्तन न करता अंतर्वक्र आरशांच्या सहाय्याने प्रकाश परावर्तित करून एका जागी केंद्रित केला जातो. अशा लेन्सेस शक्यतो एक्स्ट्रीम टेलिफोटोमध्ये येतात. ह्या लेन्सेसचा बोके अतिशय वेगळा येतो आणि त्यामधील धूसर वर्तुळांच्या मध्यभागी अजून एक वर्तुळ दिसते.

इतर काही प्रकार

          
     प्रतिमा स्थिरीकरण असलेल्या लेन्सेस
नावाप्रमाणेच लेन्सेसमध्येच प्रतिमा स्थिरीकरण यंत्रणा असते. कॅननच्या सर्व EF आणि EF-S लेन्सेसमध्ये ही यंत्रणा (IS) असते. निकॉनच्या सर्व लेन्सेसमध्ये त्यांची VR यंत्रणा मात्र नाही. वेगवेगळ्या उत्पादकांच्या लेन्सेस वेगवेगळ्या सांकेतिक नामावली मिरवतात. उदा. कॅनन - IS, निकॉन - VR, ऑलिंपस - OS, इ.

     ब्रॅण्डेड आणि जेनेरिक लेन्सेस
टोकिना, टॅमेरॉन, सिग्मा, कार्ल-झाइस् सारख्या काही कंपन्या इतर उत्पादकांच्या कॅमेरा बॉडींसाठी लेन्सेस बनवतात. त्यांना जेनेरिक लेन्सेस म्हटले जाते. निकॉन, कॅनन, लाइका, सोनी वगैरे उत्पादक स्वतः कॅमेर्‍यांबरोबरच लेन्सेससुद्धा बनवतात. अशा लेन्सेस ब्रॅण्डेड समजल्या जातात.

     सीपीयू आणि मॅन्युअल लेन्सेस
ज्या लेन्सेसच्या मागील बाजूवर (माउंटवर) सीपीयू स्पर्शबिंदू नसतात त्यांना मॅन्युअल लेन्सेस म्हणतात. अशा लेन्सेस नाभीय अंतर किंवा मीटरिंगसाठी आवश्यक असणारी एक्स्पोजर माहिती कॅमेरा बॉडीकडे पाठवू शकत नाहीत. सीपीयू लेन्सेसमुळे वेगवेगळे ऑटो मोड वापरणे शक्य होते. मॅन्युअल लेन्सेसचा आणखी एक तो़टा म्हणजे टीटीएल प्रकारचा फ्लॅश स्ट्रोब वापरणे अशा लेन्सेसवर शक्य होत नाही.

     पार्श्वसंकेंद्रीकरण (Retrofocussing) आणि पृष्ठसंकेंद्रीकरण (Front Focussing) लेन्सेस
कधीकधी वाइड-अ‍ॅन्गल लेन्सचे सर्वात मागचे भिंग हे कॅमेर्‍याच्या आतील आरशापेक्षाही मागे जाऊ शकते. हे टाळण्यासाठी अशा लेन्सेसची प्रत्यक्षातील लांबी ही लेन्सवर नोंदवलेल्या लांबीपेक्षा जास्त ठेवली जाते. शिवाय त्यामुळे लेन्सच्या आतील प्रकाशशलाकेच्या मार्गाचे नियंत्रण करणेही सोपे जाते.

त्याचप्रमाणे एक्स्ट्रीम टेलिफोटो लेन्सची लांबी तिच्या नाभीय अंतराएवढीच ठेवली तर ती लेन्स इतकी लांबलचक, अवाढव्य आणि अवजड होईल की ती वापरणे कटकटीचे वाटू शकेल. यासाठी अशा लेन्सची लांबी तिच्या नाभीय अंतरापेक्षा कमी ठेवली जाते.

जेव्हा एखादी वाइड-अ‍ॅन्गल लेन्स ही तिच्या अभिधानित नाभीय अंतरापेक्षा जास्त लांब असते तेव्हा तिला पार्श्वसंकेंद्रीकरण लेन्स म्हटले जाते. उदा. १४ मिमी लेन्सची प्रत्यक्षातील लांबी १४ मिमीपेक्षा जास्त असणे. जेव्हा एखादी टेलिफोटो लेन्स तिच्या अभिधानित नाभीय अंतरापेक्षा लांबीने आखूड असते तेव्हा तिला पृष्ठसंकेंद्रीकरण लेन्स म्हटले जाते. उदा. ६०० मिमीची लेन्स प्रत्यक्षात साठ सेंमीपेक्षा लांबीने कमी असणे.

जाताजाता - वेगवेगळ्या नाभीय अंतरावर प्रतिमा कशी दिसेल हे तुम्ही इथे पडताळून पाहू शकता.

निकॉन लेन्स सिम्युलेटर

क्रमशः

प्रतिक्रिया

उत्तम माहिती, वाचन खुण करुन ठेवतो. :)

प्रचेतस's picture

30 Jun 2013 - 9:06 pm | प्रचेतस

अतिशय उत्तम माहिती.
तांत्रिक विषय असूनही सोप्या भाषेत समजावून सांगितल्यामुळे किचकट वाटत नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Jul 2013 - 12:56 am | लॉरी टांगटूंगकर

यैच बोलता!!! लै भारी माहिती देताय.

चौकटराजा's picture

1 Jul 2013 - 9:45 am | चौकटराजा

No camera is better than it's lens . हे वाक्य फार वर्षापूर्वी वाचलेले आठवतेय. स्वतः फोटोग्राफी करताना विपर्यास भ्रम एक रंग प्राबल्य यांचा अनुभव घेतला आहे.अजूनही एकही फोटो असा आला नाही ज्यात बरोबर डोळ्याने पहिलेला पांढरा व काळा रंग फोटोत ९० टक्के तरी आलेला आहे. अतिरंजित फोटो मस्त वाटत असले तरी ते कलाकारीचे समाधान देत नाहीत.अगदी बेस्ट व्हाईट बॅलन्स साठी प्रयत्न चालू आहेत.न्रिरनिराळ्या निकषावर भिंगांचे वर्गीकरण केल्याने माहिती उदबोधक झाली आहे. पुढे मागे फोटोतील मानव निर्मित दोष उदा. कंपोझिशन, प्रकाशाच्या चुकीच्या दिशेने फोटो काढणे ई बरोबरच आपल्या कॅमेर्‍याची नीट माहिती नसल्याने वा कॅमेर्‍याच्या मर्यादांमुळे येणारे दोष यावर एक धागा जरूर व्हावा ही नम्र विनंति !

एस's picture

2 Jul 2013 - 12:35 am | एस

अजूनही एकही फोटो असा आला नाही ज्यात बरोबर डोळ्याने पहिलेला पांढरा व काळा रंग फोटोत ९० टक्के तरी आलेला आहे. अतिरंजित फोटो मस्त वाटत असले तरी ते कलाकारीचे समाधान देत नाहीत.अगदी बेस्ट व्हाईट बॅलन्स साठी प्रयत्न चालू आहेत.

याबाबत मानवी डोळा आणि कॅमेरा यामधील फरक मी छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना या भागात स्पष्ट केला होता. व्हाइट बॅलन्सवर त्याचा काय फरक पडतो हे पाहूया. मानवी संवेदनांना (डोळ्याकडून मेंदूकडे पाठवले जाणारे संदेश आणि मेंदूची त्या संदेशांचा अर्थ लावण्याची क्षमता तसेच कार्यपद्धती) एखादे दृश्य कसे दिसेल हे त्यात सांगितल्याप्रमाणे संकेंद्रीकरण, प्रकाशसमायोजन, तपशील पाहण्याची क्षमता,रंग पाहण्याची क्षमता आणि दृश्य आकलन या बाबींवर अवलंबून असते. त्याचबरोबर एखादे कृत्रिम दृश्य हे ती प्रतिमा कुठल्या स्वरूपात आपल्यासमोर येते, उदा. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सीआरटी, एलसीडी, इ. तसेच किती अंतरावरून ती पाहिली जाते आणि कुठल्या प्रकाशात पाहिली जाते या अशा असंख्य बाबींवर त्या प्रतिमेची स्वीकारार्यता ठरते.

पांढरा व काळा रंग हे खरे तर रंग नसून वेगवेगळ्या तरंगलांबीच्या प्रकाशाचे मिश्रण आहेत. खरा पांढरा रंग किंवा खरा काळा रंग अस्तित्त्वात नसतात. (भौतिकशास्त्रातील अ‍ॅब्सोल्यूट व्हाइट होल आणि अ‍ॅब्सोल्यूट ब्लॅक होल जसे केवळ सैद्धांन्तिक रूपानेच असू शकतात, तसेच काहीसे इथेही आहे.) हे झाले या दोन रंगांबाबत. आता मानवी डोळ्यांची बरोबरी कुठलीही ऑप्टिकल सिस्टिम किंवा कॅमेरा, प्रिंट वगैरे करू शकत नाहीत हेही मी आधी स्पष्ट केले आहेच. कारण आपला मेंदू या दोन रंगांबाबत खोटे बोलत असतो. प्रकाशाचा अभाव म्हणजे तो काळा रंग मानून मोकळा होतो. पण कुठल्याही जागी किमान एकतरी फोटॉन असतोच असतो. आणि कॅमेर्‍याच्या संवेदकांमध्ये तथाकथित काळ्या रंगातील विविध सूक्ष्म रंगछटा नोंदवण्याची क्षमता असते. त्यामुळे पूर्ण काळा रंग संवेदकावर किंवा प्रिंट वा मॉनिटरसारख्या दृश्यमाध्यमातून सूचित करणे (ट्रूली डेपिक्ट ब्लॅक्स अ‍ॅज् ब्लॅक्स) हे शक्य नाही.

काळ्याचे असे, तर पांढर्‍याचे असे. आपल्या दृष्टीला पांढरा रंग म्हणजे हायलाइट्स जास्त पांढरा करून पहायची किंवा जाणवून घ्यायची सवय आहे. त्यामुळे समोर दिसणारे दृश्य आणि त्याचा त्याच वेळी काढलेला फोटो या दोघांमधील पांढरा रंग सेम-टू-सेम नाही हे आपल्याला लगेच जाणवते. आणि हो, जगातला कुठलाही इमेज प्रोसेसिंग अल्गोरिदम मेंदूची बरोबरी करू शकेल काय? ;)

अबाउट गेटिंग व्हाइट बॅलन्स राइट - तुमच्या कॅमेर्‍यात एक्स्पोजर लॉक चे बटन असेल तर - एक चांगला पांढरा कागद घ्या. फोटो काढताना हा कागद फ्रेममध्ये सब्जेक्टच्याच प्रतलात ठेवा आणि फोटो मीटर करा. एक्स्पोजर पहा. योग्य सेटिंग झाले की अर्धे शटर बटन रिलीज करून एक्स्पोजर लॉक करा व कागद काढून घ्या. आता फोटो काढा.

एक्स्पोजर लॉक नसेल तर पोस्ट प्रोसेसिंगमध्ये क्लोन करून कागद काढू शकता. किंवा रॉ मध्ये शूट करत असाल तर व्हाइट बॅलन्स नंतर समायोजित करू शकता.

कस्टम व्हाइट बॅलन्स सेट करून ठेवा. तोही वापरू शकता.

अर्थात हे सगळं तुम्हांला माहित असेलच. मी फक्त हा प्रतिसाद वाचणार्‍यांनाही उपयोगी पडेल म्हणून उद्धृत केले एवढेच. :)

पुढे मागे फोटोतील मानव निर्मित दोष उदा. कंपोझिशन, प्रकाशाच्या चुकीच्या दिशेने फोटो काढणे ई बरोबरच आपल्या कॅमेर्‍याची नीट माहिती नसल्याने वा कॅमेर्‍याच्या मर्यादांमुळे येणारे दोष यावर एक धागा जरूर व्हावा ही नम्र विनंति !

नक्कीच. धन्यवाद..

चौकटराजा's picture

2 Jul 2013 - 8:51 am | चौकटराजा

आपला डोळा आपल्याशी खोटं बोलतो ? च्या मायला या डोळ्याच्या ? मग जसं दिसतं तसा फोटो चा ह्ट्ट डिजिटल फटू त सोडून द्यावा म्हणतो. कृष्णा , या अर्जुनाचा संभ्रम दूर झाला. आता !! बाकी दोन प्रकाश शलाका जिथे एकमेकीना छेदतात तिथे छेदनबिंदू वर काळा रंग असतो म्हणे !! आता हा काळा रंग कसा टिपायचा बरं ???

एस's picture

3 Jul 2013 - 12:55 am | एस

दोन प्रकाश शलाका जिथे एकमेकीना छेदतात तिथे छेदनबिंदू वर काळा रंग असतो

आधी याची लिंक द्या.

नन्दादीप's picture

1 Jul 2013 - 12:13 pm | नन्दादीप

अतिशय उत्तम माहिती..... धन्यवाद.....

चिगो's picture

1 Jul 2013 - 2:06 pm | चिगो

माहितीपुर्ण लेख.. धन्यवाद मित्रा..

तात्पर्य, बाबांनो आणि बाबींनो, उगाच पैसे आहेत म्हणून डीएस्एल्आर् घेत बसू नका. हे एकापरीने व्यसनच आहे.

शंभर टक्के, मित्रा.. अनुभव घेतो आहे.. :-( :-) पोर्ट्रेट फोटोजसाठी म्हणून निकॉर ५०mm 1.8D वर ५५०० रुपये आणि झुमलेन्ससाठी Tameron 70-300mm वर ७८०० रुपये मागच्या पंधरवाड्यात खर्च करुन झालेत. आता लेन्स वाढल्या, तर स्पेशल डिएसेलाअर बॅग पण घ्या.. पण ५०मीमी चा "बोके" जबराट येतो, यार..

एस's picture

1 Jul 2013 - 11:51 pm | एस

एक दिवस मी माझ्याकडच्या सगळ्या लेन्सेस व जवळपास सगळ्या अ‍ॅक्सेसरीज विकून टाकल्या. फक्त ५०मिमी ठेवली. आणि माझ्याकडे जेवढे आहे त्याने जे आणि जसे फोटो काढता येतील, मी फक्त तेवढेच काढत आहे. हो, मलापण एखादी एक्स्ट्रीम वाईड अ‍ॅन्गल घेऊन मस्त पैकी समुद्रकिनार्‍यावर स्टार ट्रेल काढायचे आहेत किंवा मोशन ब्लर चा वापर करून भोरगिरीच्या धबधब्यांची जादू टिपायची आहे, एक्स्ट्रीम टेलिफोटो घेऊन शिक्राची जोडी एखाद्या पारव्याची पारध करत असतानाचा क्षण टिपायचाय.. पण पाहू केव्हातरी. आधी ही एक लेन्स मास्टर करू देत. बाकीच्या आपोआप येतील.

बादवे, तुला आधीच सांगितलं होतं ५० मिमी घे म्हणून ;)

चिगो's picture

2 Jul 2013 - 12:23 pm | चिगो

बादवे, तुला आधीच सांगितलं होतं ५० मिमी घे म्हणून

म्हणूनच घेतली की मित्रा.. आणि १.८ डी असल्याने ऑटो-फोकस नाहीये. मग आता मॅनुअल फोकसिंग शिकायलाच लागतेय. हात आणि डोळा स्थिर ठेवायला जमायला हवं आता, बाबा.. ;-)

तपशीलवार माहितीबद्दल धन्यवाद.

एस's picture

2 Jul 2013 - 12:40 am | एस

धन्यवाद मदनबाण, वल्ली, चौकटराजा, नन्दादीप, चिगो आणि गणपा..

छान माहिती .आता मोबाईलच्या मुळे प्रत्येक जण फोटो काढत फिरतो आहे .कैमरावाल्यांना त्यामुळे आव्हान आहे .असे लेन्स आणि असे फोटो काढावे लागतात की जे फक्त तुमच्या डाएसेलआर कैमेऱ्यानेच शक्य आहे . दोन ते पंधरा फुटांतील फोटोंवर मोबाईलचे राज्य आहे असं मला वाटतं .लग्नसमारंभात दहाएक नातेवाईक तरी फोटो काढत असतांना बोलावलेला फोटोग्राफर खुर्चिवर तोल संभाळत उभा राहातांना फारच केविलवाणा दिसतो .शिवाय हे फोटो काही वेळांत नेटवर गेलेले असतात .२४ अथवा २८ मिमि आणि १३५ मिमि एफ २ ची चांगली लेन्स असावी .

मोहन's picture

8 Jul 2013 - 12:29 pm | मोहन

वा खू साठवण्यात आलेली आहे.

Dhananjay Borgaonkar's picture

8 Jul 2013 - 1:23 pm | Dhananjay Borgaonkar

साहेब..शेवटी घेतला मी पण डी.एसएलआर Canon 1100D १८-५५, ५५-२५० कोंम्बो लेन्स.
चांगली डील मिळाली.पण आता तुम्ही सांगताय तर प्राईम लेन्स पण घ्यावी लागणार. कितीहो तो खर्च :-o
तुमची लेखमाला माझ्यासारख्या नवोदितांसाठी पर्वणीच आहे. धन्यवाद.

दिपस्तंभ's picture

1 Oct 2013 - 9:18 pm | दिपस्तंभ

सर्व लेख आवडले... मलाही डिजीटल फोटोग्राफी बद्दल शिकायचे होतेच.. तुमच्या सारखा अनुभवी 'मास्तर'मिळाला. तुमचा एखादा ब्लोग किंवा वेबसाइट आहे का? जिथे पुर्विच काम पाह्ता येइल? बेसिक पासुन सुरवात केलीत याबद्दल धन्यवाद!!!

मी घेतलेल्या प्रतिमा मलाच अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्या इतरांना दाखवण्याचा धीर काही होत नाही. ;) तरी माझ्या संस्थळावर जरा बर्‍यापैकी गठ्ठा तयार झाला की जरूर दुवा चिकटवेन स्वाक्षरीत. :)

छायाचित्रणासंबंधी काही प्रश्न असतील जरूर इथे विचारा. सरळसरळ धाग्यावरच चर्चा झाल्याने त्यातील माहितीचा उपयोग इतरांना आणि विशेषतः वाचनमात्र किंवा मिपासदस्य नसणार्‍यांनाही होतो. तसेच इतरही जाणकार व्यक्ती आपल्या चर्चेत मोलाची भर टाकू शकतात.

निओ's picture

17 May 2015 - 3:04 pm | निओ

स्वॅप्स.....खुप चान्गली माहिती देत आहात.