रामोशाची पोरं मशाली आणणार होती , आमच्याकडे दोन कुर्हाडी होत्या, गुरव देवीचा अंगारा आणणार होता, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही तयारी केलेली होती . त्या दिवशी पोर्णिमा होती . लक्ख चांदणे पडलेले होते . आणि आम्ही निघालो , अंगावर शहारा येत होता , भयंकर धाडस करत होतो , सगळे गुपचूप सड्यावर आलो .. समोर अंधारात ती गढी दिसत होती , आम्ही एकमेकांचे हात पकडलेले होते , गावच्या लोकांनी रस्त्याला लागून गुर त्या भागात जाऊ नयेत म्हणून कुंपण लावलेले होते ... ते आम्ही उचकटले.. भर थंडीत देखील घाम फुटलेला होता .. अक्ख्या उतारावर विचित्रच झाडं वाढलेली होती खुरटी.. सगळे तसेच स्तब्ध होते , शेवटी मनाचा हिय्या केला
आणि पहिले पाउल मीच 'त्यांच्या' हद्दीत टाकले.
****************
उतारावरून मी खाली उतरायला सुरुवात केली, आणि अचानक वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटायला लागलं, श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, वातावरणात एखाद्या गंधकासारखा वास येत होता , तिखटसर. डोळ्यातून पाणी वाहायला लागलं, रामोशांची पोर माझ्या पाठोपाठ उतरली, पण एक विचित्र घटना घडली , सोबत आणलेल्या मशाली विझल्या.. त्यांनी बराच प्रयत्न केला परत त्या पेटवायचा ,पण काही केल्या मशाली काही पेटत नव्हत्या , तो विचित्र वास अजूनच तीव्र झाला, आता काय ? आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. शेवटी तो उद्योग तसाच बाजूला ठेवला, कारण चांदणं एवढं टिपूर पडलेलं कि उजेडाची गरजच नव्हती, आम्ही एकत्रच उतरायला लागलो, अजून पर्यंत तरी काही वेगळं घडलेलं नव्हतं. आजूबाजूची झाडं कुठली काही अंदाज येत नव्हता , पूर्वी कधी पाहिलेली नव्हती, वारा अजिबात नव्हता. मी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होतो, समुद्र एवढ्या जवळ असूनही लाटांचा अजिबात आवाज येत नव्हता. एवढं सगळं कसं शांत असू शकत? आत्ता सड्यावर कुठेतरी चालेल्या कीर्तनाचा चांगला आवाज येत होता , अचानक इथे हि शांतता . त्या शांततेचीच भीती वाटायला लागली, काहीतरी घडण्याच्या अपेक्षेत आम्ही आलेलो होतो, पण अजूनतरी काहीच घडत नव्हत. एखाद्या मोठ्या काचेच्या गोळ्यात ठेवलेल्या चित्रासारखे समोरचे दृश्य होते, स्तब्ध .. शांत तेवढ्यात गुरवाने शांतता तोडली , 'वो भाव , माका काय या लक्षान नीट दिसत नाय हा , माघारी निघालेला बरा' त्याला नजरेने तसाच दाबत मी पुढे निघालो , कारण ऐनवेळी सर्वांनी माघार घेतली असती तर येण्याचा उद्देश काही सफल झाला नसता , आता एवढे आलो आहोत तर गढी पर्यंत जाउन येउयाच असे सांगत कसेबसे त्यांना मी पुढे रेटले .
केशव माझा भाऊ ,बेडर होता , हातात कुऱ्हाड होतीच , रामोशी पण तसे निगरगट्टच होते , गुरव उगाच इकडे तिकडे बिचकत येत होता . आता आम्ही पूर्ण खाली उतरलो.
चांदण्याचा निळसर प्रकाश झिरपत होता , समोर अंधारात बुडालेली गढी दिसत होती , आता पायाखाली फरशी लागली , आजूबाजूला सर्व जमीन फरसबंद केलेली होती , त्यावर सुद्धा वेगळ्याच वेली पसरलेल्या होत्या, मलाही आता थोड वेगळंच वाटायला लागलं , आजूबाजूला बर्याच नजरा आपल्यावर रोखून बघत आहेत असं सारखं वाटू लागलं. हि जाणीव कधी जत्रेतल्या गर्दीतही झालेली नव्हती , आजूबाजूला नजर वळवायला देखील मन कचरत होतं , न जाणो कुठला आकार , कुठली छाया डोळ्यांसमोर येईल . मनात नाही नाही ते आकार जन्म घेत होते , लहानपणी ऐकेलेल्या भुतांच्या गोष्टी आठवत होत्या . एक एक पाउल जपून टाकत मी पुढे जात होतो , आता ती गढी चांगलीच समोर आली , मोठा राजवाडाच होता तो , प्रचंड इमारत , सड्यावरून तिची फक्त एकच बाजू दिसायची आत इतका मोठा आवार असेल वाटलं नव्हत , चांदण्यात ती इमारत भेसूर वाटत होती , इमारतीला चार ते पाच मजले होते , प्रचंड आकाराच्या खिडक्या होत्या , आत अंधारच होता . गुरव मागून चला चला म्हणत होता.. पण आता अजून पुढे काय याची उत्सुकता होतीच , आम्ही सगळे आता एकमेकांना खेटून उभे होतो , समोर एक दगडी कारंज होतं , त्यातून भयानक मुळ्या वर आलेलं एक झाड होतं, त्याचा आकार काहीतरी विचित्रच होता ,
त्याला ओलांडून आम्ही आता अगदी जवळ आलो , एक जुनाट भव्य दरवाजा होता , दोन्ही बाजूने अनेक खिडक्या होत्या, सर्व बंद होत्या , वरती सुद्धा अनेक खोल्या असाव्यात, गढीच्या दगडांचा मुळचा पांढरा रंग आता विरून गेलेला होता , काळपट शेवाळ माजलेल होतं .तेवढ्यात माझी नजर सर्वात वरच्या मजल्यावरच्या एका खिडकीकडे गेली , आणि मी दचकलो, तिथे नक्की काहीतरी होतं, साकळलेल्या अंधारात काहीतरी भयंकर जन्म घेत होतं , कसलातरी गुलाबीसर प्रकाश बाहेर झिरपत होता, आता सर्वांचंच लक्ष वर गेलं.. गुलाबी धुकं आता बाहेर पडायला लागलं होतं , आसपासच वातावरण
अचानक गार पडलं, आम्ही अक्षरशः काकडायला लागलो , खालील मजल्यांवर पण तसाच वावर जाणवायला लागला. आता मात्र मनावरचा ताबा जायला लागला, गुरव माझ्या हाताला धरून मागे खेचायला लागला. आता झालं तेवढ पुरे , म्हणून मागे वळलो आणि ..
मागे 'ते' ओळीने उभे होते.. बुडालेले आमचे कोळी..आम्ही हादरलो , ते जिवंत खासच नव्हते , तरी आम्ही नावाने हाक मारून पहिल्या , कसलाच प्रतिसाद नाही .. कोणीतरी कळसूत्री बाहुल्या नाचवतात तसे ते विचित्रच चालत आमच्या कडे यायला लागले . गुरवाने खच्चून बोंब मारली , रामोशी आणि आम्ही हातातली हत्यार घट्ट केली , अंगाची चाळण झालेली , त्यावर फाटक्या चिंध्या , तोंडावर त्वचा अशी नाहीच , बघवत नव्ह्त, जे काही होत ते अतिशय विकृत होतं, डोळ्याची खोबण तशीच रिकामी, पण काही अंतर जेमतेम ते चालले , आणि अचानक सगळे सापळे खाली कोसळले ...
गुरवाला कसतरी सावरून आम्ही भयानक वेगात पळायला सुरुवात केली , अचानक कसलातरी आवाज झाला , बाकीचे पुढे पळत गेले , पण मी थांबलो , जे पाहिलं ते भयाण होतं , मानेवरून थंड घामाचा ओघळ आला ... पहिल्यांदा मी 'त्यांना' पाहिलं, त्या पडलेल्या हाडांमधून 'ते ' बाहेर येत होते . मागून त्या दगडी कारंज्यातल झाड आता फुल उमलतं तसं उघडलेलं होतं , त्यातूनही काही वर येत होतं , झपाट्याने , त्यांना काहीच आकार नव्हता , सावली म्हणता येईल ,पण सावल्या पारदर्शक असतात , हे तसेही नव्हते .. काळसर लपलपणार, एखाद्या शेवाळाचा गोळा उंच काठीला बांधून सोडल्यावर कसा दिसेल तसाच काहीसा आकार , कानाला दडा बसेल असा शिट्टीसारखा कर्कश आवाज करत 'ते' माझ्या दिशेने यायला लागले , मला भान आलं , मी बराच मागे पडलेलो होतो, केशव लांबून हाका मारत होता, मी जीव घेऊन पळत सुटलो , मध्ये मध्ये मागे नजर टाकत होतो , आता अजूनच विचित्र घडलं, ते आकार आजूबाजूच्या वेलींमध्ये , दगडात विरून गेले , आणि एकदम सर्व आवाज थांबला .. मी तसाच धावत पुढे जात होतो , बाकी सर्व सड्यावर सुखरूप पोचलेले होते , मागे आता कोणीच नव्हत , मी चढावाखाली आलो, एवढा चढ चढला कि सुटलो ,तेवढ्यात अचानक वरून मोठा दगड माझ्यावर कोसळला , मी झटक्यात बाजूला झालो, थोडक्यात वाचलो .. त्या खाली जाणार्या दगडातून एक आकार तुफान वेगात निघून दुसर्या एका दगडात मिसळून गेला , मी पळत होतो , तेवढ्यात वेलीत पाय अडकून जोरात पडलो, काही कळायच्या आत , कुठून तरी अनेक वेळी कुठून तरी सरपटत आल्या , माझे हात पाय करकचून आवळले गेले, आणि तसाच मी परत खाली खेचला जायला लागलो , ते तिथल्या कणाकणात होते, अख्ख वातावरण त्यांनीच भारलेलं होतं, हातातली कुऱ्हाड कशीतरी चालवायला लागलो, जीव घेऊन सगळ्या वेली कापून काढल्या , केशव परत मागे आलेला होता, तो हि मला मदत करत होता , एकदाचा मी मोकळा झालो , आम्ही कसे बसे वर आलो , मागून त्या वेली परत खाली सरकत जात होत्या , सड्यावर आल्यावर अचानक वारा लागायला लागला... समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायला आला .. आम्ही 'त्यांच्या' तावडीतून सुटलो होतो तर , वातावरण आता नेहमीसारखे होते, आम्ही तिथेच फतकल मारून बसलो , काळीज धडधडत होतं , गुरव तर शिव्यांची लाखोली वाहत साफ आडवाच झाला , मी अजूनही तिकडे बारकाईने पाहत होतो , हळू हळू तो गढीतला गुलाबी निळसर प्रकाश कमी कमी होत , गढी अंधारात बुडून गेली , थोडक्यात आम्ही वाचलो होतो , पण मनातले प्रश्न कमी होण्या ऐवजी वाढलेलेच होते, हा प्रकार निराळाच होता
************
भाऊ , भाऊ , आरतीला येताय ना? कोणीतरी खालून ओरडलं, अन आम्ही भानावर आलो, खोलीत एक मिणमिणता दिवा सुरु होता, बाहेर पूर्ण अंधार पडलेला होता , गोष्ट ऐकण्याच्या नादात वेळ कसा गेला काही समजलंच नाही .बापरे माझ्या अंगावर काटा आलेला , शिरीष तर दोन पायावर उकिडवा बसलेला होता, त्याची पोझिशन पाहून मला हसायलाच आलं , मला पाहून तो 'ह्या ह्या' करत मागे टेकला. भाऊ हळू हळू उठले , म्हणाले आरतीला जातोय , यावस वाटलं तर या, नाहीतर जरा आवरून घ्या , रात्री जाताना जेवायला बोलवेन . उरलेला भाग रात्री बोलू . मी त्यांना बाहेर सोडून आलो ,
हळू हळू काठी टेकत ते खाली सरावाने उतरून गेले. मी परत मागे आलो , आत येऊन दरवाजा लावून घेतला, कपडे बदलुन आम्ही एकमेकांची तोंड पाहत बघत बसलो ,
आयला पशा . " मायला हि काय भानगड आहे ?" शिरीष सरळ मुद्द्यावर आला
हो ना , बेक्कार किस्सा सांगितला. चायला उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे आणि हि अशी सुरुवात अपेक्षित नव्हती .
हे आजोबा कोकणीच आहेत रे , वय पण बघ न किती झालाय , कोकणात रात्री आज्जी आजोबा गोष्टी सांगतात तशा सांगितल्या असतील आपल्याला .
प्रत्यक्षात ते तेंव्हा गेलेही असतील, पण अंधाराला घाबरून परत आले असतील, त्या वेली, तो प्रकाश , ते सापळे .. विश्वास ठेवायला जड जातंय रे .
ठीके आहे शिऱ्या , एक वेळ मानून चालू कि या कहाण्या रंजक आहेत , पण तरीही एक प्रश्न उरतोच , मला पडणारी स्वप्न, त्यांचे इथे जुळलेले परफेक्ट कनेक्शन , आणि हा जयदीप ..
हम्म सगळंच गुंतागुंतीच आहे रे . शिऱ्या वैतागत बोलला. कुठे येऊन फसलोय, आणि काय काय पहाव लागणारे काय माहित चायला मी तर म्हणतो नोकरी वर रीस्युम अपडेट करूया , तसंही हे काम आपल्याच्याने समजा झालं नाही तर, वाय्झेड हाकलणार आहेच, मी मागची खिडकी उघडत म्हणालो .
बाहेर पाउस रिपरीपत होता , रातकिडे किरकिरत होते , एकदम गार हवा आत आली , सड्यावरचा रस्ता निवांत होता, त्यापुढे गढीच टोक दिसत होत , माझ्या सुदैवाने आत्ता तरी तिथे अंधारच दाटलेला होता .
भूक लागलीये रे , चल आपण खाली जाऊया , देऊळ पण पाहून येऊ , येताना भाऊ आजोबांना घेऊन जाऊ घरी , शिऱ्या उठत म्हणाला ,
अरे वा शिऱ्या, 'भाऊ आजोबा' वेग्रे , भारीयेस , मीही त्याची खेचत उठलो .
घराला कुलूप लावून आम्ही खाली रस्त्यावर आलो ,सगळा अंधारच होता , आरतीचा आवाज येत होता, त्या रोखाने निघालो. पाचच मिनिटात देऊळ दिसले , १५ -२० माणसं जमलेली होती, आम्ही बाहेर थांबलो , काही वेळात आरती संपली , आणि सर्व बाहेर आले , भाऊंनी आमची ओळख करून दिली , पण आम्ही कशाला आलो आहोत ते मात्र सांगितले नाही , आमचे पावणे आहेत इतकेच सांगितले , एक वयस्कर माणूस मात्र डोळे बारीक करून मला न्याहाळत होता , भाऊंनी ते ओळखले, बाकी लोक निघून गेल्यावर त्याला घेऊन ते आमच्याजवळ आले ,आणि म्हणाले बाळांनो ,हा माझा मित्र लक्ष्मण गुरव, आणि आमच्याकडे पाहून हसले , आयला म्हणजे त्या गोष्टीतला गुरव हा होता तर, परत येताना , आम्ही पुढे होतो , हे दोघ हळू हळू खुसपुसत होते , गुरव आजोबा , हो आजोबाच ते , तेही काहीतरी तावातावाने मुद्दे मांडत होते. आम्ही मात्र काही विचारत बसलो नाही , खूप भूक लागलेली , घरी आल्यावर काकांनी सरळ जेवायलाच बसवले , दुपारच्या प्रसंगाबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त केली , काकू हि आता शांत झालेल्या होत्या , आम्ही दोघेही भरपूर जेवलो , सतीश काकांबरोबर गप्पा मारत बाहेर आलो , तरीही त्यांनी मध्ये मध्ये गढीचा विषय काढून जमल्यास निघून जायला सांगितले, आम्ही हो ला हो करत होतो . रात्र वाढली तसा पाऊसही वाढला, भाऊ, गुरव ,आणि आम्ही असे पुन्हा त्या घराजवळ आलो, मी दर उघडले , आणि सर्व आत बसलो भाऊनी पुन्हा बोलायला सुरुवात केली
हा.. तर त्या दिवसापासून आम्ही सर्वांनीच त्या गढीचा धसका घेतला , कसाबसा जीव वाचलेला होता , पण तिथे नक्की आहे कोण हे कोड अजून सुटलेलं नव्हत . आमच्या भागात पूर्वी एक वाघ दिसायचा कधी कधी , एकदा तर त्या वाघाची भयंकर डरकाळी त्या भागातून ऐकू आलेली होती , पुढे तो वाघ काय त्याच नखही दृष्टीला पडलं नाही, हळूहळू ती विचित्र झाडं त्या सड्यावर सुद्धा दिसायला लागली , पार अगदी तो कडा जिथे समुद्राला भिडतो तिथवर .. त्याचं साम्राज्य कणाकणाने वाढत होतं . रात्रीने त्या रस्त्याने यायचं पण आम्ही टाळायचो .
पुढे बरीच वर्ष पार पडली , माझं लग्न झालं , मुलगा झाला , मी माझ्या आयुष्यातून त्या गढीला इतर गावकरी लोकांसारख वजा करून टाकलं , एक पिढी संपली , अनेकांची मुल शिकायला नोकरीला म्हणून देश परदेशात निघून गेली , म्हातारी कोतारी इथेच झिजत गेली , बरीचशी घर कायमची बंद झाली . गावाला अवकळा आली. पण मी माझं गाव सोडून कुठेही गेलो नाही , हा गुरव पण . माझ्या मुलाने माझा वसा चालवून हे गाव जपलं
आणि एखाद्या जखमेची खपली निघून रक्त वाहायला सुरुवात व्हावी तशीच एक घटना घडली. त्याने माझं आयुष्य परत ढवळून निघालं. साधारण २५-२५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी रात्री जेवून झाल्यावर अंगणात शतपावली घालत होतो, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि अचानक सड्यावरून जोरजोरात मदतीसाठी कोणाचा तरी आवाज यायला लागला, मी घाबरलो , काय करावे कळेना , पण शेवटी देवाचे नाव घेतले , कुऱ्हाड हातात घेतली , केशव ला आवाज दिला आणि सड्यावर निघालो .. धावत वर पोचलो, आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक तरुण जीव घेऊन पळत होता, आणि त्यांच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं . आम्हो दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकल , अंधारात ते नक्की काय आहे कळत नव्हत , उंच काटकुळ , फूसफुसण्याचा आवाज येत होता , ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं , तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच , केशव ने मशाल सोबत आणली होती , कदाचित त्यामुळे ते एका सीमेबाहेर येत नव्हते , आम्हीही पुढे गेलो नाही , हळूहळू ते खाली उतरत त्या गढी निघून गेले , गढी कडे पाठ न करताच मीही त्या तरुणाला मागे खेचत आणले ..
त्याचे डोके मी मांडीवर घेतले .. वा.. वा ... वाघ असं बडबडत तो पुन्हा बेशुद्ध झाला. मी घाबरून केशव कडे आणि त्या गढी कडे पाहिलं ,
वरच्या मजल्यावरून गुलाबी प्रकाश दिसत होता.. कित्येक वर्षांनंतर.....
क्रमशः
प्रतिक्रिया
8 Jan 2013 - 1:42 pm | पैसा
काय भयानक! हा भाग दिवसाचा टाकलास ते बरं झालं.
8 Jan 2013 - 1:44 pm | प्रचेतस
मिळ.प्र
काय अप्रतिम लिहिलंयस रे. वाचकांना घाबरून टाकायची तुझी हातोटी फार विलक्षण
जळ.प्र.
भें... काय लिवलंय काय लिवलंय. फूल्टू मारतोय आता हा आम्हाला.
8 Jan 2013 - 1:47 pm | भटक्य आणि उनाड
फार छान !!
8 Jan 2013 - 2:03 pm | बॅटमॅन
मिळ.प्रः
मस्त रे स्पांडू. लिहिण्याची हातोटी एकच लंबर!!!
जळ.प्रः
आयला *डू स्पांडू, काय लिहितोस का ** मारतोस बिचार्या वाचकांची?
8 Jan 2013 - 2:05 pm | नगरीनिरंजन
भयोत्कंठावर्धक!
9 Jan 2013 - 1:29 pm | नंदन
तंतोतंत!
8 Jan 2013 - 2:38 pm | किसन शिंदे
एक नंबर!!
स्वगत: च्यायला!! ह्या गविसरांचे विद्यार्थी जिकडे पाहावं तिकडे फुकटच्या फाकट जळ.लि स्वाध्याय गिरवताना दिसतील. ;)
8 Jan 2013 - 2:42 pm | कवितानागेश
च्यायला, जुनंच चित्र टाकून फशिवतोस व्हय रं?
वाघ कुठेय?
8 Jan 2013 - 2:43 pm | गवि
अगो.. ठाण्याच्या पुढची सर्व स्टेशन्स "फशिवली", "गंडिवली" अशी आहेत मूळची.. हल्ली नावं बदलली आहेत इतकंच. :)
8 Jan 2013 - 3:43 pm | कवितानागेश
अस्सय क्काय?!
थांकुर्ली बरं का तुम्हाला. :)
9 Jan 2013 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा
@ पुढची सर्व स्टेशन्स "फशिवली", "गंडिवली" अशी आहेत मूळची..>>> =))
@थांकुर्ली बरं का तुम्हाला.>>> =))
8 Jan 2013 - 5:07 pm | मृत्युन्जय
जबर्या. आग बढो. हम तुम्हारे साथ हय.
8 Jan 2013 - 5:33 pm | विलासिनि
खूप डेंज्रर आहे हे 'ते' जे काही आहे ते. खुप छान भयकथा.
8 Jan 2013 - 7:41 pm | Mrunalini
वाव.. मस्त झालाय भाग.. पुढचा भाग पण लवकर येउदे.
8 Jan 2013 - 7:47 pm | रणजित चितळे
मस्त
8 Jan 2013 - 7:57 pm | केदार-मिसळपाव
आ आ आ आ आ आ आ... (रामसे बन्धुन्च्या चालीत म्हणतोय)...
8 Jan 2013 - 7:58 pm | दिपक.कुवेत
भाग आज एका दमात वाचुन काढले...पुढचे भाग पण आता लवकर टाका....खुप उत्सुकता लागुन राहिलिये कि ह्याचा नेमका शेवट कसा असेल!
8 Jan 2013 - 10:28 pm | कौशी
लवकर लिहा .
8 Jan 2013 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा
9 Jan 2013 - 9:05 am | ५० फक्त
मस्त रे मस्त लिहिलंस..
9 Jan 2013 - 9:29 am | मूकवाचक
पुभाप्र
9 Jan 2013 - 10:03 am | हरिप्रिया_
सही..
पुढचा भाग पण लवकर टाका.
9 Jan 2013 - 3:18 pm | अविनाश पांढरकर
+१
9 Jan 2013 - 10:08 am | स्पंदना
चित्र बदलायला हवं. आता त्या छोटेखानी गावाच चित्र टाक स्पावड्या.
मी कथा वाचली नाही. मी घाबरले नाही. मला आज रात्री खिडकितून येणारा गुलाबी प्रकाश अन गायब झालेला वाघ हे दोन्हीही दिसणार नाही. मी गुरगुरीत झोपणार!
9 Jan 2013 - 2:00 pm | पैसा
मी चुकून "गुरगुरत" वाचलं!
9 Jan 2013 - 3:40 pm | चाणक्य
उत्सुकता रबरावाणी ताणताय राव
10 Jan 2013 - 10:15 am | नन्दादीप
लय भारी....
10 Jan 2013 - 3:09 pm | चेतन माने
तुमचं लिखाण जबरदस्त आहे, पुढे काय ह्याची खूप उत्सुकता लागली आहे
पुभाप्र
:)
10 Jan 2013 - 11:56 pm | निनाद मुक्काम प...
जबरी मजा येत आहे ,
आता लिखाणात खंड पडू न देता भाग टाकत रहा.
11 Jan 2013 - 11:50 am | सौरभ उप्स
जाम भारी रे स्पांडु.... कस काय सुचत राव एवढ... अगदी स्वप्न बघतोय अस वाटतंय हे सगळ वाचून .... आणि जाग येऊन स्वप्न अर्धवट नको राहायला हे स्वप्न चालूच रहाव अस वाटत तसच वाटतंय हे सगळ वाचून.. लगे रहो,,,
11 Jan 2013 - 12:18 pm | प्रचेतस
बाप रे. जाम भयानक स्वप्नं पडतात वाट्टं तुला.
11 Jan 2013 - 12:28 pm | स्पा
=))
11 Jan 2013 - 2:42 pm | अनिल तापकीर
वाचतोय,
11 Jan 2013 - 3:53 pm | सौरभ उप्स
हो बर्याचदा पडतात भयानक स्वप्न....... ती लक्षात राहिली तर त्याचा त्रास होतो, नाही राहिली तर उत्तम जस रात गई बात गई ....
9 Jul 2015 - 3:03 pm | तुडतुडी
अजिबात भीती वाटली नाही . काल्पनिक गोष्ट वाचतोय हे पूर्णपणे जाणवतं .
काळसर लपलपणार, एखाद्या शेवाळाचा गोळा उंच काठीला बांधून सोडल्यावर कसा दिसेल तसाच काहीसा आकार , कानाला दडा बसेल असा शिट्टीसारखा कर्कश आवाज करत 'ते' माझ्या दिशेने यायला लागले >>>
असं कुठलं creature असतं का? त्यामुळे भीती न वाटता हसूच यायला लागल . नारायण धारप टाईप कथा .
9 Jul 2015 - 5:02 pm | पाटील हो
पुढचा भाग पण लवकर टाका.