वाटा तश्या अनेक असतात. प्रत्येकाची आपापली वेगळी असते. वाटा फ़ुटतात, वाटा हरवतात, वाट मिळते, वाट सापडते. वाट पाहिली जाते, वाट दावली जाते, अन वाट लावलीही जाते. कधी कधी आपल्याआपण वाट लागतेही.
वाटा चोखाळल्या जातात, जोखल्या जातात. वाट वळणाची असते, वाट निसरडी असते, कधी वाटा वेगळ्या होतात, कधी वाट वाकडी करुन येण होत, अन कधी वाकड्या वाटेला जाण ही होत. कुणी आपापल्या वाटेने जात असतो, कुणास वाट दाखविणारा भेटतो, कुणी वाट अडविणारा असतो. कुणी वाट राखतो, कुणी वाट मारी करतो. कधी कधी वाटेला जायच नसत.गप आपापली वाट धरायची असते. वाटेला धरुन चालायच असत.
तश्या वाटा तुम्ही आम्ही खुप पाहिलेल्या असतात. पण स्वत:ची अशी एखादी वाट असतेच नाही का? माझी ही आहे. माझ्या गावची वाट. बऱ्याचदा अजुनही अधी मधी स्वप्नात मी माझ्या या वाटेने चालत असते. फ़ार लहाणपणी या वाटेची अन माझी ओळख झाली. ही आहे, माझ्या गावाला आणखी एका तिठ्ठ्याच्या गावाला जोडणारी वाट !. ही निघते गावापासुन.... आता ती तिथुनच कशी काय निघते बाई? कारण ती ज्या गावाला पोहोचते त्या गावाहुन इकडे वाट वाकडी करुन यायची फ़ारशी गरज कुणाला भासत नाही. गरज आहे ती माझ्या गावाला! म्हणुन ही वाट निघते ती माझ्या गावातुन. तशी फ़ार मोठी नाही . आहे साधीच ! अगदी साधी !! ’ पाउल वाट’! पावल टाकत जाता येण्या जोगी! पावला समोर पाउल टाकत जाण्या साठी. पुढचा चालत असेल तर त्याच्या बरोबरीला न जाता, त्याच्या मागोमाग पावलावर पाउल टाकत जाण्या साठीची. गावाच्या वेशीकडुन पण एक वाट निघते. ती थोडीशी राजेशाही म्हणावी लागेल. कारण ती आहे गाडी वाट. म्हणजे तीच्यावरुन चक्क गाडी जाउ शकते. पण असल्या नाही नाही तो तोरा दाखविणाऱ्या गोष्टी मला कधीच नाही भावल्या. त्यामुळे माझी आपली हीच वाट.
खुप लहाणपणी जेंव्हा घर म्हणुन आता फ़क्त भिंती उरल्याहेत ही जाणिव अगदी पहिल्यांदा झाली, अगदी तेंव्हाच या वाटेची अन माझी ओळख झाली. तेंव्हा या वाटेन चालता चालता मी माग वळुन वळुन हळु हळु दुर चाललेल ते हे ऽ ऽ लांबच्या लांब आढ पाहिलेल आठवत मला. त्या आढ्या खालच सावलीतल जगण संपल आता ही जाणिव त्या लहाणपणीच आली मला. पुन्हा पुन्हा भरुन येणाऱ्या डोळ्यांना पुसत, अन ते भरतातच का? या दटावणीच्या प्रश्नाला बगल देत मी ही वाट माझ्या आठवतेपणी पहिल्यांदा चालले. मग वर्ष सहा महिन्यांनी परत परत परतण्या साठी मी हीच वाट निवडली. अगदी स्वत:चा स्वत:वर अधिकार येइ पर्यंत! साऱ्या गाडी घोड्यांच्या ऐषोआरामाला तोंडात मारेल अशी ही वाट आहे. गाव सुटल की अगदी शंभर दिडशे पावला वर नदी लागते. आधी म्हणे ही वाट थेट नदीत घुसायची, अजुनही ती वाट आहे, पण आता ती फ़क्त पाणवठ्याची वाट आहे. तीवरुन बायका, बाप्ये, नदीला अंघोळीला, धुणी धुवायला, जनावरांना पाणी पाजायला थेट नदीत उतरतात. पण माझी वाट मात्र पुला कडे वळते. पुलावर यायच्या आधी ही मसणवटीला बगल द्यायचा प्रयत्न करते. खरच,? सजीवांसाठी असल्यान तीही मरण या कल्पनेला घाबरत असावी का? पण कितीही बगल दिली तरी स्मशाण मात्र कायमच तीला निरखत असाव. कारण चालता चालता नजर पुन्हा पुन्हा तीथे नुकत्याच पडलेल्या एखाद दुसऱ्या नविन जळक्या खुणांवर फ़िरायची....
स्मशान संपल , अस कितीस मोठ म्हणा? पावला दहा पावलात संपुनही जायच ते, की लागायच धरण. आता ते सिमेंट वाळुत बांधलेल म्हणुन धरण नाहीतर बंधारा म्हणायला हरकत नाही. हे बांधण्या पुर्वी लोक नदितुनच ये जा करायचे , अन लोक नदीतुन येता जाताहेत म्हणुनच की काय तेंव्हा नदीला जवळ जवळ आठ ते दहा महिने पाणी असायच. अर्थात हे ऐकीव! जुणी खोड उगाचच नवीन काही झाल की हळहळतात तस असाव. कारण आता नदीला सहा महीने जरी पाणी असल तरी ’माप झाल’ म्हणायची पाळी. वरचे सारे बंधारे भरले तरच इथे पाणी पोहोचणार.. तर असो. तर म्हणे त्या वेळी गावातली माणस भरलेल्या नदीतुन सांगड टाकुन आर पार जायची. जास्त पाणी नसेल तर अंगावरचे कपडे हळु हळु वर करत पाणी वाढेल तस , आणखी वर करत , अन पाणी उतरेल तस खाली सोडत या काठावरुन त्या काठावर पोहोचायची. ऐकताना सुद्धा हसु फ़ुटायच मला कल्पनेन. पण केव्हढ चौकस रहाव लागत असेल नाही? म्हणजे पाण्यात पाय कुठे पडतो आहे, घसरतो की काय ? सखलात (मला अजुन सखल म्हणजे सपाट की खड्डा हा प्रश्न पडतो) पडला की काय हे सार बघायच, बघायच म्हणजे पायान हळु हळु चाचपत पुढे सरकायच, बर तुम्ही गावा बाहेर पडता ते काही कारणास्तव, तर ते जे काही कारण असेल ते , म्हणजे बाजार रहाट हे सार हातात वा डोक्यावर सावरुन धरायच अन वर कपडे भिजु नयेत म्हणुन वर ओढायचे , अन पाण्याच आवरण संपल की अनावृत्त होइल म्हणुन खाली खाली सोडायचे , काय? काय? पर्सनल मॅनेंजमेंट मॅनेंजमेंट म्हणजे किती ती? आहे का आज अस कसब कुठे? तर म्हणे अशी त्या काळी नदी पार केली जायची. पण पुल झाल्या पासुन मात्र सारी ये जा पुला वरुनच होते. मध्यंतरी एकदा हे ऽऽ अस्सा पुर आला अन त्या पुरात आमचा हा पुल चक्क दोन तीन फ़ुट पुढे सरकला. मग सरकारी माणस आली अन मग परत एकदा त्यांनी साऱ्या बाजुने सिमेंट ओतल अन अजुन तरी हा पुल आहे तिथे आहे. धरणावरुन येता जाता, एका बाजुला प्रचंड ओबड धोबड खडक दिसतात, ही नदीची खालची बाजु, अन एका बाजुला थोड पाणी अन गाळ ! नदीत पाणी असेल तर कुठे धुण , कुठे धान्य धुतल जात. तेव्हढीच नदीवर हालचाल! खालच्या बाजुला मात्र त्या ओबड धोबड खडकाळ भागात खळग्या खळग्यातुन पाणी साठलेल असत. जेंव्हा हे पाणी ताज अन स्वच्छ असत तेंव्हा अगदी आजुबाजुच्या गावातुनही लोक इथे अंथरुण पांघरुण धुवायला येतात. हे लांबच्या लांब पसरलेला खडक , अगदी चार चार जण एका एका वाकळीची चार टोक धरुन धबाधब आपटुन धुतात, अन त्यातल्याच एखाद्या खडकावर वाळत ही घालतात. असा एकेक खडक! त्या खडकातुन रहातात खेकडे! मग ते खेकडे पकडायला पोर आलीच!
जेंव्हा जेंव्हा नदीला पुर येइ, तेंव्हा धरणावरुन पाणी या खडकाच्या कोंदाटीत फ़ेसाळत फ़िरत रहात, नजर ठरत नाही असा प्रचंड भोवरा गरगरत रहातो. जणु दर वर्षी त्या खडकांना धारदार करायच कंत्राट या पाण्याला दिलेल असाव. या पुरात बऱ्याच गोष्टी वहात यायच्या. मोठी मोठी झाड असायची त्यात. ती झाड पाण्याचा प्रवाह अन जोर वापरुन काठाला आणणारी मोजुन दोन माणस गावात होती. सरपणा साठी . कापीव लाकडा साठी असा साऱ्यासाठी या झाडांचा उपयोग असे , अन हे डोळ्या समोर ठेवुन अस फ़ेसाळत पाणी हे दोघजण वर्षाला झेलत. मग अचानक कुजबुज उठे. ’ बारकीच हाय’ आमच्या संगी एव्हढीच असल! काय बाई माणस तरी? कलियुग रे बाबा कलियुग’ ऑनर
किलिंग भारतात नाही, किंवा आपल्यात नाही हे तुम्ही मला नका सांगु! माझ्या आठ्वणीत तरी फक्त एकदाच पुरुषाच प्रेत वहात आलेल मला आठवत, बाकि दरवर्षी एखाद दुसरी ....जाउ दे!
दसरा दिवाळीकड याच पुलावर ’बरगे ’ पडतात. बरगे म्हणजे पाणी अडवण्या साठी लाकडाचे तुळईच्या आकाराचे मोठे बॅटन म्हणा. तर हे बरगे पडले की मग लोक या धरणावर नजर ठेवत. अन मग एखादे दिवशी मासा चढायला लागतो. धरण साधारण चाळीस एक फ़ुट उंचीच असेल अन, हे मासा चढण म्हणजे, नदीच्या खालच्या पात्रातुन हे मासे त्या धरणावर चढुन पलिकडे जायचा प्रयत्न करतात. मग ही वाट तिथुन पुढे अश्या मासे पकडणाऱ्यांनी भरुन जाते. जीवनाप्रती असणारी सजीवांची आस्था पहावी तर ती या माश्यांच्या रुपात! जर पाणी वरुन धबधब्या सारख कोसळत असेल तर त्या पाण्यातुन तर हे मासे वर चढायचा प्रयत्न करतातच, पण जर अस पाणी कोसळत नसेल तर जे काही पाणी बर्ग्यातुन खाली वहात असेल त्या धारेला धरुन अगदी बर्ग्याला चिकटुन हा मासा वर वर चढत रहातो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत रहातो. एव्हढ्याश्या जीवाला जर जगण्या बद्दल, आहे त्या परिस्थीतीवर मात करायची एव्हढी जीद्द, तर माझ्या सारख्यान का म्हणुन रडत खडत जगाव?
नदी संपली की लागते शेतांची रांग, इथे एकदा सुर्यफ़ुल लावली होती. अन त्या फ़ुललेल्या सुर्य फ़ुलांवर खुप सारे भुंगे उडायचे. नेमका माझा एक ड्रेस अगदी तश्याच पिवळ्या रंगाचा होता अन त्यातले काही भुंगे माझ्या ड्रेस कडे आकर्षीत होऊन परिणामी माझी पळता भुइ थोडी झाली. याच मार्गावर एकदा माझ्या पुढे पुढे एक लांब लचक धामिण जणु हवेत तरंगल्या सारखी जेमतेम जमिनीला स्पर्शत सळसळत राहिली. जणु तीला पण याच पाय वाटेन जायच असल्यान, अन ती माझ्या पुढे चालत असल्यान तीची मी तीच्या मागोमाग जाव अशी रास्त अपेक्षा असावी. इतर वेळी साप या कल्पनेन ही घाम फुटणारी मी, हे अनोख सळसळत सौंदर्य मात्र अविचल पहात राहिले. इथेच थोड पुढे एक शेत घर होत. मी सकाळी सकाळी सातच्या बातम्या ऐकत बाहेर पडे तेंव्हा बहुतेक करुन इथे कोणीही नसे. इथेच काय पण साऱ्या वाटेवरच कोणी नसे. हे एव्हढ साधारण दोन अडीच किलोमिटरच अंतर मी जास्ती जास्त सात मिनिटात पार करत असे. तर या शेत घराच्या पुढे माझ्या या पाउल वाटेला तिठ्ठ्यच्या गावावरुन एक गाडी वाट येउन मिळे. पाउल वाटेकडे एक हलकासा दृष्टीक्षेप टाकत ही गाडीवाट झटकन पुढे सरके. ही क्रॉस केली की लागायचा ’थळोबाचा मळा’
बहुतेक वेळा मी सकाळी बाहेर पडायचे तेंव्हा रानात पक्ष्यांची सकाळची कवायत सुरु असायची. उगाचच भरारा उडणाऱ्या भोरड्या, प्रचंड कलकलाट करणाऱ्या साळुंख्या, नदीच्या काठावर भुसभुशीत जमिनीत बिळातुन रहाणारे भारद्वाज, अगणित चिमण्या, असा नुसता धुमाकुळ चाललेला असे. त्यात भर म्हणुन ऋतुमानानुसार येणारे पाहुणे पक्षी ही जमेल तशी भर घालत असत. सगळ्यात भांडखोर अन फ़सवी जात कोकिळेची. त्यातल्या त्यात कावळ्यांकडुन मार खाणारा अगदी असाहय्य असा नर कोकिळ तर अगदी बघण्या जोगा! काय ते जमिनीला घासणारे पंख, फरपटत, फरपटत का असेना पण कावळ्यांपासुन राखलेल योग्य अंतर, अन कावरी बावरी नजर. तर हा सगळा गोंधळ का कूणास ठाउक पण या ’थळोबा’ पाशी अगदी संपायचा. या ’थळोबा’ च एक अगदी मोठ्ठ च्या मोठ्ठ अगदी जंगी म्हणता येइल अस झाड होत. कोणत झाड काय माहीत नाही. खर तर तिथे दोन वा तीन झाड असावीत. त्यातल एक ’मडी चाफ्याच’ होत. मडी चाफा म्हणजे पांढरा चाफा! पाउल वाटेच्या विरुद्ध बाजुला, झाडाच्या आड शेंदरान माखलेला थळोबा होता. त्या जंगी झाडामुळे त्या रानाची जवळ जवळ अर्धी बाजु व्यापली होती, अन त्या झाडाच्या सावलीने तिथे काहीच उगवायच नाही. उरलेल्या अर्ध्या भागात मात्र, शाळु , शेंगा, तुर लावलेली दिसायची. या झाडाजवळ एक सुन्नशी शांतता असे. बहुतेक दा तिथल एखाद दुसर चाफ्याच फुल घेउन मी पुढ सरकायची. थळोबाच दर्शन अस एखाद दोनदाच घेतल असाव. कधी कोणी भेटल्यावर मला या थळोबाचा उलगडा झाला. या थळाची राखण करणारा तो थळोबा! आता थळ म्हणजे स्थल अन आपण मराठीत साऱ्याच देवांना पुढे आदरार्थी म्हणुन ’बा’ लावतो, जस ’म्हसोबा’ ’जोतिबा’ तसा हा या स्थलाची राखण करणारा ’स्थलोबा’ अन अपभ्रंशीत, थळोबा!
मी कधीही त्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट वा हालचाल ऐकली नाही. त्या झाडाजवळ असे, ती एक प्रकारची गंभीर शांतता. तिथे बसुन ’तो’ या साऱ्या परिसराची राखण करायचा. एकदा अशीच सकाळी सात च्या बातम्याला घराबाहेर पडले. नेहमीच्या धावत्या गतीने मी थळोबा पार केला , अन समोरुन एकदम साधारण वीस एक माणस मला माझ्या बाजुला येत असलेली दिसली. सर्वात पुढे एक वृद्ध म्हनता येइल असा मुल्ला हातात माळ घेउन चालत होता अन मागोमाग बहुतेक अठरा ते पंचवीस या वयोगटातली तरणीबांड पोर! सारे अगदी आपल्या इथे अजीबात न दिसणाऱ्या गोऱ्या रंगाचे! लालबुंद गोरे! अंगावर काश्मिरी टाइप कपडे! साहजिकच मला पाय वाट सोडावी लागली , पण कधी थांबायची सवय नसल्यान, मी चालतच राहिले. मला अगम्य अश्या भाषेत काहितरी विचारल गेल, अन म्होरक्या कडुन नकारात्मक उत्तर गेल्याच मला जाणवल. तसाच वेग अजिबात कमी न करता मी जरी चालत राहिले , तरी कुठेतरी ठोका चुकला होता. इथुन ही वाट कुठे जाते? यमग पार करुन कागलच्या आसपास. अन तिथे आहे मुस्लिम समाजाची काहीतरी पुर्वी अगदी लहानशी अन आजकाल अचानक तटबंदी उभारलेली अशी मदरसा टाइप वास्तु! हे लोक तिथे चाललेत. मग पायी का? अन एव्हढ्या सकाळी हे इथ, म्हणजे हे जिथुन कुठुन निघालेत तिथुन फार लवकर अंधारात बाहेर पडले असणार. नेहमी प्रमाणे कॉलेजला पोहोचले, अन विसरुन गेले. पण मग त्यानंतर सुरु झाली भर दुपारी रानात एकट्या दुकट्या काम करणाऱ्या स्त्रीयांवर अश्याच गोऱ्या अन न कळत्या भाषेत बोलणाऱ्या लोकांची अत्याचार मालिका. बरीच प्रकरण दडपली गेली. काही पोलीसांपर्यंत गेलीच नाहीत. पण चर्चा मात्र खुप झाली. माणस एकट्या दुकट्या बायकांना काम करु द्यायची बंद झाली. त्या वेळी , मी पण एकटीच होते. पण एव्हढ सगळ झाल तरी त्या कागलच्या अड्ड्यावर काही कुणी उठुन ना छापा घातला ना काही तपासणी केली. आणखी एकदा अशीच दुपारी कॉलेज मधुन घरी येत होते. मला बस मिळुन घरी यायला जवळ पास दुपारचे दोन वाजायचे.या थळोबाच्या रानात तिठ्ठ्याच्या गावहुन येताना पहिला एक ओढा लागायचा अन मग रस्ता शेताच्या बांधान काटकोनात वळायचा,थळोबा कड आल की आणखी एक असच वळण लागायच. तर ओढ्यातुन वर आले अन तंबाखु कापलेल्या त्या रानात अगदी एकसारखी दिसणारी , काळीकुळकुळीत पाच सहा कुत्री दिसली. सहसा कुत्री अशी कळपान फिरत नाहीत अन फिरली तरी अशी एकसारखी तर अजीबात दिसत नाहीत. मी त्या इतक्या दुपारच्या कडक उन्हात बसलेल्या कुत्र्यांकडे नवलाईन पहात राहिले. उन्हान धापत असल्यान त्यांच्या जिभा बाहेर लवलवत होत्या. आमच्या कडे पण वाघ्या होता. पण त्याची जीभ अशी इतकी पातळ अन अशी लालभडक नव्हती. माझ्या त्या बघण्यान की काय ती सारी कुत्री माझ्या मागुन मागुन यायला लागली. मी थांबुन माग वळले की ती कुत्री थांबायची, मी चालायला लागले की चालायची! मी माग वळुन पाहिल तर नजरेल नजर न देता दुसरी कडे पहायची. हे आणखी एक, कुत्रा साधारण तुमच्या नजरेला नजर देतो, मग तो अंगावर का येत असो! हे जरा वेगळ होत. मी परत माझ्या वेगान चालत थळोबा कड आले अन कुत्र्यांनी त्या रानात आल्या बरोबर, माझा पाठलाग थांबवला. तिथेच रानात बसुन माझ्याकडे पहात राहिलेल्या त्या अजब कुत्र्यांकडे परत परत वळुन पहात मी रान पार करुन घरी आले. संध्याकाळी दिवेलागणीला एकदम शेतावर कामकरणारी एक वहिनी घरासमोर येउन ओरडायला लागली, तिला पाळायला दिलेल्या शेळ्यांपैकी एक पिलु लांडग्यान नेल अस तिच म्हणन होत. पपा वैतागले,’ इथ कुठुन लांडगा येतोय?’ अन मला दुपारच्या कुत्र्यांच गुढ उलगडल. मी बाहेर जाउन मी आज एक नाही दोन नाही चांगली टोळी बरोबर घेउन आलेय हे सांगितल्यावर साऱ्यांची तोंड अगदी पहाण्या लायक होती. तिथुन पुढे मग मात्र मी आमच्या वाघ्याला बरोबर चल म्हणुन सांगितल. सकाळी बाहेर पडताना नुसत ’वाघ्या’ जरी म्हंटल तरी हा कुठुन असेल तिथुन धावत यायचा, पण मग तिठ्ठ्याच्या गावाजवळ आल की याची गुर गुर अन भुंकण सुरु व्हायच. त्याचा मात्र जाम त्रास व्हायचा. तरी पण दुपारी मात्र मला एकटीलाच याव लागायच. पण वरच्या दोन्ही प्रसंगात ’थळोबाच स्थळ राखण’ मात्र सिद्ध झाल. तर हा ’थळोबा’ संपला की वाट वळायची अन एका शेताला काटकोनात वळसा घालुन ओढ्यात उतरायची. इथे भरपुर उतार होता अन भरपुर झाडी होती. या उतारावरुन पावसाळ्यात उतरण म्हणजे एक दिव्य असायच. हातातली पुस्तक, पर्स, हे सार सांभाळत झाडांच्या फांद्या धरत धरत एकदा ओढ्यात उतरल की आता परत चढायच कस? या प्रश्नाची सुरवात होइ. या ओढ्याच्या दुसऱ्या काठाला एक छोट्या छोट्या जांभळाच झाड होत. लोक त्याला त्याच्या आकारा मुळे की काय पण ’लेंडी जांभळ’ अस म्हणत. फार छान लागयची ही जांभळ! ओढा ओलांडला की पलिकडच्या गावात अजुनही बातम्या सुरु असायच्या. मग भराभर उरलेली दोन शेत पार करुन बस स्टॉप गाठायचा अन बस ची वाट पहायची.
या वाटेन मला काय दिल नाही? ’हिरवे हिरवे गार गलिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ वा ’टाकुनिया पाय जळात बैसला असला औदुंबर’ या कविता माझ्या साक्षात समोर उतरल्या त्या या वाटेवरच. रणरणत्या उन्हात मलुल होऊन पडलेली सारी सृष्टी जरा उन्ह कलल्यावर कशी सळसळु लागते ते मी इथेच अनुभवल. अजुन उन्ह चमकताहेत तोवरच समोरुन येणारा पावसाचा झीरमिरता पडदा माझ्या पर्यंत पोहोचे पर्यंत निरखण्याच भाग्य ही मला याच वाटेवर लाभल. पहाता पहाता वावटळी कश्या भुत होऊन गरगरु लागतात हे पहाव तर अश्या पाउल वाटांवरच. जरी साधी बाधी अशी दिसत असली , तरी या वाटेचा स्वत:चा असा एक कायदा होता. जरा वाट सोडुन नाठाळपणा केलात, आजुबाजुच्या शिवाराच्या सरीत पाय टाकलात, तर तिथल्या पिक कापल्या नंतरच्या उरलेल्या सडांनी नाही तुमचा पाय सोलवटला तर सांगा! पिक रानात असताना तर तो पाय तेथल्या ढेकळांनी , वा पाणी पाजवल असेल तर चिखलाने भरुन पाठवण्याच शासन ठरलेल. ’कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा’ मधला तो गोळा कसा निवत चाललेल्या धातुच्या गोळ्या सारखा दिसतो, ते पहायची संधी मला इथे लाभली. पावसाळ्यात चिखलान भरलेल्या या वाटेन मला अगदी जीव नकोसा करुन सोडला, वरुन कोसळत असलेला पाउस हळु हळु कसा आतवर , अगदी मनाच्या गाभ्या पर्यंत झिरपत जातो, अन मग त्या वरुन पडणाऱ्या सरींच काहिच कस वाटेनास होत ते ही मी इथेच अनुभवल. आकाशात क्षितिजाच्या दोहो बाजुला टेकलेल हेऽ थोरल इंद्रधनुष्य अगदी वेळेच भान हरपुन पहात बसण्याचा उद्योग मी इथेच केल. अस्पर्श दवबिंदुनी भरलेल हिरवगार गवत, जणु ते मोती ओघळु नयेत म्हणुन कस नि:स्तब्ध उभ रहात, साऱ्या वाटेवर हळु हळु अवगुंठण उचलाव तस हळु हळु अगदी विती वितीन वर सरकणार धुक्याच पांघरुण पाहुन, आपली चादर ही अशीच जादुन वर वर गेली तर येणारी जाग; अशी या सृष्टी सारखी प्रफ़ुल्लीत असेल का? असा प्रश्न पड तो याच वाटेवर.
दुपार कलल्यावर अंधाराच्या आधी सासरी पोहोचाव म्हणुन निघालेल्या डबडबल्या डोळ्यांनी फिरुन फिरुन माघारी गावाकडे पहात निघालेल्या माहेरवाशिणी या रस्त्यावर अनेकदा भेटायच्या. निघता निघता, गाव दृष्टी आड झाल्यावर ही गावातल कुणी भेटल्याचा आनंद, अन नुकतच माहेर सोडल्याच दु:ख या दोहोन गदगदलेली ’ती’ पाहुन डोळे भरले नाहीत अशी व्यक्ती विरळच! कधी कधी ’सांगावा’ मिळाल्यान दणादणा पळत निघालेल्या व्यक्ती नदी कडुन उठलेला धुर बघुन वा गावाकडुन वाऱ्याच्या झुळकी बरोबर येणारा रडण्याचा आवाज ऐकुन दु:खातिरेकान वाटेवरच बसकण मारत अन रडायला सुरु होत, अश्या कुणाला समजुत घालत गावापर्यंत तरी पोहोचवण्याच महा अवघड कर्म एक दोनदा माझ्या हातुन घडल अन आपण कुणी तरी मोठ्ठे आहोत अस वाटुन गेल. सकाळी पेटलेली अन दुपार पर्यंत धगधगणारी चिता नजर चुकवली तरी मनाच्या पाटीवर ओरखाडल्या शिवाय रहात नसे. ती शेवट पर्यंत जळावी म्हणुन गावतल्याच ओळखिच्या थांबलेल्या व्यक्तीन अश्या वेळी ओळख न दाखवुन स्मशाण वैराग्य म्हणजे काय ते ही शिकवल ते याच वाटेवर!
लग्ना नंतर तर ही वाट अगदी कायमची दुरावली. शेवटी गाड्या घोड्याच्या प्रतिष्ठेन बाजी मारलीच! पण जेंव्हा मी आई झाले अन माझी बाहुली चालु बोलु लागली, तेंव्हा मात्र मी तिला एकदा का असेना पण सकाळी सकाळी या ’पाऊल वाटेची ’ ओळख तिला करुन दिली. तिच्या भोळ्या भाबड्या मनाला,"आपण वाटेन जायच नसत, वाट आपल्याला नेते" या गोष्टीच काय अप्रुप वाटल तेंव्हा. मग माझ्या पुढे पुढे पळत ती ’ आई! आई! बघा , बघा वाट इकडे ये म्हणतेय’ अस सांगत पळु लागली , अन सरते शेवटी तिच्यात माझ्यातल कवीत्व जिवंत राहिल याची खात्रीही मला याच वाटेन दिली
__/\__
अपर्णा.
प्रतिक्रिया
30 Nov 2011 - 8:55 am | प्रकाश१११
वाटा -मस्त वाटल्या . .झकास .
आठवणीच्या वाटा आवडल्या .!!
30 Nov 2011 - 9:22 am | रणजित चितळे
ह्या वरुन मला माझ्या शाळेची आठवण झाली. आम्हाला नववी मध्ये निबंध लेखनासाठी आमच्या मराठीच्या बाईंनी - वाटा वळणावळणाच्या हा विषय दिला होता.
,"आपण वाटेन जायच नसत, वाट आपल्याला नेते" सुंदर फिलॉसॉफिकल आहे.
खुप मजा आली वाचून आपला लेख.
30 Nov 2011 - 9:32 am | तर्री
प्रकटन खूप आवडले.
सोपा विषय छान फुलवला आहे. वाचनाना नदी , धरण , शेते डोळ्यासमोर ऊभी राहीली.
शेवट खूपच अनपेक्षित व गोड .
30 Nov 2011 - 10:25 am | सविता००१
सुंदर लिहिले आहे. खूप आवडल्या या वाटा :)
30 Nov 2011 - 10:34 am | जाई.
छान लिहीलय
ही वाट दूर जाते हे गाणं आठवलं
30 Nov 2011 - 2:21 pm | क्रान्ति
खूप खास घेतलाय वाटांचा मागोवा!
30 Nov 2011 - 2:21 pm | क्रान्ति
खूप खास घेतलाय वाटांचा मागोवा!
30 Nov 2011 - 2:21 pm | क्रान्ति
खूप खास घेतलाय वाटांचा मागोवा!
30 Nov 2011 - 2:46 pm | विजुभाऊ
छान लिहिल आहे. शांता शेळकेंच्या तोडे या कथेची आठवण झाली
30 Nov 2011 - 7:34 pm | पैसा
अगदी मनापासून आवडल्या या वाटा.
30 Nov 2011 - 7:44 pm | मोहनराव
छान लिहीलय आपण!! खरंच काही वाटा मनात घर करुन राहतात!!
30 Nov 2011 - 8:19 pm | सुहास..
_/\_
लई दिवसांनी लिहीलस !
अवघड विषयावर सकस लिखाण !!
30 Nov 2011 - 9:27 pm | पाषाणभेद
एकदम छान लेख. हि वाट आवडली.
30 Nov 2011 - 9:44 pm | रेवती
लेखन मस्तच.
शेवट सुखावणारा.
बरेच दिवसांनी आलीस मिपावर.
1 Dec 2011 - 6:29 am | स्पंदना
धन्यवाद सार्यांना .
ऑस्ट्रेलियाला मायग्रेट झाल्या पासुन आपुनच मालक आपौनच नौकर अशी अवस्था आहे एकद्द त्याची सवय मलाच काय पण घरातल्या सार्यांना लावली की परत पुर्वीच्याच उत्साहान मिपावर आहेच.
1 Dec 2011 - 1:12 pm | मदनबाण
अप्रतिम लिहलयं ! :)
1 Dec 2011 - 1:49 pm | मन१
छान....
1 Dec 2011 - 4:22 pm | प्यारे१
मस्त लिहिलंय अपर्णा.
1 Dec 2011 - 6:24 pm | इंटरनेटस्नेही
मस्त. तुमची वाट डोळ्यासमोर व्झिझुअलाईझ झाली. कोकणातल्या आमच्या गावची मातीची पायवाट आठवली.. तुच्या बाजुने एक ओढा वाहत असे... पुर्वी मातीची होती; आता डांबराची झाल्यपासुन तशी मजा येत नाही.
चांगलं लिहिलंयत, अपर्णा ताई.
1 Dec 2011 - 6:37 pm | वपाडाव
तायडे ज्याम भारी की गं....
1 Dec 2011 - 9:09 pm | मदनबाण
अन मग एखादे दिवशी मासा चढायला लागतो. धरण साधारण चाळीस एक फ़ुट उंचीच असेल अन, हे मासा चढण म्हणजे, नदीच्या खालच्या पात्रातुन हे मासे त्या धरणावर चढुन पलिकडे जायचा प्रयत्न करतात. मग ही वाट तिथुन पुढे अश्या मासे पकडणाऱ्यांनी भरुन जाते. जीवनाप्रती असणारी सजीवांची आस्था पहावी तर ती या माश्यांच्या रुपात! जर पाणी वरुन धबधब्या सारख कोसळत असेल तर त्या पाण्यातुन तर हे मासे वर चढायचा प्रयत्न करतातच, पण जर अस पाणी कोसळत नसेल तर जे काही पाणी बर्ग्यातुन खाली वहात असेल त्या धारेला धरुन अगदी बर्ग्याला चिकटुन हा मासा वर वर चढत रहातो. प्रवाहाच्या विरुद्ध पोहत रहातो. एव्हढ्याश्या जीवाला जर जगण्या बद्दल, आहे त्या परिस्थीतीवर मात करायची एव्हढी जीद्द, तर माझ्या सारख्यान का म्हणुन रडत खडत जगाव?
हे वाचल्यावर मला सायमन माशाचा प्रवास आठवला... नदीतुन समुद्राकडे आणि मग परत समुद्राकडुन नदीकडे ! हापिसात असल्यामुळे पहिल्यांदा दिलेल्या प्रतिसादात हा व्हिडीयो देता आला नव्हता... तो आत्ता देत आहे.