आधीच्या भागांचे दुवे :
मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी
मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी
मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव
-----------------------------------------------------------------------
आमच्या शाळेत इतके वर्ष युनिफॉर्म नव्हता पण ती पध्दत आता सुरू झाली होती. पोपटी रंगाची साडी आणि तिला चटणी रंगाचे काठ असा युनिफॉर्म होता. आठवीपासूनच मी साड्या नेसायला लागले होते, सगळ्याच मुली आठवी, नववीपासून साड्या नेसायला लागत. स्कर्ट घालणार्या अगदीच थोड्या आणि पंजाबी ड्रेस तर फारसा प्रचलित नव्हताच. तो साडीचा बोंगा सांभाळत उन्हापावसात,चिखलातून रोज घोरावाडीहून शिवाजीनगरला शाळेसाठी येत असू. मी, कला,प्रमिला, रमेश, भगवान शिवाजीनगरला उतरुन रेव्हेन्यु कॉलनीतून चालत एटीफिट रोडला येऊन आम्ही मुलींच्या शाळेत तर ते दोघे मुलांच्या शाळेत जात. संध्याकाळी परत एकत्र घरी. नानासाहेब सकाळी लवकरच ट्यूशनसाठी पुण्याला जात आणि शाळा सुटल्यावरही ट्यूशनची एक बॅच करुन उशिरा घरी परत येत.
एके वर्षी त्यांनी मुलांच्या शाळेची सिलोन येथे ट्रीप ठरवली होती त्यावेळी आईचे दिवस अगदी भरत आले होते पण शाळेची ट्रीप ऐनवेळी रद्द कशी करणार? ताईमावशी मदतीला आली असल्याने आईने त्यांना ट्रीप घेऊन जायला सांगितले. रमेश,भगवानही त्यांच्याबरोबर ट्रीपला गेले होते. दसर्याच्या दिवशी आई बाळंत होऊन मुलगा झाला परंतु दोनच दिवसात बाळाची प्रकृती एकदम बिघडली. बाळाला न्यूमोनिया झाला होता. तळेगाव स्टेशनला हॉस्पिटल मध्ये बाळाला घेऊन ताई मावशीबरोबर गेलो. त्यावेळी फोन बिन काही नव्हते. घरात कळती अशी मीच होते,असेन १३,१४ वर्षांची. मुकुंददादा पुण्यात होता. आईला एकंदर परिस्थितीचा अंदाज आला असावा.तिने मला पुण्याला मुकुंददादाकडे जाऊन सविस्तर निरोप सांगून लगेच येण्यास बजावले. तेथेही वहिनी आणि २ वर्षाचा पुतण्या घरात होता. दादा कामावरुन आल्यावर त्याला लगेच धाडन्यास सांगून मी परत आले. इकडे बाळाची प्रकृती खूपच बिघडली आणि संध्याकाळी ६ च्या सुमाराला ते अवघे पाच दिवसाचे बाळ दगावले पण हॉस्पिटलातून घरी आणायाला वेळ लागला. दादा येईपर्यंत सात वाजून गेले होते. पुढे सगळे सोपस्कार झाले. तो दिवस कोजागिरीचा होता! नानासाहेब ट्रिपहून परत आल्यानंतर त्यांना ही दु:खद बातमी समजली.
ह्याचदरम्यान आमच्या समोरच्या इंदुलीकरांच्या घरात बापट कुटुंब रहायला आले. बापटकाका ऑर्डिनन्सला असल्यामुळे त्यांची देहूरोडला बदली झाली होती. ते आले तेव्हा दीपक अगदी तीन एक वर्षाचा असेल. त्यांचे दिवस भरत आले होते आणि अगदी अचानकच काकूंना कळा सुरू झाल्या. बापट मंडळी गावात नवीन, कसलीच सोय अजून झालेली नव्हती. पावसाचे दिवस, गोकुळाष्टमी होती. आईनेच बाजेपासून झबल्या टोपर्या दुपट्यांपर्यंतची सगळी सोय केली. सुईणीला बोलावली आणि गिरिषचा जन्म झाला. दोन्ही घरात देवाणघेवाण चालत असेच. आमच्याकडे रात्री जोंधळ्याची भाकरी असे आणि कधीकधी लहान अडीचतीन वर्षाच्या गोपाळला पोळीच हवी असे. त्याचा हट्ट ऐकू आला की बापटवहिनी हळूच पोळी घेऊन येत आणि त्याला वाढत. राजु, राजु म्हणत त्याचे खूप लाड करत. त्यावेळी जमलेला स्नेह,दोन्ही घरातला जिव्हाळा अजून तसाच टिकून आहे.
त्यावेळी जरी आमच्याकडे शेतीचे धान्य येत होते तरी ते पुरे पडत नसे. मोठ्या कुटुंबासाठी घाऊक खरेदी करणे स्वस्त पडत असे. बापटकाका आणि नानासाहेबांनी मिळून घाऊक धान्यखरेदी करुन आणखी चारपाच जण जमवून सगळ्यांनी एकत्रित वाटून घ्यायचे ठरवले आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणली. धान्य खरेदी करुन बापटकाकांच्या घरी सगळी पोती रचली आणि मग ती पाच सहा जणांनी वाटून घेतली. ग्राहक संघ, ग्राहक पेठ अशी काही कल्पनाही त्यावेळी अस्तित्त्वात नसावी.
दरम्यानच्या काळात आमच्या आत्याच्या यजमानांनी सांगलीजवळच्या बुधगाव येथे थिएटर करता कर्ज घेतले होते आणि त्यासाठी नानासाहेब जामिन राहिले होते. आग लागून ते थिएटर जळाले आणि पैसे न भरल्याने जप्ती आली. ती चुकवायला जामिनकीचे आणि कर्जाचेही पैसे भरावे लागले त्याचे हप्ते जाऊ लागले. त्याकरता त्यांनी अजून ट्यूशन करायला सुरुवात केली. साहजिकच घरी यायला उशिर होऊ लागला. सोबतीसाठी आणि थोडेफार भाड्याचे पैसे येतील म्हणून घरात बिर्हाड ठेवावे असे ठरवले. आमच्या दोन घरांपैकी एका घराच्या भिंती,जमिनी सारवून घेऊन स्वच्छ करून घेतल्या. एटीफिट रोडवर सायकलने जात असताना नानासाहेबांना मोठा अपघात झाला होता. पायाला मोठीच दुखापत झाली होती.त्यामुळे तळेगावच्या घराच्या उंच पायर्या चढणे त्यांना त्रासदायक होत असे. पण मागचे दार रस्त्यातून सरळ अंगणातच उघडत असल्याने ते मागच्या दाराने येत असत. रिकाम्या केलेल्या घरात आता हे भाड्याने द्यायचे म्हणून आम्ही सगळे झोपलो. दुसर्या घरातल्या माजघरात एका मोठ्या मिलिटरीच्या ट्रंकेत सोनेनाणे, चांदीची भांडीकुंडी अशा मौल्यवान गोष्टी कुलुपात ठेवलेल्या होत्या. नानासाहेब रात्री घरी उशिरा आलेले कोणाला समजले नाही.
एव्हाना रमेश आणि भगवान दोघेही एस एस सी पास झाले आणि दोघांनी एफ वाय सायन्सला प्रवेश घेतला .दोघेही नापास झाले, म्हणून मग नानासाहेबांनी रमेशला त्याच्या एसेसीच्या मार्कांवर सांगलीला इंजिनिअरिंग डिप्लोमाला धाडले तर भगवानने आर्टस घेतले. मी त्यावेळी अकरावीत म्हणजे एसेसीला होते. अभ्यासासाठी मी पहाटे लवकर उठत असे तशीच त्याही दिवशी लवकर उठले तर न्हाणीच्या दाराला बाहेरुन कडी लावलेली दिसली. बाहेरच्या दारांनाही कड्या घातलेल्या होत्या. कंदिल घेऊन आम्ही घरभर पाहिले तेव्हा माजघरातील ट्रंक गायब झाल्याचे लक्षात आले. तसेच धावत बाहेर आले तर मागचे दार उघडे दिसले. धावत जाऊन पाहिले तर समोरच्या बोळात बत्तीखाली आमची ती मोठी ट्रंक रिकामी,उघडी टाकलेली दिसली. त्यातले सर्व सोनेनाणे चोरांनी लुटून नेले होते. हा मोठाच धक्का होता. चोर नक्की कोणीतरी माहितगार असावा,पाळत ठेवून हे काम केले असावे पण चोरीचा शेवटपर्यंत पत्ता लागला नाही. आम्हाला त्याची फारच दहशत बसली. आई तर दिवसदिवस अडीचतीन वर्षाचा भाऊ घेऊन एकटी असे. तिला तर त्या घरात राहणे अगदी अशक्य झाले. त्याचा परिणाम म्हणून आम्ही तळेगाव सोडले.
प्रतिक्रिया
20 Oct 2010 - 6:25 pm | गणेशा
भाग छान लिहिलेला आहे.. थोडासा धावता वाटला .. पण छान आहे.
मागील भाग अजुन वाचले नाही लवकर वाचेन ..
लिहित रहा .. वाचत आहे
-- गणेशा
20 Oct 2010 - 7:08 pm | रेवती
वाचते आहे. खूपच साध्या भाषेत पण सरभरीत वर्णन आहे. आवडले.
पुढचा भाग लवकर लिहावा हि विनंती.
21 Oct 2010 - 10:39 pm | पैसा
यावेळेला पुढचा भाग खूप दिवसानी लिहिलात काय?
20 Oct 2010 - 7:19 pm | यशोधरा
वाचते आहे...
21 Oct 2010 - 10:35 pm | शिल्पा ब
छान वर्णन...चोरी होण्याचे दुःख असतेच पण ओळखीच्याच माणसाने चोरी केल्याने जास्त वाईट वाटते...चुकीच्या माणसांवर विश्वास टाकला म्हणून.