मिशन काश्मीर - १

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
9 May 2011 - 1:59 pm

**************************************************************

मिशन काश्मीर : भाग १; भाग २ - श्रीनगर; भाग ३ - श्रीनगर; भाग ४ - बर्फ; भाग ५ - अवंतिपुरा, पहलगाम; भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क; भाग ७ - पहलगाम; केवळ छायाचित्रे

**************************************************************

अगर फिरदौस बर्रूए-जमीनस्तो, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो। . जन्नत अगर कही है तो यही है, यही है, यही है।.

बहुधा जहांगीर म्हणाला किंवा कोणीतरी उर्दु शायर. ज्याने कोणी लिहिले आहे त्याने काश्मीरचे वर्णन करताना सत्यापासुन गुंजभरही फारकत घेतलेली नाही आहे. याहुन योग्य शब्दात काश्मीरचे वर्णन करता येणार नाही. जे डोळ्यांना दिसते ते कॅमेर्‍यात कैद होउ शकत नाही आणि शब्दात वर्णन करता येत नाही. तरीही हा एक तोकडा प्रयत्न काश्मीरची सैर घडवुन आणण्याचा. माझा टंकलेखनाचा वेग महान असल्यामुळे २-३ भागात प्रकाशित करेन.

पुण्यात तापमानाची स्पर्धा ४० च्या अंकाशी व्हायला लागली तसे थंड हवेच्या ठिकाणी सुट्टीचे वेध लागले. काश्मीर नक्की केले तेव्हा मनात थोडी धाकधूक नक्की होती. पण दहशतवादाच्या भितीला योग्य ठिकाणी मारुन आम्ही तयारीला लागलो. जास्त 'रिक्स' घ्यायची नसल्यामुळे ट्रॅव्हल कंपनीतर्फे जायचे निश्चित केले. ट्रॅव्हल कंपनीतर्फे जाण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे आपल्याला काही करायला लागत नाही. सगळे त्यांच्यावर सोपवुन निवांत बसायचे. आणि अनेक तोट्यांपैकी एक म्हणजे प्रवासाची व्यवस्था काय असेल त्याचा भरवसा नसतो. आमच्या टुर ऑपरेटर ने आम्हाला गो एयर च्या हवाली केले. आईशप्पथ सांगतो गो एयर हा एक थ्रिलींग अनुभव असतो.

बोर्डिंग पास घेतानाच मी काउंटर वरच्या कोस्मेटिक कंपनीची जाहिरात करणार्‍या ललनेला किमान ३ विंडो सीटस द्यायला सांगितल्या. त्यावर तिने केवळ १ उपलब्ध असल्याचे सांगुन माझी बोळवण केली. तसे मला विंडो सीटचे फारसे आकर्षण नाही पण विमानातुन बर्फाचे डोंगर दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे मला खिडकी हवी होती. शेवटी १ खिडकीवर समाधान मानुन विमानात शिरलो. तर माझ्या जागेवर एक ललना आधीच बसलेली होती. माझ्या पुणेरी आवाजात कमाल मार्दव आणुन मी तिला ती माझ्या जागेवर बसल्याची जाणीव जरुन दिली. त्यावर च्यायला आजकाल कोणीही विमानात बसायला लागलय. साधे सीट नंबर्स बघता येत नाहीत असे भाव चेहेर्‍यावर आणुन तिने मला शांतपणे ति तिचीच सीट असल्याचे सांगितले. मग दोन्ही बोर्डिंग पास बघता असे लक्षात आले की सीट एक और आदमी दो अशी नाइन्साफी झालेली आहे. मी तेवढ्याच शांतपणे ही बाब हवाई सुंदरीच्या लक्षात आणुन दिली. त्यानंतर १५ मिनिटात ४ वेगवेगळ्या लोकांनी आमच्या दोघांचे बोर्डिंग पास चेक केले. माझा वेंधळेपणा लक्षात घेता मी चुकुन मुंबै - दिल्ली - श्रीनगर च्या ऐवजी कन्याकुमारीच्या विमानात नाही ना शिरलेलो याची मी स्वतः ३-४ वेळा खात्री करुन दिली. एव्हाना आजुबाजुच्या लोकांची छान करमणुक सुरु होती. मी सीटपाशीच (म्हणजे माझी असुन नसलेल्या सीटपापा) उभा असल्याने येणार्‍या जाणार्‍या लोकांना त्रास होत होता आणि काय गावंढळ माणूस आहे असे भाव नजरेत आणुन ते मला साइड द्यायला विनवीत होते. एव्हाना आजुबाजुच्या लोकांच्या "गो एयर मध्ये आणि एष्टी मध्ये फारसा फरक नाही", "काळजी करु नका ते तुम्हाला उद्याच्या फ्लाईट मध्ये जागा देतील " वगैरे कमेंट्स पास करुन झाल्या. दुसर्‍या दिवसाच्या विमानातुन जाण्याऐवजी मी मध्ये स्टुल टाकुन बसायलाही तयार होतो. अर्ध्या तिकिटात तसा मी उभा राहुनही गेलो असतो पण वरती हात धरायलाही विमानात जागा नसते त्यामुळे थोडा पिराब्लेम होता.

परत एक हवाई कन्या आली आणि "Sir is your seat number 21 Delta?" असे मंजुळ आवाजात विचारायला लागली. Delta? म्हणजे काय? माझा सीट नंबर तर 21 D होता. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला D म्हणजे Delta. त्या कन्येने शेवटी मला 1 Bravo वर बसायला सांगितले आणि कडकड केल्यावर 1 Alpha वर बसु दिले. Alpha, Delta, Bravo वगैरे शब्द ऐकुन मला एकदम डेल्टा फोर्स मधला सोल्जर झाल्यासारखे वाटायला लागले होते. गो एयर मध्ये जागा मिळणे हे असेही एक युद्धच होते म्हणा. अखेर एक सीट दोघांना दिल्याचा मला फायदाच झाला. पुढच्या तिन्ही सीटवर माझ्याशिवाय कोणीही बसलेले नव्हते.

थोड्याच वेळात खिडकीतुन दिसणारे ढगांचे पुंजके बघायचा मला कंटाळा आला. बाजुला नजर फिरवली तर वॉशरुमच्या बाजुने येउन एक इसम माझ्या शेजारी येउन बसला. पाठोपाठ दुसर्‍याने उरलेली एक सीटही बळकावली. हा काय प्रकार आहे हे मला झेपेना. भारतीय रेल्वेच्या शौचालयात लपून प्रवास करणारे महाभाग मला माहिती होते. पण विमानात पण हा प्रकार चालतो हे मला माहिती नव्हते. शेवटी गो एयर मध्ये काहीही होउ शकते हे मनात बिंबवुन मी गप्प बसलो. थोड्या वेळाने उलगडा झाला की ते लोक "रांगेत" होते. आतला माणूस बाहेर आला की माझ्या शेजारचा तुंबलेला माणूस आत घुसायचा. आता जास्त ताप व्हायला लागला. एवढी घाउक रांग मी याधी कुठल्याही फ्लाइट मध्ये नव्हती बघितली. माणसे यायची कसनुसा चेहेरा करुन बघायची. थोड्या वेळाने नंबर लागायचा. माझ्या बाजुच्या सीटा म्हणजे तुंबलेल्या लोकांसाठी वेटिंग रुमच झाली होती. थोड्या वेळाने एक ४- ५ वर्षाचा पोरगा येउन बसला. दोन मिनिटे त्याने वाट बघितली आणि अखेर म्हणाला "अंकल बहुत जोर की लगी है" मी ब्लँक झालो. काय बोलावे ते कळेना. जोर की लगी है म्हणजे? मी काय करावे अशी अपेक्षा आहे? मी काय सुलभ शौचालयाचा चालक, संचालक, संस्थापक आहे का? मी काय करु शकणार तुला घाईची लागली आहे तर? पण अखेर मुलावर दया येउन मी "रांगेत" उभ्या राहिलेल्या एका माणसाला पोराला पुढे जाउ द्यायची विनंती केली. त्याच्या चेहेर्‍यावर पोरं तुम्ही जन्माला घालणार त्रास आम्हाला होणार असले काहीसे भाव दिसले. पण हो म्हणाला बिचारा. पोर माझे नाही हे त्याला ओरडुन सांगावेसे वाटले. पण काय करणार? गप्प बसलो. हे म्हणजे खाया पिया कुछ् नही गिलास तोडा बाराना टाइप झाले. अखेर एकदाचे विमान दिल्लीला लँड झाले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझे भोग अजुन संपले नव्हते. दिल्ली - श्रीनगर सेक्टरला सेम ताप. परत माझी सीट दुसर्‍याला दिलेली. वर ती बाई ( म्हणजे हवाई बाई. तिला मी मागच्या सेक्टर वर पण हाच प्रकार झाल्याचे सांगितले) मला तोंडभरुन म्हणाली "you should have informed this to the ground staff" मग मात्र माझे डो़के सटकले. माझा पुणेरी बाणा दाखवत मी तिला विचारले "You mean to say that i should have assumed that Go Air ground staff is idiot enough to repeat the same mistake again?" (वाचताय ना मी किती फर्डे इंग्रजी फाडतो ते). अखेर परत अल्फा, ब्राव्हो, डेल्टा चा खेळ खेळत मी एकदाचा स्थानापन्न झालो.

तासाभरातच विमान श्रीनगरपाशी पोचले. आणि खिडकीबाहेर बघुन मी तृप्त झालो. कापूस पिंजुन ठेवावा तसे ढग आणि त्या ढगांआडुन डोकावणारी "स्नो व्हाइट " म्हणजे काय त्याची अनुभुती घडवणारी हिमशिखरे. फोटो न काढण्याची एयर होस्टेसच्या सुचनेला फाट्यावर मारुन कॅमेर्‍याचा क्लिकक्लिकाट सुरु झाला. जे दिसले जे अनुभवले ते याआधी अनेकांनी अनुभवले असेल. युरोप अमेरिका वारी करणार्‍या हाय फ्लायर्स साठी हा नजारा काही नवीन नसेल. पण माझी ही पहिलीचे वेळ होती.

गो एयर चा त्रास आणि तिकीटाचे पैसे वसूल झाले. हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर तो अभी बाकी थी.

प्रवासभूगोलमौजमजाछायाचित्रणविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद्_पुणे's picture

9 May 2011 - 2:23 pm | प्रमोद्_पुणे

सुरुवात तरी भारी झाली आहे..पुढचे भाग टाक लवकर..

निमिष ध.'s picture

9 May 2011 - 9:37 pm | निमिष ध.

वा पहिला भाग एकदम झकास झाला आहे. आता पुढील भागांची वाट पाहतो आहे.
"गो एयर मध्ये जागा मिळणे हे असेही एक युद्धच होते " हे युद्ध खासच !

प्रास's picture

9 May 2011 - 10:15 pm | प्रास

लई भारी सुरुवात केलीय हो.

तसं मलाही गो एअर नाही गमत फारशी पण तुम्हाला तिच्यातून दिसलेला नजारा मी पाहिला असता तर मीही तिला अशीच माफ करून टाकली असती.

येऊंद्या पुढले भाग......

सुनील's picture

9 May 2011 - 10:22 pm | सुनील

सुरुवात छान.

या पुढे गो एयरला फाट्यावर मारण्याचा निश्चय झाला आहे!

बाकी थेट श्रीनगरला गेल्यामुळे तुम्ही जम्मू ते श्रीनगर हा जवळपास १२ तासांच्या रोमहर्षक घाटरस्त्याच्या प्रवासाला (कोण तो लेका प्रयासाला म्हणतोय?) मुकलात!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

सुरूवात मस्त झाली आहे.
पुढचे भाग लवकर टंका.

५० फक्त's picture

10 May 2011 - 7:27 am | ५० फक्त

मस्त रे एकदम मस्त येउ द्या छान छान फोटो आणि वरणनं, १९९९ साली गेलो होतो, पुन्हा एकदा जायचा विचार करतोय, पाहुया कसं जमतंय ते .

प्रचेतस's picture

10 May 2011 - 8:53 am | प्रचेतस

पुढचा भाग टाक पटापट आता. अजूनपर्यंत काश्मीरला गेलो नाही, तुझ्या नजरेतून तरी बघून घेतो.

प्यारे१'s picture

10 May 2011 - 9:26 am | प्यारे१

मस्तच.........!!!

विनायक बेलापुरे's picture

10 May 2011 - 10:28 am | विनायक बेलापुरे

तुमचे फ्लाइट वेळेवर सुटले आणि तुम्हाला हातीपायी धड घेउन गेले याहून दुसरा आनंद काय असू शकतो ?

पण सुंद्रीने (हवाई ) खायला काय काय दिले ? (त्यांच्या पाकृ अंमळ वेगळ्या असतात). त्याचे पण "रसभरीत" वर्णन आले असते तर बरे वाटले असते. असो.

छान चाललयं !! मिशनचा पुढील भाग वाचायला उत्सुक.

मृत्युन्जय's picture

10 May 2011 - 11:05 am | मृत्युन्जय

सुंद्री (हे वाचायला कसे अगदी चिचुंद्री सारखे वाटते आहे) काय देतीय खायला. पाणी पण विकतात साले गो एयर मध्ये. १५० रुपयाचे सॅण्डवीच खाउन अपचन झाले असते मला. त्यामुळे घरुन नेलेल्या काका हलवाईच्या बाकरवड्या खाल्ल्या. विमानात बसल्यावर जेवण झालेले असुनसुद्धा खायची इच्छा का होते यावर कोणी प्रकाश टाकु शकेल काय?

प्रचेतस's picture

10 May 2011 - 11:10 am | प्रचेतस


तुम्ही चक्क चितळेंच्या बाकरवड्या सोडून काका हलवाईंच्या नेल्यात?

मृत्युन्जय's picture

10 May 2011 - 11:41 am | मृत्युन्जय

त्यांचा बिझिनेस कसा व्हायचा नाहितर?

मुलूखावेगळी's picture

10 May 2011 - 10:33 am | मुलूखावेगळी

मस्त लिहिलेय रे
लवकर टाक पुढचे भाग

तातडीने टाक पुढचे भाग. अनेक वर्षे राहून गेली आहे ही ट्रिप..

शाळेच्या वयापासून.

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2011 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या रे.
मस्त लिखाण. पु भा प्र.

बादवे हा लेख प्रकाशित करताना देखील तू केलेले युद्ध आठवले ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 May 2011 - 12:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इना, "... repeat ... again" असलं इंग्रजी बोल्लं की असंच होणार रे! ;-)

(इतक्यातच एयर इंडीयाच्या वैमानिकांच्या संपाच्या तडाख्यात सापडलेली) अदिती

अवांतरः चितळेंच्या बाकरवड्या मलाही आवडत नाहीत, फार तिखट असतात. काका हलवाईकडच्या खाऊन पाहिल्या पाहिजेत.

आशु जोग's picture

18 Aug 2013 - 11:36 am | आशु जोग

अदिती तै
आपण पुण्याच्या नाही का ? असं वाटलं खरं.
बा द वे
आपण मिपावर अ‍ॅक्टिव्ह असाल नसाल तरी आमचे मेसेंजर हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवतीलच.

आशु जोग's picture

17 Aug 2013 - 9:05 pm | आशु जोग

गो एयर मध्ये आणि एष्टी मध्ये फारसा फरक नाही
अजिबात दुमत नाही

जॅक डनियल्स's picture

17 Aug 2013 - 9:12 pm | जॅक डनियल्स

कश्मीरच्या पुढच्या लेखाची वाट बघतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2013 - 2:46 am | प्रभाकर पेठकर

१९८४ साली मुंबई-दिल्ली-श्रीनगर विमानप्रवास केला होता. नववधू बरोबर होती त्यामुळे अर्थात खिडकी तिलाच मिळाली. बाकी खिडकीतून बाहेर डोकावताना नववधूचा होणारा ओझरता स्पर्श म्हणजे मेजवानी आधीच्या, आवडीच्या, सूप सारखे होते. खिडकीतून बाहेर काय पाहिले काsssssही आठवत नाही.

चिगो's picture

18 Aug 2013 - 11:57 am | चिगो

रसिक काका..

टवाळ कार्टा's picture

18 Aug 2013 - 7:14 am | टवाळ कार्टा

"फोटो न काढण्याची एयर होस्टेसच्या सुचनेला फाट्यावर मारुन कॅमेर्‍याचा क्लिकक्लिकाट सुरु झाला."

???

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2013 - 2:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त सुरुवात !

पण पुढचे भाग कुठे आहेत... तेही वर काढा कोणीतरी.

यशोधरा's picture

14 May 2015 - 9:11 am | यशोधरा

भारी!

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 11:50 am | मृत्युन्जय

मिशन काश्मीरची ही पुर्ण मालिका लिहुन काही वेळ झाला. त्यावेळेस मला व्यवस्थित लिंक्स देता यायच्या नाहित त्यामुळे या मालिकेच्या बर्‍याच भागात मालिकेतील बाकीच्या लेखाच्या लिंक्स नाहित, त्यामुळे प्रतिसादातुन त्या सगळ्या लिंक्स येथे देत आहे. त्यामुळे काही काळापुरते सगळे लेख उगाच वर येतील त्याबद्दल क्षमस्वः

मिशन काश्मीर १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर - भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर - अवंतिपुरा, पहलगाम - भाग ५ - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर - भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर - ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर - केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309