लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
4 May 2023 - 10:36 am

सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं.

माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी! किती शिकवा जाहिरातीतल्या बाईसारखा तरोताजा बनवणारा चहा काही या म्हशीला करता येत नाही.(चिडले की मी मनुष्य योनीतून पशुयोनीतलं संबोधन वापरते.) त्या चहात बुचकळून कडक टोस्ट दातांना (त्यातले अनेक कृत्रिम) टोचवून आणि जिभेला इजा करवून घेत मी खाल्ले.
आता यापुढचा दिनक्रम काय उघड करुन सांगायला पाहिजे?चतुर आणि चाणाक्ष नसलेल्या वाचकांच्याही तो लक्षात आला असेल. मग आंघोळ,बेचव ब्रेकफास्ट, बेचव जेवण.कितीतरी स्वयंपाकिण्या बदलल्या असतील,पण चवीत फरक पडेल तर रामा,शिवा, गोविंदा! जेवणानंतर टीव्हीवर सुरु असलेल्या रटाळपणाचा कळस असलेल्या मालिका. मी त्या असह्य मालिका मुर्दाडपणे का बघते? डोळ्यांसमोर काही तरी चित्रं हालतात म्हणून?बातम्यात ह्याची त्याच्यावर टीका, घणाघात, टोला हाणला. पलटवार, शेरेबाजी! आत्ताच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा एक वेळ निकाल सुध्दा लागेल, पण या नेत्यांचं बोलणं काही थांबणार नाही. मला तर हल्ली कोण गद्दार (किती सालचे?)कोण ढेकूण, कोण सर्प,कोण घूस, कोण डुक्कर,कोण चोर,कोणाचा खंजीर कुणाकुणाची पाठ हेच कळेनासं झालंय. म्हणजे पुन्हा तेच ते आणि तेच ते.

टीव्ही बघून आणि वाचून डोळे शिणले की झोपायचं. पुन्हा टीव्ही , पुन्हा चहा, पुन्हा जेवायचं (आता काय म्हणे रात्रीचं जेवण!) आणि मग पुssssssन्हा त्याच त्या बिछान्यावर झोपायचं. च्या.... च्या.... उतारवय किती कंटाळवाणं! काहीतरी वेगळं, छान, घडायला पाहिजे. सनसनाटी,थ्रिलिंग!

माझ्यासारखंच माझ्या काही मैत्रिणींना वाटत होतं. आमच्यांपैकी एका मैत्रिणीनं सुचवलं,"(बुद्धिमान आहे साली.)आपण सगळ्याजणी मस्तपैकी कुठंतरी आऊटिंगला जाऊया का?ट्रीपला? सरळ हॉटेल किंवा चांगल्याशा लाॅजवर उतरायचं. कुणाच्याही घरी नाही. मग भाजी चिरून देऊ का? पोळ्या करु का? असं मॅनर्स म्हणून विचारावं लागतं आणि करावंही लागतं. त्यापेक्षा हॉटेल बरं!आठ दिवस राहायचं हॉटेलवर. स्वयंपाकाला हा म्हणून लावायचा नाही. सिनेमे बघायचे,रोज नव्या हाॅटेलात चमचमीत जेवायचं. आजवर अजिबात न खाल्लेले पदार्थ खायचे. (बियर प्यायची,एका बिनधास्त मैत्रिणीचं प्रपोजल. नाही ग बाई.आम्ही नाही हं त्यात!"-काही उद्गार) भरपूर खरेदी करायची. आईस्क्रीम, फालुदा, कुल्फी ,मस्तानी, मिल्कशेक ओरपायचं, एसी टॅक्सी, सॉरी, कॅबमधून हिंडायचे. पैसे लावून पत्ते खेळायचे.(एक दोघी: ए,असलं काही नको हं!) म्युझिक लावून डान्स करायचा. मस्तपैकी सिगरेटही ओढून पाहायची.(सगळ्याच जणी: हे असलं तर काहीतरी अजिबात नाही हं!) बघूया तरी कसं वाटतं ते!आपण काय आता लहान मुली नाहीत बिघडायला! सगळ्या काकू, मावशी,ऑंट्या , आज्या आहोत. "त्या बुद्धिमतीनं आपलं बोलणं संपवली. आम्ही तिच्या इतके सडाफटिंग मुक्त विचारांच्या नसलो तरी तिची आयडिया एक्सायटिंग वाटली.

आम्ही पाच जणी गेलो. एका शहरात. आम्हाला खेड्यात,शांत वातावरणात, निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसायचं नव्हतं. आम्हांला मज्जा करायची होती. शहरातल्या सगळ्या लक्झुरीज आम्हांला हव्या होत्या. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लाॅजची आम्ही निवड केली होती. तिथं आम्हांला लाॅजवरुन उतरताच ओ