कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
(हा लेख म्हणजे आधी गुरूघंटाल यांच्या एका लेखावर दिलेल्या प्रतिसादांचे संकलन आहे. त्यात काही अजून मुद्दे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सौजन्य - पैसाताई, विसुनाना, संपत इ.
द्विरुक्ती वाटल्यास काढून टाकला तरी चालेल.)
डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण -
‘A good camera helps a good photographer; it doesn't make one.’
जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते तेव्हा बाजारात अक्षरशः ढिगाने उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे गोंधळून जाते. इथे सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे की छायाचित्रण महत्त्वाचे आहे. तुमच्या हातातील साधने नंतर. फोटो तुम्ही काढता, तुमचा कॅमेरा नाही. मग या दर्जाचे छायाचित्रण करण्याचे ठरवल्यानंतर आधी हे ठरवा की तुम्हाला सुरुवातीला कोणत्या प्रकारचे छायाचित्रण करायचे आहे. पोर्ट्रेट्स, वाइल्डलाईफ, मॅक्रो, प्रॉडक्ट्स, आर्किटेक्चरल, इंडस्ट्रियल, वेडिंग्ज व इव्हेंट्स, बर्डिंग, लॅण्डस्केप्स, इ.... मग त्यातही पुढे तुम्ही किती प्रोफेशनल होणार, तुमचा प्रकाशचित्रे विकण्याचा मनोदय आहे का, की फक्त हौशी. तुम्हाला स्टुडिओ फोटोग्राफी करायची आहे की आउटडोअर. ह्यातला एक प्रकार निश्चित केला की त्याला कुठल्या प्रकारचे साहित्य लागते ते शोधावे. उदा. पोर्ट्रेट्स ला स्टुडिओ, स्पीडलाइट्स, सॉफ्टबॉक्सेस, रिफ्लेक्टर्स, बॅकड्रॉप्स इ. घ्यावे लागेल तर वाइल्डलाईफ साठी यातले काहीच लागणार नाही. पण वाइल्डलाईफला जास्तीत जास्त फोकल लेंग्थवाल्या लेन्सेस आणि फास्टेस्ट एफ्. पी. एस्. (फ्रेम्स पर सेकंड्स) देणारा अत्युच्च दर्जाचा कॅमेरा लागेल, तर पोर्ट्रेट्स साठी अगदी एपीएस् साइजचा (१.६ किंवा १.५ क्रॉप फॅक्टरवाला) कॅमेरा व ५०, ८५ वा ७०-२०० एमएम लेन्सेस पण चालतील. मॅक्रोसाठी विशेष मॅक्रो (निकॉनच्या भाषेत माइक्रो) लेन्सेस व खास मॅक्रो स्पीडलाइट्स लागतील. तर बर्डिंग साठी सर्वात जास्त फोकल लेंग्थवाल्या प्राइमच वापराव्या लागतील.
आता एकदा आपल्याला काय काय साहित्य आत्ता किंवा पुढे लागू शकेल याची ढोबळ यादी बनविल्यानंतर त्यात सर्वात उत्तम दर्जा, सर्वात जास्त व्हरायटी, सर्वात जास्त कंपॅटिबिलिटी, सर्वात जास्त उपलब्धता व वापर, ब्रॅण्डची विश्वसनीयता व लॉन्जेविटी आणि शेवटी तुमची आवड व ब्रॅण्ड एकनिष्ठता या गोष्टींचा विचार करावा.
शक्यतो सर्वच छायाचित्रकार वापरलेल्या लेन्सेस वगैरे घेत राहतात व आपले आर्सेनल समृद्ध करतात. त्यामुळे लगेचच सर्व काही व सर्व काही नवीन घेण्याचा अट्टाहास करू नये. मिळाल्यास आधी लेन्स, कॅमेरा वगैरे भाड्याने वापरून पहावे किंवा मित्रांकडून उधार घेऊन टेस्ट करून पहावे व मगच विकत घ्यावे. आता एकदा का तुम्ही एका ब्रॅण्डचा कॅमेरा घेतला की मग त्याच ब्रॅण्डच्या लेन्सेस किंवा त्याला कंपॅटिबल लेन्सेस, स्ट्रोब्ज इ. घेत राहाल. त्यामुळे काही काळाने ब्रॅण्ड स्विच करणे फार अवघड होऊन बसते.
कॅनन आणि निकॉन-
कॅनन आणि निकॉन दोन्ही मल्टि-बिलियन डॉलर ऑप्टिकल कंपन्या आहेत (ऑप्टिकल कंपनी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे) आणि या दोन्ही कंपन्या गेल्या कित्येक दशकांपासून असंख्य ग्राहक, सुरक्षादले व औद्योगिक उपयोगांसाठी जगातले सर्वात उच्च दर्जाचे ऑप्टिकल साहित्य बनवत आल्या आहेत. नेहमीच्या फोटोग्राफीसाठी लागणा-या अचूकतेपेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाचे ऑप्टिक्स आणि स्टेपर्स सारखी उत्पादने या कंपन्या बनवतात आणि त्यांची किंमत लाखो डॉलर्समध्ये असते. याच अत्युच्च दर्जाच्या उत्पादनांबरोबरच त्या कॅमेरे व लेन्सेस वगैरे बनवतात. व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणा-या सूक्ष्मदर्शकांमध्ये जे लेन्सेस, यांत्रिक स्टेपर्स इ. वापरले जाते त्यात निकॉनचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ३७% आहे. (झाइस व लाइट्झ पेक्षाही जास्त). कॅननचा वाटा आहे २०%. केवळ नमुन्यादाखल या उपकरणांची क्षमता पाहिली तर थक्क व्हायला होते. (४५ नॅनोमीटर्सपर्यंत). कॅनन आणि निकॉन दोन्ही मुळात ऑप्टिकल कंपन्या आहेत - इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्टवेअर कंपन्या नव्हेत. त्यामुळे आधी यांचा चांगला कॅमेरा घ्यायचा आणि मग पैसे वाचविण्यासाठी कुठलीतरी थर्ड पार्टी लेन्स त्यावर लावायची याला माझ्या मते काहीच अर्थ नाही. या दोन्ही कंपन्यांची ऑप्टिकल उत्पादने अक्षरशः लाखो डॉलर्सला विकली जातात. त्या तुलनेत आपण छायाचित्रकार जे लेन्सेस, कॅमेरे, स्पीडलाइट्स इ. विकत घेतो ते फार फार तर दोनशे ते दहा हजार डॉलर्सपर्यंत जाते. कॅनन आणि निकॉन दोन्हींच्या दृष्टीने चिल्लर...
सरळ आहे. छायाचित्रण म्हणजे प्रकाश, ऑप्टिक्स. मग त्यासाठी ऑप्टिक्समधील बाप कंपन्यांकडेच जावे. उदा. निकॉन, कॅनन, लाइका, झाइस, पेन्टॅक्स, इ. हे झाले लेन्स बद्दल. आणि आधी लेन्सेस चा विचार करावा व मग त्यांना सूट होईल असा कॅमेरा विकत घ्यावा.
मी निकॉन का घेतला -
मी छायाचित्रण शिकलो ते मित्राच्या कॅननवर. पण स्वतःचा पहिला डी. एस्. एल्. आर्. घ्यायचं ठरवलं तेव्हा काही शोधाशोध केली, थोडी पुस्तके, फोरम्स, संस्थळे उलथीपालथी केली, प्रत्यक्ष काही कॅमेरे वापरून बघितले आणि निकॉन निवडला. त्यातील काही मुद्दे इथे देत आहे.
१. फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स म्हणजे लेन्स माउंट च्या माउंटिंग फ्लॅन्ज आणि सेन्सर प्रतल यामधील अंतर. हे अंतर एका ब्रॅण्डच्या कॅमे-याला दुस-या ब्रॅण्ड्सच्या लेन्सेस अडॅप्टर वापरून लावता येतील की नाही हे ठरवते. हे शक्य होण्यासाठी ह्या लेन्सेसचे सर्वात योग्य फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स हे कॅमे-याच्या फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स पेक्षा जास्त हवे. निकॉन च्या एफ्-माउंटचे फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४६.५० मिमी तर कॅननचे (इएफ-एस माउंट) फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४४ मिमी आहे. फारसा फरक नाही. (सोनी व लायकाचे अंतर जास्त आहे.)
फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स जास्त असण्याचा फायदा हा की अशा माउंटवर त्याच ब्रॅण्डच्या जास्त लेन्सेस लावता येतात, तर कमी असण्याचा फायदा हा, की अशा माउंटवर जास्त अडॅप्टर्स लावून वेगवेगळ्या लेन्सेस लावता येतात. म्हणूनच निकॉनचा एफ्-माउंट १९५९ पासून बदललेला नाही तर कॅननने १९८७ मध्ये इओएस माउंट आणून आधीच्या लेन्सेसची कंपॅटिबिलिटी संपवून टाकली.
२. कॅननच्या कॅमे-यां ना निक्कॉर लेन्सेस लावता येतात, पण निकॉनच्या कॅमे-यांना कॅननच्या (किंवा इतर काही ब्रॅण्ड्स च्या) लेन्सेस लावता येत नाही याचे हेच कारण आहे. अर्थात, ही कमतरता निकॉनच्या टाइमलेस एफ्-माउंटमुळे चांगलीच भरून निघते, कारण तुम्हाला तुमच्या खूप जुन्या मॅन्युअल निक्कॉर लेन्सेस टाकून द्याव्या लागत नाहीत. अर्थात हा सगळा शेवटी वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे.
३. सुरुवातीच्या कॅनन कॅमे-यांना निकॉनच्या लेन्सेस असत.
निकॉन आधी फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी महागडे व्यावसायिक कॅमेरे बनवी, तर कॅनन आधी फक्त हौशी लोकांसाठी स्वस्त कॅमेरे बनवी. सुरुवातीला कॅननची स्पर्धा लायकाबरोबर होती. निकॉनने स्वस्त आणि कॅननने महाग कॅमेरे बनवण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजे दुस-या महायुद्धानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
४. निकॉनच्या लेन्सेसच्या फिल्टर साइजेस बहुतांशी ठरलेल्या आहेत व तुम्हांला दरवेळी नवीन फिल्टर घ्यावे लागत नाहीत.
५. लायकाने ऑटोफोकसचा वापर करता येईल असे तंत्रज्ञान शोधले. १९८५ मध्ये आधी मिनोल्टाने व नंतर कॅनन व निकॉन ने असे कॅमेरे बाजारात आणले. पण आधी सांगितल्याप्रमाणे कॅननने आपली माउंटिंग सिस्टिम अद्ययावत केल्यामुळे निकॉनपेक्षा त्यांचे कॅमेरे ऑटोफोकस जास्त लवकर करू लागले. स्पोर्टस् फोटोग्राफर्सना ही बाब सोयीची वाटल्यामुळे कॅननचे कॅमेरे व लेन्सेस त्यांच्यात लोकप्रिय झाले. व एकदा आख्खी सिस्टिम एका ब्रॅण्डमध्ये उभी केल्यावर ब्रॅण्ड बदलणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने कॅननचा दबदबा कायम झाला तो २००० पर्यंत. अजूनही एखाद्या खेळाच्या सामन्यात वगैरे सर्वत्र पांढ-या लेन्सेस दिसतात ते याच कारणामुळे.
६. २००० नंतर ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली ते निकॉनने तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आघाडी घेतल्यामुळे. आता निकॉनच्या लेन्सेससुद्धा कॅननच्या लेन्सेसइतक्याच वेगाने फोकस शोधू शकतात. निकॉनने इतर सर्व कॅमेरे-उत्पादकांवर तंत्रज्ञानाच्या संशोधनात व उत्पादनांच्या दर्जात गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त आघाडी घेतली आहे. ही आघाडी कॅमे-यांच्या तंत्रज्ञानातही डी८०० च्या रूपाने दिसून येते. निकॉनचा हा कॅमेरा थेट मीडियम फॉरमॅट कॅमे-यांना आव्हान देणारा ठरत आहे.
७. निकॉन घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची CLS ही फ्लॅश यंत्रणा. कॅननच्या TTL कडे अजूनतरी त्याला तोड नाही. कॅननचे प्री-फ्लॅशेस इतके तीव्र असतात की सब्जेक्ट्सना ते थोड्या वेळाने नकोसे वाटते. याउलट निकॉनचे प्री-फ्लॅशेस कधी पडले ते कळतही नाही. तरीही निकॉनचे फ्लॅश एक्स्पोजर पहिल्यावेळी आणि दरवेळी अचूक येते. कॅननच्या प्रोग्रॅम मोडमध्ये फ्लॅश सेटिंग्ज खूपच जास्त ऑटोमॅटिक होतात व निकॉनच्या तुलनेत आपल्याला पाहिजे तसे सेट करता येत नाहीत.
८. कॅननचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे कॅननचा व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांमधला भेदभाव. कॅननची एन्ट्रीलेवल मॉडेल्स व लेन्सेस इ. स्वस्त आहेत. पण त्याचबरोबर त्यांचा दर्जादेखील तितकाच तुलनेने कमी करण्यात आला आहे. उदा. कॅननच्या लाल रिंग असणा-या एल् सिरीज यूएसएम लेन्सेस सर्वात दर्जेदार आहेत पण नॉन-एल् सिरीज लेन्सेसच्या तुलनेत त्यांच्या दर्जा व किंमतीतील तितकाच फरक मला खटकतो. म्हणजे कॅनन तुम्हाला आधी निश्चित करायला लावते की तुम्ही प्रो आहात की अमॅच्युअर आहात. निकॉन असा उघड उघड भेदभाव करत नाही. त्यांच्या कुठल्याही लेन्समागे प्रो वगैरे लेबल लावलेले नसते तसेच फक्त प्रोफेशनल्ससाठी म्हणून त्यांची कुठलीही वेगळी खास सिरीज नाही. माझ्या 'Everyone can take good photographs' या तत्त्वाशी हे सुसंगत आहे.
९. निकॉनचे व्हाइट बॅलन्स खरोखर न्यूट्रल येतात, तर कॅनन किंचित फ्लॅश सेटिंग्जकडे झुकतो. निकॉनचे कलर रेन्डिशन बाय डिफॉल्ट न्यूट्रल आहे तर कॅननमध्ये कन्झ्युमर कॅमे-यांप्रमाणे बाय डिफॉल्ट कलर रेन्डिशनमध्ये कॉन्ट्रास्ट जास्त येतो. असे फोटोज जर त्यांमध्ये हिरवाई टिपली असेल तर जास्त चांगले वाटतात, पण आपल्या डोळ्यांना दिसणारे दृश्य आणि फोटो यात फरक लगेच कळतो. कॅननमध्ये अचूक कलर रेन्डिशन मिळवणे नवख्या छायाचित्रकारास अवघड आहे. पेन्टॅक्स सुद्धा याबाबतीत कॅननपेक्षा जास्त अचूक आहे.
१०. निकॉनच्या लेन्सेसचे डायफ्रॅम विषम संख्येने असतात (७ किंवा ९) तर कॅननचे डायफ्रॅम सम संख्येत असतात (६ किंवा ८). याचा उपयोग चांगले सनस्टार्स मिळवण्यासाठी होतो.
११. निकॉनची बटने संख्येने जास्त तर मेन्यूंमधील सबमेन्यू लेवल्स कमी असतात. कॅननचे नेमके उलटे आहे.
१२. जास्त आय्एस्ओ ला निकॉनचा परफॉर्मन्स किंचित जास्त चांगला आहे. नॉइज निकॉनमध्ये कमी येतो.
१३. निकॉनचे ऑटोफोकसिंग कॅननच्या तुलनेत जास्त सायलेंट आहे. विशेषतः एन्ट्रीलेवल लेन्सेसमध्ये तुलना केली असता.
१४. अंधारात ऑटोफोकस करण्यासाठी कॅनन पॉपअप फ्लॅश वापरते. निकॉनच्या नवीन मॉडेल्समध्ये त्यासाठी ऑटोफोकस असिस्ट बीम वापरली जाते, जी बंद करूनही निकॉनचा ऑटोफोकस जास्त अचूक व लवकर फोकस शोधतो.
१५. कॅनन सेन्सर्सच्या तीन साइजेस वापरते (१, १.३, १.६), त्यामुळे दरवेळी कुठली लेन्स कुठल्या मॉडेलवर प्रत्यक्षात किती फोकल लेन्ग्थची ठरेल हे काढत बसणे जास्त अवघड ठरते. निकॉन फक्त १ आणि १.५ वापरते. त्यामुळे आख्खी आणि अर्धी असे पटकन सांगता येते.
१६. निकॉनची बिल्ड क्वालिटी कॅननच्या तुलनेत सरस आहे.
१७. फोटो प्लेबॅकमध्ये पाहताना झूम-इन करून फक्त तेवढ्याच भागापुरता हिस्टोग्रॅम पाहता येणे फक्त निकॉन व लायकामध्येच शक्य आहे.
१८. निकॉनच्या प्रो लेन्सेस अगदी कॉर्नर्सपाशी सुद्धा शार्प असतात.
१९. कॅननच्या प्रोग्रॅम्ड ऑटो, अपर्चर व शटर प्रायोरिटी मोडमध्ये मीटरिंग वापरायला काही मर्यादा येतात. याचा तोटा विशेषतः पोर्ट्रेट फोटोग्राफी करताना पार्श्वभूमीच्या प्रकाशाला अनुसरून सब्जेक्टला अचूक प्रकाशित (इल्युमिनेट) करताना जाणवतो.
२०. डिजिटल कॅमे-यांचे संवेदक (सेन्सर्स) त्या त्या कॅमे-यांचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात महागडे भाग असतात. कॅमे-याच्या RAW फाइल्सचा दर्जा हा त्याच्या सेन्सरवर ठरतो. RAW फाइलमध्ये टिपला जाणारा विदा (डेटा), डायनॅमिक रेंज (रंगांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटा ओळखण्याची क्षमता), बर्नआउट झालेल्या भागातील व शॅडोजमधील डिटेल्स परत मिळवण्याची क्षमता, हाय ISO ला नॉइज नियंत्रण, इ. गोष्टी संवेदकावर अवलंबून असतात. आणि छायाचित्रकार नंतर पोस्ट-प्रोसेसिंगमध्ये किती वेळ घालवते हे या गोष्टींवर अवलंबून असते. गेल्या पाच-सहा वर्षांतील निकॉनचे सेन्सर्स हे कॅननच्या सर्वात उच्च प्रतीच्या कॅमे-यांपेक्षा कितीतरी पटींनी सरस आहेत.
२२. त्याचबरोबर सेन्सरच्या बायनरी विदाचे विश्लेषण करून त्याचे प्रत्यक्ष प्रतिमेत रूपांतर करणारा प्रक्रियक (प्रोसेसर) व त्याचा अल्गोरिदम् सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. निकॉनचे Exspeed 3 प्रोसेसर इंजिन अजोड आहे.
२३. निकॉनच्या लेन्सेसचा परफॉर्मन्स त्यांच्या फोकल लेंग्थ झूम रेंजवर आणि एपर्चर रेंजवर खूपसा एकसमान आढळतो. सर्वात वाइड एपर्चरला सुद्धा कॉर्नर-टू-कॉर्नर शार्पनेस निकॉनमध्ये चांगला मिळतो.
२४. निकॉनच्या दोन मॉडेल्समध्ये Optical Low Pass Filter ला डच्चू देण्यात आला आहे. (D800E आणि D7100). Optical Low Pass Filter मुळे इमेज शार्पनेस कमी होतो, पण त्याचबरोबर color moiré येण्याची शक्यता वाढते.
२५. निकॉनचा D800 व D800E हे ३६ मेगापिक्सेलचा सेन्सर वापरतात. हे कॅमेरे बाजारात आल्यापासून मीडियम फॉरमॅट कॅमे-यांना प्रथमच फुलफ्रेम कॅमे-यांकडून स्पर्धा निर्माण झाली आहे.
कॅननचे काही सरस मुद्दे -
१. कॅननकडे छायाचित्रणसाधनांच्या बाजारपेठेचा सर्वात मोठा हिस्सा आहे.
२. कॅननकडे लेन्सेसचे इतर कोणत्याही उत्पादकापेक्षा जास्त वैविध्य आहे.
३. वरील मुद्दा क्र. ८ दुस-या बाजूने पाहता तसा कॅननलाही झुकते माप देणारा आहे. कॅननच्या लेन्स वर्गीकरणाच्या पद्धतीमुळे तुम्हांला ती लेन्स तुलनेने उत्कृष्ट आहे की नाही (L सीरीज व Non-L सीरीज) हे लगेच समजते. इतर लेन्सउत्पादकांनीही आपापल्या लेन्सेसचे असे वर्गीकरण उपलब्ध करून दिले आहे. उदा. टोकिना - AT-X Pro, सिग्मा - EX, पेंटॅक्स - limited, इ.
निकॉनची कुठली लेन्स भारी हे त्या लेन्सवरील लांबलचक ओळ पाहून ठरवावे लागते. उदा. AF-S NIKKOR 200mm f/2G ED VR II यावरील ED (एक्स्ट्रॉ लो डिस्पर्जन) आणि VR II तसेच nano crystal coating असे डब्ब्यावर लिहिलेले असेल तर ती लेन्स उत्कृष्ट असावी असा अंदाज बांधता येतो. त्यासाठी छायाचित्रणाची आणि निकॉन लेन्सेसची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे.
४. कॅननची विक्रीपश्चात सेवा निकॉनच्या तुलनेत फारच चांगली आहे. अगदी भारताचाच विचार करायचा झाला तर भारतात एक्स्क्लूजिव कॅनन स्टोअर्स भरपूर आहेत. त्यामानाने निकॉनची एक्स्क्लूजिव स्टोअर्स नाहीत. जी आहेत ती फक्त निकॉन उत्पादने विकत नाहीत व म्हणूनच निकॉनच्या सर्व उत्पादनांची माहिती व उपलब्धता एका छताखाली कुठे मिळेल याची निदान मलातरी खात्रीशीर माहिती नाही.
५. विडिओ शूटिंग - निकॉनच्या कॅमे-यांनी चित्रफीत बनवणं हे ऑटोफोकस हंटिंग च्या कटकटीमुळे त्रासदायक वाटते. निकॉन वापरून केवळ प्रतिमा घ्याव्यात (फोटो काढावेत). विडिओ शूटिंगसाठी सोनीचा हॅन्डीकॅम घ्यावा. पण कॅननने विडिओ शूटिंग करणं तुलनेनं सोपं जातं असा अनुभव आहे. अर्थात् हे कॅमेरा-टू-कॅमेरा व लेन्स-टू-लेन्स बदलतं व निकॉनचे आधुनिक कॅमेरे कॅननइतकेच चांगले आहेत अशीही माहिती मिळाली आहे.
कॅननच्या बाजूने बोलण्यासारखे इतरही मुद्दे जरूर असतील. कॅननच्या चाहत्यांनी ते प्रतिसादांमध्ये मांडल्यास त्यांचे आभार. तसेच निकॉनच्या बाजूचे वरील सर्व मुद्दे सर्वांनाच पटतील असेही नाही. आणि डी. एस्. एल्. आर्. म्हणजे केवळ याच दोन कंपन्या असेतर मुळीच नाही. कार्ल झाइस व लायकाच्या काही लेन्सेस ऑप्टिक्सचा विचार केला तर निव्वळ कहर आहेत. ऑलिंपस, पेंटॅक्स, कोनिका-मिनोल्टा, नव्यानेच दाखल झालेले सोनी व सॅमसंग इ. कंपन्यांचीही आपापली सामर्थ्यस्थळे आहेत. लायकाचा नुसता एक रेंजफाइंडर घेणे हे येर्या गबाळ्याचे काम नोहे. मीडियम फॉरमॅट व लॉन्ग फॉरमॅटचा इथे विचार केलेला नाही.
डिस्क्लेमर्स व नोट्स -
(लेखात सर्वसामान्यपणे अनामिक कर्त्यासाठी सर्वनाम पुल्लिंगी वापरण्याची पद्धत आहे. उदा. ‘जेव्हा एखादा नवखा छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवतो’. मी माझ्या लेखांमध्ये मुद्दाम सामान्य कर्ता रूप स्त्रीलिंगी ठेवलं आहे. उदा. ‘जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते’. प्रेरणा - ‘Operating System Concepts’, Abraham Silberschatz, Peter B. Galvin, Greg Gagne. आणि Homai Vyrawalla, भारतातील पहिल्या स्त्री छायावृत्तकार)
वरील लेख केवळ माहितीपर असून सर्वच मते अचूक असतील असे नाही. कुठला कॅमेरा किंवा ब्रॅण्ड कुणाला जास्त भावेल हे व्यक्तीसापेक्ष आहे.
मला फक्त निकॉन व कॅननच्या कॅमेरे/लेन्सेसची विस्तृत माहिती देता येईल. इतर ब्रॅण्ड्सची किंवा पॉइंट व शूट कॅमे-यांबद्दल मला फारशी स्वानुभवजन्य माहिती नाही.
मी माझ्या मते फार वाईट फोटोग्राफर आहे.
संदर्भ -
आंतरजालावरील विविध संस्थळे, पुस्तके, स्वानुभव, परानुभव, परीक्षणे, चर्चाकट्टे (फोरम्स), लिंक्डइन वरील कट्टे, इ. मधून वेळोवेळी काढलेली टिपणे.
संज्ञा -
डी. एस्. एल्. आर्. - ३५ मिमी सेन्सर साइज. http://en.wikipedia.org/wiki/Digital_single-lens_reflex_camera
मीडियम फॉरमॅट - साधारणपणे ६X६ सेंमी फिल्म किंवा डिजिटल बॅक साइज. http://en.wikipedia.org/wiki/Medium_format
लॉन्ग फॉरमॅट - साधारणपणे १२० सेंमी किंवा ८X१० इंच फिल्म साइज.
रेंजफाइंडर http://en.wikipedia.org/wiki/Rangefinder_camera
स्टुडिओ फोटोग्राफी - Studio photography is any photography shot under the controlled conditions of a studio.
स्पीडलाइट्स - http://en.wikipedia.org/wiki/Speedlight
सॉफ्टबॉक्सेस - http://en.wikipedia.org/wiki/Soft_box
रिफ्लेक्टर्स - http://en.wikipedia.org/wiki/Reflector_(photography)
फोकल लेंग्थ - http://en.wikipedia.org/wiki/Focal_length
लेन्सेस - http://en.wikipedia.org/wiki/Camera_lens
कॅमेरा - http://en.wikipedia.org/wiki/Camera
एफ्. पी. एस्. (फ्रेम्स पर सेकंड्स) - http://en.wikipedia.org/wiki/Frame_rate
एपीएस् - http://en.wikipedia.org/wiki/APS-C
क्रॉप फॅक्टर - http://en.wikipedia.org/wiki/Crop_factor
मॅक्रो - http://en.wikipedia.org/wiki/Macro_photography
माइक्रो - Nikon nomenclature for Macro
स्ट्रोब्ज - http://en.wikipedia.org/wiki/Strobe_light
ऑप्टिकल - http://en.wikipedia.org/wiki/Optical
फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स - http://en.wikipedia.org/wiki/Flange_focal_distance
लेन्स माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Lens_mount
सेन्सर - http://en.wikipedia.org/wiki/Image_sensor
अडॅप्टर - A lens adapter allows the use of a lens on a camera for which it was not designed.
एफ्-माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Nikon_F-mount
इओएस माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Canon_EF_lens_mount
मॅन्युअल लेन्सेस - Without CPU, Manual handling and focusing
निक्कॉर - http://en.wikipedia.org/wiki/Nikkor
फिल्टर - http://en.wikipedia.org/wiki/Photographic_filter
ऑटोफोकस - http://en.wikipedia.org/wiki/Autofocus
सीएलएस - http://www.nikoncls.com/
टीटीएल - http://en.wikipedia.org/wiki/Canon_EOS_flash_system
प्री-फ्लॅशेस - http://en.wikipedia.org/wiki/Pre-flash_metering
एक्स्पोजर - http://en.wikipedia.org/wiki/Exposure_(photography)
एल सिरीज यूएसएम - http://en.wikipedia.org/wiki/Canon_L_lens
व्हाइट बॅलन्स - White balance is a camera setting that adjusts for lighting in order to make white objects appear white in photos.
कलर रेन्डिशन - For a light source, the extent of the agreement between the perceived color of a surface illuminated by the source and that of the same surface illuminated by a reference source under specified viewing conditions, measured and expressed in terms of the chromaticity coordinates of the source and the luminance of the source in agreed spectral bands.
कॉन्ट्रास्ट - Difference between highest luminance and lowest.
डायफ्रॅम - http://en.wikipedia.org/wiki/Diaphragm_(optics)
आय्एस्ओ - http://en.wikipedia.org/wiki/Film_speed
नॉइज - http://en.wikipedia.org/wiki/Image_noise
पॉपअप फ्लॅश - The on-camera flash
ऑटोफोकस असिस्ट बीम - http://en.wikipedia.org/wiki/Autofocus#Assist Lamp
हिस्टोग्रॅम - http://en.wikipedia.org/wiki/Image_histogram
RAW फाइल्स - http://en.wikipedia.org/wiki/RAW_file
डायनॅमिक रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Dynamic_range#Photography
पोस्ट-प्रोसेसिंग - http://en.wikipedia.org/wiki/Digital_image_processing
फोकल लेंग्थ झूम रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Zoom_lens उदा. १८-५५ मिमी झूम लेन्सेचे १८ ते ५५ पर्यंतचे सर्व अपर्चर स्टॉप्स.
एपर्चर रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Aperture उदा. ५० मिमी लेन्सची Aperture range f/1.4-f/16 पर्यंत असू शकते.
Optical Low Pass Filter - http://en.wikipedia.org/wiki/Anti-aliasing_filter
Color Moiré - http://en.wikipedia.org/wiki/Moir%C3%A9
Nano Crystal Coating - Indicates the Nano Crystal Coat, a relatively new type of lens coating that originated in Nikon's semiconductor division. Lenses with this coating feature the logo of an "N" inside an elongated hexagon on the name plate.
एक्स्ट्रॉ लो डिस्पर्जन - http://en.wikipedia.org/wiki/Chromatic_aberration
तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. वरील लेखात आलेल्या तांत्रिक संज्ञांबद्दलही पुढे केव्हातरी विस्ताराने लिहीन.
प्रतिक्रिया
23 Mar 2013 - 4:22 am | अँग्री बर्ड
बऱ्यापैकी गोष्टी उलगडून सांगितल्या आहात. निकॉन कॅनोनपेक्षा केव्हाही सरस पण महागे ! आपण निकॉन कूलपिक्स P510 वापरतो बॉ !
23 Mar 2013 - 5:44 am | nishant
छान माहिति दिलिस...निकॉन रुल्स..आपलाबी ;) !!
23 Mar 2013 - 7:05 am | ५० फक्त
मस्त माहिती एकदम, तु म्हणतोच आहेस तसा थोडासा एकांगी म्हणजे बायसड वाटला,तरी देखील खुप छान माहिती.
23 Mar 2013 - 8:52 am | लॉरी टांगटूंगकर
मी पण कॅननच्या चाहत्यांची वाट बघतोय...कॅननचे चाहते पण एकदम कट्टर असतात.
26 Mar 2013 - 12:08 am | जेनी...
मी कॅनन ची चाहती ... एकदम कट्टर्र्र !
23 Mar 2013 - 8:39 am | वेल्लाभट
एवढी डीट्टेल माहिती ! सही आहे राव. धन्यवाद. वाचून जाम भर पडली ज्ञानात. बुकमार्क केलाय पुन्हा वाचावा लागेल जेंव्हा अॅक्चुअल घ्यायला जाईन त्या आधी.
सॉलिड धन्यवाद.
23 Mar 2013 - 8:55 am | प्रचेतस
माहितीपूर्ण लेख.
पण इतक्यातच थांबू नये.
छायाचित्रणाच्या तंत्रावरही अधिक माहिती येऊ द्यात.
23 Mar 2013 - 2:37 pm | विसुनाना
असेच माझेही मत आहे.
23 Mar 2013 - 3:08 pm | एस
नक्कीच.
23 Mar 2013 - 9:04 am | मन१
माहितीनं खच्चून भरलेला लेख.
छायाचित्रणातलं(ही) काहीच समजत नाही; पण त्यात रस असलेल्यांना नक्की वाचायला सुचवणार हा लेख.
23 Mar 2013 - 9:25 am | चौकटराजा
मी माझ्या मते फार वाईट फोटोग्राफर आहे. हे मात्र फार आवडले. मला माझ्याबद्द्ल असेच वाटते.कारण मी फार अप्रतिम फोटो ग्राफी पाहिलेला माणूस आहे. बाकी लेख माझ्या पार डोक्यावरून गेला. जादा लेन्सेस, फिल्टर्स वगैरे मी पुढच्या जन्मासाठी राखून ठवलेले एरिया आहेत.
आपला फोटो फसला आहे. हे ताबडतोब कळणारा तज्ञ - चौ रा.
23 Mar 2013 - 9:54 am | स्पा
निकोन रॉक्स ...
23 Mar 2013 - 10:31 am | मैत्र
सर्वप्रथम.. उत्तम लेख आणि संकलन..
http://www.kenrockwell.com/tech/nikon-vs-canon.htm या लेखाची आठवण आली...
निकॉन उत्तम आहे यात शंका नाही. पण अनेकदा "कितीतरी पटींने सरस" असा शब्दप्रयोग म्हणजे अतिशयोक्ती वाटते.
जर निकॉन ३-४-५ पट उत्तम रिझल्ट्स देत असेल तर कॅनन ला गाशाच गुंडाळावा लागेल.
प्रोफेशनल विभागात आजही 5D / 7D हे कॅननचे कॅमेरे सर्वोत्कृष्ट मानले जातात आणि अनेक प्रोफेशनल्स ते वापरताना दिसतील. अत्यंत कमी दर्जाचे सेन्सर्स असल्यास हे शक्यच नाही.
एन्ट्री लेव्हलला कॅननच्या लेन्सेस ज्या किंमतीत जे रिझल्ट्स देतात ते निकॉन मध्ये येणे अवघड आहे. मागे एका लेखावर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आता निकॉनने D600 च्या तोडीचे मॉडेल आणले आहे. २-३ वर्षापूर्वी तो पर्याय नव्हता.
कॅनन अनेक पर्याय देते. उदा. ५० एमएम प्राईम लेन्स मध्ये एक अतिशय स्वस्त आणि तकलादू बिल्डची लेन्स केवळ ७-८ हजारात येते. पूर्वी ही अजून स्वस्त होती आणि या किंमतीला उत्तम रिझल्ट्स देते.
पण त्याच बरोबर ५० एम एम ची एफ १.४ ची एक उच्च दर्जाची कॅनन लेन्स ३२००० ला उपलब्ध आहे.
अशा स्वरुपाचे पर्याय निकॉन देत नाही.
थोडी गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर मध्यम लेव्हलला (एन्ट्री च्या पेक्षा नक्कीच जास्त जाणकारी आणि सिरियस इंटरेस्ट) तर निकॉन आणि फार दूरवर जाण्यात इंटरेस्ट नसेल तर कॅनन. पैशाचे बंधन असेल तर कॅनन..
पण अतिशय उच्च दर्जाचे प्रोफेशनल काम करायचे असेल तरी कॅनन तुल्यबळ आहे..
अर्थात काही बाबतीत विशेषतः white balance / high ISO noise निकॉन कॅननच्या बराच पुढे आहे.
23 Mar 2013 - 3:06 pm | एस
यावर मी काही अधिक बोलण्यापेक्षा खालील दुवे पहावेत असे सुचवेन -
http://www.fredmiranda.com/5DIII-D800/index_controlled-tests.html
http://www.dxomark.com/index.php/Cameras/Camera-Sensor-Ratings
नमुन्यादाखल खालील सारणी पहा -
Sr. No. Sensor Rating
प्रो कॅमेरे, त्यांच्या लेन्स सिस्टीम्स, अक्सेसरीज्, व इतर गुंतवणुकींचा विचार केला तर माझे लेखातील खालील मत पटेल - “आता एकदा का तुम्ही एका ब्रॅण्डचा कॅमेरा घेतला की मग त्याच ब्रॅण्डच्या लेन्सेस किंवा त्याला कंपॅटिबल लेन्सेस, स्ट्रोब्ज इ. घेत राहाल. त्यामुळे काही काळाने ब्रॅण्ड स्विच करणे फार अवघड होऊन बसते.” तसेच ९० च्या दशकात व्यावसायिक छायाचित्रकार कॅननकडे का झुकले हेही लेखात सांगितले आहे. एवढी सगळी गुंतवणूक गुंडाळून पुनश्च हरिओम् म्हणत सुरुवात करणे सोपे नाही. त्याचबरोबर त्या ब्रॅण्डची सवय झालेली असते. कॅनन आणि निकॉन चे सगळे एकमेकांच्या उलटे आहे. लेन्स माउंटिंगच्या दिशेपासून ते मेन्यूपर्यंत. त्यामुळे अजूनही कॅनन वापरणारे प्रोज् बराच काळ तरी कॅननच वापरत राहतील हे स्पष्ट आहे.
D600 हा निकॉनचाच कॅमेरा आहे. तुम्हांला 600D म्हणायचे असेल.
निकॉनच्या लेन्सेसच्या किंमती ह्या दुव्यावर पहायला मिळतील.
http://www.nikon.co.in/en_IN/pagearticle.page?DCRPath=templatedata/en_IN...
५० मिमी लेन्सेस -
AF-S NIKKOR 50mm f/I.4G 31,950/-
AF-S NIKKOR 50mm f/I.8G 13,750/-
AF NIKKOR 50mm f/1.4D 17,950/-
AF NIKKOR 50mm f/1.8D 6,290/-
यातील सगळ्यात शेवटची लेन्स माझ्याकडे आहे व ती अप्रतीम रिझल्ट्स देते. मला ती साडेपाच हजारांना पडली. कॅननची त्याच दर्जाची लेन्स साडेसात हजारांला विकली गेल्याचं त्याच दिवशी त्याच दुकानात पाहिलं आहे.
AF-SNIKKOR 600mm f/4G ED VR 679,950/-
याच फोकल लेन्ग्थची व दर्जाची कॅननची लेन्स खालील किंमतीला आहे.
Canon EF 600mm f/4L IS II USM 803245/-
मग निकॉनच्या लेन्सेस कॅननच्या लेन्सेसच्या तुलनेत महाग कशा?
अजून एक मुद्दा क्र. २६- कॅननचे कॅमेरे व प्राइम लेन्सेस आकाराने निकॉनच्या तशाच उत्पादनांपेक्षा मोठे (बल्की) आहेत. :)
23 Mar 2013 - 4:26 pm | मैत्र
स्वॅप्स धन्यवाद.. उत्तम माहिती मिळाली.
१. एकूणात निकॉन सेन्सर्स हे कॅनन पेक्षा सरस असल्याचे दिसते. साधारण एका लेव्हलच्या कॅमेर्यात रेटिंग मध्ये निकॉन पुढे आहे. अपेक्षेप्रमाणे कमी उजेड, कमी noise इ. विभागात आघाडीवर आहे आणि विशेषतः सर्वोच्च कॅमेरे D800 D600 इ. एकाच पातळीवर असलेल्या मॉडेल्स मध्ये तुलना केल्यास निकॉन चांगले आहेत पण अर्थात पुन्हा एकदा मुद्दा हा की काही पटीने सरस आहेत हे विधान अतिशयोक्त आहे..
२. 600D म्हणायचे होते. टंकलेखनात चूक झाली. या किंमतीत पूर्वी निकॉन चे पर्याय नव्हते. थेट D90 घ्यावा लागत होता. आता उत्तम पर्याय आणले आहेत जे कॅननपेक्षा चांगले आहेत.
३. निकॉनची ५० एम एम लेन्स इतकी स्वस्त आहे याची कल्पना नव्हती. धन्यवाद..
शेवटच्या मुद्द्याबद्दल कल्पना नाही.. (बल्की)
४. एका प्रकारच्या लेन्सेस आणि माउंट यामुळे तोच सेट वाढत जातो आणि लोक एकनिष्ठ आपोआप राहतात. मेनू आणि वापर एकदम विरुद्ध असल्यानेही अडथळा येतोच.. त्यामुळे तो मुद्दा मान्य आहे.
एकूण लेख कॅनन जरा बकवास आहे आणि निकॉन अतिउत्तम आहे असा सूर वाटला..
D90 पेक्षा साध्या ५००डी ने उत्तम फोटो काढलेले पाहिले आहेत. हेही खरे की अतिशय उच्च दर्जाच्या निकॉनचे फोटो किती जबरदस्त येतात याची कल्पना आहे. निकॉन D800 वापरून पाहिला आहे.
23 Mar 2013 - 9:47 pm | एस
असे अजिबात नाही. लेखातील तेवढ्या भागाचे शीर्षकही 'मी निकॉन का घेतला' असे आहे. कॅननचीही कित्येक वैशिष्ट्ये खूप चांगली आहेत. पण मी कॅनन वापरत नसल्याने मला माहीत नाहीत एवढेच. यासाठीच कॅननची माहिती असणा-यांना त्यांनी त्यांचेही मुद्दे मांडावेत असे आवाहन केले होते. प्रत्येक परिस्थितीत दोन्ही (किंवा इतरही) ब्रॅण्ड्सचे कॅमेरे किंवा लेन्सेस वेगवेगळे परफॉर्मन्स दाखवतात. तेव्हा त्या परिस्थितीत त्या क्षणाला त्या सेटिंगला तो ब्रॅण्ड काकणभर सरस ठरतो. 'लेखाचा सारांश आमचा निकॉन बाळ्या गल्लीतल्या बाकी सगळ्या कार्ट्यांपेक्षा जास्त गुणाचा असे सांगण्याचा नाही. :)' हे वाक्य शेवटच्या डिस्क्लेमर मध्ये टाकायचं राहून गेलं ही माझी चूक. निकॉनने ऑटोफोकस व सेन्सर तंत्रज्ञानाच्या स्पर्धेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं आहे व इतर स्पर्धक किती लवकर आपापला दर्जा तितका उंचावतात हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल...
हे शक्य आहे. कारण D90 हा डीएस्एल्आर् च्या दुस-या पिढीतील कॅमेरा मानला जातो तर EOS Rebel T1i (500D) हा तिस-या पिढीतील कॅमेरा आहे. निकॉनने अजूनही D90 ची लाइन सुरू ठेवली आहे याचे नक्की कारण मला माहीत नाही, पण माझा अंदाज असा आहे - कुठल्याही कॅमे-याचा सेन्सर (संवेदक) बनवण्यासाठी एक खास प्रकारचा डाय वापरला जातो. उत्पादनाच्या पहिल्या काही वर्षांत त्याचे तयार चिप विरुद्ध वाया गेलेले मटेरिअल हे गुणोत्तर बरेच कमी असते. त्या डायची परिणामकारक उत्पादकता साधारणपणे ९० टक्क्यांपर्यंत वाढेपर्यंत व काही काळ नंतरही ते उत्पादन सुरू ठेवणे कंपन्यांना परवडण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे कदाचित हा कॅमेरा अद्याप प्रॉडक्शनमध्ये असावा.
खरेतर सर्वात चांगला कॅमेरा कोणता असा मला कुणी प्रश्न विचारल्यास मी सांगेन की तुम्हांला जेव्हा फोटो काढावासा वाटेल तेव्हा तुमच्या हातात असणारा कॅमेरा सगळ्यात उत्तम. छायाचित्रणातील एवढ्या सगळ्या तांत्रिक बाबी असूनही त्याला कला का म्हटले जाते हे तुम्हांला वेगळे सांगण्याची गरज नाही. पुढे कधीतरी छायाचित्रण नावाच्या कलेविषयी लिहिण्याचा मनोदय आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद मैत्र...
23 Mar 2013 - 1:21 pm | नांदेडीअन
आम्ही Panasonic FZ18 वाले.
६ वर्षांपासून टकाटक चालतोय.
23 Mar 2013 - 2:43 pm | चिगो
लेख अगडबंब आवडला.. पण जन्मजात आळसापायी एक प्रश्न विचारतोय. 50 हजारापर्यंत बजेट असल्यास बेस्ट DSLR कुठला? सध्या कॅननचा SX30IS पाॅइंट न शुट वापरतोय. तोही उत्तमच आहे, पण जरा हौशीपणा करायची हुक्की आलीय.. कॅननच्या फोटोज मध्ये बाय डिफाॅल्ट कलर्स जरा सॅच्युरेटेड येतात, असं मला वाटतं..
23 Mar 2013 - 3:34 pm | एस
खाली काही दुवे देत आहे. तुम्हांला जी मॉडेल्स आवडतील ती निवडा व त्यांच्याबद्दल अजून माहिती मिळवा. तुम्ही काही मॉ़डेल्स फायनलाइज करा, मग मला त्यांच्याविषयी काही माहिती असेल तर सांगतो.
कॅनन
निकॉन
सोनी
ऑलिंपस
पेन्टॅक्स
तुम्ही आळशी आहात म्हणून आयतं काही सुचवत नाही. ;)
23 Mar 2013 - 6:37 pm | अर्ध सत्य
उत्तम लेख आहे मला मनापासुन आवडला, या लेखाबद्दल आपले शतशः आभार.
23 Mar 2013 - 6:45 pm | ५० फक्त
एक शंका, ही लायका पेंटॅक्स वगैरे जी मंडळी आहेत ती सर्वसामान्य लोकांच्या डोकॅलिटि आणि कॅपॅकिटिच्या बाहेर आहेत का ? का ती असल्या चिल्लर झाडा झुडुपांच्या आणि मांजरा बायकांच्या फोटोग्राफिसाठी लागणा-या साधनांच्या धंद्यात उतरत नाहीत.
23 Mar 2013 - 9:55 pm | एस
हाहाहाहा... लायकाने स्वस्तातले कॅमेरे बनवणं म्हणजे मर्सि़डिज किंवा बीएमडब्ल्यूने अल्टो ८०० ला टक्कर देण्यासाठी तशीच एखादी छोटी कार काढणं आहे. लायकाचा आपला खास असा एक चाहतावर्ग आहे, तसाच तो पेन्टॅक्सचाही आहे. आपण जसं आपलं रोजचं वाचायचं वर्तमानपत्र शक्यतो बदलत नाही तसंच आहे.
बाकी लायकाचे कॅमेरे पिढ्यान् पिढ्या टिकतात. नव्हे, तर लायकाचा लाल ठिपका असणारा व पितळी आवरण झिजून उघडा पडलेला कॅमेरा म्हणजे लायका ओनरचा शोपीस असतो.
23 Mar 2013 - 6:50 pm | चिगो
ही घ्या यादी, मालक..
Nikon D90 Kit (18-105mm VR)
Nikon D5200 Kit (18-105mm VR)
Canon 500D/550D
आता ह्यांच्यामधून सुचवा, ही विनंती.. :-)
23 Mar 2013 - 10:08 pm | एस
डी९० हा दुस-या पिढीतला कॅमेरा आहे, तर डी५२०० हा तिस-या पिढीचा नुकताच आलेला कॅमेरा आहे.
डी५२०० व ५५०डी किंवा ६५०डी कुणाकडे मिळाले तर किंवा शोरूममध्ये जाऊन हाताळून बघ. अजून एक म्हणजे किट लेन्सच्या नादी लागू नकोस. फक्त कॅमेरा बॉडी घे, एखादी ५०मिमी सारखी स्वस्त लेन्स घे व नंतर सवडीने फुलफ्रेमसाठीच्या लेन्सेस घेत रहा. प्राइम लेन्स वापरण्याचा एक फायदा म्हणजे त्या फक्त एका कोनातून पाहण्याची सवय झाल्याने तुमची फोटोग्राफीची नजर विकसित होते.
डी५२०० आणि कॅननचे बरोबरीचे मॉडेल यांची तुलना आंतरजालावर उपलब्ध असते. dpreview सारख्या साइट्स पहा. दोन्ही मॉ़डेल्समधील खाचाखोचा मी सांगेनच नंतर.
24 Mar 2013 - 7:48 pm | चिगो
मी बहुतेक डि 5200 घेईल, 105 mm किट लेन्स सोबत.. . हाताळायला मिळायचा चॅन्स कमी असल्याने कदाचित नेटावरच भरवसा ठेवावा लागेल..;-) घेतल्यावर बोलूच..:-)
24 Mar 2013 - 11:33 pm | एस
लवकरच तू बनवलेल्या प्रतिमा टाक मिपावर...
"Photography is the journey from taking images to making images..."
- Vikram Potdar in one of his lectures
23 Mar 2013 - 9:26 pm | कपिलमुनी
मिररलेस टेक्नॉलॉजी बद्दल माहिती आणि तुलना या बद्दल माहिती मिळेल का?
जालावर शोधले पण तांत्रिक ज्ञान कमी असल्याने त्यांची आणि डीएसेलार ची तुलना करता आली नाही
23 Mar 2013 - 9:58 pm | एस
मिररलेस म्हणजे अगदी नवीन असं काही नाही. कंझ्युमर पॉइंट व शूट कॅमेरे आणि डीएस्एल्आर् च्या मध्ये ही कॅटेगरी येते. थोडं सवडीनं अधिक शोधाशोध करून लिहितो.
23 Mar 2013 - 9:55 pm | यशोधरा
अपुनभी निकॉननिष्ठ. धन्यवाद.
27 Mar 2013 - 11:08 am | अभिज्ञ
अगदि अगदि...
बाकरवडी खावी ती चितळेंचीच अन डिएसएलाआर कॅमेरा घ्यावा तो नि़कॉनचाच....;)
बाकी चालु द्या.
जरा लेन्सेस बद्दल ही येउ द्यात.
अभिज्ञ.
23 Mar 2013 - 10:56 pm | Dhananjay Borgaonkar
माहितीपुर्ण लेख. वाचनखुण साठवली आहे.
मालक, मी सुद्धा निकॉन डी३२००(१८-५५ लेन्स) घ्यायचा विचार करत आहे. तुम्हाला कसा वाटतो हा कॅमेरा?
मी या आधी मॅन्युअल मोड्वर एकपण फोटो काढला नाहीये. माझ्यकडे साधा P&S आहे आत्ता.
24 Mar 2013 - 1:17 am | एस
२४ मेगापिक्सेल खरंतर डोक्याला ताप आहे कारण उगाचच रॉ फाइलची साइज वाढते, हार्डडिस्क व सीपीयू प्रोसेसिंग स्पीड कमी पडतात. अर्थात हे माझे मत झाले. लोकांना जास्त मेगापिक्सेल म्हणजे जास्त चांगला फोटो असं वाटतं म्हणून कॅमेरा कंपन्या मेगापिक्सेल वाढवत बसतात.
प्लस पॉइंट म्हणजे ह्याच्या सेन्सर ची डायनॅमिक रेंज मोठी आहे.कॅमे-याचे एर्गोनॉमिक्स चांगले आहेत. एक्स्पीड-३ हे प्रोसेसिंग इंजिन आहे. आयएसओ परफॉर्मन्स चांगला आहे.
बिल्ट-इन् फोकसिंग मोटार नसल्याने लेन्सची चॉइस मर्यादित राहते व पॉपअप् फ्लॅश कमांडर म्हणून वापरता येत नसल्याने फ्लॅश फोटोग्राफी साठी कमांडर वगैरे घ्यावे लागतात.पण अगदीच एन्ट्रीलेवल ला या दोन्ही गोष्टींमुळे काही अडत नाही फारसं. डी३२०० व डी५२०० वगैरे निकॉनचे जे एन्ट्रीलेवल मॉ़डेल्स आहेत त्यांना ह्या काही मर्यादा आहेत.
किट लेन्स चांगली आहे. तिचा पुरेपूर वापर करा.
24 Mar 2013 - 7:45 pm | सर्वसाक्षी
फोटोग्राफीमधलं (सुद्धा) फारसं समजत नाही पण तरीही तोंड उघडायचे औद्धत्य करायचे म्हटले तर मला निकॉन किट लेन्स (१८-५५) फार सुमार वाटली. अखेर काढुन टाकली आणि टॅमरॉन १७-५० (२.८) घेतली. माझ्या पातळीवरच्या फोटोंना बरी वाटली, काढलेल्या १८-५५ निकॉन किट लेन्स पेक्षा नक्कीच सरस. आता ५५००-६००० मध्ये निकॉन तरी काय देणार?
24 Mar 2013 - 10:44 pm | एस
या वाक्यात तुमच्या प्रश्नाचे उत्तरही आहे.
तरी पण किट लेन्स काय काय करू शकते किंवा खरंतर किट लेन्स वापरूनही तुम्ही काय काय करू शकता यासाठी हा लेख वाचा.
http://photo.stackexchange.com/questions/20933/what-can-be-done-using-a-...
24 Mar 2013 - 11:10 am | यशोधरा
हॅसलब्लाडबद्दल लिहायला हवे होते. आमच्या सरांकडे हॅसल्ब्लाड आहेत. विनंती करुन आअम्च्या बॅचने हॅसलब्लाड हातात धरायला मागितल्याचे आठवते. :)
आमच्या सरांची साईत http://www.anandsharan.com/index.html
24 Mar 2013 - 6:13 pm | एस
हासेलब्लाडची किंवा एकूणच मीडियम फॉरमॅटची स्वानुभवजन्य माहिती फारशी नाही.थिअरेटिकल माहिती टाकू शकेन पण मीडिअम फॉरमॅट व त्याचे विविध ब्रॅण्ड्स उदा. हासेलब्लाड, मामिया इ. हे स्वतंत्र लेखाचा विषय आहेत.मीडिअम फॉरमॅटने लॅण्डस्केप किंवा पोर्ट्रेट फोटोग्राफी करणे हा फार वेगळा अनुभव आहे. आता डिजिटल बॅक येते पण ६बाय६ किंवा ४बाय६ च्या फिल्मप्लेट वर प्रतिमा घेणे व नंतर डार्करूममध्ये ती विकसित करणे याची मजा काही औरच...
जाऊदे. हे सगळं पुन्हा केव्हातरी... अजूनही बरेच विषय घोळताहेत मनात. एकूणच छायाचित्रणावर एक लेखमालिका लिहिता येईल एवढे मटेरिअल आहे. पाहूयात मुहूर्त केव्हा लागतोय ते... :)
24 Mar 2013 - 10:21 pm | श्रीरंग_जोशी
या सर्व माहितीचे या ठिकाणी संकलन करून प्रकाशित केल्याबद्दल आभार.
अवांतर -ज्यांना अवजड व आकाराने डिएसएलाआर हाताळणे अवघड वाटते त्या सर्वांसाठी मिररलेस कॅमेरा अत्यंत समर्पक पर्याय आहे.
24 Mar 2013 - 11:29 pm | एस
मी स्वतः कॅननच्या कॅमे-यावरच छायाचित्रण शिकलो. जेव्हा एकेकाळी 'खिसा फाटका होता' तेव्हा 'आकाशातल्या चंद्रा'चे जबरदस्त आकर्षण होते. हा चंद्र म्हणजे कॅनन १०००डी. अगदी डीएस्एल्आर् प्रत्यक्षात घ्यायचे जवळजवळ नक्की झाले तरीसुद्धा मी कॅननचाच विचार करत होतो. ऐनवेळी हे निकॉन मध्ये कडमडलं आणि आम्ही निकॉनियन झालो. वरील सर्व मुद्दे मी निकॉन का घेतला म्हणून लिहिले आहेत, पण खरं तर कॅननची एवढी सवय झालेली असतानाही आणि कॅननबद्दल प्रेम असूनही शेवटी निकॉन घ्यायचे कारण म्हणजे ज्यांच्याकडून सर्वात पहिल्यांदा एस्एल्आर फोटोग्राफीची मुळाक्षरे गिरवली त्या अवलिया व्यक्तीचे खालील वाक्य -
'कॅननमध्ये तुला जास्त फीचर्स मिळतील. निकॉनमध्ये तुला त्याच पैशात कमी फीचर्स पण जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल.'
वेल, कॅमे-याची ती पिवळ्या अक्षरात Nikon लिहिलेली काळी स्ट्रॅप गळ्यात अडकवताना मला त्यांचे ते वाक्य अजूनही आठवते आणि मी माझ्या डीएस्एल्आर् ला फिल्म एस्एल्आर् समजूनच फोटो काढायला सुरुवात करतो. :)
24 Mar 2013 - 11:39 pm | मदनबाण
माहिती आवडली.
मी निकॉनचे अत्ता पर्यंत ३ कॅमेरे घेतले. पहिला निकॉन एल-५, दुसरा निकॉन-१०० आणि आत्ता निकॉन ड-५१००
मध्यंतरी इस्पिकचा एक्का यांच्या धाग्यावर डेन्मार्कचा जो फोटो टाकला होता तो एल-५ मधुन काढला. त्यावेळी तिथेच तो विकत घेतला होता. कॅनन वापरला नसल्याने त्या बद्धल मत देउ शकत नाही.
आता बाजारात नविन टेक्नॉलॉजीवाले कॅमेरे आले आहेत आणि काही दिवसात भन्नाट कॅमेरे येतील,ज्यात ३डी कॅमेरे सुद्धा असतील.
काही दिवसांपूर्वीच एक वेगळा कॅमरा मी जालावर पाहिला होता,बहुतेक काही जणांना तो माहित सुद्धा असेल्,तरी पण त्याची इथे थोडी माहिती देतो.
या कॅमॅरेचे नाव आहे Lytro
ही आयता कॄती वस्तु कॅमेरा आहे असे सांगितल्यास कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. लाईट फिल्ड या टेक्नोलॉजीवर काम करणारा हा कॅमेरा आहे.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले,तर जिथे कर्सर ठेवाला किंवा पाँइटर ठेवला तिथला भाग स्पष्ट करता येतो,थोडक्यात या कॅमेर्या ने काढलेल्या फोटोत समोरची{ light field } सगळी माहिती रेकॉर्ड करतो.
हा नक्की कसा काम करतो या बद्धल अधिक माहितीसाठी खालील दुवे उघडावेत.
http://sida.org.sg/wp-content/uploads/2012/03/20120318A1_NewLytroCamera_...
http://sida.org.sg/2012/03/19/the-new-lytro-light-field-camera/
तसेच हे वरती सगळ काही लिहल आहे ते नक्की कसं काम करत ते अनुभवण्यासाठी त्यांच्या लिव्हींग पिक्चरसवर जरा इथे तिथे क्लिक करुन काय गंमत होते ते पहा जरा. (या साईटचे पेज पूर्ण लोड होउ द्या.)
https://www.lytro.com/camera
तसेच नोकिया ने त्यांच्या कॅमेरा फोनसाठी नविन टेकॉलॉजी विकसीत केली आहे,ज्याचे नाव आहे {PureView}
त्यांच्या Nokia 808 PureView ला World Congress 2012 चे "Best New Mobile Handset, Device or Tablet" ऑवॉर्ड मिळाले होते.
या बद्धल अधिक इथे वाचता येईलः---
https://i.nokia.com/blob/view/-/849564/data/2/-/Download1.pdf
10 Jun 2014 - 11:54 am | llपुण्याचे पेशवेll
ही माहीती खरंच नवीन आणि चांगली होती. एक वर्ष याच्यावर कशी नजर पडली नाही याचे आश्चर्य वाटते.
25 Mar 2013 - 11:45 pm | कपिलमुनी
मला कॅनन चे कलर जास्त नैसर्गिक वाटतात
26 Mar 2013 - 11:13 pm | एस
माझा अनुभव थो़डा वेगळा आहे. एक टेस्ट म्हणून निकॉन व कॅनन च्या कॅमे-यांवर एकाच प्रकारची सेटिंग व एकच ग्रे कार्ड वापरून व्हाइट बॅलन्स सेट करून हिरव्या जंगलाचा फोटो घेऊन पहा. नंतर तेच जंगल स्वतःच्या डोळ्यांनी पहा. आता पहा कुठल्या कॅमे-यात जंगलाचा हिरवा रंग व त्याच्या सर्व रंगछटा जशा आहेत तशाच उतरल्या आहेत.
कॅननचा फोटो जास्त आवडण्यासारखा दिसेल. पण त्याचे कारण म्हणजे त्यात सॅचुरेशन हे बाय डिफॉल्ट +1/3 ते +2/3 स्टॉप्स एवढे येते.
बाकी प्रत्येकाची आवड.
27 Mar 2013 - 4:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
निकॉन वापरलेला नाही म्हणून त्याबद्दल अजिबात काहीच बोलू शकत नाही. पण कॅननचे तीन वेगवेगळे कॅमेरे वापरले आहेत, पावरशॉट एस ३, टी ३, आणि एक पॉईंट अँड शूट प्रकारातला, खिशात मावेल असा. मॉडेल क्रमांक माहित नाही, मित्राचा आहे. सगळ्यात रंग कमी सॅच्युरेटेड वाटतात. खालच्या प्रतिसादात खांबाच्या एका फोटोचा उल्लेख आहे, यात कॉण्ट्रास्ट, सॅच्युरेशन बदललेलं नाही. पण ते बदलून उलट मला रंग अधिक आवडले. प्रत्यक्षात कसे दिसत होते, असतात हे एकतर घरी आल्यावर, फोटो प्रोसेस करताना आठवत नाही आणि दुसरं मी ब्राऊन रंगाचा गॉगल वापरते त्यामुळे दिवसा मला सगळेच रंग किंचित उबदार दिसतात. वेगवेगळ्या सेटींग्जनाही फोटोंचे रंग वेगवेगळे दिसतात.
पण या सगळ्या गोष्टी मागाहून निस्तरता येतात. त्यामुळे ते फार लक्ष देण्यालायक वाटत नाही.
आणखी एक, कॅननचे फोटो किंचित अंडरएक्सपोज्ड काढते. बहुतेकदा -२/३ ई.व्ही. वापरते. क्वचित कधी फार उजेड असताना, सावलीतली वस्तू महत्त्वाची वाटली तर शून्य ई.व्ही. किंवा वरचं सेटींग वापरते. उदा हा फोटो काढताना ओव्हरएक्सपोज केलं होतं. फोटो नंतर कातरला आहे.
कॅनन चांगलं का निकॉन या वादात मला फार रस नाही. कोणताही कॅमेरा वापरा, चांगले फोटो दाखवा म्हणजे झालं.
26 Mar 2013 - 3:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख आवडला.
काही ठिकाणी आकृत्या असतील तर अधिक परिपूर्ण होईल. उदाहरणार्थ पहिला 'फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स'चा मुद्दा. ते सगळे शब्द सुटे माहित असले तरी एकत्रित अर्थ नीटसा समजला नाही.
मी अलिकडेच जरा लक्ष देऊन फोटो काढायला सुरूवात केलेली आहे. काही खास कारण नाही, पण कॅननचा टी३ घेतला आहे. मला ज्या प्रकारचे फोटो काढायचे असतात, स्थिर वस्तू, प्रकाश-सावल्या, काचा, त्यातून येणारा प्रकाश, घरं इ. साठी टी३ चा मंद प्रोसेसर आणि किट लेन्स (१८-५५ मिमी) पुरेसं वाटतं. विशेषतः अनोळखी माणसांचं लक्ष नसताना फोटो काढण्यासाठी थोडं झूम लेन्स आवश्यक वाटतंय. पण ते घरी आल्यापासून अशी संधी मिळालेली नाही.
कॅननचे रंग मला थोडे कमी सॅच्युरेटेड वाटतात. अनेक फोटोंमधे कॉण्ट्रास्ट, सॅच्युरेशन आणि फोटोचं तापमान वाढवते. शिवाय भरपूर मेगापिक्सल असल्यामुळे फोटो हवेत तसे कातरताना वाईट वाटत नाही. अनेकदा मोठ्या स्क्रीनवर फोटो पहाता तो थोडा वाकडा आल्याचंही जाणवतं. अशा प्रकारचं बरंच पोस्ट प्रोसेसिंग, मला बर्या वाटणार्या फोटोंवर करते.
शिवाय, कच्चा फोटो साठवून त्यात कॅननच्या सॉफ्टवरमधून एच.डी.आर. प्रतीचे फोटो मिळवता येतात. कच्च्या फोटोंमधे सेन्सर-गेन बदलून वेगवेगळ्या एक्सपोजरचा परिणाम मिळवता येतो. त्यातून मिळालेल्या डायनामिक रेंजवर मी खूष आहे.
आणि एक, तुम्ही स्वतःला वाईट फोटोग्राफर समजत असाल तरीही लोकांनी काढलेले फोटो दाखवा की! फोटोग्राफीसंदर्भात लेख आणि एकही फोटो नाही; यात काय मजा!! लोकं आजकाल पाकृसुद्धा फोटोशिवाय मान्य करत नाहीत! ;-) शिवाय काही कॅननने काढलेले फोटोही बघता येतील.
हा फोटो 'दोन' या विषयासाठी काढला होता. कॉण्ट्रास्ट डोळ्यांना दिसणारे रंग मिळावेत म्हणून वाढवला आहे. तापमान थोडं कमी केलं आहे.
आणखी हा एका जुन्या इमारतीचा मूळ फोटो. कच्च्या फोटोंमधून एच.डी.आर. फोटो बनवला आणि तो वळवून, कातरून हा शेवटचा फोटो बनवला.
लहान मुलाच्या रंगपेटीचा काढलेला हा कृत्रिम प्रकाशात काढलेला फोटो. यात कॉण्ट्रास्ट, सॅच्युरेशनमधे फार फेरफार करावा लागला नाही. मूळ उजेडच व्यवस्थित असल्यामुळे पुढे कष्ट घ्यावे लागले नाहीत. ISO ४०० ला काढलेला आहे, ८" बाय १०" चा प्रिंटही काढला आहे, त्यातही अजिबात नॉईज दिसत नाही. त्यापुढची ISO सेटींग्ज मी वापरत नाही, पण त्यात नक्कीच बराच जास्त नॉईज आहे; विशेषतः १६०० आणि ३२००.
या फोटोत खांब उभा सरळ असता तर आवडला असता. पण नंतर तो फिरवताना बाही, बाहीवर पडलेला उजेड बरचसं जात होतं म्हणून तसाच ठेवला.
यातले बहुतेकसे फोटो साध्या कॅमेर्यानेही आले असते, बहुदा मोबाईलने एवढे क्रिस्पी आले नसते. पण कॅननचं कच्चे फोटो प्रोसेस करण्याचं सॉफ्टवर आणि गिंप किंवा क्वचित कधीतरी पेंट शॉप प्रो हे वापरून मूळ फोटो फारच सुधारतात. त्याबद्दलही तुम्ही किंवा इतर कोणी लिहाच असा आग्रह.
स्त्रिया फोटो काढतात, फोटोग्राफर म्हटल्यावर ती बाईसुद्धा असू शकते असं नेहेमीपेक्षा वेगळं दिसणारं व्याकरण वापरल्याबद्दल खास आभार.
(कोणाचं स्लो कनेक्शन असल्यास मुद्दामच फोटो दाखवलेले नाहीत, फोटो आकाराने अगदीच लहान नाहीत, बरेच आहेत. म्हणून फक्त लिंका टाकल्या आहेत.)
26 Mar 2013 - 3:53 am | श्रीरंग_जोशी
उदाहरणांसकट वर्णन परिणामकारक वाटत आहे. याप्रकारचे अधिक लेखन करावे हि विनंती.
26 Mar 2013 - 11:22 pm | एस
नक्कीच. लेखमालेतील पुढील लेखांमध्ये फोटो व आकृत्यांचा भाग शब्दांपेक्षा जास्त असेल.
खालील विषयांवर लिहिण्याचा मनोदय आहे.
छायाचित्रण
प्रकाश
कॅमे-यांचे प्रकार
फिल्म व सेन्सर्स
लेन्सेस
लाइटिंग - कृत्रिम आणि नैसर्गिक
रंग - कॅमे-यातून
पोस्ट-प्रोसेसिंग
चांगले फोटो काढण्यासाठी बेसिक टिप्स
छायाचित्रणाचे विविध प्रकार
मला भावलेले काही छायाचित्रकार व त्यांचे कार्य
सरतेशेवटी काही भारतीय छायाचित्रकारांच्या मुलाखती (मिळाल्या तर)
:)
27 Mar 2013 - 12:10 am | चिगो
दोस्ता, तू अगदी माझ्यासाठी 'मेड टू ऒर्डर' असल्यासारखी लेखमाला लिहीण्याच्या विचारात दिसतोस..;-) धन्यवाद.. वाट बघतोय..
27 Mar 2013 - 4:10 pm | चौकटराजा
या अशा धाग्याची वाट पहात आहे.बाकी ही साईट फोटोग्राफीतील संकल्पना समजण्यासाठी
भन्नाट आहे.पण आयेच्या भाषेत शिकणे याचा आनंद वेगळाच !
27 Mar 2013 - 4:14 pm | चौकटराजा
ही लिंक अशी आहे
www.cambridgeincolour.com
27 Mar 2013 - 7:30 am | चौकटराजा
आप्ल्या दिलेल्या लिंक वर जाउन पाहिले सर्व फोटो सुरेख आहेत.ते सुर्यास्ताचे, शिल्होटीचे , धुक्याचे फोटो म्हणजे कलात्मक फोटो अशी एकेकाळी -आमच्या लहानपणी व्याख्या होती. आता पाच हजाराच्या कॅमेर्याने देखील तसे फोटो येतात.काहीतरी प्रत्ययकारी विषय घेऊन तरीदेखील तांत्रिक बाबीवर सरस अशी फोटोग्राफी या पुढे सरस ठरणार आहे !
27 Mar 2013 - 9:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचा काळ म्हणजे नक्की कोणता ते माहित नाही. पण अफगाणिस्तानी मुलगी, नापाम बाँबपासून पळणारी नग्न मुलं असे फोटो त्या-त्या काळात एवढे प्रसिद्ध आणि महत्त्वाचे होते की ते आजही फेसबुकावर दिसतात. फोटोग्राफी आयुष्य बदलणारी कला असू शकते हे असे फोटो पाहिले की वेगळं सांगावं लागत नाही.
माझं आडनाव जोशी असलं तरी भविष्य वर्तवण्यात माझं शिक्षण नाही. तरीही, सध्या जसे कॅमेरे येतात, ज्या प्रकारचे फोटो प्रस्थापित, आदरप्राप्त वृत्तपत्रांच्या संस्थळांवर दिसतात आणि ज्या प्रकारची गॅजेट्स वापरून लोकं फोटो पहातात ते पहाता तंत्र, स्किल वापरणार्यांच्या पातळीवर फार महत्त्वाचं ठरणार नाही असं वाटतं.
अलिकडच्या काळात कॅमेर्यातच एच.डी.आर. प्रोसेसिंग करता येतं असे कॅमेरे आलेले आहेत. कॅननचा, साधा, खिशात घालता येईल असा पॉईंट अँड शूट कॅमेरा हे करतो. आयफोनमधला प्रोसेसर पॅनोरमा बनवतो. कॅमेर्यांच्या कंपन्यांच्या नोकरीच्या जाहिराती पाहिल्या तर त्यांच्याकडे इमेज प्रोसेसिंगचे अल्गोरिदम समणार्या माणसांना मागणी आहे. थोडक्यात, कॅमेरा वापरणार्याला आपण तो कशासाठी वापरतो हे समजलं पाहिजे.
एकंदरच जास्तीतजास्त बिनडोक काम यंत्रांकडून करवून घ्यायचं आणि फक्त विचार करण्याचं काम माणसाने करायचं अशा प्रकारचा प्रवाह भूतकाळातून पुढे जाताना दिसतो. एकेकाळी सुंदर हस्ताक्षर फार चलतीत होतं. आज तुमचं आणि माझं हस्ताक्षर सारखंच दिसतं. कोण काय विचार करतं, ते कसं मांडतं, याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कॅमेरे आले तेव्हापासून हुबेहूब चित्र हाताने काढण्याचं महत्त्व संपलं. जी गोष्ट यंत्र करतं, ती गोष्ट हाताने तश्शीच केली तर त्यात काय वेगळी गंमत? त्यापेक्षा तसं यंत्र बनवणं ही मोठी 'कला'. वरचा लेख त्या 'कले'ची समीक्षा करणारा आहे.
पण स्वॅप्स याबद्दल पुढच्या भागात लिहीणार आहे तोपर्यंत हात आवरते.
27 Mar 2013 - 1:55 pm | ऋषिकेश
छानच!
सवडीने तपशीलवार लिहितो.. तुर्तास फक्त वाचनखूण साठवत आहे
27 Mar 2013 - 7:36 pm | पैसा
तपशीलवार लिहिल्याबद्दल धन्यवाद! दोन कॅमेर्यात (कॅनन्/निकॉन) नेमका कसा फरक येतो हे फारच छान लिहिलं आहेत. लेख मुद्दाम सावकाशीने वाचूया म्हणून बाजूला ठेवला होता. अनेक प्रतिसाद वाचून ते बरेच केले असे वाटत आहे! खूपच छान. या मालिकेत असेच तपशीलवार लेख अजून येऊ द्यात! लोकांनी म्हटल्याप्रमाणे उदाहरण म्हणून अधून मधून फोटो टाकलेत तर अजून छान होईल.
28 Feb 2014 - 4:18 pm | काव्यान्जलि
या दोन्हि मधला कोनता घेऊ camra??? खुपच confusion आहे.... :(
2 Mar 2014 - 6:38 pm | एस
दोन्ही कॅमेर्यांची तुलना करून बघा. त्यासाठी गुगलवर भरपूर पर्याय दिसतील. www.dpreview.com ही साइट त्यासाठी चांगली आहे. आणि कॅमेरा त्या ब्रॅण्डचा घ्या ज्या ब्रॅण्डचे कॅमेरे तुमच्या मित्रमंडळींकडेही असतील. त्यामुळे लेन्सेस शेअर करणे सोपे जाते. अजून काही माहिती हवी असल्यास जरूर विचारा.
2 Mar 2014 - 6:50 pm | शैलेन्द्र
५२०० घ्या ना..
28 Feb 2014 - 6:21 pm | संपत
विनंतीला मान दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
4 Mar 2014 - 2:46 pm | कोकणी पुणेकर
The camera's only job is to get out of the way of making photographs.
5 Mar 2014 - 2:19 pm | एस
अॅग्रीड. अ कॅमेराज ओन्ली जॉब इज टू गेट आउट ऑफ द वे ऑफ मेकिंग फोटोग्राफ्स अॅट द राइट टाइम अॅण्ड फॉर द राइट टाइम.
5 Mar 2014 - 4:56 pm | कोकणी पुणेकर
राईट टाईम ला क्लिक करण जमल की उरलेल काम सध्याचे ऑटो मोड वाले कॅमेरे बहुतेकवेळा करतात.
5 Mar 2014 - 7:13 pm | एस
जगातला कुठलाच कॅमेरा स्वत:च रचनाविचार ठरवू शकत नाही. अजूनही खूप गोष्टी असतात प्रतिमा घेण्यापूर्वी आणि प्रतिमा घेतल्यानंतही. त्याबद्दल नंतर केव्हातरी.
छायाचित्रणातील तांत्रिकता साधनांवर सोडावी आणि कलात्मकता छायाचित्रकारावर. :-)
6 Mar 2014 - 12:10 pm | कोकणी पुणेकर
मान्य.
राईट टाईम ला क्लिक म्हणजे रचना (object / composition)वैगरे ठरवून क्लिक.
बाकी मी छायाचित्रणातील अडाणी माणूस.
"छायाचित्रणातील तांत्रिकता साधनांवर सोडावी आणि कलात्मकता छायाचित्रकारावर."
एकदम सहमत. Photography is the power of observation, not the application of technology. अर्थात हे वाक्य माझे नाही,(http://www.kenrockwell.com ) वर वाचले आहे.
28 Apr 2014 - 12:04 pm | काव्यान्जलि
मी canon 600D घेतला finally.... धन्यवाद... :)
28 Apr 2014 - 6:21 pm | एस
आता लवकर तुम्ही घेतलेल्या प्रतिमा टाका मिपावर.
28 Apr 2014 - 6:38 pm | काव्यान्जलि
तुमच्या लेखाचा खुप फायदा होतो आहे.... photography शिकताना....
29 Apr 2014 - 1:26 pm | एस
:)
3 Jun 2014 - 3:03 pm | मराठी कथालेखक
डिजीटल च्या युगात सेन्सर आणि प्रोसेसर मुळे कॅमेरा बॉडीचे महत्व वाढले असावे काय ? मला फोटोग्राफी चि आवड आहे पण खोलवर ज्ञान नाही. काही अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात.
मी Vivitar (हे स्वस्तातले कॅमेरे म्हणूनच प्रसिध्द होते) चा फिल्म रोल वाला SLR घेतला. तो जूना म्हणजे सेकंड हँड तेही एका लोखंडाच्या व्यापा-याकडून !! या कॅमे-याला ५० mm ची फिक्स्ड लेन्स (झूम नसलेली) होती. त्याला ऑटोफोकस ही नव्हते. त्या व्यापा-याने कॅमेरा विकण्यापुर्वि माझ्यासमोर एक फोटो काढून नंतर धूवून आणून मला दाखवला (माझी खात्री पटावी म्हणून). जमिनीवर पडलेल्या लोखंडी सळ्या, बाजूला बसलेली एक बकरी यांचा तो फोटो. पण त्यातले रंग खूप सुंदर भासले. (पूढे तो फोटो त्याने मलाच दिला सापडला कधी तर स्कॅन करुन ठेवेन).
पण मला मात्र नंतर फिक्स्ड लेन्स चा कंटाळा आला मग मी सिग्मा ची 70-210 अशी सेकंड हँड लेन्स पुण्यातील पूना फिल्म्स सेंटर मधून घेतली. ही माझी लाडकी लेन्स , अगदी घाईने जरी फोकस केले आणि फोटो काढला तरी तो छान स्पष्ट असायचा. पण 70 mm ने घरगुती फोटो काढता येईना. मग पुन्हा पूना फिल्म्स सेंटर मधून पेंटॅक्स ची 28-80 अशी लेन्स घेतली (अर्थात सेकंड हँड ). हीचे पण फोटो चांगले यायचे मात्र सिग्मा ची मजा अनोखीच.
पुढे सिग्मा खाली पडून खराव झाली मग टॅमरॉन ची 70-300 (की 80-300) नवी लेन्स घेतली. पण ह्या लेन्स ने मात्र निराशा केली. फोटो म्हणावे असे चांगले येईना. ऑटोफोकस प्रकारची लेन्स मी म्युन्युअली फोकस करुन वापरत असल्याने असेल कदाचित.
पुढे डिजिटल च्या युगात मी फिल्म रोलच्या त्या कॅमे-याला राम-राम केला.
डिजीटल मध्ये मी अजून तरी point & shoot वापरत आहे. आणि एक-दोन वर्ष थांबून DSLR पेक्षा Mirrorless घेईन असा विचार करतोय.
10 Jun 2014 - 8:52 pm | एस
पूना फिल्म सेंटर चा बग्गा (की बागा?) ही एक वल्ली आहे. त्याच्याकडे गेलं की तास-दीड तास फक्त ऐकत रहायचं. :-) अर्थात 'उत्खनन' करायची हौस असेल आणि वेळ असेल तर त्या जुन्यापुराण्या अडगळीतल्या दुकानात बराच भारीभारी माल सापडतो. ;-)
13 Jun 2014 - 3:47 pm | मराठी कथालेखक
विजय बागा. त्यांच्याकडे बहुतेक सगळ्या वस्तू स्वस्त मिळतात शिवाय खात्रीशीरपण. माझ्या जुन्या लेन्सेस देखील चांगल्या होत्या.
बाकी त्यांचे प्रवचन ही एक मजेची बाब आहेच !!
10 Jun 2014 - 11:11 pm | हुकुमीएक्का
काही म्हणा. कॅनन बेस्ट आहे. बाकीचे कॅमेरे चांगले नाहीत असे मी म्हणत नाही. परंतू ज्याने एकदा कॅनन वापरला त्याला बाकीचे कॅमेरे वापरताना 'फरक' लगेच जाणवून येतो. माझा पहिला कॅमेरा कॅनन आहे परंतू त्यापुर्वी मी Panasonic, Nikon, Fujifilm या सारखे डिजिटल कॅमेरे हाताळले आहेत. कॅमेरा घेताना त्याची features जरूर पहावीत.