विक्रांत वरील आयुष्य २

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
5 May 2013 - 1:08 am

विक्रांत ( किंवा कोणतीही विमानवाहू नौका) हे एक चालते बोलते शहरच असते. विक्रांत वर बेकरी होती आइस क्रीम तयार करता येत असे. तेथे तीन बेडरूम घरा एवढे कोल्ड स्टोअरेज होते.
डॉक्टर म्हणून तुम्हाला तेथे प्रत्येक गोष्टीचे आरोग्यदायी वातावरण ठेवण्याच्या दृष्टीने पर्यवेक्षण फेरी(sanitary round)महिन्यात एकदा करावी लागत असे.यात स्वयंपाक घर जेवणाचा हॉल पासून अन्न आणि शिधा ठेवण्याच्या जागा सुद्धा तपासल्या जात असत. दर महिन्याला स्वयंपाकी आणि वाढपी यांची वैद्यकीय तपासणी असे त्यात त्याचे केस नखे पासून लघवी शौचाची तपासणी होत असे( कारण त्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नाही याची खात्री केली जात असे) जो या चाचणीत नापास होत असे त्याला अन्न हाताळण्याची बंदी असे. मग अशा माणसाला फक्त झाडू मारणे खरकटी उचलणे असे खालच्या पातळीचे काम करावे लागे त्यामुळे जर डॉक्टर शिस्तीबाबत कडक असेल तर या (स्वयंपाकी आणि वाढपी) सर्व लोकाना एकदम काटेकोर राहावे लागे.
याबाबतीत मी कोणतीच हयगय करीत नसे त्यामुळे वेळच्या वेळी त्यांची तपासणी होत होती. इतकी कि त्यांनी मासाहारी अन्न कापण्यासाठी वापरलेला लाकडाचा ओंडका रोजच्या रोज साफ करून त्यावर मीठ पसरून ठेवलेले असे.( त्यावर लागलेल्या रक्तावर जीवाणूंची वाढ होऊन अन्न विष बाधा होण्याची शक्यता असते) एकदा त्या लोकांना हि सवय लागली कि त्यानंतर त्यांना स्वतःला सुद्धा अस्वच्छता खपत नसे.
विक्रांत मध्ये जेवण फारच सुरेख मिळत असे तेथे कायम अति महत्त्वाच्या व्यक्ती येत असत. त्यामुळे तेथे अशा पाहुण्यांसाठी मेजवानीचे जवळ जवळ ३०० मेनू वेगवेगळ्या कार्डावर छापलेले होते. त्यांचे वेगवेगळे मिश्रण करून अतिशय सुंदर मेनू तयार करून देत असत. श्री अनुप जलोटा यांनी एक कार्यक्रम करून अश्विनी रुग्णालयाच्या व्यसनमुक्ती केंद्राला १ लाख रुपये देणगी दिली होती तेंव्हा त्यांना विक्रांत वर कृतज्ञता पूर्वक मेजवानी दिली गेली होती. ते माझे वैयक्तिक पाहुणे म्हणून आले होते. पण जाताना जेवणावर अतिशय खुश होऊन गेले.
विक्रांत मध्ये रोज ८५० सैनिकांसाठी जेवण बनवले जात असे आणि त्याचे खरकटे रोज चार ठिकाणाहून एकत्र होत असे या प्रकरणात तेथे झुरळे फार झाली होती. जहाजात बरयाच प्रमाणात लाकडी आणि लोखंडी पत्रे वापरात असत त्यांच्या फटीत हि झुरळे लपून राहत त्यामुळे त्यांचा नायनाट करणे हि एक डोकेदुखी होती. मी तेथे गेल्यावर पहिली दोन तपासणी फेर्यात हे मला जाणवले होते यावर काय करावे या विचारात मी असताना मला DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना)यांचे एक पत्र आले होते कि त्यांनी काही वेगळी किटक नाशके बनविली आहेत आणि त्यांची चाचणी घेण्यासाठी त्यांना काही जहाजे हवी आहेत.(दुर्दैवाने काय हि कटकट म्हणणारे लोक नौदलातही होते. त्यामुळे त्यांना बाकी कोणी प्रतिसाद दिला नव्हता. मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांना निमंत्रण दिले त्यापूर्वी जहाजाच्या कॅप्टन चे मला मन वळवावे लागले.
त्या लोकांनी येउन तेथे धूर करणारी यंत्रे आणली शिवाय कोणतातरी रंग आणला होता आणि झुरलांसाठी गोळ्या पण आणल्या होत्या. हे तिन्ही गोष्टी त्यांनी तेथे वापरल्या आणि तीन तासांनी ते परत आले तर जेवणाच्या हॉलमध्ये, स्वयंपाकघरांमध्ये आणि स्टोर मध्ये झुरळांचा खच पडला होता.या ठिकाणांमध्ये एक चौरस इंच जागा शिल्लक नव्हती जेथे मेलेले झुरळ नव्हते. झाडून काढल्यावर तीन पोती भरून झुरळे कचर्यात टाकली गेली. आणि त्यानंतर जवळ जवळ वर्षभर हा झुरळांचा उपद्रव झाला नाही.
काकतालीय न्यायाने याचे पूर्ण श्रेय मला मिळाले. त्या DRDO च्या शास्त्र ना मी कोणते औषध आहे ते विचारले तर ते ट्रेड सिक्रेट म्हणत होते अर्थात हे औषध नंतर पर्मेथ्रिन म्हणून उपलब्ध झाले.
या झुरळ मारण्याच्या कामात यश आल्यावर मी मूषक नाशाकडे वळलो. त्याच DRDO कार्यालयाशी संपर्क साधून मी त्यांना उंदीर मारण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. ते ताबडतोब तयार झाले कारण विक्रांतच्या बारच्या blue रूम मध्ये प्यायलेल्या विदेशी मद्याचे आकर्षण त्यांना टाळणे अशक्य होते. deratting( मूषकनाश) करण्यासाठी तुम्हाला तीन दिवस जहाजातील पाणी बंद करावे लागते. उन्दिराना तहानलेले ठेवतात त्यानंतर काम्पौंड १०८०( सोडियम मोनो फ़्लुओरो असिटेट) हे (http://en.wikipedia.org/wiki/Sodium_fluoroacetate)
औषध द्रावण स्वरुपात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते आणि ३ तासांनी मेलेले उंदीर उचलले जातात. हे औषध रंगहीन वासहीन आणि चवहीन आहे त्यामुळे उंदराना ते ओळखता येत नाही आणि ते पाण्याबरोबर ते घेतात ते इतके विषारी आहे कि उंदीर एक मीटर च्या परिघात मरून पडतो. असे अकराशे सत्तर उंदीर त्या दिवशी मारले गेले.या विषावर उतारा (जर कोणाला अपघाताने विषबाधा झालीतर) म्हणून व्हिस्की(काळा कुत्रा black dog) आणि व्हिनेगरची एक एक बाटली माझ्या कडे ठेवण्यात आली होती
दुर्दैवाने काही उंदीर कुठेतरी फटीत जाऊन मेले त्यामुळे पुढे जवळ जवळ एक आठवडा विक्रांत च्या कोणत्या न कोणत्या कक्षात उंदीर मेल्याचा वास भरून राहिला होता.
मि दोन्हि बाटल्या इमाने इतबारे परत केल्या. खरतर मद्य सचिव (वाइन सेक्रेटरी) मला सांगत होता कि हि बाटली (व्हिस्कीची) तुझ्या नावावर इशु झाली आहे आणि आता ती तुझी आहे. पण कोणतीही गोष्ट फुकट घेणे हि माझी सवय नाही ( आणि मी दारू पीत नाही ) त्यामुळे मी ती परत केली
हि बातमी नौदलाच्या गोदीत बर्यापैकी पसरली. आणि एक दिवस विराट नौकेचा प्रमुख वैद्यकीय अधिकारी माझ्याकडून याचा तपशील घेऊन गेला. त्याने विराट मध्ये मूषक संहार केला आणि हि एक सनसनाटी बातमी म्हणून इंडिया टुडे या मासिकात आली. " विराट या युद्धनौकेत माणसांपेक्षा उंदरांची खानेसुमारी जास्त".
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

5 May 2013 - 1:14 am | लॉरी टांगटूंगकर

तीन पोती झुरळे अन् अकराशे उंदीर , काय आकडे झाले हे!

प्यारे१'s picture

5 May 2013 - 1:38 am | प्यारे१

लष्कराचं ऑडिट असतं बाबा!
चीनी/ कोरियन नौका असती तर आकडे नक्की 'चुकले' असते. ;)

अभ्या..'s picture

5 May 2013 - 1:48 am | अभ्या..

पण प्यारे मेनू कार्डावरचे आयटेम किती वाढले असते. आधीच ३०० आहेत. ;)
डॉक्टरसाहेब माहीती मात्र एकदम विन्ट्रेस्टींग हाय.
कमीत कमी जागेत, कमी उपलब्धीमध्ये एवढे पदार्थ बनावयचे नेवल किचनमध्ये म्हणजे चॅलेंजिंग जॉब आहे. :)
आणि त्यासाठी पण शाबासकी मिळवणे म्हणजे ग्रेटच.

सुबोध खरे's picture

6 May 2013 - 10:18 am | सुबोध खरे

नौदलातील स्वयंपाक्याना १ ८ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. अश्विनी रुग्णालयात एका वरिष्ठ अधिकार्याच्या नखरेल बायकोने रात्री १ ० वाजता दाखल होताना टोमाटोचे सूप मागितले. भटारखान्यात टोमाटो नाहीत हे मला माहित होते मी त्या कूक ला विचारले कि आता काय करायचे? तो म्हणाला सर चिंता करू नका त्याने कॉर्न फ्लावर आणि टोमाटो सॉस चे उत्कृष्ट सूप बनवून तिला दिले. तिलाच काय पण मलाही चवीत फरक कळला नाही( माहित असूनही)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 May 2013 - 1:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयला मस्त!!!!
खरे काका, तुमचे लेख म्हणजे नेहमी पर्वणी वाटते. दर वेळेला तसा प्रतिसाद लिहितोच असे नाही, पण वाट जरूर बघतो.
पुभाप्र...

नंदन's picture

5 May 2013 - 7:57 am | नंदन

खरे काका, तुमचे लेख म्हणजे नेहमी पर्वणी वाटते. दर वेळेला तसा प्रतिसाद लिहितोच असे नाही, पण वाट जरूर बघतो.
पुभाप्र...

तंतोतंत

प्रचेतस's picture

6 May 2013 - 9:07 am | प्रचेतस

हेच म्हणतो.

बांवरे's picture

7 May 2013 - 7:12 am | बांवरे

अशेच्च मंतो

स्वीत स्वाति's picture

19 May 2015 - 12:36 pm | स्वीत स्वाति

+१११११११

हेच म्हणतो. उंदीर अन झुरळांचा किस्सा मस्तच!!

खरे साहेब, फार छान सफर घडवताय तुम्ही!

विमेंना +१: "दर वेळेला तसा प्रतिसाद लिहितोच असे नाही, पण वाट जरूर बघतो."

(काळे) उंदीर मारायच्या विषावर "काळा कुत्रा" हा उतारा असतो हे वाचून गंमत वाटली. :) पुढच्या वेळी लक्षात ठेवेन!

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2013 - 2:29 am | श्रीरंग_जोशी

उंदीर व झुरळांची संख्या वाचून प्रथम आश्चर्य वाटले खरे पण विक्रांतचे क्षेत्रफळ पाहता ही संख्या अवाजवी नक्कीच नाही.

लेखन नेहमीप्रमाणेच आवडले.

लेख आवडला. तुमचे आधीचे लेखही वाचनीय आहेत. विशेषत्वे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे - your moral compass is just right! तुमच्या अजून अशा अनुभवांची वाट पहातोय. पुलेशु.

चाणक्य's picture

5 May 2013 - 5:31 pm | चाणक्य

.

michmadhura's picture

7 May 2013 - 2:58 pm | michmadhura

असेच म्हणते

जुइ's picture

5 May 2013 - 5:32 am | जुइ

पुभाप्र...

तुमचे अनुभव नेहमी वेगळे असतात, लेख आवडला.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2013 - 6:08 am | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

सुमीत भातखंडे's picture

5 May 2013 - 6:47 am | सुमीत भातखंडे

आवडला

मुक्त विहारि's picture

5 May 2013 - 8:27 am | मुक्त विहारि

छान महिती..

आणि

ते सांगण्याची शैली पण आवडली.

मदनबाण's picture

5 May 2013 - 9:05 am | मदनबाण

वाचतोय... :)

रेवती's picture

5 May 2013 - 10:27 am | रेवती

वाचतिये.

विसोबा खेचर's picture

5 May 2013 - 10:40 am | विसोबा खेचर

खरेसाहेब, छानच लिहिता...

वेताळ's picture

5 May 2013 - 11:57 am | वेताळ

आपले डीआरडीओ खरोखर चांगले काम करतात. असेच काम त्याना सरकारने सिमेवर करायला जर परवानगी दिली तरी आपल्याला मोजायला वेगळी माणसे ठेवायला लागतील.

प्रकाश घाटपांडे's picture

5 May 2013 - 12:12 pm | प्रकाश घाटपांडे

ती काळ्या कुत्र्याची बाटली डीआरडीओ वाल्यांना भेट म्हणुन द्यायची ना?

सुबोध खरे's picture

5 May 2013 - 12:51 pm | सुबोध खरे

DRDO वाले फक्त झुरळे मारायला होते. एवढी झुरळे बघून त्यांना पण झीट आली. परमेथ्रीन एवढे परिणामकारक असेल असे त्यानाही वाटले नव्हते.त्यांना ब्लू रूम मध्ये सरकारी खर्चाने पाजलेली स्कॉच त्यांना चांगली आठवत असेल.पण ते उंदरांचे औषध देऊन निघून गेले. बाकीचे श्राद्ध आम्हीच उरकले होते.

खरे साहेब आपले लिखाण वेगळ्या अनुभवाचे निश्चीत असतात. आपण छान लिहीताही.
तरी पण लष्कराच्या गोष्टी, इतके तपशील देणे, असले लिखाण (निवृत्तीनंतर) करणे याला लष्कराची परवानगी असते काय?

सुबोध खरे सांगतीलच, पण माझ्या अंदाजाने काही हरकत येऊ तरी नये. ह्यात काहीही संवेदनशील माहिती बाहेर येत नाहीये. लेख तर मस्तच.

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2013 - 9:42 pm | श्रीरंग_जोशी

लष्करी विषयांचे जर्नल्स, अधून मधून होणारे लष्कराचे शक्तिप्रदर्शन यामध्येसुद्धा बरीच तांत्रिक पण शत्रुला कळल्याने काही फरक पडणार नाही अशी माहिती प्रसिद्ध होतच असते. आपलीच नाही तर सर्वच देशांची.

मग विक्रांतवर पाळले जाणारे नियम व अधिकार्‍यांची रचना, मुदपाकखान्याविषयी ढोबळ माहिती हे इथे लिहिल्याने कुठल्याही गोपनीयतेचा भंग होत असेल असे वाटत नाही.

सहज म्हणून नौदलाच्या संस्थळावर जाऊन पाहिले, बरीच रोचक माहिती आहे.

http://www.indiannavy.nic.in/

सुबोध खरे's picture

6 May 2013 - 12:01 am | सुबोध खरे

साहेब,
हि माहिती कोणत्याही तर्हेने शत्रूच्या उपयोगी नाहीकिंवा ती गुप्त वा वर्गीकृत नाही . उलट याच्या पेक्षा खूप जास्त माहिती जालावर उपलब्ध आहे. याशिवाय मला निवृत्त होऊन ५ वर्ष्पेक्षा जास्त कालावधी झाला आहे त्यामुळे आता हि माहिती गोपनीयतेच्या पडद्याच्या बाहेर आहे तसेच विक्रांत हि नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेली बोट असल्याने
त्याबद्दलची माहिती कोणत्याही तर्हेने गोपनीय नाही.
चिंता नसावी
आपल्या काळजी बद्दल मी आभारी आहे

सूड's picture

5 May 2013 - 8:31 pm | सूड

मस्त.

ढालगज भवानी's picture

5 May 2013 - 9:50 pm | ढालगज भवानी

हे आर्मी/नेव्ही मधले नवरे म्हणजे डोकेदुखी असते. अति अति शिस्तब्द्ध/पर्टीक्युलर असतात. माझा नवराही तसाच आहे. स्वच्छता/शिस्त/व्यायाम सर्वांबद्दल अतिशय आग्रही आहे. मी जुमानत नाही अन मग भांडणं होतात ते वेगळं.

लेख नेहमीप्रमाणेच खूप आवडला. मुख्य म्हणजे तुमचे विचार व तदनुसार लिखाण अतिशय ऑर्गनाइझ्ड वाटतात.

सुबोध खरे's picture

6 May 2013 - 8:29 pm | सुबोध खरे

शुची ताई
नाहीतरी कोणताही नवरा हि बायकांसाठी डोकेदुखीच असते (असे ऐकले आहे). किंवा असून अडचण नसून खोळंबा. त्यात तो आग्रही शिस्तप्रिय वगैरे असेल तर झालेच. वर लष्करात असेल तर बघायलाच नको. यावर एक श्लोक आठवतो आहे
आधीच मर्कट तशातची मद्य प्याला
त्यावरी त्यास वृश्चिक दंश झाला
तत्पश्चात झाली त्यास भूतबाधा
काय वर्णू मी कपिच्या लीला अगाधा

ढालगज भवानी's picture

6 May 2013 - 8:40 pm | ढालगज भवानी

हाहाहा :) माझा नवरा मर्चंट नेव्हीतून रिटायर (स्वेच्छेने) होऊन आता तो प्राध्यापक आहे. मला तो स्वच्छता व शिस्त या बाबतीत कमालीचा ऑबसेसीव्ह वाटतो. पूर्वी खूप संघर्ष व्हायचा आता होत नाही. दोघेही निवळलोय.
पण आर्मी खाक्या चांगला माहीते मला.

स्पंदना's picture

6 May 2013 - 4:16 am | स्पंदना

ग आई ग! एव्ह्ढी झुरळ?
काटा आला अंगावर. तसेही जहाज पाण्यावर असल्याने पाहुणे झुरळ असे वा भेटायला गेलेले झुरळ नसावेत. एकुण रहिवाशीच मरले म्हणायचे.

तुमचा अभिषेक's picture

6 May 2013 - 10:59 am | तुमचा अभिषेक

मजा आली .. खूपच मजेशीर भाग वाटला हा..
बाकी एवढी झुरळे अन उंदीर ऐकून मी सुद्धा हडबडलो खरे, पण नंतर लक्षात आले की ते विक्रांत होते, आपण म्हणता तसे पाण्यावर वसलेले एक शहर.. एकदा पाण्यात शिरले की उंदीर अन झुरळे यांचा मुक्काम कायम जहाजावरच, बाहेर कुठे जायचा प्रश्नच नाही, उलट प्रजोत्पादन मात्र मस्त जोमाने होत असेल.. ;)

jaypal's picture

6 May 2013 - 7:32 pm | jaypal

जमला आहे.

पैसा's picture

6 May 2013 - 7:53 pm | पैसा

उंदीर आणि झुरळांना मारायला पण एवढे नियोजन करावे लागले ना!

पिवळा डांबिस's picture

6 May 2013 - 11:36 pm | पिवळा डांबिस

मनोरंजक अनुभव!

असे अकराशे सत्तर उंदीर त्या दिवशी मारले गेले.

हे वाचून मिल्ट्रीचं 'एक कतार में खडे होकर गिनती करो!!' हे आठवलं आणि फिसकन हसू आलं!! :)
नुसते उंदीर मारण्याला मिल्ट्रीत महत्व नाही, तुम्ही लोकांनी ते मोजले देखील!!!
या घटनांनंतर डॉक्टरसाहेबांच्या कॉन्फिडेन्शियल फाईलमध्ये 'तीन गोणी कॉक्रोच और अकरासो सत्तर चूहे मारनेवाला' अशी नोंदही झाली असेल कदाचित!!
:)

मन१'s picture

7 May 2013 - 11:05 am | मन१

ह्यावेळी उंदीर झुरळ, मागच्यावेळी इतरांसाठी केलेली खटपट.
बरच काही नवीन्,वेगळ्म वगैरे वाचाय्ला मिळतय.

शिल्पा ब's picture

13 May 2013 - 10:25 am | शिल्पा ब

मस्त किस्से.
अवांतर : मी लहान असताना एकदा विराट बाहेरुन पाहीली होती अन दुसरी एक कोणतीतरी नौका आतुन...तोफा वेग्रे पण होत्या तीवर. एका छोट्याश्या एसी रुममधे बसुन कॅनमधलं पायनॅपल खाल्लेलं आठवतंय. उरणला का जवळ एक कोणतीतरी नेव्हीची फॅसीलीटी आहे तिथं भरपुर फ्रुटी दिलं होतं आम्हाला.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 May 2015 - 12:47 pm | माम्लेदारचा पन्खा

डिपार्ट्मेंटला घाऊक काम मिळालं असतं... वरून "सोय" वेगळीच....

कैलासवासी सोन्याबापु's picture

21 May 2015 - 10:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

डॉक्टर साब ,

एक नंबर अनुभव! एक शंका होती विक्रांत सारखे महाकाय जहाज रॉक होते का हो? असल्यास तो अनुभव् कसा असतो? म्हणजे किती भीतिदायक असतो? बोटीवर जिथे जागा त्यातल्यात्यात कमी असते त्यावर ८५० जवानांची शारीरिक तंदुरुस्ती कशी राखली जाते? त्यांची फ्लाइट डेक वर पीटी वगैरे होते काय?

मोदक's picture

15 Sep 2016 - 1:55 pm | मोदक

डॉ खरे..

नेशन वाँट्स टू नो....

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 8:16 pm | सुबोध खरे

मोदक शेट
उगाच नेशन वॉण्टस टू नो बोलून लाजवताय काय?
एका मोठ्या निवृत्त जहाजावरचा एक फडतुस यक्कश्चित निवृत्त वैद्यकीय अधिकारी.

सुबोध खरे's picture

15 Sep 2016 - 8:14 pm | सुबोध खरे

बापूसाहेब
आपला प्रतिसाद मी पाहिला नाही/ नजरेतून सुटून गेला.
क्षमस्व.
विक्रांतचे वजन १९००० टन इतके होते आणि विराट २८,००० टन. पण विक्रांत खाली जास्त निमुळती होती आणि विराट गोलाकार असल्यामुळे बोट लागणे हा प्रकार विराट दीडपट
मोठी असूनही तेथे जास्त होत असे. (त्यांना लाईट एयरक्राफ्ट कॅरियर म्हणत).
आता आलेली विक्रमादित्य हि ४५००० टन इतकी आहे.
या बोटी मोठ्या असल्या तरीही त्या मालवाहू जहाजाच्या तुलनेत लहानच म्हणाव्या लागतील. म्हणजे अजस्त्र असे इंटर लाईटर दीड लाख टनापर्यंत असतात किंवा अमेरिकेच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या निमिट्झ सारख्या नौका ७५००० टन असतात
विक्रांत निमुळती असल्याने त्याचे डुलणे (रोलिंग)विराटपेक्षा कमी होते.
पण विक्रांतची लांबी ७०० फूट होती त्यामुळे त्याचा पुढचा भाग लाटांवर वरखाली(पिचिंग) होत असे तेंव्हा जोरदार बोट लागणे हा प्रकार होत असे. कारण जरी २ % वर आणि खाली होते म्हणालो तरी १४ फूट वर आणि १४ फूट खाली असे होत असे. दर अर्ध्या मिनीटांनी तुम्ही वर जाता आणि पुढच्या अर्ध्या मिनिटाला खाली येता
जे सैनिक जहाजाच्या पुढच्या भागात कामावर (focsle) असत त्यांना हा त्रास फार जाणवत असे. विक्रांत मध्ये दवाखाना पुढच्या भागात होता आणि माझी खोली मागच्या भागात होती. विराट मध्ये दोन्ही मागच्या भागात होते. दुर्दैवाने अशा वर खाली होण्याला आपला मेंदू सहज सरावत नाही. त्यामुळे पोटात डचमळायला लागले कि त्याला काहीही उपाय नसे. जसे जसे वय होते तसे आपला मेंदू कमी संवेदनशील होत जातो त्यामुळे जे वरिष्ठ अधिकारी किंवा नौसैनिक असत त्यांना हा त्रास होत नसे. पण जे तरुण अधिकारी किंवा नौसैनिक असत त्यांना हा त्रास बराच जाणवत असे.
बाकी जवानांना रोज( जेंव्हा विमाने उडत नसत) पहाटे फ्लाईट डेक वर पिटी असे आणि अधिकाऱ्यांना फ्लाईट डेकच्या खाली क्वार्टर डेक होता तेथे पिटी होत असे. सैनिकांना परेड सुद्धा असे. मी डॉक्टर असल्याने मला परेड नव्हती पण परेडला जाऊ शकणार नाहीत/ जाऊ इच्छित नाहीत अशा सैनिकांना किंवा उडण्यासाठी तयार असणाऱ्या वैमानिकांनी उड्डाण पूर्व वैद्यकीय चाचणी साठी जायला लागत असे. माझ्या अगोदरच वैद्यकीय अधिकारी थोडा मृदू किंवा सौम्य होता त्यामुळे असे कामचुकार सैनिक माझ्याकडे पण सुरुवातीला येत असत. पण ज्याला परेडला जायचे नाही त्याला मी माझ्या रुग्णालयात भरती करून ठेवत असे आणि जेवण खाणही तेथेच मागवत असे. दोन तीन तास झोप काढल्यावर हा माणूस कंटाळत असे. पण बोलता येत नसे. त्यामुळे हा डॉक्टर कडक आहे अशी ख्याती दोन तीन दिवसातच पसरली.आणि मग माझे काम सोपे झाले.
विक्रांतचे ८५० सैनिक शिवाय जेंव्हा त्यावर गोव्याच्या तळावरून विमाने येत तेंव्हा त्याचे वैमानिक आणि देखभाल करणारे तंत्रद्न्य हे साधारण १५० असे हजार लोक जहाजावर असत. मला विक्रांतवर असलेल्या ८५० लोकांच्या (अधिकारी आणि सैनिक मिळून) वैयक्तिक वैद्यकीय स्थितीची बऱ्यापैकी माहिती होती.इतकेच नव्हे तर बऱ्याच सैनिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील लोकांच्या असलेल्या वैद्यकीय त्रासाचीहि माहिती होती.विक्रांतच्या सैनिकाचा कुटुंबीय रुगालयात भरती झाला कि त्याचा सिग्नल जहाजावर येत असे आणि मी विभागप्रमूह असल्याने मला कोणाचे कोण भरती झालंय हे कळत असे. मी मुळात अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयावरूनच पोस्टिंग वर आलो असल्याने माझा रुग्णालयाशी संपर्क चांगलाच होता. शिवाय मी सैनिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्याकुटुंबाना अश्विनी रुग्णालयात भेट हि देत असे. (माझे मित्रही सगळे रुग्णालय किंवा जहाजातच होते आणि रुग्णालय नौदलाच्या कमांड मेसच्या जवळच होते त्यामुळे आठवड्यातून तीन चार दिवस तरी मी रुग्णालयात जात असे. सणात सण आणि जावई ब्राम्हण म्हणून गेल्यावर जाता जाता सैनिकांच्या कुटुंबाना भेटत असे. त्यांचे बारीक सारीक प्रश्न सहज सोडवता येत असत उदा. कुणाच्या बायकोला लवकर डिस्चार्ज पाहिजे कुणाच्या शल्यक्रियेची तारीख बदलून पाहिजे,कुणाची औषधे लोकल पर्चेस मध्ये लवकर मिळवून हवी असत.
त्यामुळे बऱयाच अधिकारी किंवा सैनिकांशी माझे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते.