असेही हळदीकुंकू

रेवती's picture
रेवती in जनातलं, मनातलं
22 Feb 2010 - 9:18 am

(लेखातील व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

"अगं हो, मला वाटलंच होतं तू फोन करणार म्हणून, पण पाच घरी हळदीकुंकू म्हणजे वेळ लागला परत येतायेता!" सौ. सासूबाई संक्रांतीच्या हळदीकुंकवांबद्दल सांगत होत्या.
कुलकर्ण्यांकडे प्लास्टिकच्या टोपल्या तर देशपांड्यांकडे बांगड्या लुटल्या.......कान्हेरे आज्जींकडे डाळतांदळाची खिचडी........असं बोलणं झालं. अश्या प्रकारांमध्ये मला फारच इंटरेस्ट होता. कोणाकडे नविन सुना आल्यात? त्यांच्याकडच्या पहिल्या हळदीकुंकवाला कायकाय झालं? कोणी काय डिश ठेवली होती हेही विचारून झालं. आता आपलं हळदीकुंकू कधी करणार आहात? माझ्या प्रश्नानं त्यांना विचारात पाडलं."अगं आजकाल माझ्याच्यानं नाही होत हे समारंभ करणं." आवाजात मरगळलेपण. "सोनी सासरी गेली आणि तू हैद्राबादला .....इतक्याजणींना बोलावणं........आपल्या हॉलच्या चार पायर्‍या शंभरवेळा चढणं उतरणं ........ नाही जमत आता! तू असतीस तरी केलं असतं मोठं हळदीकुंकू! मी आपली शाळेतल्या चार बाईंना तिथेच हळदीकुंकू देणार."

पूर्वी हौसेनं केलेली मोठी हळदीकुंकवं आठवली......हैद्राबादला आल्यावर केलेलं हळदीकुंकू आठवलं. आजूबाजूच्या बायकांना बोलावले होते. मी नक्की काय करतीये हे त्यांना समजलेच नाही. सगळा 'फ्लॉप शो' होता असं वाटलं. नवर्‍याला सासूबाईंशी झालेलं बोलणं सांगितल्यावर म्हणाला कि चार दिवस जाऊन ये. पुन्हा सासूबाईंना फोन केला आणि मी येते आहे असं सांगून टाकलं. त्यांना जरा बरं वाटलं असावं. "ताईचाही आत्ताच फोन येऊन गेला.......काकांबरोबर इकडे येते म्हणालीये, तुझी भेट होइल बघ!" मावससासूबाई म्हणजे भलताच हौशी मामला! मंगळागौर, बारसे, डोहाळजेवण, हळदीकुंकू अश्या समारंभांना अगदी पुढे होऊन त्यांची मदत असायची. तरूणांना लाजवेल असा उत्साह वयाच्या सत्तरीतही होता. अत्यंत टापटिपीनं सगळी व्यवस्था ठेवण्यात त्यांचा हात धरणारं आमच्याकडे कोणी नाही. दोनेक दिवसात जाऊन पोहोचले सासरी! सासूबाईंनी शेसव्वाशे जणींच्या नावाची यादी करून सर्क्युलर फिरवण्यार्‍या बाईंना घेऊन जाण्यास सांगितले होते. मावशी आणि काका येण्याच्या बेताने हळदीकुंकवाचा दिवस ठरवला. नणंदही त्याच सुमारास येणार होती. "चला, सगळं कसं अगदी जुळून आलयं." मनातल्या मनात म्हटलं. अजूनही बर्‍याच महत्वाच्या गोष्टी ठरवायच्या होत्या, जसे, कोणते वाण द्यायचे, स्नॅक्स कोणती ठेवणार आणि दोनेक नव्या साड्या आणल्या होत्या त्यातली कोणती नेसायची? ;) "आता तूच ठरव काय लुटायचयं ते!" इति सासूबाई. तोच मोका साधून सासरे म्हणाले," त्या पसारे करणार्‍या वस्तू नका देऊ. अश्या कितीतरी माळ्यावरच्या पेटीत पडल्यात, त्याच वस्तू परत मैत्रिणींना दिल्यात तरी चारेक हळदिकुंकवं पार पडतील तुमची!" खरी गोष्टं, मग कोणती वस्तू द्यायची? कोणतीही वापरून संपणारी वस्तू द्यावी असं ठरलं. बराच खल करून साबण लुटायचं ठरलं. अंघोळीचा साबण, कपड्याचा साबण आणि दाढीचा साबण असे प्रकार आणून ज्या महिलेला जो प्रकार हवा असेल तो घेऊ द्यावा असे सासर्‍यांचे मत पुढे येताच आम्ही दोघींनी ते हाणून पाडले. "बायकांच्या समारंभात दाढीचा साबण काय करायचाय? अंघोळीचा साबण, तोही लक्स आणूयात!" माझे मत. १०० साबणाच्या वड्या पुष्कळ होतील असे सासूबाईंचे मत पडले. घरी झालेला निर्णय दुकानदाराने साफ धुळीला मिळवला. ताई, १२० वड्या घ्याल तर स्वस्तात देतो." १०० च्या ऐवजी १२० काही फार जास्त नाहीत, घेऊया असे वाटल्याने डिस्काऊंट व साबणाची बॉक्सेस अभिमानाने घेऊन रिक्षातून अस्मादिक घरी! त्याबद्दल कोणाला सांगायला वेळ मिळाला नाही. लगेच नणदेला आणायला रेल्वेस्टेशनवर गेलो. तिचं येणं प्लॅन्ड होतं, माझं नव्हतं म्हणून मला बघून तीलाच आश्चर्याचा धक्का बसला. "आता गप्पा घरी जाऊन मारा, इथं नकोत." तिचे सासरे म्हणाले त्यासरशी आम्ही तिला तिच्या सासरी सोडून हळदीकुंकवाचे आमंत्रण देऊन आमच्या घरी परत आलो.

"हे बघा, पाहुणे येणार म्हणून उगीच ते जेवणाचे घाट घालू नका, खाण्याचे पदार्थ बाहेरून विकत आणा म्हणजे जास्त काही करायला आणि उरायला नको." सासर्‍यांनी ठामपणे सांगितलं. त्या दिवशी इतरही ठिकाणी हळदीकुंकू व अल्पोपहार असतील, तयार जिलबी व ढोकळा बेतानेच म्हणजे दोन किलो प्रत्येकी आणावेत असे अंदाज आम्ही बांधले त्याप्रमाणे दुकानदाराने पुडे बांधले. फक्त महिलावर्गाचा कार्यक्रम असल्याने बाबा व काकांनी तात्पुरते बाहेर जायचे असेही ठरले. मांजरापासून सुरक्षित असावेत म्हणून एकेक किलो जिलबी व ढोकळे डायनिंग टेबलावर ठेवून बाकिचे जाळीच्या कपाटात ठेवून देण्याइतकी बुद्धीमान मी नक्कीच होते.:) आम्ही दोघी सासूसूना आवरून तय्यार आमच्या सख्यांची वाट पहात बसलो. वेळेवर आवरल्याचा अभिमान आमच्या चेहर्‍यावर चमकत होता. उशिरा आलेले मावशी व काका चहा घेऊन आवरायाला गेले आणि मी पेपरप्लेटस टेबलावर मांडून ठेवल्या. कधीकधी काही कामे कुणी सांगण्याआधीच मी करते. हे त्यातलेच एक! पाच वाजता बोलावल्याने महिलावर्गाने जरा लवकरच म्हणजे साडेपाचापासून ;) येण्यास सुरुवात केली. मावशींनी भरून ठेवलेल्या प्लेट्स एकेकीला द्यायच्या, त्यावेळी काहींनी आढेवेढे घ्यायचे, 'हे कमी करा' किंवा 'ते कमी करा' असे संवाद अधून मधून होत होते. चांदीच्या उजळवलेल्या कमळातून हळद व कुंकू द्यायचे, मग अत्तर लावून गुलाबपाणी शिंपडायचे. पाढरं शुभ्र खोबरं पेरलेली तिळाची वडी दिल्यानंतर वाण द्यायचे असे सगळे कसे व्यवस्थित चालू होते. त्यातल्या काहीजणी हाताला धरून विचारपूस करायच्या तर काहीजणी त्यांच्याकडच्या हळदीकुंकवाचे आमंत्रण द्यायच्या. नवीन लग्नं झालेल्या मुलींच्या काळ्या साड्या तर बाकिच्यांच्या रंगीबेरंगी साड्यांची सळसळ आणि अत्तराचा सुगंध भरून राहिला होता. "अग्गोबाई, मग आता कुठे अस्तेस म्हणे तू?" आणि नवरा कसाय? त्याला म्हणावं, शिरा आवडतो त्याला हे आज्जून लक्षात आहे हो माझ्या!" "हो सांगीन ना!" माझ्या आवाजात शक्य तेवढा आज्ञाधारकपणा!;) मधेच एकदम,"ए, कांजिवरम आहे ना ही? मस्तय! आणि तिकडचे दागिनेही वेगळेच असतात नै?" अश्या स्त्रीवेल्हाळ गप्पा सुरू होत. एखाद्या आजीबाई जवळ येऊन त्यांच्या नातेवाईकांबद्दल सांगत्,"अगं, धडफळे आडनाव आहे बघ, हैद्राबादेतच आहेत गेली बरीच वर्षं, त्यांना सांग हो माझं नाव, ओळखतात चांगले(च) मला!" "बरं बघते हं" माझा सुटकेचा प्रयत्न! तेवढ्यात माझी नणंद तिच्या सासूबाईंबरोबर आलेली बघून आम्ही स्वागत केले. "मावशी आल्यात असं ऐकलं, आतच बसतो आम्ही." सोनीच्या सासूबाई म्हणाल्या. आता या जर मावशींशी गप्पा मारत बसल्या तर प्लेट्स कोण भरणार अशी भीती वाटून गेली. थोड्यावेळानं गडबडीनं नणंद बाहेर गेली व १० मिनिटात परत आली. महिलावर्गाच्या गराड्यात सापडल्यामुळे काय झालं हे विचारायला वेळच मिळाला नाही. आतापर्यंत एक किलो ढोकळा आणि जिलबी संपत आली असेल असे वाटल्याने आत जाऊन बघितले तर मावशींनी आधीच कपाटातले पुडे काढून टेबलाच्या अगदी कोपर्‍यात ठेवल्याचे ध्यानात आले. मावशींची ही तत्परताच मला नेहमी माझ्या गडबडीच्यावेळी तारून नेते.:) सोनी व तिच्या सासूबाई हळदीकुंकू घेऊन परत गेल्या त्यावेळी मावशींची गडबड उडालेली दिसली. अरेच्च्या! नक्की काय झालं म्हणून विचारलं तर फक्त बाबा आणि काका परत आल्याचं त्यांनी मला सांगितलं.

संध्याकाळी आठनंतर हळदीकुंकवाचा बहर एकदम ओसरला. येणारी एखाद दुसरी सखी स्वयंपाकाचं निमित्त सांगून पटकन काढता पाय घेऊ लागली. साहजिकच होतं ते! होताहोता साडेआठला हळदीकुंकू समारंभ अगदी संपल्यात जमा झाला होता. सासूबाई आता कपडे बदलायला गेल्या. मावशींनी लगेच आमटीभाताची तयारी करून मला बाहेरच्या गोष्टी आवरण्याबाबत सुचना द्यायला सुरुवात केली. तासाभराने जेवणं उरकून आम्ही सगळे झालेल्या कार्यक्रमाच्या गप्पा मारत बसलो. "बरं झालं हं आपण साबण कमीच आणले ते, अपेक्षेपेक्षा फारच कमी आल्या बायका" सासूबाई खुर्चीत बसताबसता बोलल्या. फारतर पंचाहत्तरजणी आल्या असतील." "मला लक्स आवडत नाही" सासर्‍यांनी लग्गेच जाहीर केले. अरे देवा! मी १२० लक्स आणून ठेवल्याचं कसं सांगू ? माझी मनातल्या मनात तणतण. तेवढ्यात फोनची रिंग झाली. "तूच घे गं फोन, नवर्‍याचा असणार....." काकांनी थट्टेचा सूर लावला. पाहते तर नणदेचा फोन! "काय गं आज ढोकळे आणि जिलबीचा अंदाज इतका कसा चुकला?" "म्हणजे? मला नाही समजले?" आश्चर्यचकित मी. "अगं, एकेक किलो कसे पुरतील म्हणून मधेच पटकन जाऊन अजून एकेक किलो दोन्ही आणून ठेवले बघ! "काऽऽय? अगं कपाटात होते कि अजून एकेक किलोचे पुडे!" आता मात्र मावशी आणि काका एकदम उठून उभे राहिले. "अरे देवा! मलाही तिच्यासारखेच वाटल्यामुळे काकांना पाठवून मी अजून एकेक किलो दोन्ही मागवले कि!" मावशी जवळजवळ ओरडल्याच! आम्ही अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे सगळेजण स्वयंपाकघरात गेलो. कपाटात ठेवलेले दोन पुडे व आणखी चार पुडे समोर बघून सगळे स्पीचलेस! जास्तीच्या आणलेल्या साबणांनी माझ्या तोंडाला आधीच फेस आला होता, आता त्यात आणखी भर पडली होती.

संस्कृतीविनोदसमाजजीवनमानअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अस्मी's picture

22 Feb 2010 - 12:07 pm | अस्मी

ही ही ही...
म्हणजे गोन्धळात गोन्धळ

- मधुमती

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Feb 2010 - 6:48 pm | बिपिन कार्यकर्ते

जबरी... मग त्यानंतर चार दिवस सगळ्यांनाच दोन्ही वेळेला जिलबी आणि ढोकळ्याचं जेवण का? ;) साबण तर बहुतेक वर्षभर पुरले असतील.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

23 Feb 2010 - 12:11 am | टारझन

अल्टिमेट्स !!! लेखणस्टाईल अगदी अगदी ओघावती आहे :)
बायकी गप्पा तर लै भारी ... ल्हाण असतांना आई बरोबर काकुंकडे आलो की असलंच काही ऐकायला मिळायचं !! हॅहॅहॅ एकेक फॅण्सी आयटम ठेवतात म्हणे :) हे हळदीकुंकवा बरोबर लग्नातले आहेर इकचे तिकडे फिरवायची पण एक परंपरा आहे. आमच्या आईच्या कपाटात ब्लाऊजपिसांचा एक मोठ्ठा रकाणा भरला होता :) तो फक्त चालवण्याकरता असे :)

मीनल's picture

22 Feb 2010 - 7:08 pm | मीनल

:D
मीनल.

शुचि's picture

22 Feb 2010 - 7:21 pm | शुचि

>> वेळेवर आवरल्याचा अभिमान आमच्या चेहर्‍यावर चमकत होता>> =))

>>'हे कमी करा' किंवा 'ते कमी करा' अस>> =))
.... हे असं खोटं म्हणावच लागतं :( .... इच्छा असते तुटून पडण्याची =))

लेख आवडला.रेवती अजून येऊ द्या.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

स्वाती दिनेश's picture

22 Feb 2010 - 7:24 pm | स्वाती दिनेश

काय साबणाचं दुकान उघडलंस की काय मग ;)? आणि उरलेल्या (!)ढोकळा आणि जिलेबीचे काय केलेस ?
स्वाती

निशा कुलकर्णी's picture

22 Feb 2010 - 7:55 pm | निशा कुलकर्णी

एक नंबर.......

प्राजु's picture

22 Feb 2010 - 8:07 pm | प्राजु

परवा हा किस्सा तुझ्याकडून ऐकला होता.
वाचतना तेच आठवत होतं.. मजा आली पुन्हा एकदा वाचून.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

प्रभो's picture

22 Feb 2010 - 8:50 pm | प्रभो

हाहाहा..मस्तच

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

पक्या's picture

22 Feb 2010 - 10:31 pm | पक्या

छान किस्सा.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

धनंजय's picture

22 Feb 2010 - 10:39 pm | धनंजय

गमतीदार किस्सा

(कमी पडण्यापेक्षा जास्त असलेले बरे... तिप्पट-चौपटीने! अबब)

बेसनलाडू's picture

23 Feb 2010 - 4:53 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मी-सौरभ's picture

22 Feb 2010 - 11:42 pm | मी-सौरभ

साबण हवा??

की

ढोकळा हवा??

-----
सौरभ :)

वाण लुटले असे का म्हणतात ? पूर्वी खरंच वाणाची लुटालुट व्ह्ययची का ?

संदीप चित्रे's picture

23 Feb 2010 - 2:25 am | संदीप चित्रे

म्हणूनच अग जास्त तत्परता दाखवू नये ;)
किस्सा वाचायला मजा आली पण प्रत्यक्ष ऐकायला जास्त मजा येईल.

चित्रा's picture

23 Feb 2010 - 7:44 pm | चित्रा

ज्या स्त्रिया आणि पुरूष साटप असतात त्यांचे अंदाज चुकले की त्यांना असे खूप चुकल्यासारखे वाटत असावे. मला काहीच वाटत नाही, कारण माझे अंदाज कायम चुकतात! बर्‍याचदा केलेले उरते, किंवा आणलेले पडून राहते, आणि मग त्याची उस्तवार मला करायला लागते. :(

पण किस्सा वाचून पूर्वी अनुभवलेल्या हळदी-कुंकवांची आठवण झाली.

मदनबाण's picture

23 Feb 2010 - 4:41 am | मदनबाण

छान किस्स्सा... दर वेळेला नविन काय लुटायचे (लुटणे हा शब्दप्रयोग का आला असावा ? :?) हा देखील मोठा प्रश्न असावा !!! ;)

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

ऋषिकेश's picture

23 Feb 2010 - 9:53 am | ऋषिकेश

=)) =))

लय भारी!!! ह ह पो दु

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

रेवती's picture

23 Feb 2010 - 7:40 pm | रेवती

सर्व वाचकांचे व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
सर्व ढोकळे व जिलेब्या फ्रिजमध्ये ठेवून दुसर्‍या दिवशी जवळच्या आश्रमात नेऊन दिले. काय करणार?

माझ्याकडे असलेल्या धार्मिक मार्गदर्शनाच्या पुस्तकात दिल्यानुसार संक्रांतीनंतर थंडी कमी होवू लागते (सूर्याचा मकर राशीतील प्रवेश वगैरे सांगत बसत नाही.;)) भाज्या, फुले, फळे छान मिळत असतात म्हणून सुवासिनींना पूर्वी भाज्या व फळेच देत असत. नंतर कालानुरूप बदल होत जावून भेटवस्तू देण्याचा पद्धत पडली. तरीही बर्‍याच वर्षांपूर्वी आईच्या मैत्रिणीने मेथीच्या जुड्या लुटल्याचे अंधूकसे आठवते आहे. लुटण्याचा अर्थ 'आपल्याकडे भरपूर असलेली गोष्ट सढळ हस्ते सुवासिनींना देणे' असा घेतला जाणे अपेक्षित आहे.:) ज्यांना ष्टोरी प्रत्यक्ष ऐकायची आहे त्यांना घरी येण्याचे आमंत्रण आहे.:)

दरवर्षी काय लुटायचे? हा प्रश्न कधीकधी पडतो. लग्न झाल्यावर पहिली काही वर्षे या सगळ्याचा उत्साह खूप असतो. आता पूर्वीइतका नाही कारण परदेशात प्रत्येकाला सूर्याचा मकर राशीतील प्रवेश सांगत बसायचा म्हणजे त्रासाचे होइल.;)
आपणासर्वांचे पुन्हा एकदा आभार!:)

रेवती

विसोबा खेचर's picture

24 Feb 2010 - 10:27 am | विसोबा खेचर

रेवतीवैनी,

किस्सा सह्हीच! :)

तात्या.

राघवेंद्र's picture

14 Jan 2016 - 9:51 pm | राघवेंद्र

सहि किस्सा!!!

हीहीही, खास रेवाक्का किस्सा. अगं जाळीचं कपाट हा शब्द कित्ती वर्षांनी ऐकला !! आमच्याकडे होतं असं कपाट. मज्जा असते हळदीकुंकु. म्हणजे लग्नानंतर मज्जा वाटायला लागली. लग्ना आधी आईबरोबर कधी ही जायचे नाही. रादर , मी निमंत्रण पण द्यायचे नाही. धाकट्या बहिणीला फार प्रॉब्लेम नसायचा निमंत्रणं करण्यात पण "ही करत नाही म्हणजे काही तरी गडबड आहे आणि आपल्याला अजुन ती कळलेली नाही त्यामुळे सेफर साईड आपण पण अडुन राहिलेलं बरं" असा विचार असायचा तिचा. त्यामुळे आईची फार पंचाईत व्हायची. ती अर्थात च आमचा विरोध मोडुन काढुन आम्हाला पिटाळायचीच. मग अर्धी कॉलनी मी आणि अर्धी कॉलनी बहिण असं मीच वाटप करायचे, त्यात पण मी कॉलनीचा असा भाग घ्यायचे जिथल्या बायका दुपारच्या वेळी घरी असण्याची शक्यता कमी असायची. एक तर निमंत्रणं लवकर उरकायची आणि वर बोलत बसायची झंझट नाही. येऊन जाऊन अभ्यास कसा चाललाय वगैरे सारख्या लीस्ट प्रॉडक्टीव प्रश्नांची उत्तरं कोण देत बसणार? लवकर आल्यावर किती वेळ लावतेस असं बहिणीला चिडवता पण यायचं ;)

पण लग्नानंतर लोकं एकदम भारी ट्रीटमेंट देतात राव. साडीची दखल घ्या, गाडीची दखल घ्या, एकुण च आपल्याला निमंत्रण असतं, आईचं शेपुट म्हणुन जावं लागत नाही ;) मग आवडायला लागली हळदीकुंकवं. तो पर्यंत बहिणीला आईबरोबर जायला भाग पाडायचे मी :P

रुपी's picture

15 Jan 2016 - 2:52 am | रुपी

मस्त! खुसखुशीत लेख!

पद्मावति's picture

15 Jan 2016 - 2:40 pm | पद्मावति

मस्तं आहे लेख. आवडला.

सस्नेह's picture

15 Jan 2016 - 2:47 pm | सस्नेह

अस्सा किस्सा आहे होय हळदीकुंकवाचा ?
...तरीच गेले चार दिवस खफवर हळदीकुंकू गाजतंय रेवाक्काचं !

मस्त…. अरे थोडा ढोकळा आम्हाला तरी पाठवायचा:)