काही मानवी अनुभव

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
17 Apr 2013 - 1:50 pm

आम्ही दोघी सख्ख्या बहिणी. ती थोडी उजळ.मी सावळीच आहे.. एका उंच इमारतीत रहातो आम्ही. आई आमच्या लहानपणीच गेली. म्हणजे एक दिवशी रात्री ती जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मग आम्ही दोघीच उरलो एकमेकींना. एका घरी जास्त काळ नाही रहायचो. पण जेंव्हा भेटायचो तेंव्हा आमच्या चु(क्)चु(क) वाणीत भरपूर गप्पा मारायचो. मी जात्याच खोडकर होते. तरी बहीण नेहमी मला म्हणायची," तू बाई फार धोका पत्करतेस. एकदिवशी जीवावर बेतेल तेंव्हा समजेल." पण मला आवडायच्या खोड्या काढायला!

आता, त्या दिवशीचीच गंमत सांगते. दिवाळीचा पहिलाच दिवस होता तो. एका किड्याचा पाठलाग करता करता मी लिफ्टमधे गेले. सक्काळी सक्काळी एक तरुण मुलगी चांगली नटून थटून लिफ्टमधे शिरली. तिच्या पाठोपाठ एक अंकल पण आंत आले. ती मुलगी अंकलला म्हणाली, "कम धिस साईड." अंकल गोंधळले. एवढी तरुण मुलगी आपल्यासारख्या म्हातार्‍याला का बोलावतीये जवळ? मग ती मुलगी परत म्हणाली," देअर इज अ लिझार्ड बिहाइंड यू!" ते ऐकल्याक्षणी अंकल पटकन तिच्याजवळ गेले. मला जरा मजा करण्याची लहर आली. मी एकदम खाली उतरले आणि त्यांच्यावरच चाल केली. ते दोघंही घाबरुन जागच्याजागी डान्स करायला लागले. मी शिताफीने त्यांच्यामागे भिंतीवर चढले. लिफ्टमधे केवळ त्या मुलीच्या किंकाळ्या आणि दोघांचे धपधप उड्या मारण्याचे आवाज येत होते. घाबरुन त्या मुलीने आतला दरवाजा उघडला. त्यासरशी लिफ्ट थांबली. मी पटकन पुढच्या जाळीच्या दरवाजातून बाहेर गेले. अंकलनी परत दरवाजा लावला. लिफ्ट खाली गेली. लिफ्ट परत वर येताना आंत एक पारशी जोडपे होते. त्यांतला म्हातारा म्हणत होता, " ए तात्या आटली उमरमां सूं करे छे ? छोकरी केटली नल्ली छे, मारे तो चोक्कस, 'मेरे जीवनसाथी' टाईपच डान्स लाग्यु!" यावर ते दोघेही, हें हें हें, करुन हंसले. रात्री मी बहिणीला ही कथा रंगवून सांगितली. त्यावर ती काळजीने म्हणाली, "काय हे, त्या दोघांच्या पायाखाली आली असतीस तर? पुन्हा असं काही करु नकोस गं".

मला अनुभवाने हे कळून चुकलं होतं की बहुतेक सगळे आपल्याला घाबरतात.बायकांपासून तर धोकाच नव्हता. पण हल्लीचे पुरुषही चांगलेच घाबरायचे. आणि समजा मारायला आले तरी माझ्या पळण्याच्या वेगासमोर ते काय करणार? शिवाय लपायलाही इतक्या जागा असतात की ते शेवटी नाद सोडून देतात. नंतर सगळीकडे सामसूम झालं की पळ काढायचा.

अशीच एक दिवस एका घरांत शिरले. काँप्युटरसमोर एक बाप्या बसला होता. रात्री उशीरापर्यंत हे काय करत असतात कोण जाणे! आधी एका कपाटामागे लपले. आज नशीब जोरावर होते. तिथेच खाद्य मिळालं. मला ट्यूबजवळ जायचं होतं. पण ट्यूब पलिकडच्या भिंतीवर होती. म्हटलं, आधी याला दर्शन देऊ या म्हणजे कळेल की हा'शूर मरद का हुप्प्या' आहे! त्याच्या पायाजवळच्या भिंतीवर गेले. हालचाल दिसताच तो एकदम दचकून उठला आणि दाराकडे पळत गेला. मी सर्रकन ट्यूबच्या मागे गेले. त्याने त्याच्या बापाला बोलावून आणले. झोपमोड झाल्यामुळे बाप वैतागलेलाच होता. तो पटकन एका हातात झाडू आणि दुसर्‍या हातात बांबू झाडू घेऊन आला. अरे बापरे, आता आपले मरणच ओढवणार या शंकेने मीही घाबरले. बापाने आधी सगळ्या कपाटांमागे बांबू झाडू फिरवला. मग त्याचे लक्ष वर ट्यूबलाइटकडे गेले. तिथे झाडू फिरवायला लागल्यावर मी धूम पळत सुटले. मला पहाताच बापही पटकन पलंगावर चढला हे मी धांवताना पाहिले. 'चला, हा ही घाबरतोच आहे आपल्याला, मुलासमोर फक्त शौर्याचा आव आणतोय!' मी परत कपाटामागे आश्रय घेतला. अर्धा तास त्यांची खटपट चालू होती. पण मी बाहेरच आले नाही. शेवटी बाप म्हणाला," आता उद्या बघू. रात्र कोण झालीये. मला उद्या ऑफिसला जायचं आहे." मग मुलाने रुमचा दरवाजाच बंद केला आणि दरवाजाच्या खालच्या फटीत कापडं कोंबून ठेवली. त्यामुळे माझा त्यांच्या स्वयंपाकघरांत प्रवेश करण्याचा बेत फसला. नाहीतर एकदा गॅस सिलिंडर मागे आश्रय मिळाला की एक-दोन महिन्यांची निश्चिंती आणि शिवाय पोटभर खायला! म्हणजे बाळंतपणाचीही सोय झाली असती. मी त्यांच्या रुमचा सर्व्हे करावा की काय असा विचार करत होते तेवढ्यात पुन्हा दार उघडले आणि बापाने आंत कसलातरी जबरी फवारा मारला आणि दाणकन दार लावून घेतले. आता मात्र मला अगदीच 'सफोकेटिंग' का काय म्हणतात, तसे व्हायला लागले. मी खिडकीवर चढले आणि एक फट सापडली. त्यातून बाहेर पोबारा केला. गच्चीवर जाऊन पुन्हा जुने घर गांठले ! बहीण गाढ झोपली होती. तिला डिस्टर्ब न करता पडून राहिले. विचार करत होते की, पुरे झाले हे साहस! आता दोघींनी त्या बाजूच्या जैनांच्या सोसायटीतच शिफ्ट व्हावे. तिथे जीवाला कसलीच भीति नाही!

वावरकथाजीवनमानराहणीराहती जागामौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

आतिवास's picture

17 Apr 2013 - 2:03 pm | आतिवास

छान.
आता जैनांच्या सोसायटीत काय घडेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.
बाकी, पाल इतकी निरीक्षणं करत असेल आणि खोड्या काढत असेल असं मात्र वाटत नाही हं तिच्याकडे पाहताना :-)

पैसा's picture

17 Apr 2013 - 2:40 pm | पैसा

क्रमशः लिहा खरेच!

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 3:22 pm | यशोधरा

भारी आहे!

कवितानागेश's picture

17 Apr 2013 - 3:40 pm | कवितानागेश

मजा आली.

प्रभाकर पेठकर's picture

17 Apr 2013 - 4:31 pm | प्रभाकर पेठकर

पालीचे आत्मकथन आवडले.

(पालीचा गणपतीही मला आवडतो.)

प्यारे१'s picture

17 Apr 2013 - 4:37 pm | प्यारे१

मला पालीचा खंडोबा!

मालोजीराव's picture

17 Apr 2013 - 4:54 pm | मालोजीराव

.

अभ्या..'s picture

17 Apr 2013 - 4:41 pm | अभ्या..

=)) =)) =)) काय हे पेठकर काका ;) तुम्ही पण आमच्या उनाड कमिटीत येता काय?
आम्हाला द्वारपाल, लेखापाल, शिशुपाल, बिपीन्चंद्र पाल, बचेंद्री पाल, अर्जुन रामपाल हे पण आवडतात. :)
: पालपाल

प्यारे१'s picture

17 Apr 2013 - 4:44 pm | प्यारे१

अभ्या,
>>>अर्जुन रामपाल
शाहरुख नि करन रागवतील की गे ;)

सविता००१'s picture

17 Apr 2013 - 4:58 pm | सविता००१

भारी आहे. आवडलं :) मजा आली वाचताना

:D :D :D लेख आवडला... खुप हसले... पण भिती पण तेवढीच वाटते.

सस्नेह's picture

18 Apr 2013 - 2:12 pm | सस्नेह

भीती थोडी, किळस जास्त !

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 4:55 pm | बॅटमॅन

नेमके हेच म्हणायचे होते. :)

स्पंदना's picture

17 Apr 2013 - 5:37 pm | स्पंदना

चक चक चक!

उपास's picture

17 Apr 2013 - 7:29 pm | उपास

आवडलं..

तर्री's picture

17 Apr 2013 - 7:37 pm | तर्री

हा निबंध जमला आहे असे मला तरी वाटत नाही तरीही लिखाण ओघवते आहे.
म्हणूनच पुढे चांगले लेखन करावे ही इच्छा व अपेक्षा.

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2013 - 4:37 am | श्रीरंग_जोशी

पालिंचे अनुभव वाचतांना मजा आली :-).

अजून येउद्या!!

शुचि's picture

18 Apr 2013 - 5:34 am | शुचि

खी: खी:

सस्नेह's picture

18 Apr 2013 - 2:14 pm | सस्नेह

मजा वाटली.

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 8:59 pm | तुमचा अभिषेक

मजा आली.. आवडले वाचायला.. थोडावेळ पालीला मी देखील घाबर्तो हे विसरून तिच्या पार्टीत गेलो.. :)

मुक्त विहारि's picture

19 Apr 2013 - 2:50 pm | मुक्त विहारि

मझा आ गया,,