याचा अगोदरचा भाग http://www.misalpav.com/node/24854
वर झालेल्या अपघाताच्या दुसर्या दिवशी हा तंत्रज्ञ माझ्या दवाखान्यात भरती होता त्याला पाहायला आलेला एक सैनिक मला म्हणाला सर आपला न्हावी आंधळा झाला आहे. मी त्याला विचारले कि हे तुला कोणी सांगितले तर तो म्हणाला कि मी सकाळी केस कापायला गेलो तर न्हाव्याचे दुकान बंद होते. मी आजूबाजूला विचारले तर ते म्हणाले कि त्याला दिसत नाही त्यामुळे त्याने दुकान उघडले नाही.
याची पार्श्वभूमी अशी आहे- विक्रांत सारखी नौका एका वेळी दोन दोन महिने सुद्धा किनार्याला न लागता समुद्रात असे त्यामुळे धोबी न्हावी सिव्हीलीयन बेअरर असे बुणगे (NON COMBATANT) सुद्धा जहाजावर पूर्ण समुद्र प्रवासावर तुमच्या बरोबर असत. त्यांचा विमा सुद्धा नौदलाकडून उतरवला जातो.
त्या सैनिका कडून हे ऐकल्यावर मी त्या न्हाव्याला पाहायला त्याच्या दुकानाकडे गेलो. त्याचे दुकान बंद होते तेंव्हा त्याच्या राहण्याच्या जागी गेलो तेंव्हा तो एका बंक वर अडवा झोपलेला होता आणी त्याच्या पायाला मार लागला होता. मि त्याला विचारले काय झाले आहे त्यावर तो म्हणाला कि सकाळपासून माझे डोळे उघडतच नाहीत. मी बाथरूम कडे तसाच जात असताना एका शिडी वर अडखळून खाली पडलो (हा शिडी असलेल्या हैच मध्ये पडून सात फूट खाली कोसळला होता)तपासले असता त्याला सुदैवाने फक्त मुका मार लागला होता. मी त्यला तिथेच तपासायला सुरुवात केली तेंव्हा मला असे जाणवले कि त्याचे डोळे घट्टपणे मिटले आहेत आणी दोन्ही हातानी प्रयत्न केल्यावरही ते उघडत नाहीत. हे प्रकरण वाटले तेवढे साधे नव्हते.
बाकी त्याला विचारले कि तू काल काय केलेस? काय खाल्ले, काय प्यायलास? त्यावर उपयुक्त अशी कोणतीच माहिती मला मिळाली नाही. या वेळेपर्यंत ७-८ सैनिक तेथे जमा झाले होते. मी त्याला विचारले तुझ्या केबिनमध्ये हा कसलं वास येत आहे? त्यावर तो म्हणाला साहेब मला तर वास येत नाही.
मी त्याला त्या सर्व लोकांच्या मदतीने माझ्या दवाखान्यात घेऊन आलो. त्याची पूर्ण तपासणी केली तेंव्हा काहीच आढळले नाही. मी त्याला तसेच झोपवून एक सलाईन लावले. आणी विचार करू लागलो कि हे काय लफडे आहे? माझ्या डोक्यात प्रकाश पडेना एकच धागा माझ्याकडे होता तो म्हणजे पापणीचे स्नायू आखडले ( BLEPHAROSPASM) होते. शेवटी मी OXFORD TEXT BOOK OF MEDICINE काढून त्यात शोधू लागलो त्यात काहीच मिळेना त्यानंतर (TOXICOLOGY) विषशास्त्र हा विभाग बघता बघता मला एक अंधुक धागा लागला तो म्हणजे हायड्रो जन सल्फाइड विषबाधा (POISONING) यात (BLEPHAROSPASM) होतो.आता मी विचार करू लागलो आणी मला असे वाटले कि त्याच्या केबिन मध्ये येणारा वास हा तसा होता काय? मग मी तेथे त्याच्या बरोबर आलेल्या सैनिकांना विचारले कि तुम्हाला त्या न्हाव्याच्या केबिन मध्ये वास येत होता काय. त्यावर एक सैनिक (हा इंजिन रूमचा तंत्रज्ञ होता)म्हणाला कि साहेब त्याच्या केबिनच्या खाली मैला साठवण्याची टाकी आहे आणी त्या टाकीची मोटर बंद पडली आहे. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. मुळात हजार बाराशे लोकांचा मैला हा तसाच पाण्यात जात नाही तर तो एका टाकीत साठवला जातो आणी नंतर तो एका मोटर च्या सहाय्याने पाण्यात खोल सोडला जातो. हि टाकी त्या न्हाव्याच्या केबिन च्या खाली होती आणी त्या टाकीची मोटर बंद पडल्याने साठलेला मैला कुजला आणी त्यातून हायड्रोजन सल्फाइड ची गळती न्हाव्याच्या केबिनमध्ये झाली आणी त्याच्या पापणीचे स्नायू आखडले. हा अर्थातच माझा तर्क होता आणी तो खरा ठरवण्यासाठी माझ्याकडे भक्कम असा पुरावा कोणताही नव्हता. अर्थात प्राप्त परीस्थितीत माझ्याकडे पर्याय कुठे होते. मुळात त्याला रुग्णालयात हलवण्यासाठी आम्ही मुंबई पासून हजार नॉट अंतरावर होतो आणी माझ्याकडे अजून एक रुग्ण असा आधीच होता ज्याच्यासाठी काही करणे माझ्या हातात नव्हते.
मि लगेच त्या न्हाव्याला DEXAMETHSONE चे सलाईन मधूनच इंजेक्शन ठोकले, डोळ्याच्या पापणीच्या कडेने डोळ्यात क्लोरोमायसेटीन चे थेंब टाकले आणी त्याला धीर दिला कि संध्याकाळपर्यंत सगळे ठीक होईल.मुळात मी त्याला त्या टाकी पासून हलवले होते त्यामुळे होणारा पुढचा संसर्ग टळला होताच. त्याला दवाखान्यातच जेवण मागवले आणी माझ्या वैद्यकीय सहाय्यकाने ते त्याला भरवले. तो न्हावी सुद्धा त्याने इतका भारावून गेला होता. आणी काय आश्चर्य संध्याकाळपर्यंत त्याचे डोळे उघडले आणी त्याला स्पष्टपणे दिसू लागले होते. आता त्याची तक्रार फक्त पाय दुखतो हि होती.( तो ज्या हेच मध्ये पडला होता त्याची). मधल्या वेळात हि मैल्याच्या टाकीची बातमी मी एलेकट्रीकल विभागाला कळवली आणी त्यांना थोडेसे घाबरवले कि अजून कोणाला हा त्रास होईल ते सांगता येणार नाही. त्याबरोबर त्यांनी लगेच तो मोटर दुरुस्त करून तो मैला पाण्यात पंप केला.
हा न्हावी यानंतर माझ्याकडे आग्रह करीत असे कि सर तुम्ही माझ्याकडे केस कापायला या मी तुम्हाला डोक्याचे मालिश करून देतो ते पहा तरी. एक दिवस मी खरच त्याच्याकडे गेलो तर त्याने इतके उत्तम डोक्याला मालिश करून दिले कि खरोखरच जॉनी वॉकर च्या गाण्याची आठवण यावी. यानंतर मी प्रत्येक वेळा न्हाव्याकडे केस कापायला गेल्यावर आवर्जून मालिश करून घेतो. खरोखरच डोके हलके होते
प्रतिक्रिया
23 May 2013 - 11:04 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म.! किनार्यापासून हजार नॉट खोल समुद्रात काय काय समस्या उद्भवतील सांगता येत नाही.
परंतु, हे कांही रुग्ण तुमच्या कौशल्याने वाचले असले तरी ह्या अवाढव्य शहरसदृष जहाजावर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना किनार्यावरील इस्पितळात तांतडीने पोहोचविण्याची व्यवस्था नसणे हे ही जबरदस्त धोकादायक वाटते आहे. वेळेत योग्य अशी वैद्यकिय सेवा नाही मिळाली तर एखादा रुग्ण दगाऊ शकतो किंवा जन्मभरासाठी अपंग होऊ शकतो.
23 May 2013 - 11:12 am | प्रचेतस
अतिशय रोचक अनुभव आहेत हे सर्व.
23 May 2013 - 11:35 am | नेत्रेश
> 'धोबी न्हावी सिव्हीलीयन बेअरर असे बुणगे (NON COMBATANT).... '
डॉक्टर ही पोस्ट कोंबॅट की नॉन काँबॅट असते? नॉन काँबॅट असेल तर त्यांनाही बुणग्यांत धरतात का?
23 May 2013 - 2:07 pm | सुबोध खरे
बुणगे किंवा non combatant हे आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्स कायद्याखाली येत नाहीत त्यामुळे युद्ध सुरु झाले तर ते आजी आजारी आहे किंवा आजोबा कंटाळले आहेत म्हणून पळून गेले तरी त्यांच्यावर वरील कायद्याखाली खटले भरत येत नहित.त्यांच्यावर सिव्हिल कायद्याने खटला होतो आणि त्यांना नोकरीतून काढून टाकले जाऊ शकते.
सैनिक पळून गेला तर त्याचे ताबडतोब कोर्ट मार्शल होते आणि युद्ध स्थिती जाहीर झालेली( declared war) असेल तर याची शिक्षा फाशी आहे. आणि अन्यथा जन्मठेप किंवा १ वर्षे तुरुंगवास आहे. डॉक्टर हा वरील कायद्याखाली येतो.त्यामुळे डॉक्टर चे पण कोर्ट मार्शल होते. शिवाय डॉक्टर हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर हजर असतो त्याला सुद्धा बंदूक पिस्तूल आणि मशिनगन चालवण्याचे पूर्ण प्रशिक्षण घ्यावे लागते (हे मी स्वतः सुद्धा घेतले आहे). मला वाटते आपल्या शंकेचे निरसन झाले असावे
24 May 2013 - 1:28 pm | नेत्रेश
आणी शंकेचे पुर्ण निरसन झाले आहे.
23 May 2013 - 2:13 pm | जेपी
*****
23 May 2013 - 2:14 pm | सुबोध खरे
जन्मठेप किंवा १ वर्षे तुरुंगवास ऐवजी जन्मठेप किंवा १० वर्षे तुरुंगवास असे वाचावे
क्षमा असावी
23 May 2013 - 2:15 pm | पैसा
एकेक चित्र विचित्र अनुभव! तुम्ही त्या परिस्थितीत एवढा विचार केलात म्हणजे ग्रेटच!
24 May 2013 - 6:01 am | मराठीप्रेमी
आपण हे जे आपले अनुभव मांडता आहात त्यामुळे आम्हा सर्वसामन्य माणसांना एरवी दृष्टीआड असणार्या जगात डोकावण्याची संधी मिळते याबाबत आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपली कुठल्याही अभिनिवेशाशिवाय ओघवत्या भाषेत वर्णन करण्याची शैली प्रशंसनीय आहे.
24 May 2013 - 6:41 am | श्रीरंग_जोशी
सर्वच अनुभव एकाहून एक आहेत.
हे सर्व अनुभवामोती आमच्याबरोबर वाटल्याबद्दल अनेक धन्यवाद.
24 May 2013 - 7:20 am | अजितजी
अप्रतिम माहिती आणि उत्तम लेख !
अजीतजी
24 May 2013 - 8:03 am | मुक्त विहारि
अजून एक मस्त उदाहरण...
24 May 2013 - 8:06 am | रेवती
तुम्ही ग्रेट आहात डॉक्टरसाहेब! कोणती साधीशी वाटणारी पण नसणारी समस्या उद्भवेल सांगता येत नसताना, मदत मिळण्यापासून दूर असताना योग्य निर्णय घेतलात नेहमी.
24 May 2013 - 3:34 pm | कोमल
नेहमी प्रमाणे, छान माहिती, मस्त लिखाण..
आवडेश.
24 May 2013 - 7:12 pm | उपास
आवडलं! (नेहमीप्रमाणेच) 'अजून येउंद्या' असेच म्हणेन :)
25 May 2013 - 7:14 am | पाषाणभेद
छान अनुभव.
>>> शेवटी मी OXFORD TEXT BOOK OF MEDICINE काढून त्यात शोधू लागलो
आपण प्री इंटरनेट एरा मध्ये जहाजावर होता त्यामुळे आपणास इंटरनेटवरील मदत मिळणे शक्य नव्हते हे समजू शकते पण जहाजावर काही इतर संपर्क यंत्रणादेखील असतात त्यांची मदत अशा संकटसमयी घेण्यात काय अडचण आली? किंवा अशी मदत घेता येत नव्हती काय? हे समजले तर बरे होईल.
29 May 2013 - 12:31 pm | सुबोध खरे
त्या काळात फक्त उपग्रहाच्या टेलीफोन वरून संपर्क करत येत असे ते सुद्धा भरपूर कष्ट केल्यावर शिवाय हा फोन फक्त MCR( main compass room) म्हणजे जहाज जेथून चालवले जाते तेथे किंवा FLYCO( FLIGHT CONTROL OFFICE) येथे होता. तेंव्हा तेथून फोन करून माहिती मिळण्यापेक्षा तुमचे अज्ञान जगजाहीर होण्याची शक्यता जास्त होती. शिवाय आपल्या डॉक्टरला काही गोष्टी येत नाही हे सर्व सैनिकांना जाहीर होण्यात कोणाचाच फायदा नव्हता. १ ९ ९ ० साली आंतरजाल हे अगदी बाळबोध अवस्थेत होते आणी तुम्हाला पाहिजे तो माणूस तेंव्हा उपग्रह फोन वर उपलब्ध करणे हे कर्मकठीण होते.उगाच लुन्ग्यासुन्ग्याला निरोप देऊन त्याचे उत्तर मिळवण्याची वाट बघणे हे फारसे फायद्याचे झाले असते असे मला वाटले नाही.
या फोनचा एकाच फायदा झालेला मी पाहिला होता तो म्हणजे एका वायुदलाचा वैमानिक विक्रांत वर विमान घेऊन उतरला आणी काही वेळातच त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचा संदेश आला.
तेंव्हा त्याच विमानात नौदलाच एक वैमानिक त्याला घेऊन परत गोव्याच्या दिशेने पाठविला होता.
आजचा जमाना किती पुढारला आहे हे आजच्या पिढीला कळणार नाही. माझा स्वतःचा एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाचा निकाल कळवण्यासाठी १ ९ ८ ४ साली मी पुण्याच्या केंद्रीय तारघरात ६ तास मुंबईला ट्रंक कॉल लावण्यासाठी ताटकळत बसलो होतो तरीही तो लागला नाहीच. हे सुद्धा तेंव्हा माझ्या घरी फोन असून. तेवढ्या वेळात मी मुम्बईला जाऊन परत सुद्धा आलो असतो.
असो.
29 May 2013 - 2:38 pm | गुलाम
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर लेख.
तुमचे विलक्षण अनुभव आणि ते वाचकांपर्यंत पोचवण्याची हातोटी यांना सलाम!!!
29 May 2013 - 4:05 pm | बॅटमॅन
प्रत्युत्पन्नमतित्वाचे एक खल्लास उदाहरण!!!
31 May 2013 - 10:26 am | ब़जरबट्टू
सर, फार छान माहिती..
2 Jun 2013 - 8:19 pm | प्रकाश घाटपांडे
वैद्यकीय ज्ञानाला निरिक्षण व तर्काची जोड असल्यावर प्राप्त परिस्थितीत कसा उपचार करता येतो हे आपल्या उदाहरणावरुन दिसून आले. त्या न्हाव्याला किती बर वाटल असेल याची कल्पना केली.