Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
28 Jul 2025 - 9:21 pm

✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे
✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग
✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग
✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा
✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान
✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता
✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा
✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा

नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

पहिल्या दिवशी पुणे ते अहिल्यानगर (१२३ किमी), दुसर्‍या दिवशी अहिल्यानगर ते बीड (१३० किमी) आणि तिसर्‍या दिवशी बीड ते परभणी (१४२ किमी) असे टप्पे केले. काहीही त्रास न होता आरामात हे टप्पे करता आले. पहिल्या दिवशी प्रचंड पाऊस व चिखलाचा अनुभव मिळाला. फार पाऊस असताना थांबावं लागलं, कमी पावसात सायकल चालवता आली. अहिल्यानगरला पोहचण्याच्या आधी कामरगांवमध्ये विद्यार्थ्यांना भेटता आलं. जुन्या सुहृद डॉ. सविताताईंनी विद्यार्थ्यांसोबत भेट घडवून आणली. त्यांनी घरच्यासारखी व्यवस्था केली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पहिल्या दिवशी साडेपाच तासांच्या आत राईड पूर्ण झाली. म्हणजे पुण्याहून बसने नगरला जाताना लागतो त्याच्या दुपटीहून कमी वेळ! सायकलिंगचा सराव चांगला असेल तर सायकल ही अगदी स्कूटीसारखी धावते. अहिल्यानगरमध्येच डॉ. विलास जाधव सर भेटले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं.


.

.

दुसर्‍या दिवशी पाऊस कमी पण चिखल फार होता. मेरीडा सायकलीला मड गार्ड नसल्यामुळे चिखलाची सारखी आंघोळ होत होती. इतकी की, बाजूने जाणारे सांगायचे चिखल लागलाय. योगाच्या दृष्टीने चिखलातूनच कमळ उगवतं! त्यामुळे चिखलाचा त्रास वाटला नाही. अहिल्यानगरच्या पुढे करंजीचा घाट सुंदर होता. खूप वेळ रस्ता ढगातून जात होता. निसर्गाच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा पुरेपूर आनंद घेता आला. पाथर्डीच्या पुढे खरवंडीपासून बीडकडे जाणारा मधला रस्ता घेतला. नकाशात तोही राष्ट्रीय महामार्ग दिसत होता. काही ठिकाणी चांगला रस्ता होता. पण मध्ये मध्ये त्यावर जे डायवर्जन्स आणि दगडी पॅचेस होते, तिथे मात्र सायकलीला अनेक धक्के सहन करावे लागले! वनडे मॅचमधला पॉवर प्ले संपून एकदम कसोटी क्रिकेट सुरू झालं. उखडलेला कच्चा रस्ता, चिखल आणि धुळ! चिखलाचं सचैल स्नान सुरू राहिलं! बीडच्या अलीकडे १२ किलोमीटरपर्यंत ही स्थिती राहिली. परिसर मात्र अतिशय सुंदर आणि शांत. सगळीकडे डोंगर रांगा आणि हिरवागार निसर्ग! रस्ता मात्र संयमाची परीक्षा घेणारा.

अशा रस्त्यांवर जेव्हा कधी ताण होतो, तेव्हा त्यावर एक सोपा उपाय करता येतो. मनातल्या मनात एखादं गाणं सुरू करायचं. कानाचं पाठांतर चांगलं असेल तर आवडती गाणी डिट्टो ऐकता येतात. आणि अशा गाण्याकडे लक्ष गेलं की, खड्ड्यांचा किंवा चिखलाचा त्रास जाणवेनासा होतो. त्या त्रासावरची धारणा जाते आणि धारणेला दुसरा विषय मिळतो. मनातल्या मनात आवडीचं गाणं ऐकत १० किलोमीटर आरामात पूर्ण होतात. बाजूने जाणार्‍या ट्रॅक्टरच्या गाण्यामुळेही ऊर्जा मिळते. आणि जरी रस्ता अडचणीचा असेल तरी आजूबाजूचा बदलणारा आसमंत आपल्या विचारांना ब्रेक लावतो आणि मन शांत होतं. निसर्गातला आल्हाद अनुभवता येतो.


.

वाटलं नव्हतं बीडचा परिसर इतका डोंगराळ आहे म्हणून! सगळीकडे डोंगर आहेत. बीडला पोहचायला अपेक्षेपेक्षा उशीर झाला. बीडमध्ये रवींद्र देशमुख सर भेटले. वेलणकर आणि परभणी म्हंटल्यावर त्यांनी थेट विचारलं, नाना वेलणकरांचा नातू का? आजोबांनी ४० वर्षांपूर्वी दिनदयाल केंद्राचं काम केलं तेव्हा ते तरुण होते! त्यांच्याच माध्यमातून ध्येयपूर्वी वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद करता आला.

तिसर्‍या दिवशी टप्पा मोठा होता, पण रस्ता चांगला असल्यामुळे सोपा जाईल असं वाटलं. बीडवरून सकाळी सहाला निघालो. तिसर्‍या दिवशी अखेरीस कोरडा रस्ता मिळाला. बीड- वडवणी- तेलगांव- माजलगांव- पाथ्री- परभणी असा रस्ता होता. पण तेलगांवपर्यंत सतत डायवर्जन्स आणि दगड- चिखलयुक्त रस्ते! अशा रस्त्यांवर सायकलीवर बसवलेलं सामानही हलत होतं आणि परत परत ठीक करावं‌ लागत होतं. शिवाय सायकलिंगची लयही तुटत होती. हळु हळु तो टप्पा पार झाला. ह्या टप्प्यावर गावांची नावं खूपच मजेशीर होती! चिंचवड, परभणी तांडा, कल्याण नगर!

तेलगांवनंतर मात्र सुसाट रस्ता मिळाला तो थेट परभणीपर्यंत! ठराविक अंतरानंतर थोडा थोडा नाश्ता करून रिफ्युएल करत राहिल्यामुळे थकवा आला नाही आणि मस्त वेग मिळाला. पाथ्रीमध्ये परभणीच्या निरामयचे योग शिक्षक भेटले. थोडा वेळ भेट झाली आणि निघालो. ह्याआधीही परभणी- पाथ्री सायकलिंग केलं असल्यामुळे घराच्या जवळ आल्याचा भाव जाणवला. परभणीच्या ओढीमुळे पुढचं अंतर लवकर संपलं. आणि त्याच ओढीमुळे निरामयचे सुहृद वाट पाहात थांबले होते. परभणीमध्ये पोहचता पोहचता आप्त मंडळींच्या भेटीमुळे ऊर्जा मिळाली.

ह्या तीन दिवसांच्या राईडमध्ये अनेक गोष्टी अनुभवता आल्या. त्या आधारे आता पुढच्या महिन्यात सुरू होणार्‍या दक्षिण भारतीय सायकल अभियानाचं नियोजन सुरू आहे. "निरामय"चं हे सायकल अभियान बंगलोरवरून सुरू होईल. बंगलोर- मैसूर- उटी- ईशा आदि योगा- कोची- कन्याकुमारी- रामेश्वरम- पुद्दुचेरी- चेन्नै असं साधारण १८५० किलोमीटर अंतर असेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे! एक एक पाऊल व्यवस्थित उचललं तर आपोआप पुढचा मार्ग मिळत जातो. त्या अभियानाचे डिटेल्स लवकरच कळवेन. धन्यवाद.

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक: 28 जुलै 2025.

आरोग्यप्रवासविचारअनुभव

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

29 Jul 2025 - 10:41 am | विवेकपटाईत

प्रवास वर्णन आवडले.

ramjya's picture

31 Jul 2025 - 11:40 am | ramjya

मस्त सर.......बीड ला बालाघाट डोंगर रांगा आहेत पण पाडळसिंगी-बीड-तेलगाव-माजलगाव-पाथ्री-परभणी मार्ग एवढा डोंगराळ नाहिये......दक्षिण भारत भ्रमंती साठी शुभेच्छा....मी ऐकुन आहे कन्याकुमारी आनी रामेश्वररम मधला 'मान्न्पाड' ( Manapad)भाग सुन्दर आहे

कर्नलतपस्वी's picture

1 Aug 2025 - 1:11 pm | कर्नलतपस्वी

दक्षिण भारत निसर्ग समृद्ध आहे. या भागात स्वताच्या गाडीने प्रवास केल्याने अनुभवला आहे.

दाक्षिणात्य लोक हिन्दी बोलत नाही,समजत नाहीत. पण इंग्रजीत संभाषण करू
करतात. हे आपल्याला माहीत असेलच पण फक्त समयोचीत पुनरावृत्ती.

पुढील ट्रिप साठी शुभेच्छा.

लाम्ब पल्ल्याच्या राईडसाठी बरोबर काय सामान घेता आणि कसे ठेवता? सायकल दुरुस्ती किती करावी लागू शकते?

मार्गी's picture

2 Aug 2025 - 11:43 am | मार्गी

सर्वांना धन्यवाद! :) @ rmjya जी, ओके. @ अनामिक सदस्य जी, खूप मोहीमा केल्या आहेत. त्यानुसार जितकं आवश्यक तितकंच सामान. किरकोळ दुरुस्ती करता येते. पंक्चर किट ठेवतो. सर्व सर्विसिंग केलं व नवीन टायर्स घेतले तर जास्त काही करावं लागत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Aug 2025 - 8:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतकं अंतर पायंडल मारत चालायचं हे मोठं कौतुक वाटतं. लांबचा प्रवास होता.
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे