एलियनाटीसेलिया भाग ३

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 8:27 pm

मागील भागः
एलियनाटीसेलिया भाग २
एलियनायटीसेलिया भाग १

{डिस्क्लेमर्}या भागाला डिस्क्लेमर नाही.{डिस्क्लेमर संपलं}

तो पेपरातलं सुडोकू सोडवत होता. आता शुक्रवारी काय तो पाचनंतर काम करणार आहे?", असं इयन म्हणतच होता आणि मला घेऊन टी-रूममधे आला. समोरच एक प्रश्न आला. "हाय, तू संहिताच ना?"

मी खाली बघत चालत होते, अचानक मान साठ अंशाच्यावर वर केल्यावर एक चेहेरा दिसला. एक एकमितीय, वन डायमेंशनल हो, माणूस समोर उभा होता. "हाय, मी नील जॅक्सन!". "अच्छा तर हा सहा फूट, पन्नास किलो नील जॅक्सन काय," हा विचार दाबून टाकत मीपण त्याला हाय केलं. "नील आणि मी 'गुरूत्वीय भिंग' या विषयावर काम करतो. आमच्या दोघांशी बोलून, चर्चा करून, थोडं वाचन करून तू ठरव तुला कोणाबरोबर काम करायचंय ते", इयननी संशोधनाचा विषय कसा ठरवतात यावर थोडा प्रकाश पाडला. "हं, ठीक आहे", मी म्हटलं. "तुला घरी कळवायचं असेल तर चल माझ्या केबिनमधे! भारतात एक फोन करायला काहीच हरकत नाही," इयन म्हणाला. मी मात्र लाजून "मी एक इमेलच करते, तसंही आता घरचे झोपलेलेही असतील कदाचित" असं म्हटलं. इमेल केलं, आणि मग नीलनी सगळ्या मुख्य इमारतीची सैर घडवली. "पुढच्या आठवड्यात सगळेच नवीन विद्यार्थी येतील तेव्हा सगळा परिसर दाखवेनच", नीलसुद्धा इयनसारखा प्रेमळ माणूस वाटला. आणि मग इयन मला घेऊन "घरी" गेला. अर्थात तेव्हा तो ठोकळा घर वाटलंच नाही. "'चेशर हंट' विद्यापीठानी आता विकत घेतलंय. इथे काम करणारे काही विद्यार्थी तिथे रहातात. तुझ्यासाठी आत्ता एक खोली आहेच, पुढे तुला वाटलं तर दुसरं घर बघ, किंवा इथेच रहा." हेच ते घर (आता आहे की नाही माहित नाही.)

घरासमोरचा रस्ता अगदीच छोटा होता. पण तरीही खूप वर्दळ होती. वेळही संध्याकाळची होती, लोकं घरी जात असणार आता! घराचं पुढचं आवार एवढं छोटं होतं की इथेपण टी.चंद्रशेखर येऊन गल्ली रुंद करुन गेलाय की काय असा संशय मनात आला. अर्थात ठाण्यातून उचलून एकदम "लोअर विदिंग्टन" नावाच्या खेड्यात नेऊन टाकलं तर दुसरं काय होणार? पण घराच्या मागच्या बाजूला खूप मोठी जागा होती, छान बाग होती आणि इतर पडीक दोन इमारती होत्या. "काय असेल कोण जाणे, आता इथे रहायचंय एखाद वर्ष तरी तर नंतर शोध लावता येईल". इयन घराची आणि माझ्या खोलीची किल्ली घेऊनच आला होता. तो मला वर घेऊन गेला, माझी खोली पहिल्या मजल्यावर मागच्या बाजूला होती. एका माणसासाठी पुरेशी मोठी होती खोली आणि स्वच्छही! खिडकीतून मस्त नजारा दिसत होता. आणि अचानक माझं लक्ष छताकडे गेलं. "हे काय? छताला पंखा नाही? मग रात्री झोप कशी येणार?", तरीही मी काही दाखवलं नाही. उगाच इयन म्हणायचा इंग्लिशमधे, "कुठून कुठून लोकं येतात कोण जाणे!" मी इयनला थोडा दिलासा दिला, "चांगली आहे खोली आणि घरपण! मला आवडलं." "ठीक आहे तर, मी आता निघतो. उद्या सकाळी मी असेन शनिवार असला तरी. येणार असलीस तर माध्यान्हीपर्यंत मी असेन माझ्या ऑफिसमधे.", इयन म्हणाला. आभारप्रदर्शन आणि टाटा-बिर्ला करून झाल्यावर तो गेला. मी परत खोलीत आले. दोन बॅगा भरून सामान लावलं, आंघोळ केली; सामानातून खाऊ काढला. खूप दमले होते, तसंच खाऊन झोपले, संध्याकाळचे साडेसातच झाले असतील.

अजून जेट-लॅग गेला नव्हता, सकाळी पाचलाच जाग आली. मग हा जेट-लॅग खरा असतो आणि लोक नुसतेच थापा मारत नाहीत यावर माझा विश्वास बसला. मी आरामात आवरुन सातलाच बाहेर पडले. रमतगमत पंधरा मिनिटाच्या रस्त्यासाठी एक तास लावून जॉड्रलमधे पोहोचले. तिथे टेलिस्कोप कंट्रोलर सोडून शनिवारी भल्या पहाटे आठ वाजता कोणीही नव्हतं. त्या लोकांना मात्र एकही दिवस सुट्टी नाही, होळी नाही, पोळा नाही, ख्रिसमसही नाही, कोण ना कोणतरी तिथे असणारच! त्या दिवशी मार्क होता, त्याला कोणीतरी भल्या पहाटे आल्याचा आनंद झाला. तो लगेचच कंट्रोल रूम सोडून बाहेर आला, मी कोण, काय चौकशी केली. नवीन आहे तिथे समजल्यावर लगेचच आत कंट्रोल रूममधे घेऊन गेला. तिथलं सगळं काय, कसं चालतं दाखवलं. मला वाटलं काय अगत्यशील माणूस आहे, काही दिवसांमधे समजलं, त्यांनाही कंटाळा येतो तिथे बसून, मग कोणी बकरा/री मिळाली की मग कापायचं त्या/तिला!

इयनही थोड्या वेळानी आला. मग आम्ही थोडा वेळ विज्ञानासंबंधी चर्चा केली, मी फक्त श्रवणभक्तीच केली, त्याने थोडे संदर्भ दिले वाचायला; थोडी त्या जागेबद्दल, इंग्लंडबद्दल माहिती दिली. माझा उत्साह इयन गेल्यावर फार वेळ टिकला नाहीच, मी घरी आले. घरी टॉम, मिंग आणि डेव्ह भेटले. टॉम आणि मिंग माझ्याच ग्रुपमधे काम करणारे आणि डेव्ह पल्सार्सवर! डेव्ह सोडून कोण काय बोलतंय काही टोटल लागत नव्हती. प्रत्येक वेळी, "सॉरी", "काय", "पार्डन मी" सुरू होतं. डेव्हच्या लक्षात आलं, "अगं, मी बरंच फिरलेलो आहे. माझा जन्मच हाँगकाँगचा! त्यानंतर कॅनडा झाला, बेलफास्ट (हे उत्तर आयर्लंडमधे आहे) झालं, आणि आता इथे आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात काही फारसे हेल नाही आहेत. टॉम अगदी इथल्या लोकांसारख्या हेलात बोलतो, चेशरमधल्या! आणि मिंग चीनी आहे, तो काय बोलतो मला आता दोन महिने झाले तरी नाही नीट समजत. पण तुझं बोलणं समजतंय!" मला जरा बरं वाटलं.

दोनेक दिवसात त्या दोघांच्याही हेलांशी बरीचशी ओळख झाली. अर्थात, मिंग आजही बोलायला लागला तरी हॉर्स म्हणतो का हाऊस नीट समजत नाही, आणि आम्ही त्याला वाल्क आणि वर्क असे दोन शब्द, शब्दशः म्हणायची विनंती केली. तो आपलेच उच्चार योग्य असा दावा करत ती अमान्य करतो हा भाग निराळा! रोज जॉड्रलला जायचं, वाचन करायचं, शिकायचं, घरी यायचं, गुपचूप जेवण बनवून जेवायचं आणि झोपायचं असा एक आठवडा गेला. त्या आठवड्यात माझं सगळं 'बाळसं' उतरलं. तिथे जायच्या आधी, काकू, मावश्या, माम्या, सगळ्यांनी एवढ्या प्रेमानी खायला घातलं होतं, आता पोरगी पुन्हा दिसणार नाही, तिला तिकडे उपाशी ठेवणार या समजुतीनी, त्यामुळे महिन्याभरापूर्वी घेतलेल्या जीन्स मला घट्ट होत होत्या. त्या सगळ्या या एका आठवड्यात सैल व्हायला लागल्या. "तेवढंच चांगलं" अशी मी मनाची समजूत घातली. आणि रविवारीपण घरी बसून करणार काय, म्हणून पुन्हा जॉड्रलला गेले.

नेहेमीप्रमाणे संध्याकाळी घरी आले. समोरून एक प्रचंड मोठा, राक्षस आला, "हाय, मी माईक कीथ. मी आजच आलो इथे!". हा तर त्या नीलपेक्षाही उंच होता, घटोत्कचच हो! माझ्या दुप्पट आकाराचा तरी होता. त्याला वरपासून खालपर्यंत बघायला मला तीन पूर्णांक चौदा शतांश सेकंदं लागली. एकदा घड्याळ्यात पहा म्हणजे समजेल केवढा वेळ असतो तो ते! "हाय, मी संहिता, मी इथे मागच्याच आठवड्यात आले", माणूस आकारानी एवढा मोठा असू शकतो या धक्क्यातून स्वतःला सावरत मी बोलले. अर्थात हा आकारानी जरी घटोत्कच होता तरी चेहरा अगदी गोंडस, लहान मुलासारखा होता. मला बघितल्यावरच माईक दोस्त म्हणून एकदम आवडला. "तू भारतीय का ...", त्याला अर्धवट तोडूनच मी म्हटलं, "हो. आणि तू?". "मी ब्रिटिश आहे, मुळचा मिडल्सब्राचा, डरहममधे शिकलो." "हे दोन्ही कुठे आलं, मला काहीच कल्पना नाही." "इथून बरंच उत्तरेला. बरं ते ठीक आहे, तुझा आज जेवणाचा काय बेत आहे?". ऑ, हे काय? "मला भारतीय जेवण खूप आवडतं. माझे पालक घरी बनवतातपण अनेकदा! तुला चालणार असेल तर मी आज तुझ्यासाठी आमच्या पद्धतीचं जेवण बनवतो, तू मला उद्या खायला घाल, चालेल?" मी फारच दचकले. माईक बोलतच होता, "पण मी शाकाहारी आहे. तुला चालेल का?". आता मात्र मी दचकून आडवी होणंच बाकी होतं. आता तर माईक मला फारच आवडला. किती व्यवहार्य कल्पना होती ती; दोघंही आळशी आणि शाकाहारी! घरातला आकारानी सगळ्यात छोटा आणि मोठा रहिवासी जेवण एकत्र करतात, हा बाकी सगळ्यांच्या विनोदाचा विषय होता.

त्या रविवारी संध्याकाळी जेनीपण आली. आणि आमची तिघांची चांगली मैत्रीपण झाली. जेनी आणि माईकचा बॉस एकच होता. ते दोघं पल्सार्सवर काम करत होते. आमचं कोर्सवर्क सुरू झालं. आठवड्यातून एक दिवस मँचेस्टरला फेरी, लेक्चर्स असायची विद्यापीठात. तेव्हाच परत येताना भाज्या, फळं, सगळं सामान घेऊन यायचं. माईकची कार होती पण पार्किंगचा नेहेमीचा प्रश्न मँचेस्टरमधेही होताच. मग कार स्टेशनात लावायची आणि ट्रेननी जायचं मँचेस्टरला. स्टेशनच्या बाहेरच मोठ्ठं दुकान होतं. परत येताना आठवड्याचा बाजारहाट करून घरी परत! आणि बाकी चार दिवस जॉड्रलमधे काम, संध्याकाळी ब्रिटीशांच्या वेळेला म्हणजे साडेसहा, सातपर्यंत जेवायचं, आता गप्पा मारायला मित्र-मैत्रीणी होत्याच. शनिवार-रविवार आराम करायचा, टिव्ही पहायचा अगदीच कंटाळा आला तर पुन्हा जॉड्रलला जाऊन टाईमपास करायचा! दिवस अगदीच रटाळ राहिले नव्हते, पण लहान मात्र व्हायला लागले होते.

आणि एक दिवस माईक मला म्हणाला, "माझं एक काम करशील उद्या?". "काय रे काय झालं?" मी विचारलं. "अगं, तुला माहित्ये ना, उद्या माझ्या आजीचा पंच्यातरावा वाढदिवस आहे, मला तिकडे जायचंय. पण उद्या नेमकं मला तो मोठ्ठा लव्हेल टेलिस्कोप आहे आपला, त्याच्यावरुन ऑब्झर्व्हेशनपण करायचंय. बरं त्यातून उद्या शनिवार, अँड्रयू, मायकलपैकी कोणीच नाही आहे इथे, सगळे कॉन्फरंससाठी गेल्येत जर्मनीला. तू उद्या माझ्यासाठी प्लीज जॉड्रलला जाशील त्या पल्सारच्या ऑब्झर्व्हेशनसाठी?". "हो, चालेल. तसंही मी कधी स्वतः ऑब्झर्व्हेशन्स केली नाही आहेत. आणि मला तसंही उद्या काही काम नाहीये." "पण फारच विचित्र वेळेला आहे ऑब्झर्व्हेशन. सकाळी सहा वाजता आहे. मी तुला गाडीनी सोडतो तिथे आणि मग मी जाईन." माईकनी लगेच आपला उपकार कमीत कमी घेण्याचा ब्रिटीश बाणा दाखवला. "काही गरज नाही आहे रे, मी जाईन चालत." मलाही जरा विचित्र वाटलं, तो नेहेमी कुरकुर न करता स्टेशनला लिफ्ट देतो आणि आता मी त्याच्यासाठी काही करू शकते तर .... "असू देत गं! तू एवढं काम करत्येस माझं. मी सोडेन तुला. पण आज चहाच्या वेळेत जरा थोडा वेळ ये कंट्रोल रूममधे, काय करायचंय ते तुला दाखवून ठेवतो." "ठीक आहे, ठरलं तर मग!" आणि त्यानी सगळी सेटींग्ज, कोणती ऑब्जेक्ट्स बघायच्येत ते दाखवून ठेवलं. नुसतेच पल्सार्स बघून फायदा नसतो, तो डेटा कॅलिब्रेट करायला काही विशिष्ट माहित असलेले सोर्सेसही बघायला लागतात, त्यांना कॅलिब्रेटर्स म्हणतात. तेही त्यानी नीट दाखवलं. रात्री आम्ही सगळेच सकाळी लवकर झोपायचं म्हणून लवकरच आडवे झालो. मला नीट झोपच येत नव्हती. उद्या तो प्रचंड टेलिस्कोप मी वापरणार या विचारानीच मी थरारून गेले होते.

सकाळी लवकर उठलो. अजून सूर्याजीराव झोपेतच होते. माईकनी मला जॉड्रलला सोडलं आणि तो पुढे गेला आजीकडे. मी कंट्रोल रुममधेच गेले, आजपण मार्कच होता तिथे! अजून थोडा वेळ होता ऑब्झर्व्हेशन सुरू व्हायला, आम्ही दोघं चहा बनवायला गेलो, आणि मोठे मग्ज भरून कषायपेय घेऊन गप्पा मारत आलो. सगळी सेटींग्ज केली. ऑब्झर्व्हेशनच्या आधी कॅलिब्रेटर बघायचा, दर अर्ध्या तासानी पुन:पुन्हा बघायचा असा प्लॅन होता. टेलिस्कोप हळूहळू वळत होता, पण तेव्हाच संगणक जो काही डेटा येतो तो गोळा करून दाखवतच होता. अचानक एका ठिकाणाहून खूपच जास्त सिग्नल्स येत असलेले दिसले. मला वाटलं मी अजूनही झोपेतच आहे. मी मार्कला हाक मारली. तो आला डुलत डुलत, आणि त्यालापण असंच वाटलं. आकाशाच्या या भागातून कधीच एवढे स्ट्राँग सिग्नल्स येत नाहीत. मी माहित असलेल्या वस्तूंची यादी काढली, त्यातही ही जागा नव्हती. "काहीतरी लफडं असणार. आपण कॅलिब्रेटर पाहूयाच म्हणजे किती तीव्रतेचे सिग्नल्स आहेत ते समजेल", आम्ही दोघं एकाच वेळी म्हणालो. कॅलिब्रेटर पाहिल्यावर समजलं की ते सिग्नल्स खरंच खूप सशक्त होते. "पुन्हा टेलिस्कोप तिकडे फिरवून पाहूया दोन मिनिटं?", मार्कचंही तेच मत पडलं. आणि त्या दिशेला काहीच नव्हतं, मोकळं आकाश!

क्रमशः

बालकथाविनोददेशांतरमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मेघना भुस्कुटे's picture

15 Sep 2008 - 8:34 pm | मेघना भुस्कुटे

च्यायला, तो आंद्या म्हणाला तसं खरंच दर भागाच्या शेवटी 'असंभव - ढँग' चाललंय की तुझं. पण लय मजा येतीय. माणसं झकास उभी राहतायत डोळ्यांसमोर. अगदी चार-दोन ओळींत. घटोत्कच चेहरा - निरागस भाव - ब्रिटीश स्वभाव... चालू द्या जोरात!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> च्यायला, तो आंद्या म्हणाला तसं खरंच दर भागाच्या शेवटी 'असंभव - ढँग' चाललंय की तुझं.
हे असंभव काय असतं?

>> पण लय मजा येतीय. माणसं झकास उभी राहतायत डोळ्यांसमोर. अगदी चार-दोन ओळींत. घटोत्कच चेहरा- निरागस भाव - ब्रिटीश स्वभाव...
:-) त्याच्याकडे बघून मला "महामानव" आणि "घटोत्कच" हे दोनच शब्द आठवले होते.

आणि बोल सखे, तुझी डीमांड काय?

मेघना भुस्कुटे's picture

16 Sep 2008 - 10:49 am | मेघना भुस्कुटे

'असंभव' एक गूढ-अतर्क्य डेलीसोप असतो, ज्यात शनिवारी काहीतरी उत्सुकता टांगणीला लावून ठेवतात आणि 'ढँग' करून एपिसोड संपवतात.

माझी मागणी? जरा नकारात्मक आहे -

१. टिपिकल अमेरिकी सिनेमाप्रमाणे एलियन्स जग वाचवायला / नष्ट करायला येऊ नयेत.
२. ते कुरूप / विद्रूप / चाइल्डिश नसावेत.
३. विश्वात नांदणार्‍या अजून एका प्रगत जीवसृष्टीबद्दल -म्हणजे आपल्याबद्दल - त्यांना तुच्छता / अकारण पंखाखाली घेणारा काळजीवाहू पालकभाव / दुष्टावा नसावा. आपल्याला जसे त्या कल्पनेचेही अप्रूप असते, तसे त्यांनाही ते असणारच. ते जमल्यास दिसावे.
४. प्रगत म्हणजे काहीतरी यंत्रमानवसदृश ही एक आचरट समजूत प्लीज टाळावी. प्रगतीची अनेक निरनिराळी रूपं असू शकतात. भौतिकशास्त्राखेरीज इतर अनेक शाखांमधे ही प्रगती होऊ शकते - जसं की मानसशास्त्र - हे लक्षात ठेवावे. पुरातत्त्वशास्त्र, दैवतांचा अज्ञात इतिहास, मानववंशशास्त्र यांवरही एलियन्सच्या संपर्कामुळे काही प्रकाश पडू शकतो की. निव्वळ 'कॅन्सरवर मात, एड्सवर औषध, पर्यावरण वाचवा' असे बाळबोध संदेश कृपया नकोत.
५. टंच एलियनींना आपली काही हरकत नाही. ;) पण अशा प्रकारे शोषण होणारच असेल, तर ते उभयलिंगी असावे. (म्हणजे - एखादा मिलिंद सोमण -अर्थात पृथ्वीवरचाच - गोष्टीत आला, तर उर्वरित अर्ध्या वाचकवर्गालाही लय धमाल येईल.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. टिपिकल अमेरिकी सिनेमाप्रमाणे एलियन्स जग वाचवायला / नष्ट करायला येऊ नयेत.
२. ते कुरूप / विद्रूप / चाइल्डिश नसावेत.

ते मलाही तसे आवडत नाहीत.
३. विश्वात नांदणार्‍या अजून एका प्रगत जीवसृष्टीबद्दल -म्हणजे आपल्याबद्दल - त्यांना तुच्छता / अकारण पंखाखाली घेणारा काळजीवाहू पालकभाव / दुष्टावा नसावा. आपल्याला जसे त्या कल्पनेचेही अप्रूप असते, तसे त्यांनाही ते असणारच. ते जमल्यास दिसावे.
४. प्रगत म्हणजे काहीतरी यंत्रमानवसदृश ही एक आचरट समजूत प्लीज टाळावी. प्रगतीची अनेक निरनिराळी रूपं असू शकतात. भौतिकशास्त्राखेरीज इतर अनेक शाखांमधे ही प्रगती होऊ शकते - जसं की मानसशास्त्र - हे लक्षात ठेवावे. पुरातत्त्वशास्त्र, दैवतांचा अज्ञात इतिहास, मानववंशशास्त्र यांवरही एलियन्सच्या संपर्कामुळे काही प्रकाश पडू शकतो की. निव्वळ 'कॅन्सरवर मात, एड्सवर औषध, पर्यावरण वाचवा' असे बाळबोध संदेश कृपया नकोत.

अर्थात, वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्कृती वेगळ्या असतात तसंच हे पण. पण ते पुढचं पुरातत्त्वशास्त्र, दैवतांचा अज्ञात इतिहास, मानववंशशास्त्र यांवरही लिहायचं तर थोडं इनपुट द्या हो मायबाप.
५. टंच एलियनींना आपली काही हरकत नाही. पण अशा प्रकारे शोषण होणारच असेल, तर ते उभयलिंगी असावे. (म्हणजे - एखादा मिलिंद सोमण -अर्थात पृथ्वीवरचाच - गोष्टीत आला, तर उर्वरित अर्ध्या वाचकवर्गालाही लय धमाल येईल.)
माईकला जिममधे पाठवू का? ;-) एक होता मिलींद सोमण तिथे तसाही, आणू का त्याला?

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Sep 2008 - 8:44 pm | ब्रिटिश टिंग्या

वाचतो आहे!

(ब्रिटिश) टिंग्या :)

टारझन's picture

15 Sep 2008 - 9:05 pm | टारझन

एक नंबर ग आज्जे .... आयला मजा आया भिडू.... आता ते सिग्नल्स कसले आहेत याची उत्सुकता ताणून क्रमशः केलंस... आमची अवस्था अगदी ताणलेल्या बाणासारखी झाली आहे.सगळं वर्णन मस्त. माइक पेक्षा जेनीच अजुन खोल वर्णन केलं असतंस की गं .... माइकला आपला हाय बोल ... जिम ला जातो का तो ? का नुसताच पोळ आहे?
फोटू डकवायची ष्टाइल आवडली गं ... वातावरण निर्मितीला पोषक आहेत. आम्ही हा गुणधर्म इन्हेरिट करू :)
पटकन टाक पुढचा भाग.

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आता ते सिग्नल्स कसले आहेत याची उत्सुकता ताणून क्रमशः केलंस...
बोल बाळ तुला एलियन्स हवेत का नकोत?

>> वर्णन मस्त. माइक पेक्षा जेनीच अजुन खोल वर्णन केलं असतंस की गं ....
थ्यँकु! बघते, आता येत्या भागात जेनीबद्दल लिहायचं का, ठीक आहे!

>> माइकला आपला हाय बोल ... जिम ला जातो का तो ? का नुसताच पोळ आहे?
तो आणि पोळ? डब्बल बैल आहे तो. तो खरोखर माझ्या दुप्पट होता, आम्ही भेटलो तेव्हा. पुढे त्याहीपेक्षा जास्त झाला, म्हणे माझ्या हातची पोळी-भाजी खाऊन! :-D
आणि माईक आणि जिम, नो चान्स!

>> पटकन टाक पुढचा भाग.
बघते, वेळ मिळण्यावर आहे.

विद्याधर३१'s picture

15 Sep 2008 - 9:05 pm | विद्याधर३१

तीनही भाग आवडले..
सर्व तपशील व्यवस्थीत उभे करत आहेस..
पुढला भाग लवकर येउ दे.

अवांतरः तात्या पुढचा भाग कधी टाकणार याची माहीती जाहीर केल्याशिवाय क्रमशः प्रकाशीत करता येणार नाही असे काही करता येते का हो?

विद्याधर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 11:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अवांतरः तात्या पुढचा भाग कधी टाकणार याची माहीती जाहीर केल्याशिवाय क्रमशः प्रकाशीत करता येणार नाही असे काही करता येते का हो?

काल मला प्रकाशित करायचं नव्हतं तरी झालं! :-)

तात्यानू, ती सोय पुन्हा द्या की हो "अप्रकाशित" ठेवण्याची! झोप यायला लागली की मला चार वाक्य टाकता येतील इथे. नाहीतर जास्त वाट बघायला लागणार हा! "ये धमकी नहीं चेतावनी है, हा हा हा हा!" ;-)

मनस्वी's picture

15 Sep 2008 - 9:08 pm | मनस्वी

हाही भाग छान. सॉल्लिड अनुभव आहेत!
सिग्नल कसले होते याची उत्सुकता आहेच, शिवाय -

"काय असेल कोण जाणे, आता इथे रहायचंय एखाद वर्ष तरी तर नंतर शोध लावता येईल".

याचीही आहे!
पुढचा भाग लवकर टाक.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 11:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

... एक आणखी किडा डोक्यात सोडल्याबद्दल! आम्ही त्या बिल्डींगच्या मागच्या प्राण्यांना जुनीअंडी आणि टोमॅटो "खायला" घालायचो, पण आता वेगळा विचार आलेला आहे डोक्यात! ;-)

अदिती

धनंजय's picture

15 Sep 2008 - 9:12 pm | धनंजय

ढॅण टॅ ढॅण!

(अथवा अति-अति मंद्र सप्तकात गूढ कॉर्ड्स!)

वाचतो आहे!

मनिष's picture

15 Sep 2008 - 9:19 pm | मनिष

उत्सुकता वाढते आहे!

रवि's picture

15 Sep 2008 - 10:14 pm | रवि

अरे वा .......
एलियन्स आले का ?? .......Wow ......!!

(निरिक्षक)रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

भाग्यश्री's picture

15 Sep 2008 - 10:20 pm | भाग्यश्री

वा.. मस्तच!! सिग्नलचा सस्पेन्स चांगलाच जबर्‍या आहे.. काय आहे याची उत्सुकता लागली आता.. दिवसाला एक भाग कंपल्सरी टाक ग प्लीज !!

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2008 - 10:55 pm | स्वाती दिनेश

हा भागही खुसखुशीत आणि उत्सुकता वाढवणारा झाला आहे,कथेतल्या पात्रांची ओळख तर छान झाली आहे,आता लवकर पुढे काय ते लिही..
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 11:20 pm | प्रभाकर पेठकर

वर्णन अगदी खिळवून ठेवणारे आहे. अभिनंदन.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

वा! मस्त ससपेंन्स.... तो ताजा असतानाच पुढचा भाग येऊ देत.. मस्त उतरलाय हा भाग पण
चला आता पात्रांची सिद्धता झाली आहे .. महाकाय मित्र नक्की कोण आहे? घरा जवळच्या पडीक इमारतीत काय आहे? सिग्नल्स काय आहेत? वाट बघतोय!!!

-(!!!!!!) ऋषिकेश

बन्ड्या's picture

16 Sep 2008 - 3:47 am | बन्ड्या

सही चालली आहेस...अभिनंदन.
पुढचा भाग लवकरात लवकर टाक.

राघव's picture

16 Sep 2008 - 4:15 am | राघव

तिन्ही भाग वाचलेत. छान लिहिलेत. मुख्य म्हणजे खुसखुशीत वर्णन एकदम बेश्ट!
घरातला आकारानी सगळ्यात छोटा आणि मोठा रहिवासी जेवण एकत्र करतात, हा बाकी सगळ्यांच्या विनोदाचा विषय होता. :D

तो टेलिस्कोप बघून आपले डोळेसुद्धा तसेच मोठे झालेत! बाकी क्रमश: चा चांगलाच उपयोग करताय की तुम्ही! पुढच्या भागाची वाट बघतोय, लवकर लिहा :)

(उत्सुक) मुमुक्षु

नंदन's picture

16 Sep 2008 - 5:06 am | नंदन

हा भागही मस्तच. प्रवासवर्णनातून आता रहस्याला सुरुवात होत आहे. "हा तर त्या नीलपेक्षाही उंच होता, घटोत्कचच हो! माझ्या दुप्पट आकाराचा तरी होता. त्याला वरपासून खालपर्यंत बघायला मला तीन पूर्णांक चौदा शतांश सेकंदं लागली." - हे वाचून लंपनची आठवण आली :) [बाकी, रँडमली ३.१४ हा आकडा सुचण्यामागेही वैज्ञानिक डोकं लागत असावं ;)]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

16 Sep 2008 - 7:58 am | धनंजय

त्यामुळे हा जिम/व्यायामशाळेत जात नाही, हे वेगळे सांगायची गरज नाही!

काय मस्त साक्षेप!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 9:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद नंदन!

>> [बाकी, रँडमली ३.१४ हा आकडा सुचण्यामागेही वैज्ञानिक डोकं लागत असावं ;)]
वैज्ञानिक का अवैज्ञानिक माहित नाही, पण माझं डोकं? Does not compute ;-)
आणि ते रँडमली नाही सुचलेलं. "मी बय्राचदा एक मिनिटात येते"च्या ऐवजी ३.१४ मिनीटात येते असं चॅट करताना लिहिते.

घाटावरचे भट's picture

16 Sep 2008 - 5:37 am | घाटावरचे भट

जे ब्बात !!!! लवकर पुढील भाग टाकणे (किंवा टंकणे)...येकदम झबरी!!!!
पल्सार्स म्हटल्यावरच कुठेतरी काहीतरी चुकचुकलं होतं....शंका खरी निघाली म्हणायची!!!

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

रामदास's picture

16 Sep 2008 - 6:25 am | रामदास

गोग्रॅमचा चितार येणार आता.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

विजुभाऊ's picture

16 Sep 2008 - 10:08 am | विजुभाऊ

अर्रे बरेच दिवसानी "गोग्रॅमचा चितार"पुस्तक आठवले
धारपांचे "नेनचिम" ही मस्त आहे

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहज's picture

16 Sep 2008 - 7:36 am | सहज

मजा येत आहे. :-)

नवे भाग येण्याचा हाच वेग कायम राखून "क्रमशः वाल्यांना" एक आदर्श घालून द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> नवे भाग येण्याचा हाच वेग कायम राखून "क्रमशः वाल्यांना" एक आदर्श घालून द्या.

>> वा.. मस्तच!! सिग्नलचा सस्पेन्स चांगलाच जबर्‍या आहे.. काय आहे याची उत्सुकता लागली आता.. दिवसाला एक भाग कंपल्सरी टाक ग प्लीज !!

भाग्यश्री आणि सहज, मला हापिसात बॉसकडून आणि घरी नवय्राकडून ओरडा खाण्याची इच्छा नाही आहे. ;-)
पण एक दिवसाआड तरी जमेल बहुतेक!

भाग्यश्री's picture

16 Sep 2008 - 10:09 am | भाग्यश्री

ह्म्म, एक दिवसा आड इस नॉट बॅड.. सो सूट दिली तुला!! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Sep 2008 - 11:05 am | बिपिन कार्यकर्ते

बॉस ठीक आहे... पण तुझा नवरा ओरडतो? आणि ते सुद्धा तुझ्यावर? काहितरी पटेल असं बोल...

ऋचा's picture

16 Sep 2008 - 10:08 am | ऋचा

मस्त लिहील आहेस ग!!
पण क्रमश: योग्य वेळी टाकल आहेस :)

पुढचा भाग लवकर टाक

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री's picture

16 Sep 2008 - 10:34 am | आनंदयात्री

मागच्या भागापेक्षा या भागात उत्कंठा ताणुन ठेवणे जमले आहे.

सुनील's picture

16 Sep 2008 - 10:47 am | सुनील

कथेचा वेग चांगला आहे.

योग्य जागी क्रमशः.

आता उत्सुकता फार ताणू नका!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

16 Sep 2008 - 2:31 pm | भडकमकर मास्तर

गिअर पडला गिअर पडला...मस्त चाललीय गाडी...
चालूंद्यात...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसुनाना's picture

16 Sep 2008 - 2:45 pm | विसुनाना

तिन्ही भागातली सहजता आवडली.
आता उत्सुकता...वेगळेपणाची!

अवलिया's picture

16 Sep 2008 - 4:01 pm | अवलिया

उत्तम
लवकरात लवकर एलियन किंवा एलियनी येवु द्या
तुमच्यासारखेच विक्षिप्त आहेत का हो ते एलियन?
असु द्या
संभाळुन घेवु

नाना

शितल's picture

16 Sep 2008 - 7:03 pm | शितल

हा भाग ही मस्त झाला आहे.
:)

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 10:38 pm | विसोबा खेचर

अदिती,

तुला मिपावर लिही, मिपावर लिही असं अनेकदा सांगितलं होतं त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय! :)

जियो...! :)

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> तुला मिपावर लिही, मिपावर लिही असं अनेकदा सांगितलं होतं त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय!

तात्या, इथे एखादा नाच करणारा इमोटिकॉन नाही का?

मी विचार करत होते अजून चारेक भागात ही चर्पटपंजरी गुंडाळून टाकेन. मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्या तीन वर्षांत काय विक्षिप्तपणा केला याबद्दल काय लिहायचं आणि कसलं तेच ते एलियनचं गुर्‍हाळ लावायचं या विचारात मी होते. पण आता विचार बदलला आहे. आता कमीतकमी अजून आठेक भाग टाकेन. (चालेल ना?)

आणि हो, लोकहो, जरा मला वेळ द्या लिहायला. रोजच्यारोज, सलग दोन तास मिळतीलच असं नाही. नाहीतर खरं खगोलशास्त्र सोडून मला गोष्टीच लिहायला लागतील आयुष्यभर! ;-)

(प्रतिसादांमुळे उत्साह "य"पट वाढलेली) विक्षिप्त अदिती.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर

पण आता विचार बदलला आहे. आता कमीतकमी अजून आठेक भाग टाकेन. (चालेल ना?)

जरूर.. ! :)

तात्या.

विजुभाऊ's picture

17 Sep 2008 - 11:24 am | विजुभाऊ

मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनी त्या तीन वर्षांत काय विक्षिप्तपणा केला याबद्दल काय लिहायचं
तेच ल्ही .
तसेही तुम्ही एलीयनांपेक्षा काही कमी नसाल त्या भागातल्या लोकांसाठी

तुमची प्यान्ट ढीली होत असेल तर मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतीषाकडे विसरली आहे

सुनील's picture

17 Sep 2008 - 7:23 am | सुनील

डेव्ह सोडून कोण काय बोलतंय काही टोटल लागत नव्हती.
अगदी शक्य आहे..

आमचा एक यॉर्कशायरचा सहकारी "बूस"ने यायचा नि फाईल "उपडेट" करायचा! तर, ससेक्सचा माणूस सकाळी ब्रेकफास्टसोबत "पायपर" वाचायचा!

दर दहा कोसांवर अमेरिकन इंग्रजी बदलत नाही पण ब्रिटिश इंग्रजी नक्कीच बदलते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आमचा एक यॉर्कशायरचा सहकारी "बूस"ने यायचा नि फाईल "उपडेट" करायचा! तर, ससेक्सचा माणूस सकाळी ब्रेकफास्टसोबत "पायपर" वाचायचा!

हे भारीच ... मला कितीतरी दिवस "मुनि" असेल तर काहीही विकत घेता येतं हे समजायचंच नाही.

जवळजवळ पहिलं वर्षभर मला फक्त जॉड्रलमधल्या नीट लोकांशीच बोलता यायचं. तिथल्या जवळपासच्या म्हणजे, "चेशर" आणि "डार्बी"मधल्या लोकांचे उच्चार एवढे भयंकर असतात ना! त्यातल्यात्यात दक्षिणेत एवढा प्रश्न येत नाही. पण "ससेक्स"ही विचित्रच दिसतंय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे!

नंदन's picture

17 Sep 2008 - 10:54 am | नंदन

>>> मला कितीतरी दिवस "मुनि" असेल तर काहीही विकत घेता येतं हे समजायचंच नाही.
- 'फुनि' म्हणणारा जेफ्री बॉयकॉट आठवला :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

- 'फुनि' म्हणणारा जेफ्री बॉयकॉट आठवला

:$
त्याचं नाव काढलं की इंग्रज विशेषतः यॉर्कशरचे लोक अगदी आंबट चेहरा करतात. तो म्हणे बायकोला मारायचा, म्हणून!

सर्किट's picture

17 Sep 2008 - 11:06 am | सर्किट (not verified)

तो म्हणे बायकोला मारायचा, म्हणून!

बॉयकॉट आणि मारायचा ? विश्वासच बसत नाही !

फार फार तर उभ्या बॅटीने तिचे बॉल तटवत असेल.

तुम्ही कधी त्याची ब्याटिंग पाहिली अहे का ? रवी शास्त्रीचा काका होता तो म्हणजे.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 11:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> बॉयकॉट आणि मारायचा ? विश्वासच बसत नाही ! फार फार तर उभ्या बॅटीने तिचे बॉल तटवत असेल.
=))
जे मी ऐकलं ते लिहिलं!

>> तुम्ही कधी त्याची ब्याटिंग पाहिली अहे का ? रवी शास्त्रीचा काका होता तो म्हणजे.
हो तर, अहो मी तेव्हा काय फार म्हातारी नव्हते, आजच्यासारखी १५० वर्षांची (बरोबर ना रे टाय्रा?)
खरंतर, नाही! मला आता रवी शास्त्रीची बॅटींगही नाही आठवत, पण हे कानावर पडलं आहे आधी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2008 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डिश ऐंटेनाच्या चित्रामुळं वाटल काही शास्त्रीय, पारिभाषिक संज्ञा-बिज्ञा, व्याख्या, त्याचे डिटेल्स....असतील म्हणुन लेखन वाचायला जरा टाळाटाळ केली . पण तसे काही नसल्यामुळे हाही भाग सुंदर आणि सुसह्य झालाय, पुढील भागाच्या प्रतिक्षेत. :)

बाय द वे, आमचा एक बाळबोध प्रश्न... आकाशातून सिग्नलच्या साह्याने केवळ डेटा मिळतो की अशी काही सोय संगणकात किंवा तेथील सिस्टीम मधे आहे, की कॅमेरा पुढे पुढे जातो. आणि संगणकावर काही चित्र-बित्र दिसायला लागतात? :W

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डिश ऐंटेनाच्या चित्रामुळं वाटल काही शास्त्रीय, पारिभाषिक संज्ञा-बिज्ञा, व्याख्या, त्याचे डिटेल्स....असतील म्हणुन लेखन वाचायला जरा टाळाटाळ केली . पण तसे काही नसल्यामुळे हाही भाग सुंदर आणि सुसह्य झालाय, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

:-) धन्यवाद. अगदीच अपरिहार्य असेल तिथेच शास्त्र आणायचा विचार आहे माझा. त्यामुळे फार रटाळ होणार नाही बहुदा!

बाय द वे, आमचा एक बाळबोध प्रश्न... आकाशातून सिग्नलच्या साह्याने केवळ डेटा मिळतो की अशी काही सोय संगणकात किंवा तेथील सिस्टीम मधे आहे, की कॅमेरा पुढे पुढे जातो. आणि संगणकावर काही चित्र-बित्र दिसायला लागतात?

एक उदाहरण म्हणून .... जी.एम.आर.टी.सारखे "इंटरफेरॉमीटर्स", किंवा अनेक दुर्बिणी एकत्र करून बनवलेला टेलिस्कोप असेल तर "डेटा" अशा प्रकारानेही दिसतो. (डेटा "बघण्याचे" प्रकार आहेत, त्यांतला हा एक)

आणि त्याची इमेज, किंवा चित्र बनवावी लागतात. खालचं चित्र माझ्या (लाडक्या) गुरूत्वीय भिंगाचं आहे. वरच्या डेटाचा आणि याचा काही संबंध नाही, पण एक उदाहरण म्हणून!

हे वरचं चित्र बनवायला मला जवळजवळ दोन आठवडे लागले. आणि त्यासाठीचा डेटा काही तासांतच आला.
दृष्य दुर्बिणी असतील तर मात्र हे काम काही तासातच होतं.

उर्मिला००'s picture

17 Sep 2008 - 4:46 pm | उर्मिला००

Really very great अदिति,तू खूपच छान लिहित आहेस.मी अगदी हरवून गेले.त्या भूमिकांशी कधी तादात्म्य पावले माझं मलाच कळलं नाही.

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2010 - 4:39 am | इंटरनेटस्नेही

तीनही भाग आवडले.. पुढे वाचतो आहे... :)