ऑपरेशन गंगा

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
12 Mar 2022 - 10:52 am

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू झालेल्या संघर्षामुळे सुमारे 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी हाती घेण्यात आलेले ऑपरेशन गंगा 10 मार्चला संपन्न झाले. या मोहिमेत भारतीय हवाईदलाबरोबरच एअर इंडिया, एअर एशिया, स्पाईसजेट, इंडिगो, विस्तारा आणि गो फर्स्ट या विमान कंपन्यांची विमानेही सहभागी झाली होती. भारताकडे परत येत असताना भारताच्या विमानांमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश अशा शेजारी देशांच्या नागरिकांनाही संकटग्रस्त भागातून परत आणले गेले.

भारतीयांना युद्धग्रस्त युक्रेनमधून परत आणण्याची प्रक्रिया 22 फेब्रुवारीला सुरू करण्यात आली. त्यानंतर भारतातून धाडलेली विमानं बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट, हंगेरीची राजधानी बुडापेस्ट, स्लोव्हाकियातील कोशित्सा (Košice), रोमानियातील सुचावा (Suceava) आणि पोलंडमधील झेझो (Rzeszów) इथून भारतीयांना घेऊन मुंबई आणि दिल्लीला परतू लागली. दरम्यानच्या काळात युक्रेनमधील संघर्ष अधिक तीव्र होत गेला होता. त्यामुळे संकटग्रस्त युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवून 2 मार्चपासून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) ही मोहीम हाती घेतली गेली.

ऑपरेशन गंगामध्ये भारतीय हवाईदलालाही सहभागी करून घेतलं गेलं. त्यामुळं 2 मार्चपासून भारतीय हवाईदलाची सी-17 ग्लोबमास्टर-3 विमानंही भारतीयांना परत आणण्यासाठी पूर्व युरोपातील विमानतळांकडे झेपावण्यास सुरुवात झाली. भारतीय हवाईदलाने या मोहिमेत भाग घेतल्यावर सी-17 विमानांनी भारतातून जाताना संबंधित देशांना देण्यात येणारे मानवीय मदतसाहित्य नेण्यास सुरुवात केली. भारत आणि या देशांदरम्यानचे हवाई अंतर सुमारे 4,800 किलोमीटर आहे. पण हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून न जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सी-17 विमानांना जाताना-येताना जास्त अंतर कापावे लागले.

संकटग्रस्त प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्याची ऑपरेशन गंगा ही भारताने राबवलेली काही पहिलीच मोहीम नव्हती. त्याआधीही कित्येक वर्षांपासून भारत अशा मोहिमा यशस्वीपणे राबवत आला आहे. ऑपरेशन गंगाच्या निमित्ताने त्यापैकी भारतीय हवाईदलाचा सहभाग असलेल्या मोहिमांचाच या लेखात उल्लेख केला आहे. भारतीय हवाईदलाने यापूर्वी 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे येमेनसाठी (ऑपरेशन राहत) आणि दक्षिण सुदानसाठी (ऑपरेशन संकट मोचन) राबवली होती. ‘ऑपरेशन राहत’च्यावेळी भारताने आपल्या नागरिकांबरोबरच अमेरिका आणि कॅनडासह 23 देशांच्या नागरिकांचीही सुटका केली होती. त्याआधी 1990 मध्ये पहिल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या विमानांच्या मदतीने कुवेतमधून 1 लाख 70 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना मायदेशी परत आणले होते. त्यामध्ये भारतीय हवाईदलाचे वैमानिकही सहभागी झालेले होते. कमीतकमी कालावधीत परदेशातून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणत्याही देशाकडून राबवली गेलेली ती जगातील आजपर्यंतची सर्वात मोठी हवाई मानवीय बचाव मोहीम ठरली आहे. त्यानंतर 2011 मध्ये लिबियात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सेफ होमकमिंग (Operation Safe Homecoming) राबवले गेले होते.

‘लाल सेने’च्या माघारीनंतर 1992 मध्ये अफगाणिस्तानातील राजकीय परिस्थिती अतिशय बिघडली होती. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाईदलाने आपत्कालीन मोहीम राबवून ‘एएन-32’ विमानाने काबूलमधील भारतीय राजदूत आणि त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुरक्षित सुटका केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये नाटोने (NATO) अफगाणिस्तानची सूत्रं तालिबानकडे देण्याची घोषणा केल्यावर तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय हवाईदलाने ऑपरेशन देवी शक्ती राबवले होते.

हवामान बदलामुळे पूर, चक्रीवादळं, हिमस्खलन, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा जगातील सर्व देशांना वारंवार फटका बसू लागला आहे. अशा आपत्तीच्या काळात भारत परदेशांना तातडीने मदत पोहचवत आला आहे. अशा प्रकारच्या मदतीचा भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होत आहे. म्हणूनच देशाबाहेर येणाऱ्या आपत्तींच्या काळात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय एकमेकांशी समन्वय राखत योजना आखत असतात.

परदेशी भूमीवर आलेली संकटे नैसर्गिक आणि मानवी अशा दोन्ही प्रकारची असू शकतात. यापैकी कोणत्याही संकटाच्यावेळी एखाद्या देशात तातडीने मदत पोहचवणे, त्या प्रदेशातून आपल्या नागरिकांची सुखरुप सुटका करणे यांसारख्या बाबी प्रत्येक देशासाठी आपल्या हितसंबंधांचे प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असतात. त्यातून आपल्या राष्ट्रशक्तीचेही प्रदर्शन होत राहते. भारताने डिसेंबर 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीच्या काळात इंडोनेशिया, श्रीलंका, मालदिवज् या देशांना तातडीने मदत पोहचवली होती.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2022/03/blog-post_12.html?m=1

धोरणराजकारणसमीक्षालेखमतमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Mar 2022 - 11:51 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद....

शाम भागवत's picture

12 Mar 2022 - 12:45 pm | शाम भागवत

सुंदर माहिती.
कोणताही अभिनिवेश न ठेवता आलेली माहीती खूप सुखावह असते.
_/\_

पराग१२२६३'s picture

12 Mar 2022 - 3:55 pm | पराग१२२६३

या लेखात नजरचुकीने बल्गेरियाची राजधानी बुखारेस्ट असा उल्लेख राहून गेला आहे. तो रोमानियाची राजधानी बुखारेस्ट असा हवा होता.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Mar 2022 - 8:24 pm | अमरेंद्र बाहुबली

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर?
ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी?
ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 Mar 2022 - 8:41 pm | अमरेंद्र बाहुबली

भारत सरकारने युक्रेन मधून विद्यार्थी आणले की आजूबाजूच्या देशातून? प्रत्यक्ष युध्द भूमीतून किती लोक काढले बाहेर?
ती मूलं जर बाजूच्या देशात स्वतहून पोहोचली असतील तर ओपरेशन गंगा कशासाठी राबवलं? फक्त त्या मुलांचं भाडं वाचवण्यासाठी?
ती मुलं तर नकारात्मक प्रतिक्रीया देताहेत. काहीनी तर मोदी झिंदाबाद घोषणाही दिली नाही, काहींनी मंत्र्याच्या नमस्काराला परत नमस्कार घातला नाही. अनेकांनी मदत मिळाली नाही, ऐंबेसीच्या लोकानी फोन घेतला नाही अशी तक्रार केली, रोमानीयातील एका शहराचे महापौर कॅमेरे नी पत्रकार घेऊन आलेल्या ज्योती. शिंदेंवर भडकले.

पराग१२२६३'s picture

12 Mar 2022 - 9:40 pm | पराग१२२६३

यंदाच्या मोहिमेला प्रचारकी बाजूही होती, हे खेदानं मान्य करावं लागतंय.

रोमानियाच्या माणसाचे वागणे काही रुचले नाही बुवा. फार भडक माथ्याचा माणूस वाटला. सिंधिया सभ्यपणे बोलले.

sunil kachure's picture

12 Mar 2022 - 8:53 pm | sunil kachure

सरकार म्हणून सरकार ची काही तरी कर्तव्य असतात.
ते काम कारणे सरकार कडून अपेक्षित च असते.
नाही तर सरकार हवं च कशाला फक्त टॅक्स गोळा करणे आणि लोकांवर निर्बंध टाकणे ह्या साठी.
सरकार त्यांचे काम केले आहे त्याची जाहिरात करण्याचे काही कारण नाही.
झाडून सर्व हिंदी चॅनेल ऑपरेशन गंगा वर च 24 तास चालले होते.
बाकी सर्व न्यूज गायब.
फक्त सरकार ची कृपा दृष्टी राहावी ह्या साठी हे हिंदी चॅनल वाले चापलुसी करत असतात.

पराग१२२६३'s picture

12 Mar 2022 - 9:41 pm | पराग१२२६३

सहमत.

सुखीमाणूस's picture

13 Mar 2022 - 12:04 am | सुखीमाणूस

आता काचेच्या घरात राहतो आहोत. सोशल मीडिआ मुळे प्रत्येक गोष्टीची बातमी काही सेकन्दात सगळीकडे पोचते.
१९९० साली कुवेत युद्ध झाले तेव्हा आपण दुरदर्शन वरील बातम्या आणि वर्तमानपत्रे यावर फक्त अवलम्बुन होतो. त्यामुळे अडकलेल्या लोकान्च्या भावना आणि सरकारचे सुटकेचे प्रयत्न यातील यश किवा त्रुटी हे मर्यादीत प्रमाणात आपल्यापर्यन्त पोहोचत होते. तेही बरचसे सरकारी नियन्त्रणा़खाली.
आता तसे नाही. आपल्यावर माहितीचा सतत मारा होत असतो. त्यामुळे दोन्ही बाजु जास्त ठळकपणे (किवा बटबटीतपणे) पुढे येत असतात
त्यात नेमका पाच राज्यातला निवडणुकान्चा काळ. त्यामुळे अजुन कहर झाला विरुध्द बाजुने सरकारचे अपयश दाखवायचा आणि सरकारकडुन यश दाखवायचा..
चालायचच!! कोणी सगळीकडे सन्स्थाना, विमान्तळाना, सरकारी इमारतीना स्वताची नाव देउन अजरामर व्ह्यायचा प्रयत्न करते तर कोणी केलेल्या कामाचे मार्केटीन्ग करुन...