विक्रांत वरील आयुष्य ४

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
18 May 2013 - 2:05 pm

मार्च १ ९ ९ ० मध्ये विक्रांत सर्व डागडुजी झाल्यावर समुद्रात युद्ध सरावासाठी निघणार असे नक्की झाले होते. माझा समुद्रावरील पहिला दिवस हा अतिशय वादळी झाला होता ते वर्णन खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल. http://www.misalpav.com/node/23980 आणि http://www.misalpav.com/node/23987.
यामुळे मी जर धास्तावलेला होतो परंतु विक्रांतचा एकंदर आकार आणि त्यावर चालणार्या घडामोडी यामुळे त्याबद्दल एक उत्सुकता सुद्धा मनात होतीच. जेंव्हा हा कार्यक्रम मला कळला तेंव्हा त्यावर थोडेसे पाणी पडल्या सारखे झाले कारण पहिला सराव हा फक्त पाणबुडया बरोबर होता आणि त्यात फक्त हेलीकोप्टरच असणार होते कारण सगळी विमाने विराट वर जाऊन दुसर्या तर्हेचा युद्धसराव करणार होती.
आम्हाला मुंबई बंदराचे संरक्षण करण्याची जबाबदारी दिली होती. आमच्या शत्रुपक्षाची रचना पाकिस्तानी नौदला सारखी केलेली होती म्हणजे त्यांची जहाजे आणि जुनाट पाणबुड्या जशा होत्या तशा ( आपल्या जुन्या रशियन पाणबुड्या त्यांना दिलेल्या होत्या आणि आपल्या नवीन (शिशुमार आणि शंकुश) जर्मन पाणबुड्या आमच्या बाजूला होत्या. त्यासाठी आम्ही समुद्रात रवाना झालो. यावेळेस समुद्र एखाद्या तळ्यासारखा शांत होता आणि मी एकटाच विक्रांत वर डॉक्टर होतो. त्यामुळे मी आपल्या बापाची जहागीर असावी तसा जहाजाच्या उड्डाण तळाच्या पुढच्या भागावर राजा सारखा उभा राहत असे. आपल्या मागे एवढी बलाढ्य विमानवाहू नौका आणि चार सी किंग आणि तीन चेतक हेलिकॉप्टर बघून छाती भरून येत असे.
पहिल्या दिवशी आम्ही दिवसभर समुद्रात फिरून रात्री रत्नागिरी बंदराच्या जवळ नांगर टाकला. शत्रुपक्षाची जहाजे आणि हेलिकॉप्टर टेहळणी करीत होतीच. त्यांनी विक्रांत वर घातपाती कारवाया करण्याचा डाव टाकला. आमच्या पाणबुड्या आमच्या जवळ पाण्याखाली होत्याच त्यामुळे त्यांच्या पाणबुडीला सहज जवळ येता येणार नव्हते.त्याशिवाय आमची सीकिंग हेलिकॉप्टर दिवस भर गस्त घालत होतीच. हेलिकॉप्टर पाण्याच्या पृष्ठभागावरून अगदी जवळून (३ ते ४ मीटर) उडताना एका तारेला एक संग्राहक बांधून पाण्यात सोडलेला असतो हा संग्राहक पाण्य्च्या खाली पाणबुडीने केलेला आवाज ऐकत असतो. त्यामुळे तुमचे हेलिकॉप्टर आपल अस्तित्व जाणवू न देत पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न करीत असते.
शत्रुपक्षाने या सर्व गोष्टी गृहीत धरून व्यूहरचना केली होती.
ती अमावास्येची रात्र होती. समुद्रावर ठार अंधार असतो. तुमची जहाजे मुळात राखाडी रंगाची असतात कि जी समुद्राच्या पाण्या पासून रात्री वेगळी दिसत नाहीत. अशा गडद रात्री जहाजावर रात्रभर गस्त चालू असतेच तुम्ही भर समुद्रात नांगर टाकला तरी बाहेरून येणाऱ्या धोक्यासाठी तुम्ही पूर्ण सावध असताच. त्यांनी आपल्या पाणबुडी ला विक्रांत पासून वीस एक
किमी वर पृष्ठभागावर आणली त्यातून रबरी बोटीत तीन कमांडो चढले आणी ते अशा अंधार्या रात्री विक्रांतच्या साधारण दोन किमी अंतरावर पर्यंत पोहोचले जेथून क्षितिजावर विक्रांत जेमतेम दिसत होती. तेथे त्यांनी एका कमान्डोला पाण्यात उतरवले आणी ती रबरी बोट परत पाणबुडीकडे गेली. हा मरीन कमांडो (एक लेफ्टनंट हंचीनाल म्हणून होता) त्या अमावास्येच्या गडद काळ्य़ा रात्री, रात्री तीन वाजता साधारण दोन किमी भर समुद्रात पोहून विक्रांत कडे येत होता.( घातपाती कारवाया करण्यासाठी अशी भर रात्रीची वेळ निवडली जाते कारण अशा वेळी बहुसंख्य लोक गाढ झोपेत असतात आणी पहारेकरी सुद्धा बराच वेळ खडा पहारा देऊन सुस्तावलेले असतात. शिवाय कामाची पाळी बारा ते चार अशी असल्याने चार वाजताच्या पाळीचे लोक उठलेले नसतात) त्यावेळी त्याला आमच्या गस्त घालणाऱ्या एका सैनिकाने पाहिले. त्याला लांब क्षितिजावर काहीतरी हालचाल वाटली. त्याला वाटले मोठा देवमासा किंवा शार्क असावा. गम्मत म्हणून त्याने सर्च लाईट मारला. तर तो सर्च लाईट पाहून हंचीनालने पाण्यात डुबकी मारली परंतु त्या सैनिकाला काही दिसेना म्हणून त्याने सर्च लाईट ऑनच ठेवला एक मिनिटाने हन्चीनाल परत बाहेर आला तेंव्हा त्या सैनिकाला वाटले कि बहुधा कोणी माणूस असावा. म्हणून त्याने आणखी दोन जणांना सावध केले आणी हंचीनाल पकडला गेला. त्याला पकडून युद्धकैदी (!) म्हणून विक्रांतवर आणले गेले. त्याच्या जवळ अंगावर असलेला कमांडो चा गणवेश(बॉयलर सूट सारखा) ज्यात दोन मोठी चोकलेट होती. एक छदमी बॉम्ब(MOCK बॉम्ब)विक्रांतला चिकटवण्यासाठी आणी काही सटर फटर सामान होते. त्याला वर आणल्यावर मी विचारले कि आता काय करणार तो म्हणाला कि आता मी युद्धकैदी आहे तुही म्हणाल ते करणार आणी तो हसला.त्याच्या कडे आतील अंडर वेअर आणी वरचा सुट सोडून काहीच नव्हते. तो पार भिजला होता पण दोन किमी पोहून तो अजिबात थकलेला नव्हता.मी त्याला माझ्या दवाखान्यातील टॉवेल अंग पुसायला दिला रुग्णाचा पायजमा आणी शर्ट घालायला दिला आणी तेथे रात्रपाळी वर असलेल्या कुक ला सांगून गरम गरम सूप दिले. त्याला मी विचारले कि विक्रांतला तो छदमी बोंब लावून तू काय करणार होतास त्यावर तो म्हणाला कि मी पुढे ५ ते ६ किमी पोहून रत्नागिरी च्या किनार्याला लागलो असतो आणी मग तेथून सकाळी फोन करून पुढची कारवाई केली असती.
अमावास्येच्या काळ्या रात्री अंधुक दिसणाऱ्या जहाजाला बोंब लावून हा पट्ठ्या पुढे ५- ६ किमी पोहून किनार्याला लागणार होता. मुळात रात्री समुद्रात पोहणे हेच किती धीकादायक आहे त्यातून तुम्ही दिशा चुकलात किंवा समुद्राच्या प्रवाहात कुठे भरकटलात तर अतिशय करुणाजनक परिस्थिती मृत्यू येऊ शकतो. मुळात नौदलात पहिली बढती मिळण्याच्या अगोदर पोहोण्याची चाचणी परीक्षा पास व्हावे लागते हि परीक्षा म्हणजे तरण तलावात पूर्ण गणवेश फुल शर्ट फुल पँट आणि मोज्यासकट बूट घालून १०० मीटर पोहणे हि असते . कारण तुम्ही पाण्यात पडता तेंव्हा तुम्ही फक्त चड्डीवर नसता तर पूर्ण कपड्यात असता. अशा सर्व जामानिमा करून तुम्ही पोहायला सुरुवात करता तेंव्हा त्याच ५० मीटर च्या दोन फेऱ्या पाचशे मीटर वाटाव्या अशा असतात. आणि इथे हा भर रात्री ८ ते १० किमी पोहून आग पिछा नसलेल्या जागी किनार्याला उतरणार होता. अशी कर्तव्य तत्पर आणि समर्पित माणसे काय तयारीची असतात आणी कोणत्या मुशीत घडलेली असतात ते परमेश्वरालाच ठाऊक. माझे कितीतरी मित्र असे कमांडो आहेत. रोजच्या बोलण्यात हि माणसे तुमच्या आमच्या सारखीच असतात पण अशी काय गोष्ट आहे कि जी त्यांना इतक्या समर्पित वृत्तीचे बनवतात हे मला आजही ठाऊक नाही.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

विक्रांतवरचे आपले अनुभव अतिशय रोचक आहेत.
अशा वेगळ्या विषयांवर वाचायला मिळणे ही आमच्यासाठी पर्वणीच.

रोमांचक अनुभव आणि प्रत्ययकारी लेखन.
पण इतक्या समर्पित तरुणांना आपल्याकडे, विशेषतः महाराष्ट्रात मुलगी देण्यास लोक का कू करतात. शिवाजी आपल्या घरात नको अशीच सर्वांची अपेक्षा असते. नात्यातल्या अशाच एका तरण्याबांड देखण्या हसतमुख कमांडोचे लग्न जुळता जुळत नव्हते. शेवटी एक (अर्थातच) पंजाबी कुटुंबाने आपणहून संपर्क साधाला आणि त्या पंजाबी मुलीशी लग्न झाले.

प्रभाकर पेठकर's picture

18 May 2013 - 3:03 pm | प्रभाकर पेठकर

थरारक प्रसंग आहे. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.

जो पकडला गेला त्याला कांही शिक्षा होते का? कारण प्रत्यक्ष शत्रूच्या जहाजाला बॉम्ब लावायचा प्रसंग आला तर त्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. इतक्या सहजासहजी पकडले जाणे धोक्याचेच.

मॉक ड्रिल मधे ज्याने कर्तव्यतत्परता दाखविली त्या, विक्रांतवरील, सैनिकाला कांही बक्षिस, प्रशस्तीपत्र मि़ळते का? जे काम करणे त्याच्याकडून अपेक्षित होते ते त्याने चोख बजावले आहे. त्याला प्रोत्साहनपर कांही फायदा देण्यात येतो किंवा कसे?

प्यारे१'s picture

18 May 2013 - 3:14 pm | प्यारे१

रोमांचक अनुभव आहे!

बापु देवकर's picture

18 May 2013 - 3:15 pm | बापु देवकर

वल्लीशीं सहमत..रोचक आणी रोमांचक देखील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2013 - 5:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोमांचक. अजुन असेच खूप लिहीत रहा.

काकाकाकू's picture

18 May 2013 - 5:23 pm | काकाकाकू

अशी कर्तव्य तत्पर आणि समर्पित माणसे काय तयारीची असतात आणी कोणत्या मुशीत घडलेली असतात ते परमेश्वरालाच ठाऊक.............रोजच्या बोलण्यात हि माणसे तुमच्या आमच्या सारखीच असतात पण अशी काय गोष्ट आहे कि जी त्यांना इतक्या समर्पित वृत्तीचे बनवतात हे मला आजही ठाऊक नाही.

+१११. आणि त्यानाही मुलं-बाळं, संसार असतो. सगळेच काहि सडेफटिंग नसतात. आणि चार चव्वल जास्तीचे मिळतातच असंहि नाहि.

चाणक्य's picture

18 May 2013 - 5:51 pm | चाणक्य

तुमचे सगळे अनुभव वाचतोय. लिहित रहा.

पिवळा डांबिस's picture

18 May 2013 - 6:41 pm | पिवळा डांबिस

त्या बेट्या हंचीनालची जिगर दाद देण्याजोगी आहे!!!

पैसा's picture

18 May 2013 - 10:06 pm | पैसा

मस्त अनुभव! असा चालतो तर युद्धसराव!

बाबा पाटील's picture

19 May 2013 - 9:30 am | बाबा पाटील

आवडेश...नेहमीप्रमाणे हा ही भाग सुंदर...तुमचे अनुभव वाचुन, मला शक्य झाले नाही पन माझ्या लेकीला लष्करात नक्की पाठवण्याचा प्रयत्न करेन.....