मागे वळून पाहताना.. ३) सण आणि उत्सव

लीलावती's picture
लीलावती in जनातलं, मनातलं
26 Aug 2010 - 12:02 pm

आधीच्या भागांचे दुवे :


मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी

मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी

-------------------------------------------------------------

अशा ह्या साध्यासुध्या दिवसात टीव्ही हा प्रकार काय असतो ते माहित नव्हते आणि रेडिओ ही सर्रास सगळ्यांकडे नव्हते. खेळ सुध्दा सूरपारंब्या,लगोरी,लंगडी नाहीतर ठिकर्‍या खेळणे. इतर मुलींसारखे सागरगोटे विशेष खेळलेले आठवत नाही. कॅरम, बॅडमिंटन हे तर शहरी खेळ आणि त्या खेळाच्या साहित्यासाठी पैसे कुठे असत? पत्ते कधीतरी सुटीत खेळत असू आणि कवड्या तर खेळतच नसू. कवडी,कवडी विद्या दवडी! हे नानासाहेबांचे आवडते वचन होते.क्वचित कधी नाटक पाहणे होत असे. श्लोक,कवितांच्या भेंड्या लावणे हा एक आनंदाचा भाग होता. सुप्रसिध्द साहित्यिक अप्पा दांडेकर म्हणजे गावाची शानच! गावाच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा सहभाग असे. साधारण १९५०च्या सुमाराला त्यांनी गावातल्या हौशी मंडळींना एकत्र करुन 'सागराशी झुंज' नावाचे ऐतिहासिक नाटक बसवले होते आणि ते स्वत: , नीराबाई, माझे वडिल अशा सर्वांनी त्यात कामे केली होती. नाटकाचा प्रयोग गावातल्या विष्णुच्या देवळात झाला आणि पहायला आम्ही सर्व अगदी आई सुध्दा प्रयोगाला आली होती. प्रयोग खूप रंगलेला आठवतो आहे. त्यावेळी तळेगावात थिएटर नव्हते ,गावाबाहेर तंबू टाकून तेथे सिनेमाचे खेळ असत आणि पुण्यात थिएटर होते पण सिनेमे पाहणे काही फार चांगले समजले जात नसे त्यामुळे सिनेमा बादच! तरीही संत तुकाराम वडिलांनी मुद्दाम तंबूतल्या थेटरात नेऊन दाखवल्याचे आठवते. तसंच शाळेचे गॅदरिंग असायचे तेव्हा आईसुध्दा पुण्याला यायची आणि नंतर आम्हाला सगळ्यांना संभाजी बागेत नेऊन नानासाहेब भेळ आणि उसाचा रस देत असत. ती मोठीच पर्वणी वाटत असे.

शिवाय आपले सणवार असतच, तरीही सणांचे फेस्टिव्हल होऊन त्यांना ग्लॅमर प्राप्त झालेले नव्हते तर कुळाचार म्हणून आणि त्यानिमित्ताने चार लोकं एकत्र येत म्हणून सण साजरे केले जात.चैत्रपाडव्याला पूजा करुन गुढी उभारली जात असे. पक्वान्न श्रीखंड असे. आमच्या परीक्षा संपल्या की चैत्रातले हळदीकुंकू असे. वरच्या मोठ्या माडीत एका शिसवी पलंगावर चैत्रगौर मांडली जाई. तिच्याभोवती छान आरास करत असू. आंब्याची डाळ आणि गूळ घालून केलेले पन्हे असा नैवेद्य असे. जवळजवळ सगळ्या गावालाच हळदीकुंकवासाठी आमंत्रण असे. साधारण चार पायली म्हणजे सोळा शेर हरभरे मोठ्या हंड्यात भिजत घातले जात. संध्याकाळी गावातल्या बायका हळदीकुंकवासाठी येत असत.

चातुर्मासात रामायण पोथी वाचली जात असे. रोज एक अध्याय खंड न पडता रोज वाचायचा असे. बहुतेकदा नानासाहेबच अध्याय वाचत असत पण त्यांना यायला उशीर होणार असेल तर आम्हा मुलांपैकी कोणीही तो अध्याय वाचून खंड पडू देत नसू. अंगणातल्या औदुंबराखालच्या नरसोबाच्या वाडीच्या पादुकांसमोर गुरुचरित्राचे पारायण नानासाहेब करत आणि भावांनाही करायला लावत. घरातल्या देवांची पूजा बायका करीत नसत,पुरुषांपैकीच कोणीतरी एकजण सोवळ्याने करत,बहुतेकदा नानासाहेबच आणि सुटीत भावांपैकी कोणीतरी एकजण. बायकामुलींपैकी कोणी का नाही करायची घरच्या देवांची पूजा? असा प्रश्न मनातच राहत असे. तो विचारायची प्राज्ञा नव्हती. वटपौर्णिमेला सवाई वाड्यासमोरच्या बोळातल्या वडाच्या झाडाची पूजा गावातल्या बायका करत. दिव्याच्या अवसेला घरातले सगळे दिवे उजळले जात. जेवणातही दिवे आणि तूप असे. श्रावणात तर सणांची रेलचेल असे. नागपंचमीच्या आधी अंगणातल्या पाट्यावर मेंदी वाटत असू. त्या दिवशी पुरणाची दिंडे , एखादी उसळ, भात,आमटी असा स्वयंपाक असे. भाजायचे,चिरायचे नाही म्हणून पोळी, भाकरी , भाजी नसे. नारळीपौर्णिमेला गूळ घालून नारळीभात केला जाई. शुक्रवारी पुरणाची पोळी असे. चणे, दूधाचा नैवेद्य देवीला असे. पिठोरीला म्हणजे श्रावणातल्या अमावास्येला आई उपास करत असे. आई अतिथी कोण आहे? असे विचारत असे. मग आम्ही सगळे मी आहे,मी आहे ! असे उत्तर देत असू. रात्री खीरपुरीचे जेवण असे.

आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असे. आधीच्या शनिवार,रविवारी माजघराला भाऊ रंग देत असत. झाडून, सारवून माजघर लख्ख केले जाई. गणपती अर्थातच सोवळ्यामध्ये देवघरातच ठेवून आरास केली जाई. घरातच वीज नव्हती त्यामुळे लाइटिंग इफेक्ट वगैरे ची आरास नसे. पुठ्ठ्याला लावलेल्या बेगडाच्या कागदांनी मखर करत असू.दुपारी मोदक असत आणि रात्री आरत्यांची चढाओढ असे. त्यात दत्ताची श्रीकृष्णपंचगंगा.. ही आरती अगदी म्हणायचीच असा नेम असे. दुसर्‍या दिवशी गणपती बोळवला जाई. गौरी आणायला डोळसोबाच्या तिथे असलेल्या ओढ्यावर जात होतो. काठावरचे सात खडे वेचून, तबकात ठेवून ,तोंडात पाण्याची गुळणी धरुन न बोलता,मागे न पाहता अनवाणी घरी येत असू. बरोबर असलेली भावंडे घंटा,झांजा वाजवत असत. रांगोळीची पाऊले अंगणापर्यंत काढलेली असत. घावनघाटल्याचा बेत असे. तांदळाच्या पिठाची जाळीदार घावने आणि कणिक,गूळ,खोबर्‍याचे खिरीसारखे घाटले वर्षातून एकदाच होत असे.

पितृपक्षात एक दिवस श्राध्दपक्ष असे. सर्वपित्री संपतानाच नवरात्राचे वेध लागत. नवरात्रात पहिल्या दिवशी घट बसत. सप्तशतीचा पाठ वाचायला रोज ब्राह्मण येई. दसर्‍यापर्यंत कुमारिका,सवाष्णही जेवायला असे. त्यांना न्हायला सुध्दा बोलावले जाई. रोजचा स्वयंपाक सोवळ्यात असे. आई नैवेद्याला म्हणून रोज वेगवेगळे प्रकार करत असे पण ब्राह्मण, सवाष्ण इ. चे जेवण झाल्याशिवाय त्यातले आम्हाला काही मिळत नसे. त्याच सुमाराला सहामाही परीक्षा असत. त्यामुळे आमच्यासाठी साधा,वेगळा स्वैपाक आई करत असे आणि गोडाधोडाचे सोडून भाकरी,पिठले,भात असे खाऊन आम्ही पेपरला जात असू. आम्हाला त्या पक्वानांचा आस्वाद घरी आल्यावरच घेता येत असे त्याचे लहानपणी फार वाईट वाटत असे. दिवाळीत फराळाचे लाडू, चिवडा, शेव, कडबोळी, चकल्या, करंज्या,शंकरपाळे असे पदार्थ केले जात. एवढे सगळे फराळाचे सगळे घरातच केले जाई. आई एकटी तरी किती करणार? आम्ही अर्थातच चकल्या पाडायला, लाडू वळायला मदत करत असू. दोघं तिघं भाऊ घरीच आकाशकंदिल करत असत. त्या साठीची खळ बनवण्यापासून तयारी असे. मागच्या अंगणात औदुंबराखाली,पुढे ओट्यावर पणत्या लावत असू. आवाजाचे फटाके विशेष असे नसतच, फक्त फुलबाज्या आणलेल्या आठवत आहेत. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अंघोळी करुन देवाला नेवैद्य दाखवून मगच आम्हाला फराळाचे दिले जाई.

संक्रातीला तिळगूळ, गुळाची पोळी आणि होळीला पुरणाची पोळी असे. शिवाय आमच्याकडे वार्षिक बोडणे असत. म्हणजे वर्षातून एकदा बोडण भरायचे असे. त्यासाठी सवाष्णी, कुमारिका लागत. पुरणपोळीचा नेवैद्य असे. दिवाळीच्या, मे महिन्याच्या सुटीत आमच्याकडे मावशी किवा आत्या मुलाबाळांसकट येत असत तेव्हा बहुतेकदा आई बोडण भरुन घेत असे. बोडण भरण्यातली मोठी अडचण म्हणजे घरातली कोणी बाई गरोदर असेल तर बोडण भरता येत नाही. तसेच चातुर्मासातही बोडण भरता येत नाही. आई किवा वहिनीला दिवस असले की त्या वर्षीचे बोडण राहून जाई. आई भिंतीवर अशी राहिलेली बोडणे लिहून ठेवत असे. पुढे बाबेच्या,चुलतबहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी अशी साचलेली बरीच बोडणे एकदम घालून घेतलेली आठवत आहेत. तसेच बोडण कालवायला मायलेकी एकत्र चालत नाहीत म्हणून मग पुढे आमची लग्ने झाल्यानंतर सुटीत आम्ही माहेरी गेलो की वहिनीला आणि आम्हाला कालवायला बसवून आई त्या वर्षीचे बोडण भरुन घेत असे. घर मोठ्ठे असले तरी पाहुण्यांमुळे सुटीत अगदी गजबजून जाई, नानासाहेबांना सगळ्यांना आपल्याकडे बोलावण्याची भारीच हौस होती त्यामुळे असेल कदाचित पण आम्ही सुटीत कुठे असे नातेवाईकांकडे रहायला गेल्याचे फारसे आठवत नाही.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Aug 2010 - 12:07 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Aug 2010 - 12:20 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं. जुना काळ डोळ्यासमोर उभा राहीला...
आमची आजी सांगायची त्यांच्या ९ भावंडात ती ५वी . तिच्या आधी २ मोठ्या बहीणी आणि २ मोठे भाऊ होते. मग नंतर २ धाकटे भाऊ आणि मग २ बहिणी परत. तर सर्वात मोठी बहीण व भावंडात १ नंबर म्हणजे मोठ्या मावशी त्यांने नाव आवडी, दुसरीचे नाव गंगू. नंतरचे २ मामा (म्हणजे २ भाऊ ) त्यांची नावे राम, लक्ष्मण. नंतरची आमची आजी तिचे नाव अंबू. अशी सगळी जुन्या वळणाची नावे होती. त्यानंतरचे भाऊ आमच्या आजीच्या नंतर ५ वर्षांनी झाले. तेव्हा मोठ्या मावशी, मोठे मामा हे सगळे शाळेत जात होते. आजी देखील शाळेत जायला सुरुवात झाली होती. मग तिथे शाळेत नव्या विचारांचे वारे (इतक्या लहान वयात?). म्हणून मग या ५ मोठ्या भावंडांनी आई वडीलांवर दबाव आणून लहान भावंडांची नावे चांगली (नवीन वळणाची) ठेवायला लावली. म्हणून हे नंतरचे २ भाऊ, त्यांची नावे मधुकर,शरद आणि बहिणींची नावे मालती आणि कुंदा. :)
बोडण भरण्यातली मोठी अडचण म्हणजे घरातली कोणी बाई गरोदर असेल तर बोडण भरता येत नाही
यावाक्यावरून त्याकाळची थोडीफार कल्पना करता येईल.

मस्त लिहित आहात. पुढचे भागही येऊ देत पटपट.

खरंच छान !! आता सण फक्त नावापुरतेच. गेल्या वर्षी, जॉब लागल्यापासून तीन वर्षांत पहिल्यांदा मी दिवाळीला घरी होतो.

स्वाती's picture

29 Aug 2010 - 7:00 pm | स्वाती

सणवार कसे साजरे केले जात त्याचे वर्णन आवडले. पुढचे भाग वाचायला उत्सुक.

पैसा's picture

29 Aug 2010 - 7:59 pm | पैसा

असेच म्हणते

लीलावती's picture

20 Oct 2010 - 4:51 pm | लीलावती

मध्यंतरीच्या काळात गौरीगणपती, नवरात्र इ. मुळे मिसळपाववर येता आले नाही, आता उरलेले भाग लिहिण्याचा विचार आहे.
सर्वांना धन्यवाद.

यशोधरा's picture

20 Oct 2010 - 5:33 pm | यशोधरा

अरे वा! लवकर लिहा, वाट बघत आहे.

पर्नल नेने मराठे's picture

20 Oct 2010 - 5:31 pm | पर्नल नेने मराठे

मस्तच लिहिले आहे.

हा लेख वाचायचा राहून गेला होता.
नेहमीप्रमाणे ग्रेट लेखन आहे.
मलाही बोडण भरायला मजा येते.
माहेरी बोडणाची पद्धत नाही पण सासरी आहे; तेही फक्त कार्याचे बोडण!
मुलाच्या मुंजीनंतर पाच सवाष्णी आणि माझ्या भावाची अडीच वर्षाची मुलगी कुमारिका असे बोडण भरले.
खणाचे परकर पोलके नेसलेली गुटगुटीत कुमारिका पाहून सगळ्यांना इतका आनंद झाला.
तिलाही पंचामृतात एरवी इतकं कोण खेळू देणार म्हणून मजा आली.
बोडण कालवून झाल्यावर पुरणाने कुमारिकेचे हात स्वच्छ केले आणि पुरण चाटू दिले नाही म्हणून रागावली होती.;)

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 11:00 am | शिल्पा ब

नेहमीसारखाच छान लेख....जुना काळ अगदी डोळ्यासमोर उभा केलात..
एक दोन शंका आहेत : बोडण म्हणजे नक्की काय? अन नागपंचमीला भाजायचे चिरायचे नाही तर उसळ कशी करणार?

बाकी माझे आजोबासुद्ध असेच कोणतीतरी पोथी वाचायचे...नक्की आठवत नाही...सगळ्यांना ऐकू जावे म्हणून रामाच्या देवळात laudspeaker वरून त्यांची पारायणे चालायची...माझ्या दोन्ही आज्या सगळे सण वार छान करायच्या....लोकही भरपूर असायचे ...गावच होते ना..

लहानपण आठवले.

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 11:00 am | शिल्पा ब

नेहमीसारखाच छान लेख....जुना काळ अगदी डोळ्यासमोर उभा केलात..
एक दोन शंका आहेत : बोडण म्हणजे नक्की काय? अन नागपंचमीला भाजायचे चिरायचे नाही तर उसळ कशी करणार?

बाकी माझे आजोबासुद्ध असेच कोणतीतरी पोथी वाचायचे...नक्की आठवत नाही...सगळ्यांना ऐकू जावे म्हणून रामाच्या देवळात laudspeaker वरून त्यांची पारायणे चालायची...माझ्या दोन्ही आज्या सगळे सण वार छान करायच्या....लोकही भरपूर असायचे ...गावच होते ना..

लहानपण आठवले.