मागे वळून पाहताना.. २) मु. पो. घोरावाडी

लीलावती's picture
लीलावती in जनातलं, मनातलं
23 Aug 2010 - 11:29 am

आधीच्या भागांचे दुवे :

मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी

-------------------------------------------------------------------------

तळेगाव रेल्वे स्टेशन तसं आमच्या घरापासून बरेच लांब होते त्यामुळे रोज शाळेत जाताना गाडी पकडायला घोरावाडीला जात असू. त्यावेळी घोरावाडी स्टेशनाला प्लॅटफॉर्म तर नव्हताच आणि त्यात पुन्हा एक रुळ खाली तर एक वर! खाली जाण्यासाठी जिना नाही, उड्या मारुन, रुळ क्रॉस करुन जावे लागत असे. गाडी अगदी एखादे मिनिटच थांबत असे. पाऊस,सोसाट्याचा वारा अशामध्ये गाडीचे दार उघडून चढणे जिकिरीचे होत असे. पावसाळ्यात चिखल असेच. घरापासून घोरावाडी स्टेशनापर्यंत जायला १५,२० मिनिटे सहज लागत. कच्चा रस्ता,दोन्ही बाजूला शेती होती. तेथे तर पावसात भरपूर चिखल! सकाळी ९.३० ची गाडी गाठायची असे, ती चुकली तर शाळा बुडलीच! पावसाळ्यात गाडी हमखास लेट होत असे आणि साहजिकच मग शाळेला उशीर होत असे. पाऊस,चिखल,दगदग, उशीर असे अनेक त्रास असले तरी आम्हाला घोरावाडीहून शिवाजीनगर पर्यंतचा प्रवास आवडे. एकतर आम्ही सख्खीचुलत ४/५ भावंडे एकत्र प्रवास करत असू आणि दुसरे म्हणजे आमच्याबरोबर अप्पा दांडेकर असत. ते गोष्टीवेल्हाळ होते. तासाभराच्या त्या प्रवासात ते अनेक कथा रंगवून सांगत. एकदा आंतरशालेय नृत्यस्पर्धेसाठी त्यांनी आमच्या शाळेकरता एक शेतकरीगीत लिहिले होते भलरीगडी की असेच काहीसे त्या गाण्याचे बोल होते आणि तो नाच बसवण्यासाठी त्यांनी बराच पुढाकार घेतलेला आठवतो आहे. अर्थात त्या नाचाला पहिले बक्षिस मिळाले हे वेगळे सांगायला नकोच!

सकाळी शाळेत जाण्यापूर्वी जेवून, पोळीभाजीचा डबा घेऊन आम्ही निघत असू. घरचा गहू आणि जोंधळा येत असल्याने घरात सकाळी जेवणात भात,आमटी,पोळी भाजी आणि डब्यात पोळी आणि एखादी फळभाजी तर रात्रीच्या जेवणात भाकरी,पालेभाजी, तूरडाळीची आमटी, कोशिंबिर ,भात, दही असे. घर मोठे आणि दहा माणसे! ते तिमजली घर झाडायचे, शेणाने सारवायचे म्हणजे मोठाच व्याप असे. प्रत्येकाने एकेक खोली झाडायची असे. आमच्याकडे तेव्हा घरात नळ नव्हते. त्यामुळे पाणी भरायचे मोठेच काम असे. वापरायचे पाणी बाहेर असलेल्या नळावरुन भरावे लागत असे. प्रत्येकाने पाच कळशा पाणी भरायचा नियम केला होता. पिण्याचे पाणी आमचेच एक फडणीसांकडून घेतलेले घर होते तेथल्या नळावरुन आणत असू. त्यावेळी तेथे शेजारी सोनारांची वस्ती होती. एक कळशी भरली की दुसरी कळशी किवा घागर नळाला लावून पहिली ओतायला जात असू आणि कधी कधी परत येईपर्यंत घागर भरुन वाहू लागे, मग तेथे असणार्‍या कोणी तरी ती काढून ठेवत. ती घागर न आणता त्यांच्यापैकीच कोणीतरी ती आपल्यात ओतून घेई आणि पुन्हा घागर घासून नळाखाली वाहून देऊन पाणी भरुन ती आणत असू. आता आठवले तरी हसू येते पण तेव्हा ही शिवाशिव, सोवळेओवळे सगळीकडेच असे आणि त्यात कोणाला काही कमीजास्तपणा वाटत नसे. त्या तांब्याच्या कळशा,घागरी घासून लख्ख ठेवणे हे सुध्दा एक कष्टाचेच काम होते. सकाळी किवा संध्याकाळी घर झाडण्यात आणि पाणी भरण्यात वेळ जात असेच पण ती कामे न करुन चालण्यासारखेच नव्हते. जरा मोठे झाल्यावर आपापले कपडे आमचे आम्हीच पिळून टाकत असू. केर,लादी,धुण्याला बाई नव्हती आणि धुलाई मशिन माहितच नव्हते. भांडी घासायला बाई होती पण तिने घासून आणलेली भांडी परत पाणी टाकून घ्यावी लागत. आई तर कामात अखंड बुडालेलीच आठवते आहे.

पाण्याच्या साठवणीची भांडी तांब्याची तर घरातली स्वयंपाकाची भांडी,पातेली,डबेडुबे आणि ताटं वाट्या पितळेच्या असत.स्टेनलेसस्टील त्यावेळी बाजारात अगदी नवे आले होते. त्या ताटवाट्या चकचकीत आणि शिवाय घासायला सोप्या म्हणून मग दरमहा प्रत्येकासाठी एकेक ताट खरेदी करुन वर्षात सगळ्यांसाठी स्टीलची ताटे आली. निर्मल, शशी आणि गोपाळ अगदी लहान होते.निर्मल सहा वर्षांची,शशी साडेचार तर गोपाळ तीन वर्षांचा असेल.त्या तिघांसाठी सारख्या ताटल्या घेतल्या होत्या आणि त्यावर नावे टाकली होती. गोपाळचे पूर्ण नाव तर बाकी ताटांवर आद्याक्षरे टाकली होती. गोपाळ त्यातून आपले 'मोठ्ठे' नाव असलेली ताटली बरोब्बर ओळखून काढे त्याची गंमत वाटत असे.

आमच्याकडे एक म्हैस आणि तीन गाई होत्या. त्यांची बरीच उस्तवारी करावी लागत असे. आम्हाला त्यांचे आंबोण म्हणजे सरकी,चुणी,पेंड याचे मिश्रण प्रत्येकीच्या घमेल्यात काढून ठेवणे,गवत,कडबा काढून ठेवणे अशी कामे करावी लागत. माडीच्या मागच्या खोलीत गुरांचा कडबा,गवत ,सरकी,चुणी इ.साठवलेले असे आणि सकाळच्या घाईत एखादे वेळी विसरलेच तर रात्री कंदिल घेऊन त्या काळोखातून गवत आणायला फार भीती वाटत असे कारण घरात वीज नव्हती. कंदिलाच्या प्रकाशात रात्रीच अभ्यास करुन ठेवावा लागे. सकाळच्या घाईत वेळ मिळत नसे. कंदिलावर वाकून लिहिताना माझ्या केसांच्या बटा भुरुभुरु जळत तिकडे लक्ष ठेवावे लागत असे. घरचा भुईमूग पोतीपोती भरलेला असे पण त्या शेंगा सोलून दाणे काढण्याचे काम सुटीत करावे लागतच असे. घरचे भात आले की गिरणीवरुन सडून तांदूळ करुन आणावा लागे. त्यात कोंडाही येत असे, तो चाळून त्यातील कणी काढली जाई आणि कोंडा गुरांसाठी ठेवला जाई. हरबर्‍याची चणाडाळही घरीच केली जाई. टरफले अर्थातच गुरांसाठी उपयुक्त असत. शारिरिक कष्ट भरपूर होते पण तळेगावची हवा इतकी उत्तम होती आणि जोडीला घरचे धान्य आणि दूध,तूप ! भूक भरपूर लागे पण आजच्यासारखे दहा प्रकार बाजारातून आणणे माहितच नव्हते. भुकेला शेंगदाणे, गुडदाणी,खजूर, फुफाट्यात भाजलेले कांदे,बटाटे, केळी, परसातल्या अंगणातल्या पपया असे खात असू. डोळसोबाच्या उत्सवाच्या आधी आमच्या आळीत एका रविवारी बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेड्यातले शेतकरी भाजी,फळे,धान्य असे घेऊन येत असत. ह्या बाजारात खरेदी करण्यात मोठी गंमत असे. अशा वेळी नानासाहेब करवंदाची अख्खी पाटीच खरेदी करत. तेव्हा घरातली सगळी मुले आणि आळीतलीही मुले ओट्यावर किवा अंगणात बसून कोंबडाकोंबडी खेळत त्या पाटीचा फडशा पाडत असू.

गावात दर रविवारी आठवडी बाजार भरत असे. भाजीपाला,फळे इ. आणण्यासाठी आम्ही नानासाहेबांबरोबर जात असू. अनेक प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या,भरीत कोशिंबिरीसाठी गाजरे,मुळा,वांगी अशी पोतभर भाजी खरेदी होत असे. घरी आल्यावर त्या भाज्या वेगळ्या करुन निवडणे हे सुध्दा मोठेच काम असे. पोतं उचलण्यासाठी सखा महार तयारच असे. महार,चांभार, वाणी इ. दुकानदार ठरलेले असत.आमच्या घरासमोर एक तेली होता,त्याच्याकडून घाण्यावरचे गोडेतेल आणत असू. कापडचोपडासाठीचीही दुकाने ठरलेली होती. वर्षातून एकदा अमृतलाल पारेख कडून आईसाठी नऊवार साड्या घेऊन माणूस घरी यायचा.त्यातल्या मुगी चौकटीची जोडी आई घ्यायची. ती गोरीपान, घारी असल्याने तिला कोणताही रंग शोभून दिसे पण तिचे साडीचे रंग लाल,डाळिंबी,हिरवा किवा हळदीचा पिवळा असे ठराविक असत. शाळेत गणवेश नव्हता पण आमच्या घरात होता ना! एका पांढर्‍या कापडाच्या ताग्यात मुलांचे शर्ट, नानासाहेबांचे नेहरुशर्ट शिवले जायचे ,त्यांची धोतरजोडी असायची तर मुलांच्या विजारीसाठी मळखाऊ रंगाचा एक तागा असायचा. चिटाचे फुलाफुलांचे कापड असलेल्या ताग्यात परकरपोलक्यापासून पाऽर झबल्याटोपर्‍यापर्यंतचे कपडे शिवले जायचे. आमच्याच एका घरात रामभाऊ शिंप्याचे बिर्‍हाड होते त्यामुळे कपडे कोणाकडे शिवायचे,फॅशन काय असावी असले किरकोळ प्रश्न आधीच निकालातच निघालेले असायचे. किंबहुना असे काही असते हेच मुळात माहित नव्हते.

एवढ्या मोठ्या कुटुंबात घरातली कामे मोठ्या मुलांना वाटून दिलेली असत ती करावीच लागत. पुढे आम्ही जरा कळत्या झाल्यावर पोळ्या,भाकरी करायला लागत असू. मागचे आवरणे तर मी आणि कलाच करत असू पण अभ्यासात हयगय मुलगा असो वा मुलगी कोणाचीच चालत नसे. नानासाहेब स्वतः आमचा अभ्यास कधीच घेत नसत, पण तरीही सगळ्यांच्या प्रगतीची खबर त्यांना बरोबर असे. शाळेकरता रोजचे घोरावाडी- शिवाजीनगर अपडाउन चालू होतेच. चकमकाटाच्या दुनियेपासून खूप लांब अगदी साधेसुधे असे आमचे रुटिन होते.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Aug 2010 - 11:36 am | ब्रिटिश टिंग्या

छान चालु आहे! वाचतोय! :)

प्रभो's picture

23 Aug 2010 - 8:10 pm | प्रभो

असेच म्हणतो.

विंजिनेर's picture

23 Aug 2010 - 11:58 am | विंजिनेर

छान. येऊद्या पटापट पुढचे भाग.
स्वगतः ती वाचनखुणांची सोय कधी चालू होणारे कोण जाणे. असे चांगले लेख निसटायला नको :(

सहज's picture

23 Aug 2010 - 11:59 am | सहज

छान लिहलयं

छोटा डॉन's picture

23 Aug 2010 - 12:02 pm | छोटा डॉन

अगदी उत्तम चालु आहे.
एक मस्त लेखमाला होईल हा विश्वास आहे.

चालु द्यात, आम्ही वाचत आहोत.

अवांतर :
प्रत्येक नव्या भागाच्या सुरवातीस त्याआधीच्या जुन्या भागाचे दुवे द्यावेत ही विनंती, वाचकांना त्याची मदत होईल :)

- छोटा डॉन

विलासराव's picture

23 Aug 2010 - 12:06 pm | विलासराव

आमचेही एकत्र कुटुंब होते.२४-२५ माणसांचे. वडील आणी त्यांचे ५ भाउ.अगदी माझे इंजिनिअरींग पुर्ण होईपर्यंत.मस्त मजेतले ते दिवस आठ्वले. बाकी तळेगाव,घोरावाडी स्टेशन आणी परिसर पाहिलेला आहे.
खुप छान लिहीताय.चालु द्या.

आमच्याबरोबर अप्पा दांडेकर असत

अप्पा दांडेकर म्हणजे गो.नी.दांडेकर का? त्यांचे 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे मला आवडलेले पुस्तक.

मी-सौरभ's picture

23 Aug 2010 - 1:07 pm | मी-सौरभ

ते तळेगावकर होते....

मितान's picture

23 Aug 2010 - 12:37 pm | मितान

खूप छान लिहिताय.
पुढच्या भागाची वाट बघते. :)

मदनबाण's picture

23 Aug 2010 - 3:00 pm | मदनबाण

पुढच्या भागाची वाट पाहत आहे... :)

अर्धवट's picture

23 Aug 2010 - 3:02 pm | अर्धवट

असेच म्हणतो

स्वाती२'s picture

23 Aug 2010 - 4:34 pm | स्वाती२

आवडले.

मस्त लेखन!
पुढच्या भागाची वाट पाहते आहे.

निखिल देशपांडे's picture

23 Aug 2010 - 5:34 pm | निखिल देशपांडे

खुप छान लिहिले आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

अमेयदेव's picture

23 Aug 2010 - 5:45 pm | अमेयदेव

अहो मि पन तळेगाव ला राहतो .. तुमचं लेख वाचून अगदी गाव डोळ्यासमोर उभे राहिले ...सध्या इंडिया मध्ये नसल्या मुले खूप मिस्स करत होतो .. आता लवकरच सुट्टी साथी जाणार आहे घरी :) ..धन्यवाद सुंदर लेखा साथी

स्वाती's picture

24 Aug 2010 - 1:26 pm | स्वाती

पुढच्या भागाची वाट बघते आहे.

१) चुणी
२) फुफाट्यात भाजणे
३) कोंबडाकोंबडीचा खेळ

याचे अर्थ सांगता का ?

यशोधरा's picture

25 Aug 2010 - 6:24 pm | यशोधरा

लय भारी!
मिपावर आजकाल जे मोजके उत्तम लिखाण येते, त्यातले हे आहे.

लीलावती's picture

26 Aug 2010 - 11:52 am | लीलावती

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
छोटा डॉन- आधीच्या भागाची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी मी आधीच्या लिंक्स देईन.
पेन- चुणी म्हणजे हरबरे भरडल्यावर जी टरफलं राहतात ती गुरांना घालतात. शेंगदाण्याची फोलपटे म्हणजे पेंड ,ही सुध्दा गुरांना घालतात.
फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा स्वयंपाक झाला, तरी गॅस,स्टोव्ह बंद केला की आच बंद होते तसे होत नाही. आतमध्ये धग बरीच असते. त्यात बटाटे,कांदे भाजत ठेवत असू.
कोंबडा कोंबडी-करवंदे खाल्ली आहेत का? करवंद वरुन काळेच असते पण आतमध्ये काही करवंदे लालजर्द असतात तर काही फिकट लाल,गुलाबी रंगाची. बाहेरुन मात्र सगळी काळीभोर दिसतात. तेच फोडल्यावर लाल असले तर कोंबडा आणि गुलाबी असले तर कोंबडी असा खेळ ८-१० जण खेळत पाटी फस्त करत असू.

सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Aug 2010 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll

फुफाट्यात भाजणे - चुलीवरचा स्वयंपाक झाला, तरी गॅस,स्टोव्ह बंद केला की आच बंद होते तसे होत नाही. आतमध्ये धग बरीच असते. त्यात बटाटे,कांदे भाजत ठेवत असू.
म्हणजे थोडक्यात बार्बेक्यू का?

तुमचे लेखन वाचायला मजा येते.

फुफाट्यात कृष्णाकाठची हिरवी वांगी, छोटे पांढरे कांदे, बटाटे, रताळी असे काही बाही खुपसून ठेवावे मग जरा उंडारुन यावे आणि अर्ध्यातासाने हा सगळा मेवा राखेतून बाहेर काढून फक्त मीठ लावून फस्त करावा म्हणजे स्वर्गानुभूती म्हणतात ती येते! ;)

(फुफाट्यातला)चतुरंग

जुन्या काळात छान फिरवून आणता तुम्ही.

तुमचे लेख वाचणे ही एक पर्वणी असते.

मिपावर वाचनीय असलेल्या लेखा पैकी एक.

प्राजु's picture

14 Sep 2010 - 12:50 am | प्राजु

मस्त! फार सुंदर लिहिले आहे..
येऊद्या अजून. :)