भाग पहिला http://www.misalpav.com/node/21795
एखाद्या दिवशी गावातली एखादी जाणकार व्यक्ती हळुवार सुरात बोलते,'काल रात्री नवं पाखरू उतरलं जणू'. बाकीची माणस अगदी लक्ष देवून ऐकतात.' म्हणजे मृग काय लांब नाही तर?'
प्रश्न पडला ना ऐकून? नवं पाखरू हे migratory पक्षी . या दिवसात हे पक्षी भारतात स्थलांतर करून येतात, अन त्यांचा इतर पक्षात वेगळा असणारा चिवचिवाट या जाणकारान टिपलेला असतो. मग येतो "पावश्या" कुठही आजूबाजूला बसून हा बिनदिक्कत आरोळी ठोकतो"पावश्या घो!" "पावश्या घो!!" . हळू हळू वातावरण बदलू लागत. अन एका रात्री मान्सून टपटपू लागतो. आवाज नाही, गोंधळ नाही. बस, साऱ्या आसमंतात फक्त आभाळातून बरसणारया या मायेचा 'सरऽ ऽ सर' नाद भरून राहतो. माणस रात्र भर जागी असतात. पण तशीच पडून आभाळाची ही माया एखाद्या झाडानं, लवल्या पानांनी झेलावी, तशी झेलत रहातात. मनात शेतांची साद घुमू लागते. उन्हाळाभर सारी अवजार नीट नेटकी करून घेतलेली असतात, सार तयार असत. मन अगदी हळुवार फुर फुरू लागतात. सुरवातीला दोन तीन दिवस पाऊस एक सारखा पडत राहतो. जणू त्याची वाट पाहणाऱ्या धरेला त्यान कडकडून दिलेलं आलिंगन!! ही मिठी सुटता सुटत नाही. एकदा का जमिनीवरून छोटे छोटे ओघळ वाहू लागले, तीच मन भरलं, की मग उघडीप होते.
मला नदीला पाणी कसे येते हे कधीच बघून माहीत नव्हत. अचानक एके दिवशी काल पर्यंत कोरडी ठणठणीत असणारी नदी आधी खळखळाट करत, आणि मग हळू हळू एका धारेन वाहू लागते.पात्रातले मोट्ठे मोट्ठे दगड जे उन्हान पांढरट पडले होते, ते सुद्धा जणू ताजे तवाने होतात! काळ्याशार शिळा पुन्हा एकवार पात्रात चमकू लागतात. एव्हढ पाणी पुन्हा नजरेला पडल्यावर उगाच एखादी सालस, दुभती म्हैस सुद्धा थोडं थोडक उधळून बघते, लटका माज दाखवते.
साऱ्या सृष्टीला थोड्याफार फरकान, पण अगदी अस्सच वाटायला लागत. काल पर्यंत गावाकडे मुकाट चालणारी पाय वाट आज अंगावर भुरकट तुरळक गवताची शाल ओढून जणू लपून बसायचा आव आणते. हळुवार डोलता डोलता, जुनी जाणती झाड एकदम जोरात सळसळ करतात . जणू एखाद्या आजोबांनी खळखळून हसत पोरासारांच्या खेळांत सामील व्हाव. गावातल्या बायका, मुली काहीना काही कारण काढून, नदीकड जाऊन येतात.
एकदा का सारी नदी त्या नव्या पाण्यान भरली की मग नव्या पाण्याची जत्रा 'सादवली' जाते. 'सादवणे' म्हणजे गावातल्या जाणत्यांनी केलेला ठराव कुणी तरी एकान मोट्ठ्यान, दवंडी पिटाव तशी, ओरडत गावात एक फेरी मारायची. हो ! म्हणजे उगाच कोणी मला सांगितलं नाही म्हणायचं काम नाही.
आता ही नव्या पाण्याची जत्रा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होते. नदीच्या पाण्याची मनोभावे पूजा, मग ते पाणी कळशीत भरून ग्राम दैवताला अभिषेक..नदीची ओटी..आणी सर्वात शेवटी ..पाणी हे पंच महाभूता पैकी एक म्हणून...कोंबड वा बकर ! गावात त्या निमित्तान साऱ्या घरात वशाट शिजत. इथून पुढे जवळ जवळ गणपती पर्यंत मांसाहार टाळला जातो.
पावसान रोगराई वाढते म्हणून असेल, पावसाळ्यात बरेच प्राणी प्रजनन करतात म्हणून असेल वां आणी काही, पण गावी पावसाळ्यात मांसाहार व्यर्ज्य!
ज्या दिवशी मृग नक्षत्र चालू होत...गावी लागत.. म्हणतात..त्या दिवशी 'कुरी' पुजली जाते.कधी पाच आट्याची, कधी सात आट्याची अशी ही 'कुरीबाय' घरधणीनीच नवकोर लुगड नेसते. चांगला लफ्फेदार पदर काढुन तिच्या डोक्यावरुन पुढे ओढला जातो. घसघशीत मळवट भरलेली ही कुरी, आज ओटीची मानकरीण असते. धान्यान तीची ओटी भरुन , नैवेद्याचा गुळाचा खडा समोर ठेवला जातो. "लाभ! लाभ!! चा गजर होतो. या कुरीन पेरणी केली जाते.
उन्हाळाभर तयार केलेली बी बियाण, जी कीड लागू नये म्हणून राखेत घालून ठेवली होती, बाहेर निघतात. पाखडून साफ करून शेतावर पाठवली जातात. साऱ्या शिवारात पेरणी सुरु होते. भात, जोंधळा, या कुरीन तर भुईमुग सोयाबीन हातांन टोकणला जातो. बांधावर वरणा, चवळी , मिरची ,अश्या हंगामी भाज्यांची टोकणनी होते.
घराच्या माग परडी सुद्धा साफ करून मांडव घातले जातात. घेवडा, पडवळ, दोडका भोपळा यांची मागच्या हंगामाच्या मडक्यात घालून ठेवलेल्या एक दोन एक दोन बिया लावल्या जातात.
कधी कधी सरीच्या मध्ये कुठ शेपू, चाकवत, अन मेथी लावली जाते. गडी माणस विरोध करतात, मुळ पिकाला त्रास होतो म्हणून! पण मग गौरीला काय दाखवायचं? असं म्हणून त्यांना गप्प केल जात.
एकदा का पेरणी झाली की बरचस कामं संपत. एक दोन वारकरी मग एखाद्या दिवशी टाळ,चिपळ्या घेवून घरातून बाहेर पडतात. एक दोघी; थोड्या मुलंबाळ मार्गाला लागलेल्या झडझडीत स्त्रिया सुद्धा डोक्यावर तुळशीच वृंदावन घेवून, भरल्या गळ्यान "रुखुमाइला तुळस दावून येते ग! ' असं गावातल्या लोकांना सांगत वारीला निघतात. ज्येष्ठात निघालेली ही मंडळी, आषाढ एकादशीला पंढरपूर गाठायच्या उद्देशान पायी चालू लागतात.
अन गावाला भजनांचे वेध लागतात. गावी तशी वर्षभर वेगवेगळ्या कारणान भजन होत असतात,पण पावसाळ्यात घरा बाहेर पडण मुश्कील! त्यामुळे सारे जण एकत्र जमून अगदी नेमान भजन होऊ लागत. पेटी, तबला वा मृदंग अन बाकी साऱ्यांच्या हातात टाळ..ते नसतील तर हलकेच वाजवलेल्या टाळ्या..गावी कोणताही आव लागत नाही तुमच्या मनातला भाव पुरेसा असतो कोणतीही गोष्ट पार पाडायला.रात्री उशिरा पर्यंत भजनाचा गजर कानावर पडत राहतो.
अशी पेरणीची धावपळ सुरु असते तोवर येते वट पौर्णिमा! आता बहुतेक सारे सण स्त्रियांचे!
वट पौर्णिमेला दुपारी सारी काम आवरून मग गावातल्या सारया जणी एकत्र जमत. बहूतेक पुरुष या दिवशी मुद्दामहून गावात न थांबता एकतर घरात बसत वा तसच डोक्यावर पोत्याच इरल घेउन शेतावर फेरी मारुन येत. मग थोड मोकळेपणान या साऱ्याजणी वडाच्या पारावर जमत. एकमेकीला तू कर, मी कर करत हळू हळू पूजा होई. सात जन्म हाच पती लाभू दे असं मनातल्या मनात म्हणत,मग त्या पारावर उखाणे घ्यायची स्पर्धा लागे. बहुतेक जणी हिरव्या रंगाचं वस्त्र लेवून असत. या त्या, त्या सणांच सौंदर्य मला त्यातल्या हळुवारपणान भावून जात.
साधारण याच वेळी येतो बेंदूर ! काय वर्णावा मी हा सण? जस जमेल तस सांगायचा प्रयत्न करेन मी.
पहिली गोष्ट बेंदराचा बाजार...एकदा पेरणी झाली की शक्यतो किंवा नाहीच ...बैलांना शेतात नेल जात नाही. एक तर जनावर पावसात भिजवायचं नाही असा अलिखित कायदा! आणि दुसर म्हणजे पेरलेल धान्य जे अजून उगवलं सुद्धा नाही ते मोडेल ! तसा आता पावसान परत बऱ्यापैकी जोर धरलेला असतो.दिवसातून निदान दोन तीनदा तरी सरी कोसळत असतात. तर बेंदूर म्हणून, आधीच जाऊन बाजारातून हळीव, डिकमल आणि तिरफळ, असा 'मसाला' खरेदी करून आणलेला असतो. उन्हाळ्यात नांगर ओढताना गळ्याला ओढ लागते म्हणून काढून ठेवलेले गळ्यातले चाळ, शिंगाच्या टोकांना लावायच्या 'शेम्ब्या' हे सार परत एकदा हात फिरवून घेतलं जात. एखादा तुटलेला घुंगरू, एखादी मोडलेली शेम्बी दुरुस्त करून आणली जाते.
बेंदराच्या आदल्या रात्री पुऱ्या घराची एकचं मेजवानी..'खिचडा' जो बैलांकरिता मुद्दामहून शिजवला जातो. आम्ही लहाण असताना हा खिचडा (यात मीठ अगदी कमी आणि बाकी काही चव नाही) खायला नाखुश असू. पण आज बैलांचा सण आहे त्यांच्या साठी जे तेच आपण खायचं असं बजावलं जाई. मग रात्री गोठ्यात जाऊन तो खिचडा बैलांसमोर ठेवून हळद आणि लोणी एकत्र करून त्या मिश्रणान बैलांचे 'खांदे चोळत'. बैलांचा खांदा म्हणजे वशिंड आणि शिंगाच्या मधला भाग. नांगर ओढून ओढून थकलेल्या त्या बैलांची , निदान थोडी तरी सेवा करावी अश्या भावनेन हे सार केल जात.
बेन्दरा दिवशी घरच्या, नव्या वाकाच्या वळलेल्या (उन्हाळ्यात डोहात बुडवुन ठेवलेल्या आंबाड्याचा वाक होतो ) बारीक दोरीत चैत्रात नव्या फुटलेल्या पिंपळाची कोवळी पान अडकवून तोरण बनविल जात. हे तोरण दाराला अन बैलांच्या गळ्यात सुद्धा मिरवल जात.
हेच तोरण घरच्या म्हैशी अन अगदी शेळ्या मेंढ्यांच्या सुद्धा गळ्यात बांधल जात.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी दोघं- तिघजन येऊन मग मसाला कुटायला सुरुवात करत. डिकमल, तिरफळ , आणि आंबेहळद अगदी बारीक कुटून चाळुन घेतली जाई.हळीव पाण्यात भिजवून ठेवली जाई. मग हे सार मिश्रण गोडेतेला बरोबर आणि अंड्यान बरोबर अगदी एक जीव केल जाई, एक एक मोठ्ठी बाटली भरून (या बाटलीला शिसा म्हणत) हे सगळ घेवून परत परड्यात! बैलांना बाहेर आणून बैलगाडी वरून दोरी टाकून हळू हळू ओढत त्याचं तोंड बैलगाडीच्या वरती पर्यंत आणत, मग एक जण वर उभा राहून ही मोठ्ठी बाटली त्यांच्या तोंडात खुपसत. त्या वेगळ्या चवीन आणि वासानं बैल आवरण मुश्कील होई. पण हे औषध पाजवल्या शिवाय ना बैलाची, ना गड्यांची, कुणाचीच सुटका नसे. तीरफळ काय करते माहित नाही पण तेल पौष्टिक, तसच अंड सुद्धा!! हळीव ही पौष्टिक म्हणूनच खातात अन डिकमल आत स्नायून मध्ये झालेली जखम वा शिरांवरचा (स्नायु?) ताण कमी करते. आंबे हळद ही सुद्धा रक्त शुद्ध करणारी म्हणून औषधी! एकूण उन्हाळा भर बैलांवर जे अतीव कष्ट पडतात, त्यावेळी चुकून माकून कुठ काही मुरगळल असेल, दुखावलं असेल तर हे मिश्रण रक्तात फिरून ते साऽर बर व्हाव असा उद्देश.
उन्हं आली की बैलांना नदीवर नेऊन धुतलं जाई. मग तिथ कुणाच्या बैलाचे 'खांदे' व्यवस्थित चोळलेत आणि कुणी कामचुकारपणा केलाय अशी चर्चा रंगे.
अगदी घासून पुसून अंग रगडून बैल साफ केले जातात. परत परड्यात आणून मग सजवायचा कामं सुरु होत. शिंगांना कुठे लाल , कुठे निळा, कधी भगवा असे रंग( oil paint ) तर अंगावर साधे रंग त्यात हात बुडवून, वा वेगवेगळे छाप वापरून लावले जातात.
घरात देव्हार्यावर ठेवायला कुंभारणीने एक मातीच्या बैलांची जोडी आधीच आणून दिलेली असते.
आज मात्र पुरण पोळीचा नैवेद्य असतो त्या मातीच्या आणि खऱ्या वृषभ रायांना.
संध्याकाळी 'कर' तोडायचा कार्यक्रम. गावाच्या वेशी जवळ, मारुतीच्या देवळाला लागून एक कमान उभारली जाते. त्या कमानीच्या मधोमध मानाचा नारळ अन शेमला बांधलेला असतो. प्रथा ही, की गल्लीच्या मध्यावरून धावत येऊन बैल आणि त्याचा पकडणारा अश्या दोघांनीही त्या कमानीच्या खाली असलेल्या माणूस भर उंच अडथळ्यावरून उडी मारायची अन त्याच वेळी जमल तर तो वर बांधलेला मानाचा नारळ शेमला पटकावयाचा!!
मग ज्या ज्या घरचा बैल कर तोडायला निघतो त्याला एखाद्या विराचा मान मिळतो.
आमच्या वाड्यात समोरच्या सोप्यामध्ये तो खिल्लारी बैल आणून उभा करायचे. कायम मोकळ्यावर वां गोठ्याची सवय असलेल ते भल मोठ्ठ जनावर बिथरलेल असायचं. फक्त त्याला हाताळणाऱ्या व्यक्तीच्या चुचकारण्यावर भरोसा ठेवत तो सोप्यात प्रवेशायचा! सारा सोपा त्याच्या आगमनान भरून जायचा. आतून आई आरती , पाण्याचा कलश अन नैवेद्याची पोळी घेऊन दारांत येत. आधीच हाताच्या मुठी एव्हढे असलेले त्याचे डोळे विस्फारून आणखी मोट्ठे होत! मोठ्यान श्वास सोडत तो मागे सरे! आता खरी सर्कस ! खाली वाकून आई त्याचे पाय धुवायच्या , मग थोड पाणी त्याच्या मस्तकी लावून त्यावर लाल भडक कुंकवाचा नाम ओढत! बाजूला उदबत्तीचा वास भरून राही. अन मग आपल्या हातांन ती पोळी त्याला चारायची. नमस्कार करायचा.
तोवर साऱ्या गावाचे बैल पोळी खावून बाहेर आलेले असत. माळावर त्यांना कस बस स्थिर ठेवलं जात असे. आणि मग एकदम एकेक बैल धावायला सुरु होई. माळावरून पळत गावातल्या मुख्य गल्लीतून वेशीकडे येताना त्यांचा वेग वाढे...बघता बघता कर ओलांडून बैल पुढे झेपावे ! तो कर ओलांडतो की नाही हे पाहायला त्या कमानी जवळ जमलेली गर्दी, बैल त्या अडथळ्या वरून वर झेपावला की मागे सरे, कारण तेव्हढा एक क्षण, बैलावर कोणाचाही ताबा नसतो. जमिनीला पाय टेकले की, तो कोठे मोहरा वळवेल याची खात्री नसते.
'कर' पार करून दम छाक झालेले दोघेही मग परत घरासमोर येत. आता त्याला सोप्यात आणायची कोणाचीच छाती होत नाही. वाड्याच्या बाहेर येवून आई त्याच्या वरून भाताचा मुटका ओवाळत आणि बैल परत मागे परड्यात आणला जाई.
का कुणासा ठाऊक पण मान त्या दिवशी उगाचच उन्नत्त राही, त्या 'आपल्या बैलाकड' पाहताना, अन मन भरून जाई त्याच्या पूजेच्या वखताला. हा असा असतो बेंदूर शेतकऱ्याचा! वर्षभर त्याच्या बरोबरीन राबणाऱ्या त्या बैलाला एक दिवस का होईना पण पुरा मान दिला जातो. तशी त्यांची निगराणी तर रोजचीच!!
आता शेतावर जाण हे फक्त पिक उगवतंय, अन कस उगवतंय? एव्हढ बघायला. चिखल चांगला गुडघाभर झालेला असतो. ज्येष्ठ सरलेला असतो अन आकाशात आता कालिदासाच्या मत्त गजांची आठवण करून देणाऱ्या , मेघांची दाटी झालेली असते. सूर्य दर्शन होण थोड दुरापास्त झालेलं! जरा उघडीप झाली, की बायका धावपळ करून पाणी भरणे, कपडे धुणे अश्या गृहकामाच्या गोष्टी पुऱ्या करायच्या माग असतात.या धावपळीत नव्या लग्नाच्या नववधुंच नवपण कधिच मोडीत निघत. बघता बघता सारी काम सूरात सुरु होतात. आषाढी एकादशी दिवशी गावातून भिजत भिजत 'नामदेव तुकाराम' च्या जय घोषात दिंडी निघते , त्या गावातल्याच वारकर्यांचे पाय, घागरी ओतून धुतले जातात. पुरा गाव उपास करतो. रात्रीच भजन हा तर अगदी नित्यनेम !
एकुण उन्हाळाभरच्या कष्टाला पावसान उजवी दिलेली थाप बळीराजाला सुखावुन गेलेली .
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 7:56 pm | रेवती
लेखन आवडले.
बेंदराचे वर्णन छानच!
1 Jun 2012 - 8:07 pm | प्रभाकर पेठकर
व्वा..व्वा...! ग्रामीण जीवनाचं, शेतकर्यांच्या भावभावनांचं, सणावारांचं बयाजवार वर्णन आणि जोडीला निसर्गाचं शब्दचित्र मन मोहवणारं आणि खरोखरच कोणालाही 'काळ्या मायची' ओढ लावणारं आहे.
मन ओतून लिहिण्याची शैली मनाला भावली. अभिनंदन.
2 Jun 2012 - 4:18 am | स्पंदना
आं !
बयाजवार्...किती दिवसान कानावर पडला हा शब्द..धन्यु प्रपेका.
1 Jun 2012 - 8:08 pm | शुचि
क्या बात है!!!
वाचनखूण साठवली आहे.
1 Jun 2012 - 8:55 pm | स्मिता.
लेख वाचून खूपच छान शांत शांत वाटलं. लिखाण तर पेठकर काकांनी म्हटल्यासारखं काळ्या मायची ओढ लावणारं आहे.
1 Jun 2012 - 10:12 pm | पैसा
अगदी दृष्ट लागण्यासारखं लिहिलंस अपर्णा! तिकडे फार आठवण येत असेल नाही या सगळ्याची?
2 Jun 2012 - 4:17 am | स्पंदना
अपरुटेड !
एव्हढा एकच शब्द पुरेल माझी अवस्था सांगायला पैसा.
गणपतीत तर मला सकाळपासुनच "तुंदिल तनु परी सकळ साजिरी" कानात घुमत असत. अन मजा म्हणजे ही गाणी घरात लाउन समाधान नाही होत. ती ऐकु आली पाहिजेत गल्लीच्या स्पिकरवरच!
काय सांगाव?
2 Jun 2012 - 4:13 am | नंदन
फार सुरेख.
2 Jun 2012 - 9:14 am | प्रचेतस
गावच्या आठवणी छान चितारल्यास.
2 Jun 2012 - 9:47 am | यकु
नुसते शब्द नाहीत हे - डोक्यावरुन हात फिरला त्यातून.
पावले.
2 Jun 2012 - 9:49 am | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस, धन्यवाद.
2 Jun 2012 - 11:07 am | jaypal
पार हळव करुन भुतकाळात नेउन ठवल. खुप छान खुपच छान
2 Jun 2012 - 11:36 am | निश
aparna akshay जी, अप्रतिम लिखाण आहे.
खरच गाव डोळ्यापुढे उभ राहील.
2 Jun 2012 - 11:38 am | अमृत
अप्रतिम झालेत दोन्ही भाग. तुम्ही आणखी गावाकडच्या आठवणी लिहाव्यात ही विनंती. तुमच्या या लेखांनी आता पावसाचे वेध जास्त तिइव्रतेनी लागलेत.
अवांतर - 'पावश्या घो' प्रमाणेच विदर्भात 'पेरते व्हा' असा पक्षी असतो. अजुन एक ते 'डीकेमाली' लहान मुलांना दात येण्याच्या वेळी हिरड्यांवर चोळतात याने त्यांचा थोड त्रास कमी होतो.
अमृत
2 Jun 2012 - 12:10 pm | श्रावण मोडक
बेळगावच्या परिसरातील खेड्यांवर नेलंस तू मला. :-)
असाच पिंगा घालत रहा. :-)
2 Jun 2012 - 3:29 pm | नाना चेंगट
सुरेख !!!!
2 Jun 2012 - 3:32 pm | sneharani
मस्त, आवडलं!
:)
2 Jun 2012 - 9:39 pm | सुहास..
काय लिहीलेस !! ज ब र द स्त !!!!
समोर असतीस तर दंडवत च घातला असता !!
गावी कोणताही आव लागत नाही तुमच्या मनातला भाव पुरेसा असतो कोणतीही गोष्ट पार पाडायला.रात्री उशिरा पर्यंत भजनाचा गजर कानावर पडत राहतो.
या एका वाक्यावरच अक्षरशः _/\_
3 Jun 2012 - 12:29 am | मुक्त विहारि
अजून लिहा....