अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in जनातलं, मनातलं
14 Nov 2013 - 11:01 am

अद्भुत आविष्कार

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

"कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून.
"दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे.
आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ?

मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला. बराच दुर्लक्षित असा हा किल्ला असल्याने तेथे जास्त वर्दळ नसते. पायथ्याचे गाव सोडले की क्वचित एखादा गुराखी दिसेल असा निर्मनुष्य. धोडप किल्ल्यावर जायच्या दोन वाटा आहेत. एक "हट्टी" नावाच्या गावातून जे किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. आणि एक वाट आहे 'ओतूर' नावाच्या गावातून. जे बरेच लांब असून या वाटेने येताना दोन डोंगर ओलांडून यावे लागते.

धोडप किल्ल्याच्या शेजारीच "विखारा" नावाचा एक किल्ला/डोंगर आहे. गूगल नकाशे वर तो मी लोकेट केला आहे. याचा उल्लेख आजपर्यंत मी कुठेच ऐकला/वाचला नाहीये. पण श्रावणात एक दिवशी ( कोणता तो लक्षात नाही) कुटुंबासहित या किल्ल्यावरच्या मंदिरात जाण्याची प्रथा ओतूर मध्ये होती.

या नकाश्यात आपल्याला अंदाज येऊ शकेल. हट्टी गावाच्या वर एक काळा गोल आहे तो लक्षात ठेवा हा. सांगतो तो कसला आहे ते.
हे 'ओतूर' गाव नाशिक मधील कळवण तालुक्यातील आहे. आणि 'अलंग' जे दाखवले आहे तो किल्ला नसून धोडप किल्ल्याच्या माचीवर वसलेले १०-१५ घरांचे छोटे गाव आहे.

.

असो, मुद्द्यावर येतो. तर धोडप किल्ल्यावर आम्ही निघालो. मी, माझा एक मित्र आणि त्याच्या भाऊ. त्याच्या भाऊ हा ओतूर गावातच राहत असल्याने त्याला किल्ल्यावर जायची वाट माहीत होती. पण तोही लहान असताना किल्ल्यावर गेला होता. ( मी पुण्यात राहून शनिवार वाडा किती वेळा गेलो बरे? ).
निघता निघता, मित्राच्या मामाने सांगितले की "किल्ल्याच्या पायथ्याशी एक 'गाय' आहे ती आवर्जून बघून या. सापडणार नाही तुम्हाला ती कारण ती आता कपारीत घुसली आहे. पण दिसली तर बघा."
मी म्हटले "गाय काय बघायची? आणि कपारीत घुसली म्हणजे काय?"
मग कळले की, "चुनकळीच्या दगडाची चालणारी गाय"! काय ??????????

त्यानंतर कळलेल्या वर्णनानंतर, "बस्स! ती गाय शोधून काढायचीच" असे ठरले. जाताना ओळखीच्या माणसांना विचारून पाहिले त्यांनीही त्या बद्दल ऐकले होते ती कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते.

ऐकलेल्या वर्णनावरून, ती दगडी गाय हट्टी गावाच्या दिशेला असावी असा अंदाज बांधला. आणि परस्पर विरोधी वाट जोडत आम्ही निघालो. पावसाळ्यात असे काही सापडणे शक्यच नव्हते. आम्ही पावसाळ्या पूर्वी गेलो होते हे बरे होते. जवळ जवळ अर्ध्या किल्ल्याला वळसा घालून आम्ही ओतूर गावाकडून येणाऱ्या वाटेने विखारा किल्ल्याच्या खिंडीतून धोडप किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलो. किल्ल्यावर जाणारी वाटही जोडीला होतीच.
पहिल्यांदा लगीन गायीचे मग किल्ल्याचे असा निर्णय करून किल्ला सोडून २-३ तास कडे कपारी धुंडाळत राहिलो.

२-३ तास हिंडून गाय तर काही सापडली नाही पण वेळही चालला होता. मग त्या गायीचे परत कधीतरी 'दर्शन' घेऊ म्हणून किल्ल्याची वाट धरली.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर १-२ घरे दिसत होती. त्यांच्या घराबाहेर प्रचंड मोठ्या आकाराच्या 'कढया' ( कढई) ठेवल्या होत्या. पण आजूबाजूला माणसाचा लवलेशही नव्हता. हट्टी गावातून येणारी वाट एका ठिकाणी ओतूर गावातून येणाऱ्या वाटेला मिळते. तिथपासून हि आम्हाला कोणी गुराखी दिसला नव्हता वा किल्ल्यावर पोहोचल्यावरही खाली कुणी दिसत नव्हते.

मनसोक्त किल्ला हिंडून आलो आणि परतीची वाट धरली. किल्ला उतरून दुसऱ्या प्रवेशद्वार सोडून पुढे आलो. वर जाताना दिसलेली १-२ घरे सोडली आणि पहिल्या प्रवेशद्वारास जाण्यासाठी निघालो. यावेळी 'विखारा' बद्दल माहिती कळली होती. पुढच्या वेळी जाऊ असे ठरले. उगाच जरा हौस म्हणून 'विखाराचे' फोटो काढायला थोडेसे वाट सोडून दरीच्या दिशेने ( हट्टी गावाच्या उताराकडे ) गेलो. थोडा वेळ फोटो काढले आणि निवांत टेकलो.

तेवढ्यात एक माणूस समोर आला. पूर्ण परिसरात एकाही माणूस दिसला नसताना हा कसा काय आला? म्हणून आम्ही त्याला विचारले.
"सकाळीच आलोय. गुरे घेऊन आलोय चरायला. वाट चुकली काय तुमची?"
"नाही, असाच फिरतोय. "
तो गुराखी होता. एवढ्या वेळ एकाही माणूस नसताना हा मध्येच कसा उगवला? त्याची गुरेही दिसत नव्हती. पांढरा सदरा आणि पायजमा, डोक्यावर दक्षिणोत्तर पांढरी टोपी. त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या चावल्याच्या खुणा होत्या. त्याचे नाव होते सूरदास.
"ती कुठली कपारीतील गाय कुठे आहे माहीत आहे का हो तुम्हाला"
"हो माहिती आहे"
"काय ????? माहिती आहे?????"
"इथेच आहे का ती? किती वेळ लागेल जायला? आम्हाला जाता येईल का त्या कपारीत? तुम्हाला कशी माहिती ती" असे अनेक प्रश्न आम्ही त्याला विचारले. तो काहीच बोलला नाही.
फक्त म्हणाला "चला, दाखवतो ती गाय"

तडक निघालो. तो घेऊन जाईल तिकडे चालत सुटलो. काही वाटा लागल्या तर थोड्या वेळाने प्रचंड झाडी झुडपे लागली. कुठे चाललो आहे याचे तर भान नव्हतेच पण याच रस्त्याने परत येऊ शकू का याची पण शाश्वती नव्हती.

जाता जाता त्याच्याकडूनच काही माहिती मिळवली. त्याच्याकडून ऐकलेली आणि आतापर्यंत ऐकलेली सगळी एकत्रित माहिती अशी:
"फार पूर्वी, म्हणजे मित्राच्या मामाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आजोबांनी हि गाय पहिली होती. पूर्णतः दगडाची वा चुनकळीची फरशी असते त्याची. मित्राच्या मामाला ( ज्याचे वय आता ६०-६५ असेल) त्याच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी हे सांगितले होते. त्यांचे आजोबांनी जेव्हा त्याच्या डोळ्यांनी ती गाय (म्हणजे गाई चा पुतळा म्हणता येईल.) पाहिली तेव्हा ती 'हट्टी' गावाच्या आणि धोडप किल्ल्याच्या मधील मोठ्या मोकळ्या जागेवर होती. पहिल्या फोटोत काळा गोल काढला आहे तिथे जवळपास.
हा गायीचा पुतळा इथे होता तर त्याच्या परस्पर विरोधी दिशेला म्हणजे धोडप किल्ल्याच्या उत्तरेकडे खूप लांब अश्या एका गावात असाच चुनकळीच्या दगडाचे वासरू होते. निसर्गाने म्हणजे साक्षात धोडप किल्ल्याने त्या माय-लेकराची ताटातूट केली होती.
हा वासराचा पुतळा जेथे होता तेथे त्या गावातील लोकांनी विटांचा का कसलातरी कारखाना काढला होता. त्या पुतळ्याची अडचण म्हणून एक दिवशी एकाने रात्री तो पुतळा तोडून तो घरी गेला. आणि आश्चर्य म्हणजे, दुसऱ्या दिवशी तो पुतळा तसा च्या तसा होता. त्यानंतर सर्व लोकांच्या साक्षीने तोडलेला तो पुतळा दुसऱ्या दिवशीही तसाच अभेद्य होता.
किल्ल्याच्या विरुद्ध बाजूस असलेली गाय आणि वासरू हे एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे आकर्षिले जात होते. एकमेकांकडे 'चालत' मार्गक्रमण करत होते.
हि 'गाय' म्हणजे 'गायीचा पुतळा' दर 'वसुबारस' आणि 'कोजागरीला' काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकते.
त्यानंतर, हि माहिती देणाऱ्या मामांनी त्यांच्या लहानपणी स्वतः हि गाय जेव्हा पाहिली, तेव्हा ती मोकळ्या जागेतून धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी पहिली होती. त्यानंतर खुद्द मित्राच्या आईनेही ती गाय पहिली तेव्हा ती गाय एका कड्याला समांतर अशी होती. म्हणजे ती आता या कड्यांत कपार करून घुसेल की काय अशी. आणि त्यांनी तेव्हा ऐकल्याप्रमाणे विरुद्ध गावातील वासरू हे मार्गक्रमण करीत डोंगरात कपार पाडून त्या कपारीत घुसलेही होते. आता ते वासरू कुठे आहे कोणालाच माहीत नाही. ( पण, आज मला माहिती आहे की ती गाय कुठे आहे.)

या सर्व कथा आणि संदर्भाप्रमाणे आता ती 'गायही' डोंगराला कपार पाडून कपारीत आत घुसली असली पाहिजे. असा तर्क आम्ही केला आणि एका ठिकाणी पोहोचलो.
हे सगळे प्रथमदर्शनी खरे वाटले नाही. म्हणजे 'असे कसे असू शकते?' इथपासून ते 'अंधश्रद्धा असावी' इथपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यानंतर मात्र जे डोळ्यांनी पाहिले आणि हातांनी अनुभवले त्याने माझी मती गुंग झाली.

माझ्या डोळ्यासमोरच डोंगराचे पोट उभे फाडल्यासारखी कपार होती. जेवढा किल्ला आम्ही फिरलो होतो तेथे कुठेही अशी उभी कपार पहिली नव्हती मी. खतरनाक दिसत होती ती. मानव निर्मित असण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे दिसण्यावरून वाटत नव्हती.
आत जाऊन काही प्रॉब्लेम नको म्हणून दोघांनी एकत्र जायचे ठरले. पण ती कपार इतकी बारीक होती की आत काय चावले-बिवले तर दोघांना निघतानाही येणार नाही म्हणून मग भूषण पहिल्यांदी आत गेला.

.

हीच ती खोल दिसणारी कपार. मध्यभागी आत एक गाई सदृश आकृती ( मागून गाय जशी दिसते तशी) दिसते आहे. मागचे दोन पाय स्पष्ट दिसत असून शेपटी हि दिसत आहे. गाय मागून बघितल्यास दुधाचे पान्हे जसे दिसतात तसेच दिसत आहे.

.

आता हे अजून जवळून बघायला आम्ही कपारी मध्ये शिरलो. कोंदट असा वास येत होता. आम्ही आत शिरताच आतली काही वटवाघुळे आमच्या डोक्याला धडकून उडून गेली. आता मी तर फुल टू टरकलो पण भूषण अजून आत गेला.
हा जवळून फोटो. अगदी गायच वाटत आहे नाही? वाटत आहे म्हणजे काय आहेच ती गाय !

.

विशेष म्हणजे त्या कपारीची साइज पण फक्त गाई एवढीच होती. जर ती नैसर्गिक असावी तर पर्फेक्ट त्याच मापाची कशी?
.

या गायीच्या पाठीवरून पुढे हात घालून पहिले तर थोडा डोक्यासारखा उंचवटा भासला. फ्ल्याश मारून डोके सदृश भागाचा काढलेला फोटो.
.

आत कपारीतून बाहेरचा काढलेला फोटो. खूप भीती वाटत होती आत. वटवाघुळे आमच्यावर पेटून गेलीच होती पण मोठाले कोळी पण अंगावर यायला लागले होते. आणि काहीतरी चावले तर इथून बाहेरही पडता येणार नाही अशी स्थिती.
.

हा मी. आत गेलो कसाबसा पण मावलो नाही त्या कपारीत.
.

हाच तो अद्भुत 'सूरदास' आणि मागे विखारा किल्ला.
.

थोडेसे तिथेही फोटो सेशन झाल्यावर आम्ही परत निघालो. त्याने आम्हाला कुठल्या वाटेने इथपर्यंत आणले आणि कुठल्या वाटेने परत नेले हे आजही आठवत नाही. आता मी परत तिथे गेलो तरीही मी ती कपार शोधू शकणार नाही. घरी येऊन मामांना या गायीचे फोटो दाखवले. काय बोलावे त्यांनाही सुचेना. "लहानपणी पहिली होती तेव्हा ती गाय किल्ल्यावर चढत होती. कमाल केलीत तुम्ही पोरांनो!"

जे काही पहिले ऐकले ते केवळ अद्भुत. सांगीव कथांवर विश्वास बसत नाही पण जे पाहिले 'ते तरी कसे काय झाले असेल?' याचाही उलगडा होत नाही.
याला खोटे म्हणावे तर ते तरी कसे? मामांनी त्यांच्या आजोबांनी आणि मित्राच्या आईनेही ती पहिली होती. गावातील जुन्या लोकांनी पहिली होती. आज आम्हीही स्वतः पाहिली आणि पाहून विश्वास बसला.

कळत नाही की सध्या गावात राहणाऱ्या कोणाला न सापडणारी हि गाय 'सूरदास' ला कशी माहिती होती? त्याला आम्ही जाताना चहा पाण्यासाठी काही पैसे दिले. त्याने तेही घेतले नाहीत. नेमकी तो तेव्हाच तिथे कसा आला? पहिल्यांदा शोध शोध शोधून न सापडलेले हे गूढ रहस्य नंतर आम्हाला अर्ध्या तासात सापडले. याआधी किती जणांना ते सापडले असेल?
काहीच उमगेनासे झालेय.

निळे आकाश, हिरवा निसर्ग,आत आत जाणारी ती कोंदट कपार, मी, माझे प्रश्न ,
त्या दुर्गांवरती मी का माझ्या मनाच्या खोलात हा शंकांचा दुर्ग?
पैसे देऊन मी सूरदासाला मदत केली? का त्याला गरजच नव्हती अश्या मदतीची?
जर तो गुराखी होता, तर त्याची एकही गाय व शेळी कशी दिसली नाही?
आणि जर तो गावातूनच वर आला होता तर त्याच्या चेहऱ्यावर मधमाश्या कश्या काय चावल्या होत्या?
वाट सोडून गेल्यावर तो दिसला. मग जेव्हा वाटेने जात होतो तेव्हा तो कुठे असावा?
मी परत जाईन तेव्हा कुठे आणि कपारीत किती खोल गेली असेल ती गाय? मुळात मला सापडेल का ती गाय?
किती खोल पोहोचले आहे तिचे वासरू? कधी भेट होईल त्यांची? होईल का ?
कित्येक वर्षे चालू असेल हे सगळे?
काय होईल जेव्हा त्यांची भेट होईल? डोंगराच्या पोटात लुप्त होऊन जातील दोघे का डोंगर फोडून बाहेर येतील?
विखार्यावर एक मंदिर आहे, कसले आहे ते? या वासराचेच तर नसावे.?
त्या वासराच्या ओढीने पुढे जाणाऱ्या गाई साठी कोण खणत असेल कपार?
त्या कपारीत अजून आत गेलो तर काय असेल आत?
हे प्रश्न काही केल्या सुटतच नाहीत. मी मात्र अजून आत आत जात राहतो त्या गूढ कपारीसारखा.

असो,
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे, हेही असू शकते आयुष्याचे सार्थक!

सागर
http://sagarshivade07.blogspot.in

समाजजीवनमानप्रवासमौजमजाविचारआस्वादअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

14 Nov 2013 - 11:19 am | खटपट्या

मनोरंजक !!!

झंम्प्या's picture

14 Nov 2013 - 11:36 am | झंम्प्या

आवड्लं... अदभुत कथा आहे ही.

साळसकर's picture

14 Nov 2013 - 11:38 am | साळसकर

गूढ चमत्कारीक आहे खरे, फोटोंवरून तरी तसे वाटतेय.

इष्टुर फाकडा's picture

14 Nov 2013 - 1:58 pm | इष्टुर फाकडा

पुन्हा जावा अजून दोन तीन वर्षांनी बघा थोडी पुढे सरकली आहे का ती. गायीच्या मागच्या भागापासून कपारीच्या सुरुवातीचे अंतर मोजून ठेवले असतेत तर बारा झालं असतं निष्कर्ष काढायला.

सुज्ञ माणुस's picture

14 Nov 2013 - 4:39 pm | सुज्ञ माणुस

परत जाऊन ती सापडणे अवघड आहे. मला तर बिलकुल आठवत नाही कि आम्ही कसे गेलो होतो?
हा अनुभव सांगितल्यावर माझा एक मित्र लगेच पुढच्या आठवड्यात धोडप ला गेला होता. तो तिथे २ दिवस राहिला पण त्याला ती गाय नाही सापडली. :)

बॅटमॅन's picture

14 Nov 2013 - 2:05 pm | बॅटमॅन

हे जबरी आहे!!!!!! फारच भारी, आवडलं :) पुन्हा पुन्हा वाचण्यासारखे आहे खासच. :)

सार्थबोध's picture

14 Nov 2013 - 2:11 pm | सार्थबोध

झकास आणि अद्भुत , माझा सलाम तुम्हाला

प्रचेतस's picture

14 Nov 2013 - 2:39 pm | प्रचेतस

निसर्गाचा अविष्कार असतो.
बाकी कित्येक खेड्यापाड्यात अशा दंतकथा प्रचलित असतातच.

तैलबैलाचे दोन सुळके म्हणजे रामाने ठेवलेली कावड वैग्रे वैग्रे. फार काय ठाण्यासारख्या मोठ्या शहरात राहणारे आमचे मित्र किसनरावजी शिंदे पण म्हणतात की तिथल्या प्राचीन कौपिनेश्वर मंदिरातल्या शिवलिंगाची उंची सतत वाढत असते. पूर्वी लहान होते म्हणे आता उंची वाढलीय.

बॅटमॅन's picture

14 Nov 2013 - 3:19 pm | बॅटमॅन

अगदी अगदी. कोल्हापूरच्या रंकाळ्यातीरी असलेला एक छोटासा णंदीसुद्धा गहूभर पुढे येऊन निळभर मागे जातो अन जेव्हा तो रंकाळ्यात जाईल तेव्हा जगबुडी येणारे म्हणे.

२००६ च्या पञ्चगङ्गेच्या पुरात अख्खे कोल्लापूर बुडले होते तेव्हा काय झाले होते ते बाकी पहायला हवे. नदी फार कै लांब नसावी तिथून.

रामपुरी's picture

14 Nov 2013 - 10:38 pm | रामपुरी

तो नंदी मागे पुढे हलत नाही. मी लहानपणी बघितला होता तिथेच आजही आहे. (हल्ली लोकांची श्रद्धाच नाही असल्या गोष्टींवर. तो तरी काय करेल बिचारा :) ).
पंचगंगा नदी या नंदीपासून लै लांब आहे.

-कोल्हापूरकर

धन्यवाद. बाकी नंदी तिथेच का आहे याची मीमांसा आवडली ;)

स्पंदना's picture

15 Nov 2013 - 3:51 am | स्पंदना

ए बटु तू कोल्हापुरच्या माणसांचा हक्क काढुन घेतलास ही कथा सांगायचा? ;)
मी पण हेच सांगायला आले होते. :D

बॅटमॅन's picture

15 Nov 2013 - 11:58 am | बॅटमॅन

हाहाहा :)

बाकी ते बटु परत एकदा काळजाला भिडलं ओ.

अग्निकोल्हा's picture

14 Nov 2013 - 2:50 pm | अग्निकोल्हा

.

प्यारे१'s picture

14 Nov 2013 - 2:50 pm | प्यारे१

वाईचा ढोल्या गणपती पण लहान लहान होत चाललाय.
तिथेच कुठला नंदी गहूभर पुढे, तांदूळभर मागे असं टीपी करतो.

काय की आपल्याला काही समजत नाही ब्वा!

सुज्ञ माणुस's picture

14 Nov 2013 - 4:41 pm | सुज्ञ माणुस

नंदी टीपी करतो, हे हे भारी :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2013 - 3:12 pm | अत्रुप्त आत्मा

छा.............न!

कवितानागेश's picture

14 Nov 2013 - 3:46 pm | कवितानागेश

मस्स्तय गाय. :)

शरभ's picture

14 Nov 2013 - 4:59 pm | शरभ

खरं खोटं माहीत नाही. पण तुम्ही कदाचीत श्रद्धेने गेलात आणि परमेश्वराने व्यवस्था केली गाय शोधून द्यायला :)
ऐकावं ते नवलच.

सूड's picture

14 Nov 2013 - 5:10 pm | सूड

विंट्रेष्टिंग !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2013 - 10:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

अनाकलनिय ! परत काही काळाने जावून खरंच गाय सरकली की नाही याची खात्री करा.

पैसा's picture

14 Nov 2013 - 10:24 pm | पैसा

गोष्ट ऐकून मज्जा वाटली! फोटो आणि तुमची सांगायची स्टाईल मस्त आहे!

स्पंदना's picture

15 Nov 2013 - 3:54 am | स्पंदना

यस्स! सांगायची स्टाईल मस्त आहे.
अगदी लाईट गेलेत, घरात चूल पेटली आहे, बाहेर पाऊस; त्यामुळे अंगणात बसता येत नाही अन म्हणुनच सगळे चुलीभोवती कोंडाळ करुन, आई काहीतरी बनवताहेत चुलीवर. त्या खमंग वासात कोणतातरी काका, मामा अथवा आजोबा अस काही गुढगंभीर सांगताहेत.

सुज्ञ माणुस's picture

15 Nov 2013 - 10:05 am | सुज्ञ माणुस

थांकू. काय मस्त वर्णन केलेत. खरच,असेकाही आपण लिहिले आहे का हे तपासायला परत एकदा वाचून काढला मी लेख ! :)

अग्निकोल्हा's picture

15 Nov 2013 - 10:25 am | अग्निकोल्हा

.

जेपी's picture

15 Nov 2013 - 1:39 pm | जेपी

तुळजापुरात हि एक भली मोठी शिळा आहे . त्याला घाटशीळ मंदीर म्हणतात . तिथली शिळाही दरवर्षी गव्हाऐवढी वाढते . ज्या वेळेस ती भोवती असलेल्या खांबास टेकेल तेंव्हा जगबुडी होईल अशी दंतकथा सांगितली जाते .

कपिलमुनी's picture

15 Nov 2013 - 1:46 pm | कपिलमुनी

आमच्या तळेगावला पाच पांडवांचा मंदीर आहे ..तिथे मागच्या बेडरूम मधे द्रौपदी झोपलेली आहे ..
ती कूस बदलते असे म्हणतात ...खखो भीम जाणे !

सौंदाळा's picture

20 Nov 2013 - 10:11 am | सौंदाळा

हेच लिहायला आलो होतो.
फार वर्षांपुर्वी तळेगावला गेलो असताना हे मंदिर पाहीले होते.
हा धागा वाचुन एकदम कुस बदलणार्‍या द्रौपदीची आठवण झाली.
आरवलीचा वेतोबादेखील रक्षणकर्ता म्हणुन रात्री गावात फिरतो म्हणतात. लोक त्याला नवस म्हणुन चपलांचा जोड (किंवा केळ्याचा घड) अर्पण करतात. चपलांचा जोड काही दिवसाने झिजलेला दिसतो असे म्हणतात.
ऐकावे ते नवलच

प्रचेतस's picture

20 Nov 2013 - 10:21 am | प्रचेतस

अहो फार लांब कशाला, इथे पुण्यातच सातारा रोडवर कुठल्याश्या महाराजांचा मठ आहे. लोक तिथे समाधीस्थ बुवांना शिग्रेटी अर्पण करतात आणि त्या आपोआप पेटतात म्हणे.
कीव येते राव अशा लोकाची.

शंकर महाराजांचा मठ का? तिथे तर राजरोस पेटवून ठेवतात विड्या सिगारेटी. आपोआप नाही पेटत.

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 1:32 pm | प्यारे१

मुंबईत एक बाबा घोडागाडीत बसलेला स्वतः शिग्रेट ओढत कधीमधी राख झटकत होता.
ती राख भक्तीभावानं लोक हातात प्रसाद घेतल्यासारखे घेत होते नि पाया पडत होते.
नंतर ती राख खात होते. स्वतः बघितलंय.

मला कीव पण करावीशी वाटत नाही. :/

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:52 pm | बॅटमॅन

खरेच मूर्खपणा आहे. दारू, शिग्रेटी, इ. गोष्टी अर्पण करणे हा वायझेडपणा आहे. उद्या कोणी बायकाही अर्पण करतील, लोकांचा नेम नाही काहीच.

प्यारे१'s picture

21 Nov 2013 - 2:55 pm | प्यारे१

>>>उद्या
???
झालेले प्रकार आहेत.
तोडकर महाराज आठवा की कोल्हापुरातले.

ब्याट्या, आम्ही रेफरन्स देण्याची वेळ यावी?????

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 2:59 pm | बॅटमॅन

ऑफ कोर्स, ते प्रकरण आहेच. जितक्या उघडपणे शिग्रेटी देतात तितक्या उघडपणे बायका देतील असं म्हणायचं होतं. बाकी तोडकर म्हाराज अन अजून बरेच ठरकनाथ आहेतच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Nov 2013 - 2:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

चायला कायपण एक एक

गाय सदृश्य दगड जर सध्या कपारीत आहे तर तो डोंगराबाहेर कसा आणि कुठे होता हे शोधणे हा संशोधनात्मक विषय ठरू शकेल. त्याच्या चालीवर संशोधन कसे झाले नाही अजून?

ही गाय बाहेर गावात कुठे पहिली असल्याच्या ग्रामस्थांच्या मताबाबत मात्र असहमत.

सुज्ञ माणुस's picture

15 Nov 2013 - 2:40 pm | सुज्ञ माणुस

अश्या दंतकथा बऱ्याच आहेत पण ते आपण व कोणी पाहिलेले नसते फक्त ऐकलेले म्हणून दंतकथा. पण हे मित्राच्या मामाने, आईने आणि आता लेटेस्ट मी म्हणजे जुन्या व नवी पिढी दोघांनीही पाहिलेय. याला दंतकथा कसे म्हणावे. काय समजत नाय राव ! :(

सुहासदवन's picture

15 Nov 2013 - 3:20 pm | सुहासदवन

तुम्ही संपूर्ण गाय पाहिली नाही, फक्त त्या वस्तूच्या पाठीमागून तुम्हाला ती गाय सदृश्य आकृती दिसली. वास्तविक ती आकृती गाय नाही पण तिच्या पार्श्व भागाप्रमाणे दिसणारे काही तरी आहे.

एक शंका - तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या कोणी ही गाय कपारीच्या बाहेर कड्यापासून लांब (कड्याच्या पायथ्याशी, कड्याला समांतर नव्हे) पाहिली होती काय.

ग्रामस्थांचे सोडा (म्हणजे दुर्लक्ष करा) , बहुतेकांना आपल्या गावात काहीतरी गूढ आहे आणि ते प्रसिद्ध केले पाहिजे असं वाटतं.

कृ.ह.घ्या.

टवाळ कार्टा's picture

15 Nov 2013 - 4:56 pm | टवाळ कार्टा

+१११११११

युगंधर's picture

16 Nov 2013 - 11:19 pm | युगंधर

मोरगावच्या मोरेश्वरा पुढचा नंदीही तिळभर पुढे सरकतो म्हणे. खखो मोरेश्वर जाणे ……

युगंधर's picture

16 Nov 2013 - 11:26 pm | युगंधर

आमच्या सासवड गावात कालभैरावची जत्रा भरते, आणि काही तरुण बाहेर पाराला बांधलेला जाडा साखळदंड तोडतात, पण पहिल्या झटक्यात तो तुटला नाही तर भैरोबाला तो साखळदंड तुटे पर्यंत घाम येत राहतो. अर्थात मी काही पर्तेक्षा नाही पहिला बा !!!!

केवळ कोणाकडून तरी ऐकले म्हणून अश्या कथा सांगितल्या जातात आणि बहुतेक धार्मिक वर्तुळाच्या परिघाच्या आत बाहेरच फिरतात.

कमीत कमी गेल्या दोन पिढ्यांत असं कोणी पाहिलं नाही, प्रत्यक्ष पुरावा किंवा आधार नाही अश्या कथा उगाच सांगत, फैलावत राहण्याचं जे एक गूढ समाधान मानवी मनाला मिळत त्याबद्दल काय सांगावं.
नाहीतर ह्या अश्या कथा गेल्या दोन पिढ्याआधीच संपुष्टात आल्या असत्या.

अग्निकोल्हा's picture

17 Nov 2013 - 9:47 am | अग्निकोल्हा

लेखकाला रस्ता दावनारे कोण होतं ? अन लेखक पुन्हा कपार सापडेल याची शाश्वती का देत नाही?

सुज्ञ माणुस's picture

17 Nov 2013 - 1:36 pm | सुज्ञ माणुस

सूरदास बद्दल आलेले उल्लेख आपण परत एकदा वाचावेत हि विनंती. त्याने आम्हाला अर्धा तासात कुठून कसे नेले मला आजही सांगता येणार नाही. सुहास यांच्या मताशी मीही सहमत आहे. जेवढे प्रश्न तुम्हाला पडले आहेत त्यापेक्षा जास्त मला पडले आहेत. म्हणून मी कोणतेही कन्क्लूजन काढलेलेच नाहीये.म्हणजे खरेतर काढूच शकलो नाहीये.फक्त तिथे दिसलेली गाय सदृश्य गोष्ट आणि गावात जी ( वर वर्णन केलेली) दंतकथा आहे त्याच्याशी काही प्रमाणात जुळत असल्याने मला ते अद्भुत वाटले एवढेच.
मला जेवढे उमगले ते मांडले आहे. सगळे बरोबरच आहे आणि सगळ्यांना त्याच्यावर विश्वास बसलाच पाहिजे असे माझे अजिबात म्हणणे नाही. असे विषय खूपच व्यक्ती सापेक्ष आहेत असे मला वाटते.
असो, बाकीचे जाऊद्या तुम्ही म्हणता तसे समजून जरी ती दंतकथा आहे तर 'विथ फोटो दंतकथा' वाचायची तरी मजा घेऊया. :)

मुक्त विहारि's picture

17 Nov 2013 - 9:39 am | मुक्त विहारि

आवडला...

टवाळ कार्टा's picture

17 Nov 2013 - 12:57 pm | टवाळ कार्टा

"सुज्ञ माणुस" याने हा लेख टाकला (ए कोण रे तो जिल्बी म्हणतोय??? )

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 1:59 pm | चाणक्य

भारी आहे हे...

शिल्पा ब's picture

17 Nov 2013 - 2:43 pm | शिल्पा ब

एक्दम आवडेश.

सुहास..'s picture

18 Nov 2013 - 1:42 pm | सुहास..

लेखन स्टाईल आवडली

म्हैस's picture

21 Nov 2013 - 2:51 pm | म्हैस

@सुहासदवन.
सहमत . मला हि असच वाटतंय. साखळदंड तोडण्याच्या प्रकाराला लंगर तोडणे म्हणतात असं ऐकलंय . सातारा रोड वरचा तो कुठला मठ आहे? गगनगिरी महाराजांचा पण १ मठ अहे. जावून मजा तरी बघू एकदा काय आहे ते

तिमा's picture

25 Nov 2013 - 9:23 am | तिमा

फोटोत दिसणार्‍या गाई सदृश्य आकृतीकडे बघून असे वाटते की गुहा, कपारी यांत नैसर्गिकरीत्या तयार होणारे हे कॅल्शियम कार्बोनेटचे स्टॅलॅक्टाईट्स आणि स्टॅलॅग्माइटस असे संबोधण्यात येत असलेले खडक आहेत, हे झाले शास्त्रीय निवेदन. बाकी ते गाय पुढे सरकणे हे खरे की खोटे याबाबत माहित नाही. असे खडक आम्ही उत्तरांचल मधे 'पाताळेश्वर येथे आणि चेरापुंजीच्या गुहेत बघितले आहेत.

चेरापुंजीजवळच्या गुहेतील कॅल्शियम कार्बोनेटची खडकातली डिपॉझिटस

आता, यालाही कोणी गाईचे आचळ वा बैलाची अंडवृद्धी असे काहीही म्हणू शकेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2013 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दंतकथांची मजा असते. कपारीच्या दगडात चालणारी गाय पुरेपुर मला पोहचेना. आकाशात पाहतांना पांढ-या शुभ्र ढगांच्या आकृत्यामधुन विविध गोष्टी दिसतात तसे वाट्ले.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

26 Nov 2013 - 12:22 pm | कपिलमुनी

येथे असाच गुहे मधे लवणस्तंभ आहे ..
स्थानिकांनी त्याचे शिवलिंग करून टाकले आहे .