सरस्वती-२
तर काय सांगत होतो, हे संशोधन नंतरचे. प्रथम समोर होता ऋग्वेद व त्यातील सरस्वती. आता उल्लेख आहे व त्याला जुळेशी नदी तर नाही, काय करावयाचे ? जरा बाहेर शोधल्यावर लक्षात आले की अवेस्थातही तशा एका नदीचा उल्लेख आहे . उच्चारही Harahvati . संस्कृतमधील "स" चा अवेस्थात "ह" होतो: म्हणजे तीही सरस्वती अफगाणीस्थानात एक हेलमंड नावाची नदी आहे. तेव्हा या नद्या (वा यातील एक म्हणा) म्हणजेच सरस्वती असे समजले गेले. या नद्या भारताबाहेर, पश्चिमेला, तेव्हा ऋग्वेदच भारताबाहेर लिहला गेला, इथपर्यंत हे ताणले गेले. या नद्या व ऋग्वेदातील सरस्वतीचे वर्णन फारसे जुळत नाही याकडेही दुर्लक्ष केले गेले. नंतर मात्र उपग्रहातून काढलेली छायाचित्रेच मिळाली. त्यात चक्क जमीनीखालील हिमालयातील उगमापासून थेट कच्छमध्ये समुद्राला मिळणार्या सरस्वतीचे पात्रच दिसत होते. वेदांत-महाभारतात वर्णन केलेल्या सरस्वतीचे ! सतलज कोठे मिळत होती, यमुना कोठे मिळत होती ...सगळे प्रत्यक्ष पहाता येत होते. आता हरियाणा-पंजाब-राजस्थान या ठिकाणी उत्खननात सापडलेली गावे, आज आसपास नदी नसतांनाही, तेथे का वसली गेली याचाही उलगडा झाला. हा सर्व भाग सुजलाम् सुफलाम् होता. नदीच्या मुखाशी मोठे बंदर होते. मोठे म्हणजे किती मोठे ? तेथला धक्का ३००-४०० फूट लांब होता. गुजराथमध्ये आज तुम्ही तो पाहू शकता.
सरस्वती एक महानदी होती. महा म्हणजे किती महा ? काही ठिकाणी तिचे पात्र ६ किलोमीटरपेक्षा जास्त रुंद होते. तिच्या उपनद्यात होत्या यमुना व सतलज. या तीनही नद्यांना पाणी मिळत होते हिमालयातील हिमनद्यांचे. पूर्वी ह्या हिमनद्या अजस्त्र सापांसारखे हळुहळु खाली येत. पण नंतर तापमान वाढले. बर्फ वेगाने वितळू लागले. पाणी धोंधों वाहू लागले. ऋग्वेदात याचे रम्य वर्णन केले आहे. ऋषी म्हणतात " इन्द्रा, या अहींचा (सर्पांचा) नाश करून तू आम्हाला पाणी सोडत आहेस." या जलमार्गाचा व्यापाराकरिता उपयोग केला जात होता. गुजराथमधील बंदरातून आयात-निर्यात जोरात होती. सगळे सुखात चालले होते.... काही दिवस.
नंतर दिवस बदलले. भूगर्भातील हालचालींनी नद्यांचे प्रवाह पहिले मार्ग सोडून भलतीकडेच वाहू लागले. पूर्वेला वळून सरस्वतीला मिळणारी सतलज पश्चीमवाहिनी होऊन सिन्धूला मिळाली. यमुनेने आपले दोन भाग केले. एक पूर्वीप्रमाणे सरस्वतीला मिळत राहिला व दुसरा पूर्वाभिमुख होऊन गंगेला साथ देऊ लागला. नंतर सरस्वतीला मिळणारा पाट पूर्णपणे बंद होऊन यमुना आजसारखी फक्त गंगेलाच मिळू लागली. हिमनद्यांचा स्त्रोतही कमी झाला. सरस्वती रोड होऊ लागली.प्रथम परिणाम दिसू लागला तो मुखापाशी. त्यात आणखी एक मोठा झटका बंदराला बसला. सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळी भयानक रीतीने वाढली व बंदर पूर्णणे उध्वस्त झाले.हिमालयातील ज्वालामुखीच्या उद्वेगाला साहित्यात वडवानल म्हटले आहे.तर ज्या कोसळलेल्या पर्वतांमुळे सरस्वतीचे पाणी कमी झाले त्याला कार्तिकेयाने बाणासुराचा वध करण्यासाठी बाणासुराचे वास्तव असलेला पर्वत फोडला असे म्हटले आहे.मानवाने स्वत:चे डोळ्याने या घटना पाहिल्या व काव्यात त्याचे वर्णन केले.
पाणी कमीकमी होऊ लागल्यावर प्रथम कच्छमधील गावे लोकांनी सोडली व ते हळुहळु उत्तरेकडे नदीच्या उगमाकडे वाटचाल करू लागले. गुजराथ-राजस्थान-पंजाब ... किती फिरणार ? सरस्वती नाहिशीच झाल्यावर लोक पूर्वेकडे गंगेकडे वळले. आता सरस्वतीचा मान गंगेला मिळू लागला. तरीही सरस्वतीची आंस मनातून नाहिशी झाली नाही. त्यांनी गगा-यमुनेच्या संगमात सरस्वतीला स्थान दिले. ती अदृश्यपणे का होईना तेथे आहेच व हा "त्रिवेणी" संगम आहे असे म्हणून आपल्या लोकमातेची आठवण कायमस्वरूपी करून ठेवली. आजही उत्खननात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाल तसतशी गावांची संख्या वाढलेली दिसेल.
आज आपण ह.मो. येथील उत्खनात सापडलेल्या गावाबद्दल फक्त दोन गोष्टींची नोंद घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळी भारतात साम्राज्य नव्हते-सम्राट नव्हता. त्यामुळे विशाल राजप्रासाद किंवा सम्राटचे पुतळेही नव्हते. होती आमजनतेची समृद्धी. आक्रमणाचे भय नसल्याने उंच तटबंदीची गरजच नव्हती.तटबंदी लागली तर पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यापुरती. दुसरी म्हणजे त्यात सापडलेल्या काही वस्तु लिंगपूजा, मूर्तीपुजा यांची सुरवात झाली असावी असे दर्शवितात. म्हणजे वेदिक परंपरेचा तो एक हिस्सा होता.
उत्खनात गवसलेल्या गावांचे तीन भाग पडतात. सर्वात प्राचिन ज्या वेळी मानवाने स्थाईक राहून शेतीला सुरवात केली ती.इ.स.६००० पूर्वीची. ती पश्चिमेला पार अफगाणीस्थान्पर्यंत पसरलेली होती. नंतरची सरस्वतीच्या काठाची. काळ इ.स.पूर्व ६००० ते ३०००. शेवटची सिन्धूच्या खोर्यातली इ.स.पूर्व ३००० ते १५००.
नंतर महत्व प्राप्त झाले गंगा-यमुना काठाला.
आजच्या भागात आपण दोन नकाशे आणि एक सारिणी बघणार आहोत. पहिल्या नकाशात एकाच वेळी सरस्वतीचे वेदकालिन पात्र व आज प्रत्यक्षात वाहणार्या नद्या बघा. काही भाग पाकिस्थानात गेला आहे. सिन्धू आणि सरस्वती कशा समांतर वहात होत्या बघण्यासारखे आहे. दुसर्या नकाशात उत्खनाच्या जागा आहेत.काही जागा तर सरस्वतीपासून बर्याच दूर आहेत. तरीही संस्कृती एकच. नाईल नदीच्या संस्कृतीला इजिप्त संस्कृती म्हणतात ; त्यामध्ये बरीच गावे नाईल नदीपासून अंतरावर आहेत, तसे. सारिणीत पश्चिम भारतातील भूकंपांची नोंद आहे. त्यावरून सरस्वतीच्या इतिहासातील महत्वाचे टप्पे लक्षात येतात.
भूकंपाने जमीन उचलली जाते किंवा दबली जाऊ शकते. सिन्धूच्या मुखापासची काही बंदरे आज समुद्रापासून ३०-४० किलोमीटर आत आहेत. म्हणजे इतका प्रदेश वर आला व समुद्र मागे हटला. द्वारका समुद्रात बुडालेली आज दिसते म्हणजे समुद्राने तेथे आक्रमण केले व जमीन गिळली. इतिहासातील भुकंपांचे काळ अंदाजाने ठरवता येतात. मिळालेल्या १२ नोंदीतील सरस्वतीशी संबंधित काही पुढीलप्रमाणे :
क्र, जागा काळ
१. यमुनेने सरस्वतीला सोडले इ.स.पूर्व ३१००
२. ढोलविरा बंदर (बंदर उध्वस्त) " " २७००
३. सतलजने सरस्वतीला सोडले " " २५००
४. द्वारका बुडाली " " १६००
पुढील शेवटच्या भागात इतर माहिती व संदर्भ.
शरद
प्रतिक्रिया
15 Feb 2012 - 12:32 pm | प्रचेतस
हाही भाग सुरेखच आणि माहितीपूर्ण.
15 Feb 2012 - 12:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे.
15 Feb 2012 - 2:17 pm | प्रास
अभ्यासपूर्ण आणि तितकंच वाचनीय लिखाण!
आधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल.
पुभाप्र
15 Feb 2012 - 2:41 pm | वपाडाव
मस्त अभ्यासु लेखमाला...
15 Feb 2012 - 3:25 pm | यकु
इंट्रेस्टिंग आणि अभ्यासपूर्ण हेवेसांनल
कृपया वेळात वेळ काढून पुढचे भाग मोठे लिहावेत.
पु.भा.प्र.
15 Feb 2012 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार
ज्ञानात भर पडते आहे आणि उत्सुकता वाढत चालली आहे.
15 Feb 2012 - 8:27 pm | आदिजोशी
+१०००००००००००००००००००
15 Feb 2012 - 3:38 pm | असुर
हा लेखही पहिल्या लेखाप्रमाणेच वाचनीय!
आता अभ्यासाला सुरुवात केली पाहीजे. :-)
--असुर
15 Feb 2012 - 7:47 pm | धनंजय
हीबाबत चर्चा पूर्वी झालेली आहे. (हेलमंदास जुळणारी सर्वात मोठी नदी अर्गंदब. ही जुनी हरह्वती.)
चर्चा करून-न-करून काही फायदा नाही. असो.
15 Feb 2012 - 7:58 pm | पैसा
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
16 Feb 2012 - 3:52 am | रामपुरी
आवडला
16 Feb 2012 - 6:57 pm | स्मिता.
हा ही भाग आवडला. नवीन महिती मिळतेय.