ब्रेथलेस

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
25 Sep 2021 - 12:55 pm

रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे मंडळी एका अतूट निष्ठेनं एकमेकांची मूठ गार करत दिवसरात्र खड्डेनिर्मितीत गुंतलेली असतात कारण खड्डे हे जनतेच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अतिआवश्यक असतात किंवा त्याहीपुढे जाऊन असं म्हणता येईल की खड्डेनिर्मितीच्या ध्येयाने झपाटलेले लोक म्हणजे खरंतर उच्च दर्जाचे आत्मज्ञानी वगैरे किंवा अत्यंत पोहोचलेले झेन गुरू वगैरे लोक असतात, ही मूलभूत बाब आपण एकदा समजून घेतली की मग आयुष्यात काही म्हणजे काहीच अडचण उरत नाही कारण शेवटी असं आहे की आपण एकदा घरातून बाहेर पडलो की गोष्टींवरचा कंट्रोल आपल्या हातात राहत नाही आणि आता हे उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर समजा सिग्नल सुटण्याची वाट बघत आपण अगदी घाईला आलेलो असतानाच भरचौकातला एखादा फ्लेक्सचा सांगाडा अकस्मात आपल्यावर कोसळला किंवा पोटावरचे चरबीचे थर कमी करण्याच्या हेतूने, ओह् माफ करा, म्हणजे समजा हेल्दी वगैरे राहण्याच्या हेतूने एखाद्या पहाटवेळी समजा आपण ओळखीच्याच रस्त्यावरून रमतगमत फिरायला वगैरे निघालेलो असताना अचानक उघड्या ड्रेनेजच्या एखाद्या मॅनहोलमधून आपलं शरीर गायब होताना पाहून स्वतःस आश्चर्यचकित वगैरे करण्याची संधी ही काही कमी दर्जाची म्हणता येणार नाही किंवा जाताजाता चुकून वीजेच्या डांबाला चिकटून तात्काळ जीवन्मुक्त होण्यापेक्षा एखाद्या मूड खराब असलेल्या ड्राइव्हरने समजा आपल्याला कट मारून आपले हातपाय वगैरे मोडून परस्पर ससूनला वगैरे ॲडमिट होण्याचं बक्षिस दिलं तर त्यातल्या त्यात ते चांगलंच म्हणावं लागेल किंवा अगदीच काही नाही तर समजा आपण गाडी पार्किंगच्या पांढऱ्या लाईनबाहेर किंचितशी लावली असल्यामुळे एखाद्या कर्तव्यदक्ष वगैरे ट्रॅफिक पोलिसाच्या भावना दुखावल्या गेल्यास आपली निगोशिएशनची तुटपुंजी कौशल्ये पणाला लावून प्रकरण थोडक्यात मिटवायच्या दृष्टीने हालचाली करण्याचा अनुभव तर आपल्याला हरहमेश उपलब्ध होत असतोच म्हणूनच खरंतर एवढं लांबलचक वाक्य लिहिण्यापेक्षा, आपल्या अस्तित्वाला आपणच जबाबदार असतो, अशा प्रकारचा अस्तित्ववादी निष्कर्ष सुरूवातीलाच डिक्लेअर केला असता तर जमलं असतं पण म्हटलं की उगाच ते अस्तित्व की फिस्तित्ववादी लिहून वाचणाऱ्यांचे डोळे भरून वगैरे आले तर मग ते त्यांना जरासं अडचणीचंच होणार कारण एकतर रूमाल वगैरे सामुग्री घेऊन वाचायला बसण्याएवढा महान कुणीच नसतो आणि समजा वाचता वाचता रडायला बिडायला यायला लागलेलं असतानाच नेमकं त्याच वेळी कुणी त्यास पाहिलं तर मी अगदीच काही अलका कुबल वगैरे नाही हे पटवून देण्यासाठी माणसं, छे! छे! तसं काही नाही‌, वगैरे स्वरूपाचे उद्गार त्वरित काढायला लागतात म्हणून यामागे नेमकं समाजशास्त्रीय कारण काय असावं हे शोधून काढण्यासाठी आपल्याकडच्या तुपाळ पोटबाबूंची एक समिती वगैरे नेमण्यापेक्षा सरळसरळ एखाद्या बलाढ्य मल्टीनॅशनल कंपनीलाच हे कंत्राट देऊन त्यांनाच मानवी दु:खाची मूळ कारणं आणि तत्संबंधी उपाय वगैरे शोधायला सांगावं कारण हे चकाचक मल्टीनॅशनलवाले कार्पोरेट्स आपल्या जीवनात आनंदीआनंद आणण्याच्या कामात भलतेच चेकाळलेले दिसून असतात परंतु आपल्याला आनंदी करण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे जे काही किडुकमिडूक शिल्लक राहिलेलं आहे तेसुद्धा लुटून फस्त करून आपल्याला पूर्णपणे कंगाल भणंग केल्यानंतरच ह्या जगङव्याळ कार्पोरेट यंत्रणा बहुदा शांत होतील परंतु किमान तोपर्यंत तरी थोडीफार धुगधुगी आपल्यात शिल्लक ठेवली जाईल ही आशा बाळगत तूर्तास आपण खुशीची गाजरं खात रहायला हरकत नाही..!
तर अशा प्रकारे वाक्यात विरामचिन्हांचा वगैरे वापर न केल्यामुळे आता हा बाबा थांबतोय की नाही ह्यासंबंधाने विचार करत करत एका वाक्यावरून दुसऱ्या वाक्यावर धापा टाकत चाललेला असतानाच मध्येच काही मजकूर असा येतो की ज्यामध्ये एकाच वाक्यात तब्बल तीन तीन नकार वापरलेले दिसतात आणि मग माफक चीडचीड व्हायला लागते की आता ह्याचा नेमका अर्थ काय लावावा की हा नादच सोडून देऊन हरी हरी करत बसावं म्हटलं तर खरी गोष्ट लक्षात येते की सदर माणसाला लांबलचक वाक्याच्या कवचाखाली लपून आपली असंबद्ध बडबड धूर्तपणे वापरण्याची भलतीच खोड दिसते आहे परंतु हे ही एकवेळ समजा सहानुभूतीपूर्वक समजून घेतलं तरीही त्या असंबद्ध बडबडीलाच जर कुणी मराठी साहित्यातील ह्या शतकातील महान आविष्कार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करू लागला तर त्यास तातडीने येरवडा किंवा ठाणे किंवा मिरज वगैरे ठिकाणी जेथे मानसिक चंचलतेसंबंधी उपचार करणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत तेथे नेऊन सोडण्यासंबंधी गुपचूप हालचाली कराव्या म्हटलं तरी त्या संस्था सुद्धा अॉलरेडी हाऊसफुल्ल भरून वाहत असल्याचे निदर्शनास येईल कारण सांप्रतकाळी शहाणे आणि वेडे यातला फरक करणं एवढं मुश्किल होत चाललेलं आहे की वेडेपणासंबंधी जे जुने निकष होते ते बदलण्याची महत्वाची कामगिरी आता केवळ एका देशाच्या पार्लमेंटला वगैरे झेपणारी नाही आणि म्हणूनच सदर काम तात्काळ युनो किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे संस्थांकडे सुपूर्द केले पाहिजे कारण जगभरातील सगळे शहाणे चतुरलिंगम लोक त्याच ठिकाणी दबा धरून बसलेले असतात ही सर्वश्रुत गोष्ट समजा आपल्याकडच्या लोकसत्तेच्या वगैरे संपादकांस कळवली असता त्यांस माफक क्रोध येईल की काय असे भय वाटते कारण त्यांची वैश्विक संपादकीय दृष्टी हरहमेश जागतिक पातळीवरील घटनांचं विश्लेषण करण्यात एवढ्या भराऱ्या मारत असते की इथल्या तमाम फाटक्या तुटक्या लोकांनी तात्काळ विमान वगैरे पकडून किंवा खरंतर विमानाच्या तिकीटाचा विचारही हास्यास्पद वाटण्याएवढी हालत खस्ता कंगाल दिवाळखोर असल्यामुळे बोचकी पाठीवर बांधून सरळ समुद्रमार्गे पोहत पोहत थेट अमेरिका ब्रिटन जर्मनी फ्रान्स किंवा तत्सम कॅनडा वगैरे देशांकडे प्रस्थान केले तर सगळेच लोक एका झटक्यात ग्लोबल वगैरे होऊन सगळ्यांसाठीच विन-विन की काय म्हणतात तसली सिच्युएशन होऊन चोहीकडे आनंदीआनंदाच्या लाटा पसरत जातील असा एक आपला अंदाज आहे..!

मुक्तकभाषाजीवनमानप्रकटनलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

25 Sep 2021 - 1:25 pm | गॉडजिला

एकदम पीजी वोडहाउस आठवले. पानभर पॅराग्राफ अन पॅराग्राफच्या शेवटीच काय तो फुल्स्टोप.

पाटिल's picture

25 Sep 2021 - 6:32 pm | पाटिल

धन्यवाद गॉडजिला :-))
तुम्ही ते शेवटपर्यंत वाचलंत हेच विशेष :-)

खेडूत's picture

25 Sep 2021 - 8:49 pm | खेडूत

मस्त मस्त!
प्रयोग आवडला आणि लेखही..

इंद्रधनू's picture

25 Sep 2021 - 11:23 pm | इंद्रधनू

क्या बात! जबरी लिहिलंय

सोत्रि's picture

26 Sep 2021 - 4:53 am | सोत्रि

सर्वश्रुत गोष्ट समजा आपल्याकडच्या लोकसत्तेच्या वगैरे संपादकांस कळवली असता त्यांस माफक क्रोध येईल की काय असे भय वाटते कारण त्यांची वैश्विक संपादकीय दृष्टी हरहमेश जागतिक पातळीवरील घटनांचं विश्लेषण करण्यात एवढ्या भराऱ्या मारत असते

:=))

प्रयोग आवडला!!

- (वाचून दम लागलेला) सोकाजी

hrkorde's picture

26 Sep 2021 - 4:36 pm | hrkorde

छान

वामन देशमुख's picture

26 Sep 2021 - 8:32 pm | वामन देशमुख

बापरे! धाप लागली वाचताना!
बाकी, लेखनप्रयोग छान वाटला.

सविता००१'s picture

27 Sep 2021 - 11:41 am | सविता००१

किती भारी लिहिलंय... आवडलं

कर्नलतपस्वी's picture

28 Sep 2021 - 10:51 am | कर्नलतपस्वी

आपले दोन्ही लेख वाचले मस्तच लिहिलंय

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Sep 2021 - 11:39 am | राजेंद्र मेहेंदळे

शेवटपर्यंत वाचला पण डोक्यावरुन गेला

रंगीला रतन's picture

28 Sep 2021 - 12:03 pm | रंगीला रतन

प्रयोग आडवला.
नवीन मराठी भाशा वापरून सगल्या वेलांत्या आनी उकार दीर्घ केले अस्ते तर लय भारी वाटला अस्ता म्हंजे कूणी अवीशकार असा :=)

गॉडजिला's picture

28 Sep 2021 - 12:25 pm | गॉडजिला

कूणी अवीशकार असा

हा हा हा.
रतनजी, पाटिल साहेब आविश्कारी आजिबात नाहीत, फक्त थोडे प्रयोगशील आहेत… कधी फसतात कधी चालतात पण बहुतेक वेळा दाद घेउन जातात :)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Sep 2021 - 4:19 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान.
लेखनप्रकार आवडला.

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2021 - 9:22 am | प्राची अश्विनी

काय अफाट सुंदर लिहिलंय. वाह!