लेख केवळ मनोरंजन व स्वानंद हा उद्देश समोर ठेवून लिहीला आहे. खुप आधी लिहीला होता,अभद्र विषय असे लोकांचे म्हणणे. सणासुदीला कशाला अभद्र लिहायचे व आनंदावर विरजण टाकायचे म्हणून आता डकवत आहे. माझ्यापुरते म्हणाल तर,
काळ देहासी आला खाऊ
आम्ही आनंदे नाचू गाऊ ll
-संत नामदेव
स्मायलींची बाराखडी शिकवल्या बद्दल @टर्मिनेटर भौं चे विषेश आभार.
😀😁
______________________________
आजकाल मिपावर कवितेच्या दुकानाकडे रसिक कमीच फिरकतात दोन आकडी वाचक तीन आकडी जरी झाले तरी धन्य वाटते.मधूनच एखादी"तुला काय ठाऊक सजणी" दामिनी सारखी चमकून जाते. कदाचित.....
-
चर्चेची मिसळ
लेखांची भेळ
कवितांकडे बघायला
कुणाला आहे वेळ
-
भटकंतीचा वडापाव
शशकांचा पिझ्झा
शेअर्स मधली गोडी
कवितेमधे कुठ हाय मज्जा
-
भंगलेली हृदयं
प्रेमाची रडगाणी
तेच रटाळ विषय
गाणी कंटाळवाणी
-
करतात डोक्याचं दही
म्हणून कवीतेच्या वाटेला
कुणी जातच नाही
-
लेखाच्या अवगुठंनात कविता लिहायचा एक वेगळाच प्रयत्न करतोय जळण नसणाऱ्या तिरडीवर' या कवितेचा जन्म कसा झाला याची गोष्ट.
-
एक परममित्र, जेवढे हुशार तेवढे खट्याळ. फिरकी घेण्यात तरबेज. कधीकाळी क्रिप (क्रिकेटपटू) होते आता इंग्रजीतले क्रिपी झालेत सदानकदा गुगली टाकतात.पन्नास वर्षांची मैत्री. बालमित्र, एकमेकांच्या नाड्या चांगल्याच ओळखून आहोत. एक दिवस त्याने अचानक विचारलं"वळण नसलेल्या सरळ वाटेवर",अचानक कुणी भेटलं तर काय होतं? प्रश्नाचा रोख लक्षात आला. गर्भितार्थाकडे कानाडोळा करत उत्तरा दाखल "वळण नसलेल्या वाटेवर ",ही कविता लिहीली व मिपा तज्ज्ञां समोर प्राथमिक चिरफाडी साठी प्रस्तुत केली. उदारमतवादी तज्ञांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिल्याने हुरूप आला. इथे वाचा. 😼
-
https://www.misalpav.com/node/50380/backlinks
आमच्या सरळ वाटेवरच्या निरागस कवितेचे पैजारबुवांनी,"दळण नसलेल्या गिरणीवर" विडंबन केले व म्या पामराच्या सृजनाचा सन्मान केला. इथे वाचा. 👈
https://www.misalpav.com/node/50381/backlinks
माऊलींच्या विडंबनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातच एक जेष्ठ सदस्य शशिकांत ओक यांनी "जळण नसलेल्या तिरडीवर", अशा कविकल्पनेचा पतंग हवेत आरूढ होऊन स्वर्गसुख, हूर पऱ्या याची दोस्ती यावर काव्य निर्मिती व्हावी अशी फर्माईश केली.
उमेदवारीचे दिवस, विडा उचलला आणी कामाला लागलो.सकाळी सकाळी सिहांसन बत्तिशी वर आरूढ असताना "ज्ञानवती, कौशल्या व रूपरेखा ",या तीन पुतळ्यांनी एकत्रीत येवून ज्ञानगंगा प्रवाहित केली व सुप्त कौशल्य जागृत करून कवीतेची रूपरेखा बनवली. प्रथम श्रोती, अर्थात अर्धांगिनी हिला ऐकवली."असले कसले अभद्र विषय सुचतात हो तुम्हांला?" प्रथम प्रतिसाद.
मी म्हणालो,
"कोबंड नाय आरावलं म्हणून सुर्यदेव नाय उगावलं ",आसं कंदी झालयं का?
-
सणासुदीचे दिवस आहेत,अजीबात कुणाला पाठवू नका ,फर्मान सुटले. च्याप्टर क्लोज.
बाप्पा आपल्या घरी सुखरूप पोहोचलेत. पुर्वजांची श्रद्धापुर्वक आठवण काढण्याचे दिवस सुरू झालेत.विचार केला कवीता मिपाकरांच्या चिकित्सक दृष्टीपटला समोर ठेवावी.
मधल्या काळात, संत तुलसीदास यांनी मनुष्य जन्मावर केलेले भाष्य वाचनात आले. ते म्हणतात.
"प्रारब्ध पहले रचा, पीछे रचा यह शरीर।
तुलसी चिन्ता क्यो करे,भज ले श्रीरघुबीर।।
भावार्थ - मनुष्य जब माता के गर्भ में आता है, उसी समय से ही उसका प्रारब्ध निर्धारित हो जाता है। प्रारब्ध कर्म इस जन्म के भोगों का निर्धारण करते हैं। उसका शरीर बाद में बनता है ".
मनात विचार आला की जर माणुस प्रारब्धा नुसार जन्मतो, सुखदुःख भोगतो,वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या कारणाने त्याला मृत्यू येतो तर तसेच त्याच्या पार्थिवाचे सुद्धा प्रारब्ध असेल काय? कुणाला भडाग्नी, कुणाला मंत्रांग्नी ,कुणाला तोफांची सलामी तर कुणी बेवारशी म्हणून फक्त कर्तव्य म्हणून केलेला भावनाशून्य अंतिम संस्कार असे का? एक ना अनेक प्रश्न डोके वर काढू लागले.
"Empty mind is devils work shop",ही उक्ती आता मात्र मला खरी वाटू लागली.
मनो मधुकरो मेघो मद्यपो मत्कुणो मरुत् ।
मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलाः ॥
मन,मधमाशी,मेघ,मद्यपी,मत्कुणो (ढेकूण), मरूत्,मद,मर्कट आणी मीन म्हणजे मासा या जगातील दहा सर्वात जास्त चंचल गोष्टी.त्यात मानवी मनाचा पहिला नंबर येतो. मनाचे तारू आणखी भरकटण्या आगोदरच त्याला आवरलेले बरे.
सिहासन बत्तीशीवर बसल्यावर बुद्धीचा वारू जास्तच गतीमान होतो.कल्पना विलासातून स्फुरलेलं काव्य आपल्या समोर ठेवत आहे.
जळण नसलेल्या तिरडीवर.....
-
जळण नसलेल्या तिरडीवर
प्रेत गप गुमान निजलं व्हतं
सरगातल्या आसरांच
सपान त्येला पडत व्हतं
-
हरिश्चंद्र म्हणाला.....
ठेवा त्याला इकडं
आणा चाळीस मण लाकडं
टोल टॅक्स भरा अन्
मगच पुढील सोपस्कार करा
-
थंड पडलया प्रेत,वाट पघत आगीची
लई काम हाय,येळ हाय घाईची
यमदूत बडबडला,"कुठ कडमडली बाकीची
ही काय येळ हाय का, सोडून जायची?"
-
दोस्त म्हनला.....,
मुक्कामाची गाडी हाय
येरवाळीच जाया हवं,
बाईल वाट पघत आसलं
इतका येळ कुठं शेण खात व्हता
म्हणून डोक खात बसलं
-
मुन्शीपाल्टीवाला म्हनला,
सरकारी टैम संपला
बिगी बिगी आवरा,मला बी हाय घाई
घरला वाट पघत्यात सात पोरं
अन एकलीच माह्यी बाई
-
शेजेची बाईल धाय मोकलून रडत व्हती
पदराचा बोळा कोंबून "आता माझं कस व्हणार"
म्हनून टाचा ख-?रडत व्हती.
-
सरकारी येळ झाला सम्द्यांनी दुकानं केली बंद
पडला गुफ्फ अंधार अन् हवा झाली कुंद
-
प्रेत गप गुमान पडलयं,
पघतयं शेवटच्या काडीची वाट
शेजेच्या बाईने घातलायं,
दुसर्या पाटाचा घाट
-
प्रेतानी इच्चार केला,मी तरी कह्याले थांबू!
भुताखेताची वस्ती हाय,मागतील कापड न् बांबू
भ्या दावतील मला, दिसा उजेडी येतो
कुणी नाय बघून एकलाच घरला जातो
-
घेऊन गुलाबाच फुल, प्रेत उभं दारात,
नेसून पैठणी, घोडनवरी बसली शेजघरात
बघून त्यास्नी,बाईच्या काळजाचा ठोका चुकला
सुहागरातीच्या आधीच नवा दादला खपला.....
-
अर्थात प्रत्येकाच प्रारब्ध वेगळे पण माॅरल ऑफ द स्टोरी मात्र एकच.....
लळा जिव्हाळा शब्दच खोटे.....
अर्थात गदिमांची मंतरलेली लेखणी व बाबूजीची स्वर्गीय वाणी यांची किमया. या गाण्याचा जन्म सुद्धा प्रारब्धानुसार झाला. तो कसा झाला हे माहीत करून घेण्यासाठी श्रीधर माडगूळकरनी लिहीलेला धागा वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Lala_Jivhala_Shabdach
@कसरत
३१-८-२०२२
प्रतिक्रिया
10 Sep 2022 - 4:56 pm | रंगीला रतन
हा हा हा भारी :=)
10 Sep 2022 - 8:21 pm | मुक्त विहारि
एक दिवस शांतपणे भेटू या ...
10 Sep 2022 - 9:55 pm | कर्नलतपस्वी
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. पुण्यनगरीत येताय का,भेटायला खूप आनंद होईल.
10 Sep 2022 - 11:35 pm | मुक्त विहारि
ती जाहीरात आहे ना?
मिल बैठे तीन यार, आप, मै और बॅगपायपर ...
फक्त सध्या थोडा फरक आहे, बॅगपायपरच्या ऐवजी, No.1 ने जागा घेतली आहे ...
NO.1 आम्ही आणू
12 Sep 2022 - 10:37 am | विजुभाऊ
चालेल तारीख ठरवा भाऊ.
पुण्यात तर पुण्यात भेटू.
10 Sep 2022 - 8:28 pm | चौथा कोनाडा
फर्मास लेखन... आधी मथळा वाचून घाब्रलोच
बाकी कविते बद्दल काय बोलणार ?
कर्नल साहेब यांची तुफान बॅटिंग !
10 Sep 2022 - 9:57 pm | कर्नलतपस्वी
यम्टी मांईड डेव्हील्स वर्कशॉप.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
11 Sep 2022 - 8:15 am | शेखरमोघे
इतर मिपाकरांच्या चिकित्सक दृष्टीपटलासमोर आणखीही काहीबाही येत असले तरी आम्ही फक्त "छान छान" म्हणत टाळ्या वाजवत आहोत.
11 Sep 2022 - 9:22 am | कर्नलतपस्वी
आम्ही फक्त "छान छान" म्हणत टाळ्या वाजवत आहोत.
माझ्या मते ,मिपा हे केवळ मनोरंजन व एकमेकांकडून पाठ थोपटून घेण्याकरता नसून काही नवीन शिकण्यासही मदत करते. तेव्हां जरा उलगडून सांगितले तर छानच.
ताली के साथ गाली का भी स्वागत है l
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
11 Sep 2022 - 7:45 pm | Nitin Palkar
वा कर्नल साहेब, कविता आणि मोराल दोन्ही आवडले.
12 Sep 2022 - 6:47 am | प्रचेतस
एकदम सुरेख
12 Sep 2022 - 11:11 am | सुरिया
फुल्ल इंदुरीकर महाराज आहात बघा. अधून मधून काव्यपंक्ती फेकत वाजवायचे प्रवचन. थोडेसे नमस्कार स्मायली पण फेकत जा अधून मधून. म्हणजे फील पूर्ण होईल. थोडी जुनी पिढी, थोडी नवी पिढी, थोडे संस्कार, थोड्या परंपरा करत हाणायची प्रवचने. हाय काय नाय काय.
व्हिडिओ तयार करा, युट्यूबवर टाका. तेवढीच मिपाकरांना पण विश्रांती. काय म्हणता.
12 Sep 2022 - 5:59 pm | कर्नलतपस्वी
वाचकां पेक्षा प्रतीसादक मोठे. धागा वाचला आणी त्याची नोंद घेतलीत आमच्यासाठी फार मोठी गोष्ट.
इदुंरीकर महाराजांच्या लाईनीत बसवले काही हरकत नाही,तसेतरी बुद्धिबळाच्या राजाला खोक्यात पडल्यावर कोण विचारतं.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
सूचनेचा विचार करायला हरकत नाही पण मिपाचा दरवाजाच आमच्याकडून कसाबसा उघडतो. अलिबाबाची गुफा कशी उघडणार.
सध्याच्या काळात आम्ही पाषाणयुगी.
क लो आ
12 Sep 2022 - 4:31 pm | ज्ञानोबाचे पैजार
मजाआली वाचताना,
सुपारी घेउन कविता लिहिणे सोपे काम नाही,
तुम्ही तर त्यावर एक अख्खा लेखच पाडला,
आमच्या तर्फे तुम्हाला काटाकिर मिसळ आणि सुजाताची केशर मँगो मस्तानी लागू झाली
पैजारबुवा,
12 Sep 2022 - 6:13 pm | कर्नलतपस्वी
प्रतिसाद फ्रेम करून ठेवलाय. पत्ता सांगा सदाशिव का?
मनापासून आभार.