आठवणींच्या जंगलात

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
2 Jul 2022 - 3:15 pm

पूर्वरंग

त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे. उद्देश तेंव्हा आणी आता याची सांगड घालत मनोरंजनाचा प्रयत्न.अंतर खुप मोठे आहे लेखनात त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गाभा

३० जुन,"महा"वादळ थांबले होते, धुळ,पाला-पाचोळा खाली बसत होता.नऊ दिवस अथक वादळाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकार आणी टि व्ही चॅनेल्सनी एक खोलवर श्वास घेतला.

सकाळच्या मुख्य बातम्यात एक नवी बातमी जुडली होती."आज बाबा बर्फानीची म्हणजेच अमरनाथ यात्रा सुरू झाली.श्रद्धाळूंचा पहिला जथ्था यात्रेकरता रवाना झाला".

१९८० जुलाई मधे अमरनाथ यात्रा करण्याचा योग आला होता. तो एक वेगळाच अनुभव होता.आठवणी जागृत झाल्या.मन पाखरू झाले आणी त्रेचाळीस वर्ष मागे गेले. वाटले काही लिहावे.

मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
- बहिणाबाई

१९७९,नुकतीच दिवाळी संपली होती. वार्षीक अवकाश संपवून पुन्हा एकदा ड्युटीवर परतलो. गणपती,नवरात्र,दसरा दिवाळी वर्षाचे सण सहपरीवार,इष्टमित्रां बरोबर साजरे करता आल्यामुळे खुपच खुश होतो.खरेतर या कालावधीत सैनिकाला सुट्टी मीळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच.

युनिट मधे आल्या बरोबर बदलीची बातमी कळाली.मैदानी युनिट (field unit) आसल्यामुळे नेमके कुठे जायचे हे नवीन युनिटने जवळचे रेल्वे स्टेशन (NRS) कळवल्या नंतरच कळणार होते,तरीसुद्धा जुन्या अनुभवी वरिष्ठ मित्रांकडून साधारण ठिकाण कुठे आहे ते कळाले.आदांज होताच, अतिरिक्त वैयक्तिक सामान आगोदरच घरी सोडून आलो होतो मैदानी युनिट मधे कमीत कमी सामान बरोबर ठेवायचे आसा मानदंड होता.

जम्मू-तवीला रिपोर्ट करायचा होता. प्रवासा करता "वाॅरंट", (म्हणजे गंतव्य स्थानी जाण्यासाठी परवानगी पत्र) घेऊन दिल्लीपर्यंत आरक्षण केले व पुढील प्रवासाच्या आरक्षणा साठी दिल्ली स्टेशन (एम सी ओ)ला संदेश पाठवला.आरक्षण मिळेल न मिळेल पण मित्रांनी सांगीतले की दिल्लीला झेलम एक्सप्रेस खाली होते व त्याला दोन अतिरिक्त मिलट्री डब्बे सुद्धा लागतात, त्यात बसुन जा.

झेलम एक्सप्रेस त्याच वर्षी, १९७९ एक एप्रिल पासून पुणे ते जम्मूतवी पर्यंत सरळ रेल्वे सुरू झाली होती.ही ट्रेन काशमीर खोर्‍यात कार्यरत पश्चीम महाराष्ट्र, कर्नाटक मधील सैनिकांसाठी खुपच सोईची व पुढील विस वर्ष याच गाडीने प्रवास केला.

एकटाच,कुठलेच पाश नव्ह्ते. शिपायांच्या भाषेत,
"छडा xx गिरधारी ना लोटा ना थाली", म्हणजे लग्न न झालेला मनमौजी.सहकर्मी,वरीष्ठ यांच्या कडून बरेच अनुभव ऐकले होते. जाण्यास उत्सुक होतो.जायचा दिवस आला,मित्रमंडळी,सेक्क्षन, प्लाटून कमांडर स्टेशनवर सोडायला आले होते. हातानेच बनवलेल्या फुलमाळा घातल्या.कोण कुठले, कोणी कोणाचे नव्हते पण फौजी वर्दीने सगळ्यांना एका सुत्रात बांधून ठेवले होते. निरोपा निरोपी झाली, "फिर मिलेंगे",म्हणत गाडीत बसलो. डोळे, माझे आणी त्यांचेही ओले झाले.आगदी संदिप खरे यांच्या कविते सारखे.

"गाडी सुटलि, रुमाल हलले,
क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटलि, पडले चेहरे,
क्षण साधाया हसरे झाले".
-संदीप खरे

दिल्लीपर्यंत आरक्षण पण झेलम मधे सुद्धा ऐसपैस जागा मीळाली. रात्र झोपेत गेली.सकाळी सकाळी पठाणकोटला पोहचलो.फलाटावर गाडी थांबली, "अंडे,अंडे, ब्रेड आम्लेट,पुरी सब्जी, चाय,गर्रम चाय" आसा एकच कल्ला,झोप चांगली झाली होती.मस्त पैकी ब्रेड आम्लेटचा नाष्टा करून मातीच्या कुल्हड मधे गरमागरम चहा घेतला. थंडीमुळे दातांची कवळी गाणे गात होती तर इतर अवयव त्याच्या तालावर नाच करू पहात होते. आयुष्यात पहिल्यांदाच इतकी थंडी अनुभवत होतो.

गाडीतली गर्दी आणखीन कमी झाली. आबांला,जलंदर,पठाणकोट योल कॅम्प आणी हिमाचल मधे कार्यरत आसलेले सैनिक आपा- पल्या स्थानकांवर उतरून गेले होते. उरलेल्यांचा गप्पांचा फड रंगला, बरोबरच घरून आणलेला फराळ बाहेर निघाला. हवालदार, नायक शिपाई आपली वरीयता विसरून लहान मोठ्या भावा प्रमाणे बोलत होते.आता परिस्थितीत बदल झालाय,प्रत्येक जण मोबाईल मधे गुरफटलेला दिसतो.दुरवर धौलाधार पर्वतरांगांची शुभ्र बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. जुने जाणकार नव्यांना दाखवत होते.नवीन प्रदेश बघत आणी गप्पा मारत केव्हा जम्मू तवीला पोहोचलो कळलेच नाही. दुपारचे बारा वाजले होते.उंचावर रेल्वे स्थानक,चारच प्लॅटफॉर्म.देशातल्या कानाकोपर्‍यातून सैनिक घेऊन आलेल्या गाड्या यार्डात सुस्तावल्या होत्या तर काही संध्याकाळनंतर परत जायचय म्हणून नट्टापट्टा करत होत्या. ड्युटीवर परत आलेले व सुट्टीवर जाणारे सैनिक त्यांच्या हालचाली व चेहर्‍यावर वरून साफ ओळखू येत होते.

जवळपास सर्वांनाच परागमन शिबीरात जायचे होते त्यामुळे एक छान ग्रुप बनला. सामान एक दुसर्‍याला बघायला सांगत स्टेशनवरच आन्हिक उरकून घेतले.

बावीस वर्षाचा गब्रू जवान होतो. काश्मीर खोऱ्यात जाण्याची पहिलीच वेळ.त्यावेळेस जम्मूतवी हे शेवटचे रेल्वे स्टेशन होते. बाहेर परागमन शिबीराच्या गाड्या उभ्या होत्या. पत्र्याची पेटी, वळकटी (Holdall) आणी किटबॅग घेऊन जम्मू परागमन शिबीरात (Transit Camp) दाखल झालो.तंगधार क्षेत्रात जायचे आहे आसे कळाले. आपसूकच स्टेशनवरचा ग्रुप गंतव्य क्षेत्रा प्रमाणे विभागला.

तंगधार गाव, निलम व लिपा घाटी मधले सीमावर्ती क्षेत्र. चहूबाजूंनी उंचच उंच डोंगर आणी पायथ्याला गाव वसलेले. चारी बाजूचे डोंगरांचे कडे आणी शत्रूचे गोळे कोसळून कधी गावाची चटणी बनवतील याचा भरवसा नाही.

जम्मू पासून उधमपुर, श्रीनगर, पट्टण, बारामुल्ला कुपवाडा, त्रेगाव, चौकीबाल तंगधार आसा उत्तर पश्चीम सिमावर्ती काशमीर पर्यंतचा प्रवास. किलोमीटर जरी कमी आसले तरी दुर्गम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक, रा.मा. जरी आसला तरी आजच्या राज्य मार्गा पेक्षाही चिंचोळा,बरेच ठिकाणी एका वेळेस एकच गाडी जाण्या पुरती जागा. संपुर्ण घाट,एकिकडे डोगंर तर दुसरीकडे भोवळ आणणारी खोल दरी,कुठे हेअर पिन बेन्ड ,कुठे झेड मोड तर कुठे जलेबी मोड. सगळाच थरार. घाटाच्या प्रवासात बहुतेक नवखे उलटीने बेजार झाले.

काशमीर खोर्‍यात जाण्यासाठी, जम्मू आणी काश्मीर खोऱ्याला वेगळे करणारा पीरपंजाल १३००० फुट उंच लांघून जावा लागतो. पीरपंजाल शब्द डोग्री,पीर = पर्वत आणी कशमीरी, पातसल= पर्वत या दोन भाषांनी मीळून बनलाय व पुढे त्याचा अपभ्रंश झाला असावा. कडाक्याची थंडी,बिकट घाट व अचानक खाली कोसळणारे डोंगरकडे यामुळे जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागे. इसवी सन १९६० मधे "जवाहर", आणी इसवी सन २०२१ मधे "बनिहाल-काझीगुंड", बोगदा बांधल्यावर प्रवासातील अंतर व धोका दोन्ही कमी झाले.आतातर थेट श्रीनगर,बारामुल्ला,
सोप्पुर पर्यंत ट्रेन जाते.इंजीनिअर्स,कुशल तंत्रज्ञ अकुशल कामगार आणी रेल्वे प्रशासनाला सॅल्युट.

एक गोष्ट जरूर सांगाविशी वाटते तो प्रवास आजच्या सारखा सुखकारक, आरामदायक नक्कीच नव्हता.

बारा दिवसांनी चौकीबाल बेस कॅम्प मधे पोहोचलो. (साडेचारशे किलोमीटर प्रवासाला इतके दिवस का तर ठिकठिकाणी परागमन शिबीरात रहावे लागायचे.FIFO व्यवस्था आसते.) परागमन शिबीरात काही जुने काही नवे दोस्त व नवे अनुभव मीळाले.

अतिरिक्त सामान बेस कॅम्प मधे जमा करून पुढे मुख्य युनिट मधे जायचे होते. दोन दिवस राहिल्यावर पुढे जाण्यासाठी नंबर आला.

डिसेंबरचा महीना,वजा विस,तीस तापमान, प्रचंड बर्फ पडलेले रक्त गोठावणारी थंडी, सतत सांय सांय छातीत धडकी भरणारा वारा, गाडीचा रस्ता सुद्धा बर्फाची चादर ओढून झोपलेला त्यामुळे पायी जाणे हाच एकमेव पर्याय. त्यावेळेस या भागात विज पोहोचली नसल्याने कंदिल हेच रात्रीच्या उजेडाचे साधन.कंदिल,चिमणी,गॅसबत्ती हे माहीती होते पण ढिबरी,म्हणजे काचेच्या बाटलीत रॅकेल भरून झाकणातून कापडाची वात घातलेला दिवा, तसेच चीड(पाईन) वृक्षाच्या काटक्या सुद्धा मशाल म्हणून कामी येऊ शकतात याची माहीती इथेच मीळाली.

फक्त पंचेचाळीस किलोमीटर अंतर. क्राॅस कंट्री,पर्वतीय रोड ऐरवी गाडीने आडिच तीन तास.दहा बारा फुट बर्फातून आडिच तीन हजार मीटर चढण व तेवढीच उतरण, उतरताना बर्फाची घसरगुंडी करण्यास बंदी,पाय उचलतच जायचे नाहीतर ट्रॅक खराब होतो आसे पायी तेच अंतर कापणे आणी ते सुद्धा पाठीवर सामान घेऊन
म्हणजे एक प्रकारे शारीरिक व मानसिक शक्ती परीक्षणच होते. आता परीस्थीती खुप बदलली आहे.रोडची आवस्था,जमलेले बर्फ, कोसळलेले कडे हटवण्या साठी, पुनश्च डांबरीकरण करण्यासाठी भरपुर अधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध आहेत.

या पिढीतील एक कुशल ड्रायव्हर या रोड बद्दल काय म्हणतो ते बघा.यावरून त्रेचाळीस वर्षापुर्वी कसा रोड कसा आसेल याचा आदांज बांधता येईल.

Sadhana Top, a drive you'll never forget

Sadhana Top is a high mountain pass at an elevation of 3.130m (10,269ft) above the sea level, located in the Himalayas, Tangdar in Kupwara district in Kashmir valley.Demands 100% concentration. Drivers must remain cautious as the pass has been known to claim the lives of careless drivers. Take a tip from the tortoise: slow and steady.

The route, to the summit, also known as Sadhna top,The surface of the road is paved (some sections in very bad conditions) but scary enough, with hairpin curves /around 60) and dangerous dropoffs. Sadhna pass was originally known as Nastachun (cut nose) pass.Do not travel this road in severe weather conditions. This pass receives more than 12 to 15 feet of snow every winter and remains mostly closed from December to April due to snow.

The road is certainly breathtaking and it has a fearsome reputation.It still remains an adrenaline -pumping journey and is definitely not for the faint of lungs, heart, or legs. The road to the summit links Tangdhar and Kralpora towns. The journey is avalanche( I myself witnessed one such in 1982 but miraculously escaped) prone and very dangerous for commuting during winters and summers as well and witnesses frequent accidents,landslides, snow avalanches and rolling stones.

Road suggested by: Hugh Wilson
Pic: manik mittal
अंतरजालावरून साभार.

Nastha Chun चा शब्दशः अर्थ "कापलेले नाक " असा होतो, कारण वर्षभर वाहणाऱ्या जोरदार आणि थंड वाऱ्यांमुळे लोकांना इथे नाक जाणवत नाही.याच कारणास्तव या खिंडीचे काश्मिरी नाव "नाथी चापा गली" म्हणजे "नंब नोज पास" आहे. नास्ता चुन पास साधना पास म्हणून ओळखला जातो.प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री साधना यांच्या नावावर आहे ज्यांनी १९६५ च्या युद्धानंतर सैनिकांशी संवाद साधण्यासाठी खिंडीला भेट दिली होती.

१९४७ मधे हा भाग पाकिस्तानने अनाधिकृत पणे आपल्या कब्जात घेतला पण भारतीय जाबांजानी पुन्हा हिसकावून घेतला.

Maj Gen K S Bajwa,Retd यांनी आपल्या Jammu Kashmir War 1947-48 पुस्तकात येथील लढाईचे सटीक वर्णन केले आहे.

"फुट काॅलम",दुपारी तीन वाजता निघणार आहे, हुकूम आला. (सकाळी फुट काॅलम निघाला तर स्नो ब्लाइंडनेस, होण्याचा धोका) नखशिखांत गरम कपड्यात लपेटून गरजेपुरतेच सामान घेतले ,पॅक लंच ,हातात आधारा करता मजबूत काठी.स्नो बुट, स्नो गाॅगल्स घालून रिपोर्ट केला.रस्त्यात चहा,नाश्ता, गरम पाणी आणि थोडावेळ विश्रांतीसाठी जागा बनलेल्या होत्या.अंगात गर्मी आणी गुर्मी दोन्ही भरपूर होती,बारा तासाच्या पायपीटी नव्हे बर्फपीटीनंतर ( रस्ता नव्हताच, बर्फच तुडवीत जायचे होते) गंतव्य स्थानी पोहोचलो. एवढ्या थंडीतसुद्धा घामाघूम झालो होतो.ओलेचिंब कपडे काढून बदली केले. खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली. सिमावर्ती क्षेत्र आसल्याने स्थानीक नागरीक सुद्धा मिलिट्री फुट काॅलम बरोबर ये जा करतात.त्याना सर्व प्रकारचे सहाय्य सैन्य देते.

नवीन मित्र, नवीन जागा लवकरच रूळावलो. दिवसा मागुन दिवस जात होते.नवनवीन अनुभव गाठीला येत होते.आशा वातावरणात स्वतःची फारच काळजी घ्यायला लागते. आक्युट माउटंन सिकनेस (AMS),चिलबिलीयन्स,फ्रोस्ट बाईट,डिप्रेशन (बहुतांशी ही तात्पुरती मानसिक स्थीती आसू शकते) जास्त उंचावर गेल्यास पलमोनरी ओडीमा, सेरीब्रल ओडिमा इ. होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या करता युनिट मधील वैद्यकीय अधीकारी व इतर स्टाफ नवीन आलेल्या सैनिकांवर लक्ष ठेवतात,त्यांना काळजी कशी घ्यावी याची माहीती वारंवार देतात.

दिवस मस्त चालले होते. शिशीर संपून वसंत वैभव चहूबाजूला पसरू लागले होते.आता ती जागा नंदनवन वाटत होती. आबंटगोड चेरी, आक्रोड,बदाम झाडावरून तोडून खायला मजा येत होती. खुरमानी, नाशपाती, बब्बूगोषा,आडू सारखी फळे भरपुर,सफरचंदे इथे नव्हती पण कधी पट्टण,बारामुल्ला गेलो तर भरपूर बागा दिसायच्या. महाराजा सारखी सफरचंदाची फळे पाडावर आली की मस्त लागतात. एकदमच वेगळाच अनुभव. सटी साहामाशी सत्यनारायणाच्या पुजेत एखादा वाळलेला बदाम बघण्याची सवय असणाऱा मी,बदामाच्या बागेत हिडंताना खुप अप्रूप वाटत होते. खुपच मोठा लेख झालाय.
अमरनाथ यात्रा वर्णन पुढील भागात करतो.
- क्रमशः

मुक्तकप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Jul 2022 - 4:23 pm | कुमार१

छान सुरुवात
येऊ द्या....

तुमची लेखन शैली छान आहे. समोर बसून गप्पा मरल्यासारखे वाटतेय

नागरीकांना शिपायांचं,सैनिकांचं जीवन म्हणजे ब्वॉक वाटतं.
सध्या सेवेत का निवृत्त?

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2022 - 7:21 pm | कर्नलतपस्वी

अंतीम प्रहर चालला
आठवणींच्या जंगलात राहातो
अस्ताला जाण्या आगोदर
मीच माझे यौवन
पुन्हा पुन्हा पाहातो

कंजुस भाई,आता विसाव्याचे क्षण.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नागरीकांना शिपायांचं,सैनिकांचं जीवन म्हणजे ब्वॉक वाटतं.

रसायन तेच आहे पण वेगळ्या मुशीत तापवल्या मुळे जरा वेगळे दिसते. समाजातले चांगले, वाईट सर्व गुण यात दिसतील फक्त प्रमाण किती यावर वेगळेपण ठरते.

अमर विश्वास's picture

2 Jul 2022 - 5:52 pm | अमर विश्वास

सलाम ...

उत्तम सुरुवात ..
गेल्या पंधरा वर्षांत काश्मीर / लेह-लडाख परिसरात इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुधारले आहे (ड्राईव्ह ट्रिप्स मध्ये चांगला अनुभव येतोय)

पण चाळीस वर्षांपूर्वी काय परिस्थिती असेल कल्पनाच करवत नाही ...

त्या परिस्थितीत तिथे काम करणाऱ्यां सर्वांनाच सलाम ..

अजून येऊ द्या

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2022 - 7:44 pm | कर्नलतपस्वी

@अमर विश्वास,
धन्यवाद.
ऐंशी मधे काश्मीर खोऱ्यात शांतता होती,पर्यटक बिनघोर नंदनवनात फिरू शकत होते. शहरी भागात सुखसोई उपलब्ध होत्या तर ग्रामीण भागात विज,बॅक, दळणवळण सारख्या मुलभूत सोई सुद्धा उपलब्ध नव्हत्या. असामाजिक तत्त्व संघटित होण्यास सुरवात झाली होती. सेने बद्दलचा द्वेष शहरी भागात जाणवत होता पण ग्रामीण भागात जवळपास नव्हता. उपासमार आणी क्षय ह्या करता सेनेने चांगले काम केल्याने गावात सौहार्दपूर्ण वातावरण होते.

माझे निरीक्षण.

कर्नलतपस्वी's picture

2 Jul 2022 - 7:46 pm | कर्नलतपस्वी

कुमारेक सर,विजुभाऊ प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आठवणी ची पोतडी उघडा... छान लिहिलं आहे... पुभाप्र

कानडाऊ योगेशु's picture

3 Jul 2022 - 10:09 am | कानडाऊ योगेशु

पुढील भागाची उत्कंठा वाढविणारे लेखन.
एकुण मालिकाच थरारक असणार आहे असे वाटतेय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

शेखरमोघे's picture

4 Jul 2022 - 7:43 am | शेखरमोघे

सुन्दर वर्णन आणि सुयोग्य कवितान्ची पेरणी! मस्त!!

शेखरमोघे's picture

4 Jul 2022 - 7:44 am | शेखरमोघे

सुन्दर वर्णन आणि सुयोग्य कवितान्ची पेरणी! मस्त!!

सस्नेह's picture

4 Jul 2022 - 9:57 am | सस्नेह

मस्त रैचक आठवणी !

सस्नेह's picture

4 Jul 2022 - 9:57 am | सस्नेह

रोचक असे वाचावे

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jul 2022 - 10:57 am | ज्ञानोबाचे पैजार

संपूर्ण लेखमाला रोचक होईल यात काहीच शंका नाही,
आठवणी ४३ वर्षांपूर्वीच्या नसून कालच्याच आहेत इतक्या ताज्या वाटत आहेत.
आपल्या स्मरणशक्तीलाही सलाम.
पैजारबुवा,

Nitin Palkar's picture

4 Jul 2022 - 2:42 pm | Nitin Palkar

तुमची लेखनशैली अतिशय ओघवती आहे. 'युद्धस्य कथा रम्या' तद्वतच सैनिकाचे कथनही मनभावन.... वाचायला खूप मजा येतेय. लेखांच्या लांबीचा विचार करू नका, लिहित राहा.
पुभाप्र.
_/\_

कर्नलतपस्वी's picture

4 Jul 2022 - 6:40 pm | कर्नलतपस्वी

सुखी,का. यो. शेखर,सस्नेह, माऊली, नितीन पालकर आणी वाचकांचे आभार.

काश्मीर किंवा उत्तर पुर्व सीमेवरील सैनिकाला एकाच वेळेस अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते.त्यामुळे तिथले सर्व दिवस स्मरणात राहातात. स्थानिक लोकांना अंगवळणी पडलेले आसते किंबहुना त्याच मातीतले आसल्यामुळे त्यांना सवय आसते. पण सैनिकाला मात्र जुळवून घ्यावे लागते.

मस्त आठवणी. मीही कशमीर खोरे travel co . बरोबर पाहिले आहे आम्ही tourist co. बरोबर सहल केली असलबयाने खूप safe tour केली होती. पण तेव्हाही अतिरेक्यांमुळे 10/10 पावलांवर मिलिटरीचा खूप बंदोबस्त होता व एकेक जवान 10/10 पावलांवर बंदूकीचा नेम धरून attension pose मधे ऊभा होता. त्यमुळे सैनिकांबद्दल अतिव आदर व वाईटही वाटत होते कारण कुठे लांब ठिकाणी घरदार सोडून बिचारे दिवसरात्र थंडीवारा अंधार उजेडात सतत डोळ्यात तेल घालून रोखलेली बंदूक धरून गावातला रस्ता असो की डोंगराळ पहाडी , बर्फाळ वारा वाहणारा प्रदेश असो सतत attension मधे उभे असलेले आपले व सर्व देशाचे शत्रूंपासून व अतिरेक्यांपासून रक्षण करत 24 तास उभे रहाणारे सैनिक दर 10 पावलांवर दिसत होते व वाईट वाटणे ,अभिमान वाटणे एकदमच वाटत होते. ते2009 साल होते. तिथल्या नोव्हेंबर च्या थंडीत माझीअंगावर व्यवस्थित गरम कपडे असूनही थंडीमुळे पुरती वाट लागली होती त्यात टूर कंपनीचे धावत टुर करण्याचे वेळापत्रक ,आम्ही स्वतंत्ररित्या आराम करत आमच्या मनाच्या वेळापत्रकाप्रमाणे ट्रिप्स केल्यामुळे हे असे धावते वेळाफत्रक गाठणे मला विशेषतः खूप जड गेले ‌व तेव्हापासून कानाला खडा लावला कि पूर्वीही कधी अशा टूर्स केल्या नाहीत व यापुढेही अशा टूर्स कधी करायच्या नाहीत व मनासारखे साईटसिइंगही यात होत नाही ते टूर कंपनी म्हणतील तसे धावावे व पळावे
लागते काही ठिकाणी ते साइटसिइंगला कमी वेळ देऊन जेवण- खाणे, snacks चहा यात फार वेळ घालवतात ,तोच वेळ आम्ही न घालवता( उभ्याने टपरीवर वाटेत 10 च मी फक्त दुपारच्या चहाला ठेवून म्यझियमस् , निसर्नगद्रृश्ये जास्त वेळ पहाणे असे आमच्या मनासारखेवागून स्वतःचे समाधान पहिले बघतो 10 मिनिटात राजवाडा, 15 मिनिटात संग्रहालय असले उरकणे नसते तर 2/2 तास संग्रहालय, 1 तास उदा. राजवाडा असे बघून समाधान घेतो म्हणून स्वतंत्ररित्याच ट्रिप आम्हाला पटते. त्यात जबाबदारी, शोधाशोध सतत विचारणा करणे हे तोटे आलेच पण ते आम्ही जाणवून घेत नाही आमचे समाधान महत्वाचे. तसेच यामुळे तेथील लोकल अन्नही आम्हाला माहित होते समजते व खावे लागते ज्यातील राई(मोहरी) तेल अर्ध्या भारतात खाल्ले जाते व मला शेंगदाणा तेलाची खूपच सवय असल्याने फारतर खोबरेल तेल चालते पण जिथल्या राज्यात फिरून राईचे रिफाईंड तेलातील स्थानिक पदार्थ आम्ही खाऊन आलो की घरी आल्यावर माझा उलटीचा कार्यक्रम झालाच पाहिजे फक्त मलाच असे होते घरातल्या बाकी कोणाला असे होत नाही.

श्वेता व्यास's picture

5 Jul 2022 - 9:36 am | श्वेता व्यास

छान आठवणी आहेत, वाचत राहावं असं लिहिलंय.
पुभाप्र.

सुबोध खरे's picture

5 Jul 2022 - 9:46 am | सुबोध खरे

कर्नल साहेब

छान लिहिलेले आहे. सामान्य माणसांना काश्मीर तिथले बर्फ इ बद्दल भरपूर आकर्षण असते.

परंतु तेथे १२ महिने राहणाऱ्या लोकांना काय त्रास असतो याची पुसटशीच कल्पना असते.

प्रत्यक्ष राहिल्यावर अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय त्रास घ्यायला लागतो याची कल्पना नसते.

त्यामुळे असे कोणी तरी स्वतःच्या अनुभवांवर लिहिणे हे स्वागतार्ह आहे.

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2022 - 2:52 pm | कर्नलतपस्वी

नुतन,श्वेता व्यास,डॉक्टर खरे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
डॉक्टर आपले म्हणणे बरोबर आहे. अजुनही बहुतांश लोकांना सेना लढाई व्यतिरिक्त काय करते या बद्दल माहीत नाही.
सैनिकांशिवाय स्थानिक सीमावर्ती लोकांना सुद्धा भरपूर समस्याना तोड द्यावे लागते.

यश राज's picture

5 Jul 2022 - 2:58 pm | यश राज

पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.

सिरुसेरि's picture

7 Jul 2022 - 9:27 am | सिरुसेरि

छान वर्णन . लष्करातील साहसी आणी खडतर जीवनाचे माहितीपुर्ण लेखन .

निनाद's picture

7 Jul 2022 - 9:36 am | निनाद

कर्नल साहेब, छान लिहिलेले आहे. आम्हा सामान्य माणसांना मैदानी युनिट, वाॅरंट, परागमन शिबीर, फुट काॅलम असलेल्या या आयुष्याविषयी फारशी माहिती नसतेच.
ओघवते सहज लेखन. अजून येऊ द्या, वाट पहत आहोत.

कर्नलतपस्वी's picture

7 Jul 2022 - 6:13 pm | कर्नलतपस्वी

सिरूसेरी,निनाद प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

ब्रिटिश आल्या नंतर सेनेची संकल्पना वेगळी झाली. पहिल्यांदा सैनिक घरीच आसायचे फक्त मोहिमे करता बाहेर पडायचे. ब्रीटीशांनी गावापासून दुर छावण्या वसवल्या तेथे सामान्य नागरीकांना प्रवेश वर्जीत होता. सैनिकांना बराकीत ठेवले. त्यामुळे अंतर वाढत गेले व छावणी सामान्य माणसासाठी अलिबाबाची गुफा झाली. त्यांनी सर्व राज्ये,संस्थाने खालसा केली व सेनेचे केन्द्रीय संघटन मजबूत केले.
जसजसा राज्य विस्तार झाला तसतसा सेना राज्याच्या सीमेवर तैनात झाली. सीमाप्रातांत सेना काय करते हे बर्‍यापैकी माहीत आहे पण इतर भागात नाही.

शाळेच्या आभ्यास क्रमात सुद्धा हा विषय नाही. पानिपतावर मराठ्यांची सेना लढली एवढेच माहीती.शिकलगार, तोपची ,पागनीस,स्वयंपाकी ,भोई,भिस्ती याबद्दल कुणालाच माहीत नाही.

कर्नल साहेब, छान लिहिलेले आहे. तुमच्या लिखाणामुळे
इस्पिकचा एक्का उर्फ डॉ सुहास म्हात्रे यांची आठवण आली... ते कुठे गायबलेत कोणास ठाऊक ? बराच काळ मिपावर दिसले नाहीत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekar

कर्नलतपस्वी's picture

10 Jul 2022 - 3:10 pm | कर्नलतपस्वी

चला कुणाची तरी आठवण आमच्यामुळे आली.