विक्रांत वरील आयुष्य ५

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
19 May 2013 - 2:24 pm

सकाळी रत्नागिरीच्या समुद्रातून आम्ही निघालो तेंव्हा सकाळचे ६.३० वाजले होते. आता कोठे जायचे होते ते माहित नव्हते ( लष्करात कोणतीही माहिती ज्याला आवश्यक आहे त्यालाच दिली जाते. अर्थात त्यामुळे फार फरक पडतो असे नाही. माझ्यासारखा माणूस जो कोणत्याही विभागात काहीही कारण नसताना जात असे त्याला हे माहित होतच होते. तसे मी ब्रिज वर(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते तेथे गेलो तेंव्हा तेथे नौकाचलन अधिकारी ( navigating officer) नकाशावर रेघोट्या ओढत होता.
त्याच्या नकाशात डोके घातले तर आम्ही सरळ पश्चिमेकडे जात होते असे दिसले कुठे जायचे किती अंतर हे विचारण्याच्या मी फंदात पडलो नाही. पूर्ण २ दिवस आणि रात्री आम्ही अरबी समुद्रात पश्चिमेकडे जात होतो. या काळात फार काही नवीन घडले नव्हते. या काळात आमची हेलिकॉप्टर समुद्रात गस्त घालायला जात होती त्याबरोबर आमच्या पाणबुड्या आणि इतर जहाजे आपल्या सरावात मग्न होती. दोन दिवसानंतर एका रात्री आमच्या काही पाणबुड्या पाण्याच्या पृष्ठभागावर आल्या. त्यानी त्यांच्या संपलेल्या बैटर्या विक्रांतवर चार्जिंग साठी दिल्या आणि आमच्याकडून नवीन (पूर्ण चार्ज केलेल्या) बैटर्या घेतल्या आणि त्या परत पाण्याच्या खाली गेल्या.
या डिसचार्ज झालेल्या बैटर्या आमच्या इलेकट्रीकल विभागाच्या तंत्रज्ञांनी चार्ज करण्यासाठी इलेकट्रीकल कंट्रोल रूम मध्ये नेल्या आणि ते त्यातील पाणी वगैरे चेक करण्यासाठी त्यांनी त्याची झाकणे उघडली आणि त्याचे विशिष्ट गुरुत्व तपासण्यासाठी घेतले. या काळात समुद्र थोडासा खवळलेला होता आणि जहाज वर खाली होत होते. आता हि नेहेमीची गोष्ट असल्याने कोणीही फारसे लक्ष देत नाही. पण मध्येच एक मोठी लाट आली आणि जहाज एकदम वर उचलले गेले आणि परत वेगाने खाली आले. यामुळे एका बैटरीतील सल्फ्युरिक आम्ल उसळून बाहेर आले एक तंत्रज्ञ त्या बैटर्याची अमलाची पातळी किती आहे ते पाहत होता ते आम्ल त्या तंत्रज्ञाच्या डोळ्यात गेले. ताबडतोब तो तंत्रज्ञ ओरडू लागला आणि त्याचे साथीदार त्याला तसेच उचलून माझ्या दवाखान्यात घेऊन आले. सुदैवाने मी रात्रीची चक्कर मारायला दवाखान्यातच होतो. ते त्या तंत्रज्ञाला घाईघाईने घेऊन आले आणि सर याच्या डोळ्यात असिड गेले म्हणून सांगु लागले. मी ताबडतोब तेथे ठेवलेल्या सलाईनच्या बाटलीचे सील फोडले आणि त्याच्या डोळ्यात पूर्ण अर्धा लिटर सलाईन उलटे केले. अशा एकामागोमाग तीन सलाईन च्या बाटल्या मी त्याच्या डोळ्यात उलट्या केल्या. त्याचे सगळे कपडे पण सलाईन ने भिजले तो तंत्रज्ञ अजूनही आरडा ओरडा करत होता. सर बहुत जलन हो रही है. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा काही थेंब पडले होते ते पण सलाईन ने धुतले गेले होते पण डोळ्यात किती आम्ल गेले होते ते कळायला मार्ग नव्हता. तो काही डोळा उघडत नव्हता. मी शांत पणे बाकी लोकांना बाहेर पाठवले त्याला तिथल्या शस्त्रक्रिया गृहात घेऊन गेलो त्याच्या डोळ्यात सलाईनची बारीक धार सोडली आणि हळूहळू त्याचा डोळा उघडला.तिथल्या टेबलवरच्या मोठ्या दिव्याच्या प्रकाशात त्याचा डोळा तपासला. मी त्याच्या सुदैवाने त्याच्या बुबुळावर( cornea) कोणतीही जखम झाली नव्हती तर ती जखम डोळ्याच्या आत पापणीच्या खालच्या लाल भागाला(lower conjunctiva) झाली होती.त्याला भयंकर जळजळ होत होती. त्याला डोळा उघडवत नव्हता पण मी जेंव्हा त्याला सांगितले कि तुझा डोळा( बुबुळ) वाचला आहे त्याला जखम झालेली नाही तेंव्हा तो मला मनापसून धन्यवाद देऊ लागला. मी त्याला परत परत सांगत होतो कि मी काहीही केलेले नाही. पण तो आपला डोळा वाचला आहे या आनंदातच होता.
आता मला वेगळीच चिंता होती कि पापणीच्या खालच्या भागात झालेली ओली जखम हा होता. कारण हि जखम भरताना जर त्याची पापणी नेत्रगोलाला चिकटली असती तर तर प्रत्येक वेळा वर बघताना त्याचा डावा डोळा वर फिरला असता आणि उजवा डोळा चिकटल्याने तेथेच राहून तो तिरळा झाला असता.मी त्याच्या डोळ्यात क्लोरोमायसेटीन चे मलम टाकले आणि कॅप्तन ला भेटायला निघालो. कॅप्टन ला मी लगेच भेटलो आणि सर्व माहिती सांगितली आणि सांगितले कि सर याला ताबडतोब अश्विनी रुग्णालयात हलवले पाहिजे कारण त्याच्या डोळ्याचा प्रश्न आहे. कॅप्टन शांतपणे मला म्हणाले कि ते आता शक्य नाही मी विचारले असे का? त्यावर ते म्हणाले कि आता आपण मुंबई पासून एक हजार नॉट (अठराशे किमी) अंतरावर आहोत आणि आपल्या हेलिकॉप्टरचा पल्ला/ आवाका (range)फक्त पाचशे नॉट(९०० किमी)आहे. मग मी म्हणालो कि त्याला लवकरात किती लवकर पाठवता येईल.त्यावर ते म्हणाले कि वीस नॉट तासाला या वेगाने आपण चोवीस तासांनी पाचशे नॉट टप्प्यात पोहोचू शकू आणि सुरक्षा म्हणून मी अजून ६ तासांनी म्हणजे चारशे नॉट टप्प्यात हेलिकॉप्टर पाठवू शकतो. तीस तास म्हणजे दोन रात्री आणि एक दिवस गेला असता. मी जरा नाउमेद होऊन बोललो कि तीस तासांनी त्याला पाठवून काहीच फायदा नाही त्यावर ते शांतपणे म्हणाले मग ठीक आहे जे करायचे आहे ते तूच कर(ok then manage it yourself I wont turn around) मी उलटा फिरणार नाही. मी नाउमेद होऊन परत फिरलो आणि दवाखान्यात आलो. काय करावे ते समजत नव्हते सल्फ्युरिक आम्ल किती खोल जखम करते ते माहित नव्हते त्यातल्या त्यात त्याचा कोर्नीया (बुबुळ)सुरक्षित होते हा चांगला भाग होता माझ्याकडे ऑक्सफर्ड टेकस्टबुक ऑफ मेडिसिन होते ते पूर्ण चाळून पहिले त्यात काहीच माहिती नव्हती. काय करावे कसे करावे?
मी त्याच्या डोळ्यात क्लोरोमायसेटीन टाकून बँडेज लावले होते. त्याला एक phenargan ची गोळी दिली जळजळ कमी होण्यासाठी आणि तेथे झोपवले. रात्री तो शांत झोपला पण मला सारखी जाग येत होती आणि एक भीती वाटत होती कि याचा कोर्निया दिसतो तसा सुरक्षित आहे का? तसा नसेल तर काय?आणि बाकी अशी जखम कशी सांभाळायची. एक नक्की होते कि मी नेत्ररोग विभागात काम चांगले केले होते त्यामुळे हे माहित होते कि जर जखम चिकटू दिली नाही तर त्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती पुढचे सर्व सुरक्षित ठेवेल. त्यामुळे मी पुढे तीन दिवस दिवसात सहा वेळा त्याला शस्त्रक्रिया विभागात घेऊन मोठ्या दिव्याखाली पाहत होतो. डोळ्यात औषधाचे थेंब टाकीत होतो आणि रात्री मलम टाकून बँडेज लावीत होतो आणि प्रत्येक वेळेला खालची पापणी आणि बुबुळ अलग करीत होतो. शेवटी चार दिवसांनी आम्ही मुंबईत पोहोचलो तेंव्हा सर्वात पहिली गाडी विक्रांत जवळ उभी होती ती म्हणजे अश्विनीची रुग्णवाहिका. तिच्यात त्याला बसवून मी लगेच नेत्ररोग विभागात घेऊन गेलो तेथे आमच्या विभाग प्रमुखांनी स्वतः ती जखम बघितली. त्यांनी कोर्नियाला कोणतीही इजा झालेली नाही हा निर्वाळा दिला आणि पापणीच्या आत असलेली जखम पण बरीच भरली गेली आहे हे पण सांगितले. ( त्यांनी सुद्धा हे कबुल केले कि सल्फ्यूरिक आम्लाची जखम त्यांनी आयुष्यात कधी पहिली नव्हती). मी त्या तंत्रज्ञाला अश्विनी मध्ये भरती करून आलो आणि सुटकेचा निश्वास सोडला. चार दिवस माझ्या मनावर असलेला अदृश्य असा तणाव संपल्याची जाणीव झाली.
याच काळात आमचा न्हावी बेशुद्ध पडला होता ती कहाणी पुढच्या भागात.
क्रमशः

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 May 2013 - 2:56 pm | प्रचेतस

थरारक घटनांनी भरलेय नौसैनिकांचे आयुष्य.
एकेक अनुभव वाचणे ही पर्वणीच.

आदूबाळ's picture

19 May 2013 - 2:57 pm | आदूबाळ

बाबौ!!

एक प्रश्नः ही घटना इंटरनेटपूर्व युगात घडलेली असावी. आता इंटरनेटच्या आगमनानंतर काही फरक पडला आहे का? ऑक्स्फर्ड टेक्स्टबुकावर अवलंबून न रहाता आंतरजालाचा वापर करून हा प्रसंग हाताळणं सुकर झालं असतं का? विमानवाहू नौकेवर इंटरनेट वापरायला परवानगी आहे का?

---
तुमचे लेखन आवर्जून वाचतो. प्रतिसाद देतोच असं नाही. लिहीत रहा!

प्यारे१'s picture

19 May 2013 - 3:38 pm | प्यारे१

खूप छान!
वेळेत योग्य उपचार होऊन त्या माणसाचे डोळे वाचले हे महत्त्वाचं.

अवांतरः मागे एकदा एक सत्य घटनेवर आधारित पुस्तक वाचलेलं व्हाय नॉट आय- वृंदा भार्गवे (चुभू देघे) त्यात औषधाची रिअ‍ॅक्शन होऊन मुलीच्या डोळ्याच्या बाहुलीला पापण्या चिकटतात नि डोळे जातात. त्यानंतर तशा परिस्थितीत मुलगी जिद्दीनं शिक्षण पूर्ण करते अशी खूप प्रेरणादायक कथा आहे.

पैसा's picture

19 May 2013 - 3:47 pm | पैसा

काय एकेक विचित्र अपघात!

पिलीयन रायडर's picture

19 May 2013 - 4:33 pm | पिलीयन रायडर

काय पण लाईफ असतं लोकांच....
आपण फक्त वाचुन थक्क होतो, प्रतिक्रिया देतो.. बस्स.. तेवेढच काय ते थ्रिल..!!

दंडवत हो डॉक्टर..!!

काकाकाकू's picture

20 May 2013 - 12:28 am | काकाकाकू

+१

बापु देवकर's picture

19 May 2013 - 4:35 pm | बापु देवकर

आपले अनुभव असामान्य आणि अचंभित करणारे आहेत.

शेअर केल्या बद्दल धन्यवाद .

जेपी's picture

19 May 2013 - 5:09 pm | जेपी

आधीच्या भागा ऐवढाच रंजक पुभाप्र .

आजानुकर्ण's picture

19 May 2013 - 6:16 pm | आजानुकर्ण

पुढील भाग येऊ द्या...

तुमचे सर्व अनुभव वाचनिय आहेत...

बापरे! किती विचित्र अपघात.

इंटरनेटबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यास उत्सूक. अजूनही बॅटऱ्या तपासण्याची पद्धत तीच आहे? की डोळ्यांवर गाॅगल/चेहऱ्यावर मास्क घालून धोका कमी केला जातो?

उपास's picture

20 May 2013 - 7:36 am | उपास

समयसूचकता आणि धीरोदत्त स्चभाव. बहुतेक सगळेच डो़क्टर असे थंड डोक्याने (म्हणजे शांतपणे पण सगळ्य्सा विकल्पांचा विचार करुन) निर्णय घेणारे कसे होतात बुवा..!

स्पंदना's picture

20 May 2013 - 7:45 am | स्पंदना

असेच म्हणेन.

अहो
कसली समयसुचकता आणि धीरोदात्तपणा. सल्फ्युरिक आम्ल डोळ्यात गेले आहे हे कळल्यावर मला पण मती गुंग झाल्यासारखे झाले होते. कारण चेहऱ्यावर आम्ल उडाल्यामुळे भाजलेल्या केसेस मी बर्याच पाहिलेल्या होत्या. त्यामुळे सल्फ्युरिक आम्ल किती हानी करू शकते ते पाहिलेले होते. (सर्व साधारणपणे "मुलीच्या चेहऱ्यावर एसिड फेकले" यात हेच अमल असते) एवढेच आहे कि मी ते चेहऱ्यावर दिसू नये इतकी काळजी घेण्याचे कसब मिळवले आहे.शेवटी तुमचे मौलिक ज्ञान (fundamentals) अशा प्रसंगी कामाला येते हे जाणवल्यामुळे मी या काही प्रसंग नंतर परत पुस्तकांकडे वळलो आणि त्याचा मला आयुष्य भर फायदा होत आहे. मी काही जास्त न करता त्याचे डोळे सलाईन ने धुतले तेवढा वेळ मला विचार करण्यासाठी मिळाला.
कोणतेही रासायनिक प्रदूषण किंवा भाजले असताना आपले शरीर ताबडतोब पाण्याने किंवा सलाईन ने धुवावे हा बालकपाठ मला मूळ शिक्षणात मिळालेला होत.
अर्थात एक भाग म्हणजे माझे काम तणावाखाली जास्त चांगले होते. त्यामुळे रुग्णावर कोणतेही काम करताना अगदी रुग्णाच्या पाठीच्या मणक्यातील पाणी काढतेसुद्धा वेळी मी रुग्णाच्या नातेवाईकाला बाजूला उभे राहू देतो. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाचे माझ्याबद्दल फारच चांगले डॉक्टर आहेत मत असे होते.

सौंदाळा's picture

20 May 2013 - 9:30 am | सौंदाळा

श्वास रोखून लेख वाचला.
आणि (तुमच्या प्रसंगावधानाने) तंत्रज्ञाचा डोळा वाचला हे वाचून खूप बरं वाटलं.

श्रिया's picture

20 May 2013 - 10:24 am | श्रिया

डॉक्टर ,तुमचे अनुभव नेहमी वाचतच असते. अचानक उद्भवणार्‍या आणि विचित्र परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे तुमचे कसब, थक्क करणारे आहे.

कोमल's picture

20 May 2013 - 12:17 pm | कोमल

__/\__

दंडवतच.. काय जबरी अनुभव आहेत सगळेच.. बेश्ट..

आतिवास's picture

20 May 2013 - 12:22 pm | आतिवास

वेगळ्या विषयावरचं आणि वेगळ्या प्रकारचं लेखन. वाचतेय; आवडतंय.

michmadhura's picture

20 May 2013 - 7:01 pm | michmadhura

असंच म्हणते.

मन१'s picture

20 May 2013 - 12:38 pm | मन१

कमाल आहे

आणखी अनुभव वाचायची वाट पहातो आहे......

उपास's picture

20 May 2013 - 7:19 pm | उपास

बोट न लागण्यासाठी नेमका उपाय काय करावा? भरपूर पाणी की काहीच न खाणे..? कुठल्या जागी बोटीवर बसू नये/ बसावे?

चंबा मुतनाळ's picture

20 May 2013 - 8:34 pm | चंबा मुतनाळ

बॅटरीतील सल्फयूरिक आम्लामुळे झालेली २५ एक वर्षांपूर्वींची घटना:
ही घटना व्यापारी बोटीवरची आहे. शनिवारचा दिवस होता. जहाज जर लांबच्या प्रवासात असेल तर शनिवारी नॉर्मली दिवसा काम करणारे अधिकारी जेवणा नंतर सुट्टि घेतात. सकाळचे ११.३० झाले होते. जहाजावरचा इलेक्ट्रिशियन ह्याच दिवशी बोटीच्या आपातकालिन ब्याटर्‍या चेक करणे चार्ज करणे अशी आठवड्याची कामे करतो. असेच मी व बत्तीसाब (इलेक्ट्रिशियनचे बोटीवरचे टोपणनाव) बॅटरी रुममधे गप्पा मारत होतो. त्याचे सल्फयूरिक आम्लाची घनता बघून झाली होती. त्याने बोलता बोलता त्याचे ढुंगण ब्याटर्‍यांच्या शेल्फवर टेकवले. बोलण्याच्या नादात १२ कधी वाजून गेले ते कळलेच नाही. १२ वाजता जेवणाची सुट्टी होते. आम्ही बॅटरी रुममधले काम आटोपते घेतले आणी बाहेर डेकवर आलो. बत्तीसाब बोल्ला किती गार वारा आहे. मी बघितले तर त्याच्या बॉयलरसूटची ब्याकसाईड आतल्या चड्डीसकट गायब झाली होती!! त्याने जिथे कुल्ले टेकवले होते त्यावर अ‍ॅसीड्चा स्प्रे बसला होता, आणी त्यामुळे कॉटनच्या बॉयलरसूटचा चक्क भुगा झाला होता

दशानन's picture

20 May 2013 - 8:43 pm | दशानन

लेखन वाचतो आहे, खूप आवडत देखील आहे.
मागील भाग देखील वाचले होते वेळे अभावी प्रतिसाद दिला गेला नाही.

रेवती's picture

20 May 2013 - 9:15 pm | रेवती

वाचतीये. लेखन आवडले.

खटपट्या's picture

20 May 2013 - 11:29 pm | खटपट्या

खरे साहेबान्च्या लेखाची मी चातकासारखी वाट पहात असतो. काय नसत या लेखान्मधे. मी तर खरे साहेबाना मीपा चा स्टार समजतो. माझे नम्बर एक चे आवड्ते लेखक. त्यान्चा एक एक लेख मला सम्रुद्ध करतो.