(आमचे परमस्नेही खासे सेनापती बहाद्दर गुले गुल्फाम अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी आम्हांस विनंती केली ऐसीजे.. मालकांचे विनंतीनुसार घडली हकिकत लिव्हणें आम्हांस भाग आसें.)
तर ते समयी शहर पुणे मुक्कामाचे दिवस मोठे मौजेचे..!
रात्रीचा उद्योग रात्री करावाच परंतु दिवसाहीं रात्रीचाच उद्योग करीत बैसावें, ऐसा आमचा सुवर्णकाळ चालिला आसें..!
ऐशाच येके संध्यासमयीं सूर्यास्त जालियानंतर दोन घटिका मौज करणें हेतूने आम्ही यारदोस्त 'बैसलों' होतों..!
परंतु येकमेकांचे आणि आलम दुनियेचे दोष काढितां काढितां मोठीच मौज येऊ लागल्यानें दोन घटिकांच्या चार-आठ घटिका कैशा होत गेल्या कळावयास मार्ग नाही..!
ऐसा माहौल ऐन रंगात आलां असतां मद्यसाठा खलास झालियाचें अकस्मात कळोन येताच मेहफिल बेजान होवोंन गेलीं आणि समस्तांमधी येकदम नाखुशी जाहली..!
कितीयेंक श्रमी जाहले.. कितीयेंक कष्टी जाहलें..
काहींयेक माफक गालिप्रदान करों लागलें... कितीयेकांस शोक आवरेंना..मनुष्य मयत जालियावरी जैसा शोक करतात तैसा शोक करू लागलें.. येकच कलकलाट होवों लागलां..!
ह्यावरी अवरंगाबादकर बहाद्दुरांनी सर्वांस बळ बांधोन हिंमत दिल्ही की "ये समयी मद्यसाठा काही आकाश फाडोन आपोआप पुढ्यांत येवोन पडणार नाही..! वखतही बहुत जाहला आसें. तुरंत जावोन कुमक करावी लागतें...! जो कुणीं जावोन ऐवज घेवोन येईल तयाचि मोठी कीर्त होईल..!"
ऐसे भाषण ऐकोंन कलकलाट पळभर शांत जाला.
तें समयीं कोलापूरकर बोलिलें की "तूवाच जावोंन घेवोंन यावें.. ये प्रसंगी तूच आमची आबरू राखावीस.. पैका दुपट द्यावा लागला तरी चिंता करों नयें, परंतु ऐवज घेवोनच माघारी यावें. रिकामें हात हलवित माघारें याल तर नामोष्की पदरीं पडेल, हे याद राखावें..! समागमें ह्या सोलापूरकरियांसही उचलोंन घेवोन जावें. हा भुरटाचिया आज बहुतच वायफळ बोलतों आहें..!"
ह्यावर अवरंगाबादकरियांस स्फुरण चढिलें आणि शिरस्त्राण वस्त्रे आदी परिधान करोन आम्हांस समागमें घेवोन चढे दुचाकियानिसीं कूच केले...!
रात्रीचा वखत फारा जाहलेला. तें कारणें चार कोसांवरील समस्त वोळखीच्या मद्यांच्या दुकानांस भलेमोठे टाळे लागलेले.
अवरंगाबादकर मनसूबा बोलिलें की "प्रसंग मोठा बाका आहें. आधी चखनियाचा जुगाड करावा, नाहीं तो सगळेच गेले आणि हाती फकस्त धुपाटणे राहिलें, ऐशी गत होईल..!"
ह्यावर आम्हीं मसलत दिल्ही की "चखना कोठे पळोंन जातो की काय..! आणि चखन्यावाचोन कुणाचे काय आडतें? तेंव्हा आधी मद्याचा बंदोबस्त करावा आणि मग पुढे जैसे काही करणें ते एकविचारें करावें..!"
तत्समयी ऐसेच धुंडाळीत असतां येके जागीं आम्हांस लांबूनच दिसोन आलें की येका दुकानाचें द्वार आस्ते आस्ते बंद होतें आहे.
आम्हीं त्वरा करून त्यांस गाठिलें आणि विनंती केलीं ''शेठजी, येवढी गडबड कशासाटी? पळभर थांबावे आणि आम्हांस आनंददायी रसायनाचे दोन बुधले काढोन द्यावेत.''
ह्यावर शेठजी यांनी निष्ठूरपणे मना केलें. ते पाहोन आम्हांस वीज मस्तकी पडावी ऐसे जाहले..! मोठाच निर्वाणीचा प्रसंग आम्हावरी आला..! परंतु ऐशा प्रसंगीच आमच्या वाणींस स्फुरण चढतें.
आम्ही बोललो की," शेठजी,ऐसे निर्दय होवों नयें.
गि-हाईकांस संतोस करावा हा तो तुमचा धर्म..! आम्ही वरकड पैकाही दुपट देणेंस राजी आहों आणि तरीही तुम्ही मना करता ही कवणीं उफराटी रीत जाहली? ऐसे ना करावें.''
ऐसे बुधिमान निरूपण ऐकलियावरी शेठजींनी जाबसाल केला की ''आम्हांस आता धर्मसंकटात टाकों नये. कारण वखत संपला असलेंमुळे कोतवालांचे मज भारी भय वाटते. तेंव्हा तुमी उगा पिरपिर न करता येथून निघावें, हे उत्तम.''
तरीही आम्ही पदर पसरोंन आर्जव करित राहिलों की "रातीचा बहुत वखत जाहला शेठजी. ये समयी आम्ही कोठें पिशाचासारखें फिरावें? आणि येक बुधला दिल्याने तुमच्या जीवांस काय कटकट होतें? तुम्हांस गि-हायीकांची परवा नाही, हे येकवेळ समजो शकतों, परंतु तुमीं थोडी मानुसकी दावायला काय हरकत आहे? आम्हीं हयातीभर तुमच्या तबेतीस दुवा देत राहू.!"
परंतु ऐसे विवेचन ऐकोन शेठजींचा आम्हाविसीं निष्कारण आपसमज जाहला आणि आम्हांकडे द्रिष्टीही न टाकिता थुलथुलीत शेठजी ओठांच्या आर्वाच्च हालचाली करून रातीच्या अंधारात डुलत डुलत गायब जहाले.
तोंवर कोल्हापूरकर आम्हांस वारंवार संदेस धाडून गालिप्रदान करत होते की, "नामाकुल! बेशरम! येवढां समय कैसा लागतों? कोठें गायब जाहला तुम्हीं? त्वरित ऐवज घेवोन यावें. येथे आता आम्हांस आधिक दम धरवत नाही **..ss !"
इत्यादी इत्यादी वाचोंन आमचें मनास बहुत विरक्ती आलीं.
आम्ही अवरंगाबादकरियांस मनसूबा दिल्हा की, "मालक, काम होत नाहीं असे दिसतें. आता माघारें फिरावें, हे उचित होईल."
परंतु अवरंगाबादकर बहुत कर्तबगार मनुष्य. तयांचे मनही बहुत टणक..!
ते बोलिले की," ये समयी आपेश घेवोन सर्वांस तोंड दावणें आम्हांस जमणार नाहीं..! आधीच आमची आपकिर्ती जगात तुम्ही बहुत करोन ठेविलीं आसें."
हा तडाखा आम्हीं हासत हासत वरचिया वर झेलिला. आसो.
रात्रीचा एक प्रहर समय असलेंकारणें रस्तियांवरी कुठें तुरळक इसम द्रिष्टीस पडतातीं. कुठे येखादं दुसरं वाहन आणि बहुतांशी मोकाट कुत्री इत्यादी दिसतातीं.
तैशा समयीं आम्ही आसें नामुष्क भिरभिर होवोंन फिरत असतां, आम्हास दिसोंन आले की येका अंधाऱ्या बोळातून येक फाटका कंगाल इसम बहुत तल्लीन आनंदी होवोन झुकांड्या देत आमच्यारोखें येतों आहें.!
त्यांस पाहोनी अवरंगाबादकरियांचे मनी कुतूहल जागृत जाले. त्यांनी नजीक जावोन त्या इसमास पुसलें की, "श्रीमान, आपण नुकतेच जे देशी किंवा तत्सम सस्ते आंग्रेजी मद्य प्राशन केलें आहे, तयाचे उगमस्थान आम्हां गरजूंस सांगू शकाल काय? मोठी मेहेरबानी होईल.''
यावर सदर इसम मायाळू होवोंन बोलिला की ''अवश्य सांगू.. त्यात कृपा वगैरेचा सवाल कोठून येतों? तमाम दुःखी कष्टी गरजू इत्यादींची तकलीफ निरास्त करणें, हे तर आमचं परमकर्तव्यच आहें..! साक्षात ईश्वरानेंच आम्हांस त्याकामी नेमिलें आहें. चलावेss आस्ते कदम आमचें पाठीं बिगीबिगी यावें..!'
सदर दैवी इसम देशी मद्याच्या प्रतापें पुरा कामातून गेला आहे, ही गोस्ट आम्ही त्वरित समजोन घेतली.
ते समयी अवरंगाबादकरियांनी मनसूबा बोलिला की "आता कवणा उपाय सिल्लक नाहीं. जें पदरी पडतें ते पवित्र मानिलें पाहिजें. समय व्यर्थ न दवडता ह्या झुकांड्या इसमामागें निघावें."
ऐसी मसलत करोंन सदर इसमामागें बोळाबोळांतून आदमास घेत घेत आम्हीं एका दरवाजियापासी पोहोंचलों असतां, तिथें आमच्यासारिख्या गरजू होतकरू इसमांची मुबलक दाटी दिसोन आली.
ते पाहोन आम्हांस आनंद जाहला.
भविष्यात वेळवखत पडिल्यास ऐसे चखोट ठिकाण माहित जालियामुळें तर तो आनंद आणखी अति थोर जाहला. आसो.
सेवटी ईश्वरें आनुकूल दान दिल्हे आणि आम्हांस मनासारिखा आंग्रेजी ऐवज प्राप्त जाहला...!
आम्ही मोहीम फते पावून सत्वर माघारें कूच केलें.
मुकामी आमचे स्नेही चातक पक्षियाप्रमाणे तृष्णेंने व्याकुळ होवोन इंतजार करीत होतें, ऐशी गत दिसोन आली.
समस्तांनी आमचा बहु जयजयकार सत्कार इत्यादी करून कल्लोळ उडवून दिल्हा.
ते समयी नगारें शहादनें इत्यादी साधनें आम्हापासीं नव्हतीं. आन्यथा ते हीं वाजविण्यास आम्हीं मागें पुढें पाहिलें नसतें..! आसो.
तर ते समयीचा आनंदकल्लोळ ल्हिवून कैसा वर्णावा हे आम्हांस ठावें नाहीं. पण गोस्ट मोठी चखोट जाहली, हे सूज्ञांच्या चित्तांस पावलें आसेलंच,ऐशी आम्हांस खातरी वाटतें.
याउपरी बहुत काय लिहिणें?
चूकभूल देणें घेणें.
(ह्याबद्दल तमाम बखरकार आम्हांस मोठ्या मनाने क्षमा करतील ऐसी आपेक्षा. लेखनसीमा.)
प्रतिक्रिया
3 Oct 2021 - 11:50 pm | कासव
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील
कळावे लोभ असावा
3 Oct 2021 - 11:50 pm | कासव
त्या जागेची खूण आपल्या नकाशा वर साठवून ठेवणे. एकाध्या आला गेल्या बुरा वखता ला ती जागा लोभ पावेल. त्या इसमाचा काही संपर्क अंक पण मिळाला तर दुधात साखरच. आपले कर्तबगार पुण्य नगरीचे नागरिक बहुत दुवा देतील
कळावे लोभ असावा
3 Oct 2021 - 11:58 pm | कपिलमुनी
भारी लिहिलंय
4 Oct 2021 - 12:46 am | रंगीला रतन
चखोट.
याउपरी बहुत काय लिहिणें? :=)
4 Oct 2021 - 8:45 am | सुखी
भारी लिवले
4 Oct 2021 - 12:46 pm | चांदणे संदीप
ऐसे बसणियाचे प्रसंग गतकाळी आम्हांवरी बहुत आले. ऐसिया बसण्याच्या समयी आम्हांस 'सावरकर' हे उपनाम लाभते. परंतु, ऐसे बुधले आणावयाच्या कष्टप्रद मोहीमेपासून ईश्वराने आम्हांस कायमच रक्षिले ह्याकारणे आम्ही ईश्वराचे सर्वस्वी आभारच मानतो.
पाटील सरकारांसी विनंती असें की, तयांनी कायमच आपल्या बोरूस धारेवर धरोन ऐसे लेखन मिपावर उमटवावे. __/\__
सं - दी - प
4 Oct 2021 - 7:52 pm | पाटिल
'डोलकरां'स सावरणेंसाटी कवण्या येकाने 'सावरकर' होणें बहुत जरूरी असें. बैठकीची ती ही बाजू कवणीतरीं सांभाळिली पाहिजें. नाही तों समस्त 'डोलकर' मंडळी बेहोष होवोनिया कवण्या थरास जाऊन कैसा उत्पात घडवितील, हे ज्ञान तैशा प्रसंगातून निभावलेल्यांसच ठावें..!
:-)) _/\_
4 Oct 2021 - 1:22 pm | गॉडजिला
पणं मला ती मजां आली नाही
4 Oct 2021 - 1:38 pm | टर्मीनेटर
निसटलेलं पान वाचुन संतोष जाहलां... 😀
मस्त! येउद्यात अजुन.
4 Oct 2021 - 2:48 pm | अनिंद्य
भले शाब्बास !
मोहीम फत्ते :-) :-)
4 Oct 2021 - 5:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...
झकास.
4 Oct 2021 - 6:01 pm | चौथा कोनाडा
लै बाहरी
😀
चित्र तंतोतंत डोळियापुढे उभे राहिले असें
🍷
लेखनास चियर्स म्हंणणे मनास कृतघ्नता वाटें
4 Oct 2021 - 7:33 pm | पाटिल
समस्तांची पोच पावलीं असें.
कवतुकाचे बोल ऐकोन फुर्ती येणें, हा तों मनुष्य स्वभाव..!
पाटीलही मनुष्यच असलें कारणें त्यांसही खुसी जाली..! :-))
ही कीर्त म-हाटी भासेची..!
आपुली म-हाटी बोली ऐशी आबरूदार असें, ऐशी डौलदार असें, ऐशी रगदार असें, ऐशी गोमटी आसें, ऐशी साजिरीं आसें आणि शब्दकळेच्या बहुविधतेची ऐसी मालकीण असें ही मरहट्टी भासा, कीं जो कवणें ल्हिवू बोलूं ऐको लागावें तो तयाचें रोखें आपसूकच बळ यावें, ह्यांत कैसे आच्छेर्य..!
:-)) _/\_
4 Oct 2021 - 8:02 pm | प्राची अश्विनी
:):) बखर भारी जमलीय.
4 Oct 2021 - 10:17 pm | बबन ताम्बे
शिकस्त करोन मोहीम आखीर फते जाहली, परमसंतोष जाहला.
अजून बखरीतली सुटी पाने येऊ द्या.
5 Oct 2021 - 12:27 am | सुक्या
मस्त. मजा आली वाचुन. अजुन येउ द्या ...
5 Oct 2021 - 2:44 am | शेखरमोघे
खाशियान्ची पुण्याई जबर - फत्ते करूनच स्वार्या परतल्या. प्रसन्ग बान्का, वर्णनही तितकेच बैजवार. मोहीमेवर आयत्या वेळी निघून फत्ते करून गनीम (म्हणजेच "सवता काही न करता फक्त कोकलणारे") जास्त जोर करणे आधीच स्वार परतही फिरले. वा, वा!!
वापसी नन्तरची खबर देखील थरारारकच असणार. येऊ दे लौकर.
7 Oct 2021 - 9:07 am | लई भारी
बेस्ट आहे! अजून लिहीत राहा :-)
7 Oct 2021 - 3:43 pm | बाजीगर
वाचोनी मोठाच संतोष जाला.
की आपण बवखत जावोनि ठाओठाई नाकार जालियावरी हे काज फतेह करोनि आलात.
चैतन्यद्रव्य आंग्ल मुलूखातले आणिले ही खासाच थोर बात जाहली.
टाकोटाक पुढली बखर लिहिनेस घेणे.
क्षेम.
7 Oct 2021 - 4:05 pm | अमरेंद्र बाहुबली
खरंच छान लिहीलंय पाटील साहेब. अजून नवं येऊद्या.
8 Oct 2021 - 12:26 am | उगा काहितरीच
बा हूच्छ लिखाणकाम हे वाचोनी आनंद जाहला. ऐसेची किमपी याउपरी हुच्छ लिखाणकाम करोनी समस्त मिपाकरांसी सादर करावे.
8 Oct 2021 - 1:44 am | गामा पैलवान
पाटीलबुवा,
तुमचा लेख फक्कड जमलाय. जाम आवडला. साधाच प्रसंग कसोशीने खुलवलाय.
आ.न.,
-गा.पै.
8 Oct 2021 - 7:44 am | ज्ञानोबाचे पैजार
ही अशी कित्येक पाने हरवलेली असतिल, ती शोधुन पुन्हा उजेडात आणणे हे मोठे पुण्याचेच काम म्हणावे लागेल,
अजून अशी काही पाने सापडली तर वाचायला द्या.
पैजारबुवा,