शनिवारवाडा: अवशेष वर्णन
सध्या दिसणाऱ्या अवशेषांमध्ये पुढील ३ गोष्टींचा समावेश होतो.
१. तटबंदी आणि बुरुज
२. दरवाजे
३. नगारखाना
आता या तिन्ही गोष्टींची थोडक्यात माहिती घेऊयात.
१. तटबंदी आणि बुरुज
शनिवारवाडा हा पुण्याच्या साधारणपणे मध्यावर वसला आहे. वाड्याची तटासह दक्षिणोत्तर लांबी १८४.२५ यार्ड आहे तर पूर्वपश्चिम लांबी १६४.२५ यार्ड आहे. या वाड्याने जवळपास ६.२५ एकर जमीन व्यापली आहे.
वाड्याच्या तटबंदीची उंची ३३ फुट असून खालील १० ते १८ फूट उंचीचा तट हा चिरेबंदी आहे तर वरचे बांधकाम पक्क्या विटांचे आहे. तटाचा माथा ११ फूट रुंद आहे. माथ्याच्या दर्शनी बाजूस बंदुकीतून गोळ्या झाडण्यासाठी जंग्या (भोके) ठेवण्यात आल्या आहेत. तटास एकूण ९ बुरुज आहेत. या सर्वांवर तोफा बसवण्याची व्यवस्था आहे. उत्तर पेशवाई मध्ये वायव्य बुरुजास "तोफेचा बुरुज" तर पश्चिम बुरुजास "पागेचा बुरुज" म्हणत असत. इतर बुरुजना अशी नावे सापडत नाहीत. या बुरुजांपैकी पागेचा बुरुज आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी एक खड्डा आहे. त्याचा तोफगोळे ठेवण्यासाठी वापर होत असावा.
दिल्ली दरवाज्याच्या दोन्ही बाजूचे बुरुज हे बहुकोनी, चिरेबंदी व लंबरूप आहेत. इंत सर्व बुरुज हे पक्क्या विटांचे असून ते Cylindrical आकाराचे आहेत.
तटबंदीमध्ये असणाऱ्या जंग्या
पागेचा बुरुज( हा बुरुज पोकळ असल्याने सध्या दरवाजा लावून बंद करण्यात आला आहे)
दिल्ली दरवाज्याचा अष्टकोनी बुरुज
तट रुंद असल्याकारणाने आत पहारेकऱ्यांच्या खोल्या होत्या. तटावर जाण्यासाठी एकूण नऊ जिने ( १ दिल्ली दरवाज्याजवळ, १ मस्तानी दरवाज्याजवळ, २ खिडकी दरवाज्याजवळ, १ नारायण दरवाज्याजवळ, २ पागेच्या बुरुजाजवळ आणि २ तोफेच्या बुरुजाजवळ) आहेत तर खिडकी दरवाज्याजवळ पाच ओवऱ्या आहेत. तटाच्या पूर्व अंगास अजूनही आठखणी सोपा असल्याची चिन्हे दिसतात.
पहारेकऱ्याची खोली
मस्तानी दरवाज्याजवळील जिना
खिडकी दरवाज्यापाशी असलेल्या ओवऱ्या
आठखणी दुमजली सोपा असल्याचे चिन्ह
२. दरवाजे
तटास एकूण ५ दरवाजे आहेत.
१. दिल्ली दरवाजा : या दरवाज्याची रुंदी १४ फूट तर उंची २१ फूट आहे. हत्तींच्या धड्केपासून दरवाजा सुरक्षित ठेवण्यासाठी अणकुचीदार खिळे आणि जाडजूड पट्ट्या मारल्या आहेत. दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी, दिल्ली ही उत्तरेला असल्याकारणाने, उत्तर दरवाज्याला दिल्ली दरवाजा असेही म्हणत. तोच प्रकार इथेही दिसतो आहे. हा दरवाजा सर्वात मोठा आहे.
दिल्ली दरवाजा
२. अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा : मस्तानी, समशेरबहादूर व मस्तानीचा नातू ( आणि बांदा संस्थानाचा मूळपुरुष) अलीबहादूर हे वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात राहत असत. त्यांचा वावर हा वाड्याच्या ईशान्य बाजूच्या पण उत्तराभिमुख दरवाज्यातून होत असे. म्हणून त्या दरवाज्यास "अलीबहादूर / मस्तानी दरवाजा असे नाव दिले गेले. हा दरवाजा सर्वात लहान आहे.
अलीबहादूर दरवाजा / मस्तानी दरवाजा
३. खिडकी दरवाजा : पूर्व बाजूस असणाऱ्या या दरवाज्याच्या जागी पूर्वी एक लहानसा दरवाजा होता. त्यास खिडकी किंवा दिंडी असे म्हणत असत. पुढे नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या वेळी हा दरवाजा काढून दुसरा दरवाजा बसवला पण ते नाव मात्र तसेच चालू राहिले.
खिडकी दरवाजा
४.गणेश दरवाजा : हा दरवाजा आग्नेय बाजूस असून पूर्वाभिमुख आहे. या दरवाज्याच्या बाहेर गणेश मंदिर असल्याकारणाने यास गणेश दरवाजा असे नाव पडले. मजबुतीच्या बाबतीत हा दरवाजा दिल्ली दरवाज्याच्या खालोखाल आहे.
गणेश दरवाजा
५. दक्षिण / नारायण / जांभळीचा / नाटकाशाळांचा दरवाजा : हा दरवाजा दक्षिण दिशेला आहे म्हणून यास "दक्षिण दरवाजा" असे म्हणत. पुढे नारायणरावांच्या खुनानंतर त्यांचे प्रेत याच दरवाज्याने वाड्याबाहेर नेले म्हणून त्यास "नारायण दरवाजा" हे नाव पडले. या दरवाज्याने नाटकशाळांचा येत-जात असत म्हणून त्यास नाटकशाळांचा दरवाजा असेही म्हणत. या दरवाज्याच्या बाहेर एक जांभळीचे झाड होते म्हणून त्यास "जांभळीचा दरवाजा" असेही म्हणत. अर्थात ही सर्व नावे एका एकाच वेळी अस्तित्वात नसणार!
नारायण दरवाजा
३. नगारखाना
दिल्ली दरवाज्यातून आत गेले कि नगारखान्याची दुमजली इमारत लागते. याचा तळमजला हा पूर्णपणे चिरेबंदी असून तो २७ फूट उंच आहे. तळमजल्यामध्ये दिल्ली दरवाज्याच्या दुमजली देवड्या, पहारेकऱ्यांच्या कोठड्या, व पूर्वेस वरच्या मजल्यावर जाण्याचा जिना आहे. देवडीच्या चौकात आल्यावर छताकडे पहिले असता एक साधी लाकडी इमारत दिसते जिचा मूळ इमारतीच्या लाकडी बांधणीशी काहीही संबंध नाही. असे सांगितले जाते कि जर शत्रू येनकेनप्रकारेण दरवाजा तोडून आत आलाच तर ही लाकडी इमारत जाळायची आणि त्याच्या अंगावर पाडायची. तशी वेळ कधी आलीच नाही म्हणून आजही ती लाकडी इमारत आपण पाहू शकतो.
नगारखाना : तळमजल्याचे सामान्य बांधकाम असलेले छत
मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे देवडीच्या भिंतीवर शेषशायी, गणेश इ.ची पुसट चित्रे दिसतात.
भित्तीचित्र : गणेश
नगारखाना : दुसरा मजला
वाड्यात काय चालले आहे हे बाहेरच्या माणसाला कळू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडीचा चौक आणि आतले सर्व चौक हे एका रेषेत न करता नागमोडी केले आहेत.
क्रमशः
******************************************************************************
छायाचित्र सौजन्य : श्री. ओंकार यारगुद्दी
प्रतिक्रिया
4 Mar 2013 - 8:08 pm | पैसा
मस्त! आधी लेखाच्या शेवट क्रमशः आहे हे बघून घेतले.
4 Mar 2013 - 8:10 pm | सव्यसाची
धन्यवाद पैसाताई..!
अजून कमीत कमी २ भाग तरी होतीलच :)
4 Mar 2013 - 8:58 pm | आदूबाळ
छान!
कोणत्यातरी एका बुरुजाला "फुटका बुरूज" म्हणतात ना? जवळपास कुठेतरी बसथांबा असावा, कारण "फुटक्या बुरुजाचं" तिकीट काढून आजोबा मला त्यांच्या एका मित्राकडे नेत असत.
4 Mar 2013 - 10:18 pm | मैत्र
महानगरपालिकेचा एक दवाखाना आहे / नंदादीप कार्ड्स वगैरे दुकाने आहेत तिथून रस्ता जिथे शनिवारवाड्यापाशी चढावर वळतो तो कोपरा. उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य कोपरा जिथे आहे पूर्ण तटबंदीचा तो बुरुज म्हणजे फुटका बुरूज.
दवाखान्याजवळ तो बस थांबा आहे. पुर्वी दुहेरी वाहतूक होती तेव्हा विरुद्ध बाजूला एक थांबा होता.
त्याला 'फुटका' का म्हणतात ते सव्यसाचीच सांगू शकतील.
15 Mar 2013 - 7:53 pm | सव्यसाची
खरेतर एखाद्या बुरुजाला असे काही नाव आहे हे मला आजच कळते आहे कारण ग.ह.खरे आणि रमेश नेवसे यांची पुस्तके मी वाचली आहेत आणि त्यात हे नाव मला आढळले नाही.
मी पुण्यात काही वर्षांपूर्वी आल्याकारणाने मला बाजीराव रस्ता हा अनादी काळापासून एकेरीच आहे असे वाटत ;).
माझ्या अंदाजाप्रमाणे, पश्चिम बुरुजाला "फुटका बुरुज" म्हणत असावेत कारण तो आतून पोकळ आहे.(हा फक्त अंदाजच!)
मी अधिक माहिती मिळवून पुढच्या लेखामध्ये सांगण्याचा जरूर प्रयत्न करेन.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)
4 Mar 2013 - 9:32 pm | शशिकांत ओक
इथे नगारखान्याचे फोटो पाहून एक विचारावेसे वाटते -
नगारखान्याचे प्रयोजन काय असावे?. तो धड ना गाण्या-बजावण्याचा, संगीताचा भाग ना युरोपियन सैनिकांचे मनोबल वाढवणारा बँड पथकाचा भाग? जर काही महत्वाच्या घोषणा करायच्या असतील तर त्या राजालाच ढोल बडवून सांगायची गरज का? मात्र सर्व महत्वाच्या किल्यात नगार खाना हटकून दिसतो! तेंव्हा त्याचे काही महत्व नक्कीच असले पाहिजे. यावर माहितगारांनी प्रकाश पाडावा. ही विनंती.
5 Mar 2013 - 12:03 am | सूड
पुभाप्र !!
5 Mar 2013 - 12:28 am | आशु जोग
सव्यसाची,
फार छान आहे हे वर्णन. फोटोही सुरेख आलेत त्यासाठी तुमचे आणि श्री. ओंकार यारगुद्दी
यांचे अभिनंदन.
६ आणि ७ वा फोटो आवडला.
संध्याकाळच्या सूर्यप्रकाशामुळे एक वेगळीच छटा आली आहे या फोटोंना.
शनिवारवाडा आज पाहताना जाणवत नसेल तरी एकेकाळी काय दबदबा असेल या वास्तुचा हिंदूस्थानात.
तंजावर ते पेशावर राज्य चाले इथून.
असो
एक शंका आहे
मस्तानी दरवाजाबाहेर कोणते देवस्थान आहे. त्याचा उल्लेख नाही आला.
काही भक्त इथे आठवड्यातून किमान एकदातरी येतातच. यापुढे या देवस्थानाचा महीमा वाढत जाइल आणि गर्दीही वाढेल.
अशी चिन्हे आहेत.
इतक्या श्रद्धाळू, ईश्वरभक्तीत तल्लीन झालेल्या लोकांची संख्या वाढल्याने पुण्यातली शांतता वाढीस लागेल नि पोलिस खात्यावरचा ताणही कमी होइल असा अंदाज आहे.
5 Mar 2013 - 1:51 am | आदूबाळ
"पेशवे गणपती" बहुतेक.
पण हा गणपती नव्याने उगवला असावा. फर्लांगभर अंतरावर ग्रामदैवत कसबा गणपतीचं देऊळ असताना पेशल गणपती बसवण्याचं पेशव्यांना काही प्रयोजन असेल असं वाटत नाही.
6 Mar 2013 - 9:57 pm | आशु जोग
अहो हिरवे हिरवे झेन्डे लावले आहेत तिथे.
गणपती नाही.
12 Mar 2013 - 9:10 pm | काळीमाती
याच्यापुढे तर कोणतेच मंदिर नाही .
5 Mar 2013 - 2:03 am | बॅटमॅन
मस्त रे सव्यसाची! ते नाना भानूंचं पत्र कधी येतंय त्याची वाट पाहतोय ;)
5 Mar 2013 - 9:02 am | अमोल केळकर
चित्रांसहीत दिलेली माहिती आवडली
अमोल केळकर
6 Mar 2013 - 10:36 am | ऋषिकेश
आवडेश!
6 Mar 2013 - 10:45 am | हासिनी
वाचते आहे, पुढचा भाग येऊ दे लवकर!!
6 Mar 2013 - 10:22 pm | मदनबाण
मागचा भाग वाचला आहे,हाही भाग मस्त झाला आहे.
भित्तीचित्र : गणेश
हे कुठे दिसत नाही ते ? सिद्धी विनायकाच्या धाग्यामुळे बाप्पा रुसुन अतंर्धान पावले की काय ? ;)
15 Mar 2013 - 7:58 pm | सव्यसाची
मदनबाण, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..!
जिथे ते लेबल आहे त्याच्या वरच्या बाजूला जो फोटो आहे त्यात पुसटसा गणपती दिसतो आहे.
आपल्याला तो फोटोच दिसत नाहीये का?
10 Mar 2013 - 2:08 pm | आतिवास
एरवी शनिवारवाडा पाहताना काय पाहायचे ते कळत नसे आणि पाहिले त्याबद्दलही फारसे काही कळत नसे. ही माहिती वाचून झाल्यावर संधी मिळताच पुन्हा एकदा शनिवारवाडयाला भेट देण्याचा विचार आता मनात आला आहे.
श्री. खरे यांचे पुस्तक बाजारात मिळते का?
माहितीपूर्ण लेख. आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
10 Mar 2013 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीपूर्ण लेख... आवडला.
पुभाप्र.
10 Mar 2013 - 6:52 pm | सानिकास्वप्निल
पुभाप्र :)
12 Mar 2013 - 9:16 pm | लॉरी टांगटूंगकर
झकास चाललंय
शनिवारवाड्यातल्या कारंज्याचे उल्लेख कुठे तरी वाचले होते (बहुदा ना सं इनामदारांच्या कोणत्यातरी पुस्तकात असावे), त्या बद्दल पण थोडे लिहावे ही विनंती..
त्या काळात कारंजे कसे जमवले असावे या बद्दल बरेच कुतूहल आहे..
13 Mar 2013 - 2:00 am | बाळकराम
गणेश दरवाज्यासंबंधी नंदा खरेंच्या "बखर अंतकाळाची" मध्ये एक वेगळी व्युत्पत्ती सांगितली आहे.
15 Mar 2013 - 8:16 pm | सव्यसाची
पैसा,आदूबाळ,मैत्र,शशिकांत ओक,सूड,आशु जोग,काळीमाती, बॅटमॅन, अमोल केळकर, ऋषिकेश, हासिनी, मदनबाण, आतिवास, इस्पिकाचा एक्का, सानिकास्वप्नील, मन्द्या, बाळकराम : सर्वाना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
@आशु जोग: मस्तानी दरवाज्याबाहेर जी कबर आहे ती सातशे वर्ष इतकी जुनी असून हजरत मकबूल हुसेनशा बुखारी यांची आहे. असे सांगतात कि मस्तानी दररोज या बखरीची पूजा करत असे. ( संदर्भ: पुण्याचा शनिवारवाडा, लेखक: रमेश जि. नेवसे)
@ आतिवास : आपल्या शनिवारवाड्याच्या ट्रीप ला शुभेच्छा..! :) ग.ह.खरे यांचे पुस्तक बाजारात मिळणे अशक्य आहे. भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये एकाच कॉपी होती बहुधा. ती त्यांनी झेरोक्स करून ठेवली आहे.
@ मन्द्या: कारंज्याबद्दल पुढील लेखांमध्ये माहिती येईलच. ना.सं.इनामदार यांनी पेशवाई वरती खूप कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मी फक्त राऊ वाचली आहे.
@बाळकराम:तुम्ही सांगू शकाल का या नावामागची वेगळी व्युत्पत्ती? धन्यवाद.!
15 Mar 2013 - 9:13 pm | Mrunalini
मस्त... पु.भा.प्र. :)