आधीच्या भागांचे दुवे :
मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी
मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी
मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव
मागे वळून पाहताना.. ४) घरातली चोरी
-----------------------------------------------------------------------
१ जानेवारी ५७ रोजी आम्ही पुण्यात रहायला आलो. तळेगावच्या तिमजली घरातून भोमेवाड्यातदोन खोल्यात आलो. त्यातही एक खोली खाली आणि एक वर होती. चुलतभाऊ,वहिनी तेथे राहत होतेच. एवढ्या माणसांनी दोन खोल्यात राहणे शक्य नव्हते. लवकरच आम्हाला तेथून अगदी जवळच एटीफिट रोडवर गुरुजी बंगल्यात तीन खोल्या ६५रु. भाड्याने जागा मिळाली. तेथेही दोन खोल्या एकत्र होत्या आणि तिसर्या खोलीत बाहेरुन जावे लागे. घरात एवढी माणसे आणि अपुरी जागा. हल्लीच्या मुलांच्या १०वीला पालक ठेवत असलेली बडदास्त पाहिली की माझ्या एसएससीची आठवण होतेच होते. कसे दिवस होते ते, किती स्थित्यंतरे त्या एकाच वर्षात पाहिली मी! जानेवारीत तळेगाव सोडून पुण्याला आलो आणि लगेचच ३ महिन्यात परीक्षा होती. खूपच धावपळ झाली होती. गाइड,२१ अपेक्षित असले प्रकार अस्तित्त्वातच नव्हते आणि क्लासला फक्त अगदी ढ किवा अतिश्रीमंत मुलेच जात असत.
त्यात सिलॅबस बदललेली आमची पहिली बॅच होती. १०० मार्कांचे हिंदी सक्तीचे आले होते. इंग्रजी , मराठी होतेच. फिजिक्स केमिस्ट्री एकत्रित १०० मार्काचा पेपर होता. सोशल स्टडीज, जनरल सायन्स आणि एलेमेंटरी मॅथेमॅटिक्स हे तीन किवा ह्यापैकी कोणतेही दोन विषय घेता येत असत,त्यात मी सोशल स्टडीज सोडून उरलेले दोन विषय घेतले होते. तसेच स्पेशल अॅरथमॅटिक किवा संस्कृत यापैकी एक निवडता येत असे. मी स्पे. अॅरथमॅटिक घेतले होते. म्हणजेच ३ भाषा, २ गणित, २ सायन्स असे एकूण सात विषय मी घेतले होते. तेव्हा सात किवा आठ विषय घेऊन एसएससीला बसता येत असे. आधी तळेगावहून शाळेला येत असू, मग चोरीचा धक्का बसल्यावर पुण्याला रहायला आलो, नवीन जागा,नवीन वातावरण! परीक्षा अगदी दोन महिन्यावर आलेली होती त्यात शनिवार रविवारी तळेगावला जात असू. मनाला स्वस्थता नव्हती. अशा परिस्थितीतच पेपर दिले. रोज दोन पेपर आणि तिसर्या दिवशी एक पेपर अशी साडेतीन दिवसात परीक्षा संपत असे. सुटीत पुन्हा तळेगावला गेलो.
दोन महिन्यांनी सुटी संपून ११वीचा रिझल्टचा दिवस आला. आमच्या पूर्ण वर्गात मीच एकटी इंग्रजीत नापास झाल्याचे समजले. नानासाहेब शाळेतच असल्याने त्यांनी पुस्तकात आधीच निक्काल पाहिलेला होता पण ते आधी मला काही बोलले नाहीत. जरी इतकी स्थित्यंतरे झालेली होती,अडचणी आल्या होत्या तरी मी नापास होण्याइतकी वाईट परिस्थिती अभ्यासात कधीच उद्भवलेली नव्हती. मलाही मी नापास होईन असे कधीच वाटले नव्हते. खूपच निराश झाले, कारण नानासाहेब आम्हा बहिणींना नेहमी म्हणायचे नापास झालात तर लग्न लावून देईन. त्याकाळी एसएससीच्या मांडवाखालून गेले की लग्नाच्या मांडवाखालून जाणेही अगदी सर्रास होते. आजूबाजूच्या मुली, आमच्या मावस, आत्येबहिणीं ची उदाहरणे बघत होतोच. पण मला मात्र अजून शिकायचे होते, निदान ग्रॅज्युएट तरी व्हायचे होते. नानासाहेब स्वतः गणित घेऊन बी ए झाले होते त्यामुळे त्यांनाही आम्ही मुलींनी शिकावे असे वाटत होतेच. त्यांनी मला व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करायला सांगितला आणि काही दिवसांनी पास झाल्याचे रीतसर पत्र आले.
एसएससी पास झाल्याचे मार्कशीट मिळाल्यावर अर्थातच खूप आनंद झाला. एम इ एस कॉलेजला सायन्सला अॅडमिशन घेतली. सकाळी ७ चे पहिले लेक्चर असे. त्यावेळी आम्ही गुरुजी वाड्यात एटीफिट रोडला राहत होतो. इतर बहिणी सायकल चालवायला शिकल्या पण मला मात्र भीती वाटत असे. त्यामुळे कॉलेजला जाताना जिमखान्यापर्यंत बसने आणि पुढे चालत जात असे. पावसात आणि थंडीत खूप त्रास होत असे, स्वेटरही नव्हता. मोजक्याच चार साड्या. पण शिकायला मिळत होते हेच खूप होते. त्यावेळी ए आणि बी असे दोन ग्रुप असत. ए ग्रुप मध्ये हायर मॅथ्स असे तर बी ग्रुपमध्ये बायोलॉजी. मी इंटरला ए ग्रुप घेतला होता. त्यावेळी इंटर पास होणे जरा कठिण असे.त्यात रमेश आणि भगवान दोघांनीही इंटरला धक्का खाल्ला होता त्याची भीतीही होतीच. एकतर आम्ही ८ वीपासून इंग्रजी शिकलो आणि कॉलेजात सगळेच विषय इंग्लीशमधून शिकवत. बोलताना तर भलताच न्यूनगंड वाटत असे. पुन्हा हे नानासाहेबांना काही सांगायची ,बोलायची सोय नाही. त्यांचे इंग्लिश उत्तमच होते. ते फर्डी भाषणेही इंग्लिशमधून देत असत.
नेटाने आपला आपणच अभ्यास करुन मी इंटरला व्यवस्थित पास झाले पण पुढच्या डिग्री च्या शिक्षणासाठी पैशांची सोय होणे जरा कठिण होते. कलाही तोवर एसएससी झालेली होती. बाकीच्या बहिणी शाळेत शिकत होत्या, त्यांची शिक्षणे आवश्यक होतीच. रमेश इंजिनिअरिंग करत होता. तो सांगलीत हॉस्टेलवर राहत होता. त्यालाही पैसे पाठवावे लागत. त्यात चोरी झाल्यामुळे पैशाचा प्रश्न अजूनच आ वासून होता. शेवटी नाइलाजाने कॉलेज बंद करायचा निर्णय घेतला.नानासाहेब सकाळी आणि संध्याकाळीही ट्यूशन घेत असत,शिवाय व्ह.फा.चे गणिताचे साधारण १००० पेपर तपासतअसत. त्याकाळी एका पेपरामागे चार आणे मिळत. हे पेपर नुसतेच तपासणे नसे तर बरीच लिखापढी असे. प्रश्नवाइज गुण लिहून कार्बन पेपर घालून मार्कांच्या याद्या तयार करणे हे एक मोठेच काम असे. ते बहुतेकदा मीच करु लागले. लक्ष्मी रोडवरच्या एका लायब्ररीत २० रु पगारावर ३-४ महिने नोकरी केली. ते काम अर्धवेळच होते म्हणून मग उरलेल्या वेळात शिवणाच्या क्लास केला. लायब्ररीतले काम करत असताना पुढे शिकण्याची इच्छा डोके वर काढत असेच पण तूर्त तरी त्यावर मार्ग नव्हता.
प्रतिक्रिया
24 Nov 2010 - 3:01 pm | ढब्बू पैसा
खूप नाटयमय न करता ओघवतं लेखन! हा पण भाग सुंदर झालाय आधीच्या भागांप्रमाणेच. पुढचे भाग लवकर येउद्या!
24 Nov 2010 - 3:05 pm | गणेशा
छान लिहिला आहे भाग .. आवडला ..
लिहित रहा .. वाचत आहे ..
24 Nov 2010 - 3:08 pm | निवेदिता-ताई
छान् लिहिलय ...
24 Nov 2010 - 3:13 pm | नगरीनिरंजन
खूप ओघवते आणि यथाघटित वर्णन केले आहे पण वर्णनातला तपशील वाचून ते दिवस तुमच्या मनावर कोरले गेले असतील असं वाटलं. लिहीत राहा. एखाद्या माणसाचं आयुष्य हे कोणत्याही गाजलेल्या कादंबरीहून तिळमात्रही कमी सुरस नसतं असंच वाटतं हे वाचून.
24 Nov 2010 - 5:45 pm | पात्र
छान् लिहिलय ...
24 Nov 2010 - 6:58 pm | लॉरी टांगटूंगकर
एस एस सी का बरे अशी लक्षात राहते कळत नाही .खरे तर दरवर्षी असाच काहीतरी रिझल्ट घेत असतो आपण .पण तरी हि .....................असो माझ्या एस एस सी च्या आठवणी फारश्या चांगल्या नाहीत .मार्क कमी पडले आणि मग .......................
24 Nov 2010 - 7:40 pm | स्वाती२
हा भाग ही आवडला. पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
25 Nov 2010 - 2:31 am | रेवती
खुपच छान लिहिलाय हा भाग!
पुढचा भाग लवकर लिहावा हि विनंती.
5 Jan 2011 - 1:32 pm | लीलावती
मध्यंतरी काही कारणांमुळे मिसळपाववर येऊ शकले नाही त्यामुळे उशीराने धन्यवाद देते आहे.
तसेच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!