सरस्वती -३

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
25 Feb 2012 - 5:16 pm

सरस्वती-३
आज या शेवटच्या भागात आपण सरस्वतीसंदर्भात सर्वसाधारण माहिती घेणार आहोत. पूर्वी पेक्षा एक मोठा फरक असा दिसतो की केवळ भाषा,इतिहास, धर्म अशा विषयातील तज्ञांबरोबर भूगर्भशास्त्र,अंतरालविज्ञान , रसायनशास्त्र , जीवशास्त्र या सारख्या अत्याधुनिक शास्त्रातील वैज्ञानिक या विषयात रस घेऊ लागले आहेत. खरे म्हणजे या लोकांचे योगदानच जास्त महत्वाचे व प्रत्यक्ष पुरावे देणारे असल्याने जास्त विश्वासार्ह्य आहे. आता "स" चा "ह" होतो म्हणून सरस्वतीला भारताबाहेर नेण्याची गरज उरली नाही.( तशी पूर्वीही नव्हती म्हणा. इराणमध्ये "स" चा "ह" होत असेलही, पण तसा तो मेवारमधील मारवाडीतही होतो !) जमिनीखालील नदीचा मार्गच ते दाखवतात. असो. पुढील माहिती निरनिराळ्या टप्प्यात आहे. एकामेकांशी थेट संबंध नाही. मात्र वेगळेवेगळी शास्त्रे आपला वाटा कसा उचलतात ते पहाण्यासारखे आहे.

(१) इ.स.पूर्व १०,००० वर्षात काय काय घडले ?

इ.स.पूर्व. ! ० गंगा-यमुनेच्या काठावर गुप्त-मौर्य साम्राज्ये, बुद्ध-जैन धर्मांचा प्रसार, मोठी नगरे
! १००० लोह युग , हवामान आजच्यासारखे, सरस्वती नाहिशी झालेली.
! २००० आर्य पूर्वेकडे पसरले, उ.प्रदेश, बिहार (मगधे, कुरू, पांचाल) ,दक्षिणेकडे कोंकण
कोरडी हवा, मोठा दुष्काळ, सिन्धू संस्कृतीचा लोप.
! ३००० सिन्धू संस्कृती, लिपींना सुरवात, शेती व मोठी नगरे, सरस्वती कोरडी होऊ लागली.
आर्य सिन्धूकडे वळले.यमुना-सतलजने सरस्वतीची संगत सोडली.
! ४००० आर्द्र हवामान संपून कोरड्या हवामानाला सुरवात.
! ५००० आर्द्र हवामान, उदंड ताजे पाणी, तुडुंब भरलेली मोठी सरोवरे. वैदिक संस्कृतीची सुरवात व
भरभराट
! ६००० सरस्वती व तिच्या उपनद्यांचा वैभवाचा काळ. खेडेगावे वसली. शेती व गाई-घोडे इ.
जनावरे पाळण्यास सुरवात.
! ७००० हिमालयातील हिमनद्या वितळण्यास सुरवात. सप्तसरितांचा प्रचंड जलौघ. सरस्वती
त्यांतील सर्वात मोठी.
! ८००० पाऊस वाढला, समुद्राची पातळी वाढली.
! ९००० भारतात वन्य जमाती, शिकारी. (अश्म युगाचा शेवट ?)
! १०००० हिमयुगाचा अंत.

(२) सप्तसरितांची सुरवात

हिमालयातील गोठलेल्या हिमनद्या तापमान वाढू लगल्यावर वितळू लागल्या. ही प्रक्रिया फार झपाट्याने वाढली. पाणी पठारावर धोंधों वाहू लागले. स्वत:चे पाणी व उपनद्यांचे मिळणारे पाणी यांनी सरस्वती महानद झाली. किती नद्यांचे पात्र ६-८ किलोमीटर रुंद असते ? पण सगळेच आलबेल होते असेही दिसत नाही. हिमालय पहिल्यापासून अस्थीरच. आज आपण तेथे दरडी कोसळण्याच्या बातम्या वाचतो. तेव्हाही तसेच होत होते. एखाद्या नदीच्या पात्रात अशी दरड कोसळी तर तर तो एक बंधारा किंवा धरण होई व खालील वाहणारे पाणी बंद होई. वेदात इन्द्राची प्रार्थना केली आहे, " तू धरणे फोडून आम्हाला पाणी देतोस." प्रथम वाचतांना या क्रूरकर्मा इन्द्राची प्रार्थना का करावयाची कळत नसे. उलट आक्रमक आर्यांनी अनार्यांनी बांधलेली धरणे फोडून त्यांचा विध्वंस केला अशीच कल्पना केली गेली. आज असे नैसर्गिक बंधारे फोडून खाली कोरड्या झालेल्या नदीच्या काठच्या लोकांना पाणी परत मिळू लागले म्हणून ते आभार मानत आहेत हे लक्षात येते.
( काही हजार वर्षांपूर्वी हवामान आर्द्र होते , ते कोरडे झाले हे कसे ठरवले ? भूमिगत पाण्याचा साठा सापडला, त्याचे आयुष्य ठरवले ; मग पाण्याची तपासणी केली; त्यात फुलांचे पराग मोजले. त्यावेळी कोरडी हवा असेल तर आजूबाजूला झाडे कमी; पराग कमी. ओल्या हवामानात झाडे जास्त, परागही जास्त. राजस्थानात असे संशोधन केले गेले आहे. जैसलमेरला आज ५०० एम.एम. पाऊस पडतो. ८०० वर्षांपूर्वी दुप्पट पडत होता हे ठरवता आले.)

(३) सरस्वतीचे बदलते पात्र

पंजाब-राजस्थान-गुजराथ हा तसा सपाट प्रदेश.धोंधों वहाणारे पाणी नदीचे पात्र केव्हाही बदलत असे. सरस्वतीचे अशी ५-६ भूमिगत पात्रे आढळून आली आहेत. "कोलॅरॅडो" नदीने वहात वहात खोल "ग्रॅन्ड कॅनिअन" तयार केला तसे प. भारतात झालेच नाही. पण लांब कशास जावयाचे ? प. महाराष्ट्रात बारा मावळे आहेत. एक खोर्‍यातून एक नदी वहाते. आन्द्रा नदी वहाते ते आन्द्र मावळ. आता आन्द्रा नदी दोन डोंगरातून वहात असल्याने तिला मार्ग बदलायाला जागाच नाही. पण बिहारमध्ये तसे नाही. नद्या पात्र बदलतात.

(४) भुकंपाचे प्रताप

भुकंपाने जमीनीची उंची बदलते. मागील शतकातील एका भुकंपाने गुजराथ-राजस्थानात काही ठिकाणी उंची ५-१० मीटर बदलली. यमुना-सतलजची पात्रे बदलावयास हे पुरेसे होते. हिमालयातून नदीला मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणात बदलते. कारण आज मिळणार्‍या ओढ्याचे पाणी उद्या मिळेलच असे नाही. आज यमुनेत येणारे पाणी ५००० वर्षांपूर्वी तेवढेच होते असे नाही. या भुकंपांबरोबर ज्वालामुखीही जागृत होते. आज हिमालयात कित्येक ठिकाणी गरम, अगदी उकळत्या, पाण्याचे झरे मिळतात.

(५) समुद्राची वाढलेली उंची

समुद्राच्या वाढलेल्या पातळीने सरस्वतीच्या बंदरांचा नाश झाला. त्याच वेळी कोकणातही हा प्रलय घडला.
आज समुद्रकिनार्‍या जवळील टेकडीवर शंख-शिंपल्यांचे थर आढळतात. पाणी वर चढले, नंतर ओसरलेही. पण मागे खुणा ठेवून गेले.

(६) वेदातील सरस्वतीचे उल्लेख

तशी सूक्ते अनेक आहेत; त्यात सरस्वती नदी व देवता या दोन्ही रूपात दिसते. आपण आज दोन-तीन बघू.

(अ) ... पावित्र्य पसरवणारी, समृद्ध, कर्तव्यघन, सत्यप्रेरक, मनुष्यांच्या बुद्धीला दीप्तिमान करून दृतगती देणारी वाग्देवी सरस्वती अन्नद्वारा आमचे स्तौत देवांपर्यंत नेवो. १.३.
(ब) सरस्वतीसूक्त .... हत्ती ज्याप्रमाणे कमळ उपटतो त्याप्रमाणे आपल्या प्रभावी लाटांच्या प्रवाहाने तूं पर्वत एखाद्या लहानश्या खड्याप्रमाणे उखडून टाकलेस. देवनिंदकांना तू पळवून लावलेस. सृष्टीचें राज्य स्वाधीन केलेस. स्तोत्ररक्षक, सुवर्णरथचक्रयुक्त, तेजस्वी जलधारांनी निनादत जाणारी, सामार्थ्यवान, उदकसंपन्न,सप्त नद्यांची भगिनी, त्रैलोक्यगामिनी,संपत्तिदात्री आणि दारिद्र्यनाशक सरस्वती देवतेतूं आम्हा भक्तांचे रक्षण कर. अमची धान्ये उत्तमप्रकारे उत्पन्न कर, आमची मलिनता काढून टाक आणि आम्हाला सदैव तुझा आश्रय लाभेल असे कर. ६.६१
(क) .. लोखंडाच्या भिन्तीप्रमाणे सर्वाधार,रथात बसलेल्या वीराप्रमाणे दृतगामी आणि उदकाने समृद्ध झालेली प्रवाहशील सरस्वती नदी इतरांना मागे टाकून पुढे जात आहे. पर्वतातून उगम पावणार्‍या, समुद्राला मिळणार्‍या आणि संपत्तीवान सरस्वती नदीने तृषार्त नाहुश राजाला दूध आणि तूप यांनी तृप्त केले. भल्तांनी प्रशंसा केलेली,धनदायी आणि भाग्यवती सरस्वती आमची स्तोत्रे श्रवण करो. वृक्षछायेप्रमाणे शीतलता प्रदान करणारी, शुभ आणि शुभ्र वस्त्रे धारण केलेली सरस्वती नदी आमचे कल्याण करो.ज्ञानमयी, महामती, देवप्रिय, सरलगामी, अन्नप्रदायिनी, शुभ्रवर्णा आणि कल्याणमयी सरस्वती देवते, तूं तुझी कृपादृष्टीआमच्याकडे वळव आणि आम्हास भरपूर धन दे. ७.९५-९६.

(६) संदर्भ :

जालावर भरपूर माहिती मिळते. आपण अवश्य वाचा. मी आज एकच संदर्भ देत आहे. Memoir 42.
Vedic sarasvati Evolutionary History of a Lost River of Northwestern India. Geological Society of India. Bangalore. नावावरून घाबरू नका. देशातील निरनिराळ्या भागातील, वेगवेगळ्या ज्ञानशाखेतील विद्वान शास्त्रज्ञांनी लिहलेले ३०-३५ निबंध यात वाचावयास मिळतात. माझे मित्र डॉ. रमेश आठवले यांच्याकडे हे पुस्तक वाचावयास मिळाले. इति अलम् !

शरद

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2012 - 5:49 pm | पैसा

याही लेखात प्रचंड माहिती आहे. एक साधी गोष्ट आहे, सुरुवातीच्या काळात आर्यांनी उषा, सूर्य्, वारा अशा निसर्गातल्या दृश्यांना आणि शक्तींना देवतास्वरूप मानलं. द्रविडांनीही नाग, वारुळे, लिंग अशा नैसर्गिक गोष्टींना देव मानलं होतं. त्या अर्थी सरस्वती नदी प्रत्यक्षात असलीच पाहिजे. निव्वळ कल्पनेतल्या नदीला कोणी त्या काळात पूजनीय देव म्हणेल याची शक्यता वाटत नाही. राजस्थान गुजरातच्या भल्यासाठी फक्त आता या नदीला परत आणणं शक्य आहे का याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी एखाद्या भगीरथाची आवश्यकता आहे.

प्रचेतस's picture

25 Feb 2012 - 5:50 pm | प्रचेतस

लेखमाला अत्यंत आवडलीय.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

26 Feb 2012 - 11:08 am | डॉ.श्रीराम दिवटे

तीनही लेख उत्तम माहितीपूर्ण होते. पुलेशु

उत्तम माहितीपूर्ण लेख!