लिहिणं

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
29 Dec 2021 - 10:04 pm

लिहिणं म्हणजे नेमकं काय आणि मी का लिहितो या प्रश्नांचं उत्तर शोधावसं वाटतं कधी कधी, आणि मी लिहायला घेतो. खरं तर, एवढं सांगून हे लिहिणं संपू शकतं एवढं सोपं आणि सहज आहे, किंवा असायला हवं, लिहिणं!

एकटेपणा ते एकांत अशा प्रवासात सोबत म्हणून असेल कदाचित, लिहिणं मला जवळचं वाटलं. आणि लिखाणाशी झालेली मैत्री व जवळीक जास्त प्रकर्षाने जाणवली. मी पाहिलेलं आणि पाहत असलेलं भोवतालचं विश्व माझ्या शब्दात मांडणं, आठवणींमध्ये रमणं, आणि त्या लिहिणं मला भावलं. खूप काही वाचायचं राहून गेलं, अशी खंतही वाटते, पण जे थोडं फार वाचता आणि वेचता आलं, त्यातून लिहिण्यासाठी ऊर्जा मिळाली.

आईच्या वाचण्या-लिहिण्याचाही माझ्यावर प्रभाव पडला. तिला वाचायची खूप आवड होती, ती लिहायचीही कधी कधी. पण ती स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकली नाही, हे मला बऱ्याचदा जाणवायचं. तिचं भावविश्व मर्यादित राहिलं. कदाचित तिथूनही मला लिहावसं वाटलं असेल.

प्रत्येक माणसाचं आयुष्य वेगळं आणि अद्वितीय असतं. विचार-आचार, जडण-घडण, भूत-वर्तमान यांचं ते अनोखं रसायन असतं. प्रत्येकाकडे सांगायला स्वतःची अशी एक कथा असते, वेगळी अशी एक विचारसरणी असते, जगाकडे पाहण्याची स्वतःची एक दृष्टी असते. या अभिव्यक्तीसाठी विचार-आचारांच्या पलीकडे जाऊन संवाद साधणं लिखाणामुळं शक्य होतं, असं मला वाटतं.

अगदी मोजक्या शब्दात सांगायचं म्हटलं तर -- विचार आणि शब्द यातलं अंतर, स्वतःशी संवाद साधून, शक्य तितक्या प्रामाणिकपणे पार करणं, त्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे लिहिणं!

(मिपाकर लिहिण्यावर लिहितीलंच! वाचण्यास उत्सुक.)

मांडणीसाहित्यिकप्रकटनविचारलेखमत

प्रतिक्रिया

लिहीलेले अगदी मनापासून लिहीले ते लिहीतांना जे काय सायास करावे लागतात ते केवळ लिहून समजत नाहीत तर ते वाचून अन मग कागदावर लिहून दुसर्‍यांपर्यंत लिहीणे कसे समजेल याचे प्रयत्न करणे अन ते मिळाल्यानंतर त्यांनी उत्तरात काय लिहीले आहे ते उलट टपाली (पक्षी प्रतिसादात) मिळणे हा लिखाण श्रेष्ठ झाल्याची पावती असते असे कुणीतरी लिहीलेले (पक्षी आम्हीच) वाचल्याचे आठवल्याने लगोलग उलट टपाली (मी पयला प्रतिसाद) लिहीले व ते तुम्हास प्राप्त होवून आपणही यावर लिहावे असे लिहून मी दोन शब्द लिहून संपवतो.

खरे तर लिहील्याने माणूस जास्त प्रगल्भ होत असतो. बोलणे अन लिहीणे यात जबाबदारीचे अंतर असते. बोलून माणूस मोकळा होतो. परिणाम क्षणीक असतात. परंतु लिहीलेले कायम राहणार असल्याचे बोलणार्‍याला समजत असते. त्यामुळे आपोआप जबाबदारीने लिहावे लागते.

छान मनोगत लिहीले आहे.

श्रीगणेशा's picture

30 Dec 2021 - 3:46 pm | श्रीगणेशा

धन्यवाद पाषाणभेद _/\_
खरं आहे, वाचणारं कोणी असल्याशिवाय लिहिण्याला अर्थ नाही!

प्राची अश्विनी's picture

1 Jan 2022 - 7:14 am | प्राची अश्विनी

लिहिणा-याने लिहीत जावे,
वाचणा-याने वाचत जावे,
वाचता वाचता वाचणा-याने, लिहिणा-याचे हात घ्यावे..
:)

श्रीगणेशा's picture

1 Jan 2022 - 11:25 pm | श्रीगणेशा

धन्यवाद प्राची अश्विनी _/\_

प्रतिसादाला उत्तर म्हणून फक्त धन्यवाद लिहिल्याने मूळ लिखाणाची जाहिरात वाटते खरी, पण इथे प्रतिसादही वाचनीय असतात, त्यामुळे त्यावर प्रतिसाद देणं प्राप्त आहे!

कर्नलतपस्वी's picture

2 Jan 2022 - 11:46 am | कर्नलतपस्वी

दाद(प्रतीसाद) देणं खूप महत्त्वाचं असतं.....
यावर ऐक छोटे मुक्तक खुप पुर्वी लिहीले होते ते वेगळे शेअर करतो.

श्रीगणेशा's picture

3 Jan 2022 - 3:30 pm | श्रीगणेशा

धन्यवाद कर्नल साहेब _/\_
आपलं "प्रतिसादा"वरील मुक्तक वाचायला आवडेल नक्की!

सौन्दर्य's picture

4 Jan 2022 - 12:05 am | सौन्दर्य

२००८ साली अमेरिकेत आल्यावर जवळचे कुटुंबीय सोडल्यास मराठी ऐकायला, बोलायला मिळत नव्हती. पुस्तके त्यांच्या वजनांमुळे खूप आणणे शक्य झाली नव्हती. त्यामुळे मराठीत संवाद साधण्याच्या आत्यंतिक इच्छेमुळे मित्रांना इमेलने विचार कळवायला लागलो. भूतकाळातील घटनांविषयी लिहू लागलो त्यातूनच काल्पनिक कथा लिहू लागलो. मित्रांनी, कुटुंबाच्या इतर मंडळींना ते आवडू लागलं. 'मैफिल-ए-मैत्र' नावाच्या एका ग्रुपवर लिहू लागलो, त्यातून एका मित्राने 'मिसळपाव' सुचवलं, मग येथेही लिहू लागलो. काही दिवाळी अंकात लेख प्रसिद्ध झाले. असं करता करता लिहू लागलो.

श्रीगणेशा's picture

5 Jan 2022 - 1:51 am | श्रीगणेशा

धन्यवाद सौंदर्य _/\_
मीही सुरुवातीला आठवणी लिहिल्या (अजूनही बऱ्याचदा लिहितो) कारणं त्या लिहिणं बऱ्यापैकी सोपं जातं. मात्र इतरही बरंच काही लिहायचा प्रयत्न आहे.

राघव's picture

4 Jan 2022 - 12:50 pm | राघव

लिहिणं अगदी आतून धक्का मारून बाहेर येतं ना.. ते खूप समाधान देऊन जातं.
या अनुषंगानं काही मागे लिहिलेलं -

स्फुट: रचना!

अनन्त्_यात्री's picture

4 Jan 2022 - 8:29 pm | अनन्त्_यात्री

आपणा दोघांचीही मनोगतं आवडली!

श्रीगणेशा's picture

5 Jan 2022 - 2:11 am | श्रीगणेशा

धन्यवाद अनन्त्_यात्री _/\_
आपल्या कविता वाचून मराठी भाषा परत एकदा नव्याने शिकत आहे.
त्यातील वेगळेपण, खोली आणि कल्पनाशक्ती प्रशंसनीय आहे _/\_

श्रीगणेशा's picture

5 Jan 2022 - 1:57 am | श्रीगणेशा

धन्यवाद राघव _/\_
स्फुट: रचना लेख खूप आवडला. लिहिण्याचा खूप बारकाईने विचार केला आहे त्यात _/\_

खरं आहे, आतून धक्का मारून आलेलं लिखाण अगदी नावीन्यपूर्ण, आणि स्वतःला समाधान वाटेल असंच असतं!

टर्मीनेटर's picture

4 Jan 2022 - 6:31 pm | टर्मीनेटर

मनोगत आवडले 👍
वाचनाची आवड आधी पासूनच असली तरी लिहिण्यातही आनंद मिळतो हा अनुभव मला मिपावरच मिळाला.
जमेल तसं इथे काही बाही लिहीत असतो आणि मिपाकर त्यावर प्रतिसाद देऊन पुढे लिहिण्यासाठी माझा हुरूप वाढवत असतात त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत!

श्रीगणेशा's picture

5 Jan 2022 - 2:33 am | श्रीगणेशा

धन्यवाद टर्मीनेटर _/\_
आपण मिपाकरांनी दिलेला प्रतिसाद वाचून हुरूप आला आहे. सर्व मिपाकरांचे आभार!
आणि प्रतिसादातून खूप काही वाचायला मिळालं!

मुक्त विहारि's picture

5 Jan 2022 - 6:41 am | मुक्त विहारि

मनांतील विचार लिहीण्यासाठी, मिपा सर्वोत्तम

श्रीगणेशा's picture

6 Jan 2022 - 12:08 am | श्रीगणेशा

धन्यवाद मुवि _/\_
आणि आजच्या आभासी जगात मिपावरील बरेच लेखक/वाचक स्वतःची खरी ओळख लपवत नाहीत याचेही विशेष कौतुक वाटते!