सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली
---------------------------------------------------
काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१
पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी.
तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी. -२
शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती.
गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३
रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती.
मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती. -४
सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी.
म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी. -५
पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल.
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६
अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण.
छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७
सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले.
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८
बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात.
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात. -९
.
- सौरभ वैशंपायन(मुंबई).
प्रतिक्रिया
30 Aug 2008 - 8:22 pm | प्रमोद देव
काव्यरचना!
30 Aug 2008 - 8:26 pm | सौरभ वैशंपायन
धन्यवाद!
31 Aug 2008 - 4:26 am | मदनबाण
व्वा फारच सुंदर..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
31 Aug 2008 - 4:33 am | रेवती
जो संताप आला होता व लढाईच्यावेळी जश्या भावना असतील त्या सर्व वरील रचनेतून व्यक्त होत आहेत.
कविता आवडली.
रेवती
31 Aug 2008 - 8:15 am | शितल
कविता आवडली.
:)
31 Aug 2008 - 12:54 pm | पंचम
उत्तम
31 Aug 2008 - 5:21 pm | नीलकांत
कविता आवडली...
सरनौबत प्रतापराव गुजरांबद्दल मी या आधी येथे लिहीलंय.
सौरभराव लिहीत रहा ही विनंती.
धन्यवाद.
नीलकांत
1 Sep 2008 - 12:43 am | ऋषिकेश
कविता, भाव दोन्ही आवडले
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
1 Sep 2008 - 2:58 pm | सुमीत भातखंडे
कविता.
आवडली
1 Sep 2008 - 3:10 pm | स्वाती दिनेश
कविता आवडली.. वेडात मराठी वीर दौडले सात.. ची आठवण झाली.
स्वाती