रात्री साडेआठ वाजता एस्डीपीओंचा प्रांतांना फोन आला.
“सर रारुआं थानारे जणे सुइसाइड अटेम्प्ट करिछि, मु सेआडे जाउछि. सरंक इन्फर्मेशनपाई जणाइली.” प्रांतांना चटकन काही लक्षात आले नाही. त्यांनी एवढंच विचारलं, जिवंत आहे का?
“हां सर. व्यस्त होअन्तु नाही. मु खबर देइ देबि. रहिली सर, नमस्कार.” एस्डीपीओंनी प्रांतांना अधिक संधी न देता फोन कट केला.
प्रांतांनी एस्पींना फोन लावला. फोन स्वीच ऑफ. प्रांतांना काही सुचेना. पहिलंच पोस्टिंग. जेमतेम सहा महिने झालेले. पोलीस कस्टडीत मृत्यु हे पोलीसांना भलतंच महाग पडणारं प्रकरण असतं हे त्यांना माहीत होतं. खरंतर तेवढंच माहीत होतं. कायद्याच्या आणि नियमांच्या पुस्तकात वाचून त्यांना तशी माहिती बरीच होती. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आली तर काय करावे हे फक्त अनुभव नावाच्या पुस्तकातच वाचायला मिळत असल्यामुळे आणि हेच पुस्तक जवळ नसल्यामुळे प्रांत बेचैन झाले. एवढ्यात कलेक्टरांचा फोन आला.
“अजित, अरे एक प्रॉब्लेम झालाय. रारुआं ठाण्यात एकानं फास लाऊन घेतलाय.”
“हो मॅडम, आत्ताच समजलं. मी जाऊ काय तिथं?”
“नाही. तू जायची गरज नाही. पण सावध रहा. बातम्या घेत रहा. एस्पी राऊरकेला ला आय जीं कडे गेलेत. मला एकच काळजी आहे, हा माणूस मेला नाही पाहिजे. निदान हॉस्पीटलमध्ये आणेपर्यंत तरी जगला पाहिजे. तू असं कर, मेडीकल ऑफिसरशी बोल. किमान दोन डॉक्टर हजर हवेत जेंव्हा केंव्हा त्याला सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आणतील तेंव्हा. माणूस मेला तर हॉस्पीटलमध्ये आणि गावामध्ये फोर्स राहिला पाहिजे. दंगा होऊ शकतो.”
“काळजी करू नका मॅडम. मी बघतो. गरज वाटलीच तर तुमच्याशी बोलीनच.”
प्रांतांनी लगोलग मेडीकल ऑफिसरना फोन लावला आणि सगळे डॉक्टर जाग्यावर असल्याची खात्री करून घेतली. हेडक्वार्टर इन्स्पेक्टरला फोन करून दोन कॉन्स्टेबल दवाखान्यात पाठवून दिले. परत एस्डीपीओंना फोन लावला.
“सर मी इथं पोचलोय. त्याला आम्ही उखुंडाला प्रायमरी हेल्थ क्लिनिकमध्ये घेऊन चाललोय. मी परत लावतो तुम्हाला फोन.” एस्डीपीओंनी पुन्हा प्रांतांना काही संधी न देता फोन कट केला. प्रांत वैतागले. पण एस्डीपीओ कामात असेल, घाईत असेल अशी मनाची समजूत घातली.
रारुआं प्रांतांच्या हेडक्वार्टरपासून साधारण तीस किलोमीटरवर. म्हणजे पाऊण तास. उखुंडा रारुआंपासून पाच किमी. म्हणजे दहा मिनिटं. प्रांतांनी हिशेब केला. आत्ता नऊ वाजलेत. उखुंडातून निघायला साडेनऊ ते दहा वाजतील. म्हणजे इथे यायला कमीत कमी अकरा वाजणार. त्यांनी मेडीकल ऑफिसरला पुन्हा फोन लाऊन कल्पना दिली, की त्यावेळेत ड्यूटी शिफ्ट होणार असेल तर पुढचे डॉक्टर येईपर्यंत अगोदरचे डॉक्टर थांबले पाहिजेत. एवढा वेळ तो दुर्दैवी माणूस जिवंत राहणार का अशी शंका प्रांतांना वाटून गेली. त्यांनी परत एस्डीपीओंना फोन लावला. यावेळी त्यांना काही न विचारता प्रांत म्हणाले, “दासबाबू, तुम्ही त्याला उखुंडाला नेऊन पुन्हा एक तास कशाला वाया घालवताय? सरळ इकडे घेऊन या.”
“नाही सर. तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथं.”
“तुम्ही डॉक्टर आहात का?”
“तसं नाही सर, आम्हाला त्याला जवळच्या दवाखान्यात लगेच नेलं असं दाखवणं भाग आहे.”
प्रांतांची ट्यूब पेटली. म्हणजे जीव वाचवणे हा मुद्दाच नाही; गाडी प्रोसीजरच्या रस्त्याला लागलेली आहे.
“कुठे मेला? कस्टडीत की उखुंडाला?” प्रांतांनी पॉइंट ब्लॅंक शूट केलं.
“सर आम्ही त्याला उखुंडाला लगेच हलवलं. तिथल्या डॉक्टरांनी सबडिव्हिजन हॉस्पीटलला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही तिकडे घेऊन येणार. तिथे पोचल्यावर तो मरेल.”
पोलीसांच्या त्या प्रोफेशनल उत्तरानं प्रांत अचंबित झाले. आपली कातडी अशी टणक व्हायला किती दिवस लागतील असा एक विचार त्यांचा मनात चमकून गेला. प्रांत त्यांना इतकेच म्हणाले, जी काही प्रोसीजर असेल ती काळजीपूर्वक करा, गॅप ठेऊ नका. नंतर मी काहीच मदत करू शकणार नाही. प्रांतांनी कलेक्टरांना फोन लावला.
“मॅडम, तो मेलाय. एस्डीपीओ काही नीट सांगत नाहीये.”
“तो नाहीच सांगणार. कारण इन्क्वायरी तुलाच करायची आहे. असो. शक्य ती मदत आपण करायची आहे. लॉ ऍण्ड ऑर्डर आपल्यालाच सांभाळायची आहे.”
प्रांतांनी एस्पींना पुन्हा फोन लावला. ते रस्त्यात होते. सहा तासांचं अंतर होतं. रात्रभर प्रवास करून हा बाबा सकाळपर्यंत पोचला असता. एस्पी उत्तर प्रदेशातले होते. पण त्यांच्यात गुण शिवाजीच्या मावळ्यांचे होते. कुणालाही कल्पना न देता जिल्ह्यात कुठेही ते अकस्मात अवतीर्ण होत असत. यापूर्वी एका नक्षलग्रस्त भागात काम करून त्यांनी तिथे बर्याच शरणागती घडवून आणून चांगलं नाव कमावलं होतं. नक्षल्यांच्या हिट लिस्टवर होते. तरीही केवळ दोन साध्या वेषातल्या पीएसओंना सोबत घेऊन ते रात्री बेरात्री बिनदिव्याच्या गाडीतून फिरत असत. काही वेळा मोटरसायकलनेही आठ-दहाजणांचा गट करून फिरत असत. हा माणूस मध्यरात्रीदेखील इथं पोहोचू शकतो असं वाटून प्रांतांनी पीडब्ल्यूडी च्या आयबी मधली एकमेव ठीक खोली त्यांना फ्रेश व्हायला तयार ठेवली.
हॉस्पीटलमध्ये चक्कर मारावी का – प्रांतांना वाटलं. पण त्यांनी न जायचं ठरवलं. त्यांनी तहसीलदारांना सांगीतलं तिथं जाऊन थांबायला. त्यांनी स्वत: जाणं ठीक वाटलं नाही. नंतरची चौकशी बहुतेक त्यांनाच करावी लागणार होती. अशावेळी पोलीसांनी या प्रकरणात काहीतरी बनवाबनवी केली असलीच तर आपल्या तिथं हजर राहिल्यानं आपण त्यांना सामील आहोत असा आरोप होऊ शकतो. शिवाय रात्रीच्या वेळेत तसेच सकाळीदेखील इथं सबडिव्हिजनमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता फारच कमी होती. गोंधळ घालणार्यांना इथं येण्यापेक्षा जवळच्याच रारुआं ठाण्यात जाणं सोपं होतं.
रस्त्यातच गाडीमधून फोनाफोनी करून एस्पींनी फोर्स मोबिलाइज करुन रातोरात रारुआं ठाण्याला गढीचं रूप द्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. राज्यामध्ये पोलीसांचे कमालीचे दयनीय संख्याबळ होते. त्यातही रारुआंसारख्या तुलनेनं शांत भागांमध्ये तर पोलीस ठाण्यांमध्ये दहापेक्षा कमी माणसं असत. कारकून, प्यून यांचा तर प्रश्नच नव्हता. यात तीन पाळ्या, आणि रजेवर जाणारी माणसं धरायची. म्हणजे कोणत्याही वेळी ठाण्यात दोन शिपाई असणार. यांनी चाळीस पन्नास गावांकडं बघणं अपेक्षित होतं. होमगार्ड गोळा करून खाकी कपड्यांचं अस्तित्त्व दाखवत राहणे आणि एखाद-दुसर्या बदमाशाला धाक बसण्यासाठी केसेस करणे एवढाच काय तो अशा पोलीस ठाण्यांचा उपयोग. लोक गरीब होते. अल्पसंतुष्ट होते. गुन्हेगारी नसल्यात जमा होती म्हणून इतके दिवस रेटून नेलं गेलं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. लोकांनी पोलीसांची ताकद जोखायला सुरुवात केली होती. कुठे गोंधळ झाला तर काठ्या बसत नाहीत, उलट समजावणीच केली जाते हे लोकांना कळून चुकले होते. त्यामुळे कुठेही परिस्थिती आजिबात हाताबाहेर जाऊ न देणे हीच प्रशासनाची पहिली कमांडमेंट होती. गेलीच तर ताकदीच्या अभावामुळे माघार घ्यावी लागणं निश्चित होतं. अशा परिस्थितीमध्ये उद्या रारुआंला गोंधळ झाला तर आपल्याला आणि तहसीलदाराला तिथं उभं राहून झटावं लागणार हे प्रांतांना ठाऊक होतं.
एका सीनियर IPS मित्राचा सल्ला प्रांतांना आठवला, ‘कस्टडियल डेथची चौकशी करणार असशील तर, पोलीसांशी तुझे कितीही चांगले संबंध असले तरीही त्यांना मुद्दामहून वाचवण्याचा प्रयत्न आजिबात करू नकोस. तुझ्या करियरची वाट लागेल, काही गोष्टी लपवल्यास किंवा बदलल्यास तर.’
रात्री पावणेबाराच्या सुमाराला बॉडी सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आली. तहसीलदारांनी तसं प्रांतांना कळवलं. पहाटे तीनच्या सुमाराला एस्पी तिथं पोचले. हॉस्पीटलमध्ये जाऊन स्थिती पाहिली आणि प्रांतांना डिस्टर्ब न करता तसेच जिल्ह्याला निघून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता प्रांत हॉस्पीटलमध्ये गेले. तहसीलदारांना रारुआंला पाठवून दिलं. रेव्हेन्यू ऑफिसरना इन्क्वेस्ट करण्यासाठी डेप्यूट केलं. बीडीओ देखील एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट होते. त्यांना हॉस्पीटलसाठी नेमलेल्या फोर्ससोबत डेप्यूट केले. मेडीकल ऑफिसरांच्या चेंबरमध्ये जाऊन प्रांत बसले. प्रेसवाले गोळा झाले होते. व्हिडीओ कॅमेरे चालू होते. प्रांत ‘बाइट’ देत नाहीत हे माहीत असूनही चिकाटी न सोडता प्रश्नांची सरबत्ती चालूच होती. साडेनऊ वाजत आले तरी इन्क्वेस्ट सुरू होईना. आता केंव्हा इन्क्वेस्ट संपणार, मग केंव्हा पोस्टमार्टेम होणार, केंव्हा नातलग बॉडी ताब्यात घेणार…प्रांत बेचैन झाले. उशीर परवडणारा नव्हता. हॉस्पीटलमध्ये लोकांची गर्दी होऊ देणं योग्य नव्हतं. शिवाय ही कामं आटपेपर्यंत फोर्स इथे अडकून पडणार होता. उशीर होईल तसं टाउटर लोकांना नातलगांना भडकावणं शक्य होणार होतं. याच कारणासाठी एस्पीसुद्धा बेचैन झाले होते. एस्डीपीओ प्रांतांना म्हणत होते, “सर मयताचा कुणीतरी नातलग तर आला पाहिजे. त्याच्या मेव्हण्याला आम्ही रात्री घेऊन आलो होतो. आता बघतो तर पसार झालाय.” प्रांत सावध झाले. टाउटर मंडळींनी आपले काम सुरू केलेले दिसते. एस्डीपीओंना म्हणाले, “त्याच्या गावातलं कुणीही बघा. बाजूला घ्या आणि काम उरकून टाका. आजिबात वेळ घालवू नका. आणि तो मेव्हणासुद्धा इथेच चहा घ्यायला गेला असेल. शोधा त्याला.” एस्पी रारुआं ठाण्यात जाऊन बसले होते आणि प्रकरण लवकर संपवण्याच्या नादात होते. त्यांना हे समजताच एस्डीपीओला त्यांनी फोनवरून लाखोली वहायला सुरुवात केली.
दहा वाजता कसेबसे इन्क्वेस्ट सुरु झाले आणि प्रांत आपल्या कोर्टात येऊन बसले. तहसीलदार एव्हांना रारुआंला पोचले होते आणि प्रांतांना त्यांनी कल्पना दिली होती की सगळा गाव ठाण्याच्या समोर जमा झाला आहे. पोलीसांची एक जीप जमावाने दगडफेक करून फोडली आहे, आणि ड्रायव्हर व फौजदाराला जमावाने मारहाणही केलेली आहे. प्रांत एस्पींशी बोलले. एस्पी म्हणाले, “काळजीचं फार कारण नाही, मी इथे आता पुरेसा फोर्स गोळा केला आहे. दगडफेक करणारी माणसं पांगली आहेत. आम्ही केसेस बुक केल्या आहेत. फक्त इथे आता प्रोसीजर निस्तरायची आहे. ” म्हणजे घरातल्यांनी बॉडी ताब्यात घेतली पाहिजे. प्रांतांना आणि एस्पींना याच गोष्टीची चिंता होती. रस्त्यात अपघात झाला आणि माणूस मेला तर लोक नातेवाइकांना जवळ जाऊ देत नसत आणि पोलीस/ प्रशासन जोपर्यंत रेडक्रॉसमधून किंवा कसेही करून पाच-दहा हजार जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत शव रस्त्यातच पडून रहात असे. प्रांतांना लोकांच्या या पशुवत वागण्याची चीड येत असे आणि लोक असे रस्ता अडवून बसले तर नाईलाजाने पैसे तर देत, पण पुढे पुढे होऊन बाता मारणारांच्यावर केस बुक होईल हे पहात असत. प्रशासनाचा तसेच पोलीसांचा धाक कमी झाल्याची ही लक्षणे होती. गावपातळीवर नेतृत्व नसल्याचाही हा परिणाम होता. गर्दी जमा झाली की संपलं. कुणाचंच कसलंच नियंत्रण रहात नसे. काठ्या मारण्याची पण सोय नव्हती. इथे तर पैसे मागणार्यांच्या हातात चांगलेच कोलीत मिळाले होते. पोलीसांच्या ताब्यात असताना माणूस मेला होता. पोलीस अजूनच डिफेन्सिव्ह झालेले होते. काठ्या बसण्याची शक्यता आजिबातच नव्हती.
साडेअकराच्या सुमाराला एस्पींचा फोन आला.
“अजित, रेडक्रॉसमधून किती पैसे देऊ शकतोस?”
“मी पाच हजार. कलेक्टर दहा.”
“मग मी इथे दहा कबूल करू का?”
“हो सर. मी मॅडमशी बोलतो. लोक काय म्हणतायत?”
“लोक! अरे ते पन्नास लाख मागतायत!”
प्रांतांना हसू आवरले नाही. पन्नास लाख म्हणजे किती हे रारुआंतल्या किती जणांना ठाऊक असेल?
“मॅडम, आम्ही रेडक्रॉसमधून दहा हजार देतोय.”
“कशासाठी?”
“तिथं दंगा सुरू आहे. थोडं तातडीनं कॉम्पेन्सेशन दिलं तर वातावरण निवळेल.”
“अजित, वेडा आहेस काय? रेडक्रॉसला हातही लावायचा नाही. त्या माणसाला पोलीसांनी अटक केली होती. तो नशेत होता. त्यानं आत्महत्या केली आहे. त्याला कोण जबाबदार आहे हे अजून समजलेले नाही. कॉम्पेन्सेशन म्हणून रेडक्रॉसमधून मदत केली तर पोलीस जबाबदार आहेत हे आपण स्वीकारल्यासारखं होतं. एस्पी आहेत तिथं. त्यांच्याकडेही निरनिराळे फंड असतात. शिवाय तू तुझ्या कपॅसिटीत एनएफबीएस मधून त्याच्या पत्नीला दहा हजार देऊ शकतोस. शिवाय विधवा पेन्शन सुरू करू शकतोस. पण नो रेडक्रॉस. मेसेज बरोबर गेला पाहिजे. चुकुनही कॉम्पेन्सेशन हा शब्द वापरायचा नाही. समजलं?”
“सर, मी दहा हजार देऊ शकतो. पण लगेच नाही. थोडी प्रोसीजर आहे. रेडक्रॉसला परवानगी नाही.”
“हं. ठीक आहे. पैशाचा फार मोठा प्रश्न नाहीये. मी करीन ऍरेंज. हे वाढू नये एवढीच मला चिंता आहे.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
15 Jul 2010 - 2:20 am | रेवती
थरारक वर्णन!
भाग वेगवान झालाय.
आमचे नातेवाईक आय ए एस ऑफिसर असल्याने त्यांची कामे अशीच सतत तणावाखाली चालू असतात ते आठवले. निवडणूकीच्यावेळी तर फारच ताण असतो.
रेवती
15 Jul 2010 - 3:35 am | बहुगुणी
आणखी एक लेखक 'must read' च्या यादीत! येऊ द्यात पुढचे लवकर.
15 Jul 2010 - 8:18 am | सहज
आणखी एक लेखक 'must read' च्या यादीत! येऊ द्यात पुढचे लवकर.
असेच म्हणतो.
रेडक्रॉस ही एक स्वतंत्र जागतीक संस्था आहे हे माहीत आहे पण इथला रेडक्रॉसचा अर्थ काय?
पुढचा भाग लवकर येउ दे!
15 Jul 2010 - 1:44 pm | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
15 Jul 2010 - 2:17 pm | विसुनाना
अगदी असेच...
15 Jul 2010 - 6:29 pm | प्रभो
म्याबी असंच म्हणतू
16 Jul 2010 - 6:57 am | छोटा डॉन
वरच्या सगळ्यांशी सहमत.
पुढच्या लिखाणाची वाट पहात आहे, लवकर येऊद्यात !
------
छोटा डॉन
15 Jul 2010 - 8:16 am | स्पंदना
केव्हढा ताण जाणवतो या लोकांवर.
मागच्या भागाइतकाच रोचक!
मस्ट रीड!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
15 Jul 2010 - 11:56 am | निखिल देशपांडे
पुढचा भाग लवकर येउद्या....
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
15 Jul 2010 - 3:26 pm | श्रावण मोडक
मालक, उत्तम! उत्कंठा लागून राहिली आहे. फार हाल करू नका आमचे!
15 Jul 2010 - 3:31 pm | स्वाती२
+१
15 Jul 2010 - 4:11 pm | गणपा
वाचतोय, आणि जे वाचतोय ते आवडलय.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
15 Jul 2010 - 11:44 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय आणि वाट बघतोय.
बिपिन कार्यकर्ते
16 Jul 2010 - 12:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी ही ..
अदिती
16 Jul 2010 - 6:55 am | सुनील
वाचतोय..
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Jul 2010 - 7:08 am | विद्याधर३१
फार वेळ लावू नका.
विद्याधर