मागे वळून पाहताना.. १) डोळसोबाची आळी

लीलावती's picture
लीलावती in जनातलं, मनातलं
19 Aug 2010 - 12:02 am

त्यावेळी आम्ही तळेगावात राहत होतो, तळेगाव दाभाडे! मावळात दोन तळेगावे, सरदार ढमढेर्‍यांचे तळेगाव ढमढेरे आणि सरसेनापती दाभाडे यांचे जहागिरीचे गाव, तळेगाव दाभाडे. पुण्यापासून साधारण ३५ किमी अंतरावर असलेले तळेगाव त्याकाळी अगदी लहान खेडेही नव्हते की पुण्याइतके मोठे शहरही नव्हते. लहानसे,टुमदार,हिरवेगर्द साधेसुधे गाव होते. गावाला रेल्वे स्टेशन होते पण रस्ते कच्चे, मातीचे होते आणि रस्त्यावरुन बैलगाड्याच जास्त करुन दिसत असत. सिटी बसेस नव्हत्याच आणि रिक्षा तर माहितच नव्हती. घोडागाड्या,मोटारगाड्या,सायकली पुण्यात दिसत असत. रेल्वे स्टेशनाजवळच्या चौकात गणपतीचे देऊळ, थोडे पुढे गेले की शाळा आणि विठ्ठलमंदिर. तेथे भजने, विठ्ठलनामाचा गजर सतत चालू असायचे. अप्पा दांडेकर इथून जवळच रहायचे. पुढे बाजारपेठ होती. तेथे वाणीसामान, कापडचोपड, सोनारांची दुकाने मग पोस्ट, दवाखाना होता. इथले टी.बी. हॉस्पीटल तर खूप जुने आणि प्रसिध्द आहेच पण येथला डोळ्यांचा दवाखानाही खूप जुना आहे. आजूबाजूच्या गावातले लोक डोळ्याच्या उपचारासाठी तेथे येत असत. गावचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथला पैसा फंड काच कारखाना! गावात लो. टिळकांच्या प्रेरणेने सुरु झालेले समर्थ विद्यालय होते, नूतन विद्यामंदिर होते पण ही हायस्कूले होती आणि प्राथमिक शाळा मात्र म्युनिसिपालिटीची होती. तेथेच माझे ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेत गणवेश तर नव्हताच पण मराठी सोडले तर इतिहास, भूगोल, गणित अशा विषयांना पाठ्यपुस्तकेही नव्हती. गणितातही पाढे, पलाखे, पावकी, निमकी, तोंडी हिशेब इ. वर भर असे. विशेष म्हणजे मोडीचे पुस्तक होते. मुळाक्षरे,बाराखडी करत मोडी पुस्तक वाचनापर्यंत चौथीपर्यंत गाडी येई. मुळाक्षरे,बाराखड्यांसाठी पुस्ती काढावी लागत असे.

इतर कोणत्याही गावाप्रमाणेच आमच्याही गावात देवळे भरपूर! गणपती,विष्णु,रामाचं,मारुतीचं मंदिर होतं, विठ्ठलमंदिरही होतंच पण विशेष म्हणजे कोठे सहसा न आढळणारे पाच पांडवांचं देऊळही होतं, अजूनही आहे. वीरासनात एका ओळीत बसलेले पाची पांडवांचे भव्य पुतळे आणि मागच्या खोलीत कुशीवर झोपलेली द्रौपदी. तिथे असलेल्या झरोक्यातून तिचे दर्शन होते. दर ६ महिन्यांनी ती कूस बदलते अशी गावात आख्यायिका आणि म्हणून खरंच ती कूस बदलते का? हे जाऊन बघण्याचा आमचा उद्योग असे. आमचे ग्रामदैवत डोळसोबा! त्यावरुनच डोळसोबाची आळी असे म्हटले जाते. डोळसोबाच्या देवळाच्या मागल्या बाजूला शंकराचे देऊळ आहे, पुढे बारव आहे आणि सभोवताली हिरवीगर्द दाट झाडी आहे. उभाबाई दाभाडे यांचे तिथे वृंदावन आहे. जवळच सरदार दाभाड्यांचा नवा आणि जुना वाडा होता. त्यांचाच अजून एक वाडा होता त्याला सवाई वाडा म्हटले जाई. ह्या वाड्याच्या मोठ्या चौकात रा. स्व. संघाची शाखा भरत असे. वाड्यासमोरच्या बोळातल्या वडाच्या झाडांवर आम्ही सूरपारंब्या खेळत असू.

याच डोळसोबाच्या आळीत आम्ही राहत असू. आमच्या आळीत फक्त राहण्याचीच घरे होती ,दुकाने अशी नव्हतीच. घराचे जोतं उंचावर, ७/८ पायर्‍या चढून गेले की ओटा,भक्कम सागवानी लाकडी दरवाजे. एकाशेजारी एक अगदी सारखी अशी दोन घरे, ट्विनघरच म्हणा ना. त्यातल्या एका घराचा दरवाजाच उघडा असायचा. आत गेले की पडवी, ओटी, माजघर, स्वयंपाकघर,मागे अंगण,अंगणाच्या शेवटी संडास,न्हाणीघर,गोठा आणि मागचे दार अशी दोन्ही घरांची रचना. अंगणात दोन्ही स्वयंपाकघरांची दारे उघडत,दोन्ही घरात ये,जा तेथून करता यायची. अंगणात लहानसे तुळशीवृंदावन,थोडी फुलझाडे आणि औदुंबराचे मोठे झाड आहे. त्या झाडाखाली नृसिंहवाडीच्या दत्ताच्या पादुका,शंकराची पिंडी,नंदी आदिंची स्थापना आजोबांनी केलेली होती. सगळ्या देवांची रोज सोवळ्याने पूजा होत असे. पूजा नानासाहेब स्वतः किवा भावांपैकी कोणीतरी करत असत. माजघरातून माडीवर जाण्यासाठी जिना, माडी चांगली मोठ्ठी २५' * १०' ची असेल. १५/१६ जण आरामात झोपू शकत. आम्ही सारी भावंडे तेथेच झोपत असू. माडीच्या मागच्या बाजूला दोन,दोन अशा चार खोल्या होत्या. त्यातल्या मागच्या खोल्यात गुरांसाठीचा कडबा,गवत साठवलेले असे. ते दारही अंगणात उघडत असे. माडीवरही अजून एक मजला होता.

स्वयंपाकघर बरेच मोठे होते. एका भिंतीला चुला, औलवैलाची चूल अशा दोन चुली आणि कोळशाची शेगडी अशी रांग होती. त्याच्या बाजूला मोठे फडताळ. ते माडीपर्यंत उंच होते.साठवणीचे लोणचं, पापड, सांडगे अशा गोष्टी,गूळाची ढेप, मसाले, तेल,मीठ, मिसळणाचा डबा, असे सारे त्या फडताळात असे. दुभत्याचा वेगळा खण होता.एका बाजूला जमिनीतच दगडी उखळ पुरलेले होते. वाटण्याकुटण्यासाठीचा तोच मिक्सरग्राईंडर! माजघरात एक लाकडी उखळीही होती. समोरच्या भिंतीला ताकासाठी घुसळखांबा होता त्याची दोरी ओढत ताक करत असू. घरात गाईगुरे भरपूर त्यामुळे दूध,तूप भरपूर असे. आळीतले बरेच शेजारी ताक न्यायला येत. भिंतीच्या एका कोपर्‍यात तांब्याचा चकचकीत हंडा,त्यावर घागर आणि वर कळशी पाणी भरुन ठेवलेली असे. अंगणात पाणी तापवण्याचा चुला होता. तापलेले पाणी उपसून घ्यावे लागत असे. जळणासाठी अर्थातच लाकडे! ठाकर लोक मोळ्या विकायला रविवारी येत. त्या मोळ्या माडीवर जाणार्‍या जिन्यामधल्या जागेत रचून ठेवलेल्या असत. पावसाळ्यात त्या ओल्या लाकडांचा खूप धूर होई. माजघरात उंच लाकडी घडवंच्यांवर धान्याची ,शेंगांची पोती असत. एकदा अशीच आत्या आमच्याकडे रहायला आली होती. माजघरात आत्या आणि नानासाहेब गप्पा मारत बसले होती. शेजारी पाण्याची कळशी भरुन ठेवली होती आणि गप्पा मारताना एकीकडे भुईमूगाच्या शेंगा फोडून खाणे चालू होते. मध्येच एकदम त्यांनी हाक मारली आणि कळशीत पाणी का नाही भरुन ठेवलेस असे विचारले. गप्पा मारताना दोघांनी मिळून शेंगा आणि कळशीभर पाणी संपवले होते त्याचा पत्ताच नाही. त्यांना वाटले मीच पाणी ठेवायला विसरले आहे.

एवढ्या मोठ्या घराचे कुटुंबही मोठे होते. आजोबा,काकाकाकू, पाच चुलत भावंडे, त्यांची आजी म्हणजे काकूची आई आणि मामा, आई,वडिल आणि आम्ही भावंडे एवढे सारे त्या घरात नांदत होतो. शिवाय आलागेला,पैपाहुणा असायचेच. माझे वडिल, त्यांना सगळे नानासाहेब म्हणायचे, पुण्याच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये गणित शिकवत. रोज ते तळेगाव -पुणे अपडाउन करत असत. ४२ साली चलेजावची चळवळ सुरू झाली आणि भारतभर पसरली पण आमच्या घराला मात्र नियती वेगळेच हादरे देत होती. जून महिन्यात प्लेगमुळे आजोबा गेले तर जुलै महिन्यात बाळंतपणात काकू दगावली.त्यावेळी बाळंतपणे घरीच सुइणीला बोलावून होत असत तरी तिला तळेगाव जनरल हॉस्पीटलात नेली होती पण ती वाचू शकली नाही. पुढे ऐन दिवाळीत अचानक काकांना काळाने ओढून नेले. एका वर्षात घरातल्या तीन जीवाभावांचे मृत्यू! आकाशच फाटले होते. काकांची पाच मुले वडिलांचीच झाली आणि आम्ही आठ भावंडे. सगळ्यात मोठा आणि धाकटा भाऊ ,मध्ये आम्ही सहा बहिणी . मोठा प्रपंच होता.

नानासाहेबांच्या नुसत्या शिक्षकी नोकरीत सगळे भागणारे नव्हते पण त्यांचा विषय गणित होता. अत्यंत तल्लख बुध्दिमत्तेचे वरदान त्यांना लाभले होते. त्याकाळात चौथी आणि सातवीच्या दोन्ही स्कॉलरशिपा त्यांनी मिळवल्या होत्या. पुढे स. प. कॉलेजातून गणित घेऊन बी. ए. केले होते त्यामुळे ते गणिताच्या शिकवण्या घेत असत. तसेच गणिताची पुस्तकेही त्यांनी लिहिली. तळेगाव स्टेशनाजवळ आमची एक चाळ होती, तिचे भाडे येत असे. नऊलाख उंबरे नावाचे लहानसे खेडे तळेगावजवळ आहे ,तेथे आमचे घर होते आणि जाधववाडी,आंबी येथे आमची शेती होती, घरचे भात, गहू, जोंधळा, हरबरा असे. मोहरी,भुईमूग, कारळे तीळ, कुळिथ,उडीद इ. धान्य आलटून पालटून येत. शिवाय गवती राने होती. गवती राने म्हणजे तेथे धान्य पिकत नसे तर गुरांसाठीचे गवत होत असे. ही शेती अधेलीने कसायला दिलेली होती म्हणजे कुळांनी आमची जमिन कसायची आणि त्या बदल्यात निम्मे उत्त्पन्न द्यायचे. गवतीरानांचे वर्षातून एकदा पैसे येत. त्याकाळी एकदम दीड दोन हजार रुपये हातात येणे ही मोठीच रक्कम वाटत असे. सन १९४९ मध्ये मोठ्या चुलत भावाचे, मुकुंददादाचे लग्न झाले आणि पुण्यातल्या भोमेवाड्यात त्याचे बिर्‍हाड केले. मी तेव्हा पाचवीत होते. पुण्याच्या मॉडर्न हायस्कुलमध्ये वडिल शिकवत असल्याने त्यांच्या संस्थेच्या मुलींच्या शाळेत माझे नाव घातले आणि मी वहिनीकडे पुण्याला रहायला लागले.बरोबर सातवीतला मोठा भाऊ आणि इतर चुलत भाऊ होते. वहिनी खूप प्रेमाने सगळं करायची पण तळेगावची आठवण यायचीच. दर शनिवारी तळेगावला जाऊन सोमवारी शाळेसाठी परत येऊ लागलो. रोज सकाळी ६.३० च्या गाडीने नानासाहेब पुण्याला घरचे दूध घेऊन येत असत. सकाळच्या पुण्यातल्या ट्यूशन झाल्या की परत जेवायला भोमेवाड्यात येत आणि शाळा झाल्यावर संध्याकाळची एक ट्यूशन करून मग रात्री तळेगावला परत जात. पुढे धाकटी कलाही पुण्याच्या शाळेत आली. ५वी आणि ६वीची दोन वर्षे भोमेवाड्यात दादावहिनीबरोबर मी राहत होते. वहिनी बाळंतपणासाठी माहेरी जायची वेळ आली तेव्हा मग आम्ही परत तळेगावला रहायला गेलो आणि तेथून रोज शाळेला येऊ लागलो.

राहणीअनुभव

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

19 Aug 2010 - 12:08 am | संदीप चित्रे

वाट बघतोय.

मी-सौरभ's picture

19 Aug 2010 - 12:10 am | मी-सौरभ

राम राम...

रेवती's picture

19 Aug 2010 - 12:34 am | रेवती

ग्रेट लेखन!
प्रत्येक वाक्यातून त्यावेळचे वातावरण स्पष्ट होत जाते आहे.
डोळ्यासमोरून फिल्म जावी तसे झाले क्षणभर!
पुढचे लेखन कृपया लवकर येउ द्या!

चित्रा's picture

19 Aug 2010 - 12:51 am | चित्रा

लेखन आवडले.
पुढील लेखन वाचण्याची इच्छा आहे.

अनामिक's picture

19 Aug 2010 - 12:55 am | अनामिक

ओघवतं, डोळ्यासमोर चित्रं आणणारं लेखन आवडलं. पुढचा भाग लवकर टाका.

बहुगुणी's picture

19 Aug 2010 - 1:14 am | बहुगुणी

..फार आवडलं वाचायला. पुढच्या भागांची वाट पहातोय.

[वामनसुतांच्या ची स्मृतीगंधाची आठवण झाली. मिपावरच्या मंडळींना 'घरच्या ज्येष्ठांना लिहितं करा' असं मागे आवाहन केलं होतं ते कुणीतरी मनावर घेतलं असं दिसतं. खरंच मिसळपाव समृद्ध करणारं असं आणखी लिखाण येत रहावं.]

स्वाती२'s picture

19 Aug 2010 - 1:26 am | स्वाती२

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

चिंतामणी's picture

19 Aug 2010 - 1:11 pm | चिंतामणी

काय लिहू हेच कळत नाही.

पण तुम्ही जे वर्णन केले आहेत हे (याला आजची पिढी सुख म्हणेल की नाही हे माहीत नाही) आता कसे अनुभवायला मिळणार????

पुष्करिणी's picture

19 Aug 2010 - 1:39 am | पुष्करिणी

लेख छानच झालाय, एकदम ओघवती भाषा

मदनबाण's picture

19 Aug 2010 - 10:35 am | मदनबाण

तुमचं अनुभवी लेखन फार आवडलं... :)
पुढच्या लेखाची वाट पाहत आहे...

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 10:39 am | ऋषिकेश

अतिशय चित्रदर्शी! लेखन, शैली सगळे आवडले.
पुलेशु

विंजिनेर's picture

19 Aug 2010 - 10:51 am | विंजिनेर

छान! पुढच्या भागांची वाट बघतोय.
गोनीदांच्या घराच्या उल्लेखावरून तुमच्या लेखनाचा काळ अगदी गेल्या १५ वर्षांच्या आत-बाहेरचा असणार :)

एक शंका - चुला म्हणजे काय? आणि औलवैलाची चूल कशी दिसते?

निखिल देशपांडे's picture

19 Aug 2010 - 11:10 am | निखिल देशपांडे

लेखनाची वेगळीच सुरवात
आता पुढचे भाग पण लवकरच येउ द्या

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Aug 2010 - 11:33 am | बिपिन कार्यकर्ते

सुंदर. ही लेखमाला ग्रेटच होणार याची आत्ताच खात्री वाटते आहे.

स्मरणरंजनाचा भाग जाऊ दे. माणूस सहसा स्मरणरंजनात गुंततोच. पण मला या लेखनातील चित्रदर्शीत्व आणि साधी सरळ आणि मुख्य म्हणजे वाचकाला स्वतःबरोबर सहज बोट धरून चालवत नेणारी ओघवती भाषा याचंच जास्त कौतुक वाटलं.

लिहा लवकर लवकर पुढे.

अब् क's picture

19 Aug 2010 - 12:12 pm | अब् क

मस्तच!!!! पुढचा भाग लवकर टाका.

फार छान लिहिलं आहे.. लीलावती तै, सध्या बरेचदा कामानिमित्त तळेगावला जाणे होते.. मी आज जे तळेगाव पहातोय, अनुभवतोय ते कधी काळी ईतक टुमदार, साधं असावं! विश्वास नाही बसत!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 1:53 pm | परिकथेतील राजकुमार

लेखन आवडले :)

पुलेशु.

चतुरंग's picture

19 Aug 2010 - 5:26 pm | चतुरंग

साधी सरळ भाषा आणि चित्रदर्शी वर्णन आवडले. वाचकाला तुमच्या कथनात बसवून हळूहळू सगळे दाखवत नेलेत.
पुढच्या भागाची वाट बघतोय.

चतुरंग

तिमा's picture

19 Aug 2010 - 8:45 pm | तिमा

वाचतोय, आवडले, अजून येऊ द्या.

श्रावण मोडक's picture

19 Aug 2010 - 11:25 pm | श्रावण मोडक

शीर्षक वाचल्यानंतर ध्यानी आले की काही वेगळं आहे. म्हणून, नीट सवड होईतो धागा उघडायचा नाही असं ठरवलं होतं. ते बरोबर ठरतंय. चित्रदर्शी लिहिता आहात. पुलेशु.

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 11:54 pm | मिसळभोक्ता

ज्येष्ठ सभासदांचे आत्मचरित्रपर वर्णन वाचायला मला फार आवडते. इतर ज्येष्ठ सभासदांनी यातून योग्य तो बोध घ्यावा.

शिल्पा ब's picture

20 Aug 2010 - 12:59 am | शिल्पा ब

खूप छान....आवडले...मलाही गावाची आठवण आली... जगात कुठेही गेलो तरी लहानपण ज्या ठिकाणी घालवले ते ठिकाण विसरणे या जन्मात तरी शक्य नाही...ओढ लागलेली असतेच.

मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर उभा राहिला

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

मस्त पूर्ण तळेगाव डोळ्यासमोर उभा राहिला

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

लीलावती's picture

23 Aug 2010 - 11:18 am | लीलावती

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
विंजिनेर, चुला म्हणजे मोठी चूल. ही सिंगल असते. तिला ३ खूर असतात आणि औलवैलाची चुल डबल असते.मुख्य चुलीच्या बाजूला अजून एक चूल असते.दोन्ही आतून जोडलेल्या असतात.मुख्य चुलीला तीन खुर तर औलाला चार खुर असतात.मुख्य चूल रसरसून पेटवली की तिच्यातले एखादे लाकूड औलात सरकवायचे आणि त्यावर मंदाग्नीवर होत आलेला पदार्थ किवा डाळ वगैरे शिजत ठेवायचे असे करतात.
टायपिंगची सवय नसल्याने दुसरा भाग लगेचच देता आला नाही तो आज देते आहे,पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.

यशोधरा's picture

25 Aug 2010 - 6:27 pm | यशोधरा

सुरेख.