सरस्वती-१

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
13 Feb 2012 - 10:43 am

सरस्वती नदी

वेदातील एक पूजनीय नदी. गंगा, सिन्धू या नद्यांपेक्षाही जास्त नावाजलेली. उगमापाशी खळाळत जाणारी, समुद्राला मिळणारी.नदीकाठच्यांना जीवन देणारी.जिचे निसर्गवर्णन करतांना ऋषींना अगदी भरून येत असे. तर ही महानदी नंतर क्षीणच झाली. हळुहळु ही समुद्राला मिळण्याऐवजी मधेच नाहीशी होऊ लागली. महाभारत काळात तर जेमतेम राजस्थानापर्यंतच दर्शन देई व तिच्या काठची तीर्थेही तितपर्यंतच ! नंतर तर ही नदी नाहीशीच झाली. हल्ली पावसाळ्यापुरती वाहणार्‍या घग्गर नदीलाच सरस्वती म्हणतात. थोडक्यात निष्कांचन झालेला चारुदत्त !

तर या वेदात वर्णन केलेल्या पण आता दर्शन न देणार्‍या नदीचे कुतुहलही क्षीण होत गेले... १९५० पर्यंत. हरप्पा-मोहिन्जदारो पाकिस्थानात गेल्यावर आपली सिन्धू संस्कृती "आपली" राहिली नाही. पण हार न मानता, पूरातत्व विभागाने सिन्धूपासून दूर राजस्थान, पंजाब, हरियाणा येथे उत्खननास सुरवात केली. साधारणत: पूर्वी संस्कृती नदीकाठीच निर्माण होत असे. इथे आता नद्या नव्हत्या पण तरीही त्यांनी चिकाटीने खणले. "आधी केलेच पाहिजे" या न्यायाने व त्याचे फळही मिळाले. ७००-८०० ठिकाणी त्याच संस्कृतीचे अवशेष मिळाले. म्हणजे सिन्धूकाठी मिळाले होते त्याच्या कितीतरी पट ! आता ही एवढी गावे काही पाण्याशिवाय वसली नाहीत, आज आपल्याला नदी दिसत नसली तरी ४००० हजार वर्षांपूर्वी नदी असलीच पाहिजे. मग आठवली वेदातली सरस्वती, जी महानद होती, मग आटली, मग लुप्त झाली. याचा लेखी पुरावा आहे.

आता तंत्रज्ञान इतके पुढारले आहे की जमिनीखाली काय आहे, मग ती नदी असो की गाव, तुम्हाला उपग्रहावरून त्याचे छायाचित्र घेता येते. आणि जमीनीखालील सरस्वतीचे उगमापासून समुद्रात विलीन होण्यापर्यंतचे छायाचित्र तुम्ही पाहू शकता. उत्खननात मिळालेली गावे ही या नदीकाठची. सिन्धू नदीकाठी मिळालेल्या गावांपेक्षा सरस्वतीकाठी मिळालेल्या गावांची संख्या काही पटींनी असल्याने खरे म्हणजे ही "सरस्वती संस्कृती". पण सिन्धूही आपली व सरस्वतीही आपलीच, तेव्हा 'सिन्धू-सरस्वती संस्कृती हे नाव जास्त योग्य. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सरस्वतीकाठची वसती ही हडप्पा-मोहेन्दजाडो याच्या आधिची आहे. हडप्पा संस्कृती शोधली गेली तेव्हा एक प्रश्न पडला होता की एवढ्या सुधारलेल्या गावांना काही तरी पूर्वपिठीका पाहिजेच; ती कोठे का मिळत नाही ? त्याचे उत्तर आता मिळाले. सरस्वती संस्कृती ही सिंधू संकृतीची आई.

ही संस्कृती नाहीशी कशी झाली ? अभारतीय, मग ते पाश्चिमात्य असोत किंवा रशिअन साम्यवादी, त्यांना प्रथम आठवण होते ती आर्यांच्या "आक्रमणा"ची. धनुष्यबाणांचा उपयोग करून, भरदार घोडदौडीने, टोळांसारखे धडकणारे, आपल्यापेक्षा जास्त सुसंस्कृत पण शस्त्रांच्या ज्ञानात कमी पडणारे जे अनार्य, त्यांची शहरे उध्वस्त करणारे, आर्य. त्यांनी इ.स.पूर्व १२-१४ व्या शतकात हरप्पा संस्कृती नाहीशी केली. ह्या विचारसरणीत बरेच दोष आढळतात. एखाद्या वस्तीवर आक्रमण झाले,अवर्षणाचा त्रास झाला तर विस्कटलेली वस्ती काही दिवसांनी परत वसते. उत्खननात बर्‍याच वेळी एकाखाली एक स्तर असलेली गावे आढळतात कारण परांगदा झालेली माणसे परत येतात व गाडल्या गेलेल्या वस्तीवर दुसरी वस्ती उभारतात. दोन-तीन पिढ्या गेल्या तरी लोक परततात. वसतीयोग्य जागा व पूर्वजांच्या वसतीची ओढ परत खेचून आणते. पण हरप्पा येथे असे काही आढलून येत नाही. ना कत्तलीच्या खुणा ना मोडतोड केलेल्या वास्तू. या उलट तापमान वाढणे, पाणी दुर्मिळ होणे, वालुकामय रणाचे आक्रमण होणे, अशा नैसर्गिक कारणांनी वस्ती उठली तर ती कायमची उठते. परत जाण्यासारखे काही उरलेलेच नसते. सरस्वती संस्कृतीचे असेच घडले. जसजसे पाणी कमीकमी होऊ लागले तसतसे एकएक गाव नाहिसे होऊ लागले. सरस्वती गेली, नदीकाठची संस्कृती गेली.

तरीही आर्यांनी इ.स.पूर्व १२-१४ व्या शतकात भारतात आक्रमण केले का ? तसेही दिसत नाही. महानदाचे वर्णन करणारे इ.स.पूर्व ४००० मधील वेदकालीन आर्य, इ.स.पूर्व ३००० मध्ये ती आटत आहे सांगणारे महाभारतकालीन आर्य, हिंदुस्थानातच होते. उलट महाभारतात बाहेरून (पश्चिमेकडून) येणार्‍या अनार्यांचा,शकादीकांचा उल्लेख आहे. अर्थात त्यांनीही संस्कृती नष्ट केली नाही हे खरेच. हे झाले संस्कृतीचे.

नदीचे काय ? ती तर चित्तरकथा (Fantastic story) आहे. पुढचा भाग देत आहे तो थोडा धुसर आहे. मतमतांतरे आहेत. पण एक ध्यानात घेण्याची गरज आहे की १९५० नंतर पूरातत्वशास्त्रात नविन ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीत प्रचंड फरक पडला आहे. आज अंदाज करत बसावे लागत नाही. प्रत्यक्ष पुरावे पहाता येतात. पूर्वसूरींची मते, ते प्रकांड पंडित होते या बद्द्दल आदर बाळगूनही, तपासून घेऊन त्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. मी पुढे संदर्भ देणार आहेच. व हे संदर्भ डॉ. वर्तक वा .वि.हिं.प. यांचे नाहीत. देणारे सगळे उच्चविद्याभूषित शास्त्रज्ञ आहेत. जर कोणाला मतभेद वर्तवावयाचे असतील तर संदर्भ त्या तोलाचे देणे उचित ठरेल. असो.

तर ही सरस्वती हिमालयातील हिमनगांपासून पाणी मिळवत होती व धोंधों वहात सिंधूसागराला (Arabian sea) मिळत होती. सरस्वतीला सतलज व यमुना या नद्या मिळत होत्या. पण तापमानातील बदल व धरणीचा उद्वेग यांनी उलटापालट झाली. हिमनगाचा प्रचंड स्रोत नाहिसा झाला. जमिनीचा उंचसखलपणा बदलल्याने सतलज पश्चिमेला वळून सिंधूला मिळू लागली व यमुना पूर्वाभिमुखी होऊन गंगेला मिळू लागली. स्वत:चे कमी झालेले पाणी व दोन मुख्य उपनद्यांनी फिरवलेली पाठ यांनी सरसवती रोडावत गेली. पूर्वी राजस्थानात हिरवीगार झाडी होती, तपमान सौम्य होते, सरस्वतीला मिळणार्‍या लहानसहान नद्या,ओढे-झरे होते; त्या ठिकाणी आता वाढते तपमान, रखरखीत वाळवंट व सुकलेल्या नद्या, नाहिसे झालेले झरे, तलाव दिसू लागले. ठरावीकपेक्षा संख्या कमी झाली तर पशू-पक्षांच्या जाती नाहिश्या होतात. तसे सरस्वतीचे झाले. पुण्यश्लोक सप्तसरितांपैकी एक भूतलावरून दिसेनाशी झाली. मनाची समजूत करून घ्यावयाची की प्रयागला गंगा-यमुना संगमात ती अदृष्यपणे अजूनही भेटते.
एक लेख किती मोठा असावा याला बंधन असल्याने आज इथेच थांबू. पुढील भागात नकाशे, इतर मते व त्यांचे खंडन वगैरे माहिती घेऊ.

शरद

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

13 Feb 2012 - 11:21 am | तुषार काळभोर

लिखाणशैली आकर्षक व तितकीच सोपी भाषा. क्लिष्टता टाळल्याने सर्वांना रस घेता येईल.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

अप्रतिम लिखाण.
सरस्वतीबरोबरच प्राचीन इतिहासाचीही सफर छान घडवलीत.
पुभाप्र.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Feb 2012 - 11:39 am | मिसळलेला काव्यप्रेमी

ओघवते व अभ्यासपूर्ण लिखाण.
वाचतो आहे, पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

अन्या दातार's picture

13 Feb 2012 - 12:04 pm | अन्या दातार

छान सुरुवात. लवकर येउदेत पुढचे भाग.

Maharani's picture

13 Feb 2012 - 1:18 pm | Maharani

खुपच छान!! सध्या Shiva triology वाचत आहे त्यात या नदीचा उल्लेख आहे...गोष्ट काल्पनिक असली तरी बरेचसे संदर्भ हे वास्तवातून आलेले आहेत.त्यातही सरस्वती हळु हळु लुप्त होत असल्याचा उल्लेख आहे...त्या मुळे तुमचा लेख वाचताना मजा आली....सिन्धू संस्कृती आणि indus valley civilization या एकच आहेत का ?? या बाबतीत अजुन माहिती हवी असल्यास कुठली website महितीपुर्ण आहे?? किंवा कुठली पुस्तके आहेत??

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2012 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढे वाचायला उत्सुक!

रणजित चितळे's picture

13 Feb 2012 - 2:09 pm | रणजित चितळे

आपला लेख नेहमी सारखाच छान. पुढे वाट पाहात आहे.

वाचतोय. लवकर टाका पुढचा भाग!! :)

राघव

डॉ.श्रीराम दिवटे's picture

13 Feb 2012 - 4:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे

उत्तम.
पुढील भाग वाचनाची उत्सुकता वाढली आहे.

बर्‍याच शंकांचे निरसन झाले आहे... पुढील भाग वाचण्यास उत्सुक...

स्वाती२'s picture

13 Feb 2012 - 6:38 pm | स्वाती२

माहितीपूर्ण लेख आवडला!

परिकथेतील राजकुमार's picture

13 Feb 2012 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार

पुन्हा एकदा छान लेखमाला.

पुभाप्र.

पैसा's picture

13 Feb 2012 - 10:45 pm | पैसा

पुढे आणखी असेच लेख वाचायला मिळतील याची खात्री आहे!

सूड's picture

14 Feb 2012 - 10:17 am | सूड

पुभाप्र

तिता's picture

16 Feb 2012 - 5:00 pm | तिता

छान विशय आहे

मन१'s picture

19 Feb 2012 - 11:12 am | मन१

मस्तच. पण ही फक्त प्रस्तावना वाटली. अधिक विस्तृत माहिती येत जाइल ही अपेक्षा.
सरस्वतीबद्द्ल राजस्थानशिवाय इतरत्रचेही दावे ऐकून आहे.
बादवे, गुजरात्-राजस्थान पट्ट्यातील लोथल हे सरस्वतीच्या कथित प्रवाहाजवळच येते का?
येत असेल तर तिथल्या उत्खनाने राजस्थान्-सरस्वती दाव्याअस पुष्टीच मिळते.