सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
आधीच्या भागांचे दुवे :
मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी
मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी
मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव
मागे वळून पाहताना.. ४) घरातली चोरी
मागे वळून पाहताना.. ५) एस एस सी रिझल्ट आणि एम इ स कॉलेज
-----------------------------------------------------------------------
लायब्ररीतले काम, शिवणाचा क्लास असे दिवस चालले होते.अशातच एक दिवस पेठे नानासाहेबांना भेटले. तळेगाव ढमढेर्याच्या एका शाळेचे सेक्रेटरी असलेले पेठे नानासाहेबांच्या परिचयाचे होते. तेथे गणित,सायन्स शिकवायला शिक्षक हवा होता. नानासाहेबांना पेठ्यांनी कोणी ओळखीतले असल्यास सांगा असे विचारल्यावर त्यांनी माझे नाव सुचवले. आम्ही पुण्यात राहत होतो आणि नोकरी होती तळेगाव ढमढेर्याला. एकटी १७,१८ वर्षांची मुलगी कशी पाठवायची? आईचा जीव होईना.. पेठे म्हणाले, आमच्या घराजवळच व्यवस्था करतो. त्यांना ड्रॉइंग टिचरचीही गरज होती म्हणून मग मी आणि मंदा, म्हणजे आमच्या मामेकाकांची मुलगी अशा आम्ही दोघी तेथे रुजू झालो. दोन तरुण मुलींनी अनोळखी गावात नोकरीसाठी राहणे,परिस्थितीच्या रेट्यामुळे का होईना जरा धाडसीच पाऊल होते. एकतर शाळा खेडेगावातली, शाळेत बहुतेक पुरुष शिक्षकच! त्यात आम्ही दोघी १७,१८ वर्षाच्या पोरसवदाच मुली. शिकवायचे वर्ग १०वी,११वी आणि विषय बीजगणित, भूमिती, अंकगणित, सायन्स! त्या वर्गातली काही मुलेच १७,१८ वर्षांची असतील आणि हीऽ ताडमाड... मी तर कायम मुलींच्या शाळेत शिकलेली. घरात भाऊ होते तेवढाच मुलांशी संपर्क! सुरुवातीला पोटात गोळा आला पण मग सवय झाली, मला मुलांची आणि मुलांनाही माझी!
वर्षभर तिथे नोकरी केली आणि मंदाचे लग्न ठरले. आता मी एकटीच तिथे कशी राहणार? आईला तर फार काळजी वाटू लागली पण दरम्यान कला एसेसी होऊन तिने एस टी सी पूर्ण केले होते त्यामुळे तिला तेथे नोकरी मिळाली. आम्ही दोघी तळेगाव ढमढेर्यात राहू लागलो. कला ट्रेन्ड होती त्यामुळे तिला ११५ रु मिळत आणि मी अनट्रेंड,त्यामुळे मला ११०रु! आम्ही अगदी काटकसरीने राहत असू. आमचा दोघींचा अंदाजे खर्च ५० रु पर्यंत होत असे, बाकीचे घरी देत असू. आठवडी बाजारात काही वस्तू स्वस्त मिळत त्या घेऊन ठेवून पुण्याला नेत असू. रुपयाला ५शेर मूग, ७रु ला १० शेराची गूळाची ढेप पुण्याला नेलेली आठवते आहे. बहुतेकदा आम्ही दोघी शनिवारी शाळा झाल्यावर पुण्याला जात असू आणि सोमवारी शाळेची वेळ व्हायच्या आधी परत येत असू. त्यावेळी आम्ही कशा राहत होतो हे आठवले तरी काटा येतो. एकच खोली, तीच ड्रॉइंगरुम, बेडरुम, किचन सर्व काही! स्वयंपाक स्टोव्हवर करत होतो. त्यासाठी रॉकेल मिळवायचे म्हणजे एक दिव्य असे. शिवाय घरात वीज नव्हतीच,नळही नव्हते. कावडीने पाणी आणत असत त्यांच्याकडून विकत घ्यायचे, ते साठवायचे. उंदीर घुशींपासून वाचवायचे.नदीवर कपडे धुवायला जायचे म्हणजे तेवढेच पाणी वाचत असे आणि मुख्य म्हणजे घरात शौचगृह नाही! एवढे सगळे करुन १० वी,११वी ला अंकगणित,भूमिती,सायन्स शिकवायचे त्याची तयारी तर करावीच लागत असे. पेपर काढणे,तपासणे इ. होतेच. एक मात्र झाले, तेथे एकटे राहण्याने निर्णयक्षमता,आलेल्या परिस्थितीला नेटाने तोंड देणे याचे नकळत शिक्षण मिळत होते.
पानशेतच्या पुराच्या वेळी मी आणि कला तळेगाव ढमढेर्यातच होतो. तेथे काही पुराचा त्रास झालेला नव्हता पण आमच्या घरातले बाकीचे सगळे पुण्यात होते. ते कोणत्या परिस्थितीत आहेत? हे समजायला काहीच मार्ग नव्हता. शाळा,कॉलेजे बंद होती हे वर्तमानपत्रातून आणि रेडिओवरुन समजले होते.आमच्याकडे कुठला रेडिओ? सेक्रेटरी पेठ्यांनी आम्हाला हा निरोप पाठवला होता. त्याकाळी काही आजच्या सारखे फोन नव्हते. काळजी करण्याखेरीज आमच्या दोघींच्या हातात दुसरे काहीच नव्हते. आमची धाकटी बहिण निर्मल असेल त्यावेळी ११,१२ वर्षांची. नानासाहेबांनी तिला आमचा पत्ता दिला आणि एकटीला एस टी त बसवून घरची खुशाली सांगण्यास पाठवले. एवढीशी ११,१२ वर्षांची निर्मल स्टँडवर उतरुन घर शोधत आमच्या खोलीवर आली आणि घरचे खुशाल आहेत हे तरी समजले.
येथे आम्ही दोघी नोकरी करत असताना दिवाळीच्या सुटीत नरसोबाच्या वाडीला जाण्याचे ठरले. आई, नानासाहेब, आत्या, शेजारच्या बापटवहिनी ,मी आणि लहानगा गोपाळ असे सगळे वाडीला जाण्यासाठी निघालो. आधी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले,देवीची ओटी भरली. रंकाळा तलाव पाहिला आणि बसने पुढे वाडीला जाण्यासाठी निघालो. आमच्या तळेगावच्या अंगणात औदुंबराखाली वाडीच्या पादुका आहेत, त्यामुळे दरवर्षी आमच्या घरातील कोणी ना तरी एक जण गुरुद्वादशीला तेथे जात असत.तेव्हा काही हॉटेलातून राहणे एवढे प्रचलित नव्हते आणि देवदर्शनाला गेल्यावर तर अजिबातच शक्य नव्हते. तेथीलच एका गुरुजींकडे आम्ही म्हणजे आमच्यापैकी जे कोणी जातील ते दरवर्षी उतरत असू, तेच आम्ही राहण्याजेवण्याची व्यवस्था करत असत.त्याप्रमाणेच ह्यावर्षीही आम्ही तेथे गेलो. दिवाळी नुकतीच झालेली होती. थंडीचे दिवस, लवकर उजाडत नसे. आम्ही बायका सगळ्या पहाटेच उठून घाटावर स्नानासाठी गेलो. नानासाहेब आणि गोपाळ गुरुजींच्या घरीच होते.आम्ही सगळ्याजणींनी स्नान केले. तेथे दीपोत्सवासाठी पाण्यात दिवे सोडतात. अनेकजणींनी सोडलेले,लाटांवर हेलकावे घेत तरंगणारे ते दिवे पहाटेच्या अंधुक प्रकाशात फार सुंदर दिसतात. आम्हीही दिवे सोडत असू, त्याप्रमाणे एक पणती मी पाण्यात सोडली.ती लाटांवर तरंगू लागली. दुसरी पणती पाण्यात सोडणार एवढ्यात ती वार्याने विझली. ती लावण्यासाठी मी पाण्यात सोडलेली पणती घेण्यासाठी वाकले पण तरंगत ती आत गेली होती. मी हात लांब करुन पणती घेण्याचा प्रयत्न करत असताना पाय निसटून पाण्यात पडले आणि भोवर्यात सापडले. मला बिलकुलच पोहता येत नाही, मी गटांगळ्या खाते आहे हे पाहून बापटवहिनींनी मला हात दिला परंतु पाण्याला इतकी ओढ होती की त्याही आत खेचल्या गेल्या आणि आम्ही दोघीही गटांगळ्या खाऊ लागलो. त्यांचा एक हात वर दिसत होता ,तो पकडायचा आईने प्रयत्न केला पण तीही पाण्यातच ओढली गेली.हे सगळे नाट्य अवघ्या क्षणादोनक्षणातच घडले. आम्ही पाण्यात खोल खोल जाऊ लागलो.
दरम्यान आत्या घाटाच्या ५,६ पायर्या चढून वर गेली होती. तिने मागे पाहिले तर आपल्या बरोबरच्या तिघी जणी दिसेनात.अजून पूर्ण उजाडलेले नव्हते. नीट पाहता आम्ही पाण्यात बुडत असल्याचे तिच्या लक्षात आले. आम्हाला धरायला न येता प्रसंगावधान राखून आरडाओरडा करुन तिने घाटावर असलेल्या लोकांना बायका बुडाल्याचे सांगितले. थोड्याच वेळात कोणीतरी उंचनिंच व्यक्ती केसाला धरुन ओढते आहे असे जाणवले. त्याने मला आणि बापटवहिनींना बाहेर काढले. आत्याने अजून एक बाई आहे म्हटल्यावर परत जाऊन आईला बाहेर काढले. काही पायर्या त्या व्यक्तीने हाताला धरुन चालवलेले जाणवत होते.पूर्ण घाट चढून आम्ही तिघी वर आलो, जिच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळाले त्या व्यक्तीला कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही काही बोलणार तर ती व्यक्ती कोठेच दिसेना! जवळजवळ ६ फूट उंच,पिळदार अशी ती व्यक्ती होती एवढेच धूसर आठवत होते. घरी आल्यावर नानासाहेबांना आणि गुरुजींना ही घटना समजली. नरसोबाची वाडी एवढेसे तर गाव, त्यातून गुरुद्वादशीच्या उत्सवाला सगळे गाव लोटते तेथे तरी हा माणूस सापडेल आणि आपण त्याला धन्यवाद देऊ शकू ह्या विचाराने आम्ही सर्वांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काही तपास लागू शकला नाही. त्या सर्वशक्तिमान नियंत्यानेच आम्हाला ह्या जीवावरच्या संकटातून वाचवले अशीच आम्हा सर्वांची धारणा आहे.
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 1:58 pm | यशोधरा
बरेच दिवसांनी लिहित आहात...
5 Jan 2011 - 3:00 pm | स्वाती दिनेश
सर्व सहाही भाग आत्ताच वाचले, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
स्वाती
5 Jan 2011 - 3:20 pm | बिपिन कार्यकर्ते
खूप अंतराने आला हा भाग! वाचनियच. जुन्या काळातले जीवन चित्रमय रेखाटले आहे. वाडीचा अनुभव वेगळाच!
5 Jan 2011 - 6:24 pm | मदनबाण
आधी कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले,देवीची ओटी भरली. रंकाळा तलाव पाहिला आणि बसने पुढे वाडीला जाण्यासाठी निघालो
हा क्रम वाचुन फार बरं वाटल... अगदी असाच अनेक वर्ष आमचा देखील प्रवास झाला आहे. :)
(वाडीकर)
5 Jan 2011 - 6:26 pm | मितान
खूप दिवसांनी आलात....
सर्व भाग एकत्र वाचले. आवडले. पुढचा भाग लवकर येऊ द्या :)
5 Jan 2011 - 10:46 pm | चिंतामणी
खूप दिवसानी आपल्या लिखाणाचा पुढला भाग वाचुन छान वाटले. तुमच्यावर वाडीला गुदरलेला प्रसंग वाचुन आणि त्यातुन आपण कश्या वाचल्या हे वाचुन काय लिहावे हेच कळत नाही.
पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत आहे.
(सर्वासांठी एक फोटो ठेवत आहे वाडीचा)
5 Jan 2011 - 11:34 pm | मी-सौरभ
पु.ले.शु.
6 Jan 2011 - 4:25 am | रेवती
सहावा भागही चांगला उतरलाय.
अगदी साध्या शब्दात लेखन असल्याने जवळचे वाटते.
8 Jan 2011 - 12:33 am | लीलावती
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
8 Jan 2011 - 10:45 am | शिल्पा ब
मस्त लेख....जुन्या काळचे चित्रण आवडले.