छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्

एस's picture
एस in काथ्याकूट
27 Nov 2013 - 2:39 am
गाभा: 

याआधीचे लेख -
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्.छायाचित्रण
छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार
छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्‍यांची रचना
छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
छायाचित्रण भाग ५. अ‍ॅक्सेसरीज्

मॅक्रो आणि क्लोजअप् छायाचित्रणातील फरक...

मॅक्रोफोटोग्राफी किंवा फोटोमॅक्रोग्राफी किंवा नुसतेच मॅक्रोग्राफी हा बर्‍याच छायाचित्रकारांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. विशेषतः हाय-एण्ड पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरा किंवा एन्ट्री-लेवल डीएस्एल्आर घेतलेली मंडळी क्लोजअप छायाचित्रणाचा एकतरी प्रयत्न लगेचच करतातच असा अनुभव आहे. सुरुवात साधारणपणे फुलांचे फोटो घेऊन होते. मग बटर बटर बटरफ्लायच्या मागे बरीच धावाधाव केली जाते. पॉइंट-अ‍ॅण्ड-शूटवाल्यांना मॅक्रो मोडमुळे थोड्याफार प्रयत्नांत बर्‍यापैकी चांगले फोटो मिळायला सुरुवात होते. पण डीएस्एल्आरवाल्यांची गोची होते कारण १८-५५मिमीच्या किट लेन्सने अगदी छोट्या गोष्टींचे म्हणावे तेवढे विशालन मिळत नाही. इथपर्यंत थोडी क्लोजअप् छायाचित्रणाशी ओळख झालेली असते. नेटवर चार चांगले फोटो पाहून आपल्यालाही असे फोटो काढता यायला हवेत असे वाटू लागते. मग शोध सुरू होतो मॅक्रोचा. त्यासाठी लागणार्‍या उपकरणांचा आणि हळूहळू आपली छायाचित्रकार खरे मॅक्रो म्हणता येतील असे फोटो घेऊ लागलेली असते.

आपल्यापैकी खूपजणांचा मॅक्रो छायाचित्रणातील प्रवास थोड्याफार फरकाने असाच झालेला असतो. पण तरीही आपण ज्याला मॅक्रो समजत असतो त्या क्लोजअप् छायाचित्रणात आपण तिथेच फिरत असतो. खरा मॅक्रो काढण्यासाठी लागणारी साधने, द्यावा लागणारा वेळ आणि राखावा लागणारा संयम आणि यासगळ्यांच्या पलिकडे लागणारे छायाचित्रणाचे कौशल्य हे अजून आपल्याकडे नसते आणि आपणही याबाबतीत काहीसे अनभिज्ञच असतो.

मुळात क्लोजअप् म्हणजे मॅक्रो नव्हे. मॅक्रोग्राफी आणि मायक्रोग्राफी हे क्लोजअप् छायाचित्रणाचे उपप्रकार आहेत असे फारफारतर म्हणता येईल. पण क्लोजअप् छायाचित्रण ही बरीचशी ढोबळ संज्ञा आहे असे आपण म्हणू शकू. तसं पाहिलं तर मॅक्रो काढण्याच्या तंत्रांपैकी एक तंत्र क्लोजअप् छायाचित्रण आहे. पण खरं मॅक्रो हे विषयवस्तूच्या जास्त जवळ न जाता काढले जातात. हे समजायला थोडे गोंधळाचे वाटू शकेल, पण पुढे हळूहळू हा फरक उलगडत नेऊ यात.

मॅक्रो छायाचित्रणाची व्याख्या...

मॅक्रो छायाचित्रण म्हणजे ज्यात वस्तूचा मूळ आकार आणि त्या वस्तूच्या कॅमेर्‍याच्या संवेदकावर पडणार्‍या प्रतिमेचा आकार यांतील गुणोत्तर हे १:१ असे असते असे छायाचित्रण.

हे समजण्यासाठी एक फूटपट्टी घ्या. कॅमेर्‍याला व्यवस्थित लंबरूप ठेऊन म्हणजे फूटपट्टी संवेदकाच्या प्रतलाला समांतर राहीन अशा पद्धतीने ठेवा. जास्तीत जास्त अ‍ॅपर्चर ठेवा. लेन्सच्या किमान संकेंद्रिकरण अंतरावर (मिनिमन फोकसिंग डिस्टन्स) फूटपट्टी राहील अशा पद्धतीने प्रतिमा घ्या आणि किती इंच किंवा सेंमीचा भाग प्रतिमेत दिसत आहे तेवढे अंतर म्हणजे प्रतिमेची उंची. आता या प्रतिमेच्या उंचीने २४ला भागा म्हणजे तुम्हांला तुमच्या लेन्सचे ३५मिमी-च्या प्रमाणातील रिप्रॉडक्शन रेशो मिळेल.

      (३५मिमी इक्विवॅलन्ट रिप्रॉडक्शन रेशो) = २४ / (प्रतिमेची मिमीमधील उंची)

तुमचा कॅमेरा फुल-फ्रेम म्हणजे ३५मिमी X २४मिमी नसेल, उदा. DX किंवा APS-C, APS-H, Micro-Fourthirds, तर तुमच्या कॅमेर्‍याच्या क्रॉप फॅक्टरने वर मिळालेल्या ३५मिमी-सम प्रमाणाला भागा म्हणजे तुमच्या लेन्सचा परिणामी म्हणजे इफेक्टीव रिप्रॉडक्शन रेशो तुम्हांला समजेल.

      (इफेक्टीव रिप्रॉडक्शन रेशो) = (३५मिमी इक्विवॅलन्ट रिप्रॉडक्शन रेशो) / (क्रॉप फॅक्टर)

वरील व्याख्येवरून समजले असेलच की मॅक्रो किंवा क्लोजअप् छायाचित्रणाला वस्तूच्या प्रतिमेने कॅमेर्‍याची फ्रेम भरून गेली पाहिजे. इथे मग लेन्सचा अभिधानित आणि परिणामी दृश्यकोन समजून घ्यावा लागतो. मागे एकदा क्रॉप फॅक्टर समजून घेताना आपण पाहिले होते की, लेन्सचे अभिधानित नाभीय अंतर छायाचित्रणाच्या कक्षेवर थेट परिणाम करत नाही. त्यासाठी महत्त्वाचा असतो लेन्सचा अभिधानित दृश्यकोन (डेजिग्नेटेड अ‍ॅन्गल ऑफ् व्ह्यू) आणि त्यावर संवेदकाच्या आकाराचा होणारा परिणाम (क्रॉप फॅक्टर). उदा. निकॉनच्या AF Nikkor 50mm f/1.8D लेन्सचा अभिधानित दृश्यकोन हा फुलफ्रेम संवेदकासाठी ४६° इतका आहे, तर तोच दृश्यकोन DX फॉरमॅटवर ३१°३०' इतका येतो. म्हणजे DX फॉरमॅटचा क्रॉप फॅक्टर हा ४६°/३१°३०'= १.५ आहे.

CropFactorIllustration
क्रॉप फॅक्टर आणि दृश्यकोन

आता वरील परिणामी दृश्यकोन किंवा फिल्ड-ऑफ्-व्ह्यू वापरून आणि त्या लेन्सचे किमान संकेंद्रिकरण अंतर वापरून एखाद्या वस्तूचे मॅक्रो छायाचित्रण करता येईल का याचा अंदाज बांधता येईल. वरील उदाहरणातील लेन्सचे किमान संकेंद्रिकरण अंतर हे दीड फूट किंवा ०.४५ मीटर म्हणजे ४५० मिमी इतके आहे. हे अंतर लेन्सच्या समोरील पृष्ठभागापासून मोजले जात नसते, तर ते कॅमेर्‍याच्या प्रतिमासंवेदकाच्या प्रतलापासून मोजले जाते. (वरील आकृती पहा.) म्हणजेच किमान संकेंद्रिकरण अंतरावर असलेली वस्तू जर परिणामी दृश्यकोनाच्या दोन्ही बाजूंना स्पर्श करत असेल, तर तिची प्रतिमा कॅमेर्‍याच्या प्रतिमासंवेदकावर संपूर्ण जागा मावेल. (इथे दृश्यकोन आडवा म्हणजेच संवेदकाच्या आयताकार आकाराच्या लांबीशी संबंधित गृहीत धरला आहे. त्याचप्रमाणे उभा दृश्यकोन वापरून कॅमेर्‍याच्या संवेदकावर मावण्यासाठीची किमान उंची ठरवता येईल.)

म्हणजेच या सगळ्या विवेचनाचा व्यवहारात उपयोग करायचा झाल्यास तुम्हांला काही गोष्टी माहीत असायला हव्यात - एक म्हणजे तुमच्या डीएस्एल्आर कॅमेर्‍याच्या संवेदकाचा आकार आणि क्रॉप फॅक्टर, दुसरे म्हणजे जी लेन्स वापरणार आहात तिचे किमान संकेंद्रिकरण अंतर आणि तिसरे ज्या वस्तूची प्रतिमा घेणार आहात तिची लांबीरूंदी. आपण वरील उदाहरणात जी लेन्स पाहिली तिचा रिप्रॉडक्शन रेशो ०.१५X इतका आहे, म्हणजे ही लेन्स थेट कॅमेर्‍यावर नेहमीप्रमाणे वापरून आपल्याला म्हणावे तसे मॅक्रो किंवा क्लोजअप् छायाचित्रण करता येणार नाही.

मॅक्रो छायाचित्रण म्हणजे अजूनही बरेच काही...

वर आपण पाहिले की, मॅक्रो म्हणजे किमान १:१ असे प्रतिमेच्या विशालनाचे गुणोत्तर. पण तेवढे म्हणजेच मॅक्रो नाही. मॅक्रोमध्ये ह्या विशालनाबरोबरच आणखीही कित्येक निकष येतात आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे अचूकता - इतर छायाचित्रणात जसे काही प्रमाणातील विविध प्रकारच्या प्रतिमाभ्रंशांचे अस्तित्त्व चालून जाते किंवा कधीकधी आर्टिस्टिक इफेक्ट म्हणूनही प्रतिमाभ्रंश मुद्दाम ठेवले जातात तसे मॅक्रोमध्ये अजिबात चालत नाही. इथे ब्लर किंवा धूसरपणा, विनेटींग किंवा लाइट फॉलऑफ्, बॅरल-पिनकुशन-मुस्टाश् डिस्टॉर्शन, कलररेंडिशन अचूक नसणं, ह्या गोष्टी टाळण्याला फार महत्त्व दिलं जातं. मॅक्रोग्राफीचा उदयच मुळात शास्त्रीय प्रयोगांच्या नोंदींमध्ये फोटोग्राफिक पुरावे जमा करण्याच्या उद्देशाने झाला असल्याने त्यात प्रत्यक्ष दिसणारे दृश्य आणि प्रतिमेत येणारे दृश्य यांमधील अचूकता अतिशय क्रिटिकल ठरते. त्यामुळेच मॅक्रोफोटोग्राफीची उपकरणे - विशेषतः लेन्सेस बनवणे आणि प्रत्यक्ष मॅक्रो छायाचित्रण करणे ह्या दोन्ही बाबी छायाचित्रणाच्या तंत्राची परिसीमा पाहणार्‍या मानल्या जातात.

ट्रू मॅक्रो लेन्सेस...

आपण मॅक्रो लेन्सेसचे जरी उदाहरण पाहिले तरी ह्या लेन्सेस जगातल्या सर्वोत्तम लेन्सेसपैकी आणि तितक्याच महागड्या लेन्सेसपैकी का आहेत हे लगेच समजेल. सर्वात आधी मॅक्रो लेन्सेसना अतिशय जवळ संकेंद्रिकरण करावे लागते - म्हणजे त्यांचे किमान कार्य करण्याचे अंतर (मिनिमम वर्किंग डिस्टन्स) हे खूप कमी असावे लागते. हीच एक फोटोऑप्टिक्सच्या दुनियेतील साध्य करायला अतिशय किचकट अशी तांत्रिक बाब आहे. दुसरे म्हणजे त्यांचे विशालन गुणोत्तर हे किमान १:१० पासून सुरुवात होऊन १:१ किंवा त्यापेक्षा अधिक असावे लागते. त्यातही प्रतिमासंवेदकाचा मोठा आकार ही बाब खूपच मोठा अडथळा बनते. (म्हणूनच मीडिअम किंवा लार्ज फॉरमॅट कॅमेर्‍यांचा व्यवहारामध्ये मॅक्रोसाठी फारसा उपयोग होत नाही. लार्ज फॉरमॅटचा तर नाहीच नाही.). आता खूप जवळ संकेंद्रिकरण आणि लाइफ-साइज विशालन ह्या एकमेकींच्या दृष्टीने भिन्न बाबींना एकत्र आणल्यानंतर पुन्हा त्यात कसलेही डिस्टॉर्शन नको. लेन्सचा शार्पनेस हा प्रतिमेच्या मध्यापासून ते प्रतिमेच्या कोना़ड्यांपर्यंत एकसमान आला पाहिजे. लेन्समधून येताना प्रकाशातील कुठलाही रंग हा किंचितही गाळला जाऊ नये म्हणजेच कलररेंडिशन अचूक असले पाहिजे (रंगअचूकता). मध्यभागी जास्त प्रकाश आणि कोना़ड्यांकडे येताना अंधुकपणा असे विनेटिंग नको. कलर फ्रिंजिंग नको. आणि ह्या सगळ्या सत्त्वपरीक्षा देऊनही पुन्हा लेन्स सुपरशार्प हवी. मग कुठे तिला मॅक्रो लेन्स म्हणायचे.

(निकॉन मायक्रो म्हणते कारण ते मायक्रोस्कोप व तत्सम मायक्रोग्राफिक उपकरणे खूप बनवतात आणि त्यांच्या मॅक्रो लेन्सेसचे तंत्रज्ञान तिथूनच आले आहे.)

लेन्सेसचे मूलभूत कार्य हे प्रकाशकिरणांना वाकवणे आणि फाकवणे हे असते. वरील अचूकतेची वैशिष्ट्ये लेन्समध्ये आणण्यासाठी ऑप्टिक्सच्या अभियंत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. भिंगांची वक्रता - Curvature, त्यांचे अंतर, नाभीय समानता - Focal Axis Alignment, भिंगांच्या काचेची एकसमान किंवा समानपणे परिवर्तित होत (बदलत) जाणारी घनता - Gradient Density, अस्फिअरिकल म्हणजेच गोल नसलेले भिंग, भिंगांवरील नॅनोक्रिस्टलचे थर अशा अनेक बाबी यात येतात आणि गणितीय प्रकाशभौतिकीतील - Mathematical Optics - काही सर्वात मोठी आव्हाने मॅक्रो लेन्सेस बनवताना त्यांना पार करावी लागतात. म्हणूनच अशा लेन्सेस अतिशय महागड्यासुद्धा असतात.

(नोंद - बाजारात फ्रंट एलिमेंटपासून जवळ संकेंद्रिकरण करू शकणार्‍या बर्‍याच लेन्सेसना सर्रास मॅक्रो असे अभिधानित केले जाते, पण ह्या लेन्सेस ट्रू मॅक्रो लेन्सेस नव्हेत. त्यांच्या लेन्सच्या मुख्य भागापासून पुढे केवळ लेन्स बॅरल वाढवून हे क्लोज फोकसिंग साधलेले असते. तेव्हा आपले पैसे अशा स्वस्त मॅक्रो लेन्सेसवर घालवू नयेत.)

MicroLensesNikkorLeicaSigma
काही मॅक्रो लेन्सेस

मॅक्रो व क्लोजअप् छायाचित्रणाची तंत्रे व साहित्य...

मॅक्रो किंवा क्लोजअप् छायाचित्रणातील काही तांत्रिक आव्हाने -

      १. लेन्सच्या पुढील भागाच्या अतिशय जवळ विषयवस्तू असेल तर तिच्यावर एकसमान प्रकाश टाकणे खूप कठीण होते.
      २. इतक्या जवळ बॅरल डिस्टॉर्शन बरेच ठळकपणे दिसून येत असल्याने त्रिमितीय वस्तूचा लेन्सच्या जवळील भाग जास्त मोठा तर मागील भाग जास्त लहान दिसतो. म्हणजेच पर्स्पेक्टीव बदलतो आणि अशी प्रतिमा नाही म्हटले तरी विचित्र दिसू लागते.
      ३. इतक्या जवळून घेतल्या जाणार्‍या प्रतिमेत डेप्थ ऑफ् फिल्ड अतिशय अरूंद येते. त्यामुळे अचूक संकेंद्रिकरण हाताने रिंग फिरवून साधणे कठीण जाते.

आणि जर तुम्ही लहान किडे किंवा तत्सम छोटेछोटे निसर्गमित्र तुमच्या कॅमेर्‍यात कैद करू पाहत असाल तर आपण त्यांच्या जवळ जाण्याला मर्यादा येतात हे तुम्हांला ठाऊक असेल. (नसेल, तर मधमाशीचा फोटू घेऊन बघा.;-)... )

सर्वसाधारणपणे मॅक्रो लेन्सेसचा वापर पुढील कारणांसाठी केला जातो -

      १. कागदपत्रांच्या प्रती बनवणे - विशेषतः पोस्टाची तिकिटे, दुर्मिळ पुस्तके इ.
      २. शास्त्रीय संशोधनासाठी लागणार्‍या वस्तू उदा. दुर्मिळ कीटक, फुलपाखरे, नाणी, न्यायवैद्यकशास्त्रातील काही पुरावे इ. गोष्टी त्यांच्या सापेक्ष प्रमाणासकट व रंगांसकट जतन करणे. इथे सापेक्ष प्रमाण कळावे यासाठी एक मोजपट्टी व रंगअचूकता दर्शवण्यासाठी एक रंगपट्टी सोबत ठेऊन प्रतिमा घेतली जाते.
      ३. खूप तीक्ष्ण किंवा शार्प डिटेल्स जतन करून ठेवण्यासाठी.

वस्तूच्या अंतरावरून व आकारावरून ठरवायचे लेन्सचे नाभीय अंतर -

      १. सपाट कागदपत्रे इ. च्या प्रतिमा घेण्यासाठी ४०-६० मिमी च्या मॅक्रो लेन्सेस उत्तम
      २. फुलांच्या प्रतिमा घेण्यासाठी १०० मिमी किंवा जास्त नाभीय अंतराच्या मॅक्रो लेन्सेस वापराव्यात
      ३. कीटक व फुलपाखरांच्या प्रतिमा घेण्यासाठी १८०-२०० मिमी नाभीय अंतर आवश्यक
      ४. दूरच्या विषयवस्तूंसाठी मॅक्रो लेन्सेसचा वापर तितकेसे चांगले परिणाम देत नाही असे काही छायाचित्रकारांचे मत आहे.

काही तंत्रे व पद्धती -

      १. लेन्सच्या पुढे मोठे भिंग (मॅ्ग्निफाइंग ग्लास) धरणे.
      २. मॅक्रो फिल्टर्स वापरणे. (हे म्हणजे फक्त असे भिंग लेन्सच्या पुढे त्याच्या रिंगचा वापर करून लावता येते. बाकी काही नाही.)
      ३. लेन्स आणि कॅमेरा यांच्यात एक्स्टेंशन ट्यूब वापरणे.
      ४. बेलोज वापरणे. (एक प्रकारची अडजेस्टेबल एक्स्टेंशन ट्यूब.)
      ५. रिवर्स लेन्स फोटोग्राफी - दोन लेन्स वापरून किंवा एक लेन्स आणि एक रिवर्सिंग रिंग वापरून.
      ६. ट्रू मॅक्रो लेन्स वापरणे.

MacroEquipments
Clockwise: बेलोज, क्लोजअप् फिल्टर, एक्स्टेन्शन ट्यूब आणि लेन्स रिवर्सिंग अ‍ॅडॅप्टर रिंग

ह्यापैकी आपण ट्रू मॅक्रो लेन्स आणि लेन्स रिवर्सिंग या दोन पद्धती पाहू.

  • ट्रू मॅक्रो लेन्स पद्धत
  • R1C1andOlympusMacroRingFlash
    क्लोजअप् फ्लॅश आणि रिंग फ्लॅश

    ट्रू मॅक्रो लेन्स वापरून केले जाणारे मॅक्रोग्राफीचे काम हे खरे मॅक्रो. व्यावसायिक छायाचित्रकार नेहमी ट्रू मॅक्रो लेन्स आणि त्यातही सिग्मा १८० किंवा लायका मॅक्रो एलमारिट किंवा निक्कॉर २०० मिमी अशा खूपच हायएण्ड ट्रू मॅक्रो लेन्सेस वापरण्याला प्राधान्य देतात. मॅक्रो लेन्ससोबतच लागणारी काही साधने म्हणजे लेन्स आणि विषयवस्तू यातील अतिशय छोट्या वर्कींग डिस्टन्समध्ये योग्य आणि पुरेशा प्रकाशासाठी खास मॅक्रोसाठी बनवलेले क्लोजअप फ्लॅश किंवा रिंग फ्लॅश वापरणे. आपल्याकडे महागडे रिंग फ्लॅश नसतील
    तरी बाजारात थर्ड पार्टी स्वस्तातले रिंग फ्लॅश मिळतात, तसेच एलईडी दिवे वापरून आपणही आपल्याला हवी तशी प्रकाशयंत्रणा बनवू शकता.

    मॅक्रो फ्लॅश सिस्टिममध्ये TTL म्हणजे थ्रू-द-लेन्स फ्लॅश मीटरिंग आणि फ्लॅश व्हॅल्यू कॉम्पेन्सेशन असणे केव्हाही चांगले. अ‍ॅम्बियंट लाइट म्हणजे उपलब्ध वा नैसर्गिक प्रकाश वापरून छायाचित्रण करायचे असल्यास तुम्ही परावर्तक वापरू शकता. फक्त सिल्वर किंवा गोल्ड रिफ्लेक्टर्स ऐवजी प्लेन व्हाइट रिफ्लेक्टर चांगले. म्हणजे व्हाइट बॅलन्सला ताप होत नाही. अर्थात तसे काही छायाचित्रणात इतर कुठल्याही कलेप्रमाणेच हार्ड अ‍ॅण्ड फास्ट असे काही नाही.

    त्याचबरोबर शक्यतो मॅक्रोचे काम ट्रायपॉड वापरून केले जात असल्याने पाय जास्तीत जास्त आडवे होऊ शकणारा ट्रायपॉड चांगला. असाच पण जास्त मोठा आणि स्टर्डी ट्रायपॉड पक्षीछायाचित्रणात वापरला जातो.

    मॅक्रोमध्ये निरूंद डेप्थ ऑफ् फिल्ड असल्याने संकेंद्रिकरण अचूक असावे लागते. त्यासाठी मॅन्युअल फोकसिंगवर जास्तीत जास्त भर दिला जातो आणि वर उल्लेखलेल्या मॅक्रो लेन्सेस एरवी ऑटोफोकसिंग खूप लवकर करू शकत नसल्या तरी त्यांचे मॅन्युअल फोकसिंग म्हणजे यासम हाच किंवा हीसम हीच असा मख्खन प्रकार असतो. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा.

    बॅकग्राउंड किंवा पार्श्वभूमीसाठी खास प्रॉडक्ट फोटोग्राफीसाठी मिळतात ते पडदे - शक्यतो शुभ्र किंवा कृष्णवर्णीय - प्रॉडक्टच्या रंगाप्रमाणे वापरावेत. फ्लॅश सिस्टीमसाठी योग्य अशी आधाराची यंत्रणा हवे तसे ट्रायपॉड वा गोरिलापॉड वापरून करावी. डॉक्युमेंटेशनचे काम असेल तर दोन्ही बाजूंनी सुमारे ४५° त फ्लॅश येतील आणि त्यांचा उजेड फ्रेमच्या सर्व बाजूंना सारखा पडेल अशा प्रकारे अडकवून ठेवावेत. मॅक्रो किती अचूक आणि चांगला आला आहे तसेच आपण केलेली सेटिंग बदलण्याची गरज आहे की नाही हे तिथल्यातिथे पडताळून पाहण्यासाठी लॅपटॉप असणे चांगले. (ही तत्त्वे प्रॉ़डक्ट आणि फॅशन फोटोग्राफीलाही लागू आहेत.)

    मॅक्रो छायाचित्रणात शटर रिलीज बटन हाताने कितीही हळू दाबले तरी कॅमेरा थोडातरी हलतोच. म्हणून एकतर केबल रिलीज वापरावी किंवा रिमोट वापरावा. दोन्ही पर्याय नसतील तर किमान डिलेयड शटर मोडचा वापर करावा ज्यात शटर दाबल्यानंतर दोन सेकंद वगैरे कालावधीनंतर एक्स्पोजर घेतले जाते. तेवढ्या वेळात कॅमेरा जरा स्थिर होतो. ह्या प्रकारे आपण अतिशय शार्प प्रतिमा घेऊ शकता.

  • लेन्स रिवर्सिंग पद्धत
  • यात दोन प्रकार येतात. एक म्हणजे कॅमेर्‍याला नेहमीची एक लेन्स लावायची आणि तिच्या समोरून दुसरी लेन्स उलट्या दिशेने लावायची जेणेकरून दुसर्‍या लेन्सचा फ्रण्ट एलिमेंट आणि कॅमेर्‍याच्या लेन्सचा फ्रण्ट एलिमेंट एकमेकांना चिकटतील. त्यासाठी एकतर कपलर लेन्स वापरावी किंवा काहीकाही तर अगदी दोन लेन्सेस एकमेकींना चिकटपट्टीने चिकटवूनही असे छायाचित्रण करतात.

    MacroPlusReversedLens
    दोन लेन्स वापरून मॅक्रो छायाचित्रण (डबल लेन्स रिवर्स मॅक्रो)

    दुसरी पद्धत म्हणजे लेन्स रिवर्सिंग रिंग किंवा रिवर्स लेन्स अ‍ॅडॉप्टर वापरून एकच लेन्स असतानाही रिवर्स लेन्स क्लोजअप् छायाचित्रण करता येते.

    RLMacro01
    रेट्रो लेन्स मॅक्रो उदाहरण (सिंगल लेन्स रिवर्स मॅक्रो)

    इथे डेप्थ ऑफ् फिल्ड इतकी कमी आहे की, ह्या छोट्याश्या पानाच्या काही जाड शिरादेखील आउट ऑफ् फोकस झाल्या आहेत.

    लेन्स रिवर्स करून केल्या जाणार्‍या छायाचित्रणात लेन्सचा माउंटकडील भाग उघडा पडत असल्याने त्याची काळजी घेणे केव्हाही आवश्यक.

    इथे दिलेल्या दुव्यावर तुम्हांला वरील दोन्ही प्रकारच्या लेन्स रिवर्सिंगची माहिती मिळेल. लेन्स रिवर्स करून वापरली असता कॅमेर्‍याला लेन्समधून मिळणारा विदा (डेटा) उदा. अ‍ॅपर्चर व्हॅल्यू रीडिंग मिळत नाही. त्यामुळे अशा लेन्सला अ‍ॅडॅप्टर रिंग असलेली चांगले. नाहीतर अ‍ॅपर्चर स्लॉटमध्ये काहीतरी अडथळा किंवा कागदाचा कपटा वगैरे घुसवून अ‍ॅपर्चर वाढवावे लागते. त्यावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे आणि जास्त डेप्थ ऑफ् फिल्ड मिळवण्यासाठी लेन्स स्टॉप-डाउन करून म्हणजे लहान अ‍ॅपर्चर वापरावे लागत असल्याने हवी तशी डेप्थ ऑफ् फिल्ड मिळवता येत नाही. त्यामुळे अशी लेन्स वापरायची असल्यास (निकॉनच्या परिभाषेत G-प्रकारची लेन्स) सिंगल लेन्स रिवर्स न करता दोन लेन्सेस वापराव्यात. रिवर्स केलेली लेन्स पूर्ण अ‍ॅपर्चर व्हॅल्यूला वापरावी आणि आपल्याला हवे तसे अ‍ॅपर्चर हे कॅमेर्‍याशी जोडलेल्या मुख्य लेन्सने नियंत्रित करावे.

    दुसरे म्हणजे जास्तीत जास्त विशालन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वाइड अ‍ॅन्गल लेन्स वापरावी. उदा. तुमच्याकडे जर किट लेन्स असेल तर अशी लेन्स रिवर्स करून वापरताना ती झूमरेंजच्या जास्तीत जास्त वाइड सेटिंगला म्हणजे १८मिमी ला ठेऊन पहा. ५५मिमीला मिळणारे विशालन आणि १८मिमीला मिळणारे विशालन यातील फरक बघा. आणि तुमच्याकडे एखादी वाइड अ‍ॅन्गल प्राइम लेन्स असेल तर मग प्रश्नच मिटला. अशी लेन्स रिवर्स करून अगदी ट्रू मॅक्रो प्राइम लेन्सच्या जोडीनेही वापरता येते आणि छान परिणाम साधता येतात.

    आणि आता आपण पाहूयात मिपावरचे आपले छायाचित्रकार अभिजा यांनी स्पेशल मॅक्रो लेन्सने टिपलेल्या काही सुंदर मॅक्रो प्रतिमा..

    20101122182013_toycat
    Flowers and the Sleeping Cat ©by Abhijit Dharmadhikari

    ही प्रतिमा सिग्मा १०५मिमी मॅक्रो लेन्स वापरून घेतली आहे.

    KamalaNehruPark
    Kamala Nehru Park ©by Abhijit Dharmadhikari

    ही प्रतिमा टॅमरॉन ९०मिमी मॅक्रो लेन्स वापरून घेतली आहे. संपूर्ण फुलपाखरू कसे इन-फोकस आले आहे ते पहा.

    अभिजा यांचे सुंदर प्रतिमादालन इथे पाहता येईल. आपल्या प्रतिमा या लेखात समाविष्ट करण्यास संमती दिल्याबद्दल अभिजा यांचे आभार.

    जाताजाता
    प्रश्न - "तुमची बायको जाड झालीय की नाही हे कसे ठरवावे?"
    उत्तर - "f/16 की f/22 वापरावे लागले यावरून"...;-)

    क्रमशः

प्रतिक्रिया

नानबा's picture

27 Nov 2013 - 9:23 am | नानबा

माझ्याकडे Kodak Z990 max हा Semi SLR Hyperzoom point & shoot कॅमेरा आहे. थोडा मंदबुद्धी आहे, पण मॅन्युअल मोडवर कमाल फोटो काढतो. त्यावर काही मॅक्रो ट्राय केले होते.

fg
कर्नाटकात कूर्गच्या जंगलात टिपलेला हा नाकतोडा.

dfh
घरात उपलब्ध असलेला फुकटचा मॉडेल बोका.

काय स्वॅप साहेबा , ? आपलं काय मत ?

एस's picture

27 Nov 2013 - 11:51 am | एस

मॅक्रो मोड ही कॅमेर्‍याची एक ऑटोसेटिंग आहे. त्यात लेन्सचा फ्रण्ट एलिमेंट मागे थोडा रिसेस करून किंवा तत्सम पद्धतीने लेन्स अतिशय जवळ संकेंद्रिकरण करू शकेल अशी व्यवस्था केली जाते (पॉइंट-अ‍ॅण्ड-शूट कॅमेरे). मग कॅमेरा स्वतः मीटरींग करून तुम्हांला एक्स्पोजरचे विविध कॉम्बिनेशनपण सुचवतो किंवा स्वतःच ठरवतो.

मॅक्रो फोटो म्हणजे काही विशिष्ट उद्देशाने घेतलेल्या प्रतिमा - यात बर्‍याचदा अतिशय लहान विषयवस्तूंच्या प्रतिमा घेतल्या जातात म्हणून तिथे क्लोजअप् छायाचित्रण येते. पण केवळ लहान वस्तूंच्याच नव्हे, तर महत्त्वाची कागदपत्रे, वस्तूसंग्रहालयातील दुर्मिळ चीजा इत्यादींचेही अभिलेख (रेकॉर्ड) नोंदवून ठेवण्यासाठी मॅक्रो पद्धतीचे छायाचित्रण केले जाते. थोडक्यात मॅक्रो म्हणजे फक्त एक्स्ट्रीम क्लोजअप् नाही.

सॅम मार्टिन यांनी घेतलेली ही Upper Cretaceous कालखंडातील शार्क माशाच्या दातांच्या जीवाश्मांची ही प्रतिमा पहा -

Upper Cretaceous shark teeth

अभिजा's picture

27 Nov 2013 - 12:44 pm | अभिजा

छान लेख आणि माहिती, स्वॅप्स!
धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2013 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा

वाचिंग...

पुढील लेखात वल्लीशेट यांना मागे कबूल केल्याप्रमाणे लेन्स फिल्टर या विषयावर काही माहिती आणि अनुभव पाहूयात. रच्याकने - या विषयावर मराठीत लिहिणे जाम तांत्रिक आणि कठीण काम आहे. त्याचप्रमाणे कच्चा माल गोळा करणे म्हणजेच तशा प्रतिमा घेणे याला बराच वेळ लागतो. तरी सर्व वाचकमित्रांचे आभार!

मालिका टू बी क्रमशः! कुणाला काही विषय सुचवायचे असतील ते अवश्य सुचवात.

प्रचेतस's picture

28 Nov 2013 - 10:31 pm | प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स.
फिल्टरवरील लेखाची वाट पाहात आहेच.

प्रचेतस's picture

28 Nov 2013 - 10:38 pm | प्रचेतस

उच्च दर्जाचा लेख.
सखोल माहिती दिली आहे.

मॅक्रो अथवा क्लोज अप फिल्टर्सनी प्रतिमेत कितपत फरक पडतो? हे फिल्टर्स अवघ्या ३०० ते ७०० रूपयात (+१, +२, +४, +२० असा ४ फिल्टर्सचा सेट) उपलब्ध होतात तर ट्रू मॅक्रो लेन्स प्रचंड महाग असते.

एस's picture

29 Nov 2013 - 5:43 pm | एस

मॅक्रो अथवा क्लोज अप फिल्टर्सनी प्रतिमेत कितपत फरक पडतो?

प्रचंड फरक पडतो. विशेषतः तुम्ही जर खरोखरच मॅक्रोग्राफीबद्दल गंभीरपणे विचार करत असाल तर ट्रू मॅक्रो लेन्स घेण्याला पर्याय नाही.

मॅक्रोसाठी क्रिटिकल मानले जाणारे खालील मुद्दे विचारात घ्या.

१. शार्पनेस
२. पर्स्पेक्टीव
३. कलर फ्रिंजिंग
४. डिस्टॉर्शन - बॅरल/पिनकुशन/कॉम्प्लेक्स
५. अस्टिग्मॅटिजम्

यासंदर्भात अधिक माहिती मी लेन्सेसवरील लेखात दिली आहे.

लेन्स अ‍ॅबरेशन हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे मोनोक्रोमॅटिक अ‍ॅबरेशन जे लेन्स एलिमेंट्सच्या आकारामुळे उद्भवतात आणि प्रकाशाचे जिथे अपवर्तन आणि परावर्तन होते तिथे ते निर्माण होतात. दुसरे म्हणजे क्रोमॅटिक अ‍ॅबरेशन जे लेन्स एलिमेंट्सच्या मटेरिअलमुळे म्हणजेच प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबीं (वेवलेन्ग्थ) साठी असणारे पदार्थाचे वेगवेगळे अपवर्तन सूचकांक (रिफ्रॅक्टीव इंडेक्स) यामुळे उद्भवतात.

ट्रू मॅक्रो लेन्सेस ह्या वर उल्लेखलेल्या सर्व प्रकारच्या लेन्स आर्टिफॅक्टना बर्‍याच प्रमाणात सुधारू शकतील अशा प्रकारच्या बनवलेल्या असतात. खालील प्रतिमा पहा. पहिली प्रतिमा ही तुम्ही उल्लेख केलेल्या स्वस्तातल्या मॅक्रो फिल्टरने घेतलेली आहे. तर दुसरी प्रतिमा ही मॅक्रो लेन्सने घेतली आहे.

MacroExamples_WithMacroFilters

MacroExamples_WithMacroLens

दोन्ही प्रतिमांमधील फरक कळावा यासाठी त्यांच्या १००% क्रॉपमधून कोपर्‍यांचा भाग इथे दर्शवला आहे. दोन्ही प्रतिमांमधील शार्पनेस पहा. कॉन्ट्रास्ट पहा. कलर फ्रिंजिंग पहा. पर्स्पेक्टिव पहा. मॅक्रो फिल्टर कितपत उपयोगी असतात ते इथे दिसून येईल.

ट्रू मॅक्रो लेन्स प्रचंड महाग असतात हे मात्र खरे. कारण वरील सर्व प्रतिमाभ्रंश नियंत्रित करायला अशा लेन्स बनवताना तंत्रज्ञानाचीही कसोटी लागते.

सविस्तार्र प्रतिसादाबद्दल आभार.

दोन्ही चित्रांमधला फरक पुरेसा बोलका आहेच.
पण ट्रू मेक्रो लेंस घेणे शक्यच नसेल तेव्हा निदान फ़ोकसिंग डिस्टन्स कमी करण्यासाठी ह्या फ़िल्टर्सने काम काही अंशी तरी भागून जावे.

झकासराव's picture

29 Nov 2013 - 6:46 pm | झकासराव

उच्च दर्जाची लेखमाला.
अधाशासारखी वाचतोय. :)

अर्धवटराव's picture

29 Nov 2013 - 7:44 pm | अर्धवटराव

खुप माहितीपूर्ण धागा.

मग त्यापेक्षा तुम्ही लेन्स रिवर्सिंग अ‍ॅडॅप्टर वापरून पहा. थर्ड पार्टी ५२मिमी लेन्स रिवर्सिंग रिंग eBay वर सुमारे १८०/- पासून उपलब्ध आहेत.

प्रचेतस's picture

29 Nov 2013 - 8:55 pm | प्रचेतस

हरकत नाही.
१८-५५ आणि ५५-२५० ह्या दोन लेन्स आहेत.

लेन्स रिवर्सिंग अ‍ॅडॅप्टरचे फायदे असे की तुमच्या मूळ लेन्सचा ऑप्टिकल परफॉर्मन्स अबाधित राहतो कारण ह्या अ‍ॅडॅप्टरचे स्वतःचे ऑप्टिकल एलिमेंट नसते. आणि तुमच्या १८-५५मिमी लेन्सला १८मिमीवर ठेऊन तुम्ही लेन्स रिवर्सिंग रिंग वापरून बर्‍यापैकी विशालन मिळवू शकाल.

अवांतर - वल्लीशेठ, तुम्ही ५० मिमी प्राइम लेन्स जरूर घ्या. तुम्हांला आव्हानात्मक प्रकाशव्यवस्थेत शिल्पांचे व मंदिरांचे जे फोटो काढावे लागतात त्यासाठी ती लेन्स f/1.8 मुळे अनबीटेबल ठरेल. शिवाय एकदम चीपस्केट आहे. त्याचबरोबर जर बाजारात मिळणारे रिफ्लेक्टर (शुभ्र रंगाचे - न्यूट्रल) वापरलेत तर अजूनही एक सॉफ्ट इफेक्ट येईल तुमच्या प्रतिमांमध्ये. विशेषतः दगडी शिल्पांच्या प्रतिमा घेताना त्यांच्यावर जो नैसर्गिक प्रकाश पडतो त्याचाच वापर शक्यतो करावा लागतो कारण पॉप-अप् फ्लॅशने छायाचित्रे एकदम फ्लॅट येतात. इथे टोन, टेक्श्चर आणि अतिशय कॉन्ट्रास्ट लाइटिंग मुळे मीटरिंगचा त्रास होतो. त्यामुळे परावर्तक पृष्ठभाग प्रकाश गरजेनुसार परावर्तित करणे आणि रोखून धरणे या दोन्ही गोष्टींसाठी वापरून तुम्ही असे छायाचित्रण छान प्रकारे करू शकाल.

प्रचेतस's picture

29 Nov 2013 - 9:45 pm | प्रचेतस

लेन्स रिवर्सिंग अ‍ॅडॅप्टर वापरून पाहीनच.

५० मिमी १.८ लेन्स तर लवकरच घेणार आहे. पण ती लेन्स कमी प्रकाशात हॅण्डहेल्ड फोटोग्राफी करताना वापरता येऊ शकते का? कारण तिच्यात इमेज स्टॅबिलायझर सुविधा नाही.

बाकी हे फोटोग्राफीसाठी असलेल्या रिफ्लेक्टर्सबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय.

एस's picture

30 Nov 2013 - 12:09 am | एस

५० मिमी १.८ लेन्स तर लवकरच घेणार आहे. पण ती लेन्स कमी प्रकाशात हॅण्डहेल्ड फोटोग्राफी करताना वापरता येऊ शकते का? कारण तिच्यात इमेज स्टॅबिलायझर सुविधा नाही.

f/1.8 असल्याने नक्कीच वापरता येऊ शकते. जास्त वाइड अ‍ॅपर्चर वापरता येण्याचा फायदा म्हणजे किमान शटर इंटर्वल (यालाच लोक चुकून शटर स्पीड असे म्हणतात जो प्रत्यक्षात कधीच बदलत नाही..) वापरू शकतो. रूल ऑफ् थंबनुसार साधारणपणे लेन्सच्या नाभीय अंतराच्या व्यस्त प्रमाणापेक्षा जास्त शटर इंटर्वल वापरू नये उदा. ५० मिमी लेन्ससाठी १/५० एवढे शटर इंटर्वल ठीक आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे १/४० किंवा १/३० वगैरे स्लो शटर इंटर्वल वापरल्यास प्रतिमा धूसर यायची शक्यता वाढते. मी या लेन्सने १/२० - १/१५ पर्यंतही हॅण्डहेल्ड शूट केले आहे. ही सरावाने जमणारी बाब आहे. VR मुळे एक-दोन स्टॉपचा फायदा होतोच पण ५० मिमी किंवा त्यापेक्षा वाइड शूट करताना VR आणि ऑटोफोकसिंग नसले तरी कौशल्याने काही फारसे अडत नाही. वाचलेले पैसे तुम्ही चांगल्या ट्रायपॉड किंवा मोनोपॉ़डवर घालवू शकता.

तुमच्याकडे निकॉन असावा असा अंदाज बांधतो आहे. निकॉनच्या ५० मिमी मध्ये दोन लेन्सेस येतात. AF ५०मिमी f/१.८ D आणि AF-S ५०मिमी f/१.८G VR. दुसरी लेन्स वायब्रेशन रिडक्शन असणारी पण अ‍ॅपर्चर रिंग नसणारी आहे. तुम्हांला वाटल्यास ही लेन्स घ्या.

परावर्तक हे असे असतात. वेगवेगळ्या आकारात मिळतात. परावर्तक म्हणून, तसेच कधीकधी प्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठीही यांचा उपयोग होतो. यापैकी शुद्ध पांढर्‍या रंगाचा परावर्तक आपल्याला उपयोगी पडेल असे वाटते.

ReflectorsTypes

सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.
बाकी माझ्याकडे कॅनन आहे. ५५०डी :)
कॅनन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी ५० मिमी प्राईम मध्ये f/1.8 ही एकच आहे. तशी कॅननमध्ये अजून एक ५० मिमी f/1.4 USM आहे पण ती f/1.8 पेक्षा जवळ जवळ तिप्पट चौपटीने महाग आहे.

वर दिलेल्या प्रकाश परावर्तकांची चित्रे पाहिल्यावर हे फोटो स्टुडिओ मध्ये खूपदा पाहिलेले आहेत हे आठवून गेले.

वेल्लाभट's picture

30 Nov 2013 - 2:49 pm | वेल्लाभट

आणि ते सुसाट काढलेले फोटो !.... दिल खुश - हाय हुश !

पैसा's picture

30 Nov 2013 - 10:48 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण धागा! लेखात तांत्रिक माहिती खूप आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे. त्याशिवाय प्रतिसादातूनही खूप माहितीचा खजिना भरला आहे! अभिजा यांनी घेतलेल फोटो आवडले. तसेच तो पानाचा ही आवडला. घड्याळाच्या २ फोटोंमुळे मॅक्रो फिल्टर आणि मॅक्रो लेन्सने काय फरक पडतो ते समजायला मदत झाली.

नानबा, लगे रहो! बोका मस्त आलाय! नाकतोडा मला आवडत नाय! ;)

विदेशी वचाळ's picture

30 Nov 2013 - 10:58 pm | विदेशी वचाळ

अवडले.

सुबोध खरे , इस्पिक एक्का , क्लिटन, विकास, वल्ली....या मालिकेतील एक नाव स्वॅप.
फोटो ग्राफी करताना काही विवक्षित चुका आपल्या हातून घडण्याची शक्यता असते. उदा. फोटो 'अ' साठी आवश्यक स्लो शटर
लावून ठेवलेले असते. लगोलगच्या दुसर्‍या फोटोसाठी ते तसेच राहून हॉरिबल फोटो येतो. अशा चुकांबद्द्ल लिहावे.

अशा चुका शक्यतो सुरुवातीला कॅमेर्‍यावर हात बसलेला नसताना जास्त घडतात. त्या टाळण्यासाठी काही दक्षता घेणे आवश्यक असतेच, त्याचबरोबर काही मिड आणि हाय लेवल डीएस्एल्आर कॅमेर्‍यांवर काही विशिष्ट सेटिंग्ज वापरून आपण अशा चुका टाळू शकतो. त्यावर एक सविस्तर लेख लवकरच लिहीन.

अवांतर - पुढचे काही दिवस वैयक्तिक कारणांमुळे आंतरजालापासून रजा. थोड्याच दिवसांत परत येईन.

कहर's picture

14 Nov 2014 - 12:59 pm | कहर

Nikon coolpix L22, Macro mode

प्रचेतस's picture

14 Nov 2014 - 3:26 pm | प्रचेतस

माझ्याकडे कॅनन १८-५५ आणि ५५-२५० अशा दोन लेन्सेस आहेत. दुहेरी लेन्स रिव्हर्सल तंत्र वापरताना कुठली कॅमेर्‍याला १८-५५ जोडावी का ५५-२५०?

मी १८-५५ जोडून तिला कपलरने ५५-२५० जोडली होती. पण व्ह्यु फाइंडरने बघताना काहीही दिसू शकले नाही.

दोन्ही लेन्सेस एकाच फोकल लेंग्थला सेट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शक्यतो दोन्ही लेन्सेस त्यांच्या मॅक्झिमम अ‍ॅपर्चरला असाव्यात. तुमच्या लेन्सेसवर अ‍ॅपर्चर रिंग नाही, त्यामुळे आधी लेन्सेस कॅमेर्‍याला जोडून मॅन्युअल मोडवर अ‍ॅपर्चर सेट करायचे आणि कॅमेरा चालू असतानाच लेन्स काढायची. अर्थात असे करणे धोकादायक आहे. त्यामुळे लेन्सचे अ‍ॅपर्चर नियंत्रित करणार्‍या खाचेत एखादी काडी वगैरे घालून जास्तीत जास्त लेन्स ओपनिंग मिळवायचे आणि मग ती लेन्स कॅमेर्‍याला रिवर्सिंग कपलरने जोडायची.

व्ह्यूफाइंडरमधून काही दिसले नाही कारण बाय डिफॉल्ट लेन्स अ‍ॅपर्चर मिनिमम सेटिंगला असते.

प्रचेतस's picture

14 Nov 2014 - 6:03 pm | प्रचेतस

धन्यवाद.
हे करून बघतो.
पण खाचेत काडी घालण्याने लेन्सच्या दृष्टीने जरा धोकादायकच वाटते.