(Code of Criminal Procedure 1973 , Section 97
If any District Magistrate, Sub-divisional Magistrate or Magistrate of the first class has reason to believe that any person is confined under such circumstances that the confinement amounts to an offence, he may issue, a search-warrant, and the person to whom such warrant is directed may search for the person so confined; and such search shall be made in accordance therewith, and the person, if found, shall be immediately taken before a Magistrate, who shall make such order as in the circumstances of the case seems proper.)
प्रांतांनी ऑफिसात आल्या आल्या पेशकाराला बोलावून आजच्या केसेससंबंधी विचारणा केली.
आज शुक्रवार, कोर्टाचा दिवस. आठवड्यातून दोन दिवस कोर्टाचे. इतर दिवशी टूर किंवा मीटींग्ज. पण गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या ठिकाणी जरा अतीच मीटींग्ज झाल्यामुळे टूर, कोर्ट, ऑफिस, सगळंच विस्कळलं होतं. कोर्टासाठी लोक पदरमोड करून येत असल्यामुळे केसेस निकाली काढण्याची प्रांतांना घाई असायची. पण वकील खमंग. तारखा मागणे, नोटीशी वेळेवर पोहोचू नयेत याची व्यवस्था करणे यात वाकबगार. केसेस एक्स पार्टे निकालात काढणे हा यावर एकच तोडगा होता. किरकोळ भांडणे, वाद, यासाठी लोकांना भरीला घालून केस करायला लावणारे वकील त्यांना जळवांसारखे वाटत. मनोरंजन म्हणून पण काही लोक भांडणे लावून मजा बघत असावेत असाही त्यांना संशय होता. त्यामुळे काही केसेस दाखल करवण्याऐवजी केवळ धमकावून सोडवणे त्यांना पसंत होते. वकील-पोलीसांची कशासाठी भर करायची? न्यायव्यवस्था जर अधिक वेगवान झाली, तर आपली ‘गिऱ्हाईके’ अजून वाढतील, ‘धंदा’ वाढेल, महत्त्व आणि प्रतिष्ठा वाढेल, पर्यायाने पैसा वाढेल हे वकील, पोलीस, न्यायाधीश मंडळींना समजत नसेल का असा प्रश्न प्रांतांच्या भाबड्या मनाला पडे. प्रांत तरूण होते. आदर्श अद्याप गंजले नव्हते.
पेशकाराने लगबगीने आजच्या केसेस मांडल्या. तीन केसेस आदिवासी जमीनीवर बेकायदा कब्जा च्या, दोन केसेस अतिक्रमण अपील, आणि एक केस सेक्शन ९७. प्रांत मनाशी म्हणाले, दोन तासांत हे आटोपून टाकू. वनाधिकार समितीची बैठक, अंगणवाडी सेविकांची निवड, प्रतापपोसी गावात सुरू केलेल्या जलसंधारण कामाच्या जागी भेट हे कार्यक्रम आज दिवसभरात उरकायचे होते. शिवाय तहसीलदारांकरवी सुरू असणाऱ्या जनगणनेच्या प्रगतीचा आढावा रात्री घ्यायचा होता. १४४ लावून तीन रेल्वे स्टेशनं बंद पाडल्याला दीड महिना होत आला होता. खाण चोरी बरीचशी आटोक्यात आली असली तरी ‘वरून’ आणि ‘आजूबाजूने’ येणारा दबाव प्रचंड होता. ते सगळं प्रेशर कलेक्टर आणि एस पी वरच्यावर झेलत होते. परिस्थितीचा अहवाल आजच्या आज पाठवणे गरजेचे होते. आपल्या स्टाफची कार्यक्षमता लक्षात आल्यामुळे ‘आपला हात जगन्नाथ’ थियरी वापरूनच आजची महत्त्वाची कामं करावी लागणार हे प्रांतांनी मनाला बजावलं.
कोण कोण आलंय? प्रांतांनी पेशकाराला विचारलं. ९७ वाली माणसं आलीत, त्यानं सांगीतलं. बाकी कुणी नाही अजून आलेलं. प्रांत म्हणाले, बोलवा. केस रेकॉर्ड उघडून बघितलं. पंधरा दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस दिली होती – तुम्ही बेकायदेशीररीत्या तोफान पालेई याला गेले दोन महिने आपल्या घरात डांबून ठेवले आहे, अशी तक्रार आहे, तर आपल्या घराची झडती घेण्याचे वॉरंट का बजावण्यात येऊ नये? प्रांतांनी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. रात्र थोडी सोंगे फार अशा अवस्थेत ही केस दाखल का करून घेतली? असो. आता माणसं आलीच आहेत तर आजच्या आज हे प्रकरण संपवून टाकू.
केस अशी – मोहन पालेई या अरसळा गावातल्या माणसाचं लग्न रिली नावाच्या डुमरिया गावातल्या मुलीशी सहा वर्षांपूर्वी झालं. तोफानला जन्म देऊन रिली देवाघरी गेली. मोहनच्या सासू सासऱ्यांनी आपल्या भाचीशी – राधिकाशी मोहनचं लग्न लावून दिलं. तोफान बराचसा आजोळीच वाढला. आजी आजोबा, दोन मामा यांच्या लाडात वाढलेला तोफान साडेचार पाच वर्षांचा झाल्यावर त्याच्या आई वडीलांना वाटले आता शाळेत घालायचं वय झालं, हा आपल्या घरी राहिला पाहिजे. पण आजोळची मंडळी आज पाठवतो उद्या पाठवतो करत टाळाटाळ करायला लागली. भांडण लागलं. आजोळची माणसं म्हणायला लागली, पोर तुमच्या घरी गेलं की वाळून जातंय. आजारी पडतंय. तुम्हाला सांभाळता येत नाही. आम्हीच सांभाळतो. मोठा झाला की न्या त्याला, तुमचंच पोर आहे. राधिकाला स्वत:वर सावत्रपणाचा ठपका घ्यायचा नव्हता, तिला ते बाळ कोणत्याही परिस्थितीत हवंच होतं. वडील मंडळी मध्ये पडूनही उपयोग झाला नाही. तोफानला विचारा, येत असेल तर न्या असं आजोळकर म्हणू लागले. ते लाडावलेलं कार्टं कशाला जातंय बापाघरी! शेवटचा उपाय म्हणून बापानं ही केस घातली.
कोर्टात मोहन, राधिका एका बाजूला आणि मोहनचे सासू सासरे, आणि दोन मेहुणे दुसऱ्या बाजूला असे उभे राहिले. पाच वर्षांचा तोफान आजीच्या कडेवर लॉलीपॉप चोखत बसला होता. त्याला बघून हे लाडावणं असंच चाललं तर या मूर्खांच्या देशात अजून एका गाढवाची भर पडणार असं प्रांतांना वाटून गेलं. प्रांतांनी एक एक करून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. केस खरीच होती. दोन्ही बाजूंनी ते कन्फर्म केलं. मध्येच नमस्कार करत दोन पत्रकार आत येऊन मागे बसले. दाराशी लोकांची गर्दी झालेली होती. दीडेकशे माणसं कोर्टाबाहेर थांबली होती. या कौटुंबिक कलहात या मंडळींच्या पुढे हा शेवटचा पर्याय आहे असं प्रांतांच्या लक्षात आलं. यात लक्ष घालण्याचं नाकारलं तरी बिघडत नव्हतं. धमकावून सोडून देणे हाही पर्याय होता. यात वेळ कशाला घालवायचा? पण मोठ्यांच्या अहंकारापोटी लागलेल्या भांडणात एका लहानग्याचं नुकसान होतंय हे दिसत होतं. आपलाच छोटा मुलगा त्याच्या जागी प्रांतांना दिसू लागला.
प्रांत आजोळकरांना बोलले, "कायद्याच्या दृष्टीने आई-वडीलांच्या इच्छेविरूद्ध त्यांच्या अज्ञान मुलाला आपल्या घरी ठेवणे हे अपहरणच आहे. देऊन टाका मुलाला." ते म्हणाले, "सर, तुम्ही बाळालाच विचारा." प्रांतांनी नकार दिला. मग डुमरियाकर म्हणाले, "आम्ही द्यायला तयार आहोत. पण मुलाला एकदम घर बदलणे झेपणार नाही. एक दोन महिने जाऊद्यात, आम्ही स्वत: मूल सोडून येऊ." आई वडील म्हणाले, "ही टोलवा टोलवी मागचे सहा महिने चालली आहे. मुलाला आमची माया, ओढ राहणार नाही, मग काय उपयोग?" मुलाचे मामा म्हणाले, "आत्ता काय माया लावताय ते दिसतंच आहे, साधं सेरेलॅक देता येत नाही, बाळ सारखं आजारी असतं, आम्ही वाढवू, आम्हाला जड नाही," वगैरे. प्रांतांनी दोन्ही मामांना समज दिली. म्हणाले, बाळांनो, तुमची वयं काय? २३ आणि २५. लग्नं झालीत का? नाही. मुलं नाहीत. मग बापाला काय वाटतं ते कळणार नाही. बरं. उद्या तुम्हाला पोरं बाळं झाल्यावर या लाडक्या भाच्याकडे तेवढंच लक्ष देणार का? बिचारे निरुत्तर झाले. प्रांत म्हणाले, "आजी आजोबा, तुमचे किती दिवस राहिलेत? कशाला ही ब्याद गळ्यात घेताय?" तर "नाही सर, आम्हाला बाळाची काळजी आहे." त्यांचा बाळाच्या आईवर सावत्रपणाचा आरोप नव्हता हे विशेष. बाळाच्या बापावरच सर्वांचा राग. प्रांतांच्या लक्षात खरी गोम आली. यांचं दुसरंच भांडण आहे, आणि बाळाचा ताबा हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. राधिका डोळ्यात पाणी आणून उभी होती. प्रांतांनी तोडगा काढला, बाळाची आजी थोडे दिवस जावयाकडे राहील. आजोबा, मामा येऊन भेटत राहतील. याला कुणीच तयार नव्हतं. मग प्रांत राधिकेला म्हणाले, "भऊणि, तुमे जाअ, मांसीपाखरे रुह चारी-पांच दिन." ती म्हणाली, "अगोदर यांना माझ्याघरी येऊन राहूदेत, मग मी जाते." प्रांत म्हणाले, "हे मी पंचायतीचं काम इथं कशाला करत बसलोय. गावातली वडीलधारी मंडळी आली असली तर बोलवा." दोन माणसं आली. त्यांना प्रांत म्हणाले, "यांना घेऊन बाहेर जा, आणि समजवा. झाल्यावर या." मंडळी गेली. प्रांतांनी डाक बघायला घेतली.
अर्ध्या तासानं मंडळ परत आले. हसणाऱ्या राधिकेच्या कडेवर बाळ होतं. हातात फ्रुटी होतं. पण बाळ हात पाय झाडत रडत होतं. त्या मागोमाग आजोळकर. चेहेऱ्यावर असे भाव – बघा, आम्ही म्हणत नव्हतो? प्रांतांनी बाळ आजीकडे द्यायला सांगीतलं. नाईलाजानं राधिकेनं बाळ दिलं. प्रांत म्हणाले, "जर तुम्हा लोकांना बाळाची काळजी असेल, तर अगोदर तुम्ही लोकं भांडणं थांबवा. जावयाला थोडं मानानं वागवा. जावई सासू-सासऱ्यांना आई-वडलांसारखं वागवू देत. स्नेह राखा. मेव्हणे मेव्हणे मैत्रीनं रहा." राधिका म्हणाली, "बाळ दोन दिवस रडेल, आपोआप ठीक होईल."
प्रांतांच्या लक्षात आलं, काही उपयोग नाही.
प्रांत खिशात पैसे ठेवत नसत. त्यानी स्टेनोला हाक मारली. "जेनाबाबू, टिके सहे टंका काढन्तु." जेनाबाबूंनी शंभराची नोट दिली. प्रांतांनी लहानग्या तोफानला जवळ बोलावलं. आजी, आजोबा, मामा, आई, वडील सगळ्यांच्याच नजरेत बाळाविषयी कौतुकाची झाक झळकलेली प्रांतांनी टिपली. त्यांनी ती नोट तोफान्याच्या हातात कोंबली आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवून आशिर्वाद दिला, मोठा हो. बाळ ओडिया संस्कारांना स्मरून पाया पडले. प्रांत म्हणाले, "कोर्ट म्हणून ही केस मी केंव्हाच बंद केलेली आहे. मुलाचा ताबा त्याच्या आई-वडिलांकडेच राहील. आता एक कोर्ट, अधिकारी , म्हणून मी बोलत नाहीये, तर या प्रशासकाच्या खुर्चीवर बसलो आहे, म्हणून तुम्हा सर्वांच्या पित्याच्या भावनेने बोलतोय. माझं वय बघू नका. मी सश्रद्ध माणूस आहे. या बाळाला जो आशीर्वाद मी दिलेला आहे, त्याचं काही मोल तुम्हा लोकांना राखायचं असेल, तर मी सांगतो ते ऐका. राधिका आजच, इथूनच, बाळाच्या आजोळी डुमरियाला रहायला जाईल. सात दिवस तिथे राहील, आणि नंतर बाळाची आजी अरसळ्याला रहायला येईल. विषय संपला. टोमणे कुणी कुणाला मारले तर उत्तर देऊ नका. बाहेरच्या माणसांशी या विषयावर सल्लामसलत करू नका. ही जी बाहेर माणसं उभी आहेत, त्यातल्या कुणालाही करमणूक सोडली तर काही देणं घेणं नाही."
राधिका खाली मान घालून उभी होती. डोळे पाण्यानं भरले होते. प्रांतांनी तिला जवळ बोलावलं. म्हणाले, "एआडे देखं. मूं तुमर बडं भाई. बाळाची आजी ही तुझी मावशीच ना? यात अपमान समजू नकोस. बाळाकडे बघून पडती बाजू घे." आजोबांना प्रांत म्हणाले, "तुम्ही मघा म्हणत होता, जावयानं आम्हाला कोर्टात उभं केलं. तुमचा इथं काही अपमान झाला?" ते हात जोडून म्हणाले, "नाही. त्याच्यापुढे पण काही पर्याय नव्हता."
एवढं झाल्यावर प्रांतांनी मंडळींना निरोप दिला. थोड्याच वेळात दोन्ही मामा आत आले. चप्पल काढून प्रांतांच्या पाया पडले. निमूटपणे निघून गेले.
ही ‘पंचायत’, खरं तर ‘नसती पंचाईत’ तीन तास चालली होती. एवढा वेळ प्रातांनी कधी आपल्या मुलाला पण दिला नव्हता. आजची प्रतापपोसीची भेट रद्द करावी लागणार होती. पण प्रांतांचा उत्साह वाढला होता. कामाचा ताण कुठल्या कुठे पळून गेला होता. पेशकाराला बोलावून प्रांत म्हणाले, बोलवा पुढल्या लोकांना.
प्रतिक्रिया
23 May 2010 - 2:12 pm | अरुंधती
छान! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
23 May 2010 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते
राजाभाऊ... लेखनशैली तर आवडलीच पण लोकांना कसं मॅनेज करावं लागतं याचं एक उत्तम उदाहरण दिलंत तुम्ही.
अवांतर: तुमचं नाव असलेले धागे सारखे सारखे दिसावेत ही अपेक्षा. :)
बिपिन कार्यकर्ते
23 May 2010 - 3:20 pm | डॉ.श्रीराम दिवटे
लेख छानच आहे.
पु.ले.शु...
23 May 2010 - 5:06 pm | श्रावण मोडक
यावे, राजे यावे. या विश्वात स्वागत. म्हणजे या लेखनाच्या विश्वात स्वागत. सलामी जोरदार झाली आहे.
कथनातील निसटलेला मुद्दा - वादातील प्रतिष्ठेचा मुद्दा काय होता?
अवांतर - सावत्रपणा मानला जातो का? माझ्या अनुभवातून सुटलेला हा प्रश्न आहे.
23 May 2010 - 10:34 pm | आळश्यांचा राजा
उत्साह वाढवल्याबद्दल सर्वांचे आभार!
@ बिपिन कार्यकर्ते - लोकांना मॅनेज करण्यापेक्षा प्रांताधिकार्यांना अजून एक गोष्ट मॅनेज करावी लागते - इमेज. प्रशासनाची इमेज. हा प्रश्न सोडवणे तितके महत्त्वाचे नव्हते. साधी ऑर्डर - आई-वडीलांकडे ताबा देण्याची - काढून पाच मिनिटांत मोकळे होता आले असते. पण, इथे प्रश्न सोडवला जातो, अशी इमेज बनणे फार महत्त्वाचे असते. आपली काळजी घेणारा हाकीम बसला आहे हा फार मोठा दिलासा असतो अडल्या नडल्यांना. ही इमेज नीट नसेल तर प्रशासनाची पकड ढिली पडायला वेळ लागत नाही. अधिकार्यांच्या शब्दाला किंमत रहात नाही. इतर फोर्सेस ना स्पेस तयार होते. आता ते मामा प्रांतांच्या पाया पडून गेले, म्हणजे, प्रांतांचे त्या गावात स्थान निर्माण झाले. तो भाग लॉ एण्ड ऑर्डरच्या दृष्टीने सांभाळायला सोपा झाला.
@ श्रावण मोडक - वादातील प्रतिष्ठेचा मुद्दा काय असावा यावर प्रांतांनी विचार केला नाही. काहीतरी इगो रिलेटेड भांडण असावा असा त्यांचा अंदाज. सावत्रपणा - कोर्टातल्या चर्चेत एका वकीलाने हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर नकारात्मक उत्तर आले. माझा नाही, पण वडीलांचा सावत्रपणाचा अनुभव चांगलाच आहे. माझी सावत्र आत्या त्यांच्यावर आणि आमच्यावर फार माया करते.
आळश्यांचा राजा
23 May 2010 - 10:50 pm | श्रावण मोडक
सावत्रभाव याविषयी माझा प्रश्न किंचित वेगळा आहे. या कथेतील समाजसमुदायातील सावत्रभाव याविषयीची स्थिती काय आहे? हा समुदाय आदिवासी आहे असे मी समजतोय. म्हणजेच, आदिवासींमध्ये सावत्रभाव असतो काय, असल्यास कसा - काय, असा माझा प्रश्न आहे. सवडीने सांगा.
क्या बात है! आजच्या एका भीषण समस्येच्या मुळाला हात घातला आहे तुम्ही.
23 May 2010 - 10:54 pm | आळश्यांचा राजा
मला फार चांगला मुद्दा दिलात विचार करायला. शोधून सांगतो. दहा उदाहरणं तरी पाहिली पाहिजेत. काही लोकांमध्ये (उदा. मुंडा) चार पाच लग्नं सर्रास आहेत. गुण्यागोविंदानं एकाच चुलीवर बनवून खातात. सेन्सस मध्ये पाहिलं आत्ताच. इथे सावत्रपणा is not an issue. असं यावरून वाटतं बुवा. पण माहीत नाही.
बाय द वे, प्रस्तुत प्रकरणातील मंडळी आदिवासी नव्हती. शेतकरी होते. `चासी'. म्हणजे कुणबी. खाऊन पिऊन सुखी होते.
आळश्यांचा राजा
24 May 2010 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम धागा आणि जी काही थोडी बहुत चर्चा झाली तीसुद्धा!
अदिती
24 May 2010 - 1:14 pm | समंजस
आळस सोडून एक चांगला धागा टाकल्या बद्दल धन्यवाद !! :)
असले आणखी धागे येउ द्यात!
24 May 2010 - 1:16 pm | llपुण्याचे पेशवेll
छान लेख आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
24 May 2010 - 1:46 pm | झकासराव
उत्तम :)
24 May 2010 - 1:57 pm | पहाटवारा
"प्रांत तरूण होते. आदर्श अद्याप गंजले नव्हते"
"आजची प्रतापपोसीची भेट रद्द करावी लागणार होती. पण प्रांतांचा उत्साह वाढला होता."
सुरेख ललितलेखन. बोलि भाषेचा छान वापर.
तुमच्या लिखाणावरुन अंदाज आला आहे कि या विषयावर अजुन बरिच प्रकरणे मनात नांदत असावीत. ती लिहिते व्हावीत हिच शुभ कामना.
24 May 2010 - 4:38 pm | स्वाती२
सुरेख! अजून असेच अनुभव वाचायला आवडेल.
24 May 2010 - 5:06 pm | टुकुल
मस्त लेख, अजुन येवु द्या असेच.
--टुकुल
25 May 2010 - 3:34 am | रामपुरी
+१
25 May 2010 - 3:33 am | शिल्पा ब
छान लेख आहे...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 May 2010 - 3:44 am | मदनबाण
मस्त लेख... :)
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.