पिंगा आठवणींचा ! (अर्थात ओढ काळ्यामायची !)-३

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
17 Jun 2012 - 4:34 pm

आता पाउस काही नवखा नसतो उरलेला . रोजच्या पागोळ्यांनी चौंगाणातले हंडे, बादल्या भरभरून वाहत असतात. पाखरांना चिमुटभर दाणे टिपायलासुद्धा उसंत नाही देत हा पाऊस! त्याच्या तडाख्यान पक्ष्यांच्या घरट्यातली उब हरवलेली.

गावंसुद्धा असाच गारठलेला! जमिनीला सुद्धा जागोजागी उमाळे फुटलेले. मग त्यावर कुठ फळ्या, कधी कडबा , असा काहीबाही तात्पुरता सुका राहणारा, उपाय केला जातो. अगदी चुलसुद्धा जरा धग कमी झाली तर विझून जाते. साठवणीच जळण आता निम्म होत आलेलं! माणस चुलीशेजारीच वावरत राहतात. गरम भाकरीबरोबर कधी सांडग्याच कधी झिंग्याच असं वाळवनीच कोरड्यास अन सोबतीला चुलीच्या निखार्‍यावर भाजलेले पापड, पापड्या एव्हढाच काय तो आहार. गारठ्यान काकडणारी पाखर अन माणस सारी एक होऊन जातात. उबेसाठी आसुसून एकमेकाच्या निवाऱ्याला जातात. दिवसा एखाद दुसरी चक्कर शेताकड मारली जाते, पण दोन ढांगांचा तो रस्ता आता बरबरीत चिखलान दोन तासांचा झालेला. नुसत चालुनच थकायला होत. शेताच्या बांधांना चिक्कार तण माजलेल. वाळलेला चारा खाऊन खाऊन अगदी जनावरांच्याहीं तोंडाची चव गेलेली. मग तसंच विळ्यान मुठभर ताजी वैरण कापून जनावरांपुढे टाकली जाते. दिवस असा कायबाय करत बिना सूर्यदर्शनाचाच मावळतो. पण रात्र कशी सरायची?

अश्यावेळी मग एकेकाच्या घरातले पार पेटार्‍याच्या तळात बासनात गुंडाळून ठेवलेले ग्रंथ बाहेर पडतात. बत्त्या उजळल्या जातात. मग कुठ 'पांडव प्रताप',' रामायण' वां असाच एखाद पौराणिक वाचन सामुदायिकरित्या सुरु होत! थोडेजण अश्या वाचनाला, तर थोडे भजनाला! घरात गोधडी शिवायच काम सुरु असत. प्रत्येक पावसाळ्याला निदान एक तरी गोधडी शिवायचीच!! 'असं काय लागतंय? एकेक टाका तर घालायचा', असे म्हणत सुरेख नक्षिच्या, सुबक गोधड्या तयार होतात. आम्ही गावी या गोधडीला 'वाकळ' म्हणतो. नदीला पूर आलेला असतो! अगदी धुण्याचे दगड नदीच्या मध्यावर बुडालेले. तस आभाळातून गळणार पाणी असताना नदीपर्यंत कोणी जात नाही विशेष! पण तरीही, नदीन कितपत काठ खागललाय? कुणाच्या शेतात कितपत पाणी घुसलय? याचा मागोवा घेतला जातो. तस प्रत्येक गृहिणीन तिच हक्काच परड अक्षयतृतियेलाच पेरलेल. आता नाही म्हंटल तरी कुठ बारीक तोंडली , हिरवे टोमाटो, घेवडा असं काही बाही घरात चव बदलाला मिळायला लागत. आता हेच परड पेरताना तिच्या घर धन्यान तिला कामाचा खोळंबा होतो म्हणून सुनावलेल. पण आता त्याच परड्यातल चवबदल खाण त्याला तिच्या शेरेबाजीत गपगुमान खाव लागत. तशीही बाकीचे नऊ महिने कमीच लाभणारी हीं बापय मंडळी या तिन महिन्यात जरा बायकांच्या निवांत वाट्याला येतात.

अन श्रावण उघडतो! महिनाभर पडणारा पाऊस थोडा कमी होतो इतकंच, पण त्यान वातावरण नाही बदलत!
आता एक गाडी निघते गावातून..कुंभारांची! परत येताना तित शाडू भरलेली असते. श्रावणाच्या सुरुवातीला गणपती घडायला सुरु होतात. कधीही त्यांच्या घरी फेरी मारली, तर एकाग्र चित्तान गजाननाच्या मूर्ती घडवणारे पांडूतात्या, अन घरच्या एका कोपरयात हळू हळु कमी होत जाणारी ती पिवळट शाडू!

तोवर येते पंचिम! घरोघरी ओल्या मातीचे नागोबा सुद्धा त्याच गोंधळात पोहोचतात. मी कध्धीच गावी रंगवलेले नागोबा नाही पहिले. बैल, नागोबा सार काळ्या चिकन मातीच घडे, पण फार सुबक! त्याला रंग लावायची गरजच नसे भासत!

आदल्या दिवशी भावाचा उपास! अगदी सक्काळी सक्काळी उठून घरातली एखाद्या भिंतीवर कोळसा, हळद अन कुंकू वापरून नागोबाच मोठ्ठ चित्र चितारल जाई. त्याला चौकटी वर नक्षि काढली जाई. भावाच्या उपासासाठी भाजणीची थालीपीठे...आम्ही त्याला 'धप्पाटे' म्हणतो. त्या बरोबर काळ्या वाटण्याची उसळ, बाजूला आता शिवारात थोडी थोडी भाजी उगवायला लागल्यान हिरव्या मिरचीचा ठेचा ...आम्ही खरडा म्हणतो...अन आवडेल तस दही वां लोणी!!

नागपंचमीला घरी ओल्या नारळाचे कानोले असत.दुपारी आई 'मोती जोंधळ्याच्या' 'लाह्या' बनवत. मग त्या लाह्या, अन थोड दुध घेऊन गावाजवळच्या वारुळाला जायचं. तिथ जाऊन सारया जणी फेर धरून एक दोन गाणी म्हणत, तसल्या चिखलातच मोठ्या बायकांकडून लटक रागावून घेत एखादी दुसरी फुगडी होई. अन परत येताना आज रात्री कुठ जमायचं? याची चर्चा होई. पंचमी पासून गौरीच्या फेरांची सुरुवात होई.

पंचमीच्या दुसऱ्या दिवशी 'श्रीयाळ षष्ठी' सकाळी सकाळी पांडू तात्या एक सुंदर काळ्या मातीची हवेली पाटावर घडवून घरी आणून देत.त्या घराच्या गच्चीवर बसून श्रीयाळ शेठ आपल्या चांगुणा राणी आणि पुत्र चिलिया ..... सह दीड दिवसाचं राज्य करे! संध्याकाळी पांडूतात्या पंगतीला असत. आई गव्हाची खीर बनवत. त्या पंगतीतच एकदा मी घराच्या अतिथीला तृप्त करण्यासाठी स्वत:चा बाळ उखळात घालून ..मला लिहिता नाही येत ..कल्पना पण नको वाटते. पण मग भगवान शंकरांनी हाक मार म्हणून सांगितल्यावर तिने दिलेल्या हाकेवर दुडु दुडू धावत येणारा तो बाळ यांची कथा ऐकली. खर तर मला काही तो घास उतरला नाही त्या दिवशी.

मग का कुणास ठाऊक पण पावसाचा जोर परत एकदा साधारण वाढे....अगदी दणका! नदीला परत थोड पाणी वाढे अन येई कालाष्टमी!

संध्याकाळ पासून घरात भजनाचा अखंड प्रवाह वाहत असे. आत मध्ये दगडी खलबत्त्यात सुंठवडा वाटला जाई. सोप्यात एक छोटेखानी पाळणा सजवून तयार असे. प्रत्येक भजनात हळू हळू कृष्णावतार उलगडत जाई. आज च्या या भजनाला थोड्या वयस्कर अश्या काक्या माम्या ही बाजूला बसत. सारी व्यवस्था आहे नाही ..काही राहिलंय याची फेर तपासणी होई. एका मोठ्या खलबत्त्यात सुंठ, वेलचीअन साखर ठेचून साधारण चाळली जाई . मग त्यात सुकलेलं खोबर किसून घालायचं, झाला सुंठवडा! बाहेर सोप्यात पेटी, तबला अन टाळांच्या सुरेल साथीत भजन रंगून जाई.

भजनाचे प्रकार ही कित्ती? कधी नामदेवांचा 'बोबडा..कधी गवळण...कधी नुसते भक्तिपूर्ण.बघता बघता बारा वाजत अन मग ती छोटीशी सुबक बाळ कृष्णाची लंगडी मूर्ती सोप्याच्या मधल्या तुळीला बांधलेल्या पाळण्यात घातली जाई.अगदी साग्रसंगीत सोपस्कार पार पाडले जात अन पुन्हा नव्यान कृष्णाच्या कानात त्याच्या आठवतील तेव्हढ्या नावांची यादी सांगितली जाई. जणू एखाद नाव बाळ जन्माव तसं हसू चेहऱ्यावर घेऊन मंडळी बाजूला बसून असत. प्रत्येकजण पाठोपाठ पाळणा झुलवत अन एक गोडसा कृष्ण जन्माचा पाळणा म्हंटला जाई. सारेजण सुंठवडा घेऊन आरतीला उभे राहत. आरती संपली की नव्या दमान भजनाला रंग चढे.

रात्रभर भजनात न्हाऊन निघालेली ही मंडळी दुसऱ्या दिवशी मात्र नव्या अवतारात दारांत उभी राहत..ताई घागर भर दही दिल तरच हलणार ..गोपाल काला हाय हा...असा हट्ट होत असे.मग आजूबाजूची ज्येष्ठ मंडळी मध्यस्ती करून थोडक्यात काम भागवल जाई. संध्याकाळी एका उंच बांबूवर हे दह्याच मटक लटकावून एक जण धावत सुटे अन बाकीचे त्याला पकडून ते मडक फोडायचा जीव खाऊन प्रयत्न करीत. एकदा का मडक फुटलं की त्या दह्या दूधा ऐवजी त्या मडक्याचे तुकडे उचलून घरी नेवून दुभत्याच्या कपाटात पुरायचे. मग घरात कधीच दुभत कमी नाही पडत!

असं कृष्ण जन्माष्टमीतून मोकळ व्हाव तोवर पंधरवड्यात हरितालिका उघडे. पांडुतात्यांच्या घरुन गंगागौरींची लाल अन हिरव वस्त्र ल्यायलेली सुबक मुर्ती सकाळीच येइ. तिला हिरव्यागार पत्रीखाली झाकुन टाकत आई तिची पुजा करत. नुसत दुध दहि तुप मध अन पाचव म्हणुन काय असेल ते फळ घालुन पंचामृत बने. कुठ खारका, जर्दाळु, एखाददुसर फळ अन मध यांचा फराळ होइ. आणि एक, त्या दिवशी हिरवी साडी नेसलेल्या आई 'अहो जरा पाय करा इकडे' म्हणुन पप्पांना नमस्कार करीत.अगदी मनावर ठसुन राह्यलय ते नमस्कार करण अन तो नमस्कार स्विकारताना पप्पांच, हवेतल्या हवेत हातान परत त्यांना नमस्कार करण!
दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी! बाहेरच्या सोप्यातली खिडकी रंगवून घेतली जाई. आत प्रसादाची तयारी ! मोदक अन खीर हे दोन्ही बने. वेगवेगळ्या पत्री जमा होत. साधारण दुपारच्या वेळी गणपती घरी येई..अन सोपा परत एकदा जिवंत होऊन उठे. माझ्या माहेरचा हा गजानन नवसाचा ...म्हणून दसर्‍याच सोन घेऊन मग जातो. त्यामुळे महिनाभर आता सोपा फक्त त्यांच्या मालकीचा.

चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी ! हा उपास काहीही बैलाच्या कष्टाच न खाता करायचा म्हणे! मग परत एकदा गावातल्या सारया जणी आपापल्या परड्यातल्या भाज्या घेऊन एकत्र जमत. अगदी चहा सुद्धा मध घालून केला जातो...हौसच भारी या सार्‍याची तेंव्हा..

षष्ठीला गौरी येत. या दिवशी आई आम्हाला ठेवणीतली एखादी साडी काढून नेसावायच्या. एकदम वेगळ वाटायचं. बाकी सार्‍या गोष्टीत "लुडबुडू नको "म्हणून दम खाणारे आम्ही, आज अगदी भावात! शेतात जाऊन फुलोरा आणायचा, मग तो घेऊन घरात येताना आई पायावर पाणी घालायच्या ..भाताचा मुटका उतरून टाकायच्या. मग ही गौर गणपतीच्या जवळच स्थानापन्न होत असे. पहिल्या दिवशी ती अशी फुलोरा रुपात असे. दुसऱ्या दिवशी तिला अंघोळीला नदीवर नेऊन घरी आणलं, की तिला अडिसरीत घालुन अन वरती एक आडवी काठी बांधुन त्यावर मुखवटा बसवला जाई, छानशी साडी नेसवली जाई. अन त्या दिवशी नदीवरून जांभळ्या फुलांचा 'शंकरोबा' पण घरी दाखल होई.

पहिल्या दिवशी गौरीची भाकरी पाट वाड्या अन पाच प्रकारच्या भाज्या. यात पण गणपतीला फळ भाज्या तर गौरीला शेपू भोपळ्याची पालेभाजी केली जाई. ही भाकरी भाऊबंदांच्या अगदी प्रत्येक घरी जाई अन तिथून आम्हालाही येई. शंकरोबा आणायची पद्धत तर मी फक्त आमच्या भागातच बघितली.. या सगळ्या गोंधळात रोज सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती असे.गौरीच्या दुसऱ्या दिवशी रात्री गौरीचे कान फुंकले जात . उलट्या परातीवर रवी आणि लाटण घासून तर्रर तर्रर आवाज काढून गौर जागृत ठेवत. सोपा भर नुसता गाण्यांचा धिंगाणा!! झिम्मा, फुगडी पिंगा. रोजच्या अगदी साध्या, थोड्याश्या प्रौढ वाटणार्‍या त्या याच बायका का? असा प्रश्न पडे मनाला!

तिसरया दिवशी सकाळी पोळ्या अन दुपारी गरम दही भाता बरोबर ( पोळीचा स्वैपाक आटपूनहोई पर्यंत गौरी बाहेर पडत, त्यामूळे नैवेद्य दाखवून जेवण झालं की , लगेच आई दुसरा भात चढवत. त्यामुळे तो दही भात गरम असे) तशीच गरम गरम परड्यातल्या अळूची अळूवडी घेऊन आम्ही गौर विसर्जनाला नदीवर जात असू. परत एकदा फेर धरले जात. अन मग नदीत गौरी विसर्जन करून, नदीच्या काठावर बसून आम्ही तो उन उनीत दही भात अन अळू वडी खात असू. जाताना म्हणे गौर पुढच्या वर्षापर्यंत फेर न धरण्याची शप्पथ घालून जात असे. का? तर आता पुन्हा शिवार माणसांच्या गजबजीन जागणार असतात. भांगलणी, विरळणी, बांधांची साफसफाई , सारी सारी काम आता नव्या दमान सुरु व्हायची असतात. त्यात उगा पोरीसारींचा पंचमी पासून अव्याहत चाललेला गाण्या- फुगड्यांचा नाद नको म्हणून!

दूरदर्शनन बाहेरच सार जग आपल्या पर्यंत आणल पण ते जग मिळवताना आपण आपल किती हरवलं याची खरच गणती नाही.
(समाप्त)

__/\__
अपर्णा

संस्कृतीराहणीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

17 Jun 2012 - 4:45 pm | श्रावण मोडक

समारोप सुरेख केलाय. :-)

मन१'s picture

17 Jun 2012 - 5:01 pm | मन१

दिवस सार्थकी लागला आजचा.

सुंदर लिहिलं आहेस, धन्यवाद.

प्रचेतस's picture

17 Jun 2012 - 6:11 pm | प्रचेतस

काळ्या मातीसारखंच कसदार लेखन.

सहज's picture

17 Jun 2012 - 6:36 pm | सहज

एकाच वेळी वेगळ्याच विश्वात नेल्यासारखे वाटले पण ते सगळे थोडेफार ओळखीचेही वाटत होते.

जबरदस्त लेखन.

jaypal's picture

17 Jun 2012 - 9:32 pm | jaypal

१०१% सहमत

पैसा's picture

17 Jun 2012 - 6:54 pm | पैसा

अपर्णा, घाटावरच्या आठवणी वाचताना मी आमच्या कोकणातल्या गावात कधी पोचले कळलंच नाही! फारच सुंदर लिहिलंस.

हे लेखनही नेहमीप्रमाणेच आवडलं.
जुनं काहीबाही आठवत राहिलं.

अमृत's picture

18 Jun 2012 - 11:05 am | अमृत

इतक्या सुंदर मालिकेचा समारोप होऊच नये अस वाटत होतं. अपर्णा ताई तुला खूप खूप धन्यवाद मस्त लेखन आणि आठवणी. १२वीत अभ्यासाला 'हादगा' म्हणून एक धडा होता लेखिकेचं नाव आठवत नाही तो वाचताना जसा आनंद मिळाला होता तसाच परत मिळाला. आणखीही आठवणी वाचायला खूप आवडेलं. तो समाप्त शब्द वाचून खरच वाईट वाटलं :-(

अवांतर : इकडे विदर्भात थोड्याफार फरकाने या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. गौरीपूजनाच्या(महालक्ष्मीपूजन) दुसर्‍या दिवशी १६ भाज्यांचा नैवद्य गौरीला दाखवीला जातो गौरी ज्या खोलीत बसविली असेल ती खोली साधारण अर्धा तासाकरीता आरतीनंत्तर पूर्णपणे बंद केली जाते व सर्व मंडळी बाहेर जातात. नंतर जेव्हा खोली उघडतात तेव्हा पत्रावळ्यांवर कुणितरी नैवद्य खाल्ल्यच्या खुणा हमखास दिसतात. अर्थात हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न पण मी स्वतः बघितल्या आहेत. तसेच दसर्‍याला घरोघरी गौरी बसविले जाते तीला 'भुलाबाई' म्हणतात(शंकरजी-पार्वती-गणपतीची मातीची मूर्ती) कोजागीरी पौर्णीमेपर्यंत रोज रात्री बायामुली जमून भुलाबाईची गाणी गातात. ही गाणी मस्त मजेशीर असतात :-). असो.

अमृत

sneharani's picture

18 Jun 2012 - 11:18 am | sneharani

सुरेख ग, एकदम सुरेख, आवडला हा पण भाग!! अगदी झकास उतरलाय!!!
:)

मराठमोळा's picture

21 Jun 2012 - 8:31 am | मराठमोळा

मस्त, सुंदर लेखन...
सगळं डोळ्यांपुढे उभं केलंत ....

आवडले. :) येऊ द्या अजुन.