नाथा अन बाकीचे चार जण केगांव पासुन निघाले, तिथुन बार्शी रोडला येउन ते मधल्या रस्त्यानं तामलवाडीला आले, तिथं बाउंड्रीच्या हॉटेलजवळ गाडीत अजुन थोडी भाजी भरुन घेतली, पुढं जाउन एकाआडवाटेला अंधारात थांबुन दोघांनी गाडीच्या नंबरप्लेट बदलल्या, समोरचे शो चे लाईट काढुन टाकले, आणि लटकणारा हनुमान, डॅशबोर्डावरचा गणपती काढुन ठेवला. त्या दोघांपैकी एकजण अंधारातच चालत पुन्हा सोलापुरच्या दिशेनं यायला निघाला. मध्ये एका बाजुच्या शेतात जाउन त्यानं दोन्ही नंबर प्लेटवर बरोबरच्या बाटलीतलं थिनर टाकलं अन दोन्ही प्लेट जमेल तेवढ्या स्वच्छ केल्या, द्गडानं वेड्यावाकड्या केल्या, एक तिथंच मातीत पुरली अन दुसरी पुढं चालत येउन एका वाहणा-या नाल्यात भिरकावुन दिली.
टेम्पो सुसाट पुढं निघाला,पहाटे पर्यंत लातुर - औसा रोडवर असलेल्या एका मठात पोहोचायचं होतं, पण त्याआधी बरोबर घेतलेली भाजी उस्मानाबाद मार्केटला टाकुन तिथं पोहोचायचं होतं. आता हा मठ या चार जणांचा पुढचा दोन महिने सांभाळ करणार होता. रात्री तुळजापुरनंतर एका ठिकाणी जेवायला थांबले होते तिथं फार कुणीच बोललं नाही, एखाद्याचा जीव घेउन नुसतं वावरणंच खरंतर अवघड असतं आणि इथंतर चार तासातच सगळे एकत्र बसुन जेवण करत होते, किंवा जेवण्याचा प्रयत्न करत होते, समोर आलेल्या तंदुरी चिकनच्या जागी वेगळंच काही दिसत होतं. नाथा ओरडला ' अबे बारक्या, हिरवी भाजी नाय का काय, त्ये घेउन ये काय वातड झालंय हे चिकन ' खरंतर हे बोलताना त्याच्या डोक्यात काल पोत्यात बांधताना आनंदच्या पायाला आलेला वातडपणा होता. आनंदला पाणी पाजुन निघतानाच त्याच्या लक्षात आलं होतं की हा टिकणार नाही, प्रशाच्या गोठ्यातच त्याच्या पँटवर मुंग्या चढताना त्यानं पाहिल्या होत्या. तेवढ्यात वेटरनं पालक पनीर आणुन दिलं, त्याला गार झालेल्या रोट्या बदलुन द्यायला सांगितल्या. अजुन दोन तासाचा प्रवास बाकी होता.
अप्पा बराच वेळ फोन लावत होते, पण तो स्विअ ऑफ येत होता. मग कंटाळुन ते घरी आले. घरी बाकी सगळ्यांनी जेवुन घेतलेलं होतं. सुनेनं आणुन दिलेलं दुध पिताना अप्पा गप्पच होते. सुनेनं त्यांच्या उशा आणि पांघरुणं आणुन दिली तसे अप्पा झोपायच्या तयारीला लागले. झोपेचं सोंग घेतलं अन पडुन राहिले. यावेळी जाधव घराच्या गच्चीवर बसुन दोन घोट व्हिस्की आणि तांब्याभर पाणी घेउन बसले होते. त्यांना घरुन पाणी हवं तेवढं मिळायचं पण व्हिस्की मात्र दररोज दोन घोटच आणि बरोबर मोजुन पाच काजु आणि अर्धी वाटी शेंगा टरफलासहित. आज त्यांचं जिगसॉ पुर्ण होत आलं होतं. फक्त एकच तुकडा बसत नव्हता, म्हणजे त्याचा आकारच होता गोल, त्या जिगसॉतली जागा पण होती गोलच पण तो तुकडा कसा ही फिरवुन बसवला तरी चित्र पुर्ण होत नव्हतं, प्रत्येक वेळी एक वेगळाच अर्थ दाखवत होतं. दोन घोट व्हिस्किनं रोज किमान लांबच्या चांदण्या जवळ दिसायच्या पण आज ही समोरची डिझाइन लांब चालली होती. कंटाळुन जाधव उठले, व्हिस्की संपलेलीच होती. घरात झोपायला आले, गुपचुप बेडरुममध्ये येउन बेडवर अंग टाकुन दिलं.
पहाटेला स्वामी श्री अवतारी बाबा आश्रमाच्या कुष्ठरोग विभागार तीन जण सेवेकरी म्हणुन भरती झाले, कुणी फारसं बोललं नाहीच. तिघांनी आंघोळी आटोपल्या आणि आश्रमातले कपडे घालुन कामाला लागले. झाडलोट आणि तिथल्या रुग्णांचे कपडे धुणं ही कामं त्यांच्याकडं होती. सगळा प्रकार मुक्यानंच चालायचा, सुपरवायझर तसा पोरगेलासा तो यांना पाहुनच घाबरला. एका रजिस्टर मध्ये त्यानं यांची नावं लिहुन घेतली. जेंव्हा ते कपडे धूण्याच्या जागेकडं निघाले तसं सुपरवायझरनं त्यांना गमबुट घालायला सांगितले, तिघांनी नकार दिला अन कामाला लागले. इकडं सोलापुरात दोन मोठ्या व्यक्ती सिव्हिल मध्ये अॅडमिट झाल्या एक अप्पा अन दुसरे माननीय. अप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले नाहीत म्हणुन त्यांना दबाखान्यात आणलं गेलं रात्री कधीतरी एक माईल्ड हार्ट अॅटॅक येउन गेला होता असं अनुमान काढला गेला, तालमी घुमलेलं शरीर म्हणुन वाचले होते. तिकडं माननीय अॅडमिट झाले ते कायदा अन राजकीय आजारापोटी, त्यांच्या वकिलानं अटकपुर्व जामीनाची तयारी सुरु केली होती. पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही.
दोन दिवसांनी अनपेक्षितपणे जाधवांच्या हाती एक धागा आला, आनंद बरोबर रात्री तिथं गेलेला त्याचा एक चेला, जखमी झाल्यावर तो गावाकडं जाउन राहिला होता एवढे दिवस आणि आता सगळं शांत झालं असेल असा विचार करुन तो परत आला होता. त्याला बोलता करायला दुपारचे चार वाजले, पुन्हा एकदा पोलिसांनी तालीम, मंडळ कार्यालय पुन्हा पिंजुन काढलं, काहीच मिळालं नाही. दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत जाधवांचा रिपोर्ट कमिशनर साहेबांच्या समोर होता. एकुण अठरा जण सोलापुरातुन गायब होते, प्रत्येकजण संशय घेण्यासारखा होता पण सगळ्यांची नावं कधी कुठं आलेली नव्हती, काही नावं मात्र या असल्य भानगडीत नेहमीच असायची. आता या सगळ्यांना हुडकणं अन चौकशी करणं बरंच वेळ खाणारं काम होतं. जाधवांनी त्याची परवानगी मागितली पण कमिशनर साहेबांनी दोन चार दिवस थांबायला सांगितलं. मनात थोडं निराश होउन जाधव बाहेर आले, ऑफिस समोरच्या बागेत थोडा वेळ उभारले आणि मग घरी गेले.
केगांव रोडवरच्या खड्ड्यात पडलेली बॉडी ही दै.संचार,केसरी अन तरुण भारत ची हेडलाईन झाली ती बरोबर तीन दिवसांनी.पोलिस प्रेस फोटोग्राफरना जागेवर घेउन गेले तेंव्हा तिथं मुंग्या लागलेल्या होत्या, बाजुला उभं राहवत नव्हता. बॉडी कुणाची हे न माहित नसल्यानं गर्दीत फारशी रडारडी नव्हती, दोन ठिकाणी दगडानं ठेचुन मारण्या मागच्या उद्देश नक्की समजत नव्हता, तरीसुद्धा धार्मिक तणाव होउ नये म्हणुन पोलिसांनी बॉडी लगेच हलवली. पुढचा तपास चालु झाला, वायरलेस वरुन ह्या सगळ्याबद्दल जाधवांना समजलं होतं, पण त्यांच्या समोर आनंदच्या माणसानं दिलेला जबाब असल्यानं यावर आता जास्त विचार केला नाही, पण आपल्या जिगसॉ मध्ये ह्या तुकड्याला सुद्धा एखादी जागा द्यावी लागेल याचा अंदाज त्यांना आला होता. उद्यापासुन जाधव रजेवर जाणार होते, त्यांना नागपुरला जाउन नविन नोकरीच्या काही प्रोसेस पुर्ण करायच्या होत्या. मग आज यात जास्त अडकायचं नाही असा सोयिस्कर विचार करुन ते नेहमीप्रमाणे राउंडला निघुन गेले.
आठ दिवसांनी जाधव नागपुरला जाउन परत येईपर्यंत प्रत्यक्ष केसमध्ये काही विशेष घडलेलं नसलं तरी बॅकग्राउंडला बरंच काही झालं होतं, त्यांच्या जिगसॉचं चित्रच बदलायची वेळ आली होती, अप्पांना हॉस्पिटलमधुन डिसचार्ज मिळाला होता,माननियांनी अटकपुर्व जामीन मिळवला होता, कमिशनरनी सगळी फाईल होम सेक्रेटरींकडे पोहोचवली होती, तिथुन त्याची एक कॉपी पक्ष प्रदेशाध्यक्षांकडे गेली होती. तालीम, मंडळाचं कार्यालय पुन्हा कार्यकर्त्यांनी भरुन गेलं होतं, तरीही त्या अठरापैकी कुणीच परत आलेलं नव्हतं.नवरात्र शांततेत पार पडलं होतं. जनसामान्य आपापल्या रोजच्या जगण्यात गढुन गेले होते, मदनचा भाउ आणि वहिनी पुन्हा आपल्या गावाला निघुन गेले, जाताना मदनच्या आईला बरोबर घेउन गेले. त्याच्या बापानं आपलं दुकान पुन्हा सुरु केलं, दुकानात एक फुटभर फोटो लावला होता मदनचा, त्याला रोज हार गंध करायचा, आणि बास. एका दोघांच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
मोठा फरक पडला होता तो आनंदच्या घरी, घरचा कमावता असा गेला होता की त्याची बायको एकदमच विनाधार झाली, आणि मरणाच्या बरोबर पोलिस केस असल्यानं नातेवाईक पण दिवसपाण्यापर्यंतच घरी येत होते, नंतर कुणी फिरकलंच नाही ना सासरचं ना माहेरचं. कॅरम क्लब चालवणं तिला शक्य नव्हतं, दहावी पास या कुवतीवर कुठं नोकरी लागायची शक्यता नव्हती, घरची गाडी विकावी म्हणलं तर ती पोलिसांनी जप्त करुन ठेवलेली, ती सोडवायलाच जमादारानं चाळीस हजार मागितले होते. ज्या वस्तीत ' वहिनि' म्हणुन मिरवली होती, तिथंच चार घरी धुणी भांडी करुन जगायची वेळ आली होती, माननीयांच्या घरी दोन तीन वेळा जाउन आली, त्यांच्या आईनं अन बायकोनं दोन्ही वेळ पाच दहा हजार दिले पण, ते संपायला फार वेळ लागला नाही, पण ज्या दिवशी अप्पांना डिसचार्ज मिळाला त्या दिवशी अनपेक्षितपणे एकजण घरी येउन दोन लाख देउन गेला होता, तो नाथाचा माणुस होता. अप्पांनी हे करायला त्याला मुश्ताकला मारलं त्याच दिवशीच सांगितलं होतं. या पैशातुनच शेवटी तिनं आपल्याला जे जमेल ते करायचं ठरवलं, कॅरम क्लबच्या जागेत एक टपरी काढायची चहा भजीची.
कोजागिरी पौर्णिमेदिवशी अवतारी बाबा आश्रमात बरीच गडबड होती, उत्सव होता, जेवणं होती. सगळे जण गडबडीत कामाला लागले होते, पार संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. संध्याकाळची आरती झाल्यावर महाप्रसादाची गडबड बाहेर चालु झाली तेंव्हाच मठाच्या प्रमुखांच्या खोलीत आठ जण जमले , त्यात नाथा, हणमंता आणि त्याच्याबरोबरचं दोघं जण होते. मठप्रमुखांनी समोर ठेवलेल्या ताटातुन अरगजा मुठीनंच उचलला अन या चौघांच्या कपाळाला मळवटासारखा लावला, 'आई भवानीचा उदो उदो' असा गजर झाला, चौघांनी सगळ्यांकडं आनंदानं पाहिलं, मठप्रमुखांनी इशारा केल्यावर त्यांच्या बाजुला बसलेले अप्पा उठले, खुर्च्यांमागं ठेवलेल्या पोत्यातनं चार खोकी काढ्ली, त्यावर थोडा अरगजा लावला अन प्रत्येकाच्या हातात एकेक खोकं दिलं. चौघांनी खोकं घेउन अप्पांच्या पायावर डोकं ठेवुन नमस्कार केला, अप्पांनी नाथा अन हणमंताला जवळ घेतलं, दोघांच्या डोक्यावरुन हात फिरवला ' बाबांनो, आता सहा महिने तरी दिसु नका इकडं, निघा लगेच, आणि चपला घाल की बे आता, मानाच्या आहेत म्हणजे काय कोनाड्यात ठेवणार का काय घरी निउन.' चौघांनी खोकी उघडली अन त्या नव्या को-या चपला कपाळी लावुन पायावर चढवल्या. मठातला पुजारी शोभावा असा एक इसम तिथं होता त्यानं एक तांव्या बरोबर दिला आणि सांगितलं इथुन थेट अहमदपुरवरुन नांडेड्ला जा गोदावरी माईत यांचं विसर्जन करा आणि मगच पुढं जा' त्या तांव्यात मदनच्या भावाकडुन घेतलेल्या राख अन अस्थि होत्या. मठाच्या बाहेर एक अवतारी बाबांच्या पोस्टरनी सजवलेली ट्रॅक्स उभीच होती,विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी ती संपुर्ण भारतात यात्रा करणार होती.सगळेजण ट्रॅक्सजवळ आले, मठप्रमुखांनी नारळ फोडला, चारी चाकांखाली लिंबं ठेवली होती ती फोडुन हणमंतानं गाडी पुढं घेतली, गाडी कचकचतच चालवतोय हे बघुन नाथा त्याला म्हणाला,'अबे पहिल्यांचा चालवतोय का भाड्या,नीट चालव की'यावर हणमंता बोलला'पैलवान, महिना झाला असंल ना बिनचपलेचं फिरतोय, आज एकदम चपला घालुन जमेना बगा, हुईल एक दोन दिवसात सवय, जरा दम धरा'
समाप्त --
चपला आणि सत्कार बद्दल --
सत्कार हा एक मान असतो, सन्मान असतो, एखाद्यानं केलेल्या चांगल्या मोठ्या कामाची दिलेली पावती असते. हार, पुष्पगुच्छ एखादं मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं याचं सर्वमान्य स्वरुप असतं. पण ब-याच ठिकाणच्या गँगवॉर मध्ये अशा ब-याच या परंपरा असतात . त्यापैकीच ही एक, एका गँगवाल्यांनी दुस-या गँगमधल्या एखाद्याला उडवलं की, याचा बदला घेण्यासाठी त्या गँगमधल्या दोन चार जण पुढं येतात अन हा बदला पुर्ण होईपर्यंत ते पायात चपला घालत नाहीत,अनवाणी राहतात. ब-याचदा याची सुरुवात जवळपासच्या एखाद्या देवळात देव देव करुन होते, म्हणजे कुणी विचारलंच तर 'देवाचं' असं सांगता येतं. आणि हो भले हा बदला महिन्यात घेतला जाउदे नाहीतर त्याला वर्षे लागुदे,अगदी स्वताचे लग्नकार्य मध्ये येउदे नाहीतर उन्हाळ्यात रस्त्यावरचं डांबर वितळायला सुरु होउ दे पण पायावर चप्प्ल चढत नाही यांच्या. जेंव्हा हा बद्ला घेउन होईल, तेंव्हा त्या सर्वांचा गँगकडुन नव्या को-या चपला देउन सत्कार केला जातो.
याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारलेली ही संपुर्णपणे काल्पनिक कथा आहे, यातील व्यक्ती, स्थळ, घटना, संवाद यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्ती, घटना वगैरेशी कोणताही संबंध नाही, आणि तसे झाल्यास तो केवळ योगायोग आहे.
चपला आणि सत्कार - भाग १ - http://misalpav.com/node/19342
चपला आणि सत्कार - भाग २ - http://misalpav.com/node/19352
चपला आणि सत्कार - भाग ३ - http://misalpav.com/node/19614
चपला आणि सत्कार - भाग ४ - http://misalpav.com/node/19642
चपला आणि सत्कार - भाग ५ - http://misalpav.com/node/19672
चपला आणि सत्कार - भाग ६ - http://misalpav.com/node/19700
चपला आणि सत्कार - भाग ७ - http://misalpav.com/node/19723
चपला आणि सत्कार - भाग ८ - http://misalpav.com/node/19751
चपला आणि सत्कार - भाग ९- http://misalpav.com/node/19815
चपला आणि सत्कार - भाग १० - http://misalpav.com/node/19875
चपला आणि सत्कार - भाग ११ - http://misalpav.com/node/19911
चपला आणि सत्कार - भाग १२ - http://misalpav.com/node/20000
प्रतिक्रिया
15 Dec 2011 - 8:52 am | प्रचेतस
भन्नाट कथा मालक.
प्रचंड वेगवान, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी. कथानक गुंतागुंतीचे असूनही खूपच छान खुलवलंय.
15 Dec 2011 - 10:06 am | स्पा
खतरनाक जमलीये कथा, त्याला सोलापुरी वातावरणाचा तडका आवडला
15 Dec 2011 - 9:08 am | क्रान्ति
कमालीची वातावरणनिर्मिती केलीस हर्षद! झटक्यात सगळं सोलापूर फिरवून आणलंस, तेही त्या टोळीयुद्धाच्या दहशतीसह! आवडली ही कथा.
15 Dec 2011 - 9:52 am | प्यारे१
हुश्श्श्य......
घातल्या ब्वा चपल्या लोकांनी एकदाच्या.
सोलापूरातली काहीच माहिती नसली तरी सगळीच्या सगळी चित्रं डोळ्यापुढं उभी राहिली.
एवढ्या डिटेलींग वर एक आक्खा चित्रपट विना दिग्दर्शक काढता येईल.
रामगोपाल वर्माचा (जुन्या. फॅक्टरीवाल्या नाही ;) ) चित्रपट पाहतोय असं वाटलं.
(कम्पनी, सत्या, सरकार पैकी एखादा)
15 Dec 2011 - 10:04 am | अन्या दातार
अगदी असेच म्हणतो.
५०राव, तुम्ही पटकथा वगैरे लिहायला घ्याच.
15 Dec 2011 - 10:48 am | साबु
एकदम मस्त झाली कथा... शेवट पण छान ..व्यवस्थित सम्पवलीत.
- ५०राव, तुम्ही पटकथा वगैरे लिहायला घ्याच.
असेच म्हणतो... पण दिग्दर्शक त्या ताकदीचा पाहिजे...
कथा वाचताना मी पण त्यन्च्याबरोबर गाडीतुन फिरतोय... असे वाटत होते. नाथाचा तर चेहरा दिसत होता मला...
_/\_
15 Dec 2011 - 11:09 am | प्रास
तुमचं व्यक्तिचित्र म्हणून शक्य झाल्यास तुमच्याच पदकमलांचा फोटू ठेवा बरं! रोज दण्डवत् घालीन म्हणतो.
'चपला आणि सत्कार' ही अख्खी लेखमालाच भन्नाट आहे. टोळीयुद्धातल्या सगळ्याच प्रथा काही माहिती होण्यासारख्या नसतात पण एक नवी प्रथा आज कळली.
पहिल्या भागातले संदर्भ शेवटल्या भागात झक्कपैकी जुळतात की ज्याचं नाव ते! मग हर्षदच्या सुरूवातीला नाथाच्या अनवाणी पायाकडे पाहिल्यानंतरच्या प्रतिक्रियेचा इथे झालेला उलगडा आम्हालाही नवं ज्ञान देतो.
आता हे नक्की की तुम्ही तुमच्या लेखनाच्या गुणवत्तेचा बार एकदम उंचावर नेऊन ठेवला आहे. यापुढेही अशाच लिखाणाची प्रतिक्षा राहिल. पुलेशु.
तुमच्या लिखाणाचे आता आम्ही ऑफिशिअली फ्यान....
:-)
15 Dec 2011 - 12:18 pm | गवि
अतिशय भन्नाट...
एक विनंती आहे. हे भाग एकत्र करुन पुन्हा एकदा सलग वाचनासाठी प्रकाशित करावेत, किंवा पीडीएफ, ई-बुक स्वरुपात एकत्रित उपलब्ध करावेत.
लिंकांच्या मार्गे एकेक करुन भाग वाचताना बराच ब्रेक / रसभंग होतो. त्यापेक्षा यापुढील नवीन वाचकांना एका दमात वाचायला आता तरी हरकत नसावी.. कारण फार थोड्या कथा एका बैठकीत संपवण्यासारख्या असतात. त्यातली ही एक आहे.
19 Dec 2011 - 4:06 pm | सुहास..
अतिशय भन्नाट...
एक विनंती आहे. हे भाग एकत्र करुन पुन्हा एकदा सलग वाचनासाठी प्रकाशित करावेत, किंवा पीडीएफ, ई-बुक स्वरुपात एकत्रित उपलब्ध करावेत.
+१ टु गवि !
19 Dec 2011 - 6:48 pm | मी-सौरभ
रच्याकने...
तुमच्या ब्लॉगवर तरी हे भाग सलग उपलब्ध आहेत का???
15 Dec 2011 - 2:38 pm | मन१
सर्वच भाग वाचून प्रतिसाद द्यायला म्हणून थांबलो.(माझा वेग कमी असल्यानं पुन्हा एकदा निवांत वाचायचं आहे अजून)
वरती प्रासनं म्हटल्याप्रमाणं
आता हे नक्की की तुम्ही तुमच्या लेखनाच्या गुणवत्तेचा बार एकदम उंचावर नेऊन ठेवला आहे.
+१
15 Dec 2011 - 3:32 pm | तत्सत
लै भारी! हान तिच्या! दनका!
15 Dec 2011 - 4:05 pm | इंटरनेटस्नेही
हाही भाग आवडला. प्रत्येक ओळीतुन लेखाकाच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो आहे.
15 Dec 2011 - 4:55 pm | आत्मशून्य
भाग १३ - अंतिम संपला अनं मिपाला मारिओ पूझोचा मराठी अवतार गवसला.... एकदम आवडॅश. ओमेर्ता सारख्या संकल्पनांवरही आपल्याकडून दर्जेदार लेखनाची अपेक्षा निर्माण झालि नाही तरच नवल.
15 Dec 2011 - 4:59 pm | सोत्रि
५०फक्त,
इतके दिवस क्रमश: भाग येत होते पण एकही भाग वाचला नव्हता.
आज सगळे भाग एकत्र एका दमात वाचून काढले. सोलापुरी तडका एकदम मस्त!
_/!\__/!\__/!\_ बास आत्ता फक्त एवढेच येते आहे मनात वाचून. बाकी प्रत्यक्ष भेटीत बोलू शकेन.
एक मस्त कादंबरी होउ शकेल, प्रकाशित करायचा विचार नक्की करा!
- (सोलापुरी) सोकाजी
15 Dec 2011 - 5:28 pm | किसन शिंदे
आला का अंतिम भाग, याचीच वाट बघत होतो.!
आता सगळे भाग एकत्र करून वाचतो.
15 Dec 2011 - 5:43 pm | किचेन
सगळी पात्र एकदम जिवंत झालीयेत.मी सगळे भाग एकदम वाचल्यामुळे मला प्रत्येक पात्रात कोणाचा तरी चेहरा दिसत होता.नाथा मध्ये पिंजारामाध्ला विष्णू दिसत होता.
पहिल्या भागात हर्षद होता ,त्याच पुढ काय झाल?
15 Dec 2011 - 7:31 pm | देविदस्खोत
महोदय, शेवट्चा भाग " १३ " वाचायला मिळाला. सोलापुरातील समाजजीवनाशी परिचित असल्यामुळे शेवट अपेक्षेप्रमाणेच झाला. पण काहि म्हणा आपल्या ह्या कथेने वाचकांना जबरदस्त खिळवून ठेवले होते हे मात्र खरे !!!!!! पुढील अशाच एखाद्या जबरदस्त कथेच्या प्रतिक्षेत !!!!!! धन्यवाद !!!!
16 Dec 2011 - 1:14 pm | आदिजोशी
संपूर्ण लेखमालेला +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
16 Dec 2011 - 1:51 pm | गणपा
पहिला भाग जेव्हा आला होता तेव्हा नावं वाचुन मिपावर कुणाचा 'सत्कार' होऊन त्यांना 'चपला' मिळाल्या की काय अशी शंका आली होती. आणि घाई घाईनं धागा उघडला.
नंतर कळल की हे प्रकरण काही वेगळंच आहे.
आजवर एकही प्रतिसाद दिला नव्हता. कारण बरेच क्रमशः लेखक वाचकांना टांगणीला लावून लेखन अर्धवट टाकतात. (इतरांच्या विनवण्यांतून त्यांना काय असुरी आनंद मिळतो ते तेच जाणोत.)
म्हणुन पहिल्या भागातच ठरवलं की लेखाच्या नावात अंतिम वा खाली समाप्त दिसल्या खेरीज प्रतिसाद द्यायचा नाही.
सर्वप्रथम तुम्ही हे लेखन पुर्ण केल्या बद्दल आभार.
कथानकची जी पार्श्वभुमी होती ती माझ्यासाठी नवीनच होती. कथेचा वेग भन्नाट आणि खिळवून ठेवनारा आहे.
आपल्याला ही कथा आवडली. :)
18 Dec 2011 - 4:21 pm | अमित
बांगरेचं काय झालं?
लै झ्याक..
पण मालक, बांगरेचं काय झालं ते न्हाई समजलं
19 Dec 2011 - 2:03 pm | अन्या दातार
मालक नीट वाचा की
>>बांगरे घरी आले होते पण आल्यापासुन आजारीच होते. काडादी चाळीतला डॉक्टर दररोज येउन औषध देउन जायचा पण त्यामागं माणुसकी कमी अन त्यांच्या मुलीचं हातात हात देउन थँक्यु म्हणणं जास्त होतं असं तिच्या आईला वाटायचं.
19 Dec 2011 - 3:25 pm | अमित
अन्या राव, ठांकु
19 Dec 2011 - 3:39 pm | साबु
५० फक्त राव अजुन एक सान्गा.. मदन चा चुकुन गेम होतो.. पण दुसरी पार्टीने कुणाला मारायची सुपारी दिलेली असते? नाथाला?
19 Dec 2011 - 7:03 pm | मृत्युन्जय
एका दमात १३ भाग वाचुन काढले.
बास्किन रॉबिन्स मध्ये टुथपिकवर आइसक्रीम देतात तसा किरकोळ पहिला भाग बघुन परत वाचावे की नाही अशी शंका आली होती. त्यामुळे पुढचे भाग वाचले नव्हते. सगळे भाग वाचल्यावर जाणवले की त्या छत्रपतींच्या तलवारीत जोर होता आणि या छत्रपतींच्या लेखणीत.
आधीची ------------ सुद्धा अशीच उत्कंठा वर्धक होती. ही कथादेखील खासच जमली आहे. अंगावर वाचताना काटा आला. छत्रपती अगदी हाडाचे क्रिमिनल असल्याचा अनुभव गाठीशी असल्यासारखे लिहितात :)
छत्रपती तुम्हाला मानाचा मुजरा :)
22 Dec 2011 - 9:47 am | मी-सौरभ
मस्त प्रतिसाद...
19 Dec 2011 - 7:29 pm | पैसा
सगळ प्लॉट मस्त शेवटाला नेऊन पोचवलास! सगळं सलग वाचून बघेन परत एकदा, जास्त परिणामकारक वाटेल.
20 Dec 2011 - 1:41 pm | झकासराव
जबरी डिटेलींग आणि लोकल तडका भारीच. :)
22 Dec 2011 - 2:47 pm | साती
भन्नाट कादंबरी.
एका दमात वाचून काढली.
जबरदस्त.
आणि जबरदस्त डिटेलिंग.
12 Jan 2012 - 10:48 pm | अर्धवटराव
सलग वाचली संपूर्ण कथा. कसली कसदार झालीय... सुपर्ब.
पाचव्या भागात एक वाक्य आलय...
>>नाथाला परेशच्या घरात यायला कुणाला विचारावं लागायचं नाही, दुकानाच्या बाजुच्या जिन्यानं तो सरळ वर आला, चपला काढुन 'नाजुक ब्राम्हणा आहेस का घरात ?' असं मुद्दाम बायकी आवाजात हेल काढत विचारलं.
-- इथे "चपला काढुन" म्हणजे काय? नाथा तर "व्रतस्थ" होता ना??
अर्धवटराव
13 Jan 2012 - 9:53 am | ५० फक्त
चुक झालीय खरी, आणि माझ्या लक्षात पण आली नव्हती, लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
16 Dec 2014 - 5:37 pm | जेपी
पुर्ण मालीका वाचली,आवडली.
बालपणीच्या सोलापुर तुळजापुर आठवणी मुळे जास्तच...
16 Dec 2014 - 7:04 pm | एस
सगळे भाग वाचून काढले, एक-दोन ढोबळ चुका सोडल्या तर मस्त झालीये (उदा., स्मशानात मदनऐवजी मदनचा भाऊ राख नेणार्यांना विचारतो असं हवं होतं). थरारक आणि उत्कंठावर्धक.
16 Dec 2014 - 8:04 pm | किसन शिंदे
हर्षदच्या लेखणीतून साकारलेल्या अनेक झक्कास आणि अप्रतिम मालिकांपैकी एक! :)
17 Dec 2014 - 2:44 pm | अविनाश पांढरकर
सलग वाचली संपूर्ण कथा. कसली कसदार झालीय...
17 May 2016 - 6:45 pm | गामा पैलवान
पन्नासराव,
कथा खरंच काल्पनिक आहे? अगदी खरी वाटते. विशेषत: आज ही बातमी वाचल्यावर या कथेचीच आठवण झाली : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=B662HU
आ.न.,
-गा.पै.
17 May 2016 - 6:59 pm | अभ्या..
गा. पै. जितक्या वेळा तुमचे नाव दिसते तितक्यावेळा सोलापुरातील अशाच अनेक कथा अन अर्थात पन्नासरावांच्या चपलाच आठवतात.
.
ह्याच्या खुलाशासाठी ५० रावानाच विचारा.
20 May 2016 - 5:45 am | ५० फक्त
गा.पै. पुन्हा कथा बोर्डावर आणल्याबद्दल धन्यवाद..
कथेतली स्त्री पात्रं आणि त्यांच्याबद्दलचे उल्लेआहेत,१०० % काल्पनिक आहेत, इतर भागांत १०% कल्पनाविस्तार आहे, हे जगणं अगदी जवळुन नाही पण यात अडकणार नाही अशा अंतरावरुन अनुभवलेले आहे १०-१२ वर्षे.
पुन्हा एकदा धन्यवाद..
20 May 2016 - 8:28 am | अत्रन्गि पाउस
हे लेखमाला नजरेतून सुटलीच....अर्थात आज शुक्रवार त्यामुळे ताबडतोब भरपाई होईलच ...
3 Nov 2022 - 8:59 pm | diggi12
वेगवान कथानक
3 Nov 2022 - 8:59 pm | diggi12
वेगवान कथानक