सीआरपीएफ कमांडंट रवीन्द्र मोठा उमदा माणूस होता. थोड्याच काळात प्रांतांचा चांगला मित्र झाला होता. रविवारी सकाळी एका कार्यक्रमाला त्यांनी प्रांतांना जेंव्हा बोलावलं तेंव्हा प्रांतांनी कसला कार्यक्रम आहे याची चौकशी न करताच हो म्हणलं.
ठरल्याप्रमाणे ठीक साडेअकरा वाजता प्रांत सीआरपीएफच्या छावणीत पोचले. लष्करी थाटात आगत स्वागत झाले. एका मोठ्या शामियान्यामध्ये ग्रामीण भागातून आलेली शंभरेक तरुण मुले मुली समोर सतरंजीवर शिस्तीत बसली होती. शामियान्याच्या एका अंगाला पत्रकार तर दुसऱ्या अंगाला अधिकाऱ्यांच्या पत्नी मंडळी बसल्या होत्या. शामियान्याच्या मागच्या बाजूला सीआरपीचे काही अधिकारी आणि जवान उभे होते. समोरील बाजूला तीन मोठाले सोफे ठेवले होते. एका कोपऱ्यात एक मोठी समई आणि बाजूला एक पोडियम होते.
डीआयजी अजून पोहोचले नव्हते. रवीन्द्र आणि प्रांत कार्यक्रमाविषयी बोलू लागले. हा कार्यक्रम सीआरपीच्या सिव्हिक अॅक्शन प्लॅनचा एक भाग होता. यामध्ये नक्षलग्रस्त भागात, तसेच इतरत्र कार्यरत असणाऱ्या दलांना काही फंड दिलेला असतो. त्यातून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या नागरी भागात लोककल्याणाची काही कामं करणं अपेक्षित असतं. फोर्सेस ना एक ‘चेहेरा’ देण्याचा एक प्रयत्न. रयतेची मनं जिंकणं हे कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी अत्यावश्यक. या फण्डमधून कुणी ग्रामपंचायतींना टीव्ही देत असे, कुणी एखाद्या स्पोर्ट्स क्लबला खेळसामुग्री देत असे तर कुणी एखादा कम्युनिटी हॉल बांधायला मदत करत असे. रवीन्द्रनी थोडा वेगळा विचार केला होता. त्यांनी साठ मुले आणि साठ मुली निवडल्या. एक साधी परीक्षा घेऊन. हार्डकोर नक्षलग्रस्त गावांमधून. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी. या बॅचमध्ये ड्रायव्हिंग आणि टेलरिंगचे प्रशिक्षण मिळणार होते. टेलरिंगच्या प्रशिक्षणासोबत प्रत्येक मुलीला एकेके शिलाई मशीन पण भेट देण्यात येणार होते.
प्रांतांना ही कल्पना आवडली. त्यांनी विचारलं, हे ट्रेनिंग ठीक आहे. पण व्हॉट अबाउट एम्प्लॉयमेंट? रवीन्द्र क्षणभर गोंधळल्यासारखे वाटले. त्यांनी याचा विचार केलेला नसावा असं प्रांतांना वाटून गेलं. पण रवीन्द्र लगेच सावरून म्हणाले, फॉर दॅट आय मस्ट रिक्वेस्ट यू टू इंटरव्हीन! प्रांतांच्या मनात आलं, व्वा याला म्हणतात तयारीचा शिपाईगडी! प्रांतांनी त्यांना अन्य सरकारी योजनांची थोडक्यात कल्पना दिली आणि परिसरातील इंडस्ट्रीजसोबत या विषयावर मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग करण्याची कल्पना मांडली. स्वयंरोजगाराचे मॉडेल. प्लस बिझिनेस गॅरंटी.
हे असले प्रयत्न केवळ सिंबॉलिकच असतात याविषयी प्रांतांच्या मनात संदेह नव्हता. याने नक्षलवादाच्या प्रसारावर आणि कॅडरभरतीवर कितपत परिणाम होणार होता कुणास ठाऊक. पण समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग!
********
कार्यक्रम पार पडला. डीआयजी निघून गेले. ऑपरेशन्स सुरु होते. बिझी होते. प्रांत कमांडंटबरोबर थांबले. आदिवासी तरुणांसोबत बोलण्यासाठी. मुली शिलाई मशीन मिळणार म्हणून हरखल्या होत्या. बऱ्याच जणींना शिवणकाम अगोदरपासूनच येत होतं. त्या तरुणाईशी बोलताना प्रांतांना जाणवलं की यांच्यात आणि अन्य खेडुत तरुणांच्यात काहीच फरक नाही. आदिवासी आदिवासी म्हणजे काय? हे तर निव्वळ ‘कार्ड’ दिसतंय. ही मुलंही शहरात यायला, पैसे कमवायला तेवढीच उत्सुक होती. टीव्ही गावागावात पोचला होता. सगळ्यांकडे मोबाइल फोन होते. अमुक एक गोष्ट या मुलांना माहीत नाही असं म्हणणं धाडसाचं होतं.
********
डीआयजींसोबत बोलणी आटोपून एस्पी जरा उशीरानेच पोचले. रवीन्द्रने मिठी मारून धीरेन्द्रचे स्वागत केले. धीरेन्द्र एकदम जिंदादिल माणूस. टिपिकल एलिट बॅकग्राउंडचा. डून बॉय. एक भाऊ बीजिंगमध्ये वकिलातीत. आयएफएस. दुसरा सिंगापूरमध्ये आयबीएम मध्ये फार वरच्या पदावर. सासरे पंचतारांकित हॉटेल चेनचे मालक. वडील निवृत्त आयपीएस. आजोबा माजी आमदार.
प्रांतांना पाहून धीरेन्द्र हसत हसत प्रचंड थकल्याचा अभिनय करत सोफ्यात कोसळला. प्रांतांना एसेमेस वर लेटेस्ट बातमी समजली होतीच. त्यांनी एस्पींचं अभिनंदन केलं. पहाटे पहाटे त्यांनी चार नक्षल मारले होते. तीन जण पकडले होते. विशेष म्हणजे हे तीनही जण आसामचे होते. धीरेन्द्र एन्काउंटर मॅन म्हणून एव्हाना ओळखला जाऊ लागला होता. इंटेलिजन्स मॅन, सरेण्डर मॅन या अन्य ‘कॅटेगरीज’ होत्या. प्रांतांच्या स्वरातलं कौतुक ऐकून धीरेन्द्र फ्रेश झाला.
सोफ्यात सावरुन बसत धीरेन्द्र म्हणाले, ‘अजित, हे सगळं ठीक आहे. पण अजून एक वाईट बातमी ऐकलीयस का? सुन्द्री कुंभारची?’
‘कोण सुन्द्री कुंभार? काय झालं तिचं?’
‘ओके. तुला सगळंच सांगायला पाहिजे. अगोदर मीडिया काय म्हणतेय ते वाच, मग सांगतो.’ एस्पींनी जागरण चा अंक पुढे केला. पहिल्याच पानावर ती बातमी होती. शरण आलेल्या नक्षल महिलेला नक्षल्यांनी तिच्या पाच वर्षांच्या मुलासह मारुन टाकले. सुन्द्री सहा वर्षांपूर्वी पोलीसांना शरण आली होती. तत्कालीन एस्पी, जे योगायोगाने सध्याचे डीआयजी आहेत, त्यांनी तिला पुनर्वसित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आर्थिक विपन्नावस्थेमुळे तिची वाताहत झाली. तिचा पती उपचारांअभावी नुकताच मरण पावला होता. त्यातच पोलीस संरक्षणही नसल्यामुळे तिच्या मागावर असलेल्या नक्षल्यांनी तिचा सहज बळी घेतला. सुन्द्रीच्या मदतीसाठी मारलेल्या हाका बधीर प्रशासनाला ऐकूच गेल्या नाहीत.
बातमी वाचून प्रश्नार्थक मुद्रेने प्रांतांनी एस्पींकडे पाहिले.
एस्पी म्हणाले, सहा वर्षांपूर्वी सध्याचे डीआयजी इथे एस्पी होते. त्यांना एके रात्री बातमी मिळाली: ट्वेंटीटू प्लॅटूनची एक नक्षल मुलगी एका दवाखान्यात गर्भपात करुन घ्यायला आलीय. यांनी ताबडतोब माणसे पाठवून तिला ताब्यात घेतले. त्यावेळी सरकारची नक्षल्यांच्या शरणागतीविषयी, त्यांच्या पुनर्वसनासाठी काही पॉलिसी नव्हती. शहामृग अॅप्रोच होता. आपले डीआयजी मोठा विचारी माणूस. त्यांनी या मुलीला, सुन्द्रीला, विचारलं, शरण ये, तुझे गुन्हे माफ करतो. ती कबूल झाली. बरीच माहिती दिली. डीआयजी शब्दाला जागले. त्यांनी तिला इथेच सेटल करण्यासाठी; परत गावी पाठवू शकत नव्हते; तिचं लग्न एका रिलक्टंट तरुणाशी लावून दिलं. तो असाच दुसऱ्या एका केसमध्ये अडकला होता. त्यालाही माफीचं प्रलोभन दाखवून यांचा पाट लावून दिला. त्या बाबाला एका कारखान्यात नोकरीही लावून दिली. काही दिवस ठीक चाललं. पुन्हा हा माणूस दारुच्या आहारी गेला. मी इथे एस्पी झालो त्यावेळी ही बाई माझ्याकडे रडत आली. म्हणाली, मला त्यावेळी एस्पींनी पन्नास हजार द्यायचं कबूल केलं होतं. मला ते पैसे द्या. हे असं काही एस्पींनी कबूल केलेलं नव्हतं हे मला माहीत होतं. पण ती आमच्याच सांगण्यावरुन शरण आलेली होती. मग मी माझ्या अखत्यारीत तिला होमगार्डमध्ये भरती करुन घेतलं. महिना साडेचार हजाराची तिची सोय झाली.
पण नक्षल्यांना तिची आठवण सहा वर्षांनी कशी काय झाली? प्रांत कुतुहलाने म्हणाले.
सांगतो. आता हा आमचा अंदाज आहे. महंमद मलिक नावाचा एक डेडली नक्षल काल रात्री आम्ही मारला. त्याची माहिती ह्या बाईनं आम्हाला दिली अशा संशयावरुन त्यांनी तिला मारलं. संशय अशासाठी, की गेले दोन महिने या दोघांचं गुटुर्घू चाललं होतं. हिचा नवरा सहा महिन्यांपूर्वीच दारु पिऊन मेला होता. त्यानं त्याची नोकरीही केंव्हाच सोडलेली होती. महंमदच्या मोबाइलवरुन हिला शेवटचा एसेमेस असाच गेला होता – लव्ह यू. कल शामको मिलेंगे. दोघेही मेले बिचारे. त्या बाईचं मला खरंच वाईट वाटलं. तिचा नक्षल्यांशी हे महंमद प्रकरण सोडलं तर काहीच संबंध नव्हता.
प्रांत अलिप्तपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांपुढे फक्त गळा चिरलेलं ते पाच वर्षांचं अश्राप बालक दिसत होतं. त्यांना दु:ख फक्त त्याचंच वाटत होतं.
प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ
प्रांतांच्या गोष्टी १
प्रांतांच्या गोष्टी २
प्रांतांच्या गोष्टी ३(१)
प्रांतांच्या गोष्टी ३(२)
प्रांतांच्या गोष्टी ४(१)
प्रांतांच्या गोष्टी ५
प्रतिक्रिया
14 Feb 2011 - 12:23 am | श्रावण मोडक
शिलाई मशीन वगैरे वाचून नोंदी आठवल्या. मग सुन्द्री दिसली तेव्हा पिंजारी आठवून गेली... पुढे आठवणीच आठवणी. हे लेखन अपुरे आहे. सुन्द्रीचं काय झालं हे कळलं. ते करणाऱ्यांचं आणि तिच्यावर तशी वेळ येऊ देणाऱ्यांचंही काय झालं? तेही कळवा. त्यांचं काही तरी झालं पाहिजे ना?
14 Feb 2011 - 9:54 pm | आळश्यांचा राजा
पिंजारीच्या नोंदी आणि आठवणीच आठवणींच्या गोंधळातून काहीतरी आमच्या वाट्याला येऊ द्यात!
14 Feb 2011 - 6:53 am | सहज
ज्या दिवशी मलिक गेला लगेच सुन्द्रीपण गेलेली दिसते. नक्षलवाद्यांचे न्यायदान जितके तत्पर तितके शासनाचे असते तर.. असो. चालायचेच.
14 Feb 2011 - 9:53 pm | आळश्यांचा राजा
नाहीये तेच बरं आहे सहजराव! एन्काउंटरमध्ये आपला पण नंबर लागला असता कधीतरी!
14 Feb 2011 - 10:00 pm | सहज
न्यायदान मधे तुम्हालाही फक्त एन्काउंटरच दिसले? असो.
14 Feb 2011 - 10:12 pm | आळश्यांचा राजा
'असो' नको. सविस्तर बोला. नक्षल्यांनी केले त्याला तुम्ही न्यायदान हाच शब्द वापरलात. त्या अर्थाने न्यायदान म्हणजे एन्काउंटर शिवाय काय?
14 Feb 2011 - 10:23 pm | सहज
कापला याला कोणी खरेखुरे न्यायदान म्हणेल का? तसा अर्थ लावायचा का? मला हे म्हणायचे होते की ज्या वेगाने नक्षल त्यांना 'योग्य 'वाटते ती कृती करतात. जर कल्याणकारी शासनाने चांगल्या कामाचा, न्याय्य कामाचा वेग ठेवला तर अशी परिस्थिती यायची नाही. इतकेच.
14 Feb 2011 - 10:37 pm | आळश्यांचा राजा
तुम्ही न्यायदान कशाला म्हणताय हे समजले आहे. ('असो' ऐवजी आता जे म्हणालात ते ऐकायचे होते. म्हणून उसकवले. ;-))
कल्याणकारी शासनाने चांगल्या , न्याय्य कामाचा वेग ठेवला पाहिजे इतपर्यंत पूर्ण सहमती.
त्यापुढे अधोरेखीत भागाशी पूर्ण असहमती. या परिस्थितीचा आणि चांगल्या, न्याय्य कामाचा/ कामाच्या वेगाचा असलाच तर फारच सुपरफिशियल संबंध आहे.
नक्षल्यांना चांगल्या आणि न्याय्य कामाशी काहीही देणेघेणे नाही. असलेच देणेघेणे, तर अशी कामे होऊ नयेत हाच त्यांचा प्रयत्न असतो. चांगली आणि न्याय्य कामे झाली तर त्यांचे दुकान बंद होणार नाही का? त्यामुळे अशी परिस्थिती ही येणारच येणार. कल्याणकारी कामे केली तरी, आणि नाही केली तरी. (कल्याणकारी कामे करु नयेत असे मी म्हणत नाही.)
(केवळ) विकास नाही, म्हणून नक्षलवाद आहे ही धारणा मला मान्य नाही. नक्षलवाद आहे कारण नक्षलवाद आहे. (विकास असला तरीही नक्षलवाद असू शकतो.)
15 Feb 2011 - 4:30 am | धनंजय
हे अनुभवाचे बोल आहेत, म्हणून निश्चित विचारार्ह आहेत. पण ही कारणमीमांसा पुरेशी नाही.
नक्षलवाद हा पश्चिम बंगाल राज्याच्या नेपाल-सीमाभागात सुरू झाला, आणि एका थेट (पण सर्वव्यापी नाही, अशा) पट्ट्यात बिहार-झारखंड ... छत्तिसगढ, ... रायलसीमा... असा पसरला आहे. विकीपेडियावरील नकाशा असा :
काही म्हटले तरी हा प्रसार व्हायला थोडा तरी वेळ लागला. (२०-३० वर्षांचा कालावधी).
"जिथे आहे तिथे नक्षलवाद आहे - धोरणांशी संबंधित नाही" हे खरे असले, तरी "यापुढे तो कुठल्या भागात पसरायची शक्यता आहे?" हा प्रश्न मनात उद्भवतोच. ज्या ठिकाणी आज नक्षलवादाचा उद्रेक फार नाही, त्या ठिकाणी भविष्यात उद्रेक होऊ नये, याबद्दल काही धोरणे आखता येतील काय? हा प्रश्न सुद्धा मनात आला पाहिजे. (हा प्रश्न त्या मधल्या २०-३० वर्षांदरम्यानच्या काळच्या केंद्रसरकारच्या, बिहार-ओरिसा-मप्र-आंध्रच्या प्रशासकांच्या लक्षात यायला हवा होता, असे वाटते ना? मग आज विदर्भ-मराठवाडा-चंबळखोरे-नर्मदाखोरे येथील प्रशासकांच्या मनातही आलाच पाहिजे. या सर्व ठिकाणी या क्षणी फारसा नक्षलवाद नाही, त्यामुळे "नक्षलांना कैद करून दीर्घ मुदतीचा कारावास द्या" हे तत्त्व लागूच नाही.
तरी कुठलीशी कारणमीमांसा हवी आहे.
थोडक्यात
१. "नक्षल असतात म्हणून नक्षल असतात" या तत्त्वावरून आपल्याला असे भाकित करता येईल काय - "जितके मुळात नक्षली प्रवृत्तीचे लोक होते, ते आतापावेतोवर झाले आहेत. नक्षलवाद पसरण्याची भीती नाही. फक्त रंगीत पट्ट्यात काबू करण्यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे."
२अ. शिवाय दूरस्थ असे कुठले स्वप्न आहे - "या पट्ट्यात नक्षली असणार म्हणजे असणार, धोरणे काही का असेना, किती का कैदेत घालेना, नव्या बालका-युवकांपैकी या प्रवृत्तीचे कोणी असेलच" असे असेल, तर या पट्ट्यात कधी सैल नियंत्रणाची लोकशाही (म्हणजे आजकाल पुणे जिल्ह्यात किंवा गोव्यात आहे तितपत - परिपूर्ण नाही, तरी तशी बरी) कधी येण्याची शक्यता/आशा मनातून काढूनच टाकावी काय?
२ब. भारत शासनाने या पट्ट्यात विशेष-घट्ट नियंत्रणाची वेगळी राज्यव्यवस्था दीर्घकाळासाठी (तात्पुरती अशी व्यवस्था आहे, असावीही) वसवावी अशा प्रकारे या पट्ट्याबाहेर राहाणार्यांनी प्रयत्न करावे का?
- - -
अरे! हे सांगायचे राहायला नको. :-)
लेख-कथाप्रसंग थरारक आणि वाचनीय आहे.
15 Feb 2011 - 9:15 am | आळश्यांचा राजा
कारणमीमांसा पुरेशी नाही हे बरोबर आहे.
अनुभवाचे बोल आहेत म्हणून विचारार्ह असले, तरीही माझ्या मतांमागे अनुभवापेक्षा एकंदर निरीक्षण जास्त आहे. अनुभव (पक्षी - थोडा अधिक जवळचा संपर्क, एवढेच) नसेल तरीही थोड्या विचारांती काही गोष्टी लक्षात येतात.
दि कलर ऑफ ट्रुथ इज ग्रे. कुठलीही एकच कारणमीमांसा आजिबात पुरेशी नाही. इथे मी काही खरडले होते - त्यावेळी मनात आले तसे. त्यातही काही भर घालायची आवश्यकता आहेच. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सविस्तर प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. देतो. थोडी सवड द्या. (श्रामो इज कॉर्डियली इन्व्हायटेड!)
----
अरे! हे सांगायचे राहायला नको. :-)
आय अॅम ऑनर्ड! :-)
16 Feb 2011 - 5:32 pm | आळश्यांचा राजा
मी नक्षलवाद असतो कारण नक्षलवाद असतो असं म्हणत आहे. एकट्या दुकट्या नक्षल्याला वेगळा काढत नाही. नक्षली हा नक्षलवादाच्या, आणि नक्षली संघटनेच्या संदर्भाशिवाय नक्षली नसतो. त्यामुळे नक्षली प्रवृत्ती हा शब्दप्रयोग अनुचित वाटतो. जो काही नक्षलवाद पसरलेला आहे, तो नक्षली प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणून पसरलेला नाही. या हिंसक पॉलिटिकल फिलॉसॉफीला स्पेस मिळत गेलीय, म्हणून नक्षलवाद पसरत गेलाय. जिथे जिथे अशी स्पेस मिळेल, तिथे तिथे हा प्रकार पसरु शकतो. विकास असला तरीही. कारण विकास असला तरीही सगळेच विकासाचे लाभार्थी किंवा समाधानी नसतात. डिसग्रण्टल्ड लोक, अज्ञ लोक, हा कच्चा माल जिथे असेल, तिथे हे लोण पसरायला नक्कीच वाव आहे. त्यामुळे यात सामील होणारे हे 'नक्षली प्रवृत्तीचे' असतील असे म्हणण्यापेक्षा 'व्हिक्टिम' असतील असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.
नाही. अशी आशा ठेवायला हवी. एकाच वेळी नक्षलवादाला मिळणारी स्पेस कमी केली पाहिजे, आणि त्याच वेळी त्यांच्या सशस्त्र गुन्हेगारीचे (लढ्याचे नाही) दमन केले पाहिजे. प्रवृत्तीचा मुद्दा वर बोललो आहे.
कोणती वेगळी व्यवस्था आहे? तीच व्यवस्था सगळीकडे आहे. नक्षली भागात प्रशासकीय कार्यालये असतात. निवडणुका होतात. सगळं होतं.
16 Feb 2011 - 8:34 pm | श्रावण मोडक
सहमत. शंभर टक्के सहमत.
तुम्ही ज्याला गुन्हेगारी म्हणता त्याला मी युद्ध असे म्हणतो. त्यांनी पुकारलेले ते युद्ध आहे. यातील 'त्यांनी' या शब्दाची संदर्भचौकट वरच्या तुमच्या म्हणण्यातील 'व्हिक्टिम' सोडून उरलेल्यांना - म्हणजेच मुखंड, जे हिंसेचे तत्त्वज्ञान करतात - लागू होते. त्यांचा बीमोड केला पाहिजे. दुमत नाही. कसा करावयाचा? युद्धासारखाच. पण युद्ध फक्त सशस्त्र होत नसते. सशस्त्र सामना करण्याबरोबरच इतर बऱ्याच गोष्टी तिथं लावाव्या लागतात. इतर गोष्टींमध्ये, तुमच्या म्हणण्यातील नक्षलवादाला मिळणारी स्पेस कमी केली पाहिजे या मुद्द्याचा समावेश होतो. त्यासंदर्भात तुम्ही 'रेड सनच्या निमित्ताने' या लेखात लिहिलेल्या काही गोष्टी महत्त्वाच्या. ते ध्यानी घेऊन तिथूनच ती स्पेस कमी केली पाहिजे. त्यासाठी त्या आघाडीवर सरकारने, सर्वदूर समाजाने चार पावलं अधिक चाललं पाहिजे. यातून त्या मुखंडांना एकाकी पाडण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच जोडीने अशा विषमताग्रस्त, विकासवंचित भागांमध्ये अहिंसेच्या आधारावर चालणाऱ्या चळवळींना, संघर्षांना न्याय पटकन मिळावा यासाठी बाहेरच्या समाजाने जोर लावला पाहिजे.
एरवी, आपल्यातलाच एक मोठा समुदाय संपवण्याचे 'कार्य' आपल्या हातून व्हायचे.
मला या मुद्यांवर जे लिहायचे होते ते बहुदा एवढेच.
धनंजयची पुढची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक आहे.
14 Feb 2011 - 9:39 am | गुंडोपंत
अरे? अजून लिहा ना राजे?
फार थोडक्यात लिहिता बरं का तुम्ही.
चटका लावून गेला हा भाग.
अजून लिखाण वाचायला आवडेल.
14 Feb 2011 - 10:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अजून लिहा ... त्रास होतो वाचून, पण तरी लिहा.
14 Feb 2011 - 10:42 am | निखिल देशपांडे
पहील्या काही भागांपेक्षा आताचे भाग.. आटोपते घेतल्यासारखे वाटतात.
लिहा ना अजुन..
14 Feb 2011 - 1:51 pm | विसुनाना
वाचत आहे.
14 Feb 2011 - 4:55 pm | स्वाती२
वाईट वाटले हा भाग वाचून.
14 Feb 2011 - 9:58 pm | आळश्यांचा राजा
स्वाती२, विसुनाना, निखिल, अदिती, गुंडोपंत - थँक्स!
यात अजून लिहिण्यासारखं वाटलं नाही खरंतर. सुन्द्री प्रातिनिधिक वाटली. म्हणून सांगावसं वाटलं. म्हणून तिचा 'टाइम्स'.
15 Feb 2011 - 1:16 am | शिल्पा ब
:(
15 Feb 2011 - 3:01 am | प्राजु
अजून लिहा.. वाचते आहे.
15 Feb 2011 - 3:55 am | विनायक बेलापुरे
कित्येक नक्षली न्यायाच्या कथा तर झोप उडवणार्या आहेत.
पण वाईट वाटले वाचून.:(
15 Feb 2011 - 9:26 am | सुधीर काळे
सुरेख लेख. नेहमीप्रमाणे विचार करायला लावणारा. पण विचार करून-करून कांहीं सुचत नाहीं. उलट डोकं गरगरायला लागतं.
मागे एकदा श्री. श्रावण मोडक यांच्या याच विषयावरील लेखाच्या प्रतिसादात मी जे लिहिले होते ते या लेखातील "नक्षलवाद आहे कारण नक्षलवाद आहे" हे वाचून आठवले. खुद्द चीनमध्येही साम्यवाद हरला व आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य पण राजकीयदृष्ट्या हुकूमशाही हे चित्र आज दिसत आहे.
मला वाटते कीं इथेसुद्धा २५-३० वर्षात साम्यवाद येईल व आणखी २५-३० वर्षांत त्याचा पराजय होईल! चीन साम्यवादी ५० -५५ वर्षेंच राहिला, पण आजच्या सहज माहिती पसरू शकणार्या जगात तो इतकाही टिकणार नाहीं.
पण हे मला पहायला मिळणार नाहीं!
लिहीत रहा. तुमचे लेखन मला वाचायला आवडते.
15 Feb 2011 - 10:52 am | चेतन
सुरेख लेख, नक्षल समस्या खरच काळजी करण्यासारखी आहे आणि सध्यातरी त्यावर ठोस असा काही उअपाय दिसत नाही आहे.
खर तरं prevention is better than cure हे तत्व येथेही लागु होतं
असो लेख वाचताना आधी वाचलेले हे दुवे (दुवा १, दुवा २) आठवले
चेतन
16 Feb 2011 - 5:19 pm | आळश्यांचा राजा
दुवे वाचण्यालायक आहेत. थँक्स!