एलियनायटीसेलिया - भाग ६

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
27 Sep 2008 - 11:32 pm

मागील भागः
एलियनायटीसेलिया भाग ५
एलियनायटीसेलिया भाग ४
एलियनायटीसेलिया भाग ३
एलियनायटीसेलिया भाग २
एलियनायटीसेलिया भाग १

सगळ्यांना तात्पुरता बाय करून मी वर पहिल्या मजल्यावर, माझ्या खोलीत आले. बॅग भिरकावून दिली एका कोपर्‍यात, पडदे ओढून खोलीत रात्र केली आणि दिवाणावर झोकून दिलं स्वतःला! बरं वाटलं आडवी झाल्यावर, कधी डोळा लागला समजलंच नाही. आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.

खरंतर मला एखाद मिनीटभर समजलंच नाही मी कुठे आहे, हा आवाज कसला, हे काय चाललंय! मला बर्‍याचदा स्वप्नं पडतात आणि कोणी मधेच जागं केलं तर मग मी सत्य आणि स्वप्न यांचा संबंध लावायचा प्रयत्न करते आणि पूर्णच हरवते; तसंच काहीसं झालं. मला स्वप्नात निरुपम दिसत होता आणि ते नवीन सोर्सचे सिग्नल्सही. आधीच या दोन गोष्टींचा संबंध लावत मी हुकले होते, त्यावर हा आवाज. एव्हाना बाहेर किर्र अंधार झाला होता, त्यामुळे खोलीतही काही दिसत नव्हतं. थोड्या वेळानी ट्यूब पेटली आणि मी उठून पडदा उघडला. काही कळत नव्हतं, समोर सगळं पांढरं झालं होतं. अरे हो, चष्मा लावला नव्हता, काय कप्पाळ दिसणार? धडपडत जाऊन ढापणी चढवली आणि पुन्हा खिडकीत गेले, हात काचेला लागला आणि थंडीमुळे एकदम अंगावर शहारा आला. बाहेर सगळं पांढरं बर्फामुळे झालं होतं. दुपारची स्वच्छ हवा कुठच्याकुठे गेली होती आणि सगळी जमीन, छतं सगळं पांढरं झालं होतं. अजूनही आकाशातून कापूस खाली येतच होता. पण तो आवाज कुठून आला?

असा विचार पुन्हा करतेय तर एक मोठ्ठा पांढरा गोळा माझ्या डोळ्यांसमोर काचेवर आपटला आणि अर्ध्याधिक तिथेच चिकटला. माईक ... हो तोच होता तो! "माईक, व्हॉट द ** आर यू डूईंग?", झोपमोड आणि स्वप्नभंग झाल्याचा राग अर्थातच त्याच्यावर निघाला. पण तो राग काय टिकणार होता? आयुष्यात पहिल्यांदा मी प्रत्यक्षात बर्फ बघत होते. पटकन कोट,टोपी, मोजे शोधले आणि घाईघाईत अंगावर चढवून घराबाहेर पडले. सगळेच पहिल्या बर्फात खेळत होते. मी घराचं दार उघडलं, बाहेर आले, आणि "स्वागता"साठी सगळेच सज्ज होते. जेनी, डेव्ह, माईक, मिंग सगळ्यांनी मोठमोठाले गोळे माझ्या दिशेनी भिरकवायला सुरूवात केली. दार बंद करून मी पण "मैदानात" उतरले. अंधारात घराबाहेरचे दोन दिवेपण पुरेसे होते, त्या बर्फामुळे सगळीकडे प्रकाश पसरल्यासारखं वाटत होतं, का मलाच असं वाटत होतं पहिल्यांदा बर्फ बघितल्यामुळे कोण जाणे! मी अजिबात चौकसपणा दाखवला नाही आणि हातात बर्फ घेऊन माझ्यावारचे हल्ले परतवायला सुरूवात केली. "तू पहिल्यांदाच बर्फ बघत्येस ना; मला वाटलंच, म्हणून मी तुला उठवलं झोपेतून, आय ऍम सॉरी", माईकनी माफीनामा सरकवला. "सॉरी, व्हाय? ईन फॅक्ट आय शूड थँक यू. इट्स रियल फन. पण तू परत कसा आलास एवढ्या लवकर?", मी विचारलं. "कंटाळा आला नातेवाईकांचा! त्यापेक्षा इथेच जास्त मजा येते. आणि जेनीचा दुपारी फोनपण आला आज संध्याकाळी बाहेर जायचं का विचारायला, म्हणून आलो. अच्छा ती ऑब्झर्व्हेशन्स झाली ना नीट?", एकीकडे बर्फानी मारामारी सुरू होतीच. आता दोन गट पडले होते, मी, माईक आणि लिसा एका गटात आणि जेनी, डेव्ह आणि मिंग दुसर्‍या गटात आणि मारामारी सुरू होती. लिसा आज जेनीच्या पार्टीसाठी आली होती. ती 'चेशर हंट'मधे नाही रहायची, पण जॉड्रलमधेच पीएच.डी. करत होती. तिचा त्या रात्री आमच्याइथल्या एका मोकळ्या खोलीतच तळ ठोकण्याचा विचार होता. "मोअर द मेरीयर"चा आणखी एक अनुभव येत होता.

अर्धा तास वगैरे घराबाहेर बागेत बागडलो असू, मग मात्र दमलो, हातही दुखायला लागले. मग जेवणाचा विषय आला, प्लॅन असा ठरला की डेव्ह आणि लिसा दुकानात जाऊन रात्रीच्या पार्टीची "सोय" करुन पबमधे येणार आणि आम्ही चौघे, माईक, मिंग मी आणि जेनी तिच्या गाडीतून सरळ पबमधे जाणार. लिसा तेवढी जरा माझ्याशी कमी बोलेल याचा मला खरंतर थोडा आनंदच झाला. ती "सरे"मधली, तिचे उच्चार समजायला जरा त्रासच होता आणि त्यावर ती केंब्रिजची! त्या केंब्रिजमधल्या काही लोकांना आपण केंब्रिजचे म्हणजे एकदम आकाशातून पडलेले असंच वाटतं. एवढं खोटं आणि पुस्तकी बोलायची ती कधी-कधी, की "ए बाई, जरा गप आता, कधीपासून बघत्ये हिचं आपलं चालूच!" असं काहीसं माझ्या मनात यायचं. अर्थात ते ओठावर आणण्याएवढं नव्हतं छळलंन तिनी मला! आम्ही ठरल्याप्रमाणे पबमधे जाऊन त्या दोघांची वाट बघत होता. मी तीनेक महिन्यात पहिल्यांदाच रात्रीच्या जेवणासाठी पबमधे जात होते. त्यामुळे आता मला पुन्हा मदतीची गरज होती, एक बरं होतं, तिथे शाकाहारी पदार्थात फक्त तीनच होते त्यामुळे निवड करणं सोपं होतं. जेनी आणि माईक तत्परतेनी मदत करायला पुढे आले. "हे रिकोटा आणि कॅनलोनी काय असतं?", पहिल्याच पदार्थाच्या नावात मी अडकले. मग रिकोटा आणि पार्मेजन हे चीजचे प्रकार असतात, कॅनलोनी हा इटालियन पदार्थ आहे, स्टर फ्राय चीनी आहे अश्या प्रकारची माझी एक शिकवणी झाली. अर्थात याचा काही फारसा फायदा नव्हता, त्यामुळे एकेक करून तीन वेळा येऊन तीनही पदार्थ चाखायचा निर्धार केला आणि आजच्या दिवसासाठी मेन्यूवरचा सगळ्यात पहिला पदार्थ खायचा असं ठरवलं. "आज मी 'स्पिनच-रिकोटा कॅनलोनी' खाणार", असं मी जाहीर केलं. "चल, मी पण तेच घेतो", माईकनी मैत्री दाखवली का ठरवण्याचा त्रास वापरला कोण जाणे? आणि मग आम्ही थोडा वेळ पुन्हा ऍस्ट्रॉनॉमीबद्दल बोलायला सुरूवात केली. माईकला मी थोडक्यात तो नवा सोर्स, आम्ही केलेली निरीक्षणं असं सगळं सांगितलं. थोडा वेळ आम्ही त्याबद्दल बोललो पण डेव्ह आणि लिसा परत आल्यावर खगोलशास्त्र गुंडाळलं. नाहीतर ती बया पुन्हा सुरू झाली असती, त्यातून तो नवा सोर्स, मग तो काय असेल, कसा असेल यावर ती बोजड शब्द वापरत किती वेळ बोलत बसली असती कोण जाणे!

मस्त पोटभर जेवलो. जेवतानाच मी सगळ्यांना निरुपमबद्दल सांगितलं. मग डेव्ह आणि जेनी सोडून बाकी सगळ्यांसाठी एकेक ग्लास वाईन झाली. हो ना।ई करता करता सगळ्यांनी डिझर्ट्सही खाल्ली आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर लगेचच बाटल्या, वाईन ग्लासेस, काजू, वेफर्स सगळं बाहेर आलं. मला तेव्हाच भज्यांची आठवण झाली. मग बोलता बोलता मी आणि डेव्हनी कोबीची भजी तळली. आणि मग मस्त आरामात बसलो आणि बाटल्या उघडल्या. किती वाजले होते कोण जाणे! एकामागोमाग एक ग्लासेस भरत होते, रिकामे होत होते, कोबीची भजीपाच मिनीटांच्यावर तग धरु शकली नाहीत आणि वेफर्सचे सगळी पाकिटंही संपली. बाटल्याही रिकाम्या व्हायला लागल्या होत्या. आता मात्र डोकी "चालायला" सुरूवात झाली होती. कोणीतरी टूम काढली, चला आता "आर्बोरिटममधे" जाऊ या. "आर्बोरिटममधे या वेळेला आणि एवढ्या थंडीत? सगळा चिखल असेल तिथे, या अंधारात पाय बरबटून घेऊ?", कोणाचातरी विवेक अजून जागा होता. "त्यातच तर खरी मज्जा आहे," दारुचा परिणाम दिसतच होता. "आणि आहे कोण तिथे आपल्या गोंगाटामुळे जागं व्हायला, काय?", आता मलाही चेव चढला होता.

झालं, एकमेकांना आधार देत उठलो, तशाही परिस्थितीत कोट आणि बूट घालावे एवढं आठवत होतं. मलातर फारच शौर्य "चढलं" होतं. आयुष्यात पहिल्यांदाच असा अनुभव येत होता ना, सरळ रेष कोणती ते समजतंय पण त्या रेषेवर पाय नीट नव्हते ठेवता येत! आजच्या दिवसात खूपच काही घडलं होतं, नशीबामुळे एका नव्या सोर्सचा डेटा मिळाला होता, निरूपमशी पहिल्यांदाच "प्रेमळ" बोलणं झालं होतं, आज पहिल्यांदाच बर्फ पाहिला होता आणि आता पहिल्यांदाच युक्लीडच्या भूमितीच्या बाहेर पाय पडत होता. घराबाहेर पडलो, त्या घरामागच्या पडीक इमारतींपैकी एका इमारतीतून बाहेर पडलं की दुसर्‍या बाजूला आर्बोरिटम सुरू व्हायचं. जुना गोठा किंवा तबेला असावा असं आतून पाहिल्यावर वाटायचं. तिथेच एक जुना प्रोजेक्टर ठेवला होता, तो चित्रपटगृहात असतो ना तसल्या प्रकारचा! तिकडे असं बरंच सामान होतं जुनंपुराणं, जॉड्रलमधल्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांनी तिथे आपलं भंगार सामान टाकून दिलेलं होतं. ते नेल्यावर आपल्याला पैसे देण्याऐवजी इंग्रज भंगारवाले आपल्याकडून पैसे घेतात.

त्या भंगारातून वाट काढत आम्ही गेलो पलीकडे आर्बोरीटममधे! झुडपात खसखस झाली. काहीतरी जोरात पळालं दुसर्‍या बाजूला. "ससा असेल", डेव्ह म्हणाला. "ससा एवढा मोठा नसतो, ससा असेल तर एवढा आवाज येणार नाही आणि सशाची धडक बसून झाडावरून एवढं बर्फ खाली येणार नाही....." लिसाचं पुढचं गणित, तत्त्वज्ञान, न्यूटोनियन भौतिकशास्त्र आम्ही कोणीही काही काही ऐकलं नाही. अर्धी बाटली वाईन प्यायल्यावर हिलाअसं सगळं सुचतं तरी कसं असले प्रश्न मला तेव्हा बिल्कुल पडले नाहीत. उगाच कशावरही काय विचार करायचा? असेल काहीतरी नाहीतर आता भास होऊ शकतात असं काही बोलत आम्ही पुढे गेलो. झाडांची दाटी संपली आणि आम्ही मोकळ्यावर आलो. समोर लव्हेल टेलिस्कोप दिसत होता. तो आजफारच पांढरा वाटत होता. मी पुन्हा एकदा डोळे चोळले, खरंच तो फारच पांढरा दिसत होता. "काय रे माईक, तुलाही तो टेलिस्कोप खूप पांढरा दिसतोय का?", मी न राहवून विचारलं. "हो गं, आहे खरा पांढरा फारच! तो बर्फावरून प्रकाश परावर्तित होतोय ना, त्यामुळे असं वाटत असेल," त्या घटोत्कचाला अजून फार चढली नव्हतीच तर! बरोबर आहे, त्याचं वजन किती, माझं किती! "पण तरीही किती होईल रे पांढरा त्यामुळे? मला नाही वाटत फक्त बर्फामुळे झालंय असं; शिवाय त्या रिसीव्हरच्या दोन सावल्या पडल्या आहेत, अशा बर्फामुळे कशा पडतील?", लिसा आता फार पकवत नाही आहे असं आम्हाला वाटलं. पुन्हा शेजारच्या झाडांच्या दाटीतून काहीतरी हलल्याचा भास झाला. "काय रे असेल इथे? एवढ्या रात्री, थंडीत कोण येणार इथे?", जेनीला वाटणारी भीती तिच्या आवाजातून जाणवत होती. आता सगळ्यांचीच थोडी उतरली होती. "चला, आपण जाऊन कंट्रोलरला विचारुया, त्याला माहित असणार काय चालू आहे ते!"

जॉड्रलमधे गेलो, कंट्रोलर जागेवर नव्हताच. तो चहा करायला गेला असणार असा विचार करून आम्ही परत निघालो. आता टेलिस्कोपकडे पाठ करून चालत होतो पण मधूनमधून लक्ष मागे टेलिस्कोपकडे जातच होतं. आणि तो टेलिस्कोप तसाच पांढरा दिसत होता. आता दूर अंधारात कोणीतरी लपूनछपून चालतंय असं वाटत होतं आम्ही जरा भरभर चालत त्या कोणालातरी गाठायचा प्रयत्न करत होतो. पण अल्कोहोल त्याचं कामकरत होता; डोळे बंद होत होते, डोकंही काम करत नाही आहे असं वाटत होतं. आत्ता गादीत झोपलेले असते तर किती बरं झालं असतं असंही वाटत होतं, पण ती हलणारी आकृतीही खुणावत होती.

क्रमशः

वरचा फोटो साभार माईक कीथच्या वेबसाईटवरुन घेतला आहे.

बालकथादेशांतरमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Sep 2008 - 11:57 pm | बिपिन कार्यकर्ते

ढॅणटॅडॅण.....

सस्पेंस बढ रहेला हय भिडू... और आने देव... जल्दी...

बिपिन.

अभिजीत's picture

27 Sep 2008 - 11:59 pm | अभिजीत

हा भाग छानच जमला आहे.
'मला स्वप्नात निरुपम दिसत होता आणि ते नवीन सोर्सचे सिग्नल्सही...' हे तर सहीच ...

(मला फोटो काही दिसत नाहीये.. :W )

असो.
पुढच्या भागासाठी शुभेच्छा.
- अभिजीत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2008 - 12:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कदाचित फोटू दिसत नसेल तर मला मापी असावी ... माझी झोपेची वेळ टळून गेल्यावर मी हे सगळं बरळलं, नाही नाही, खरडलं आहे!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2008 - 12:08 am | बिपिन कार्यकर्ते

आता दिसतं आहे का ?

From Alienitesilia

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Sep 2008 - 12:08 am | ब्रिटिश टिंग्या

वाचत आहे!
सस्पेन्स पुढच्या भागात उलगडला तर बरे होईल!

- टिंग्या

टारझन's picture

28 Sep 2008 - 3:37 am | टारझन

सस्पेन्स पुढच्या भागात उलगडला तर बरे होईल!
आजे .. जास खेचू नगं .. नाय तर गटणुच्या वैनीच्या बांगड्यागत होइल ....

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

ऋषिकेश's picture

28 Sep 2008 - 12:13 am | ऋषिकेश

वा! आता खरी (रंगत) चढू लागलीए ;)
एलियन झुडपातून आला वाटतं!!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

घाटावरचे भट's picture

28 Sep 2008 - 12:44 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो...
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

प्राजु's picture

28 Sep 2008 - 12:53 am | प्राजु

एलियन???
छान. पुढचा भाग लवकर लिहि.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ's picture

1 Oct 2008 - 2:34 pm | विजुभाऊ

काय असेल बरं झुडपात??

भारतात हे उत्तर देणे सोपे आहे. कोणीतरी बसले असेल सकाळी सकाळी ;)
पण यु के त अशी सार्वजनीक सोय असते का ते म्हाइत न्हायी

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मृदुला's picture

28 Sep 2008 - 12:58 am | मृदुला

दोन सावल्यांचे चित्र सुद्धा! मला वाटलं एलियनची गाडी पार्क केली असेल तिथे खाली आणि म्हणून दोन सावल्या.
ही सत्यकथा तर नाही ना? ;-)

भडकमकर मास्तर's picture

28 Sep 2008 - 1:20 am | भडकमकर मास्तर

हा भाग सर्वात आवडला....
कथानायिकेला मादक पेयाची उत्तेजना , त्यात घडणारे भास की सत्य आणि इकडे वाचकांची वाढणारी उत्कंठा यांची अत्यंत योग्य सांगड घातली गेली आहे....
उ त्त म....
आणि तो फोटो कसला बेष्ट आहे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

28 Sep 2008 - 2:11 am | स्वाती राजेश

मस्त आदिती, लवकर लिही.....

मेघना भुस्कुटे's picture

28 Sep 2008 - 2:33 am | मेघना भुस्कुटे

वाईन, निरुपम, रात्र, बर्फ.... किती प्रकारची नशा! आणि आकृत्या... भन्नाट. लवकर लिही आता. जास्त ताणू नकोस. त्या सिंगचं काय झालं पण? ;)

रेवती's picture

28 Sep 2008 - 3:51 am | रेवती

उत्सुकता वाढत चाललीये.
पुढच्या भागाची वाट पाहणारी

रेवती

अनामिक's picture

28 Sep 2008 - 4:15 am | अनामिक

हा भाग पण मस्तं जमलाय...

सुनील's picture

28 Sep 2008 - 6:27 am | सुनील

सुंडर लेख. उत्कंठा वाढतेय. पुढचा भाग लवकर येऊदेत.

अवांतर = या भागात आनंद सिंग बद्दल काहीच कसे नाही बौ?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शितल's picture

28 Sep 2008 - 6:50 am | शितल

आदिती ,
मस्त सस्पेन्स वाढवुन धरला आहेस. :)
लवकर लिही बा नाही तर रात्री डो़क्यात ही तेच विचार येतात .

राहूल's picture

28 Sep 2008 - 7:24 am | राहूल

जबर्‍या. हा भाग सहीच जमलाय, उत्कंठावर्धक!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2008 - 11:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा फोटो रोज रात्री घेता येणार नाही. पण एलियन वगैरे सत्यकथा नाही. भडकमकर मास्तर, तो फोटो "फोटोशॉप" वापरूनही बनवलेला नाही. तुमच्या एवढी फोटोशॉप-स्किल्स नाहीत ब्वॉ माझ्याकडे!

लव्हेल टेलिस्कोपला गेल्या वर्षी पन्नास वर्ष झाली तेव्हा तिथे "फर्स्ट लाईट" नावाचा शो झाला. तेव्हा टेलिस्कोपवर वेगवेगळ्या रंगाचे दिवे रोखून प्रकाश आणि गूढ संगीताचा एक शो झाला. त्या वेळी काढलेला हा फोटो आहे.

मला आनंदयात्री उर्फ आंद्या हलकट्ट उर्फ आनंद राजवीर सिंग याने काहीतरी साय-फाय लिहि असं सुचवलं तेव्हा मी आधी नाही म्हटलं. पण त्याच दिवशी नंतर जुने फोटो पहात असताना हा फोटो समोर आला आणि डोक्यात चक्र घुमायला लागली. हा आणि असे अजून काही फोटो आहेत, तीपण एक प्रेरणा आहेच.

(एलियन कसा असावा याच्या विचारात) अदिती

मदनबाण's picture

28 Sep 2008 - 11:57 am | मदनबाण

यम्म्मी ताई...मस्त लिहले आहेस्..पुढचा भाग लवकर टाक...

( ये एलियन एलियन क्या है ??)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

रवि's picture

28 Sep 2008 - 11:57 am | रवि

आता पहिल्यांदाच युक्लीडच्या भूमितीच्या बाहेर पाय पडत होता

मस्त.........:D

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

अवलिया's picture

28 Sep 2008 - 1:28 pm | अवलिया

हम्म

वाचतो आहे
लवकर लिहा बुवा तुम्ही
फार वेळ घेता मधे मधे

जैनाचं कार्ट's picture

28 Sep 2008 - 3:12 pm | जैनाचं कार्ट (not verified)

यमे... तो एलियन ह्या भागात पण नाय आला :-/

पहीला परीच्छेद वाचून वाटलं की तो एलियनच काचेवर टकटक करत आहे :(

पण हाय.... तो दुष्ट दुसराच कोणी निघाला ~X(

पुढील भागात एलियन दाखव ( लिही ) नाय तर तुझ्या लेख मालेवर बहिष्कार टाकणार आमचं मंडळ !!!

***
मला बी त्या टकल्या रोशनच्या पोरासारखी शक्ती हवी हाय... मी पन सुपरहिरु हुणार ! :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विजुभाऊ's picture

1 Oct 2008 - 2:43 pm | विजुभाऊ

पहीला परीच्छेद वाचून वाटलं की तो एलियनच काचेवर टकटक करत आहे
पण हाय.... तो दुष्ट दुसराच कोणी निघाला

क्रमशः मंडाळाच्या सदस्यानी याची नोंद घ्यावी.
तुझ्या लेख मालेवर बहिष्कार टाकणार आमचं मंडळ !!!

होउन जाउदे. राजे तुम्ही प्रत्येक भागात पळुन जाताय. ते पण कितीही वेळा ;फार तर त्याबद्दल मार खाताय.
कथेत जितक्या उशीरा एलीयन येईल तेवढा बरा. नायतर ही सदस्या त्या एलीयनाला भाजी चिरायला आणि भांडी घासायला लावेल इतकी वस्ताद आहे.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

स्वाती दिनेश's picture

28 Sep 2008 - 5:29 pm | स्वाती दिनेश

हा भाग पण मस्त झाला आहे.
झुडुपात कोण लपलंय त्याची उत्सुकता आता आहे,
स्वाती

झकासराव's picture

29 Sep 2008 - 7:29 am | झकासराव

ढॅण टॅ ढॅण...............
हे म्युजिक अगदि नेमक्या वेळेला वाजवलस बघ. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शिवा जमदाडे's picture

29 Sep 2008 - 8:26 am | शिवा जमदाडे

लै फक्कड जमला है हा पार्ट....
लवकर येवू द्या म्होरला पार्ट.

- (वाईन पेक्षा आमच्या गावची 'भिंगरी' पेनारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

आनंदयात्री's picture

29 Sep 2008 - 9:21 am | आनंदयात्री

मस्त, सशक्त लेखन. या भागातही खिळवुन ठेवले आहे :)

-
(श्टोरीमधुन पत्ता कट झालेला)
आणंद राजविर सिंग

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 11:37 pm | प्रभाकर पेठकर

आयुष्यात पहिल्यांदा मी प्रत्यक्षात बर्फ बघत होते.

मी तर चवथ्या की पाचव्या वर्षीच बधितला होता. दारावर यायची बर्फाचा गोळा विकणारी गाडी.

पण एलियन वगैरे सत्यकथा नाही.

अरेरे! पुढील भागांमधील सगळी उत्सुकताच काढून घेतली.

असो. येऊ दे पुढचे भाग लवकर लवकर. वाचीन बापुडा मन लावून.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 9:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मी तर चवथ्या की पाचव्या वर्षीच बधितला होता. दारावर यायची बर्फाचा गोळा विकणारी गाडी.
हिहीही ...
>> अरेरे! पुढील भागांमधील सगळी उत्सुकताच काढून घेतली.
काका, सत्य नसली तरी गोष्ट असणारच आहे ना!
>> असो. येऊ दे पुढचे भाग लवकर लवकर. वाचीन बापुडा मन लावून.
:-) मग मी लिहिणारच!

अदिती

सुमीत's picture

30 Sep 2008 - 10:24 am | सुमीत

हा भाग तर छान च झाला आहे, दोन महिन्यांनी परत मिसळ पाव वर आलो आणि सगळे भाग एकदम वाचले.
आता उत्कंठा वाढत आहे , पुढे काय?

प्रगती's picture

30 Sep 2008 - 1:23 pm | प्रगती

काय पण ऊत्कंठा वाढवली आहे ,आम्ही जसं पुस्तक हातामध्ये घेतल्यावर पूर्ण झाल्याशिवाय ठेवत नाही तसंच माझं लेख वाचताना
झालं लवकर लवकर लिही.

मनस्वी's picture

30 Sep 2008 - 6:01 pm | मनस्वी

हा पण भाग छान झालाय.
पटपट लिही - असेच म्हणते!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Oct 2008 - 5:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

झकास जमला आहे हा भाग मस्त लगे रहो भिडु

राघव's picture

1 Oct 2008 - 9:50 pm | राघव

हा भाग सगळ्यांत उत्तम वठलाय!! मस्त लिहिताय...
बाकी तुमच्या खुसखुशीत लेखनावर आपण जाम खुष आहोत ब्वा.. लई ब्येस :)
येऊ द्यात लवकर लवकर पुढचा भाग...
(उत्सुक)मुमुक्षु