एक तरुण जीव घेऊन पळत होता आणि त्याच्या मागे एक विचित्रच जनावर सुटलेलं होतं. आम्ही दोघेही पुढे धावत आल्यावर ते थोड बिचकलं, अंधारात ते नक्की काय आहे ते कळत नव्हतं. उंच, काटकुळं. फुसफुसण्याचाही आवाज येत होता. ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होतं. तो तरुण आमच्या पायाशी येऊन पडलाच. केशवने सोबत मशाल आणलीच होती. कदाचित त्यामुळेच ते जवळ येत नव्हते. आम्हीही पुढे गेलो नाही. हळूहळू ते जनावर खाली उतरत त्या गढी निघून गेले. पाठ गढीकडे होऊ न देता, मीही त्या तरुणाला मागे खेचत आणले. त्याचे डोके मांडीवर घेतले. 'वा... वा... वाघ' असं बडबडत तो पुन्हा बेशुद्ध झाला.
मी घाबरून केशवकडे आणि त्या गढीकडे पाहिलं.
वरच्या मजल्यावरून गुलाबी प्रकाश दिसत होता, कित्येक वर्षांनंतर.....
***
"आम्ही त्याला उचलून घरी आणला, माझा मुलगा आणि सून तेंव्हा घरी नव्हते. मधली काही वर्ष सतीश श्रीलंकेत होता. रात्री त्याच्या डोक्यावर घरगुती लेप तयार करून लावला. प्रचंड ताप भरलेला होता त्याच्या अंगात. शिवाय, अंगावर जखमाही होत्या. ती रात्र तशीच विचित्र गेली. दुसर्या दिवशी खूप उशिराने त्याला जाग आली. मी घरातच होतो. त्याच्या जवळ बसलो. त्याला अजिबात हलता येत नव्हतं. एक पाय तर चांगलाच सुजलेला होता. त्याने पडल्या पडल्याच माझे आभार मानले. तापही उतरलेला होता. त्याची चौकशी केली, तेव्हा त्याचं नाव 'जयदीप', मूळ औरंगाबादचा आणि कामाला कसल्या तरी अंतराळासंबंधी संशोधन करणार्या संस्थेत काम करतो आणि बंगलोरला असतो इतकी माहिती मला समजली. साधारण तिशीचा हसतमुख तरुण होता. त्याची बायको, लहान मुलगा, आई, बाबा असे सर्व औरंगाबदेत असायचे. आदल्या रात्रीचा कालचा विषय मी मुद्दामूनच काढला नाही. त्यालाही बरंच बोलायचं होतं, पण तो ही गप्प गप्प होता. एक दोन दिवसांनी त्याला हिंडता फिरता यायला लागलं. घरी पत्र टाकून त्याने खुशालीही कळवली.
"एके सकाळी तो माझ्यासमोर येऊन बसला आणि सरळ त्या रात्रीचा विषय काढला.
काका त्या गढीत काय प्रकार चालतात ?तुम्हाला नक्की काहीतरी ठावूक आहे , त्या दिवशी तुम्ही आला नसतात तर माझा जीवही गेला असता. मीही त्याला उलटा प्रश्न केला , माझं हे गाव आहे . मी इथेच असतो , पण तू अचानक काही संबंध नसताना रात्रीचा तिथे काय करत होतास? तुला या गावात ओळखणार कोणी नाही , तुझं काही तसं कोणाकडे काम नाही , अचानक त्या गढीपाशी एकटा काय करत होतास.
सुरुवातीला त्याने थातूर मातुर कारण सांगितली, पण तो शेर तर मी सव्वाशेर होतो , मी अजिबात त्याला काहीही सांगत नव्हतो , शेवटी त्याचा नाईलाज झाला , कोणाला काहीही कळू न देण्याचे वचन घेऊन त्याने सांगायला सुरुवात केली , आता मला तो नक्की काय काय म्हणाला ते आठवत नाही , पण ती माहिती एका बैठकीत मात्र त्याने सांगितली नव्हती , अनेक दिवस आम्ही यावर चर्चा करत होतो. असो तेही तुम्हाला मी सांगीनच , सर्व घटना मलाही नीट आठवाव्या लागतील , पण मी जमेल तेवढ्या तपशिलात सांगेन. 'त्यांचा' अंत आता व्हायलाच हवा .. ...
"असो! उद्या सकाळी मी ती गढी तुम्हाला दाखवेन. दिवसा तिथे तशी काही भीती नसते. हां! पण फक्त सूर्यास्तापर्यंतच. एकदा का अंधाराचं साम्राज्य तेथे सुरु झालं की, "त्यांना " जाग येते. त्या आधीच तुम्हाला तेथून परत यावे लागेल. चला, रात्र बरीच झालीये. आता तुम्ही आराम करा. उद्या सकाळी ७ वाजताच तयार रहा. पावसामुळे अंधार लवकर होतो. लवकर कामाला सुरुवात करून, लवकर संपवा."
भाऊ आणि गुरव निघून गेले , आणि आम्ही जमिनीला अंग टेकलं. रात्री चक्क शांत झोप लागली.
सकाळी ६ वाजताच जाग आली. शिर्याला उठवलं. शेगडी होतीच. पाणी तापवून, अंघोळ करून गाडीपाशी गेलो. कॅमेरे, कागद, पेनं, मेझर टेप्स, लेझर डिस्टन्स कॅलक्युलेटर, त्याचा स्टॅंड असं सगळं सामान काढलं आणि भाऊंना आवाज दिला. सतीश काकांनी आत बोलावलं. चहा पोहे झाले. जपून जा म्हणाले. तेवढ्यात, भाऊ पूजा आटोपून बाहेर आले. निघालो. काल जे काही ऐकलं होतं, त्याने शिऱ्या आणि माझी चांगलीच तंतरलेली होती. दिवसाही तिथे जायला मन कचरत होतं. पण शेवटी नोकरीचा प्रश्न होता. दोन दिवसाआड कामाचे रिपोर्ट पोचवणं गरजेच होतं. सड्यावर आलो. गार वारा सुटला होता. पण पाऊस नव्हता. उतारावर गावत माजलेलं होतं. पण त्यापुढे अचानक वेगळीच झाडं, खुरटी अशी... पिवळट माती, दगड असं होतं. त्यापुढे ती गढी. जळकी.
भाऊ म्हणाले, "मी थोडावेळ इथेच थांबतो. तुम्ही जाऊन या. आत्ता काही भीती नाही. जपून राहा हो पण."
होकार देऊन, सामान उचलून आम्ही उतारावरून खाली चालू लागलो. आणि तो बदल जाणवला! विचित्र वास येत होता. घशातही खवखवायला लागलं. शिऱ्याही थोडा टेन्स होता. पण मनात खात्री होती की, जोपर्यंत दिवसाचा उजेड आहे तोपर्यंत आपल्याला भीती नाही. तसेच पुढे आलो. रात्री तूफान पाउस पडल्याने सगळ्या वातावरणातच ओल होती. आमचे पाय सारखे चिखलात घसरत होते. कसे बसे खाली आलो. आणि एकदाचे, त्या गढी समोर आलोच. विचित्र वेली भयानक आकारात गढीवर माजलेल्या होत्या. बरासचा दर्शनी भाग जाळून खाक झालेला होता. खिडक्या कधीच तुटून गेलेल्या होत्या. नुसती भगदाडं पडलेली होती. आम्ही हळू हळू गढी भोवती फिरायला लागलो. मागची बाजू बर्यापैकी शाबूत होती. प्रचंड वास्तू होती ती. शेकड्यांनी खोल्या असाव्यात. असा काही पूर्वेतिहास नसता, तर आरेकरांची निवड अतिशय योग्य होती. समुद्राचा एक पट्टा इकडे आत आलेला होता. कदाचित ओहोटी असेल, म्हणून लाटा खूप दूरवर दिसत होत्या, तिथपर्यंत फक्त वाळूच वाळू. सुरेखच जागा होती. आम्ही सगळीकडे नजर टाकीत परत समोर आलो. ते दगडी कारंजं तिथेच होतं आणि त्यात वाढलेल्या त्या मुळ्याही. इतक्या वर्षांनंतरही त्या तशाच होत्या.
"शिऱ्या, भाऊंची गोष्ट खोटी आहे म्हणत होतास ना! निदान तपशील तरी सर्व जुळत आहेत.", मी कारंज्याकडे बघत म्हणालो.
शिऱ्या काही बोललाच नाही. उगाच इकडे तिकडे फिरत बसला. मग आम्ही एका झाडाखाली थांबलो. विचित्रच झाड होतं. लिबलिबीत अगदी. एखादी जेली असावी तसं खोड होतं. गढूळ रंगाची पान>. ती ही लांबच लांब. अनेक पांढर्या, बारीक फांद्यांनी वरवर जात एक विचित्र आकार घेतलेला होता. "ते इथल्या कणाकणात आहेत", हे भाऊंचं वाक्य आठवलं आणि अंगावर काटा आला. आजूबाजूला पाहिलं तर शांतता ठासून भरलेली होती. इथून बाहेरचं जग दिसतच नव्हतं. सगळ्याबाजूंनी उंचावटा. सड्यावर पार्क केलेली आमची कार मात्र दिसत होती. एक दोन चुकार पक्षी आकाशात उडत होते. बाकी शुकशुकाट होता. ढगही दाटून आलेले होते. अजूनपर्यंत तरी पाउस नव्हता. मला एक मात्र जाणवलं. कोकणात, पावसात, तेही गवतात, वेगवेगळे कीटक, किडे ओरडत असतात, वेगवेगळे पक्षी असतात, एक जिवंतपणा असतो. पण इथे कसलाच आवाज नव्हता. जिवंतपणाचं एकही लक्षण नव्हतं. नुसतीच भयाण शांतता. जणू काही आपण वेगळ्याच जगात आहोत.
मन भरकटलं की भरकटतच जातं.
आम्ही कामावर लक्ष केंद्रित केलं. बोर्डावर A3 लावला, पेन्स काढली, आणि लेझर मशिनने डिस्टन्स मोजायला लागलो. टेकडीच्या उतारावर प्लास्टिक टार्गेट्स उभी केली. त्यातच दुपार झाली. आमच्याकडे आधी असलेल्या जागेच्या नकाशाशी आमचा नवा नकाशा पडताळून बघयला लागलो. प्रत्येक वेळी शिऱ्या टार्गेट घेऊन उभा राहायचा, मी लेझर त्याच्यावर हिट केला की बरोबर अंतर समजायचं. असला खेळ खेळत ३ वाजले. मधेच सतीश काका बघून गेले. आजचं आमचं जेवण म्हणजे बिस्कीटं आणि वेफर्स. सोबतीला थर्मास मधला चहा. आज बर्यापैकी काम झालं. कामाच्या धांदलीत असलो की मी आणि शिऱ्या आख्ख्या जगाला विसरतो. मग हवं तर अगदी स्मशानात रात्री १२ वाजतासुद्धा जाऊनसुद्धा आम्ही काम करत बसू. पण जेंव्हा आजचा दिवस संपत आला, तसा तो वास तिखट व्हायला लागला. शिर्यालाही ते जाणवलं. त्याला जेवल्यानंतर सिगरेट ओढायची सवय. त्याने सिगरेट काढून लायटर पेटवला, पण लायटर पेटायचं नावच घेत नव्हतं. आँ? ही काय भानगड म्हणायची. लायटरमधे गॅस तर होता, वारा नव्हता अजिबात. शेवटी कंटाळून त्याने तो नाद सोडला.
अचानक त्याला आठवलं,
"अरे! भाऊ आलेले तेंव्हा त्यांच्या पण मशाली विझलेल्या इथे. मायला, इथे आग पेटत नाही की काय? की पेटू देत नाहीत... "ते"?"
त्याचं बोलणं ऐकून मी ही ताठरलो. लायटर तुटायची वेळ आली. पण त्यातून फ्लेम काही आली नाही. तेवढ्यात वरतून भाऊ हातवारे करताना दिसले. आम्ही ही त्यांना 'येतोय' असं खुणेने सांगितले. पटापट समान आवरले आणि निघालो. घड्याळाची वेळ ४ दाखवत होती. डोळे प्रचंड चुरचुरत होते. वर आल्यावर एकदम बरं वाटलं, मोकळं मोकळं.
"पोरांनो उशीर करत जाऊ नका. मला सारखं वर येणं झेपत नाही. तुमची काळजी वाटली म्हणून कसाबसा आलो इथे. साडेपाच सहानंतर पूर्ण अंधार पडतो हल्ली. बघा पाउस पण सुरु झाला. चला खाली चला.", भाऊ जवळजवळ खेकसलेच आमच्यावर.
आम्ही खाली आलो. आमच्या नवीन घरात जाऊन फ्रेश झालो. प्रचंड भूक लागलेली होती. कधी एकदा जेवतोय अस झालेलं. भाऊंच्या घरातून फोन करून वायझेडला रिपोर्ट दिला. तो म्हणाला, "उद्या जेवढ काम झालं असेल तेवढं स्कॅन करून पाठवा." आता त्यासाठी तालुक्याला जावं लागणार होतं. आउटर टेरेन आम्ही मोजलेलं होतं. उद्या सकाळपर्यंत पुढील भागाचा प्लान तयार झाला असता. पहिला दिवस तरी धड गेला. काही गडबड न होता. पण उत्सुकता अजूनही ताणली गेलेलीच होती. जयदीप बद्दलची माहिती भाऊ आज सांगणार होते. रात्री आरती आटपून भाऊ वर आले. तेंव्हा साधारण ९ वाजलेले होते. गुरव आजोबा पण आले. आज सतीश काकाही सोबत होते.
भाउंनी सुरुवात केली. माझ्यात आणि त्यांच्यात अगदी वडील-मुलासारखं नातं तयार झालं होतं.
"या सतीशने कधी त्याला पहिलाच नाही. कारण, आमचा जेमतेम सताठ महिन्यांचा सहवास. पत्रातून माझी खुशाली सतीशला कळवायचो. त्यालाही मला सोबत आहे हे पाहून आनंद व्हायचा. तो येथे येईपर्यंत बिचारा जयदीप कायमचा निघून गेलेला होता.", भाऊंनी मधेच डोळे टिपले.
"तर, त्याने मला हळूहळू त्याला त्या गढीबद्दल, म्हणजे त्या जागेबद्दल, असलेली माहिती सांगायला सुरुवात केली. भारत सरकारच्या अंतराळ विषयीच्या इस्त्रो का कुठल्या मोठ्या कंपनीत तो बंगळुरात कामाला होता. तेंव्हा मला तो सांगायचा की चंद्रावर माणसे पाठवायची चढाओढ त्यावेळी विलायतेत लागलेली होती. रशिया आणि त्याची कंपनीपण एकत्र येऊन संशोधन करतेय, असं म्हणायचा. एकदा त्यांच्या उपकरणांवर विचित्र संदेश यायला लागले. पण ते नक्की कशाबद्दल आहेत ते समजत नव्हतं. एक आठवडा ते संदेश सतत येत होते. आणि अचानक ते येणे बंद झाले. यानंतर तेंव्हा उपग्रह नव्यानेच अवकाशात सोडले गेले होते. त्यांनी देशातल्या विविध भागांची काही छायाचित्र पाठवली. तेथून ती फ्रिक्वन्सी मध्ये मध्ये परावर्तीत व्हायची. मग अशा जागी त्यांच्या कंपनीने लोक पाठवले आणि इतक्यात काही बदल जाणवला का विचारले."
"आश्चर्य म्हणजे ज्या ज्या जागांवरून ती माहिती मिळालेली होती, त्या जागा खूप आधीपासून अनैसर्गिक हालचालींसाठी प्रसिद्ध होत्या. आणि बहुतेक सर्व समुद्रालगत होत्या. त्यातलीच ही देखील एक जागा होती. सर्व जागांमध्ये साधर्म्य होते. सर्व जागा ओसाड होत्या, मानवी वस्ती तिथे नव्हती, तिथली खनिज संपत्ती, झाडं सर्वच कधीही न पाहिलेले. जगात इतरही ठिकाणी अशा काही जागा आढळून आल्या. अतिशय गुप्त पातळीवर ही माहिती जमवणे सुरु होते. कुठल्याही परिस्थितीत सामान्य जनतेला या गोष्टींबद्दल माहिती आत्ताच देणे उचित नव्हते, कारण आधीच बर्याच अंध:श्रद्धा, दंतकथा प्रचलित होत्या, त्यात अजून भर पडली असती. शिवाय नक्की हे कुठून आलेत त्यांचा हेतू काय, त्यांची शक्ती किती, कशाचीच माहिती नव्हती, साधे दृष्टीसही पडलेले नव्हते कोणाच्या अजूनपर्यंत. बर्याच ठिकाणी दंतकथांमध्ये जागांचा उल्लेख हजार वर्षांपूर्वीचाही मिळाला आणि त्या सर्वच कथा अगदीच रंजक नव्हत्या. कारण आफ्रिकेतील काही जुनाट गुहांमध्ये समुद्रालगत काही आकाशातून पडतंय, विचित्र झाड, काळे आकार, वेगवेगळे दगड गोटे अशी निरनिराळी भित्तीचित्र सापडली. म्हणजे त्यांचा उगम हा थेट आदिम काळात जात होता, फक्त आत्ता त्याचा नव्याने शोध लागलेला होता. अनेक शास्त्रज्ञ काळजीत पडले."
"कारण हा सरळ सरळ पृथ्वीवर पर ग्रहावरील शक्तीचा हल्लाच होता. यावर प्रचंड अभ्यास व्हायला लागला. अनेक सिद्धांत मांडले गेले. ह्याचाच एक भाग म्हणून जयदीप येथे आलेला होता. तो आधीही गुपचूप येऊन गेलेला होता. पण त्याला विशेष काही जाणवले नव्हते. नेमका त्या दिवशी त्याला त्या गढीत उशीर झाला. आणि सूर्यास्त होऊन गेला. तुला सांगितलं आहेच, एकदा सूर्य डोळ्याआड गेला, त्यांच्या भागातलं शेवटचा सूर्यकिरण समुद्रात परतला की ते जागे होतात. आणि हा त्यांच्या तावडीत सापडला. ते जनावर जे आम्हाला दिसलं, तो कित्येक वर्षांपूर्वी मी उल्लेख केलेला वाघ होता. बिचारा काळाच्या ओघात तो मरण पावलेला असेल. पण त्याच्या कलेवराला ते अजूनही आपल्या सत्तेने नाचवत होते, त्याच्याशी अभद्र खेळ खेळत होते. जयदीपने बरीच माहिती जमवलेली होती. माझ्याकडे ते जुने कागद असतील. त्याच्या नोंदी, आमची संभाषणं, बरंच काही काही. आम्हाला आलेला अनुभव ऐकून तर त्याला बरीच नवीन माहिती मिळाली. ती सर्व नोंद आहेच. तूर्तास आज एवढे पुरे! उशीर झालेला आहे. झोपा आता."
एवढे बोलून, भाऊ, सतीशकाका आणि गुरव आजोबा यांनी आमचा निरोप घेतला. बाप रे! ऐकावं ते नवलच. या तत्वावर सध्या दिवस जात होते. पण आता या सगळ्यात एक थरार वाटत होता.
जाग आली तीच पावसाने .. आज तर काहीच दिसत नव्हत. मुसळधार पाउस बरसत होता. आम्ही उगाच पडून राहिलो . शिऱ्या घोरत पडलेला होता. चायला या गाढवाच्या जागी आज तनया हवी होती , इथे आल्यानंतर पहिल्यांदाच तिची आठवण आली. मी उठून आवरलं. आज ९ ला गढीपाशी पोचलो. बरच निसरड होत , जपून काम सुरु होतं , पाउस मेहेरबान होता , कामाच्या वेळी शहाण्या मुलासारखा गप बाजूला बसून असायचा. आज वाय्झेड ला रिपोर्टिंग करायचंच होतं. २ ला आम्ही वर आलो. काकूंकडे जेवलो. जेवल्यानंतर तालुक्याला जायचं होतं, पण दोघांनी जायची गरज नव्हती. मी शिरीष ला म्हणालो , तू जा काम उरकून ये, एखाद सायबर नक्की मिळेल, नाहीच मिळाल तर सरळ क्यामेराने प्लान चे फोटो काढ आणि दे पाठवून. मी थोडस काम आहे ते खाली उरकतो आणि समान घेऊन वर येतो .
'पशा एकट्याने जाशील ना .. *ड फाटणार नाय ना , बघ हा .. फाटली तर मी नाय शिवून देणार.. ह्या ह्या ..शिरीष्पंत नॉर्मल मूड ला आले
घाबरू नकोस.. नाही फाटली तरी मी काम एकट्याने करणार नाहीये , आपलं बरंच सामान खाली आहे ते घेऊन वर येऊन मस्त झोप काढेन ..
हा हा . बघू बघू .. म्हणत शिरीष गाडीत बसला , काका काकूंना तालुक्याला काम होत म्हणून ते सोबत आणि भाऊंना सुद्धा पोष्टाच काहीतरी काम होतं, त्यामुळे तेही असे सर्व गाडीतून निघाले, मी एकटा त्यामुळे मला दहादा बजावून गेले.
शिरीष म्हणाला पण येऊ का समान आणायला .. पण म्हटलं नको.. मी आणेन ते ( चायला एवढाही फट्टू नाहीये मी )
ते निघून गेल्यावर , मी परत उतरायला लागलो, काम करण शक्यच नव्हतं, चायला एकट्याने कोण मरणार या भयाण जागेत, एकदाच समान घ्यायचं नि कलटी मारायची. मी त्या झाडापाशी आलो , सर्व समान गोळा केलं , पिशवीत भरलं. घड्याळात पाहिलं ४ वाजत आलेले होते , चला निघूया आता , लेसर मशीन उचलल आणि चालायला लागलो , मध्ये मध्ये आजूबाजूला नजर होतीच , एकट्याला आता चांगलीच भीती वाटत होती , चांगलंच अंधारल होतं. अचानक आभाळात वीज कडाडली ,आणि मी जास्तच घाबरलो .जवळपास पळायलाच लागलो. आता हे कारंज दिसतंय ते ओलांडल कि जमीन , ती ओलांडली कि चढ, आणि आपण सुरक्षित , असाच विचार करून पळत होतो , तेवढ्यात फरशीवरच्या शेवाळावरून पाय घसरला , आणि मी सणसणीत आपटलो ,
डोक कारंज्याच्या कठड्यावर आपटलं.. क्षणात रक्ताची चिळकांडी उडाली ..तोंडात कडूशार चव पसरली , मी सावरायचा प्रयत्न करत होतो ,
पण .. पण हळूहळू समोरचा देखावा अस्पष्ट व्हायला लागला
प्रतिक्रिया
11 Jan 2013 - 5:38 pm | स्पंदना
पडलास? आता कोण आहे तिथे उठवायला?
असो. आईनस्टाईन!आईनस्टाईन!आईनस्टाईन!आईनस्टाईन!
तूला रात्रीच टाकायचे असतात कारे भाग?
11 Jan 2013 - 5:42 pm | पैसा
राम राम राम! पण ही भुतं नाहीयेत. एलियन्स.
11 Jan 2013 - 5:47 pm | बॅटमॅन
एलियन्स व्हर्सेस प्रिडेटर्स!!!! जिक रे भावड्या. आवडलैस :)
11 Jan 2013 - 7:55 pm | शैलेन्द्र
आता हा उठायचा कधी म्हणतो मी?
11 Jan 2013 - 8:00 pm | सामान्य वाचक
आता काय होणार याचे?
(नायक असल्यामुळे जीवाचे बरे वाईट होणार नाही हे नक्की )
11 Jan 2013 - 8:02 pm | इष्टुर फाकडा
हि कथा भुतावळी नाही हे कळलं आणि मगच सगळे भाग वाचून काढले :) एलियन्स वगैरे ठीके ते भुते वगैरे परवडत नाही रे बाबा. असो, नेहमीप्रमाणे फाडण्यात यशस्वी झालेला आहातच ! पुभाप्र
11 Jan 2013 - 9:56 pm | शिवप्रसाद
वाचतोय
11 Jan 2013 - 10:47 pm | कौशी
आणि कथा पुर्ण कर.
11 Jan 2013 - 10:52 pm | टवाळ कार्टा
थोडासा I AM LEGEND सारखा सीन झालाय
11 Jan 2013 - 10:57 pm | मराठे
च्यायला फटफटी झालीय!
लेखात काही काही टायपो झालेत. (नथिंग मेजर).
12 Jan 2013 - 9:07 am | स्पा
टायपो सुधारलेत
धन्यवाद
11 Jan 2013 - 11:34 pm | भटक्य आणि उनाड
नको रे तानू उत्सुक्ता !!! सम्पव लव्कर ,, मस्त जम्लय ...
12 Jan 2013 - 8:51 am | प्रचेतस
लै भारी होत चाललेय कथानक.
पुढचा भाग लवकर टाका स्पारायण गाळपजी.
12 Jan 2013 - 9:58 am | रणजित चितळे
पुढची गोष्ट सांग.
12 Jan 2013 - 10:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
झक्कास...
12 Jan 2013 - 10:17 am | अस्मी
एकदम भारी चालल्ये कथा!! पुभाप्र..
12 Jan 2013 - 12:27 pm | चेतन माने
सही !!! एकदम मस्त
पुभाप्र
12 Jan 2013 - 7:59 pm | अमोल खरे
सही चाललेत रे कथा. मजा येतेय. तु आजपासुन गरिबांचा धारप आणि मतकरी.
12 Jan 2013 - 8:39 pm | नन्दादीप
भारी... वाट पहातोय पुढच्या भागाची...
12 Jan 2013 - 11:12 pm | किसन शिंदे
आता हा पडलाय ते सुध्दा बहुतेक स्वप्नंच असावं.
पुढचा भाग लवकर टाक.
13 Jan 2013 - 3:36 am | जेनी...
खुप डरावणीये कथा .
चार वाजले वाचलं कि पूढचं हपापल्यासारखं वाचलं जातय .
कधी शुद्धीवर येणार आणि पूढचं लिवनार " ते" च जानोत
13 Jan 2013 - 3:51 pm | अन्या दातार
डरावणी हा शब्द काळजाला भिडला. कधी एकदा स्पावड्याच्या कथेतले 'ते' येतात अन मला उचलतात असे झाले.
13 Jan 2013 - 11:59 pm | कवितानागेश
म्हणजे असे काहीतरी असेल का?

14 Jan 2013 - 2:48 am | जेनी...
काहिहि हं ! :-/
डराव डराव और डराव =))
22 Jan 2013 - 4:56 pm | बॅटमॅन
हुड हुड डराव डराव डराव हुड हुड डराव डराव डराव :P =))
13 Jan 2013 - 8:43 pm | प्रीत-मोहर
मस्त रे स्पावड्या.
च्यायला खर्याशी सहमत होण्याचे दिवस आलेत!!! हे राम!!
16 Jan 2013 - 1:00 pm | अनिल तापकीर
जबरदस्त, लवकर......लवकर.......लवकर........येऊद्या पुढचा भाग
16 Jan 2013 - 1:22 pm | हासिनी
मस्त...कथेचा पुढचा भाग लिहा पटकन.
:)
16 Jan 2013 - 1:53 pm | नितिन महाजन
कथा वाचातांना उस्तूकता खुपच जबरदस्त ताणली गेलेली आहे, पुढचा भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
22 Jan 2013 - 4:40 pm | क्श्मा कुल्कर्नि
क्रमशः नाही म्हणजे कथा संपली !!
खुपच जबरदस्त !! पण अर्धवट वाटते, क्रुपा करुन पुढे लिहा. खुपच उत्सुकता वाढली आहे !!
22 Jan 2013 - 4:56 pm | धमाल मुलगा
भीड तिच्यायला! एक नंबर चाललीये ष्टुरी.
पुनर्जन्म+परग्रहवासी असा दोन्ही पक्षांना चालणारा सुवर्णमद्य (मध्य..मध्य! मद्य वाचलं का तुम्ही? ;-) ) चांगलाच काढलायस.
वातावरणनिर्मिती - झकास
फ्लॅशबॅक - झकास
वेग - झकास
पुढचे भाग येउंद्या लवकर. वाट पाहतोय. :-)
22 Jan 2013 - 9:08 pm | जेनी...
ओ तेसात कधी येणारे ??
18 Feb 2013 - 11:09 am | सुजित पवार
अता ते ७ आला तर, पहिल्यान्दा ते १ पसुन ते ६ परत वाचावे लागतिल..
18 Feb 2013 - 9:56 pm | मनिम्याऊ
अगदी बरोबर.... मी बर्यापैकी विसरलेय कथा
18 Feb 2013 - 5:09 pm | सासुरवाडीकर
भुतांच्या वसति कडे जाता जाता एकदम परग्रहावर....!
छान टर्न दिलाय कथेला.
पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय,जरा लवकर टाका.
18 Feb 2013 - 9:13 pm | निमिष ध.
ते ७ ची वाट पहात आम्हीच ते होउन जाउ असे वाटते आहे.
18 Feb 2013 - 9:18 pm | जेनी...
=)) ...
एकदम सहमत ...
19 Feb 2013 - 11:49 am | स्मिता चौगुले
अगदि बरोबर...सहमत...:)
18 Feb 2013 - 9:47 pm | अग्निकोल्हा
.
4 Mar 2013 - 10:28 pm | निनाद मुक्काम प...
स्पा
सतीश राजवड्याने ही गोष्ट वाचली तर काही प्रसंग अजून फुलवून ह्यावर तो डेली सोप आरामात बनवू शकेन, तेही त्याच्या शैलीचे म्हणजे काही महिन्यात संपणारे
असे मला वाटते.
च्यायला ते शीर्षक पण खत्री आहे.
ह्यावर शीर्षक गीत काय जबरा बनेल.