प्रांतांच्या गोष्टी -५ नोकरशाहीतील बंधुता!

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
11 Feb 2011 - 7:58 pm

ठाकूरगढहून प्रांत बदली होऊन इस्पातनगरला प्रमोशनवर एडीएम म्हणून रुजू झाल्यानंतरची गोष्ट आहे. इस्पातनगर शेजारच्या जिल्ह्यात. एकाच रेव्हेन्यू डिव्हिजनमध्ये. अर्थात विभागीय आयुक्त तेच राहिले होते, जिल्हाधिकारी बदलले होते.

इस्पातनगरमध्ये जागांचे भाव आकाशाला भिडले होते. प्राइम एरियात एकरी सहा ते सात कोटी रुपये भाव होता. पहिले एक दोन महिने तटस्थ निरीक्षण केल्यानंतर प्रांत पाण्यात उतरले. पुढच्या दीड महिन्यांत कठोरपणे अतिक्रमणे हटवायला सुरुवात केली.

पहिल्याच कारवाईत प्रांत (अर्थात एडीएम, पण गोष्ट प्रांतांची असल्यामुळे प्रांतच म्हणूया) स्वत: रस्त्यावर उभे राहिले. नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी म्हणत होते, सर फोन ऑफ करून सर्किट हाऊसवर थांबा. आम्ही आटोपतो तासाभरात. नाहीतर लोक दबाव आणतील. प्रांत म्हणाले, प्रिसाइजली त्यासाठीच मला इथे रहायचंय. लेट देम नो, कसलाही दबाव काम करत नाही!

कार्यकारी अधिकाऱ्यांची भीति खरी ठरली. स्थानिक नेतेमंडळी दुकानदारांचा जत्था घेऊन प्रांतांभोवती कोंडाळं करून उभी राहिली. पोलीस तातडीने त्यांना हटवू लागले. प्रांतांभोवती कॉर्डन केले. प्रांतांनी जत्थ्यातल्या पाच सहा जणांना कॉर्डनच्या आत घेतले. अल्प परिचित असे काही स्थानिक नेते होते. त्यांचे बोलणे केवळ लक्ष देऊन ऐकले. काहीही बोलले नाहीत. कारवाई चालूच होती. कार्यकारी अधिकारी एक डोळा या घडामोडींवर ठेऊन बुल्डोझरला सूचना देत होते. मंडळ बोलून ओरडून थकल्यावर प्रांत म्हणाले, मी आलोय इथे सहा महिन्यांसाठी. ही जागा सुंदर झाली तर तुमच्यासाठीच होणार आहे. पुन्हा आरडाओरडा सुरु झाला. शांत झाल्यावर पुन्हा प्रांत म्हणाले, आजार हाताबाहेर जायच्या आत पाय जसा कापावा लागतो, तसंच हे अतिक्रमण हटवणे आहे. अर्धा पाऊण तास हुज्जत घालूनही काही फरक पडत नाही म्हणल्यावर सर्वांनी वस्तुस्थिती स्वीकारली. प्रांतांचा फोन स्विच ऑनच होता. पण स्थानिक मंत्री/ आमदार कुणाचाच फोन आला नाही. कारवाई पार पडली. ठरल्याप्रमाणे.

या अनुभवानंतर शहराला कडक मेसेज गेला. हे अतिक्रमण हटाव दुकानांचे होते. परंतु पुढच्याच आठवड्यात प्रांतांनी प्रतिष्ठित अशा सिव्हिल टाउनशिपमध्ये, रेसिडेन्शियल एरियात बुल्डोझर नेला. लोकांनी प्लॉटच्या सीमेला खेटून घरे बांधली होती, आणि ड्रेनेज व रस्त्यांवर साताठ फूट पुढे कुंपण घालून गॅरेज, आउटहाउस आणि बागा केल्या होत्या. रस्त्याच्या नावाला चिंचोळ्या गल्ल्या ठेवल्या होत्या. या वस्तीत सगळे पांढरपेशे होते. रस्त्यात विरोध कुणीच केला नाही; थोडीफार फोनाफोनी करण्याचा निष्फळ प्रयत्न मात्र झाला. सगळ्या बागा, गॅरेजिस अडीच तीन तासांत जमीनदोस्त झाल्या. यानंतर मात्र शहरात एकाच वेळी भीति आणि आशेचे वातावरण पसरले.

यानंतर दीडच महिन्यांत सहा मोठे ड्राइव्ह काढून शहरभरात मोठमोठाली अतिक्रमणे हटवली गेली.

पण गोष्ट ही नाही. गोष्ट वेगळीच आहे.

*********

विभागीय आयुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी येणार होते. त्यांनी कलेक्टरांना सांगीतले, एडीमना बोलावून घ्या. अतिक्रमणांचा रिव्ह्यू घ्यायचाय. कलेक्टरांनी एडीएमना तसे सांगताच एडीएम, अर्थात आपले प्रांत, डिटेल्ड नोट तयार करून वेळेआधी अर्धा तास कलेक्टरांच्या चेंबरमध्ये हजर झाले.

इस्पातनगरचा कारभार बराचसा स्वतंत्र चालायचा. बारकाव्यांमध्ये कलेक्टर लक्ष घालत नसत. त्यांना या पाडापाडीची कल्पना होती. पण नोटमध्ये दिसत असलेला प्रांतांचा स्कोर इम्प्रेसिव्ह होता.

नोट डोळ्यांखालून घातल्यावर कलेक्टर प्रांतांना म्हणाल्या, ‘अजित, तुझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये या कमिशनरांसोबत तुझा काही इश्यू झालाय का?’ कलेक्टर थोड्या कोड्यात पडल्या होत्या. प्रांतांच्या डोक्यात हे कोडे तातडीने सुटले, पण त्यांनीही कोडे पडल्यासारखा चेहरा करून ‘का मॅडम’ असं विचारलं.कलेक्टर म्हणाल्या, ‘अरे एवढं मस्त काम चाललंय, पेपरात पण येतंय, आणि तरीही हे कमिशनर मला सारखे विचारत असतात, नवा एडीएम काही करतोय का, त्याला बसू देऊ नको, अतिक्रमणं निघाली पाहिजेत.’

प्रांत क्षणभर थांबले. म्हणाले. मॅडम. मी यावर काही बोललो तर ते खरं तर ठीक होणार नाही. शॅल आय टॉक सम शॉप? दॅट मे हेल्प सॉल्व्ह युवर पझल.

कलेक्टरांनी प्रांतांकडे नुसतेच पाहिले. डोळ्यांत. प्रांत थोडे थांबले. मग म्हणाले,‘माझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये पन्नास वर्षांत कधी बुल्डोझर चालला नव्हता तो पहिल्यांदा चालला. सबडिव्हिजन जेलच्या भिंतीला खेटून पंचवीस पक्की दुकाने होती. कसल्याही गडबड-गोंधळाशिवाय शिस्तीत पाडली. कुणीही मोबदला वगैरे मागायला आलं नाही. माझ्या सबडिव्हिजनमध्ये दोन नगरपालिका होत्या. तिथेही जागांचे भाव खाणींमुळे वाढलेले होते. तिथे दोन ऑपरेशन्स केली. हजार लोक मोर्चा घेऊन आले होते. मी त्यांना सांगीतलं होतं, मी पोलीस परत पाठवतो, आणि एकटाच पाडतो. ज्याला अडवायचं असेल ते समोर या. तेही शिस्तीत पार पडलं. पुढचं टारगेट काही मोठ्या इमारती होत्या. मीनव्हाइल राजकारण सुरू झालेलं होतं. कुणाच्या सांगण्यावरून ही पाडापाडी होतीय यावरून स्थानिक आमदार आणि नगराध्यक्षांमध्ये जुंपली होती. नगरपालिका मला मुळीच सहकार्य करत नव्हती. नगराध्यक्ष कलेक्टरांकडे धरणे धरून बसले होते, प्रांतांना आवरा म्हणून. माझ्या तहसीलदाराला मंत्रालयातून फोन येत होते, आमच्या माणसांना का त्रास देताय म्हणून. मला कुणीही बंद करा म्हणत नव्हतं. आमदार अडचणीत आले होते, पण तेही मला फोन करून छान चाललंय असंच म्हणत होते. या परिस्थितीत मला तिथल्या कलेक्टरांकडून बंद करायची हिंट मिळाली.’

कलेक्टरांनी अविश्वासाने प्रांतांकडे पाहिले. ‘तुला एका डायरेक्ट ऑफिसरने बंद करायला सांगितलं?’

‘येस्स. हिंट दिली. त्या असं म्हणाल्या, जपून कर. लॉ अ‍ॅण्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्याला परवडणार नाही. जे करायचं ते एस्पीला विचारुन कर.’

‘मग एस्पी काय म्हणाले?’

‘एस्पी वॉज माय गुड फ्रेण्ड. ते म्हणाले गो अहेड. तुला हवा तेवढा फोर्स देतो.’

‘मग?’

‘मग काय, मला निरनिराळ्या असाइनमेंट देण्यात आल्या. आठवड्यात एकही दिवस मोकळा मिळत नव्हता. तहसीलदारही मला समजाऊन सांगू लागला की सर हा माणूस मंत्र्याना हेवी फायनान्सिंग करतो, आपल्याला या अमक्या अमक्या प्रकरणात अडचण होऊ शकते इत्यादि डायनॅमिक्स सांगू लागला. हायकोर्टात कशी गडबड चालते याचे दाखले देऊ लागला. सो आय गॉट द मेसेज. दरम्यान माझ्या बदलीची ऑर्डर आलेली होतीच.’

‘ठीक आहे. पण याचा आणि कमिशनरना तुझ्याविषयी असं वाटण्याचा संबंध काय?’

‘मॅडम, फार जवळचा संबंध आहे. कमिशनर मला कलेक्टरांच्या मार्फत ओळखत. मी रिलिव्ह झालो त्यादिवशी एस्पीकडे जेवायला गेलो होतो. एस्पी मला अनेक गोष्टी बोलले होते. त्यातली एक ही होती – त्यांना कलेक्टर एकदा म्हणाल्या होत्या, हा प्रांत काय नस्त्या उचापती करत बसलाय? उगीचंच पाडापाडी करायला लागलाय.’

‘धिस इज अनबिलिव्हेबल. कलेक्टरसाठी डायरेक्ट ऑफिसर हा फार मोठा रिलिफ असतो! शिवाय सर्विस फ्रॅटर्निटी असतेच की.’

‘इतक्या महत्त्वाच्या गोष्टीत जर कलेक्टरची ही अ‍ॅसेसमेंट असेल, तर माझ्या बाकीच्या कामांचं काय मूल्यमापन झालं असेल? तर मॅडम, कमिशनरना माझी ओळख एक अकार्यक्षम अधिकारी अशी झाली असेल, तर मला फार आश्चर्य वाटणार नाही. आणि तशी ओळख कमिशनरही मनात ठेऊन असतील, तर धिस पर्टिक्युलर रिव्ह्यू आल्सो हार्डली मॅटर्स!’

प्रांतांचा टोन थोडा कडवट झाला होता. कलेक्टर काहीच बोलल्या नाहीत. हसत हसत एवढंच म्हणाल्या, अजून चार महिन्यांनी तुला माझ्याच खुर्चीत बसायचंय तेंव्हा दुसऱ्या अधिकाऱ्याशी कसं वागायचं नाही याचा हा चांगला अनुभव मिळालाय तुला!’

*******
प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ
प्रांतांच्या गोष्टी - ४ भाग एक
प्रांतांच्या गोष्टी – ३ भाग १
प्रांतांच्या गोष्टी – ३ भाग २
प्रांतांच्या गोष्टी - २
प्रांतांच्या गोष्टी – १

कथाराजकारण

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

11 Feb 2011 - 8:12 pm | मस्त कलंदर

बरं झालं लिहिते झालात ते.. नाहीतर डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर मध्ये तुमच्या नावाची सुपारी द्यायचा बेत होता. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Feb 2011 - 10:59 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

श्रावण मोडक's picture

11 Feb 2011 - 8:24 pm | श्रावण मोडक

आगे बढो. पुढच्या गोष्टी वाचायच्या आहेत. एका सशक्त कथेची सामग्री आहे यात. आणि एकूण सारे लेखन पाहिले तर कादंबरीच. लिहा.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Feb 2011 - 10:59 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

स्वाती२'s picture

11 Feb 2011 - 9:38 pm | स्वाती२

हम्म!

निशदे's picture

11 Feb 2011 - 11:18 pm | निशदे

ही सगळी लेखमालाच खूप आवडली. अजून येउ देत.....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Feb 2011 - 11:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एकदा प्रांत धाग्यातून भेटल्याचा आनंद झाला.

सहज's picture

12 Feb 2011 - 12:58 pm | सहज

बरीच वाट पहायला लावलीत.

विसुनाना's picture

12 Feb 2011 - 4:17 pm | विसुनाना

नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन. पुढचे भाग लवकर येऊ देत.

सुधीर काळे's picture

12 Feb 2011 - 5:23 pm | सुधीर काळे

(आळश्यांचे) राजेसाहेब, धन्य आहे तुमची!
असे अधिकारी मिळाल्यावर भारताचे नक्कीच सोने होईल!! देव तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील असा (वडीलकीच्या हक्काने) आशिर्वाद देतो!
"To the last bullet" या विनीता कामटे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अशोक कामटे यांच्या अशाच कामगिरीची आठवण झाली. ते पुस्तक आपण वाचले नसेल तर जरूर वाचा.
जय हो!