बासूदांचे 'अनुभव'

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
28 Apr 2008 - 7:35 pm

बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच.

फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते. बासूदांच्या या पुस्तकातूनही काही लोकांविषयीची अशी माहिती मिळते, पण हे पुस्तक मुख्यतः बासुदांचे स्वतःकडे बघणे आहे. स्वतःविषयी सांगण्याच्या ओघात इतरांविषयी सांगून जाते. पण उगाचच एखाद्याविषयी आपल्याला असलेली खाजगी माहिती फोडावी अशा पद्धतीने ते सांगत नाहीत. पण त्यांनी यात सांगितलेले अनेक किस्से मस्त आहेत.

पश्चिम बंगालमधून मुंबईत चित्रपट हे करीयर करण्यसाठी आलेल्या बासूदांना मुंबईत सहाजिकच संघर्ष करावा लागला. या काळात मुंबईतल्या बंगाली मंडळींनी त्यांना चांगलाच हात दिला. त्यातला एक किस्सा फार मस्त आहे. बासूदा मुळात बिनधास्त माणूस. कधी काय करतीय काही नेम नाही. सलील चौधरींच्या संगीत दिग्दर्शनाखाली लताबाईंनी एक बंगाली गाणं गायलं. सगळ्यांचं म्हणणं गाणं छान झालं असं होतं. पण बासूदांनी स्पष्टपणे सांगितलं, बाईंनी बंगाली गाणं जे गायलंय त्यातून हिंदी उच्चार दिसून येतात. त्यामुळे ते खटकतं. झालं. बासूदांच्या अशा आगाऊपणाने सगळेच गोरेमोरे झाले. मग लताबाई पुढे आल्या आणि कोणते उच्चार खटकले असे विचारून त्या त्या ठिकाणी सुधारणा केली. या घटनेनंतर लताबाईंनी बासूदांना विचारलं की मला बंगाली शिकवशील का? बासूदांनी हो म्हणून सांगितलं आणि घसघशीत रकमेची मागणी केली. लताबाईंनी त्याहीपेक्षा जास्त रक्कम देऊ केली. पण त्यानंतर बासूदांनी आणखी एक अट घातली.''मला घ्यायला तुमची गाडी येईल.'' बाईंनी तीही अट मान्य केली. हे महाशय भाड्याच्या खोलीत रहात होते. तिथून गाडीने लताबाईंना बंगाली शिकवायला जायचे.

बंगाली लोकांना स्वतःच्या साहित्याचा खूप अभिमान असतो. पण इतरांकडेही त्या दर्जाचे काही असते याची मात्र जाण नसते. बासूदाही सुरवातीला तसेच होते. पण नंतर त्यांच्या एका मित्राने हिंदीतल्या चांगल्या साहित्याची ओळख करून दिली. त्यानंतर मग त्यांनी भाषक साहित्य वाचायला सुरवात केली. बासुदा मराठी साहित्यही मराठीतूनच वाचत होते. मराठी त्यांना बोलता येत नसलं तरी अतिशय चांगलं कळत होतं.

बासूदांचा तीसरी कसम हा चित्रपट सुरवातीला पडला. पण त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र तो गाजला. पण त्याची हाय खाऊन त्याचा निर्माता व गीतकार शैलेंद्रने मात्र आधीच मरणाला कवटाळले. अतिशय रखडलेल्या या चित्रपटाच्या काळात राज कपूर यांनी सुरवातीला 'शोमनशिप' दाखवून अडवणूकही केली. पण रडत खडत पूर्ण होऊनही चित्रपट बरा चालला.

त्यांच्या दिग्दर्शनाची एक वेगळी पद्धत होती. ते कुणालाच पटकथा द्यायचे नाहीत. त्यांचे म्हणणे एकच होते. मी दिग्दर्शक आहे. पूर्ण चित्रपटाचा विचार मी केला आहे. मला पाहिजे, तसा चित्रपट व्हायला पाहिजे. त्यातील व्यक्तिरेखा कशा असतील काय असतील याचा पूर्ण विचार माझा आहे. तो तसाच पडद्यावर यायला पाहिजे. त्यामुळेच ते दिग्दर्शनात कुणाचीही लुडबूड सहन करत नसत. राज कपूरला तिसरी कसममध्ये घेतानाही त्यांनी याच अटीवर घेतले होते. त्यातही राज कपूरने अडवणूक केल्यानंतरही त्यांनी त्याला उमदा माणूस म्हटले आहे. बंगाली नट उत्तमकुमारनेही त्यांना खूप त्रास दिला.

एकदा एका चित्रपटासाठी रस्त्यावरून चालणार्‍या मुलीला त्यांनी चित्रपटात काम करशील काय म्हणून विचारले होते. तिने होकारही दिला. ही गोष्ट एका हॉटेलात बसून ते शम्मी कपूरला सांगता असताना त्याने त्या मुलीविषयी अतिशय अश्लील कॉमेंट केली आणि त्यांनी तिला त्या चित्रपटातूनच वगळले. ती मुलगी होती सिमी गरेवाल. चित्रपटातील कलावंत निवडीसाठी त्यांनी कुणाकुणाला विचारले नाही? तिसरी कसममधील नायिका नृत्यांगना होती, म्हणून बिहारमध्ये लोकेशन निवडीसाठी गेले असताना एका नाचणार्‍या बाईलाही त्यांनी हिरोईन होते का म्हणून विचारले होते आता बोला? पण वरकडी म्हणजे त्या बाईने एवढी मोठी संधी मिळत असतानाही त्यांना ठाम नकार दिला.

बासूदांचं लग्न हे एक प्रकरणच आहे. बिमल रॉय यांच्या कन्येसमेवत त्यांचे प्रेम जमले आणि रॉय कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता लग्न केले. हा पूर्ण किस्सा मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वास्तविक बिमल रॉय हे बासूदांचे या क्षेत्रातील गुरू. त्यामुळे आपल्या मुलीने बासूशी प्रेम करावे हे त्यांना मान्य नव्हते. त्यात त्यांच्या पत्नीचाही बासूदांना तीव्र विरोध. त्यांनी मुलीला कोलकत्यात जवळपास बंदीवासातच नेऊन ठेवले. त्यात एक आवई उठवली. बासूदा व लता मंगेशकरांचे लफडे आहे, म्हणून. बासूदा कोलकत्याला गेल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. पुढे या दोघांनी मुंबईतूनच पळून जाऊन लग्न केले.

बासूदांच्या मित्रांपैकी एना व रूमा गांगुली यांच्याविषयीचे व्यक्तिगत किस्सेही यात येतात. यातील रूमा गांगुली म्हणजे किशोरकुमारची बायको. रूमा गांगुलीला बंगालीत एक स्वतंत्र स्थान आहे. ती एक कवीही होती. पण किशोरकुमारबरोबर तिचे खटके उडायचे. किशोर पैशांच्या मागे धावायचा असे तिचे म्हणणे. एकदा म्हणे किशोरला बरेच पैसे मिळाले. त्यावेळी रूमा घरात आल्यानंतर तिने पाहिले तर काय? किशोर घराच्या सर्व भिंतींना शंभराच्या नोटा चिकटवून त्याकडे पहात बसला होता. त्यातच किशोरचे मधुबालाशी जमल्याचे तिने प्रत्यक्ष पाहिल्यानंतर किशोरला सोडून ती कोलकत्याला गेली. विशेष म्हणजे तीही धुतल्या तांदळासारखी नव्हती. तिचेही एका बंगाली फोटोग्राफरशी लफडे होते. पण तिने त्याच्याशी लग्न केले नाही.

बासूदा स्त्री-पुरूष संबंधांवर भाष्य करताना फार छान लिहितात. रूमा गांगुली व एना दोघींचीही लफडी होती. पण त्यांनी मूळ पतीला सोडून दिल्यानंतर प्रियकराशी लग्न केले नाही. यामागे काहीही तार्किकता दिसत नाही. पतीविषयी त्यांचे मतभेद होते, हे खरे असले तरी त्यावर त्यांचे तितकेच प्रेमही होते. तरीही हे संबंध टिकू शकले नाहीत. त्यांनी दिलेल्या एनाचा किस्सा तर अस्वस्थ करणारा आहे. एनाने पतीला सोडून दुसर्‍याशी घरोबा केला तरी तिने त्याला कधीच सुख दिले नाही. शिवाय पहिल्या पतीपासून झालेली मुलेही वार्‍यावर सोडून दिली. त्या मुलांचे तर फारच वाईट हाल झाले.

सगळं सांगून झाल्यानंतर बासूदा स्वतःचा घटस्फोट झाल्याचेही सांगून टाकतात. पण लग्न टिकण्याची गरज असल्याचेही म्हणतात. कुटुंब असणे गरजेचे असे ते म्हणतात. त्याविषयी त्यांनी एक छान किस्सा सांगितलाय. कॅनडाला एकदा ते गेले असताना तिथे त्यांना एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला. तुमच्या चित्रपटात पती-पत्नी भांड भांड भाडतात. पण शेवटी पुन्हा एकत्र येतात, हे कसे काय? त्यावर त्यांनी उत्तर दिले. तुझी संस्कृती वेगळी आहे, माझी वेगळी. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'. हाच फरक आहे.

कलाचित्रपटसंदर्भशिफारससल्लामाहितीआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

नारदाचार्य's picture

28 Apr 2008 - 7:42 pm | नारदाचार्य

वा. आटोपशीर.

आनंदयात्री's picture

29 Apr 2008 - 12:12 pm | आनंदयात्री

छान लेख !

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Apr 2008 - 9:11 pm | llपुण्याचे पेशवेll

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला.
एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते.
असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही.

तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'
:))
हे वाक्य विशेष आवडले.

-व्याकरणपंडीत
('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा)
डॅनी.
पुण्याचे पेशवे

नारदाचार्य's picture

28 Apr 2008 - 9:14 pm | नारदाचार्य

('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =))
पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.

विकास's picture

28 Apr 2008 - 9:35 pm | विकास

>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते.

बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.

शितल's picture

28 Apr 2008 - 10:35 pm | शितल

बासूदांचे 'अनुभव'
छानच मा॑डले आहेत.

स्वाती दिनेश's picture

29 Apr 2008 - 12:00 am | स्वाती दिनेश

तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'. हाच फरक आहे.

हं.. आवडले.
स्वगतःबासुदांचे 'अनुभव ' वाचायला हवे.

स्वाती

भडकमकर मास्तर's picture

29 Apr 2008 - 12:54 am | भडकमकर मास्तर

वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे...
आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार....

अवांतर -

बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट!

आपल्याला काय वाटतं?

असो..

आपला,
(हृषिदांचा प्रेमी) तात्या.

भोचक's picture

29 Apr 2008 - 10:33 am | भोचक

'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.